कोल्ड फ्युजन

कोल्ड फ्युजन: आण्विक ऊर्जानिर्मितीचा फसलेला प्रयोग

मार्च 23, 1989 रोजी अमेरिकेतील उटाह विश्वविद्यालयाची एक प्रेस नोट जगभर प्रसिद्ध झाली. व तीच प्रेस नोट मार्टिन फ्लेशमनच्या वैज्ञानिक कारकीर्दीच्या दु:खद अंताची नांदी ठरली. त्या प्रसिद्धी पत्रकात "उटाह विश्वविद्यालयातील वैज्ञानिकांनी खोलीच्या तापमानात कोल्ड फ्युजन प्रक्रियेतून आण्विक ऊर्जा निर्मितीची शक्यता आहे असा शोध लावलेला आहे. यामुळे आण्विक ऊर्जेसंबंधीच्या या पूर्वीच्या नाट्यमय घटना, त्याचा थरार यांना पूर्णविराम मिळणार आहे. आण्विक विखंडनातून मिळणाऱ्या ऊर्जेच्यामुळे उपस्थित होणारे सुरक्षिततेच्या, प्रदूषणाच्या, निर्मितीच्या प्रचंड खर्चाच्या प्रश्नांना कोल्ड फ्युजन हे उत्तर असून यातून अत्यंत कमी खर्चात प्रचंड प्रमाणात प्रदूषणविरहित आण्विक ऊर्जेची निर्मिती शक्य असून यामुळे जगाचे कल्याण होणार आहे." अशी नोंद होती. मार्टिन फ्लेशमन मात्र 'हे जग वाचवण्यासाठी मी काही करावे हा माझा मुळीच उद्देश नव्हता' असे सांगत असला तरी जमलेल्यांनी त्याच्या विधानाकडे दुर्लक्ष केले. ती प्रेस नोट व त्यानंतरची वार्ताहर परिषद यामुळे वैतागलेल्या फ्लेशमनला प्रयोग करते वेळी क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स नेमके काय आहे, याचे कुतूहल होते. व त्यासाठी प्रयोगाची जुळणी करत होता.

मार्टिन फ्लेशमन (Martin Fleischmann)

मार्टिन फ्लेशमन

मार्टिन फ्लेशमन व त्याचा सहकारी स्टॅन्ली पॉन्स या दोघानी मिळून पदरचे एक लाख डॉलर्स खर्च करून कोल्ड फ्युजनचे सुरुवातीचे प्रयोग करत होते. परंतु एक वेळ अशी आली की आणखी पैसे ओतल्याशिवाय पुढे जाणे शक्य नव्हते. निदान सहा लाख डॉलर्सची गरज होती. त्यासाठी आपण करत असलेल्या प्रयोगाबद्दलच्या प्राथमिक माहितीचा अहवाल विश्वविद्यालयाला सादर करून सहा लाख डॉलर्सच्या अनुदानाची मागणी केली. अहवालात खोलीच्या तापमानात आण्विक प्रक्रिया शक्य झाल्यास आण्विक विखंडन (nuclear fission) प्रक्रियेप्रमाणे प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करता येईल व तेही आण्विक विखंडन प्रक्रियेतील सर्व अहितकारक गोष्टी पूर्णपणे टाळून! विद्यापीठाला प्रसिद्धीसाठी एवढी गोष्ट पुरेशी ठरली व घाईघाईने वार्ताहर परिषद बोलवून फ्लेशमन व पॉन्स यांना बळीचा बकरा बनविण्यात विद्यापीठ यशस्वी झाली. फ्लेशमनला विद्यापीठाची ही घिसाडघाई अजिबात आवडली नव्हती. परंतु अनुदानाच्या आशेपोटी त्याला हे सर्व सहन करावे लागले. त्याची हीच सौम्य वागणूक त्याच्या कारकिर्दीला मारक ठरली व वैज्ञानिक जगतात तो बदनाम झाला. बातमी प्रसिद्ध झाल्या झाल्या काही उत्साही वैज्ञानिकांनी फ्लेशमनचे प्रयोग पुन्हा एकदा करून खरोखरच ऊर्जा निर्मिती शक्य आहे का याची चाचणी घेऊ लागले. परंतु नंतर केलेले प्रयोग यशस्वी होऊ न शकल्यामुळे फ्लेशमनच्या दाव्यातील फोलपणा जगासमोर आला.

