अजि म्या ब्रह्म पाहिले

शीर्षकाचा श्रेयाव्हेर - (असे लेखाच्या सुरुवातीसच करण्याची पद्धत नसली तरी श्री. श्रावण मोडक यांच्या अन्य संस्थळावर वाचलेल्या एका प्रतिसादावरून हे शीर्षक सुचले आहे हे मान्य करतो.)
प्रथम काही विस्कळीत विचार आणि मग चर्चा प्रस्ताव -
१.
'अजि म्या ब्रह्म पाहिले' हा पैठणचे संतश्रेष्ठ अमृतराय यांचा अभंग किंवा गीत. पूर्व जीवनात अत्यंत उर्मट आणि नास्तिक असलेल्या अमृतरायाने आपल्या कठोर शब्दांत अनेक कटाव लिहून भल्याभल्या विष्णुदासांची भंबेरी उडवली. त्यातून मध्वाचार्यांसारखे वैष्णव संतही सुटले नाहीत. पण मध्वाचार्यांनी शांतपणे आपली मते अमृतरायाला पटवून दिली आणि हळूहळू अमृतरायाचा हरिभक्त कीर्तनकार झाला. आजही अनेक कीर्तनकार संत अमृतराय यांच्या अनेक काव्यपंक्तींचा उल्लेख आपल्या कीर्तनातून करत असतात. पण अमृतरायांच्या या भक्तीपूर्ण कवनाचा या चर्चेशी कसलाही संबंध नाही.
२.
सर्न, जिनिव्हा येथे ४ जुलै २०१२ रोजी 'हिग्ज बोसॉन' सदृश्य एका मूलकणाचा माग काढण्यात सीएमएस आणि अ‍ॅटलस अशा दोन संशोधन मंडळांना यश आले. १९६२ साली अनुमानित केल्या गेलेल्या या कणाच्या अस्तित्व-पुराव्यामुळे विश्वाच्या निर्मितीचे आणि अस्तित्वाचे कोडे सोडवण्यात आणखी थोडे यश मिळेल.परंतु हा शोधला जाणारा शेवटचा मूलकण नसावा अशी शंका दस्तुरखुद्द संशोधकांनीच व्यक्त केल्याने यापुढेही ही शोधप्रक्रिया सुरूच राहणार असे दिसते.
३.
नोबेल पारितोषिक विजेत्या लिऑन मॅक्स लेडरमन या शास्त्रज्ञाने आपल्या एका जनताभिमुख पुस्तकात हिग्ज बोसॉनला गॉड पार्टिकल असे संबोधले. तसे करण्यामागचा त्याचा उद्देश पूर्णपणे वेगळा होता. स्वतः तो किंवा अनुमान करणारा पीटर हिग्ज या दोघांनाही तो उल्लेख चुकीचा वाटत असला तरी तथाकथित 'विज्ञानविरोधकांनी'(किंवा देवाचे अस्तित्व मानणार्‍यांनी) तो शब्द उचलून धरला आणि विज्ञानसुद्धा ईश्वराला मानते असा सोयिस्कर प्रचार सुरू केला.
४.
हिग्ज बोसॉन शोधला गेल्याने विश्वाच्या निर्मिती आणि अस्तित्वाचा प्रश्न विज्ञानाच्या अखत्यारीत आला आणि त्यामुळे ईश्वर नाही हे सिद्ध होते असे काहीतरी प्रमेय मांडण्याचा काही उथळ विज्ञानवाद्यांचा (नास्तिकांचा) प्रयत्न विनाकारण सुरू झाल्याचे दिसले. विनाकारण म्हणण्याचे कारण असे की कोणत्याही जबाबदार वैज्ञानिकाने असे विधान केलेले नाही.(-करण्याचे कारणच नाही / संबंधच नाही.)
५. हिग्ज फील्ड(कन्डेन्सेट), आईनस्टाईनचा कॉस्मॉलॉजिकल कॉन्स्टंट (ईथर)हे वैज्ञानिक तर्क एका विश्वव्यापी माध्यमाचा उच्चार करतात.गणितात कॉस्मॉलॉजिकल कॉन्स्टंट आला तेव्हा आईनस्टाईनला चूक ठरवले गेले. त्यानेही ती आपली सर्वात मोठी चूक असल्याचे मान्य केले. आता पुन्हा त्यावर विचार सुरू आहे.असे हे सर्वव्यापी माध्यम आहे तरी का? आणि असलेच तर कसे आहे? असे-नाही, तसे-नाही. (नेति, नेति) पण हिग्ज फील्ड एक्साईट होऊन (लाटेतून एखादा थेंब उडावा तद्वत) त्याचा खंड उडाला की हिग्ज बोसॉन दिसतो आणि परत लगेच हिग्ज फील्डमध्ये लुप्त होतो. (म्हणजे हिग्ज फील्ड/कन्डेसेट आहे....!?) म्हणजे म्हटले तर थेंबाथेंबापासून लाट तयार होते - म्हटले तर लाटेतून थेंब उडतो आहे. समुद्र-थेंब दोन्ही एकच. (ब्रह्म आणि विश्व दोन्ही एकच!!) असे बापरे! हे विचार तर भलतीकडेच निघाले.
६.पुढे जाऊ या. पीटर हिग्ज आणि प्रभृतींनी भाकित केलेल्या एका कणाचे अस्तित्व प्रयोगाने सिद्ध होण्यास तब्बल ६० वर्षे लागली. त्यासाठी मानवाच्या भौतिक प्रगतीला मोठीच झेप घ्यावी लागली.यापुढचा मार्ग तर आणखीच बिकट होणार. हिग्ज बोसॉन हा एक कण नसून कणमालिका आहे असे संकेत मिळत आहेत. या कण-मालिकेचे गणिती भाकित काही शास्त्रज्ञ करतील. त्या कणांचे अस्तित्व शाबित करण्यासाठी आणखी काही वर्षे जातील. म्हणजे नव्या शोधाने विज्ञानाचे क्षितीज आणखी दूर नेले.पुन्हा भाकित, पुन्हा निरीक्षण...
७. विज्ञानाची झेप कितीही मोठी असली तरी 'प्लँक'ने मोठीच (की फारच लहान?) फळी आडथळा म्हणून उभी केली आहे. (प्लँक लेंग्थ,प्लँक मास,प्लँक टाईम...) तिच्या खालून या विश्वातील काहीही सरपटू शकत नाही. आजही ज्या पातळीवर ही कणांची मोजमापे होत आहेत ती सर्व संख्याशास्त्रीय विश्लेषणे आहेत. (125 GeV/c2 ~5 σ..)आज जी फील्ड्स अस्तित्वात असल्याचे भाकित शास्त्रज्ञ करत आहेत ती कंटिन्युअस असली तर डिस्क्रीट/ग्रॅन्युलर (कण स्वरूपात) त्यांची अंतिम मर्यादा मोजता येणेच शक्य नाही. अशा ->० पातळीवर वैज्ञानिकांचा गणिती तर्क पोचणार यात शंकाच नाही. पण प्रयोगकर्ते वै़ज्ञानिक त्या पातळीवर कसे प्रयोग करणार ते कळत नाही. अशा वेळी, न्यूटनने गणित सांगितले -> त्याचा पडताळा आला, आईन्स्टाईनने गणित सांगितले -> त्याचा पडताळा आला, फेनमनने गणित सांगितले -> त्याचा पडताळा आला, हिग्स् ने गणित सांगितले -> त्याचा पडताळा आला.... ही शृंखला जेव्हा शून्याची पातळी गाठेल तेव्हा त्याचा पडताळा कदाचित घेताच येणार नाही.

