प्रश्न मनाचे

ग्रंथ परिचय- प्रश्न मनाचे

मन हा विषयच असा आहे कि त्याची व्याप्ती आपल्या कल्पनेपलिकडे जाते. मानवी मन हा कुतुहलाचा व गुढ विषय आहे. नुकतेच प्रश्न मनाचे हे डॉ हमीद दाभोलकर व डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला गेलो होतो.त्या निमित्त या विषयावर चर्चा झाली. महाराष्ट्राचे आरोग्य सचिव भूषण गगराणी यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.पुस्तकाची पहिली आवृत्ती महिन्याभरातच संपल्याने खरतर हे दुसर्‍या आवृत्तीचे प्रकाशन होते.

prashn manache

पुस्तक हे मनाचे आरोग्य आजार व त्यांची उकल या भोवती गुंफले आहे.या विषयावरील अवतीभवती असणारे व विचारले जाणारे प्रश्न व त्याची उत्तरे म्हणजे एफ ए क्यू या स्वरुपात हे पुस्तक आहे. वाचक प्रथम त्याच्या मनात असलेले प्रश्न हे पुस्तकात मिळतेजुळते कुठे दिसताहेत का? हे प्रथम पाहतो व त्याची उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न करतो. २०२० साली जसे भारत महासत्ता बनण्याचे स्वप्न आहे तसे त्या वेळी जगात औदासिन्य हा मानसिक आजार दुसर्‍या क्रमांकावर असणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य या संकल्पने ' आरोग्य म्हणजे केवळ आजार नसणे ही स्थिती अपेक्षित नसून शारिरिक, मानसिक,सामाजिक व अध्यात्मिक अशा चारही अंगाने आरोग्यपुर्ण असणे होय' असे म्हटले आहे.

पुस्तकात औदासिन्य व मूडचे आजार, चिंतेचे आजार,व्यसन व व्यसनमुक्ति,स्किझोफ्रिनीया,मनोकायिक आजार,फिटेचे आजार, लहान मुलांचे मानसिक आजार, लैंगिक समस्या, वृद्धत्वातील मानसिक आजार, स्त्रिया व त्यांचे मानसिक आजार,मनाचे औषधोपचार, मनाचे आजार आणि अंधश्रद्धा,मन आणि स्वभाव अशा प्रकरणांमध्ये पुस्तक विभागले आहे.किचकट व तांत्रिक बाबी विशेषत्वाने टाळल्या आहेत.मानसोपचाराविषयी फारशी माहित नसलेला सर्वसामान्य माणुस हा खर्‍या अर्थाने पुस्तकाचा वाचक आहे.

मूड ठीक असणे वा नसणे याची अनुभूती आपल्याला येतच असते. ती मनाची अवस्था आहे. काही माणसे कधी कधी खूप उत्साही असतात तर कधी त्यांची बॅट्री एकदम डाउन असते. जेव्हा हे अधिक प्रमाणात होते तेव्हा ते बायपोलर मूड डिसऑर्डरचे बळी असतात.अशा ठिकाणी मूड स्टॅबिलायझर औषधे उपयोगी पडतात.
शरीराचा व मनाचा फारच जवळचा संबंध आहे. मनात चिंता निर्माण झाल्यामुळे प्रतिक्षिप्त क्रिया म्हणुन शरीरात अनेक बदल घडून येतात. त्याचा परिणाम म्हणून परत मनात चिंता निर्माण होते असे हे दुष्टचक्र आहे.पॅनिक अटॅक, सोशल फोबिया, मंत्रचळ,पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, सर्वव्यापी चिंता अशा बाबी सोदाहरण सांगितल्या आहेत. औषधोपचाराबरोबरच समुपदेशन व वर्तणूक उपचार पद्धती या तितक्याच महत्वाच्या आहेत.
व्यसन हा एक मानसिक आजार आहे.कुटुंबात अथवा परिचितांमधे व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे आपण पहातो. पुर्णत: व्यसनमुक्त करता येईल असे औषध अजून वैद्यकशास्त्राला सापडले नाही. बिअर, वाईन ही दारु नाही असा खोडसाळ प्रचार जाणीवपुर्वक भारतात केला जातो असे दाभोलकर म्हणतात.
स्किझोफ्रिनिया हा तीव्र स्वरुपाचा मानसिक आजार आहे. पुस्तकात या विषयी अधिक पाने खर्च केली आहेत.या रुग्णाच्या उपचारात कुटुंबातील व्यक्तींचाही कस लागतो.
मनोकायिक आजारांमध्ये अनेक तपासण्या करुनही दुखण्याचे निदान होत नाही. डोके दुखणे, पित्त होणे, हातापायांना मुंग्या येणे ते अगदी शरीराची अर्धी बाजू लुळी पडणे इतकी लक्षणे दिसून येतात.क्रॉनिक फटिग सिंड्रोम सारख्या आजारात दीर्घ मुदतीचा थकवा जाणवतो.फिटेचे आजार हा मानसिक आजार व मेंदुचे आजार या सीमारेषेवरील आहे.कांदा किंवा चप्पल हुंगायला दिली की फिट थांबते असा समज असण्याचे कारण ती तेवढ्या वेळातच थांबलेली असते. लहान मुलात अतिचंचलता, मतिमंदत्व, स्वमग्नता आढळून येते.लैंगिक समस्या मधे हस्तमैथुन, लैंगिक समाधान,शीघ्रपतन, समलिंगी संबंध, लिंगबदल, लैंगिक विकृती या बाबतचे प्रश्न आहेत. इथे तज्ञांमधे कदाचित मतभिन्नता होउ शकते. कारण प्रकृती कुठली व विकृती कुठली याबाबत सर्वसहमती अवघडच असते.वृद्धांच्या मानसिक आजारात स्मृतीभ्रंशाचाच समावेश आहे.मनाचे आजार व अंधश्रद्धा मधे भूत, भानामती अंगात येणे,संमोहन या बाबींचा उहापोह आहे.मन व स्वभाव या प्रकरणात बहुतांशी मानसशास्त्राचा वर्गवारी चा भाग आहे.फ्रॉईडचे मॉडेल ते आधुनिक मानसशास्त्राचे प्रचलित संशोधन यात मांडले आहे.
एकंदरी पुस्तक विषयाच्या मानाने किचकट नाही.