थोडासा विचार करू लागल्यास आण्विक फ्युजन (nuclear fusion) सैद्धांतिकरित्या संभवनीय अशी संकल्पना आहे, हे नक्कीच लक्षात येईल. दोन अणूंना अत्यंत जवळ आणून त्यांच्या अणुगर्भांना जोडल्यास त्यातून एक जड अणू तयार होत असताना या निर्मितीप्रक्रियेच्या वेळी प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेर पडण्याची शक्यता आहे. मुळात ही विशिष्ट आण्विक प्रक्रियाच जीवनदायिनी ठरणारी आहे. सूर्यग्रहावरील ऊर्जेचा स्रोतसुद्धा न्यूक्लिअर फ्युजनचेच फलित आहे. सूर्यावरील हायड्रोजन अणूंचे गुरुत्वबलामुळे फ्युजन होत हिलीयमच्या अणूंची निर्मिती होते. ही प्रक्रिया घडत असताना प्रचंड प्रमाणात ऊर्जा बाहेत पडते. हाच धागा पकडून पृथ्वीवरसुद्धा अशा प्रकारे फ्युजन प्रक्रियेतून ऊर्जा निर्मिती का करू नये याचा ध्यास त्याकाळच्या वैज्ञानिकांना लागला होता.

पृथ्वीवर 'सूर्यतेज' तळपविण्यासाठी जड हायड्रोजन अणूंचीच फक्त गरज आहे. सामान्यपणे हायड्रोजनच्या अणुगर्भात न्यूट्रॉन्स नसतात. परंतु हायड्रोजनचे समप्रोटॉन्स (isotopes) असलेल्या ड्युटेरियममध्ये 1 न्यूट्रॉन व ट्रिटियममध्ये 2 न्यूट्रॉन्स आहेत. म्हणूनच यांना जड हायड्रोजन असे म्हटले जाते. खोलीतील तापमान व हवेचा दाब या स्थितीत हायड्रोजन अणूपेक्षा जड हायड्रोजन अणूंच्या वापरामुळे फ्युजन प्रक्रिया सोपे होईल असे वैज्ञानिकांना वाटते. सूर्यावरील फ्युजन प्रक्रिया 1 कोटी ते दीड कोटी अंश तापमानात व समुद्राच्या तळाशी असलेल्या हवेच्या दाबाच्या कित्येक पटीत असलेल्या स्थितीत होत असते. पृथ्वीवर मात्र हायड्रोजनच्या अणूतील धनभारातील विद्युत प्रतिकर्षणाला मात करण्यासाठी खोलीतील तापमान वा हवेचा दाब पुरेश्या नाहीत. त्यामुळे तुलनेने जड असलेल्या हायड्रोजन समप्रोटॉन्सना याकामी वापरून ही प्रक्रिया सोपे करण्याचे प्रयत्न वैज्ञानिक करत होते.

मुळात हायड्रोजनचे समप्रोटॉन्स - ड्युटेरियम व ट्रिटियम - पृथ्वीवरील महासागरांच्या तळाशी मुबलक प्रमाणात सापडतात. सैद्धांतिकरित्या विचार केल्यास आपल्या सर्व आवश्यकतेला पुरून उरेल एवढी ऊर्जा महासागरांच्या गर्भातील हायड्रोजनच्या समप्रोटॉन्समध्ये साठलेली आहे. परंतु वास्तवातील चित्र फार वेगळेच आहे. गेली कित्येक दशके शेकडो वैज्ञानिक खोलीच्या तापमानात नियंत्रित कोल्ड फ्युजन प्रक्रियेतून ऊर्जा निर्मितीसाठीचे संशोधक प्रयोग करत आहेत. वैज्ञानिकांच्या जगतात हे संशोधन व प्रयोग चेष्टेचे विषय झालेले आहेत. कारण प्रत्येक वेळी अशा प्रयोगातील तथाकथित यश वैज्ञानिकांना पुनश्च हरीओम् करण्यास भाग पाडते. सूर्यावर असल्यासारखे तापमान व दाब पृथ्वीतलावर निर्माण करता येणे शक्य नाही व कोल्ड फ्युजनच्या प्रयोगातून काहीही निष्पन्न होत नाही, अशी अवस्था आहे.

