एका साम्राज्याच्या शोधात; कार्ले गुंफा -भाग २

कार्ले गुंफांमध्ये फिरताना लक्षात येते की अनेक ठिकाणी म्हणजे भिंतीवरील दोन बास रिलिफ शिल्पांमध्ये, शिल्पातील रेलिंगवर, स्तंभांवर अशा अनेक ठिकाणी शिलालेख कोरलेले आहेत. एक रोचक गोष्ट अशी की दिसणारे हे सर्व शिलालेख फक्त प्राकृत भाषेत आणि ब्राम्ही लिपीमध्ये लिहिलेले आहेत. यावरून ज्या कालखंडामध्ये हे शिलालेख लिहिले गेले आहेत त्याची अचूक कल्पना येते. यापैकी बहुतांशी शिलालेख (एकवीस पैकी वीस) फक्त गुंफा क्रमांक 8 किंवा चैत्यगृह या ठिकाणीच कोरलेले आहेत. कार्ले बौद्ध मठाचा खर्च व तेथे निर्माण केलेल्या सर्व गुंफा व त्यातील शिल्पे यांच्या निर्मितीचा खर्च हा पूर्णपणे त्या कालातील सत्ताधीश व धनिक यांच्याकडून मिळालेल्या देणग्यांवरच चालत असे. यामुळे या चैत्यगृहातील बहुतेक शिलालेख, ते शिल्प किंवा स्तंभ हा कोणाच्या देणगीतून मिळालेल्या धनातून बनवले गेले आहेत हे फक्त सांगतात.त्यामुळे त्या काळातील काही गावांची नावे व व्यक्तींची नावे एवढीच माहिती त्यातून मिळत असल्याने या शिलालेखांना फारसे ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व आहे असे मला तरी वाटत नाही. चैत्यगृहातील 15 शिलालेख या प्रकारचे आहेत व त्यामुळे या 15 शिलालेखांचा विचार मी येथे केलेला नाही.

चैत्यगृहातील उरलेले 5 शिलालेख व गुंफा क्रमांक 12 येथील एक महत्त्वाचा शिलालेख यांना ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व आहे असे मला वाटते व म्हणून या शिलालेखांचा विचार मी येथे करणार आहे. या उरलेल्या 6 शिलालेखांपैकी 4 शिलालेखात, कोणत्या राजाच्या कारकीर्दीतील कोणत्या वर्षी ते शिल्प किंवा विहार खोदण्यासाठी धन दिले गेले याचा स्पष्ट उल्लेख असल्याने सातवाहन साम्राज्याच्या इतिहासाशी या शिलालेखांचा थेट संबंध जोडता येतो. नाणेघाटावरील माझ्या लेखात काही सातवाहन राजांबद्दलची माहिती आपण बघितली होती. सम्राट अशोकाच्या निधनानंतर सातवाहन घराणे दख्खनवर किंवा भारतीय द्वीपकल्पावर राज्य करू लागले असे म्हणता येते. सम्राट अशोकाने खोदवून घेतलेल्या एका शिलालेखात या राजघराण्याचा स्पष्ट उल्लेख असल्याने सातवाहन राजे सम्राट अशोकाचे मांडलिक राजे म्हणून दख्खनवर राज्य आधीपासूनच करत होते हे दिसून येते. सम्राटाच्या निधनानंतर लगेचच बहुदा सातवाहन राजांनी आपण सार्वभौम राजे असल्याचे जाहीर केलेले असावे. इ.स.पूर्व 220 ते179 या कालखंडात होऊन गेलेले या राजघराण्यातील पहिले तीन राजे; सिमुक, कृष्ण व श्री सातकर्णी यांच्याबद्दलची माहिती आपण नाणेघाटावरील लेखात बघितली आहे.

