पात की पातक?

भ्रूण=एंब्रियो आणि गर्भ=फीटस असे अर्थ असताना गर्भपाताला भ्रूणहत्या म्हणण्याची सुरुवात का झाली असावी? वास्तविक, गर्भारपणाच्या १० आठवड्यांनंतर भ्रूणाचे गर्भात रूपांतर होते. परदेशात बहुसंख्य गर्भपात हे भ्रूणावस्थेतच होत असले तरी भारतात मात्र तसे नाही. विशेषतः, सोनोग्राफीने लिंगनिवड करण्यासाठी भ्रूणपात शक्य नसतात, ते गर्भपात असतात. तरीही, हल्ली भ्रूणहत्या हाच शब्द का बरे प्रचलित झाला असावा? वीस आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या गर्भाला व्यक्ती म्हणून मान्यता देणे योग्य आहे काय? परदेशांत कॅथॉलिक लोकच तसा आग्रह धरतात. (पूर्वी कुटुंबनियोजन असा शब्द प्रचलित होता, आता त्याची जागा कुटुंबकल्याण या संकल्पनेने घेतली आहे. कोठेतरी मी वाचले की समाजवादी शासनव्यवस्थेला लोकसंख्या ही 'खाणार्‍या तोंडांची वाढ' अशी समस्या वाटते तर बाजारवादी शासनव्यवस्थेत तिला 'मानवी संसाधने' असे गोंडस नाव देण्यात येते, त्यामागे ग्राहक वाढविणे हा उद्देश असतो.) हत्या असा बटबटीत शब्द वापरून सरसकटच गर्भपाताची समाजमान्यता कमी होते आहे काय?
होणार्‍या बाळाला मतिमंदत्व असण्याची शक्यता जाणणार्‍या चाचणीची जाहिरात करणारी पत्रके प्रसूतीतज्ञांच्या स्वागतकक्षात ठेवलेली असतात. त्यांपैकी PerkinElmer या कंपनीच्या पत्रकात पुढील प्रकारचा मजकूर आहे: "मतिमंदत्वाची शक्यता थोडीच असते परंतु आधीच खात्री करून मानसिक शांतता मिळविता येते. पहिल्या चाचणीत संशय आला तर पाचव्या महिन्यात विस्तृत चाचणी करता येते." इथवर ठीकच आहे. परंतु, पुढे त्यात असेही म्हटले आहे की, "बाळाला मतिमंदत्व असल्याची पुरेशी खात्री गर्भावस्थेतच पटली तर त्याच्या भवितव्यासाठी आर्थिक आणि वैद्यकीय तरतूद करून ठेवण्यासाठी अधिक वेळ मिळतो.". संपूर्ण पत्रकात अ‍ॅबॉर्शन हा शब्दही नाही. बहुतेक सर्व डॉक्टर अशा प्रकरणांत गर्भपाताचा सल्ला देतात तरीही तो उल्लेख या पत्रकात हेतूपूर्वक टाळण्यात आला आहे असे मला वाटते.
--
स्त्रीभ्रूणहत्या या विषयातही 'मुलगी वाचवा', "माझ्या मुलींना मारून टाकले" अशा प्रकारचे उद्गार सर्रास काढले जातात. अशा भडक विधानांद्वारे लोकांच्या भावनेला हात घालण्यात येतो आहे. अन्यथा, जर गर्भपात हाच गुन्हा नाही, तर स्त्रीलिंगाचे गर्भपात हा तरी गुन्हा का व्हावा? तो गर्भाविरुद्धचा नैतिक गुन्हा नाही, आईची इच्छा असल्यास तिच्याविरुद्धही गुन्हा होत नाही. तो केवळ समाजाविरुद्धचा गुन्हा आहे. कारण, मुलींची संख्या कमी झाल्यास काय होते? तर, समाजाला वधू मिळत नाहीत, कुमारांची झुंड गुन्हे करते, इ. त्रास उद्भवतात. लोक मुली का टाळतात? तर, समाजात मुलगी वाढविणे त्रासाचे, कमी प्रतिष्ठेचे वाटते म्हणून! म्हणजे, समाजाच्या चुकांमुळे त्या पालकांना त्रास होणार असतो आणि समाजाच्या अन्यायाच्या बळी पालकांनी समाजाच्या गरजा पुरवाव्यात अशी समाजाची अपेक्षा आहे. वास्तविक, विविध रोगांचे गर्भ पाडण्याची किंवा त्यांना जन्मू देण्याची अनुमती आहेच. सिकल सेल पंडुरोग असल्यास मलेरियाची शक्यता कमी होते. सिकल सेल रोगाचे वाहक अपत्य घ्यावे की मलेरियाच्या भीतीत जगणारे निरोगी अपत्य घ्यावे ते आईला ठरविता येते आणि त्याला कायद्याची बंदी नाही. कोणत्या शक्यता असलेले बाळ जन्माला घालावे आणि कोणते टाळावे ते ठरविण्याची अनुमती आजही आईला आहे. उदा., घार्‍या डोळ्यांचे, गोरे, असे समाजात अप्रूप असणारे बाळ जन्मणार आहे काय त्याचा तपास जनुकीय चाचण्यांनी शक्य आहे. त्यानंतर ते जन्मू द्यावे की त्याचा गर्भपात करून त्वचेच्या कर्करोगाची कमी शक्यता असलेल्या बाळासाठी पुन्हा गर्भधारणा करावी ते ठरविण्यास कायद्याची बंदी नाही. मात्र, 'दारु पिऊन दुचाकी अपघातात मृत्यू' हाही एक रोगच आहे आणि 'हुंडाबळी', 'बलात्कार', हेही रोगच आहेत. 'प्रोस्टेटचा कर्करोग होण्याची शक्यता मुळीच नसलेलेच अपत्य' किंवा 'स्तन/गर्भाशय यांचे कर्करोग होण्याची मुळीच भीती नसलेले अपत्य' अशा अपेक्षांवर समाजाने बंदी का घालावी?
तसेही, आईचे रक्त तपासून गर्भाचे लिंग जाणण्याच्या जेंडरमेंटर इ. चाचण्या स्वस्त होत आहेत, त्यांसाठी, आईचे रक्त परदेशी पाठवून चाचणी करविणारी रॅकेटेही सुरू आहेत. काही सेलफोनमध्ये सोनोग्राफीची सोय मिळते, थोड्याशा प्रशिक्षणाने कोणीही सोनोग्राफी करू शकतो, अशा चाचण्यांना स्थिर जागा लागत नसल्यामुळे त्यांना कसा आळा घालता येईल? इन विट्रो प्रकारच्या बीजफलनात लिंगनिश्चिती करण्यापासून अडविण्यासाठी तेथे नाणे उडविण्याचे यंत्र ठठेवण्याची सक्ती करणारा कायदा करण्यात येईल काय? इतकेच कशाला, टेस्टोस्टेरॉन, अल्फा फीटो प्रोटीन, hcg इ. साध्या चाचण्या करून थोडा अंदाज घेणे शक्य असते. त्यांवर बंदी घातली तरी त्या चाचण्या तर इतर कोणा व्यक्तीच्या नावे आईचे रक्त प्रयोगशाळेत पाठवूनही करवून आणता येतील. नपेक्षा, hcg/अल्फा फीटोप्रोटीन यांची तपासणी करून गर्भारपणातील अतिरक्तदाब या गंभीर रोगाचा अंदाज शक्य असतो, मुदतपूर्व प्रसूतीचा धोकाही जाणता येतो. टेस्टोस्टेरॉन अधिक असल्यास अपत्य ऑटिस्टिक निपजण्याची शक्यता असते तर कमी असल्यास समलिंगी निपजण्याची शक्यता असते. त्यामुळे, या चाचण्यांवर बंदी शक्य होईल असे मला वाटत नाही. उगीच सायलेंट ऑबजर्वर, स्टिंग ऑपरेशने, इ. खेळ किती चालणार? दुनियादारी करायची असेल तर आमीरने तीन करोड कशाला घ्यावे?
समाजात मुलगा होण्यास इतकी प्रतिष्ठा आहे की डोहाळजेवणातही बासुंदी/गुलाबजाम यांच्या झाकलेल्या वाट्यांचा खेळ करण्यात येतो. त्यावर बंदी नसल्यास मानसिकता दडपता येईल काय? आयुर्वेदातील पुंसवन विधी शिकविणार्‍या पुस्तकांवर बंदी आहे काय? आयआयटी बाँबे येथील सर्वात तरुण प्राध्यापक तथागत तुलसी यांच्या (सर्वोच्च न्यायालयात वकील) वडिलांना असे वाटते की फलज्योतिष्याच्या मदतीने मुलगा उजविता येतो आणि तसे करणे त्यांना योग्यही वाटते (संदर्भ). त्यांच्यावर काही कारवाई नको काय? स्त्री अपत्य अडचणीचे वाटणे ही मूळ समस्या आहे आणि स्त्रीपणा समाजात खरोखरीच अडचणीचा होणे हे त्याचे एक मुख्य कारण आहे. स्त्रीगर्भ पाडून पालक, स्त्रीत्व अडचणीचे लेखणार्‍या/लेखविणार्‍या सामाजिक मनोवृतीला खतपाणी घालतात हे सत्यच असले तरी निव्वळ त्याला आळा घातल्याने मूळ समस्या कशी सुटेल? तात्पुरता उपाय हाच झटपट जादूई उपाय समजला जात आहे, (जातीय आरक्षण हेही असेच एक उदाहरण आहे). येथे तर, मूलभूत, व्यक्तिस्वातंत्र्यावरच घाला नाही काय?