त्यामुळे फ्लेशमन व पॉन्स यांच्या प्रयोगाच्या जुजबी अहवालाला नको तितके महत्व दिले गेले. त्यांनी केलेले कोल्ड फ्युजनच्या यशाचे दावे खरोखर असल्यास न्युक्लियार फिशन (nuclear fission) प्रक्रिये साठी केलेला आटापिटा, घेतलेले श्रम, ओतलेला पैसा, सुरक्षिततेसाठी पत्करलेला धोका, पूर्णपणे वाया गेल्यासारखे होतील व सर्व थरात संबंधितांची छी - थू होईल. (आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न तरी सुटेल!) प्रयोगशाळेतील आण्विक फ्युजन केलेल्या एका बीकरमध्ये एवढी ऊर्जा साठवलेली असल्यास इतके दिवस वैज्ञानिक काय करत होते, या प्रश्नाला उत्तर देणे अवघड ठरले असते.

पॉन्स व फ्लेशमननी केलेला प्रयोग अत्यंत सोपा होता. प्रयोगासाठी लागणाऱ्या वस्तू सहजपणे उपलब्ध होण्यासारख्या होत्या. हायड्रोजन वा ऑक्सिजन ऐवजी ड्युटेरियमच्या अणूंची प्रक्रिया झालेले जड पाणी (heavy water) बीकरमध्ये होते. त्यात पॅलेडियम धातूच्या पट्टीची एक टोक बुडविले होते. दुसऱ्या टोकाला बॅटरीच्या एका टर्मिनलवरून आलेली तार जोडली होती. बीकरच्या आत ठेवलेल्या प्लॅटिनमच्या वेटोळ्याला बॅटरीच्या दुसऱ्या टर्मिनलवरून आलेली तार जोडली होती. फ्लेशमन व पॉन्स यांच्या मते विद्युत प्रवाह सुरु केल्यानंतर बॅटरीतील वीज प्लॅटिनमच्या तारेतून जड पाण्यात, तिथून पॅलेडियमच्या पट्टीतून विद्युत मंडल (circuit) पूर्ण करणार होती. विद्युत प्रवाहामुळे ड्युटेरियमचे अणू पॅलेडियम पट्टीतील अणूंच्या भोवती असलेल्या मोकळ्या पोकळीत जावून घट्टपणे बसण्याच्या प्रयत्नात रासायनिक क्रियेमुळे ऊर्जा बाहेर पडणार होती.

यातील पहिल्या अर्ध्या विधानात थोडे फार तथ्य होते. कारण यापूर्वी 1866 मध्ये थॉमस ग्रॅहम या रसायनतज्ञाने पॅलेडियम धातू हायड्रोजन अणूंना सामावून घेवू शकते, हे प्रयोगानिशी सिद्ध करून दाखविले होते. खरे पाहता हा धातू हायड्रोजन अणूंना गिळंकृत करण्यास उतावीळ आहे असेच चित्र उभे केले होते. खोलीचे तापमान व हवेचा दाब या स्थितीत हायड्रोजन अणूच्या घनतेपेक्षा 900 पटीने जास्त अणू या धातूने शोषल्या होत्या. परंतु पॅलेडियम धातू खरोखरच या प्रमाणात अणूंचे शोषण करून अणूंचे संयोजन घडवून आणत होते का?

पॉन्स व फ्लेशमनच्या प्रयोगात वाजवीपेक्षा जास्त उष्णता निर्माण झाली होती. बॅटरीतील विद्युतशक्तीतून मिळणाऱ्या उष्णतेपेक्षा ही उष्णता नक्कीच जास्त होती. हेच जर खरे असल्यास ही अतिरिक्त उष्णता आली कुठून? म्हणूनच हे दोन्ही वैज्ञानिक ही उष्णता ड्युटेरियमच्या अणू संयोजनातूनच आली असावी या निष्कर्षाप्रत पोचले.