मात्र या ठिकाणी उरलेल्या दोन शिलालेखांचा मी प्रथम विचार करणार आहे. यापैकी पहिला शिलालेख समोरच्या व्हरांड्यातील डाव्या कडेच्या भिंतीवर कोरलेल्या तीन हत्तींच्या मस्तकावरील रेलिंगवर कोरलेला आहे. या शिलालेखाचा मी प्रथम विचार करतो आहे कारण हा शिलालेख हे चैत्यगृह कोणाच्या देणगीतून बनवले गेले आहे याचा स्पष्ट निर्देश करतो आहे. मूळ प्राकृतमधील शब्द असे आहेत.

"वेजयंतिता सेठिणा भूतपालेना सेलघरं परिनिठपितं जम्बुदिपाम्हि उत्तम "

बर्जेस याने केलेले या शिलालेखाचे भाषांतर खालीलप्रमाणे आहे.

“Seth Bhutapala from Vaijayanti has established a rock -mansion, the most excellent in Jambudweepa.”

या शिलालेखाचे महत्त्व लक्षात येण्यासाठी थोड्या खुलाशाची गरज आहे असे वाटते. प्रचलित मराठीमध्ये या शिलालेखाचा अर्थ असा लावता येतो की संपूर्ण भारतीय द्वीपकल्पात सर्वोत्तम असलेले हे चैत्यगृह वैजयंती येथील एक श्रेष्ठी भूतपाल यांनी स्थापन केले. वैजयंती हे नाव कर्नाटकमधील उत्तर कन्नडा जिल्ह्यातील बनवासी या गावाचे पुरातन काळातील नाव आहे. श्रेष्ठी म्हणजे कोणीतरी VIP किंवा महत्त्वाची व्यक्ती! म्हणजे हा शिलालेख आपल्याला सांगतो आहे की बनवासी गावातील भूतपाल या VIP व्यक्तीने हे चैत्यगृह स्थापन केले आणि ते भारतवर्षातील सर्वोत्तम आहे. या बनवासी गावात कोणतेही पुरातन बौद्ध मठ वगैरे मिळालेले नाहीत. फक्त या कालखंडापासून अस्तित्वात असलेले मधुकेश्वर म्हणून एक शिव मंदीर आहे. या मंदीराला, शिल्प कोरलेली एक शिला, सातवाहन राजा हरितापुत शतकर्णी (इ.स.दुसरे शतक) याने दान केली होती व ही शिला आपल्याला आजही बघण्यास मिळते. या बनवासी गावापासून सुमारे 550 किमी (350मैल) अंतरावर असलेल्या या बौद्ध चैत्यगृहाची स्थापना करण्यासाठी बनवासी गावातील एक कोणी श्रेष्ठी एवढ्या उदारपणे मदत करतो आणि यानंतर 100 वर्षांनी राज्यावर आलेला सातवाहन राजा या दूरवरच्या मंदिराला एका शिल्प शिला भेट देतो; याचा अर्थ, इ.स.पहिले शतक या कालखंडापासूनच (ज्यावेळी कार्ले चैत्यगृह निर्माण केले गेले.) बनवासी गाव सातवाहन राजांच्या शासनाखाली तरी होते किंवा निदान बनवासी गाव व सातवाहन राजे यांचा काहीतरी निकट संबंध होता असा लावता येणे शक्य आहे. सातवाहन साम्राज्य कोठेपर्यंत पसरलेले होते त्याचा हा एक अप्रत्यक्ष पुरावाच म्हणता येईल.

मी विचारात घेत असलेला दुसरा शिलालेख चैत्यगृहाच्या बाहेर असलेल्या अशोक स्तंभावर कोरलेला आहे. प्राकृतमधील या शिलालेखाचे शब्द असे आहेत.

"महारठिस गोतिपुत्रस अगिमित्रणकस सिहयभो दानं "

बर्जेस भाषांतराप्रमाणे याचा अर्थ असा लावता येतो.