प्रश्न मनाचे
लेखक -डॉ हमीद दाभोलकर, डॉ नरेंद्र दाभोलकर
प्रकाशक- राजहंस प्रकाशन
पृष्टे- १५०
किंमत - १४०/-

Comments

धन्यवाद!

पुस्तक परिचयाबद्दल धन्यवाद.

पुस्तकात औदासिन्य व मूडचे आजार, चिंतेचे आजार,व्यसन व व्यसनमुक्ति,स्किझोफ्रिनीया,मनोकायिक आजार,फिटेचे आजार, लहान मुलांचे मानसिक आजार, लैंगिक समस्या, वृद्धत्वातील मानसिक आजार, स्त्रिया व त्यांचे मानसिक आजार,मनाचे औषधोपचार, मनाचे आजार आणि अंधश्रद्धा,मन आणि स्वभाव अशा प्रकरणांमध्ये पुस्तक विभागले आहे.

मला वाटतं की पाश्चात्य समाजातील प्रश्न आणि भारतीय समाजातील प्रश्न यांचा उहापोह किंचित वेगळ्या प्रकारानेही पुस्तकात सामील व्हायला हवा. बाबा-बुवा, चमत्कार यांचा भारतीय समाजाला लागणारा आधार, साक्षात्कार, दर्शन, आकाशवाणी, उपास-तापास, इ. इ. मनाला आधार देणारे फसवे आभास आणि या ऐवजी आवश्यक असणार्‍या मानसिक उपचारांची गरज यांचाही समावेश व्हायला हवा.

व्यसन हा एक मानसिक आजार आहे.कुटुंबात अथवा परिचितांमधे व्यसनाच्या आहारी गेलेली माणसे आपण पहातो. पुर्णत: व्यसनमुक्त करता येईल असे औषध अजून वैद्यकशास्त्राला सापडले नाही.

खरंय आणि यासाठी Intervention (इंटरवेन्शन)ची गरज असते. :-)

हाऊ आय मेट युवर मदर

Intervention हा प्रकार पहिल्यांदा मी हाऊ आय मेट युवर मदर या सी. बी. एस. च्या अमेरिकन सिटकॉमच्या काही भागात पाहिला. युनिक प्रकार आहे, चांगला वाटला. अर्थातच हे Intervention मित्रमंडळीनी केलेले होते. पण खरच चांगलं आहे.