Comments

माझे मत

वीस आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या गर्भाला व्यक्ती म्हणून मान्यता देणे योग्य आहे काय?

माझ्यामते हा प्रश्न गर्भाच्या आई-वडिलांवर सोडावा. माझ्या माहितीतील काहीजण कुत्र्यामांजरांनाही कुटुंबातील व्यक्तीचे स्थान देतात. यात विनोद अपेक्षित नाही. कायद्यानेही पालकांच्या भावनेचा आदर करावा.

स्त्रीलिंगाचे गर्भपात हा तरी गुन्हा का व्हावा? तो गर्भाविरुद्धचा नैतिक गुन्हा नाही, आईची इच्छा असल्यास तिच्याविरुद्धही गुन्हा होत नाही. तो केवळ समाजाविरुद्धचा गुन्हा आहे.

१००% सहमत.

...अशा अपेक्षांवर समाजाने बंदी का घालावी?

जोपर्यंत अपेक्षा समाजाला डोईजड ठरत नाहीत तोपर्यंत अपेक्षांवर समाजाने बंदी घालू नये. माझ्यामते गर्भधारणेपूर्वी ती अपेक्षा असेल तोवर ठीक आहे. आपले मूल कसे असावे याची निवड करण्याचा हक्क पालकांना असावा. जोपर्यंत गर्भपात करणे सर्वसंमतीने (डॉक्टर आणि आई-वडिल) शक्य आहे तोपर्यंत निवड करण्याचा अधिकार असावा. (असे होणे आपल्या समाजात शक्य नाही असे वाटते.)

गर्भधारणेनंतर अपत्येच्छुक आई आणि वडिल यांच्या परस्परसंमतीने निर्णय घेतला जावा. (आपल्या समाजात असे होत नाही हे वर आले आहेच.) आई आणि वडिलांचे मत विभिन्न असल्यास, अपत्येच्छुक आईचा निर्णय अंतिम समजावा. माझ्यामते ज्याप्रमाणे मुलीच्या वडिलांची लग्नात मुलीला पैसे, मालमत्ता देण्याची इच्छा असेल तर त्याला हुंडा म्हणू नये परंतु त्यांनी ते द्यावे अशी अपेक्षा मुलाकडच्यांनी करणे अयोग्य समजले जाते कारण अशा अपेक्षा इतरांना डोईजड ठरू शकतात, त्याप्रमाणेच गर्भ-भ्रूणहत्येतही आईबापापेक्षा इतरांच्या अपेक्षा बाळगणे धोक्याचे ठरू शकते. वारंवार गर्भपाताने स्त्रीचे (आईचे) आरोग्य धोक्यात येऊ शकते. तिच्या मनावरही विपरित परिणाम होऊ शकतात हे अपत्यनिवडीबद्दल बोलताना लक्षात घ्यायला हवे.

दुनियादारी करायची असेल तर आमीरने तीन करोड कशाला घ्यावे?

मला दुनियादारी करायची आहे असे आमीरने म्हटले आहे का? माझ्यामते तो टिव्हीवर आणि टिव्हीबाहेर आपली भूमिका उत्तम निभावतो आहे. तीन करोड ठीक आहेत.

स्त्री अपत्य अडचणीचे वाटणे ही मूळ समस्या आहे आणि स्त्रीपणा समाजात खरोखरीच अडचणीचा होणे हे त्याचे एक मुख्य कारण आहे. स्त्रीगर्भ पाडून पालक, स्त्रीत्व अडचणीचे लेखणार्‍या/लेखविणार्‍या सामाजिक मनोवृतीला खतपाणी घालतात हे सत्यच असले तरी निव्वळ त्याला आळा घातल्याने मूळ समस्या कशी सुटेल?

स्त्री अपत्य अडचणीचे वाटू नये यासाठी स्त्रीअपत्य आधी व्हायला आणि वाढवायला तर हवे ना, मग त्या मुलीला फी माफी वगैरे देऊन शिकवले, सक्षम केले तर ती समाजधारणा पुढे बदलू शकेल. माझ्यामते अनेक सुशिक्षित कुटुंबात असेच झाले आहे आणि त्यांना मुली अडचणीच्या वाटणे कमी झाले. तेव्हा, स्त्री अपत्य होऊ द्या आणि ते होऊ दिले जात नसेल तर कायद्याने त्याला आळा घाला - "बर्‍या बोलाने ऐकत नसलात तर कायद्याने शहाणपण शिका" हा भाग मला पटतो.

येथे तर, मूलभूत, व्यक्तिस्वातंत्र्यावरच घाला नाही काय?

व्यक्तिस्वातंत्र्य हे मला समाजस्वास्थ्यापेक्षा महत्त्वाचे वाटत नाही. अर्थातच, समाजाने व्यक्तीचा आणि व्यक्तीने समाजाचा विचार करूनच निर्णय घ्यावेत.

अधिक माहिती

माझ्या माहितीतील काहीजण कुत्र्यामांजरांनाही व्यक्तीचे स्थान देतात. यात विनोद अपेक्षित नाही. कायद्यानेही पालकांच्या भावनेचा आदर करावा.

एकतर तो विनोदच म्हटला पाहिजे.
दुसरे म्हणजे, माझा मुद्दा असा आहे की पालकांच्या अवाजवी भावनांना अधिक पोसण्याचा (=सर्वच गर्भपात घृणास्पद बनविण्याचा) प्रयत्न समाज करतो आहे.

माझ्यामते गर्भधारणेपूर्वी ती अपेक्षा असेल तोवर ठीक आहे. आपले मूल कसे असावे याची निवड करण्याचा हक्क पालकांना असावा.

'वीस आठवड्यांपेक्षा लहान गर्भ' पाडण्याला 'पूर्वी निर्णय' घेण्यापेक्षा अधिक गर्हणीय मानले जात नाही आणि ते जाऊही नये (परंतु समाजमन त्या दिशेने जाते आहे) असे मला वाटते.

आई आणि वडिलांचे मत विभिन्न असल्यास, अपत्यइच्छुक आईचा निर्णय अंतिम समजावा.

प्रीन्यूप नसल्यास, किमान एक अपत्यतरी बनवून देण्याचे वैवाहिक उत्तरदायित्व गृहीत असते असे मला वाटते.

वारंवार गर्भपाताने स्त्रीचे (आईचे) आरोग्य धोक्यात येऊ शकते. तिच्या मनावरही विपरित परिणाम होऊ शकतात हे लक्षात घ्यायला हवे.

हे विधान तर सर्वच गर्भपातांच्या विरुद्ध सत्य आहे. त्याने केवळ स्त्री गर्भपातांचा विरोध शक्य नाही.

मला दुनियादारी करायची आहे असे आमीरने म्हटले आहे का?

नक्कीच.

अनेक सुशिक्षित कुटुंबात असेच झाले आहे आणि त्यांना मुली अडचणीच्या वाटणे कमी झाले.

सुस्थितीतील समाजांमध्ये तसे घडणे स्वाभाविकच वाटते. मानसिकतेतील बदल हे एक कारण आहेच, शिवाय, सेकंड हनीमून लवकर करणे हाही उद्देश असू शकेल. आता मुलीला वारसाहक्क दिल्यामुळे, तिच्याकडूनही म्हातारपणी आधाराची अपेक्षा ठेवणे पालकांना शक्य होत असेल.
शिवाय, काही जैविक कारणेही आहेत. य गुणसूत्रवाला शुक्राणू थोडा वेगवान असतो आणि त्यामुळे, पुरुषभ्रूण ५०%पेक्षा अधिक धरतात. मात्र, ते स्त्रीशरीरासाठी बांडगूळ वाटत असल्यामुळे गर्भाशयाने नाकारले जाण्याची शक्यता अधिक असते. शिवाय, पुरुष बाळे दुबळी असल्यामुळे, विकसनशील देशांमध्ये अधिक मरतात, प्रौढपणीही अपघात/रोग/मारामार्‍या यांमुळे पुरुष अधिक मरतात. थोडी सुस्थिती आली की पुरुषःस्त्री गुणोत्तर वाढते. उलट, प्रदूषणामुळे ते कमीसुद्धा होते. 'मुलगी वाचवा' एनजीओवाले गुणोत्तर कमी करण्यासाठी जलाशयांमध्ये कीटकनाशके मिसळत नाहीत हे नशीब!

व्यक्तिस्वातंत्र्य हे मला समाजस्वास्थ्यापेक्षा महत्त्वाचे वाटत नाही.

घसरडा उतार!

पुढे

एकतर तो विनोदच म्हटला पाहिजे.

विनोद अपेक्षित नाही असे आधी म्हटले आहेच. मलाही पूर्वी हा विनोद वाटत असे. काही केसेस जवळून पाहिल्यावर ऍटॅचमेंटची कल्पना आली. पण असो.

माझा मुद्दा असा आहे की पालकांच्या अवाजवी भावनांना अधिक पोसण्याचा (=सर्वच गर्भपात घृणास्पद बनविण्याचा) प्रयत्न समाज करतो आहे.