“From Agnimitranaka, son of Goti, a (Maharathi) great warrior, the gift of a lion pillar”

अर्थ अगदी सरळ असल्याने त्यावर भाष्य करण्याची काहीच जरूरी नाही. सुरूवातीस या शिलालेखातील अग्निमित्र ही व्यक्ती म्हणजे शुंग राजघराण्यातील दुसरा राजा हा असला पाहिजे असे भाष्य बुहलर सारख्या काही इतिहास संशोधकांनी केलेले आहे.(कालिदासाच्या मालविकाग्निमित्र नाटकाचा हाच राजा नायक आहे.) परंतु या राजाचा काल इ.स.पूर्व 152 ते 141 हा असल्याने या स्तंभावर कोरलेले नाव या राजाचे नाही हे मान्य झाले. या स्तंभावरील अग्निमित्र हा एक महारथी आहे. सातवाहन शासनकालात महारथी हे नाव धारण करणार्‍या व्यक्ती या राज्याच्या एका भागाचे संपूर्ण शासन सांभाळणार्‍या Governor समान पदावरील व्यक्ती असत. नाणेघाट गुंफेत महारथी "त्रिनक यिरो" याचा पुतळाच राजे,राणी व राजपुत्र यांच्या पंक्तीत उभारलेला होता व त्या पुतळ्याच्या डोक्यावर हे नावही कोरलेले होते. कित्येक महारथी स्वत:च्या नावाची नाणी पाडून घेत असत. अशी नाणी आजही उपलब्ध आहेत. या महारथी अग्निमित्राने जर स्वत:च्या नावाबरोबर आपल्या राजाचे नाव सुद्धा जर या स्तंभावर कोरून घेतले असते तर आपल्याला कितीतरी जास्त माहिती मिळू शकली असती.

यानंतर आपण उरलेल्या व ते शिलालेख लिहिले गेले त्या वेळी राज्यावर असलेल्या राजांच्या नावाचे उल्लेख असलेल्या 4 शिलालेखांकडे वळूया. 14 क्रमांकाच्या शिलालेखामध्ये "वशिष्ठीपुत्र स्वामी श्री पुलुमयी" या सातवाहन राजाचा ऊलेख आहे. गुंफा क्रमांक 12 मध्ये असलेल्या 20 या क्रमांकाच्या शिलालेखामध्ये याच राजाचा उल्लेख "वशिष्ठिपुत्र श्री पुलुमयी" असा केलेला आहे. 19 क्रमांकाच्या शिलालेखात "गौतमीपुत्र सातकर्णी" याच्या नावाचा उल्लेख आहे असे मानले जाते. राजाचे नाव कोरलेले आहे तेथील अक्षरे पुसट झाल्याने दिसू शकत नाहीत. मात्र इतर संदर्भामुळे याच राजाचे नाव तेथे कोरलेले असावे या अंदाजाला पुष्टी मिळू शकते. शिलालेख क्रमांक 13 मध्ये "थोर राजा क्षह(स)रत क्षतप नहापन" राजाच्या नावाचा उल्लेख आहे. परंतु ऐतिहासिक क्रमाने गेले पाहू असता हा नहापन राजा इतर राजांच्या पूर्वी गादीवर होता असे दिसते त्यामुळे शिलालेख क्रमांक 13 चा विचार आपण सर्वप्रथम करुया.