प्रश्न :
१. इतके पाल्हाळ यासाठी की विचारांनी जे जे साध्य आहे ते ते सर्व प्रयोगांनी साध्य होईलच असे नाही. मानवाला केवळ विचारांनी जे ज्ञात होऊ शकते ते पराकोटीचे आहे. बुद्धी कृतीपेक्षा या अंगाने श्रेष्ठ आहे. असे असेल तर विश्वात मानवाच्या कृतीला अशक्य आणि प्रयोगाला अज्ञात असे काही आहे हे अखेरचे मान्य करायला वैज्ञानिक का धजावत नसावेत? असे करणे म्हणजे अस्तिकांच्या किंवा ईश्वरवाद्यांच्यासमोर मान तुकवण्यासारखे ठरते असे वाचकांना वाटते काय? विश्वातील अंतिम गूढ प्रायोगिक विज्ञानाच्या आवाक्यात आहे असा विश्वास येथील वाचकांना वाटतो का? कशाच्या आधारावर?
२. सध्या तर्काधारीत विज्ञानात इतक्या मतमतांतरांचा गलबला आहे की त्यातील सत्य काय ते समजणे माझ्यासारख्या सामान्य माणसाला मुळीच शक्य नाही. या विश्वाचे एकजिनसी (तार्किक) चित्र नेमके कसे आहे ते कोणी सांगू शकेल काय? या चित्रातील कोणत्या पायरीपर्यंत प्रयोगकर्ते शास्त्रज्ञ पोचलेले आहेत?(वेगळा लेख लिहीला तरी चालेल.)
३. अन्य चर्चेत दिलेल्या प्रतिसादात सन्मान्य सदस्य श्री. यनावाला म्हणतात की "...विश्वनिर्मितीपूर्वी काहीच अस्तित्वात नव्हते.अवकाश(स्पेस)सुद्धा नव्हता.काळही नव्हता.हे माझ्या तर्काला पटतच नाही.ते खरे असायला हवे हे कळते. सिद्धान्ताचा शाब्दिक अर्थ समजतो.पण बुद्धीला आकलन होत नाही.माझ्या बुद्धीची झेप तेवढी जात नाही.जे बुद्धीला पटत नाही ते मानणे अप्राणिकपणाचे ठरेल.म्हणून विश्वनिर्मितीविषयी मी विचारच करत नाही." वै़ज्ञानिक सिद्धांत न पटणारे असू शकतात का? ज्याची जेवढी बुद्धी तेवढेच विज्ञान त्याने मानावे असे आहे काय? की प्रयोगाने जे सिद्ध होते तेवढेच वि़ज्ञान असते?

