भारतीय लेखिका

"भारतीय लेखिका" ही ४० अनुवादित पुस्तकांची मालिका मी संपादित करते आहे. त्यासाठी लिहिलेली ही भूमिका.

विमेन्स वर्ल्ड या संस्थेने १९९९ साली भारतीय लेखिकांच्या काही चर्चासत्रांचं आयोजन केलं होतं. त्यात सहभागी होण्याची संधी मला मिळाली होती.
"अशी लेखिकांची वेगळी चूल कशाला मांडायला हवी? त्यामुळे आपण लिंगभेदाची भावना वाढीस लावतो. लेखिकांच्या लेखनाचा मुद्दाम वेगळा विचार करण्याची काही गरज नाही," असा विचार तोवर माझ्या मनात होता. या चर्चासत्रानं ते मत पूर्ण बदलून टाकलं. 'सेन्सारशिप' हा चर्चासत्राचा विषय होता. राजकीय वा धार्मिक सेन्सारशिपला सामोरं जाण्याचे अनुभव मराठी लेखिकांच्या वाट्याला तसे आलेले नसले तरी कुटुंबाची आणि स्वत:ची सेन्सारशिप मात्र भरपूर होती. लिहिताना मनावर दडपण असतं, यात एकवाक्यता होती. त्या दडपणाच्या कारणांची चर्चा आम्ही त्यावेळी मोकळेपणानं केली.
विमेन्स वर्ल्डनं प्रकाशित केलेल्या पुस्तकात मुस्कटदाबी आणि छळ यांबाबत जगभरातल्या लेखिकांचे अनुभव मांडले गेले होते. रशिया, चिली, द. आफ्रिका इथल्या अनुभवांच्या तुलनेत भारतीय लेखिकांच्या अनुभवांकडे आम्ही पाहायला लागलो. स्वातंत्र्याचा उदो-उदो करणार्‍या उत्तर अमेरिकेत एका वर्षात तब्बल १६०७ पुस्तकं सेन्सार झाल्याचं त्यात नोंदवलं होतं. कारण मुलांसाठी असलेल्या या पुस्तकांमध्ये पारंपरिक कुटुंबांपेक्षा वेगळी असलेली सिंगल परेंट, समलिंगी जोडपी अशी कुटुंबं चित्रीत करण्यात आली होती. मुलांसाठी दूरच पण मोठ्यांसाठीच्या पुस्तकांमध्येही आपण असे विषय हाताळायला संकोचतो आहोत, हे त्यावरून ध्यानात आलं. नंतर भारतीय लेखिकांच्या मुलाखतींची आणि या चर्चासत्रातून निष्पन्न झालेल्या विचारांची पुस्तकं विमेन्स वर्ल्डनं प्रकाशित केली. त्यावेळी एकमेकींची सोबत अधिक घट्ट बनवून काही उपक्रम राबवता येतील का, याचा विचार झाला. पण पुढे त्यातून विशेष काही निष्पन्न झालं नाही.
नंतरच्या काळात राष्ट्रीय पातळीवरच्या विविध साहित्यसंस्थांच्या चर्चासत्रांमधून, शिबिरं-कार्यशाळांमधून, संमेलनांमधून अनेक भारतीय लेखिकांच्या भेटी-गाठी, ओळखी होत गेल्या. त्यांना प्रत्यक्ष ऐकायची, त्यांच्याशी संवाद साधायची संधी मिळत गेली. लेखनासाठी वेळ, लेखनासाठी जागा इथपासून ते लेखनाचे निषिद्ध विषय आणि लेखन ही गोष्टच निषिद्ध... इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा घडत होत्या. मराठीशी समांतर असलेलं, मराठीहून खूप वेगळं असलेलं असं साहित्य अनुवादाच्या रूपातून अगदी अल्प प्रमाणात का होईना, पण अशा ठिकाणी ऐकायला-वाचायला मिळत गेलं. त्यातून अनेक प्रश्न, अनेक विचार मनात उगवत राहिले. वेळोवेळी त्याबाबत मी लहान-सहान लेख, नोंदी असं लेखन केलं.