मानसमित्र

खरंय आणि यासाठी Intervention (इंटरवेन्शन)ची गरज असते. :-)

नक्कीच. मानस मित्र या नावाची एक संकल्पना आकाराला येते आहे. हल्ली अंनिस चळवळीत ती मांडली जाते. इथे रुग्ण व मानसोपचार करणारे डॉक्टर्स वा इस्पितळ या मधे तो दुवा म्हणुन काम करतो. रुग्णाची मानसोपचारासाठी अनुकूल अशी सामाजिक, मानसिक पातळीवर पार्श्वभूमी तयार करणे हे त्याचे मुख्य काम. मानसिक प्रथमोपचार करणे हा त्याचे अजुन एक काम. मानसशास्त्राच्या प्राथमिक अभ्यासातुन त्याला असे करणे शक्य होईल. थोड्याशा समुपदेशनाशी मिळताजुळता जाणारा हा मार्ग आहे. ग्रामीण भागात याची जास्त आवश्यकता आहे. अजुनही भारतात मानसोपचाराकडे मान्यताप्राप्त वा सकारात्मक दृष्टीने पाहिले जात नाही.
प्रकाश घाटपांडे

चांगले पुस्तक. चांगला परिचय.

पुस्तकाचा परिचय उत्सुकता वाढवणारा आहे. मला वाटते यातून ब-याच विचित्र प्रश्नांची तड लागायला हरकत नसावी. बघूया.

"स्किझोफ्रेनिया" आणि 'सिव्हीअर बायपोलर"

"स्किझोफ्रेनिया" आणि 'सिव्हीअर बायपोलर" - याच्यात डॉक्टरांचीही बरेचदा गल्लत होऊ शकते. पण दोन्ही भिन्न प्रकृतीचे आजार आहेत. "सिव्हीअर बायपोलर" मध्ये डिप्रेशन (औदासिन्य) आणि मॅनिया या दोहोंमध्ये लंबक हेलकावत राहतो इतका भरभर हेलकावत रहातो की रुग्णाला स्वतःचे मूड्-स्विंग्स आटोक्यात ठेवणे कठीण होऊन बसते. दोन्ही आजारांमध्ये नातेवाईकांचा कस हा लागतोच. मेंदूतील रासायनिक बदल हे दोहोमध्ये कारणीभूत असले तरी दोन्ही आजार भिन्न आहेत.

धन्यवाद

एका छान पुस्तकपरिचयासाठी धन्यवाद. आंतरजालीय आभासी हळवेपणाचे निदान आणि उपाय ह्यावर ह्या पुस्तकात काही मजकूर आहे काय? नसल्यास पुढील आवृत्तीत जरूर टाकावा असे सुचवतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

जालबाह्य

आंतरजालीय नव्हे पण वास्तवातला एक प्रश्न औदासिन्य व मूडचे आजार यात घेतला आहे.
"गेले सहा महिने काही कारण नसताना माझे डोळे भरुन येतात. काही वेळा तर चक्क रडू कोसळते. मनाला सतत उदास उदास वाटते. सर्व काही चांगले चालले असताना असे का होते?"
असा तो प्रश्न आहे. हे एक जैविक औदासिन्य आहे.
प्रकाश घाटपांडे

प्रथमच

ह्या पुस्तकाबद्दल् प्रथमच ऐकतोय्.
असं काही शास्त्रीय, नीट माहिती देणारं असलं तर निदान समाजच्या काही एक वर्गात तरी मनोरुग्णांबद्दलच्या चमत्कारिक कल्पना दूर होतील अशी आशा आहे.
त्यादृष्टीनं फारच संक्षिप्त का असेना पण "मनोविकारांचा मागोवा" खरोखर् उपयुक्त वाटलं होतं. पण साला त्यातली कुठलीही तीन-चार पाने
वाचली की आपल्याला स्वतःलाच आपण् वाचत असलेली लक्षणं जाणवायला लागायची. त्यामुळं आजही संपूर्ण असं कधी वाचून झालेलच नाही.

चमत्कारिक कल्पना *
१.स्किझोफ्रेनिया म्हणजे तेच ना ते (मद्राशी)"अपरिचित" पिक्चर मह्दे हिरोला होतं ते? एकदम लग्गेच स्टायलिश बनतो ना तो, आणि लगेच त्याचे मसल्स कस्ले टाइट होतात नै.
टराटर गफुगणार्‍या त्या दंडामुळे चक्क शर्टच फाटतो त्याचा. तेच ते ना ते? माणसाला एकदम सूप्पर मॅन बनवून टाकतं ते.
किंवा--->
२.मनोरुग्ण म्हणजे तेच ना ते साले रस्त्यावरून दगडं मारत फिरतात. साखळ्यांनी बांधून अंधार्‍या खोलित फेकलं पाहिजे बाबा ह्यांना.

आणि असेच बरेचसे काही.

--मनोबा

 
^ वर