या जोडीचे कोल्ड फ्युजन बद्दलचे विधान व प्रयोगाने विज्ञानजगतात बॉम्बसदृश स्फोट घडवून आणला होता. बहुतेक वैज्ञानिक फ्लेशमनचा प्रयोग पुन्हा करून त्याच्या सत्यासत्यतेच्या तपासणीमागे लागले. अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने वरिष्ठ वैज्ञाविकांची एक समिती नेमून, या समितीला या दाव्याच्या सत्यासत्यता शोधून अहवाल तयार करण्यास सांगितले. समितीच्या नोव्हेंबर 1989च्या अहवालात "उटाह विद्यापीठाच्या दाव्याच्या संदर्भात केलेल्या काही प्रयोगामध्ये अधून मधून जास्त उष्णताबाहेर पडत असली तरी प्रयोगाचे बहुतेक दावे नकारात्मक आहेत" असे नमूद केले होते. प्रयोगच्या वेळी बाहेर पडणारी उष्णता कोल्ड फ्युजनमुळेच याला कुठलाही वैज्ञाविक आधार नाही. व कोल्ड फ्युजन म्हणून संबोधित करत असलेल्या संकल्पनेचे कुठलेही ठोस पुरावे नसल्यामुळे या संबंधीचे यानंतरचे प्रयोग ताबडतोब थांबवून पैसै वाचवावे, अशी शिफारस केली. त्यातल्या त्यात थोडीशी समाधानाची गोष्ट म्हणजे आपापल्या निधीच्या उपलब्धतेनुसार अशा प्रकारचे अभ्यास चालू ठेऊन अतिरिक्त उष्णता कुठून येते यावर संशोधन करण्याची अनुमती दिली.

परंतु वैज्ञानिक वा संस्था शासनाकडून होणाऱ्या निधी कपातीचा धोका पत्करण्यास तयार नव्हते. सर्वजण पॉन्स व फ्लेशमनवर तुटून पडले. त्याकाळच्या एका पत्रकाराच्या मते चर्चला जशी पोर्नोग्राफी निषिद्ध होती तशीच वैज्ञानिकांची प्रतिक्रिया व भावना कोल्ड फ्युजनबद्दल होत्या.

या सर्व गोष्टींना अपवाद होता फक्त अमेरिकन नेव्हीच्या प्रयोगशाळांचा! तेथील वैज्ञानिकांना कोल्ड फ्युजनबद्दल अजिबात घृणा नव्हती. फ्लेशमन हा या प्रयोगशाळांचा सल्लागार होता. प्रयोगशाळेतील अनेक संशोधकांनी फ्लेशमनच्या मार्गदर्शनाखाली तज्ञांनी संमती दिलेले शोध निबंध यापूर्वी प्रसिद्ध केले होते. येथील संशोधक खोलीच्या तापमानातील कोल्ड फ्युजनसाठी काही नवीन वाटा शोधत होते. जेव्हा पॉन्स व फ्लेशमन यांच्या फसलेल्या प्रयोगाची बातमी या लॅब्सपर्यंत पोचली तेव्हा तेथील वरिष्ठानी कुणाला या संशोधनातून बाहेर पडावेसे वाटते त्यानी हात वर करावे अशी सूचना केली. परंतु एकही हात वर आला नाही. आणि हे संशोधक याच विषयावरचे संशोधन चालू ठेवले. कोल्ड फ्युजनच्या संशोधनाला निधी मिळविण्यात अडचण होती म्हणून गैरखर्च या सदराखाली प्रयोगाचा खर्च दाखविण्यात आला. संशोधनाचे शीर्षक बदलण्यात आले. नेव्ही लॅबमधील संशोधक निराश न होता संशोधन करू लागले. अशा संशोधकापैकी मेल्विन माइल्स (
Melvin Miles) हे नाव सहजासहजी विसरण्यासारखे नव्हते.

मेल्विन माइल्स

मेल्विन माइल्स

माइल्सच्या नावे तोपर्यंत शंभरेक तरी तज्ञांनी मान्यता दिलेले शोधनिबंध प्रसिद्ध झाले असावेत. रासायनिक प्रयोग करण्याविषयी आढेवेढे घेणाऱ्यातला तो कधीच नव्हता. त्यामुळे कोल्ड फ्युजनचा प्रयोग परत एकदा करून त्याची शहानिशा करण्याची तयारी त्यानी दर्शविली. कदाचित हा निर्णयच त्याला पुढे अडचणीत आणला.