मराठी स्त्री-साहित्याचा आढावा घेताना असं ध्यानात आलं की, काही विषयांवर बायका लिहीतच नाहीत, काहींवर धूसर लिहितात. काही विषय मांडताना चलाखी केली जाते. तर काही विषयांची मांडणी पारंपरिक दृष्टीकोनातूनच केली जाते.
संतसाहित्याला अध्यात्माचा गाभा असतो आणि लोकसाहित्यात कुणा एका बार्इचं नाव येण्याचं कारण नसतं. त्यामुळे तिथं स्त्रियांकडून पुष्कळ मोकळेपणानं अनुभवांची, प्रसंगांची, विचारांची, भावनांची मांडणी झालेली दिसते. तसं धाडस आजच्या आधुनिक काळात लिहिणाÚया आम्हां लेखिकांमध्ये अभावानेच दिसतं.
स्त्रियाचं साहित्य हे रोमँटिक, गोड-गुळमट भाषेतलं, कौटुंबिक ( तेही आदर्श पारंपरिक) परिप्रेक्ष्यातलं, पुरुषकेंद्री असं तरी आहे किंवा मग विद्रोही, आवाजी, पुरुषांना विरोध करणारं, बटबटीत, लैंगिक वर्णनं खुलेपणानं करणारं म्हणून आधुनिक (!), पुरुषांचं अनुकरण करणारं असं आहे - असा (गैर)समज आपल्याकडे रूढ आहे. बायका हेच, इतकंच आणि असंच लिहितात, लिहू शकतात... असं ठामपणानं मांडणारी मंडळी आजही आहेत.
इतर भारतीय भाषांचं चित्र पाहायला सुरुवात केली, तेव्हा ध्यानात आलं की प्रत्येकीच्या धाडसाच्या वाटा वेगळया आहेत आणि बिचकण्याच्या जागाही वेगळया आहेत. काहींनी जे धाडस आपल्या आधीच्या लेखिकेनं केलंय, तिच्यापासून बळ घेऊन, तिच्या पावलांवर पाऊल टाकून पुढे जात त्यातून आपला असा वेगळा ठसा निर्माण केला आहे. वेगवेगळया भाषांमधली ही धाडसं जर समोर उलगडत गेली, तर आपल्या भाषेत नसलेल्या गोष्टींबाबतही बळ मिळण्याची शक्यता तयार होते. आपण करतोहोत ते काही फार जगावेगळं नसून त्या लाटेवर स्वार होऊ पाहणार्‍या अनेकजणी आहेत, हे ध्यानात आल्यानंही एक निराळा आश्वासक भाव मनात तयार होतो. भाषा, शैली, रचना यांतले अनेकविध प्रकार समोर दिसायला लागतात; ते आपल्यातील प्रयोगशीलतेला प्रोत्साहन देऊ शकतात. याकरिता मराठी लेखिकांसाठी हे दालन खुलं झालं पाहिजे. हा विचार झाला लिहिणार्‍या बायकांच्या संदर्भात. याखेरीज सामान्य वाचक, चोखंदळ वाचक, पुरुष लेखक, अभ्यासक, समीक्षक यांनाही यातून पुष्कळ काही नवं मिळू शकेल. भारतीय स्त्री-जीवनाचं, स्त्री-विचारांचं, स्त्री-जाणिवांचं समग्र भान देणारं चित्र यातून वाचकांच्या डोळयांपुढे उभं राहू शकेल.
प्रत्येक प्रश्न हा स्त्री-प्रश्न असतोच, हे ध्यानात घेतलं पाहिजे. त्यानंतरच स्त्रियांचं लेखन हे फक्त स्त्री-विषयक असणं आजच्या आधुनिक लेखिकांना अपेक्षित नाही, हे जाणता येऊ शकतं. ( आम्ही स्त्री-वादी नाहीत, असं अनेक आधुनिक लेखिका म्हणतात, त्याचं एक कारण हेही आहे.) बालविवाह, अल्पवयीन बालकांचं लैंगिक शोषण, बलात्कार, कुमारीमाता, स्त्री-शिक्षण, हुंडा, स्त्री-भ्रूणहत्या, अंधश्रद्धा, कुप्रथा, घटस्फोट, विधवेचा वा घटस्फोटितेचा पुनर्विवाह, स्त्रीने ( विशेषत: अविवाहित वा इतर तर्‍हांनी सिंगल असलेल्या स्त्रीने) मूल दत्तक घेणे, आंतरजातीयधर्मीय विवाह, वर्ज्य समजल्या गेलेल्या व्यवसाय-नोकर्‍यांमध्ये प्रवेश, राजकीय सत्ताग्रहण इत्यादी विषय हे काही फक्त स्त्रियांचे प्रश्न असू शकत नाहीत. ते पूर्ण समाजाचे आणि समाजातील सर्व घटकांच्या चिंतनाचे विषय आहेत.