पालकांत आई आणि वडिल यांचा समावेश असल्यास त्यांच्या भावना अवाजवी वाटत नाहीत. आपल्या मुलाला कोण/काय बनवायचे याचा निर्णय ज्याप्रमाणे पालक करतात आणि कायदा हस्तक्षेप करू शकत नाही त्याप्रमाणेच. असो. एक थोडीशीच अवांतर नवी बातमी येथे दिसली.

'वीस आठवड्यांपेक्षा लहान गर्भ' पाडण्याला 'पूर्वी निर्णय' घेण्यापेक्षा अधिक गर्हणीय मानले जात नाही आणि ते जाऊही नये (परंतु समाजमन त्या दिशेने जाते आहे) असे मला वाटते.

अर्थात असू नये. जो पर्यंत पाडण्याचा निर्णय आई आणि वडिल यांच्या संमतीने घेतला जातो तो पर्यंत त्याला गर्हणीय मानले जाऊ नये.

प्रीन्यूप नसल्यास, किमान एक अपत्यतरी बनवून देण्याचे वैवाहिक उत्तरदायित्व गृहीत असते असे मला वाटते.

नाही. एक अपत्य तरी बनवून देणे हा पीअरप्रेशरचा भाग आहे. डिन्क आणि सिन्क या संकल्पना भारतीय समाजात आता बर्‍यापैकी रुजू लागल्या आहेत असे वाटते.

हे विधान तर सर्वच गर्भपातांच्या विरुद्ध सत्य आहे. त्याने केवळ स्त्री गर्भपातांचा विरोध शक्य नाही.

बरोबर पण सध्या वारंवार पुरुषगर्भ पाडण्यामुळे समाजात समस्या निर्माण झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध असणारे सर्व वॅलिड मुद्दे स्त्री गर्भपातासाठी पुढे करावे असे माझे मत आहे.

मला दुनियादारी करायची आहे असे आमीरने म्हटले आहे का?

नक्कीच.

छे! रंग दे बसंती, पीपली लाइव आणि इतर काही प्रयोगांनंतर हे असे होणार हे अपेक्षित होते. ही फक्त कलाकाराची वाटचाल आहे असे मान्य केल्यास स्त्रीभ्रूणहत्या आणि आमीर एकत्र येण्याची गरज नाही. दोन वेगळे विषय आहेत.

व्यक्तिस्वातंत्र्य हे मला समाजस्वास्थ्यापेक्षा महत्त्वाचे वाटत नाही.

घसरडा उतार!

नाय बा! त्रिकालाबाधीत सत्य. चार बुद्धीजीवींच्या मंथनाने बदलत नाही असे.

प्रतिसाद

काही केसेस जवळून पाहिल्यावर ऍटॅचमेंटची कल्पना आली.

त्यांच्या भावना कितीही असोत, कुतरे मारले या कारणास्तव हत्येची तक्रार दाखल होत नाही, दुसरे कायदे लागतात.

पालकांत आई आणि वडिल यांचा समावेश असल्यास त्यांच्या भावना अवाजवी वाटत नाहीत.

"माझ्या मुलींना मारले" या उद्गाराऐवजी "मला गंभीर इजा केली" असा आरोप पटतो.

जो पर्यंत पाडण्याचा निर्णय आई आणि वडिल यांच्या संमतीने घेतला जातो तो पर्यंत त्याला गर्हणीय मानले जाऊ नये.

हत्या हा शब्द वापरल्यामुळे गर्हणीयता मिळते आहे.

एक अपत्य तरी बनवून देणे हा पीअरप्रेशरचा भाग आहे.

भारतात ते कायदेशीर उत्तरदायित्व असते असा माझा अंदाज आहे.

डिन्क आणि सिन्क या संकल्पना भारतीय समाजात आता बर्‍यापैकी रुजू लागल्या आहेत असे वाटते.

सिन्क मधील निरुद्योगी जोडीदाराचे उत्तरदायित्वच काय असते? स्वैपाक तरी करतात की नाही?

बरोबर पण सध्या वारंवार पुरुषगर्भ पाडण्यामुळे समाजात समस्या निर्माण झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध असणारे सर्व वॅलिड मुद्दे स्त्री गर्भपातासाठी पुढे करावे असे माझे मत आहे.

तसे केल्यास सर्वच गर्भपातांना विरोध दर्शविला जातो आणि 'पॉयझन पिल' प्रकारचे बूच बसते कारण जो युक्तिवाद सर्वच गर्भपातांना विरोध करण्यासाठी वापरता येतो तो आपोआपच टाकाऊ असतो.

रंग दे बसंती, पीपली लाइव आणि इतर काही प्रयोगांनंतर हे असे होणार हे अपेक्षित होते. ही फक्त कलाकाराची वाटचाल आहे असे मान्य केल्यास स्त्रीभ्रूणहत्या आणि आमीर एकत्र येण्याची गरज नाही.

"ये कार्यक्रम मेरे सामाजिक जिम्मेदारी की एक विनम्र कोशिश है|" - भाग २ चे पहिले वाक्य.

व्यक्तिस्वातंत्र्य हे मला समाजस्वास्थ्यापेक्षा महत्त्वाचे वाटत नाही.

घसरडा उतार!

नाय बा! त्रिकालाबाधीत सत्य. चार बुद्धीजीवींच्या मंथनाने बदलत नाही असे.

एक मूत्रपिंड असलेली व्यक्ती व्यवस्थित जगते. अनेक रुग्ण डायलिसिस करीत मरत असूनही त्यांना मूत्रपिंड देण्याची सक्ती कोणाही निरोगी व्यक्तीवर करण्यात येत नाही. अगदी, फाशीच्या कैद्यांचे अवयवसुद्धा वापरण्यात येत नाहीत. असे असताना, "तुम्ही कष्टाने (कारण अनेकांना ते कष्ट वाटतात) मुलगी वाढवून समाजाची वधूची आवश्यकता पूर्ण करा" अशी सक्ती लॉटरी हरणार्‍या ५०% पालकांवर का?

Spock: Why would you do this?
James T. Kirk: Because the needs of the one... outweigh the needs of the many.

Star Trek III: The Search for Spock

हम्म!

त्यांच्या भावना कितीही असोत, कुतरे मारले या कारणास्तव हत्येची तक्रार दाखल होत नाही, दुसरे कायदे लागतात.

मनुष्य आणि प्राणी मारण्यामागील शिक्षेचे स्वरूप वेगळे असले तरी रोजच्या वापरात हत्या (उदा. गोहत्या) असाच शब्द वापरला जातो. वन्य प्राण्यांच्या हत्येला शिकार म्हटले जाते इतकाच फरक आहे.

"माझ्या मुलींना मारले" या उद्गाराऐवजी "मला गंभीर इजा केली" असा आरोप पटतो.

जर मुलगी हवी असेल आणि बळजबरीने तिला मारले तर "मुलीला मारले" हा शब्दप्रयोग योग्य वाटतो. प्रत्येक वेळी गंभीर इजा झालेली असेलच असे नाही.

भारतात ते कायदेशीर उत्तरदायित्व असते असा माझा अंदाज आहे.

यावर अधिक माहिती/ संदर्भ वाचायला आवडेल.

सिन्क मधील निरुद्योगी जोडीदाराचे उत्तरदायित्वच काय असते? स्वैपाक तरी करतात की नाही?

सहजीवनात सहसा कोणी निरुद्योगी नसते. उत्पन्न मिळवणे हा उद्योगीपणाचा निकष असल्यास, उत्पन्न न मिळवणारा जोडीदार बहुतांश केसेस मध्ये स्वैपाक, सासूसासर्‍यांची जबाबदारी, घरकाम वगैरे कामे करत असावा आणि हे सर्व करायची गरज नसेल तर केवळ "हक्काने जोडीदारासह झोपणारा/री" हे उत्तरदायित्व निभावत असावा.

तसे केल्यास सर्वच गर्भपातांना विरोध दर्शविला जातो आणि 'पॉयझन पिल' प्रकारचे बूच बसते कारण जो युक्तिवाद सर्वच गर्भपातांना विरोध करण्यासाठी वापरता येतो तो आपोआपच टाकाऊ असतो.

मला वाटते आपण येथे तपासणी करून, स्त्री गर्भ असल्याचे पडताळून नंतर पाडल्या जाणार्‍या गर्भाबद्दल बोलतो आहोत त्यामुळे सर्वच गर्भपातांना विरोध होतो असे वाटत नाही परंतु परस्परसंमतीने गर्भपात करायचे म्हटले तरी त्याकडे संशयाने बघितले जाईल याच्याशी सहमत.

"ये कार्यक्रम मेरे सामाजिक जिम्मेदारी की एक विनम्र कोशिश है|" - भाग २ चे पहिले वाक्य.

डायलॉक रायटरने त्याची भूमिका उत्तम बजावली आहे. सामाजिक जबाबदारी ही दुनियादारी नसू शकते. माझ्यावरही सामाजिक जबाबदारी आहे पण मी दुनियादारी करत नाही.

एक मूत्रपिंड असलेली व्यक्ती व्यवस्थित जगते. अनेक रुग्ण डायलिसिस करीत मरत असूनही त्यांना मूत्रपिंड देण्याची सक्ती कोणाही निरोगी व्यक्तीवर करण्यात येत नाही. अगदी, फाशीच्या कैद्यांचे अवयवसुद्धा वापरण्यात येत नाहीत. असे असताना, "तुम्ही कष्टाने (कारण अनेकांना ते कष्ट वाटतात) मुलगी वाढवून समाजाची वधूची आवश्यकता पूर्ण करा" अशी सक्ती लॉटरी हरणार्‍या ५०% पालकांवर का?