येथे विज्ञान-शिक्षणाच्या शिखरावर पोचलेले अनेक सदस्य आहेत. अशा प्रज्ञावान सदस्यांनी आपली मते व्यक्त करून उपकृत करावे ही नम्र विनंती. केवळ प्रश्नांची उत्तरे न देता सदस्यांनी आपापली मतेही मांडावीत ही अपेक्षा आहे.

(मी स्वतः विज्ञानविरोधीही नाही आणि अंधश्रद्धही नाही हे स्पष्ट करतो. तरीही अनंत काळापर्यंत मानवाच्या प्रायोगिक क्षमतेच्या पलिकडे काही विश्वरहस्य शिल्लक उरेल असे वाटते.)

लेखनविषय: दुवे:

Comments

+१

लेख् आवडला

चन्द्रशेखर

घोटाळा...

भौतिक विज्ञानाच्या टोकाच्या प्रयोगात सामान्यांची बुद्धी कशी हरवून जाते हे यथायोग्य मांडल्याबद्दल् आभार. अगदि माझाही असाच गोंधळ उडतो आणि म्हणून् हे विषय तत्काळ महत्वाचे सनसल्याने मी बाजूला सारतो.
विश्वात मानवाच्या कृतीला अशक्य आणि प्रयोगाला अज्ञात असे काही आहे हे अखेरचे मान्य करायला वैज्ञानिक का धजावत नसावेत?
मान तुकवण्याचा वगैरे इथे काहीही संबंध दिसत नाही. पण असे मान्य करणे म्हणजे प्रयोग, तर्क थांबवणे असेच होइल. बरे, हे थांबवायचे कुठे हे कुणास ठाउक?
समजा न्यूटनच्याच काळी "हे अंतिम आहे" असे म्हणत बसलो असतो तर आजच्या काळातल्या कित्येक गोष्टी मिळाल्या नसत्या.
बाकी हे सारेच बाउन्सर जात असल्याने इथेच थांबतो

