देव, धर्म, श्रद्धा आणि विवेक-विचार

देव,धर्म, श्रद्धा आणि विवेक-विचार

सामान्य जनातील अंधश्रद्धा नाहिशी करण्याचा प्रयत्न म. ज्योतिबा फुले यांच्यापासून श्री. दाभोळकर यांच्यापर्यंत अनेकांनी केला. "बुडती हे जन " हे न बघवून त्यांना वाचविण्याकरिता पोटतिडिकेने लिखाणही केले. त्यांचा वसा चालविणारे एक लेखक म्हणजे प्रा. य. ना. वालावलकर. उपक्रमसारख्या संस्थळावर व वर्तमानपत्रात नियमितपणे त्यांचे लेख-पत्रे प्रसिद्ध होत असतात. प्रा. वालावलकरांचे वरील नावाचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात ६२ लेख आहेत. साधारणत: दोन-तिन पान लांबीच्या या लेखात देव, धर्म वा श्रद्धा यातील एखादा विषय निवडून त्यावर भाष्य केलेले आहे. बरेच लेख संवादात्मक आहेत. याचा फायदा म्हणजे लक्ष वेधून घेऊन वाचकाला खिळवून ठेवता येते. वर्तमानपत्रातील स्तंभासारखे छोटेखानी लेख वाचक शेवटपर्यंत वाचतोच. सामान्य वाचकाला बोधप्रद लिखाण वाचावयाचा कंटाळा येण्याची शक्यता लक्षात घेऊन ही पद्धत स्विकारली असावी. प्रा. यनावाला त्यात यशस्वी झाले आहेत. एखाद्या श्रद्धाळू माणसाच्या जीवनातील एखादा प्रसंग निवडून विवेकाने तर्कनिष्ठ विचार केला तर त्याची अंधश्रद्धा कशी असंभव आहे हे दाखवून दिले जाते. काही लेखांची शीर्षके पाहिली तरी लेखांचा आवाका लक्षात येईल. गुरूपुष्यामृत योग, स्वर्ग, मोक्ष आणि गाजरचित्रे, गतजन्मीची आठवण, मुहुर्ताचे खुळ, बुवा,बाबा, बापूंना आव्हान, काल्पनिक ईश्वर. दैव जाणिले कुणी, उदकी अभंग रक्षिले, पानिपतचा पराभव, कर्मफल सिद्धांत अशी काही नमुना म्हणून सांगता येतील. यातील काही लेख उपक्रममध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

दुसर्‍या भागात विवेक व विज्ञान या विषयांच्या संबधित विचारवंतांच्या सुवचनांचा समावेष आहे. अर्थातच हे विचारवंत बहुतेक परदेशीच आहेत. त्यामुळे डॉ. राधाकृष्णन वा डॉ.रानडे ( मी यांना विचारवंत समजतो) यांचे विचार येथे वाचावयास मिळत नाहीत. असो. विज्ञान, विवेक, बुवा-बापू, फलज्योतिष, धर्म, देव आणि संकीर्ण या सात विभागात हे वाटले असून अगदी थोडक्यात (म्हणजे काही ओळीत) ते संपादित केले असल्याने जास्त उपयुक्त वाटतात.

पुस्तकाचा एक मोठा गुण म्हणजे तुम्ही ते कुठलेही पान उघडून वाचावयास सुरवात करू शकता व केव्हाही थांबू शकता. वर सांगितल्याप्रमाणे अशी पुस्तके सुरवातीपसून शेवटपर्यंत एका बैठकीत वाचणे अवघड असते. आणि हो, हे पुस्तक तुम्ही जरा चाळलेत तरीही चार लोकांत बोलतांना या विषयांवर तुमचा खूप अभ्यास आहे असे दाखविण्यापुरते साहित्य(material) तुमच्या गाठीशी असेल.
देव, धर्म, श्रद्धा आणि विवेक-विचार
लेखक : प्रा. य.ना. वालावलकर.
वरदा प्रकाशन, पुणे.