माइल्सच्या प्रयोगासंबंधीच्या शोधनिबंधात त्यानी केलेल्य़ा चाचणीची संपूर्ण माहिती दिली होती. लॅबमधील पॅलेडियमच्या तुकड्याला आठ दिवस ड्युटेरियमच्या द्रवात त्यानी बुडवून ठेवले. ड्युटेरियमच्या अणूंनी पॅलेडियमचा तुकडा भरून ठेवण्याचा उद्देश त्यामागे होता. याच तुकड्याचे एक टोक विद्युत-रासायनिक कोशिकेत (electrochemical cell) बुडवून रासायनिक प्रक्रियेची सुरुवात केली. परंतु प्रयोगातून काहीही निष्पन्न झाले नाही. प्रयोग पूर्णपणे फसला होता. कुठलीही आण्विक क्रिया घडली नाही. स्वत:च्या टिप्पणीसकट त्यानी पॉन्स व फ्लेशमनच्या प्रयोगाविरुद्ध एक भक्कम पुरावा त्यानी सादर केला.

मुळात हे प्रकरण येथेच थांबायला हवे होते. परंतु त्याच्या काही संशोधक मित्रांनी फ्लेशमनचे प्रयोग करताना अधून मधून उष्णता उत्पन्न होते यावर भर दिला होता. त्यामुळे माइल्स पुन्हा एकदा चाचणी करण्यास स्वत:ला गुंतवून घेतला. मार्च ते ऑगस्ट 1989 च्या दरम्यान केलेल्या त्याच्या एकाही प्रयोगात अपेक्षित परिणाम काही मिळाले नाहीत. फ्लेशमनला ही गोष्ट कळल्यानंतर त्यानी पॅलेडियम धातूच्या आणखी काही विशेष पट्ट्या पाठवून दिल्या. माइल्सच्या यासंबंधीच्या आठ प्रयोगांची सविस्तर माहिती डिसेंबर 1990 मध्ये प्रसिद्ध झाली. त्याच्या मते या प्रक्रियेत 30 ते 50 टक्के जास्त उष्णता बाहेर पडते. आश्चर्य म्हणजे या माहितीने कुठलेही वादळ निर्माण केले नाही. माध्यमांनी दखल घेतली नाही. माइल्सच्या प्रयोगाचे निष्कर्ष फ्लेशमनच्या निष्कर्षाशी मिळतेजुळते होते. तरीही वैज्ञानिकांनी माइल्सच्या शोधनिबंधाला केराची टोपली दाखवली.

यासंबंधी 1996पर्यंत त्याच्या लॅबसकट सगळीकडे सामसूम होते. त्याच्या लॅबचा वरिष्ठ असलेला रॉबर्ट नोवॅकला कोल्ड फ्युजनच्या शक्यतेबद्दल उत्सुकता होती. नेव्हीला मात्र लॅबला दिलेल्या अनुदानातील एकही डॉलर केल्ड फ्युजनवर खर्ची पडू नये असे वाटत असल्यामुळे नोवॅकही हताश झाला होता. काही दिवसात त्याची उचलबांगडी झाली. लॅबमधील वैज्ञानिक वेगवेगळ्या प्रकारचे पॅलेडियम वापरून प्रयोग करण्यात गुंतले होते. परंतु परिणाम शून्य! हळू हळू तरुण वैज्ञानिक संशोधनाचा विषय बदलून वेगळ्या विषयावर संशोधन करू लागले. परंतु माइल्सला मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात शोधनिबंध प्रकाशित झालेले असूनसुद्धा इतर कुठल्याही लॅबने त्याचा स्वीकार केला नाही. शेवटी त्याच लॅबमध्ये स्टोरकीपर म्हणून काम करत खोके वर खाली करण्याची वेळ त्याच्यावर आली. अशा प्रकारे कोल्ड फ्युजनच्या संपर्कात आलेल्या वैज्ञानिकांची हीच दुर्दशा होणार हा धोक्याचा इशारा वैज्ञानिक जगतात पसरला. गंमत म्हणजे समोर धोका दिसत असूनही नोबेल पारितोषक विजेता ज्युलियन श्विंगरसुद्धा या संकल्पनेच्या आहारी गेला.

