एक क्रियापद, अनेक अर्थच्छटा

मध्यंतरी एका मित्राने पाठवलेल्या इमेलमध्ये लागणे किंवा लावणे या क्रियापदाच्या अर्थच्छटेबद्दल लिहिले होते. आता ती इमेल हाताशी नसली तरी तिची आठवण होण्याचे कारण असे की काल लेकीला सांगत होते की "जरा चहाकडे बघ." तिला हे वाक्य माहित आहे पण ते उच्चारले की ती म्हणते "नुसतीच बघत राहू ना! बघते बघते." यावरून तिला काही मराठी क्रियापदांची आणि त्यातील विविध अर्थच्छटांची गंमत सांगत होते. नंतर लक्षात आले की विविध बोलीभाषांतूनही क्रियापदांच्या विविध अर्थच्छटा उमटत असाव्या आणि अशी अनेक उदाहरणे असावी.

उदा.

अ. लागणे - संबंध होणे

विविध अर्थच्छटा -

१. तो नोकरीला लागला - नोकरीला चिकटला
२. मला लागलं, त्याचं बोलणं मला लागलं - जखम झाली, भावना दुखावल्या
३. अन्न अंगाला लागत नाही/ तो अन्नाला लागला
४. पोलिस खुन्याच्या गाडीमागे लागले/ नादाला लागणे - पाठलाग करणे
५. तो तिला लागू आहे - दोघांचे काही प्रेमप्रकरण आहे असे बोलीत ऐकले आहे.

याचप्रकारे "लावणे" हे क्रियापदही विविध अर्थच्छटेने वापरले जाते.

ब. पडणे - कोसळणे, ढासळणे

१. तो पडला.
२. ही बॅग कितीला पडली?
३. तुम्ही जरा पडा निवांत - आराम करा
४. तो पडला व्यापारी

अशाप्रकारची ३-४ किंवा अधिक अर्थच्छटा असणारी कोणती क्रियापदे तुम्हाला आठवतात?
या क्रियापदांच्या अर्थच्छटेतील फरक मुलांना समजवून देण्यासाठी काही युक्ती आहे की हा सवयीचा भाग आहे?
विविध बोलींतून क्रियापदांचा किंवा शब्दांचा होणारा वेगळा वापर समजून घ्यायला आवडेल.

-----

ही चर्चा केवळ विरंगुळा आहे. माझे भाषेचे ज्ञान अत्यल्प आहे याची कृपय नोंद घ्यावी.

Comments

गेला/गेली/गेले

ती बाजारात मासे आणावयास गेली - (चालत गेली/ कारने गेली किंवा तत्सम)
अगं तुला माहीत नाही? महीना तरी झाला वरचे जोशीकाका गेले त्याला. (वारणे)
गेला आठवडा पाऊस चिक्कार पडला पुण्यात. (विशेषण, मागचा या अर्थी)
_______________________________________________________

चांगली ओळखून आहे मी त्याला. (वाईट अर्थी)
हो मी त्याला ओळखते. (उदासीन)
_________________________________________________________

काल मुलगी पहायला/बघायला गेलो होतो. (वधूपरीक्षा)
काल मी काकूंना मंडईत भाजी घेताना पाहीले/बघीतले. (दृष्टीस पडणे)
पहा/बघ हं नंतर म्हणू नकोस् मी सांगीतलं नाही म्हणून. (थोडे धमकीवजा अर्थहीन)

बघ

बघ - पाहा

१. चहाकडे बघ - चहाकडे लक्ष दे!
२. म्हातारपणी आमच्याकडे बघशील ना? (फेम्मस भारतीय डायलॉक ;-)) - आमची काळजी घेशील ना.

बघून घेईन

माझी चूक् काढतेस काय् , बघून घेईन :P ..... (रागाने)

महत्वाचं विसरून 'गेलात'

तिला दिवस गेलेत. :)

सुधारणा

ही चर्चा केवळ विरंगुळा आहे.

ही चर्चा माझ्यासाठी केवळ विरंगुळा आहे. सदस्यांनी मराठी आणि इतर भाषा/ व्याकरण वगैरेंवरील गंभीर चर्चेसाठी तिचा वापर करण्यास माझी हरकत नाही.

मजेशीर

मजेशीर!

चालणे

१) मी दुकानापर्यंत चालत गेलो.
२) लाल रंगाचं मिळालं तर बघा, नाहीतर निळेदेखिल चालेल.
३) दुरुस्त केला ना? टिव्ही चालतो आता?
४) साहेब, दुसरी नोट द्या, ही नाय चालणार.
५) मुलांने, "देव" शब्द चालवा.
६) तुला गाडी चालवता येते?

अवांतर - एकाच क्रियापदाच्या अनेक अर्थछटा असणे हे भाषेच्या लवचिकपणाचे एक वैशिष्ठ्य मानले तर, क्रियापद बनवण्याची क्षमता हे दुसरे वैशिष्ठ्य मानावे लागेल. पैकी पहिल्या प्रकारात मराठीत असंख्य उदाहरणे आहेत (अन्य भाषांतही असतील) परंतु दुसर्‍या प्रकारात इंग्रजीचा हात धरणारी भाषा नाही. जवळपास कुठल्याही नामापासून क्रियापद बनवण्याची इंग्रजीची क्षमता केवळ वादातीत!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चालू

माझी मुलगी लहानपणी कपाट चालू कर (बंद कर च्या उलट) असे म्हणत असे.