मूत्रपिंड निकामी होऊन मरणार्‍या व्यक्ती हा जेव्हा "सामाजिक प्रश्न" बनेल तेव्हा त्यावर उपाययोजना लागू होईलच.

ठीक

रोजच्या वापरात हत्या (उदा. गोहत्या) असाच शब्द वापरला जातो.

गोहत्या हाही असाच एक आचरट शब्द आठवून दिल्याबद्दल आभार.

जर मुलगी हवी असेल आणि बळजबरीने तिला मारले तर "मुलीला मारले" हा शब्दप्रयोग योग्य वाटतो. प्रत्येक वेळी गंभीर इजा झालेली असेलच असे नाही.

बळजबरीने/फसवून केलेला गर्भपात ही गंभीर इजाच आहे परंतु त्यास "मुलीची हत्या" म्हणणे पटत नाही.

एक अपत्य तरी बनवून देणे हा पीअरप्रेशरचा भाग आहे.

भारतात ते कायदेशीर उत्तरदायित्व असते असा माझा अंदाज आहे.

यावर अधिक माहिती/ संदर्भ वाचायला आवडेल.

“if a husband submits himself for an operation of sterilisation without medical reasons and without the consent or knowledge of his wife and similarly if the wife undergoes vasectomy or abortion without medical reason or without the consent or knowledge of her husband, such an act of the spouse may lead to mental cruelty”.
,

मला वाटते आपण येथे तपासणी करून, स्त्री गर्भ असल्याचे पडताळून नंतर पाडल्या जाणार्‍या गर्भाबद्दल बोलतो आहोत त्यामुळे सर्वच गर्भपातांना विरोध होतो असे वाटत नाही

आईच्या आरोग्यासाठी गर्भपातावर बंदी करावयाची झाल्यास स्त्री गर्भ पाडण्यासच का बंदी व्हावी? सार्‍याच गर्भपातांवर बंदी करावी लागेल.

बरं!

दिलेल्या संदर्भावरून पतीने किंवा पत्नीने जोडीदाराला फसवून किंवा अंधारात ठेवून vasectomy किंवा abortion करू नये असे म्हटले आहे कारण तो छळवाद आहे. दांपत्यापैकी एकात त्रुटी असल्याने मूल होत नाही म्हणून दुसर्‍याने घटस्फोट घ्यायचे ठरवले तर जोडीदारात अडचण आहे म्हणून घटस्फोट स्वीकारला जातो का? (मला कल्पना नाही.) शरीरसंबंधाला नकार दिल्यास स्वीकारला जातो परंतु मूल होत नसेल तर स्त्रीला वांझ किंवा पुरुषाला नपुंसक ठरवू़न घटस्फोट स्वीकारला जातो का? कारण मग त्यालाही छळवाद म्हणता यावे. डिन्क आणि सिन्क बद्दल वर आले आहेच त्यामुळे विवाहानंतर मूल निर्माण करणे हे कायदेशीर उत्तरदायित्व आहे असे सरसकट म्हणता येत नाही. पती पत्नीत मानसिक छळवाद नसावा हे योग्य.

बळजबरीने/फसवून केलेला गर्भपात ही गंभीर इजाच आहे परंतु त्यास "मुलीची हत्या" म्हणणे पटत नाही.

हा निर्णय त्या आईवडिलांवर सोडावा हे मला पटते, तुम्हाला पटत नाही तेव्हा लेट अस अग्री टू डिसऍग्री!

आईच्या आरोग्यासाठी गर्भपातावर बंदी करावयाची झाल्यास स्त्री गर्भ पाडण्यासच का बंदी व्हावी? सार्‍याच गर्भपातांवर बंदी करावी लागेल.

मला वाटतं आपण गोल फिरून तिथेच आलो. आरोग्यासाठी गर्भपातावर बंदी हे कारण नसून "मुलीचा गर्भ वारंवार पाडल्याने आरोग्याला धोका आहे" हे कारण पुढे करायचे आहे.

माहिती

जोडीदाराच्या अपरोक्ष असेच नव्हे तर जोडीदाराला सांगून परंतु जोडीदाराच्या इच्छेविरुद्ध नियोजन केले तरीही तो छळच असल्याचे न्यायालयाचे मत आहे.

दांपत्यापैकी एकात त्रुटी असल्याने मूल होत नाही म्हणून दुसर्‍याने घटस्फोट घ्यायचे ठरवले तर जोडीदारात अडचण आहे म्हणून घटस्फोट स्वीकारला जातो का? (मला कल्पना नाही.) शरीरसंबंधाला नकार दिल्यास स्वीकारला जातो परंतु मूल होत नसेल तर स्त्रीला वांझ किंवा पुरुषाला नपुंसक ठरवू़न घटस्फोट स्वीकारला जातो का?

लग्नाच्या वेळेपासूनच इंपोटन्स असेल तर घटस्फोट मिळतो, अपत्यनिर्मिती अशक्य व्हावी असा मानसिक रोग (लग्नानंतरही) उद्भवला तरी घटस्फोट मिळतो, बाकी नाही.
डिन्क/सिन्क हे परस्परसंमतीनेच ठरत असावेत/ठरावेत.

गडबड ?

"..and similarly if the wife undergoes vasectomy "

हे चुकलंय ना? वाईफची ट्युबेक्टॉमी होईल, व्हॅसेक्टॉमी कशी होईल?

एकंदर चर्चेत प्रियालीताईंची मते पटली.
व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा वादापुरता मान्य करून श्री. निखिल जोशी यांना असे विचारतो की एकंदर समाजात स्त्रीयांचे कमी होत जाणारे प्रमाण आणि त्यामुळे उद्भवलेल्या / भविष्यात उद्भवू शकणार्‍या सामाजिक समस्या- याबद्दल काय केले पाहिजे (मुळात काही केले पाहिजे का?) असे त्यांना वाटते?

शक्यता

न्यायाधीशांचा शब्दवापर चुकला हे माझ्याही लक्षात आले होते.

एकंदर समाजात स्त्रीयांचे कमी होत जाणारे प्रमाण आणि त्यामुळे उद्भवलेल्या / भविष्यात उद्भवू शकणार्‍या सामाजिक समस्या- याबद्दल काय केले पाहिजे (मुळात काही केले पाहिजे का?) असे त्यांना वाटते?

काहीतरी केलेच पाहिजे हे मान्यच. सरसकट बंदी नसावी, मुलीसाठी आर्थिक प्रलोभन/मुलासाठी शुल्क हे मार्ग योग्य वाटतात.

उद्दिष्ट

कारणमिमांसा आणि मांडण्यात आलेला निष्कर्ष योग्य आहे, विचारप्रवाह आवडला, पण नीट परिच्छेद पाडून लिहायचा कंटाळा केल्यासारखा वाटतो.

स्त्री अपत्य अडचणीचे वाटणे ही मूळ समस्या आहे आणि स्त्रीपणा समाजात खरोखरीच अडचणीचा होणे हे त्याचे एक मुख्य कारण आहे.

सहमत, ही समस्या "वाटण्याशी" संबंधित आहे, निसर्गत:च असलेला भेद हे त्याचे मुख्य कारण आहे, जीवशास्त्रीय नियतवाद लक्षात घेतल्यास हा भेद व तदनुषंगाने निर्माण झालेल्या भावना नष्ट करणे अशक्यप्राय वाटते, पण नैतिकतेचे नियम घालून काहीप्रमाणात भेद नष्ट करणे शक्य आहे. भेद नष्ट करण्यामागे दूरगामी जनुकीय स्थिरतेचा (प्रजननासाठी भिन्नलिंगीय उपलब्धता) विचारदेखील असावाच, त्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्याची नैसर्गिक उर्मी जपताना भेद नष्ट (नैसर्गिक पातळीवर आणण्यासाठी) करण्यासाठी जमेल ते प्रयत्न करणे गरजेचे आहेच.

बाकी आमीर व त्याच्या कार्यक्रमाबद्दलची मते वयक्तिक अनुभवातून अल्याने वेगळी असू शकतात.

रोचक मांडणी

रोचक मांडणी.

>लोक मुली का टाळतात? तर, समाजात मुलगी वाढविणे त्रासाचे, कमी प्रतिष्ठेचे वाटते म्हणून! म्हणजे, समाजाच्या चुकांमुळे त्या पालकांना त्रास >होणार असतो आणि समाजाच्या अन्यायाच्या बळी पालकांनी समाजाच्या गरजा पुरवाव्यात अशी समाजाची अपेक्षा आहे.

मुलगी नको, मुलगाच हवा किंवा प्रत्येक कुटुंबात निदान एकतरी मुलगाच हवा, ही कल्पना अजूनही प्रचलित आहे.
ह्यात अपत्यांमधील विविधतेपेक्षा मुलग्यांनी आपली काळजी घ्यावी, घेतील अशी कल्पना असते. प्रत्येक कुटुंबात मुलगे असले तर मुलगे आपापल्या वडिलांच्या घरातील वृद्धांना सांभाळतील अशी अपेक्षा असते. मुली सासरच्या कुटुंबाचे करतील अशी अपेक्षा असते. म्हणून त्यांना जन्मदात्या कुटुंबाच्या आर्थिक दृष्ट्या महत्त्वही फारसे नसते. मुलग्यांचे महत्त्व आणि त्यांच्यावरची जबाबदारीही तेवढीच अवास्तव वाढलेली असते.