ज्युलियन श्विंगर

ज्युलियन श्विंगर

ज्युलियन श्विंगरला (Julian Schwinger, 1918-1994) रिचर्ड फेनमनबरोबर 1965 सालचे नोबेल पारितोषक विभागून मिळाले होते. 1994 साली कॅन्सरमुळे त्याचा मृत्यु झाला. नेचर या नियतकालिकेतील मृत्युलेखात त्याच्या कोल्ड फ्युजनवरील 'अतीव प्रेमा'चा उल्लेख नसला तरी त्याच्या आयुष्यातील काही वाईट प्रसंगांचा उल्लेख होता. या वाईट प्रसंगामुळेच त्याच्या सैद्घांतिक भौतशास्त्रज्ञ या प्रतिमेला तडा गेला. त्याच्या क्षेत्रात छी थू झाली. मुळात हा सैद्धांतिक शास्त्रज्ञ असल्यामुळे कोल्ड फ्युजनच्या संदर्भात त्यानी आठ शोधनिबंध प्रसिद्ध केले. या विषयावर आणखी संशोधन व्हायला हवे अशी आग्रहाची मांडणी केली. कोल्ड फ्युजनवर भाषण देण्याचे प्रयत्न केले. परंतु वैज्ञानिकांचे जग याबद्दल काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्या दृष्टीने कोल्ड फ्युजन म्हणजे भ्रामक विज्ञान व त्यावर संशोधन करणारे वैज्ञानिक ठार वेडे!

खरे पाहता फ्लेशमन वा माइल्स यांचे कुठे चुकले, त्यांनी काय करायला हवे होते हे प्रश्न बाजूला सारून खोलीच्या तापमानातील रासायनिक प्रक्रियेतून अणूरचनेत हस्तक्षेप करत आण्विक ऊर्जेची निर्मिती करणे शक्य आहे की नाही, हा प्रश्न प्रस्तुत ठरला असता. विज्ञान फक्त वैज्ञानिकांच्या आयुष्यातील चढउतारांचे फलित नसते. काही वेळा त्यात विसंगती असू शकतात. विरोधाभास असू शकतात. व या विसंगती वा विरोधाभास इतक्या सहजासहजी नष्ट होत नसतात. त्यामुळे कदाचित श्विंगरचा मृत्यु, माइल्सची निवृत्ती वा फ्लेशमनची जाहीरपणे झालेली निर्भत्सना यांना बाजूला सारून 2004 साली कोल्ड फ्युजनचे पुनरुत्थान झाले. यावरील संशोधनाला अनुदान मिळू लागले. शोधनिबंध प्रसिद्ध होऊ लागले. नेव्हीच्या प्रयोगशाळेतील अनेक वर्षे झालेल्या संशोधनाचे संकलन करून दोन खंडात ग्रंथ प्रसिद्ध करण्यात आले. ज्याप्रकारे पॉन्स व फ्लेशमन यांच्या प्रयोगांची निंदा नालस्ती करण्यात आली होती त्याचे वास्तव या ग्रंथात नमूद केले होते. पॉन्स व फ्लेशमनच्या प्रयोगांच्या विरोधात प्रामुख्याने अमेरिकेतील एम आय टी (MIT), कॅलटेक(Caltech) व ब्रिटनमधील हावेल् लॅबनी आघाडी उघडल्यासारखे बातम्या प्रसृत करत होत्या. मुळात वैज्ञानिक जगतात याच तीन संशोधक संस्थांचा वरचष्मा होता. त्यांच्या विधानाला किंचितसा विरोध दर्शविण्याइतपतही कुवत इतर वैज्ञानिक संस्था, विद्यापीठ, लॅब्स वा वैज्ञानिकांच्याकडे नव्हती. MITने जेव्हा प्रयोगाविषयी विरोध नोंदविला तेव्हा त्यानी केलेल्या प्रयोगांची पूर्ण माहिती दिली नव्हती. परंतु काही कालावधीनंतर प्रयोगाच्या वेळी जास्त उष्णता निर्माण होऊ शकते याची परिशिष्ट जोडून नोंद केली.

युजिन मॅलोव्ह या MITच्या विज्ञान लेखकाने यासंबंधी जास्त खोलात शिरून MITला या पूर्वीच्या शोधनिबंधाला परिशिष्ट जोडण्यास भाग पाडले. परंतु MITच्या पहिल्या अहवालावरून अमेरिकन कॉंग्रेसने अनुदान न देण्याबाबतचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मॅलोव्हच्या प्रतिवादाचा उपयोग झाला नाही. मॅलोव्हच्या 10 years that shook physics या अहवालात यासंबंधीची माहिती असून त्यानी एके ठिकाणी MITचे प्राध्यापक रोनाल्ड पार्कर यानी 'उष्णतामापकाचा डाटाच (calorimetry data) टाकावू असेल!' असे विधान केल्याची नोंद केली आहे.