नितिन थत्ते

थक

माझा मुलगा थकत नाही; त्याला "थक येतो".

इट वर्क्स!

इट वर्क्स! - चालतंय या इंग्रजी शब्दाला

अमेरिकेतील रेस्टॉरंटमध्ये वेटर/ वेट्रेस असा वापरतात -

"आर यू स्टिल वर्किंग ऑन दॅट!" - झालं का तुमचं (जेवून)!

चालूवरून

चालूवरून
चर्चा चांगली चालू आहे.
चालू खाते बंद आहे. (करन्ट अकाउन्ट)
ती/तो चालू आहे. (लबाड)

क्रमश:

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

भेटणे

तो मला रस्त्यात भेटला.
हि वस्तु कितीला भेटली?
हा रस्ता पुढे कुठे जाऊन भेटतो?

भेटण्याचे असे अनेक प्रयोग ऐकुन मी सुरुवातील खुप चक्रावलो होतो. :)





मारणे कसे विसरलात???

हे क्रियापद इतके अष्टपैलू आहे की त्याची बरोबरी अन्य कोणतेही क्रियापद करू शकत नाही.

१. मी त्याला ठार मारले.

२. सायकलीत हवा मार.

३. त्याने तिला प्रपोज् मारला.

४. चल एक चहा मारू.

५. उगीच ** मारतो झालं तो.

६. मारामारी करू नका.

७. हायवेवरती गाडी ऐंशीने मारतो मी नेहमी.

८. च्यामारी...

९. त्याने तिला कट् मारला.

आहे का कोणी माईका लाल (क्रियापद) याची बरोबरी करणारा? ;)

दुष्टारी पुरता भारी | अवतरला गॉथम शहरी|
वाल्गुदेय हा निर्धारी| विदूषका जाण पां||

मारू

ती काय "मारू" दिसते याचा समावेशही मारणे मध्येच का हो? ;-)

इतर कुठलेही क्रियापद "CTRL-X" करावे आणि तेथे मारणेचे रुप "CTRL-V" करावे याच्याशी सहमत.

फडका मार
बाता मारणे
टांग मारणे

वाटणे

अजून एक क्रियापद - वाटणे

१) त्याने सर्वांना पेढे वाटले.
२) पाटा-वरवंटा कुठे आहे? मला आमटीसाठी वाटण वाटायचं आहे.
३) मला असे वाटले की ...

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

वेगळा विचार

अवांतर - एकाच क्रियापदाच्या अनेक अर्थछटा असणे हे भाषेच्या लवचिकपणाचे एक वैशिष्ठ्य मानले तर, क्रियापद बनवण्याची क्षमता हे दुसरे वैशिष्ठ्य मानावे लागेल. पैकी पहिल्या प्रकारात मराठीत असंख्य उदाहरणे आहेत (अन्य भाषांतही असतील) परंतु दुसर्‍या प्रकारात इंग्रजीचा हात धरणारी भाषा नाही. जवळपास कुठल्याही नामापासून क्रियापद बनवण्याची इंग्रजीची क्षमता केवळ वादातीत!

मराठीतील अनेक अर्थछटा असलेल्या एकाच क्रियापदांची उदाहरणे आपण पहात आहोत. त्याच वेळेस, इंग्रजीची जवळपास कुठल्याही नामापासून क्रियापदे बनवण्याची क्षमतादेखिल पाहणे मनोरंजक ठरेल, असे वाटते.

टू डायल, टू मेल किंवा अलिकडील टू गूगल सारखी उदाहरणे असंख्य मिळतील. परंतु नुकतेच खालील वाक्य नजरेस आले - जरा वेगळे वाटले.

... as the president nears a decision on a revised strategy for Afghanistan ...

मराठीत अशी क्रियापदे "पाडता" येतील काय?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहमत !

English is the only language in which every word can be 'Verbed.' असा क्वोट् असलेला टी-शर्ट माझ्याकडे होता. :)

रंजक

चर्चा रंजक् होते आहे. माझ्या डोक्यातले मुद्दे आधीच लिहून् झालेले दिसताहेत.
ह्यातून संस्कृतची आठवण झाली. त्यात एकच क्रियापद/धातू वेगवेगळी प्रेफिक्स/उपसर्ग लावून प्रचंड क्रियापदे पाडता येत.
आहार, विहार,प्रहार,संहार ही म्हटले तर काही पूर्ण् वेगळे धातू नाहित. हृ- हर (हरण करणे) हकेकच धातू वेगवेगळे उपसर्ग लावले की वेगवेगळे अर्थ "टाकतो".

--मनोबा

संयुक्त क्रियापदे

ह्या धाग्यावरून संयुक्त क्रियापदांवरील मराठीतली फार्शी २ ही चर्चा आठवली.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

 
^ वर