अर्थात जोवर कुटुंबसंस्थेमधून मुलांनी आपापल्या वडिलांचे आणि आईचा त्यांच्या वॄद्धापकाळात सांभाळ करावा अशी अपेक्षा आहे, तोवर कुटुंबाच्या मते गरज नसलेल्या, (अशा कुटुंबाच्या मते दुर्दैवाने) आर्थिक शोषण करणार्‍या गर्भाचे गर्भपात म्हणा किंवा भ्रूणहत्या म्हणा होतच राहणार. पंधरा वर्षांपूर्वी एका व्यवस्थित शिकलेल्या नोकरदार मुलीने मला म्हटल्याचे आठवते की जर आर्थिक कारणांसाठी तिच्या नवर्‍याला आणि तिला एकच मूल हवे आहे तर ते मुलगाच झालेले बरे म्हणून नाईलाजाने तिच्यावर स्त्री गर्भाला पाडून टाकण्याची 'वेळ' आली. तिला गर्भपात केल्यानंतर अतिशय दु:ख झाले होते हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. जर अशा हत्या रोखायच्या असल्या तर मुलांवर अथवा मुलींवर आर्थिक दृष्ट्या किंवा शारिरीक दृष्ट्या अवलंबून राहण्याची भावनिक आणि आर्थिक गरज कमी केल्याशिवाय या गोष्टीला आळा बसणार नाही. कायद्याने जर बंदी आणली तरी चोरून गोष्टी होतीलच.

पण म्हणून कायद्याची, किंवा जनजागृतीची गरज नाही असे नाही. सरकाराच्या दृष्टीने भारतीय सरकार हे मान्य करत नाही, स्त्रीकल्याणाचा विचार केलेला आहे असे कागदोपत्री स्पष्ट करणारी तरतूद कायद्याने केलेली असणे सोयीस्कर असावे.

मला लेख कळलाच नाही!

अरे हा तर लेख आहे. पण तो चर्चेसाठी ठेवलाय.

खरतरं हा लेख अर्धा वाचूनच मला गरगरायला झाले.

कोणताही लेख वाचताना मी तो लेख म्हणजे कोणती मुर्ती आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे समोर असलेली मुर्ती गणपतीची आहे, शंकराची आहे, कालीमातेची आहे, विश्णूची आहे, रामाची आहे की, ब्रह्माची आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो.

पण हा लेख वाचातानाचा मला वेगळंच दिसलं शीर मला काळ्या कालीमातेचे दिसले, पाय गोरे गोमटे दिसले, एका हातात मोदक दिसला, तर दुसर्‍या हातात जो रंगाने निळा आहे त्या हातात धनुश्य दिसले, बेंबीत कमळ बाहेर आले आहे पण त्या कमळावरच ती मुर्ती बसलेली आहे असे वाटले.

माझे मत

एखाद्या गर्भाचे लिंग न जाणून घेता त्याच्या गर्भपातास गर्भधारणेनंतरच्या साडेचार महिन्यांच्या आत [म्हंजे लौकिकार्थाने ५ महिने] गर्भपातास परवानगी दिली पाहिजे असे वाटते. त्यानंतर मातेच्या जीवास धोका पोहोचण्याची शक्यता अधिक/वाढत असल्याने [ऐकीव माहिती] माझे मत (त्याकाळानंतर) असहमतीचे आहे.

बाकी मुळ लेखातील 'रिऍक्टीव्ह' कायद्यावरील आक्षेप बर्‍यापैकी पटतो. अर्थात असे कायदे नकोतच असे नाही मात्र ते पुरेसे नाहित व त्यामुळे मुळ प्रश्न सुटेल असा भ्रम ठेऊ नये. कायद्यांसोबत/पेक्षा 'प्रोऍक्टीव्ह् उपाययोजना' (अशी स्त्री-गर्भहत्या होऊच नये अशी परिस्थिती निर्माण करणे) अधिक गरजेचराहे असे माझेही मत आहे.

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

व्यक्तीस्वातंत्र्य

वीस आठवड्यांपेक्षा कमी वयाच्या गर्भाला व्यक्ती म्हणून मान्यता देणे योग्य आहे काय?

हा प्रश्न विशेष करून नैतिक आहे. वैद्यकीय दॄष्ट्या विचार करायचा झाला तर साधारण दुसर्‍याच आठवड्यात गर्भ/भृण जे काही म्हणायचे असेल ते, त्याच्या हृदयाची स्पंदने ऐकायला येऊ शकतात. कॅथलिक पंथाच्या म्हणण्यामागे धर्मापेक्षा ही नैतिकता जास्त आहे असे वाटते.

हत्या असा बटबटीत शब्द वापरून सरसकटच गर्भपाताची समाजमान्यता कमी होते आहे काय?

एखाद्या क्रियेमागच्या उद्देशावरून त्याचे संबोधन बदलू शकते. (केवळ उदाहरणादाखल कृपया विषयांतर नको: म्हणूनच अफझलखान "वध" असतो तर गांधी "हत्या" असते.). जेंव्हा गर्भामधे गर्भधारणेपासून काहीच दोष नाही (त्यात सगळे आले: चुकून पासून ते वैद्यकीय दोष) आणि तरी देखील केवळ स्त्रीलिंग आहे म्हणून केले जाते तेंव्हा ती हत्याच असते असे मला वाटते. ह्यात बटबटीत पणा नसून क्रियेमागचा उद्देश समजतो. म्हणूनच मला तो कायद्याने आहे का ते माहीत नाही, पण गुन्हाच वाटतो.

त्याचे सामाजीक परीणाम केवळ मुलांना लग्नासाठी मुली न मिळणे इतक्याशीच मर्यादीत असतात असे वाटत नाही. ज्या व्यक्ती स्वतःच्या (अथवा स्वतःच्या पत्नीच्या) पोटात वाढणार्‍या मुलीस जीवन देयला तयार नाहीत त्या व्यक्ती समाजातील इतर स्त्रीयांशी तरी कशा वागणार? अर्थात कायद्याच्या बडग्यामुळे अथवा समोरची स्त्री म्हणजे जर "स्त्री शक्ती" असली :-) तर सरळ हिंमत होणार नाही पण एकूणच वृत्ती वेगळी होणे शक्यच नाही.

पण हे एकदम बदलू शकते असे वाटत नाही. ते बदलायला शिक्षण, स्थैर्य, वैचारीक बदल वगैरे अनेक प्रकार लागतात पण त्याच बरोबर सततचे लोकशिक्षण लागते. ८० च्या दशकात सुरवातीस मला आठवते त्याप्रमाणे एल आय सी च्या काही स्किम्सच्या जाहीराती असत. पैसे वाचवा, वृद्धींगत करा, त्याचा भविष्यात मुलाच्या शिक्षणासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी फायदा होईल! आता यातून नक्की काय मेसेज जात होता? अशी मानसिकता होती... तिथपासून आता अनेक एक मुलगी असली तरी आनंदी असतात इथपर्यंत आले आहे. किंबहूना अनेकांकडे दत्तक मुलगीच घेतलेली देखील पाहीली आहे.

दुनियादारी करायची असेल तर आमीरने तीन करोड कशाला घ्यावे?

माझं म्हणणे आहे, तीन कशाला कोणी खाजगी कंपनी जर तिनशे करोड देत असेल तर घेउंदेत की त्याला... करदात्यांचे (सरकारकडून) पैसे तर त्याने घेतलेले नाहीत ना? मग तो त्यांच्यातला खाजगी मामला आहे. दुनियादारी करायची असेल तर पैसे न घेता करावी ही अपेक्षा स्वतःकडून अथवा अथवा इतर कोणाकडून करू नये असे वाटते. याची परीणिती अनेकदा ढोंगात होऊ शकते. (त्याला सन्मान्य अपवाद बरेच आहेत हे माहीत आहे...) . त्यापेक्षा नुसतेच कुठल्यातरी संस्थेस देणगी न देता, पैसे करूनही मी स्वतः, सामाजीक प्रश्न सोडवण्यास अथवा त्या मार्गावर मदत करू शकतो असे जर कोणाला वाटले आणि तसे वागले तर अधिक लोकं हा मार्ग स्विकारतील...

"सत्यमेव जयते" संदर्भात ऐकले त्याप्रमाणे, त्याने प्रायोजकांना ती मालीका त्याच वेळेस स्टार बरोबरच दूरदर्शनवर दाखवण्याची पण सक्ती केली आहे. त्यात त्यांना दूरदर्शनवर फुकटात जाहीराती दाखवता येतात का ते माहीत नाही, पण टिआरपी कमी होऊ शकतो ते मान्य करायला लावले. त्याच बरोबर अनेक राज्यात ही मालीका त्या त्या राज्यांच्या भाषांमध्ये डब करून दाखवली जात आहे. (महाराष्ट्रात हिंदी समजते आणि सर्वेक्षणाप्रमाणे, आमीरच्या आवाजात ऐकणे जास्त आवडेल हे समजल्याने हिंदीतच दाखवली जात आहे). आता हे काय सगळे दुनियादारीच्या नावाखाली फुकट होणार का त्या तीन कोटींमधे होणार? त्यामुळे देखील मला त्यात गैर वाटत नाही...