इ.स.पूर्व 220 मध्ये राजा सिमुक याने प्रस्थापित केलेले व त्याचा भाऊ कृष्ण व पुत्र श्री सातकर्णी (नाणेघाट प्रसिद्ध) यांनी वर्धित केलेले सातवाहन साम्राज्य पुढील वारसदार राजांच्या अधिपत्याखाली अबाधित राहिले. या पुढच्या कालखंडात लंबोदर(इ.स.पूर्व 87-69),अपिलक (इ.स.पूर्व 69-57),मेघस्वाती (इ.स.पूर्व 57-39)आणि स्वाती (इ.स.पूर्व 30-21) या राजांनी राज्य केले. मात्र या पुढची 40 वर्षे या साम्राज्यासाठी संपूर्ण अनागोंदी कारभार, बंडे व गोंधळाची ठरली. राज्याच्या वारसदारांचे आपापसातील कलह, अंतर्गत भांडणे, परदेशी सैन्याची आक्रमणे आणि बंडे यामुळे ही राजसत्ता या काळात अगदी खिळखिळी झाली होती. या 40 वर्षात 5 राजे गादीवर आले व गेले. इ.स.22 मध्ये अरिष्टक हा राजा गादीवर आला व अतिशय आकुंचित झालेल्या सातवाहन साम्राज्यावर त्याने पुढील 25वर्षे किंवा इ.स.47 पर्यंत राज्य केले. या राजाच्या अखेरच्या दिवसात, गुजराथ व काठेवाड भागात आपली सत्ता प्रस्थापित करण्यात आधीच सफल झालेला शक क्षत्रप "भुमक" याने सातवाहन साम्राज्याचा भाग असलेल्या माळवा प्रांतावर स्वारी केली व अरिष्टक राजाच्या सैन्याचा पराभव करून माळवा प्रांत ताब्यात घेतला.

क्षत्रप "भुमक" याचा वारसदार इ.स. 55 ते 60 या कालात कधीतरी सत्तेवर आला. मात्र तो भुमकाचा पुत्र होता की नाही यासंबंधी काहीच माहिती उपलब्ध नाही. इ.स.70 पर्यंत या पराक्रमी राजाने सातवाहनांकडून पूर्व माळवा (आकार), पश्चिम माळवा (अवंती), कोकण (अपरान्त) आणि उत्तर व मध्य महाराष्ट्र हे भाग जिंकून घेतले. या शिवाय त्याचे राज्य आधीच उत्तर गुजराथ, काठेवाड आणि पार अजमेर पर्यंतचा मध्य राजस्थानचा भाग या प्रदेशात विस्तारलेले होतेच. सातवाहनांवरील विजयानंतर हे राज्य उत्तरेला अजमेर ते दक्षिणेला पुणे,पश्चिमेला काठेवाड मधील द्वारका ते पूर्वेला मध्यप्रदेशातील सागर या चार सीमांपर्यंत विस्तारले.

क्षत्रप भुमक याचा वारसदार असलेल्या व या विस्तीर्ण राज्याचा कर्ता होता "क्षहरत किंवा क्षसरत क्षत्रप नहापन".या राजाच्या नावाचा उल्लेख, शिलालेख क्रमांक 13 मध्ये असल्याचे आपण आधीच पाहिलेले आहे.

(क्रमश:)
6 जुलै 2012

(क्षमस्व: माझ्या फ्लिकर खात्यातील 200 छायाचित्रांची मर्यादा ओलांडली गेली असल्याने या लेखासोबतची छायाचित्रे मला येथे देता आलेली नाहीत. ती पहाण्यात ज्यांना रस असेल ते माझ्या http://www.akshardhool.com/2012/06/traces-of-empire-rock-cut-buddhist_21... या ब्लॉगवर जाऊन ही छायाचित्रे बघू शकतात.)

लेखनविषय: दुवे:

Comments

वाचत आहे.

या शिळालेखांवरून आपण कोणत्या कालखंडापर्यंत पोचलो आहोत? या स्थानावर बौद्ध धर्माचा शेवटचा राबता कधीपर्यंत होता- याचे काही अनुमान काढता येईल का? तसे काही शिळालेखातून दिसते का?