"आज मिळालेले नाही, पण न जाणो यत्न सुरु ठेवले तर अजूनही काही हाती लागेल" अशा आशेवर नि निश्चित् दिशेवर संशोधन चालत असावे.
आस्तिक नास्तिक हे मला कसे वाटतात ते सांगतो.
दाट अनंत असा अंधार आहे, अगणित माणसे त्यात कैद आहेत. ठराविक वेळी त्यांच्यावर अन्नवर्षाव होतो, वासाने तेखातात नि झोपी जातात्.
काही माणसे कुठेतरी काहीतरी हाताला लागेल म्हणून धडपडताहेत, ठेचकाळताहेत तरी शोधताहेत. ह्या अंधाराला अंत असलाच पाहिजे असा त्यांचा कयास, तो शोधणे, म्हणजे संशोधन.
काही माणसे ह्या धडपड्यांना मूर्ख म्हणत स्वस्थ बसली आहेत, "हा अंधार एका दिव्य शक्तीने केला असून ह्यास अंत नाही हे त्याने आमच्या कानात सांगितले" असा त्यांचा दावा.
स्वस्थ बसलेली माणसे = आस्तिक,
धडपडणारे = नास्तिक
आस्तिक खरे बोलताहेत की खोटे हे मोजायची कुठलीही फूटपट्टी उपलब्ध नाही.

-- (भौतिकशास्त्र नापास) मनोबा

हम्म!

विश्वात मानवाच्या कृतीला अशक्य आणि प्रयोगाला अज्ञात असे काही आहे हे अखेरचे मान्य करायला वैज्ञानिक का धजावत नसावेत?

यातील अखेरचे हा शब्द पटत नाही. अखेर मानली की मग पुढचे मार्ग संपतात. "त्याच्या" हवाली सर्व केले, आता हातावर हात धरून बसायला हरकत नाही असा वास त्याला येतो. वरील वाक्यातील अखेरचा हा शब्द काढला तर प्रयोगात अशक्य आणि अज्ञात असे काही आहे हे मानायला वैज्ञानिक धजावत असावेत असे वाटते. (अशक्य आणि अज्ञात - जोवर पुढील प्रयोगांतून शक्य आणि ज्ञात होत नाही तोपर्यंत)

आस्तिक आणि नास्तिक यांच्या खेळात विज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत असले तरी केवळ या खेळासाठी विज्ञान नसावेच. :-)

कळलंय् का? कळेल का?

नासदीय सूक्ताची आठवण झाली.
इयं विसृष्टिर्यत् आबभूव यदि वा दधे यदि वा न
यो अस्याध्यक्षः परमे व्योमन् सो अङ्ग वेद यदि वा न वेद ||

अज्ञात

>>विश्वात मानवाच्या कृतीला अशक्य आणि प्रयोगाला अज्ञात असे काही आहे हे अखेरचे मान्य करायला वैज्ञानिक का धजावत नसावेत?

असे का वाटते? हायझेनबर्ग याने तर अज्ञाताचा मूलभूत नियमच सांगितला आहे.

जोवर नवीन काहीतरी सापडत असल्याचे दिसते तोवर शोधण्याची धडपड होतच राहणार..

नितिन थत्ते

गोंधळ

असे असेल तर विश्वात मानवाच्या कृतीला अशक्य आणि प्रयोगाला अज्ञात असे काही आहे हे अखेरचे मान्य करायला वैज्ञानिक का धजावत नसावेत?

प्रयोगाला अज्ञात काय आहे हे प्रयोग केल्याशिवाय कसे समजणार? विश्वाचे रहस्य मानवाच्या कुवतिपलीकडे आहे म्हणून त्यामधे प्रयोग करू नयेत असा तुमच्या म्हणण्याचा मथितार्थ आहे का?

असे करणे म्हणजे अस्तिकांच्या किंवा ईश्वरवाद्यांच्यासमोर मान तुकवण्यासारखे ठरते असे वाचकांना वाटते काय? विश्वातील अंतिम गूढ प्रायोगिक विज्ञानाच्या आवाक्यात आहे असा विश्वास येथील वाचकांना वाटतो का? कशाच्या आधारावर?

प्रयोग केल्याशिवाय कळणार नाही.

पैकी काही प्रश्न केवळ-शाब्दिक असावेत

पैकी काही प्रश्न केवळ-शाब्दिक असावेत, असे वाटते.