येथे तर, मूलभूत, व्यक्तिस्वातंत्र्यावरच घाला नाही काय?

"व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला" ह्या वाक्प्रयोगाची व्याख्या करणे अवघड वाटते. कारण मग अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे पण "व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला" ठरू शकेल. ;)

गुन्हा

एकंदर विचाराशी सहमत.

>जेंव्हा गर्भामधे गर्भधारणेपासून काहीच दोष नाही (त्यात सगळे आले: चुकून पासून ते वैद्यकीय दोष) आणि तरी देखील केवळ स्त्रीलिंग आहे म्हणून केले जाते तेंव्हा ती हत्याच असते असे मला वाटते. ह्यात बटबटीत पणा नसून क्रियेमागचा उद्देश समजतो. म्हणूनच मला तो कायद्याने आहे का ते माहीत नाही, पण गुन्हाच वाटतो.

ह्याच न्यायाने प्राणी मारणे पण गुन्हा/हत्या ठरेल नाही काय?

प्राणी मारणे

ह्याच न्यायाने प्राणी मारणे पण गुन्हा/हत्या ठरेल नाही काय?

खाण्यासाठी काही प्रकारचे प्राणी मारणे हा सार्वत्रिक गुन्हा नाही. परंतु प्राण्यांतील केवळ मादी मारणे हा कधी काळी त्या प्राण्यांची संख्या घटू लागली किंवा पैदास थांबली तर भविष्यात गुन्हा होईलही. तसेही, भारतात वन्य प्राण्यांच्या शिकारीला गुन्हा मानले जातेच.

अन्यथा

>त्या प्राण्यांची संख्या घटू लागली किंवा पैदास थांबली तर भविष्यात गुन्हा होईलही.
अन्यथा गर्भपात/भ्रूणहत्या गुन्हा नव्हे तर?

नेमकं काय?

अन्यथा गर्भपात/भ्रूणहत्या गुन्हा नव्हे तर?

प्राण्यांची संख्या घटण्याचे आकडे नसतील आणि संख्या घटल्याने होणारे दुष्परिणाम समोर येत नसतील तर गर्भपात/भ्रूणहत्या हा गुन्हा नव्हे याचे मुख्य कारण ते प्राणी आहेत. माणसाचे अन्न आहेत, त्याच्या प्रयोगाची साधने आहेत. माणूस स्वतःला सर्व बाबतींत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजतो हे सत्य आहे. कुत्री, मांजरे, उंदिर जेथे खाल्ले जात नाहीत तेथे टॉक्सिकॉलॉजी आणि इतर प्रयोगांसाठी वापरले जातात कारण माणसाचा जीव हा प्राण्याच्या जिवापेक्षा श्रेष्ठ समजला जातो. पाळीव माद्यांचे स्पेइंग हा गुन्हा मानला जात नाही. अर्थातच, या सर्वांना विरोध करणारेही आहेत तरीही माणसाला आणि प्राण्याला एकाच पारड्यात तोलण्याचे दिवस अद्याप आलेले नाहीत. हे माहित असताना वरच्या प्रश्नांतून काय सिद्ध करायचं आहे ते कळलं नाही.

पुरुषाचा गर्भ हा स्त्रीच्या गर्भापेक्षा श्रेष्ठ मानावा किंवा पुरुष हे स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ आहेत म्हणून स्त्री भ्रूण/गर्भाची हत्या गुन्हा मानू नये असे तर नव्हे? ;-)

हेच

>प्राण्यांची संख्या घटण्याचे आकडे नसतील आणि संख्या घटल्याने होणारे दुष्परिणाम समोर येत नसतील तर गर्भपात/भ्रूणहत्या हा गुन्हा नव्हे याचे मुख्य कारण ते प्राणी आहेत. माणसाचे अन्न आहेत, त्याच्या प्रयोगाची साधने आहेत. माणूस स्वतःला सर्व बाबतींत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ समजतो हे सत्य आहे.

>माणसाला आणि प्राण्याला एकाच पारड्यात तोलण्याचे दिवस अद्याप आलेले नाहीत.

असेच काही पुरुषांचे म्हणणे आहे म्हणूनच हा प्रबोधनाचा प्रपंच चालू आहे न?

प्राण्यांशी क्रूरता

काही प्राणी हे मांसाहारासाठी योग्य धरले जातात. ते देखील स्थलकालसापेक्ष आहे. पण तो भाग सोडल्यास आजच्या काळात विशेष करून ज्या देशातली या संदर्भात जागृती वाढली आहे, प्राण्यांशी होणार्‍या विकृतीस तेथे जास्त विरोध केला जातो. आत्ता नाव अथवा पटकन आठवत नाही पण मध्यंतरी इथल्या (अमेरीकेतील) एका सेलीब्रीटी खेळाडूचे कुत्र्यांना हालहाल करून मारण्याचे उदाहरण बाहेर आले आणि त्याबद्दल त्याला शिक्षा देखील झाली.

मांसाहारासाठी देखील प्राणी कसे मारले जावेत, हाल न करता आणि त्यांच्यातली भिती न वाढवता यावर पण बरेच संशोधन करून सुधारणा केल्या गेल्या आहेत. आता तर अंडी पण पिंजर्‍यात बंदीस्त नसलेल्या (केज फ्री) कोंबड्यांची असतात म्हणून जाहीराती केल्या जातात. असो.

मायकेल विक

आत्ता नाव अथवा पटकन आठवत नाही पण मध्यंतरी इथल्या (अमेरीकेतील) एका सेलीब्रीटी खेळाडूचे कुत्र्यांना हालहाल करून मारण्याचे उदाहरण बाहेर आले आणि त्याबद्दल त्याला शिक्षा देखील झाली.

ऍटलांटा फॅल्कन्स आणि फिलाडेल्फिया इगल्सचा माजी क्यूबी मायकेल विक.

तोच

धन्यवाद. त्याचेच नाव आठवत होतो. पण गुगलताना अजून एक वेगळीच लेटेस्ट बातमी दिसली...

सोयिस्कर

काही प्राणी हे मांसाहारासाठी योग्य धरले जातात. ते देखील स्थलकालसापेक्ष आहे.

सोयिस्कर/सापेक्ष गुन्हा/जनुकीय निभाव? हाच न्याय माणसांना का नाही लागू?

मध्यंतरी इथल्या (अमेरीकेतील) एका सेलीब्रीटी खेळाडूचे कुत्र्यांना हालहाल करून मारण्याचे उदाहरण बाहेर आले आणि त्याबद्दल त्याला शिक्षा देखील झाली.

होलोकॉस्टच्या गुन्हेगारांना तोच न्याय मिळतो.

प्रतिसाद

अनेकांकडे दत्तक मुलगीच घेतलेली देखील पाहीली आहे.

मानसिकता लिंगनिरपेक्ष झालेली समाजासाठी चांगलीच ठरेल. परंतु दत्तक प्रकरणांमध्ये, अपत्य बंड करण्याची शक्यता मुलीत कमी वाटल्याच्या कारणानेच असे घडत असावे असा माझा अंदाज आहे.

दुसर्‍याच आठवड्यात गर्भ/भृण जे काही म्हणायचे असेल ते, त्याच्या हृदयाची स्पंदने ऐकायला येऊ शकतात.

हृदय कोंबडीलाही असते. "माझ्या शरिरातून चालता हो" असे सांगूनही जो गर्भ जिवंत राहू शकतो त्यालाच स्वतंत्र व्यक्ती म्हणून मान्यता देण्यात येते आणि "इतके दिवस हाकलले नाहीत त्यामुळे आता या व्यक्तीला वहिवाटीचा हक्क आहे म्हणून पाडू नका" या कारणाने गर्भपाताला वीस आठवड्यांची मर्यादा असते. (प्राणीहत्येलासुद्धा सुवर्णनियमामुळे खुनाची शिक्षा नसते. अजापुत्रम्...)
अन्यथा, गर्भवतीला बंगी जंपिंग किंवा किकबॉक्सिंगपासून बंदी करणे अनैतिक असल्यामुळे गर्भपात ही हत्या नसते.

गर्भामधे गर्भधारणेपासून काहीच दोष नाही (त्यात सगळे आले: चुकून पासून ते वैद्यकीय दोष) आणि तरी देखील केवळ स्त्रीलिंग आहे म्हणून केले जाते तेंव्हा ती हत्याच असते असे मला वाटते.

बेकायदेशीर वृक्षतोड हीसुद्धा हत्याच ठरते काय?
मुळात, केवळ "गर्भ स्त्रीलिंगी आहे" या कारणास्तव केलेला गर्भपातसुद्धा पालकांचा हक्क असल्याचा युक्तिवाद मी दिला आहे, त्याचा प्रतिवाद कोणीच केलेला नाही.

ज्या व्यक्ती स्वतःच्या (अथवा स्वतःच्या पत्नीच्या) पोटात वाढणार्‍या मुलीस जीवन देयला तयार नाहीत त्या व्यक्ती समाजातील इतर स्त्रीयांशी तरी कशा वागणार?

ज्या व्यक्ती स्वतःच्या (अथवा स्वतःच्या पत्नीच्या) पोटात वाढणार्‍या मतिमंद अपत्यास जीवन द्यायला तयार नाहीत त्या व्यक्ती समाजातील इतर मतिमंदांशी तरी कशा वागणार?
(स्त्री (किंवा पुरुष किंवा मतिमंद) अपत्य नकोसे असल्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पालकांना असण्याइतपतच स्त्रीत्व आणि मतिमंदत्वाची तुलना आहे, स्त्रीत्व हा मतिमंदत्वासारखा रोग असल्याचे माझे मत नाही.)