शरद

Comments

मनःपूर्वक अभिनंदन

अरे वा! श्री. य. ना. वालावलकर यांचे लेखन नेहमीच वाचनीय असते.
पुस्तकाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

अभिनंदन!

यनावालांचे उपक्रमावर प्रकाशित झालेले अनेक लेख आहेत. अतिशय सोप्या, साध्या भाषेत लेखन(कधीकधी बाळबोध) करणे हेच त्यांच्या यशाचे रहस्य होते/आहे. अनेकदा त्यांना "मऊ माती खणू नका" हे सुचवले त्यातून ते लेख योग्य कानांवर पडावे असाही एक हेतू होताच. पुस्तकप्रकाशनामार्फत त्यांचा हा प्रयत्न मोठ्या जनमानसापर्यंत पोहोचून, ज्यांचे प्रबोधन होण्याची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी आशा व्यक्त करते.

पुस्तकाची ओळख त्यांच्या टीकाकाराने करून द्यावी हे तर उत्तमच आणि त्यानिमित्ताने शरदकाका इथे आले आणि त्यांनी उपक्रमावर लिहिले हेही उत्तमच. :-)

असो. यनांचे मनःपूर्वक अभिनंदन!

अभिनंदन्

पुस्तक् प्रकाशित् झाल्याबद्दल् यनावाला यांचे मनापासून् अभिनंदन्. त्यांचे विचार् खूप् मोठ्या वाचकवर्गापर्यंत् पोहोचण्यास् या पुस्तकाची खचितच् मदत् होईल् या बाबत् खात्री वाटते.

चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

+१

<<पुस्तक् प्रकाशित् झाल्याबद्दल् यनावाला यांचे मनापासून् अभिनंदन्. >>
हेच म्हणतो. पुस्तक मिळवून वाचायला उत्सुक आहे.

छान

पुस्तक छानच असणार! जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावे ही सदिच्छा!
प्रकाश घाटपांडे

उत्तम

पुस्तक छानच असणार! जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावे ही सदिच्छा!

हेच म्हणतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

मस्त !

टंग इन् चिक पुस्तक परीक्षण आवडले. :)

उत्तम

यनावालांचे लिखाण पुस्तकरुपाने आले ही उत्तम बातमी दिल्याबद्दल शरद ह्यांचे आभार. घाटपांडे म्हणतात तसे पुस्तक छानंच असणार ह्यात काही शंका नाही. मराठीत अश्या पुस्तकांची कमतरता आहे असे वाटते त्यामुळे ह्या पुस्तकाचे स्वागत जोरात होवो.

मनःपूर्वक आभार

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
पुस्तकाचा परिचय करून दिला तत्प्रीत्यर्थ श्री.शरद यांचे मनःपूर्वक आभार.तसेच सदस्यांनी सदिच्छादर्शक आणि उत्तेजनपर प्रतिसाद लिहिले त्याकरिता त्यांचे आभार मानतो.
...यनावाला

अभिनंदन

यनावालांचे मनःपूर्वक अभिनंदन.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

छान

यनावाला सरांचे अभिनंदन आणि शरद यांनी ओळख करून दिली ह्याबद्दल आभार.
आणि यनावाला यांची शैली सुपरिचित असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांपासून त्यांच्या आईबाबांपर्यंत सर्वांना ते विचारांना प्रवृत्त करेल याची खात्री वाटते.

चित्रा

यनांच्या लेखांची लेखमाला करावी

उपक्रमावरील यनांचे चांगले लेख निवडून, त्यांच्या लेखांची लेखमाला तयार करावी असा एक प्रस्ताव समोर ठेवते...

अभिनंदन आणि...