असे हे सर्वव्यापी माध्यम आहे तरी का? आणि असलेच तर कसे आहे? असे-नाही, तसे-नाही. (नेति, नेति) पण हिग्ज फील्ड एक्साईट होऊन (लाटेतून एखादा थेंब उडावा तद्वत) त्याचा खंड उडाला की हिग्ज बोसॉन दिसतो आणि परत लगेच हिग्ज फील्डमध्ये लुप्त होतो. (म्हणजे हिग्ज फील्ड/कन्डेसेट आहे....!?)

"आहे" शब्दाचा अर्थ अतिशय संदिग्ध असल्यामुळे अस्तित्वशास्त्र (ऑन्टॉलॉजी) मांडणे कठिण असते. काही मर्यादित चौकटीत अस्तित्वशास्त्र मांडता येते. म्हणजे संदर्भ, परिणामांची चौकट वगैरे वक्ता-श्रोत्यांना ठाऊक असल्यास "आज सोमवार आहे", "दरोडेखोर दुष्ट आहे", "चंबळ खोर्‍यात दरोडेखोर आहेत", "चंबळ खोरे आहे", "अणू आहेत" वगैरे वाक्ये अर्थपूर्ण असू शकतात. मात्र चरम-अस्तित्वशास्त्राचे (संदर्भ-स्वतंत्र आस्तित्व-विधानाचे) उदाहरण मला माहीत नाही. त्यामुळे वरील वाक्ये मला शब्द-खेळ वाटत आहेत. जर वरील ?, ! वगैरे अलंकृत वाक्यांचे संदर्भ स्पष्ट असतील, तर ?, ! अलंकार काढून टाकता येतील, असे मला वाटते.

मानवाला केवळ विचारांनी जे ज्ञात होऊ शकते ते पराकोटीचे आहे. बुद्धी कृतीपेक्षा या अंगाने श्रेष्ठ आहे.

"पराकोटी"चे म्हणजे काय? काही गोष्टींबाबत विचार करता येऊ शकतो. उदाहरणार्थ तार्किक विरोध (उदा-उदाहरणार्थ "वंध्यासुत" वगैरे) विचारांत उद्भवणे शक्य आहे, ते प्रयोगांत शक्य नाही. काही गोष्टी प्रयोगांत दिसतात, त्या विचारात आपणहून दिसत नाहीत. उदाहरणे सर्वत्र - कुठलाही प्रयोग घ्या, शाळेत केलेला लंबकाचा पयोग घ्या वाटल्यास. त्यात जवळजवळ अगणित मोजमापे करता येतात, विचारांत मात्र अगणित-चित्र नसते. तर "पराकोटी" म्हणजे काय? या अंगाने श्रेष्ठ, त्या अंगाने कनिष्ठ, वगैरे ठीक आहे. पण यात नवीन-भांबावणारे असे काय आहे?

म्हणजे नव्या शोधाने विज्ञानाचे क्षितीज आणखी दूर नेले.पुन्हा भाकित, पुन्हा निरीक्षण...

पण हे तर आपल्याला आधीच ठाऊक होते ना?

अशा ->० पातळीवर वैज्ञानिकांचा गणिती तर्क पोचणार यात शंकाच नाही. ... ही शृंखला जेव्हा शून्याची पातळी गाठेल तेव्हा त्याचा पडताळा कदाचित घेताच येणार नाही.

शून्याची पातळी गाठेल असे असे? प्रत्येक पातळी आदल्या पातळीपेक्षा शून्याच्या अधिक जवळ आहे. पण शून्याची पातळी अशी काही आहे, असे म्हणण्याकरिता आपल्याकडे काही आधार नाही.

...विश्वात मानवाच्या कृतीला अशक्य आणि प्रयोगाला अज्ञात असे काही आहे हे अखेरचे मान्य करायला वैज्ञानिक का धजावत नसावेत?