दुनियादारी करायची असेल तर पैसे न घेता करावी ही अपेक्षा स्वतःकडून अथवा अथवा इतर कोणाकडून करू नये असे वाटते.

मग दुनियादारी आणि दुकानदारीत फरक तो काय?

कारण मग अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे पण "व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला" ठरू शकेल. ;)

हाच तर फरक आहे. उपासतापास, पूजाअर्चा, बोकडबळी, इ.ला कायदेशीर बंदी घालणे हा व्यक्तिस्वातंत्र्य संकोच ठरेल हे मला मान्य आहे. "मुलगी मारणारे हीन असतात" आणि "उपास करणारे भोळसट असतात" असा प्रचार करणे मला अमान्य नाही.
प्राण्यांशी क्रौर्य हा प्रकार दुर्मिळ प्राणी, सुंदर प्राणी (व्याख्या सरकारने करावी (वास्तविक, अन्नसाखळीच्या वरच्या टोकाचे प्राणी पर्यावरणासाठी फारसे महत्वाचे नसतात तरीही)) आणि प्रायमेटबाबतच दंडार्ह ठरावा असे मला वाटते. खाद्य/फुटकळ प्राण्यांशी कौर्य करण्याविरुद्धचा कायदा मला पटत नाही.

सेव्हिंग जीन्स?

>प्राण्यांशी क्रौर्य हा प्रकार दुर्मिळ प्राणी, सुंदर प्राणी (व्याख्या सरकारने करावी (वास्तविक, अन्नसाखळीच्या वरच्या टोकाचे प्राणी पर्यावरणासाठी फारसे महत्वाचे नसतात तरीही)) आणि प्रायमेटबाबतच दंडार्ह ठरावा असे मला वाटते. खाद्य/फुटकळ प्राण्यांशी कौर्य करण्याविरुद्धचा कायदा मला पटत नाही.

सो इट्स् अबाऊट सेव्हिंग जीन्स?

माझे मत

होय, दुर्मिळ प्राण्यांबाबत माझे मत जनुकीय उद्देशाने प्रेरित आहे.
सुंदर प्राणी आणि मानवसदृश प्राण्यांना व्यक्तीसदृश दर्जा मिळावा हे मात्र मलाही पटते.

समाजात अपेक्षा बदलणे मुळात हवे, खरे आहे

समाजात अपेक्षा बदलणे मुळात हवे, खरे आहे.

देश -दृष्टीकोन

गर्भजलचिकीत्सा आणि त्यावर आधारीत गर्भपात ह्या विरोधात भारतात परत (अधिक दृश्यस्वरूपात) जनजागरण चालू झालेले असताना, अमेरीकेत त्यामुळे का, ते माहीत नाही, पण धर्मतत्वावर आधारीत एकूणच गर्भपातविरोधात असलेल्या रिपब्लीकन्सनी अमेरीकन काँग्रेसमधे गर्भाची लिंगपरीक्षा करून गर्भपात करण्याविरोधात कायदा आणला. इथले (म्हणजे अमेरीकेतील) एशियन्स (विशेषतः भारतीय आणि चिनी) हे गर्भाचे लिंग कोणते हे समजून घेऊन, मुलगी असल्यास गर्भपात घडवून आणतात, म्हणून हा कायदा केला असे सांगितले गेले. अर्थात त्यात वेगळे राजकारण होते हा वेगळा मुद्दा...

मात्र त्याला सिव्हील लिबर्टीज् च्या लोकांनी कडाडून विरोध केला. कारण त्यामुळे रेशिअल प्रोफायलींग होऊ शकते वगैरे म्हणून... शेवटी त्याला रिपब्लीकन्सचा देखील विरोध झाला आणि बहुमत असूनही कायदा संमत होऊ शकला नाही.

शिवाय

गर्भजलचिकित्सा, सोनोग्राफी, इ. किचकट चाचण्या करण्यावर नियंत्रण ठेवणे कदाचित शक्य तरी होईल. मात्र, अमेरिकेत तर जेंडर मेंटर सारख्या कंपन्या गर्भवतीचे रक्त तपासूनही गर्भलिंगनिदान करतात. एका राज्यात बंदी आली तरी दुसर्‍या राज्यात रक्त पाठवून चाचण्या करता येतील, भारतातूनही जंतरमंतर रॅकेट चालते तर अमेरिकेत तसा कायदा निरर्थकच ठरेल.

शिवाय, वर दिलेल्या टेस्टोस्टेरॉन, अल्फा फीटो प्रोटीन, hcg इ. साध्या चाचण्यांनी आईचे रक्त तपासूनही काही गर्भवतींचे गर्भलिंगनिदान शक्य असते.
उदा., पुरुष गर्भ असल्यास सोळाव्या आठवड्यानंतर hcg (विशेषतः, free β-hcg) घटते तर स्त्री गर्भ असल्यास ते वाढते. सहा महिन्यांनंतरतर ठळकपणेच लिंग समजते. (संदर्भ Steier JA, Yuval Yaron, Nahid Lorzadeh, Mert Gol, Bazzett LB).
ही चाचणी एकदा करण्यास केवळ ६०० रुपये खर्च येतो.
तसेही बीड येथे सहा/सात महिन्यांचे गर्भही पाडून टाकून देण्यात आल्याचे आढळले आहेच.

Klinga K या संशोधनानुसार, ५% स्त्री गर्भांचे निदान टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाच्या आधारे होऊ शकते.
ɑ-fetoprotein चाचणीनेही काही अंदाज मिळू शकतो.
या चाचण्याही फार महाग नाहीत.

(सुस्थितीतील पालक एवीतेवी या चाचण्या मतिमंदत्वाची शक्यता जाणण्यासाठी करतातच).
या चाचण्यांवर तर भारतातही बंदी नाही.

लेख आवडला

लेख आणि चर्चा दोन्ही उद्बोधक आहेत.

ज्यावेळेला गर्भजल चिकित्सा आली होती. (हल्ली ती फारशी ऐकिवात नाही.) तेव्हा वसंत साठे यांनी लोकसंख्या साधन म्हणून अशा गर्भपाताला मान्यता देण्याची सूचना केली होती. (स्त्रियांची प्रजननक्षमता कमी असल्याने, लोकसंख्येत नेट रिप्रॉडक्शन रेट हा स्त्रियांच्या संख्येवर मोजतात.) या गोष्टीची आठवण आली.

गर्भपात करण्याचा हक्क नैतिक असल्यास, निवडक गर्भपात रो़खण्याच्या कायद्याची नैतिकता संशयास्पद वाटते.

समाजात उत्पात घडेल म्हणून लिंगांचे समप्रमाण असावे हे म्हणणेही आधाराशिवायचे वाटते.

राजवाड्यांनी प्रजापती संस्था (एका पुरुषाच्या अनेक बायका) असल्याने इतर पुरुषवर्ग रानावनात जाऊन राहायचा असे म्हटले आहे. (भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास) अशा प्रुरुषांनी (मुनी बनून) समाजाच्या प्रगतीत भर घातली असे त्यांचे मत होते. बाळंतपणात स्त्रियांचे मृत्यु होणे, विधवा विवाह मान्य नसणे आणि वरिष्ट वर्गांची एकाहून जास्त लग्ने वा संबंध ही इतिहासकाळातील स्थिती धरली तर लिंगाचे प्रमाण व्यस्तच होते. अशा वेळी याकारणाने उत्पात घडल्याचे माझ्या माहितीत नाही.

स्त्रीपुरुषांचे प्रमाण हे समप्रमाणात असावे असे माझे मत आहे. पण ज्यांचे मत तसे नाही (निदान त्यांच्या घरातले) त्यांच्यावर हे कायदे लादणे अन्यायकारक होऊ शकते.

लेखकाने म्हटल्याप्रमाणे जर तांत्रिक बाबीत इतका सोपेपणा येत जाणार आहे तर अशा मोहिमा फारशा उपयोगाच्या नाहीत. अर्भकांना उन्हात ठेऊन मारणे, पोषणाअभावि मारणे, औषधांचे सरक्षण न देण्यामुळे मारणे अशा गोष्टी आपल्या समाजात घडत असतात. (इन्फंट मोर्टेलिटी रेट मधे मुलींच्या मृत्युचे प्रमाण भारतात बरेच जास्त आहे.) मुलींना सोडून देणे (अनाथगृहात मुलींचे प्रमाण जास्त असणे.) अशावेळी निवडक गर्भपात हा कदाचित जास्त मानवतावादी प्रकार होऊ शकतो.

प्रमोद

प्रमोद

सहमत/ असहमत

राजवाड्यांनी प्रजापती संस्था (एका पुरुषाच्या अनेक बायका) असल्याने इतर पुरुषवर्ग रानावनात जाऊन राहायचा असे म्हटले आहे. (भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास) अशा प्रुरुषांनी (मुनी बनून) समाजाच्या प्रगतीत भर घातली असे त्यांचे मत होते. बाळंतपणात स्त्रियांचे मृत्यु होणे, विधवा विवाह मान्य नसणे आणि वरिष्ट वर्गांची एकाहून जास्त लग्ने वा संबंध ही इतिहासकाळातील स्थिती धरली तर लिंगाचे प्रमाण व्यस्तच होते. अशा वेळी याकारणाने उत्पात घडल्याचे माझ्या माहितीत नाही.