य. ना. वालावलकरांचे अनेक कारणांसाठी अभिनंदन. पुस्तक हे तर पहिले, आणि प्रासंगिक कारण. त्याशिवाय त्यांची कालसुसंगत मते आणि ती मांडताना किंवा त्यावर होणार्‍या वादांना उत्तर देताना कोणत्याही प्रकारचा आक्रस्ताळेपणा टाळण्याचे त्यांचे कसब हे दुसरे. त्याण्च्या पिढीत क्वचितच आढळणारी विवेकवादी मते आणि चिकित्सक वृत्ती हे तिसरे. आता थांबतो.
अवांतरः वालावलकर सरांचे 'सकाळ' मध्ये आम्हा बालकांना (इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व या निकषानुसार) सोडवता येईल असे एक शब्दकोडे येत असे. ते बंद झाल्याचा खेद वाटतो. आता रविवारच्या 'सप्तरंग' मधील शब्दकोडे सोडवताना कपाळावरील धमनी ठसठशीतपणे उभी राहाते!
सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

धन्यवाद!

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
"इंग्रजी शब्द--मराठी अर्थ" या कोड्याविषयी श्री.सन्जोपराव यांनी अनुकूल मत व्यक्त केले तत्प्रीत्यर्थ त्यांचे मनःपूर्वक आभार. पुस्तकाचे लेखन पूर्ण करण्यासाठी दोन्ही कोडीं लिहिणे बंद करावे लागले. आता जाने.२०१३ पासून "इंग्रजी शब्द--मराठी अर्थ" हे कोडे पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे.

अभिनंदन आणि धन्यवाद

पुस्तकप्रकाशनाबाबत अभिनंदन आणि ओळख करून दिल्याबाबत धन्यवाद.

गॉड्स ऍडवोकेट

विवेकवादी आणि श्रद्धाळू यांचा संवाद करवून वाचकाच्या विचारप्रक्रियेला हात घालणे हा या विषयांवरील प्रचाराचा एक चांगला मार्ग आहे असे मला वाटते. सामान्य व्यवहारातील अशा प्रकारच्या अनेक प्रसंगांसाठी सातत्याने लेखन केल्याबद्दल यनावालांचे आभार. त्याची माहिती दिल्याबद्दल शरद यांचे आभार. येथे घडलेल्या विक्रमी आणि चांगल्या चर्चांपैकी अनेक चर्चा सुरू होण्याचे श्रेयही यनावालांच्या लेखांचे आहे, ते चालूच राहो.
या पुस्तकाच्या निमित्ताने अधिक व्यापक वाचकवर्गापर्यंत ही चर्चा पोहोचेल अशी आशा वाटते, येथील चर्चांचा लेखनात काही उपयोग झाला काय असे मला कुतूहलही आहे.
मात्र, समाजाचे मतपरिवर्तन करण्यातील सर्वात मोठा अडथळा हा उच्चभ्रू श्रद्धाळूंचा असतो. विशेषतः, ऑनलाईन व्यक्तींमध्ये असे श्रद्धाळू अधिक असतात. धादांतवादासोबतच सैद्धांतिक पातळीवरील लेखनासही यनावालांनी न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे.

+१

पुस्तकाबद्दल यनावालांचे अभिनंदन, अतिशय तळमळीने ते लेखन करतात, विचारांबद्दल मतभेद असतील पण त्यांच्या लेखनामुळे वाचकांत सकारात्मक बदल नक्की घडेल असे वाटते.

>>सैद्धांतिक पातळीवरील लेखनासही यनावालांनी न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे.<<
असेच म्हणतो.

सदस्यांच्या प्रतिसादांचा सुपरिणाम

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री. निखिल जोशी म्हणतातः
"

येथील चर्चांचा लेखनात काही उपयोग झाला काय असे मला कुतूहलही आहे."

हो. सदस्यांच्या प्रतिसादांमुळे लेखनाविषयी आत्मविश्वास वाढला.विविध विषयांवर झालेल्या वादविवादांचा अप्रत्यक्ष सुपरिणाम लेखनावर झालाच.
धन्यवाद!

हे आवडले..

हे मात्र भन्नाटच...
हे पुस्तक तुम्ही जरा चाळलेत तरीही चार लोकांत बोलतांना या विषयांवर तुमचा खूप अभ्यास आहे असे दाखविण्यापुरते साहित्य(material) तुमच्या गाठीशी असेल.

 
^ वर