काहीही अखेरचे मान्य करणे फक्त मरणासन्न व्यक्तीलाच शक्य आहे. आणि तात्पुरते मान्य करायला कोणीही तयार होईलच ना. (म्हणजे आज मानवाच्या कृतीला अशक्य आणि आज प्रयोगाला अज्ञात असे पुष्कळ काही आहे, हे कोणीही सहज मान्य करेल.) सदासर्वकाळसाठी काहीतरी मान्य करण्याची नसती उठाठेव कशाकरिता करा? असे काही मान्य केले, तर उद्या मान्यता कायम असण्याची काही खात्री नाही. म्हणजे मान्य करणार्‍याला खात्री नाही, आणि मान्यता ऐकून घेणार्‍याला खात्री नाही. तर ती मान्यता व्यर्थच होय.

शब्द आणि अर्थ

असे हे सर्वव्यापी माध्यम आहे तरी का? आणि असलेच तर कसे आहे?

+

(म्हणजे हिग्ज फील्ड/कन्डेसेट आहे....!?)

- हे दोन्ही शब्दखेळ नाहीत. सर्वव्यापी माध्यम आहे हे आता सर्व(शास्त्रज्ञमान्य) सत्य मानावे का? तसे असेल तर त्याचे स्वरूप नक्की कसे असावे? हे माझे प्रश्न आहेत. '!?' = उद्गारवाचक + प्रश्नचिन्ह = 'हिग्ज बोसॉन' जर अस्तित्वात असेल तर हिग्ज फील्ड आहे(-हे मला उत्कंठापूर्ण वाटते) हे नि:संशय मानावे का? (-असा माझा प्रश्न आहे)
या दोन्ही प्रश्नांची उत्तरांवर धनंजय शिक्कामोर्तब करू शकतील असे वाटते.

पण हे तर आपल्याला आधीच ठाऊक होते ना?

-नाही. मला वाटते की हिग्ज बोसॉन सापडल्यावर क्वांटम थियरीतील स्टँडर्ड पार्टिकल मॉडेल पूर्ण होईल असे बर्‍याच शास्त्रज्ञांना (आणि त्यामुळे मलाही ;)) वाटत होते. आता यापुढे मूळकण सापडणे संपले - आता क्वांटम थियरी आणि कॉस्मॉलॉजी यांचा मेळ घालता येईल असे वाटत होते. पण तसे झाले नाही.

पण शून्याची पातळी अशी काही आहे, असे म्हणण्याकरिता आपल्याकडे काही आधार नाही.

-माझा तर्क (जेथपर्यंत पोचतो तेथर्यंत) तरी तेच सांगतो. समजा एखादे मूळ पार्टिकल प्लँक टाईमपेक्षा कमी काळ तगत असेल तर कोणत्या उपकरणाने त्याचा शोध लागू शकेल? की ते अस्तित्त्वातच नाही असा निष्कर्ष काढावा लागेल? किंवा सगळ्याच्या तळाशी 'पार्टिक्युलेट म्यॅटर' काही नसेलच तर प्रयोग कशावर करणार? (स्ट्रींग हे बिंदू -> शून्य आहेत असे वाचले आहे.)हे विश्व शून्यातून निर्माण झाले असे बिग बँग थियरी सांगते. सिंग्युलॅरिटी ही कल्पना असेच एक शून्य आहे.

सदासर्वकाळसाठी काहीतरी मान्य करण्याची नसती उठाठेव कशाकरिता करा? असे काही मान्य केले, तर उद्या मान्यता कायम असण्याची काही खात्री नाही. म्हणजे मान्य करणार्‍याला खात्री नाही, आणि मान्यता ऐकून घेणार्‍याला खात्री नाही. तर ती मान्यता व्यर्थच होय.

- शास्त्रज्ञ/वैज्ञानिक जर अनेक दिशांनी बारीक विचार करतात तर असा विचार का होत नाही? (कदाचित थियरीमध्ये हे मान्य असेलही पण एक्पेरीमँटल सायंटिस्ट ते मान्य करत नसावेत.) त्यामुळे 'सायंटिफिक मेथड' कोसळून पडेल असे मानण्याचे कारणच काय? याचा अर्थ असा नव्हे की प्रयोगाचे प्रयत्नच करू नयेत. जरूर करावेत.

पण चर्चेतला महत्त्वाचा प्रश्न राहिलाच. धनंजय यांना समजलेले विश्वाचे (आजचे) चित्र काय आहे? त्याच्या कोणत्या पातळीपर्यंत एक्पेरीमँटल सायंटिस्ट पोचलेले आहेत ते त्यांनी कृपया सविस्तर लिहावे.