वर निखिल बघा काय म्हणतात

गुणसूत्रवाला शुक्राणू थोडा वेगवान असतो आणि त्यामुळे, पुरुषभ्रूण ५०%पेक्षा अधिक धरतात. मात्र, ते स्त्रीशरीरासाठी बांडगूळ वाटत असल्यामुळे गर्भाशयाने नाकारले जाण्याची शक्यता अधिक असते. शिवाय, पुरुष बाळे दुबळी असल्यामुळे, विकसनशील देशांमध्ये अधिक मरतात, प्रौढपणीही अपघात/रोग/मारामार्‍या यांमुळे पुरुष अधिक मरतात

या शब्दांवर विश्वास ठेवून पुढे म्हणावेसे वाटते की कुटुंबनियोजन अस्तित्वात नसताना स्त्री अपत्य जगण्याचे प्रमाण पुरुष अपत्य जगण्याच्या प्रमाणापेक्षा जास्त असावे. बाळंतपणात स्त्रियांचे मृत्यू होणे ही एक बाब धरली तरी राजकारण, प्रवास आणि कामानिमित्त बाहेर पडलेला पुरुष चकमकी, लढाया, श्वापदांचे हल्ले, विषबाधा इ. अनेक प्रकारांतून मृत्यूच्या अधिक जवळ असे. एकंदरीतच प्राचीन काळी स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त असावे आणि म्हणून एकाहून जास्त लग्ने शक्य होती. रानावनांत जाणार्‍यांची संख्या तशी कमी असावी. रानावनात तप करणार्‍या अनेक ऋषीमुनींची लग्ने झालेली असत. ऋषी बनून रानात राहणे म्हणजे संन्यास घेणे नसावे. वसिष्ठ-अरुंधती, विश्वामित्र-मेनका (बायको नव्हे), अत्री-अनसूया, गौतम-अहल्या इ. इ. सर्व जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यामुळे उत्पात घडण्याचा प्रश्न नव्हता. लिंगाचे प्रमाण तेव्हा व्यस्त असले तरी स्त्रियांचे अधिक आणि पुरुषांचे कमी असावे.

अर्भकांना उन्हात ठेऊन मारणे, पोषणाअभावि मारणे, औषधांचे सरक्षण न देण्यामुळे मारणे अशा गोष्टी आपल्या समाजात घडत असतात. (इन्फंट मोर्टेलिटी रेट मधे मुलींच्या मृत्युचे प्रमाण भारतात बरेच जास्त आहे.) मुलींना सोडून देणे (अनाथगृहात मुलींचे प्रमाण जास्त असणे.) अशावेळी निवडक गर्भपात हा कदाचित जास्त मानवतावादी प्रकार होऊ शकतो.

पूर्ण सहमत!

खुलासा

फिशर तत्त्व असे सांगते की कोणतीही सामाजिक परिस्थिती काही काळ स्थिर टिकल्यास असे कार्यकारणभाव निर्माण होतात की पुरुष इतके मरतात की पुनरुत्पादनक्षम वयात गुणोत्तर १:१ व्हावे.

रोचक

फिशर तत्त्व रोचक वाटते पण सहस्रबुद्धे (पक्षी: राजवाडे) ज्या काळाचा उल्लेख करतात तो स्थिरतेचा काळ नसावा.

-------

काही काळ म्हणजे अंदाजे किती काळ अपेक्षित असावा? दोन-तीन पिढ्यांचा?

ग्राऊंड रिऍलिटीज

समाजात उत्पात घडेल म्हणून लिंगांचे समप्रमाण असावे हे म्हणणेही आधाराशिवायचे वाटते.

असा 'उत्पात' भविष्यात घडेल असे समजण्याचे कारण नाही. उत्तर भारतात याची सुरूवात झालेली आहे. मुली आयात कराव्या लागणे चिंताजनक आहे असे आपणास वाटत नाही का?
राजवाड्यांनी वर्णन केलेली विवाहसंस्था आणि तत्कालीन समाजव्यवस्था कधीच कालबाह्य झालेली आहे. आज मुली मिळत नाहीत म्हणून 'मुनी' बनण्याआधी बलात्कार होतील आणि कदाचित 'बहुपतीत्व' व्यवस्था सुरू करावी लागेल, इतपत बदल होऊ घातले आहेत.
यातही उपक्रमींना काही चिंताजनक वाटत नसल्यास हरकत नाही, माझे बोलणे खुंटेल.

माझ्या मते स्त्रीभृणहत्येसंदर्भात शक्य तितके कठोर कायदे केले पाहिजेत. त्यासाठी प्रसंगी व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच झाला तरी चालेल. हा घसरडा उतार असला तरी थोडेसे घसरायला पाहिजे. भावनेला हात घातला तरी चालेल. 'हे पाप आहे' असा प्रचार करण्यासही हरकत नाही, कारण बहुसंख्य समाजावर पाप-पुण्य कल्पनेचा बर्‍यापैकी प्रभाव आहे.
फिशर तत्त्वाने आपला प्रभाव दाखवण्यास सुरूवात करेपर्यंत तरी "टू अर्र ऑन द राईट साईड" काही बाबतीत क्षम्य आहे.

पटले नाही.

तुमचे बोलणे खुंटले तर आनंदच होईल :)

का पटले नाही?

परिस्थिती चिंताजनक नाही की ती चिंताजनक आहे असा प्रॅपोगंडा होत आहे असे वाटते/ म्हणायचे आहे?

बाकी, मी सहस्रबुद्धेंच्या प्रतिसादातील ते वाक्य गाळले कसे माहित नाही. उत्पात झालेला नसला तरी प्रश्नाने गंभीर स्वरूप घेतले आहे असे वाटते. अगदी महाराष्ट्रातील सुशिक्षित घरांत आणि मॅरेज ब्युरोमध्ये "हल्ली मुली आहेतच कुठे? एक मुलगा झाला की पुढे अपत्य होऊ न दिल्याने मुली लग्नाच्या बाजारात अवेलेबलच नाहीत आणि ज्या आहेत त्यांना इतका चॉइस आणि डिमांड आहे की बहुधा बाजारात उतरण्याची गरजच पडत नाही." असे उद्गार ऐकलेले आहेत. (त्यांची सत्यासत्यता तपासलेली नाही त्यामुळे विधान गंभीरपणे घेतले नाही तरी चालेल पण काही नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या अनुभवावरून तथ्य असावे असे वाटते.)

गणित

एक मुलगा झाला की पुढे अपत्य होऊ न दिल्याने मुली लग्नाच्या बाजारात अवेलेबलच नाहीत आणि ज्या आहेत त्यांना इतका चॉइस आणि डिमांड आहे की बहुधा बाजारात उतरण्याची गरजच पडत नाही.

स्त्रीगर्भपात किंवा मुलींची हेळसांड करवून मृत्यू झाल्याशिवाय, केवळ

  • पहिला मुलगा झाला तर अधिक मुले होऊ देऊ नका.
  • पहिली मुलगी झाली तर पुढील अपत्य होऊ द्या.

या अल्गोरिदमने लिंगगुणोत्तर बिघडू शकत नाही.

हो!

यावर विश्वास बसतो म्हणूनच माझे मत गंभीरपणे घेऊ नये असे म्हटले पण मूळ प्रश्न शिल्लक राहतोच की गंभीर परिस्थिती आहे असे वाटत नाही का?

गणित

*पहिला मुलगा झाला तर अधिक मुले होऊ देऊ नका.
* पहिली मुलगी झाली तर पुढील अपत्य होऊ द्या.

या समीकरणाने लिंगगुणोत्तर नक्कीच बिघडू शकेल, कारण हे 'पुढील अपत्य' नक्कीच मुलगा असेल याची निश्चिती करणे आज कितीतरी सुलभ झाले आहे. प्रसुतीपूर्व लिंगनिदानाची सुविधा सहज उपलब्ध असल्यामुळे मुलगा होईस्तोवर मुलीच होवू द्या, अशी परिस्थिती आता राहिलेली नाही. "काही घरात मुलगे-मुली समसमान आणि काही घरात नुसतेच मुलगे" असे असतांना लिंगगुणोत्तर का बिघडणार नाही?

'नुसत्याच मुली' असणारी कुटुंबेही आहेत, प्रबोधनामुळे (किंवा मध्यमवर्गीय भावनिक आवाहनांमुळे- ओ रि चिरैय्या वगैरे ;)) बहुधा अशा कुटुंबांची संख्याही वाढू लागेल, पण एकंदर भारतीय समाजाची पुरूष-अपत्याकडे ओढ पाहता अशा कुटुंबांची लिंगगुणोत्तर बदलण्याएवढी (म्हणजे समसमान करण्याएवढी) संख्या प्राप्त होण्यास अद्याप बराच अवकाश आहे, असे वाटते.

हे पटले नाही:

'मुनी' बनण्याआधी बलात्कार होतील आणि कदाचित 'बहुपतीत्व' व्यवस्था सुरू करावी लागेल,

बलात्काराचा अन लग्नासाठी मुली उपलब्ध असण्याचा काडीचाही संबंध नाही.
बहुपतित्वाची प्रथाही स्त्री/पुरुष गुणोत्तराशी संबंधीत नाही असे वाटते.

 
^ वर