कालखंड

क्षत्रप नहापन हा इ.स. 55 मध्ये गादीवर आला व इ.स.105 पर्यत तो राज्यकारभार बघत होता. आपण सध्या या कालखंडापर्यंत आलो आहोत.
कार्ले चैत्यगृहात बाहेरील पडदा व बाजू यावर बुद्ध शिल्पे बर्‍याच् नंतर म्हणजे महायान पंथ रूढ झाल्यावर बसवलेली आहेत. (साधारण इ.स. 200) कार्ले मठ शुएन झांग याच्या भारत भेटीच्या वेळी अस्तित्वात नसावा कारण तो कार्ले मठाबद्दल काहीच लिहित नाही. त्याने फक्त (माझ्या मताप्रमाणे ) नाशिक येथील पांडवलेणी बद्दल उल्लेख केलेला आहे.
या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर इ.स.400 पर्यंत या मठात राबता असावा असे मला तरी वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

शिलालेख

शिलालेख लिहितेवेळी ते भविष्यात इतरांना माहिती, इतिहास पुरवतील या दूरदृष्टीने लिहिले गेले नसावे. अकाउंटींग, दानपत्रे आणि घोषणा इतकेच त्यांचे स्वरूप असावे. बहुधा यामुळे या त्रोटक शिलालेखांवरून संदर्भ लावणे आणि संबंध जोडणे थोडेफार कठीण पडत असावे.

हाही भाग आवडला. फोटो लेखांसोबत असते तर बरे झाले असते. चित्रांमुळे तुमच्या ब्लॉगवर लेख वाचणे अधिक सुकर होते.

वाचतो आहे...

प्रत्येक भाग सरस आहे.

--मनोबा

उत्तम्

अतिशय उत्तम भाग.

शिलालेख क्र. १३ चे मूळ स्वरूप मिळेल काय?

नाशिक लेण्यातील (पांडवलेण्यातील) नहपान क्षत्रपाचा जावई ऋषभदत्ताच्या शिलालेखात नहपानाचा उल्लेख क्षत्रप म्हणून् आला आहे तर त्याच्या कारकिर्दीचे वर्ष ४२ असे नोंदवलेले आहे.
तर जुन्नरच्या मानमोडी लेण्यांमधील् शिलालेखात नहपान क्षत्रपाचा उल्लेख महाक्षत्रप म्हणून येतो.

[रञो] महाखतपस सामिनहपानस
[आ]मतस वछतगोतस अयमस
[दे]यधम च [पो]ढि मटपो च पुञथय वसे ४० [+] ६ कतो |

राजा महाक्षत्रप स्वामी नहपानाच्या वत्सगोत्री अर्यम अमात्याने हे टाके व हा मंडप (विहार) पुण्याप्राप्तीसाठी धर्मदाय म्हणून वर्ष ४६ मध्ये केला.

पांडवलेण्यातील आणि जुन्नरच्या ह्या शिलालेखांवरून ४ वर्षात नहपान क्षत्रपावरून महाक्षत्रप पदापर्यंत वर चढला. कदाचित सातवाहनांचे खूपसे राज्य त्याने मिळवल्याने हा किताब त्याला (कुषाणांकडून?) मिळालेला असू शकतो.

पण त्याचे हे महाक्षत्रपपद फार काळ टिकले नाही. लवकरच गौतमीपुत्र सातकर्णीने नाशिकच्या डोंगररांगांमध्ये नहपानाचा संपूर्ण पराभव करून त्याचा निर्वंश केला व आपले राज्य परत मिळवले.

अवांतरः ही शक ही कालगणना कुषाणसम्राट कनिष्काने सुरु केली होती व क्षत्रपांनी (शकांनी) त्याचे निष्ठेने पालन केले असे म.म. वा. वि. मिराशी व इतरही अनेक संशोधकांचे मत आहे व याला क्षत्रपांच्या शिलालेखातील कालगणनेचा पुरावा आहे. परंतु शकनिर्माता गौतमीपुत्रालाचा समजले जाते जे तद्दन चुकीचे असावे.

शिलालेख् क्रमांक १३

या शिलालेखाबद्दल् जास्त् माहिती पुढच्या भागात् येईलच.

चन्द्रशेखर

 
^ वर