उष्णतामापक कितपत विश्वासार्ह आहेत यासंबंधात वैज्ञानिकांचे मतभेद असले तरी कोल्ड फ्युजनच्या प्राथमिक प्रयोगात जास्त उष्णता निर्माण होऊ शकते याला तत्वत: मान्यता मिळू लागल्यामुळे याविषयावरील संशोधनाची गाडी हळू हळू रुळावर येऊ लागली, हेही नसे थोडके! कोल्ड फ्युजन नावाभोवती संशयाचे धुके असल्यामुळे व प्रयोगातील सकारात्मकता लोकांपुढे यावे म्हणून आजकाल यासंबंधीचे संशोधन Low Energy Nuclear Rections (LENR) किंवा Chemically assisted Nuclear Rections (CANR) वा Condensed Matter Nuclear Science (CMNS) या शीर्शकाखाली होत असून त्यासाठी अनुदानही मिळू लागले आहे. जपान, अमेरिका व इटली येथील वैज्ञानिक याविषयी संशोधन करत आहेत.

ही संकल्पना अजूनही अत्यंत प्राथमिक अवस्थेत असून फार लांबचा पल्ला गाठावयाचा आहे, याची जाणीव सर्व संबंधितांना आहे. परंतु अखंड, अक्षय, शाश्वत, हरित (व परवडणारी) ऊर्जास्रोत ही काळाची गरज असल्यामुळे सर्व शक्यतांची पडताळणी होत आहे. वैज्ञानिकांनी खरोखरच कोल्ड फ्युजनची ही संकल्पना वास्तवात आणल्यास ऊर्जेचे समीकरणच पूर्णपणे बदलून जाईल यात मात्र शंका नाही!

संदर्भ
लेखातील चित्रे: विकिपिडियाच्या सौजन्याने

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम

माझ्यासारख्या अतज्ज्ञ वाचकांना सोप्या भाषेत विषय उलगडून दाखविल्याबद्दल प्रभाकर नानावटींचे आभार मानतो.

माझ्या मनात ब्लूमबॉक्स तंत्राबद्दल जी शंका बरेच दिवसांपासून आहे ती हा लेख वाचून पुन: जागी झाली. ह्या दोन वेगवेगळ्या विषयांची एकत्र गल्लत होऊन चर्चेचा focus धूसर होऊ नये म्हणून ब्लूमबॉक्स तंत्राबद्दल नवा धागा मी सुरू केला आहे.

माहितीपूर्ण लेख

अत्यंत माहितीपूर्ण लेख. कोल्ड फ्यूजन या विषयावर आतापर्यंता कोणी कोणी काम केले याचा गोषवारा त्यातून मिळाला. ही कल्पनाच इतकी आकर्षक आहे की जगभरातले शास्त्रज्ञ त्यावर प्रयत्न करीत राहणारच. लोखंडापासून सोने तयार करणारा परीस शोधण्यासाठी इतिहास काळात केवढे प्रयत्न चालले होते याची आठवण यावरून येते.
कोणत्या संशोधनासाठी किती निधी उपलब्ध करून द्यायचा हे ठरवण्याची जबाबदारी ज्या लोकांवर असते त्यांना त्यासाठी काही निकष लावावे लागतात. त्यांना असलेल्या ज्ञानाच्या आधारावरच ते याबद्दल निर्णय घेऊ शकतात. त्यांनी निधी दिला नाही म्हणून हा प्रयोग रखडला असे ठामपणे म्हणता येणार नाही किंवा त्यांना दोष देता येणार नाही.
आण्विक ऊर्जानिर्मितीचा फसलेला प्रयोग या मथळ्यावरून किंचित दिशाभूल होते. कोठल्याही वैज्ञानिक संशोधनामध्ये एक प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला असे सहसा घडत नाही. सुरुवातीचे अनेक प्रयोग फसतातच, पण त्या फसण्यामागील कारणे समजून घेऊन ती हळू हळू दूर करून पुढे जावे लागते. अणुविखंडनाबद्दल कोठलीही शंका नसतांनासुद्धा आणि भरपूर आर्थिक सहाय्य उपलब्ध असतांना देखील ती क्रिया प्रयोगाद्वारे सिद्ध करून दाखवण्यापूर्वी कित्येक प्रयोग फसले होते.

 
^ वर