संवादाच्या संदर्भाची चौकट हवी

सर्वव्यापी माध्यम आहे हे आता सर्व(शास्त्रज्ञमान्य) सत्य मानावे का?

येथे "आहे" शब्दाचा अर्थ लागण्याकरिता संवादाच्या संदर्भांची चौकट हवी. आता वर्तमानपत्रात वापरतात ती चौकट असल्यास "आहे" म्हणायला काही हरकत नाही. प्रयोगशील शास्त्रात थेट-संवेदनांना न-जाणवणार्‍या संकल्पनांचे "अस्तित्व" ते काय असते? संकल्पना पूर्णतः मानलेल्या असतात. आणि
(१) त्या आजतागायत निरीक्षित घटनांचे वर्णन संकल्पना मानली तर न-मानल्यापेक्षा अधिक सुटसुटीत होते
आणि
(२) आजतागायत न-निरीक्षित अशा काही घटनांबाबत भाकीत करता येते, ते भाकीत संकल्पना मानली तर वेगळे असते, आणि संकल्पना न-मानली तर वेगळे असते.

तर संदर्भाची संदर्भचौकट "निरीक्षित क्षक्षक्ष घटना" आणि "आजपर्यंत अनिरीक्षित पण भाकिते असलेल्या संभाव्य ययय घटना" ही मर्यादित असते. (येथे क्षक्षक्ष आणि ययय येथे विवक्षित यादी अपेक्षित आहे.) संवादाची ही संदर्भचौकट निश्चित असली, तर मोठा काही तात्त्विक प्रश्न राहात नाही. सर्न मधील निरीक्षणे जितपत निश्चिती देतात, तितपत निश्चितीने या संवादाच्या संदर्भात आपण म्हणू शकतो की हिग्स फील्ड "आहे" आणि तसा कण "आहे".
अर्थात घडलेल्या निरीक्षणांची अगणित सुटसुटीत वर्णने शक्य आहेत, आणि प्रत्येक वर्णनात न-घडलेल्या घटनांबाबत अगणित भिन्न भाकिते उपलब्ध होतात. संवादाच्या संदर्भचौकटीत ते घेतल्यास हिग्स फील्ड आणि बोसॉन या संकल्पना नि:संदर्भ होतात, आणी त्यांचे अस्तित्व शास्त्रज्ञमान्य आहे की नाही हा प्रश्न अर्थ-न-वाहाणारा होतो.

शास्त्रज्ञ/वैज्ञानिक जर अनेक दिशांनी बारीक विचार करतात तर "सदासर्वकाळसाठी मान्य" असा विचार का होत नाही

:-) मला वाटते की हा विचार अर्थ-न-वाहाणारा आहे. मानवी व्यवहाराच्या दुसर्‍या एखाद्या क्षेत्रात "सदासर्वकाळसाठी मान्य" संकल्पनेचा अर्थपूर्ण आणि क्रियाशील वापर होतो का? त्याचे उदाहरण समजल्यास उपमा म्हणून वापरून विज्ञानाबाबत विचार करायचा प्रयत्न करेन.

प्रयोग जरूर करावेत, पण कसे? भाकितांत भिन्नता असल्याशिवाय प्रयोग रचता येणार नाहीत. कारण प्रयोग हे भिन्न भाकिते सुस्पष्ट रीतीने भिन्न म्हणून दिसावीत, अशा तर्‍हेने रचतात.

डोक्यातील चित्रजाल

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

वै़ज्ञानिक सिद्धांत न पटणारे असू शकतात का? ज्याची जेवढी बुद्धी तेवढेच विज्ञान त्याने मानावे असे आहे काय? की प्रयोगाने जे सिद्ध होते तेवढेच वि़ज्ञान असते?

.. श्री.विसुनाना यांनी उपस्थित केलेले प्रश्न
..
(उत्तर बरेचसे वैयक्तिक असल्याने लेखनात "आपण" हे सर्वनाम न वापतरता "मी" सर्वनाम वापरतो)
मी अनेक विषयांसंबंधी पाहातो,ऐकतो,वाचतो,अभ्यासतो,बोलतो,चर्चा करतो,विचार करतो, चिंतन करतो. त्यातून विविध विषयांसंबंधी काही चित्रे डोक्यात तयार होतात.चित्रे भिन्न,भिन्न असली तरी त्यांत सुसंगतता असते.चित्रातील गोष्टी परस्पर विरोधी नसतात.या चित्रांचे एक जाळे डोक्यात असते.(आपणा सर्वांच्या असते). नवीन ज्ञान गृहण करताना निर्माण होणारे चित्र आधी अस्तित्वात असलेल्या चित्रात बसणारे नसेल,ते बसवण्यासाठी चित्रातील अनेक धाग्यांची मोडतोड करावी लागत असेल तर ती नूतन ज्ञानतत्त्वे मला पटत नाहीत असे मी म्हणतो.विश्वनिर्मितीपूर्वी अवकाश अस्तित्वात नव्हता,काळ अस्तित्वात नव्हता ही तत्त्वे माझ्या डोक्यातील एकूण चित्रांत न बसणारी आहेत.म्हणून मला ती अयुक्तिक वाटतात.म्हणून ती मला पटत नाहीत असे म्हणतो.
...आपल्या सूर्यमालेसंबंधी विश्वासार्ह ज्ञान आपल्याला आहे.जे जे वाचले ते ते सर्व समजले असे नाही.पण तर्क बुद्धीला पटणारे आहे. पूर्वचित्रांशी विसंगत असे काही नाही.

प्रामाणिक मते

श्री. यनावाला यांची मते अत्यंत प्रामाणिक असतात. म्हणूनच त्यांनी जी विधाने केली त्यांच्याशी इतर वाचकही सहमत आहेत का? हे तपासायचे आहे.

का?

'का' चे उत्तर शोधणे ही खरी उर्मी आहे, मर्यादा हा कुवतीचा प्रश्न आहे, समाधान का मानायचे ह्याचे उत्तर तरी शोधणे आलेच, ज्याना उत्तर सापडत नाही ते शोधत बसतात, त्यांना जे सापडते त्याचा इतरांना उपयोग होत रहातो, अशक्यतेच्या कक्षा रुंदावत जातात आणि माणुस समृद्ध होत जातो, हिग्स-बोसॉन ने कक्षा रुंदावली आहे एवढे नक्की म्हणता येईल.

हा लेखपण कुठल्यातरी 'का'चे उत्तरच शोधण्याचा प्रयत्न करतो आहे हे चांगलेच आहे.

प्रश्न

तर्क आणि विज्ञान हे शब्द तयार होण्या आधी पासून मानवाला "आपण कोण" "कोठून आलो" "आपण एकटे का ह्या विश्वात" हे सगळे प्रश्न पडले होते. हे सोडवता सोडवता तर्क, विज्ञान जन्माला आले. तर्कातूनच काही लोकं अध्यात्म्याच्या वाटेला गेली. श्री यानावाला ह्यांचा प्रतिसादाशी सहमत आहेच. माणसाची सामुहिक बुद्धी व सामुहिक consciousness (योग्य मराठी शब्द) सुद्धा प्रश्न सोडवायला मदत करतात त्यात आत्ता पर्यंतचा केलेला तर्क, प्रयोग, कल्पना, थिअरीज, प्रमेय, अनुभव हे सगळे आले. पण हे सगळे चालू असताना तो त्याच्या बुद्धीच्या consciousnessच्या चश्म्यातूनच प्रश्न सोडवायचे प्रयत्न करतो. जनावरे सुद्धा त्यांच्या बुद्धीच्या व consciousnessच्या क्षमते प्रमाणे प्रश्न सोडवतच असतील की. आपल्या विश्वाचे कोडे उलगडण्याची धडपड नैसर्गिक व योग्य आहे. मानवाची जात संपे पर्यंत कोठ पर्यंत कोडे उलगडता येते ते बघायचे. नाहीतर तेवढ्यात मानवजात नष्ट व्हायची व जेव्हा परत कधी सुरू होईल तेव्हा गमभन पासून सुरवात करावी लागेल

 
^ वर