अनेक क्षेत्रांमध्ये स्त्रियांचा वावर, सहभाग वाढला आहे. पण हे समकालीन चित्र आमच्या लेखनातून क्वचितच उभं राहतं. उदा. शेतकामाचा स्त्रियांचा सहभाग मोठा आहे. शेतकरी आंदोलनात स्त्रियांचा लक्षणीय सहभाग होता. पण आजही शेतकरी म्हणून स्त्रीचा विचार कुठेच होताना दिसत नाही.
हे प्रश्न स्त्रियांनी मांडले, तर त्यातून खास स्त्रीचा असा दृषिटकोन प्रकट होईल. अनुभवसिद्ध लेखन अधिक प्रभावी रीतीने होण्याची शक्यता निर्माण होते, त्यानुसार केवळ स्त्रियांच्या वाट्याला येणारे भलेबुरे अनुभव थेट मांडले जातील. त्यातून वाचकांच्या ध्यानात येऊ शकेल की, मातृत्व, लैंगिकता, शारीरिकता यांकडेही पारंपरिक चौकट टाळून वेगळया तर्‍हेनं पाहता येऊ शकतं. कौटुंबिक गोष्टींकडेही आर्थिक, राजकीय दृष्टीने पाहिलं तर वेगळे निष्कर्ष हाती येऊ शकतात. स्त्रियाच स्त्रियांच्या शत्रू असतात, अशा ढोबळ विधानांना त्यातून चाप बसू शकतो. एखाद्या घटनेसंदर्भात आमच्या संवेदना कदाचित पुरुषांहून वेगळया नसतीलही, पण त्यांकडे पाहण्याचा कोन मात्र वेगळा असू शकतो.
पर्यावरण, शेती, जाती-धर्म, अर्थकारण, राजकारण, जागतिकीकरण, खासगीकरण, विविध विचारप्रवाह आणि वाद अशा अनेक मुद्यांमध्ये लिंगभेद हा मुद्दा मिसळत लेखिकांनी आपले विचार, भावना, आपल्या दृषिटकोनातून मांडल्या पाहिजेत, ही आजच्या काळाची गरज आहे. भारतीय लेखिकांचं साहित्य तुलनात्मक दृष्टीने वाचताना अशा अनेक गोष्टी सहज ध्यानात येतात. सहज-सरळपणाने, थेट, विनोदाने, उपरोधाने, तिरकस मांडणीतून, मनोविश्लेषणातून, मिथ्स वापरून, इतिहासाचे-पुराणकथांचे-महाभारतादी काव्यांचे संदर्भ घेत, बोधकथांमधून, विज्ञानकथांमधून, काव्यात्म होत, माहिती देत, विचारांचा कीस पाडत... अशा विविध तर्‍हांनी स्त्रियांनी लिहिलं आहे. कविता, कथा, कादंबरी, आत्मचरित्र, ललित निबंध, वैचारिक लेखन, डायर्‍या, पत्रं, अनुभव-कथन, प्रवासवर्णन अशा विविध प्रकारांत स्त्रियांनी लेखन केलेलं आहे.
भारतीय लेखिका आज नेमक्या कोणत्या वैचारिक स्तरावर आहेत, हे या साहित्यातून दिसतं. स्वत:पासून समाजापर्यंत, श्रद्धांपासून विज्ञानापर्यंत, पर्यावरणापासून राजकारणापर्यंत बहुविध विषयांना सामावून घेणारं, विविध दृष्टिकोनांकडेही स्त्रीच्या नजरेनं पाहणारं हे साहित्य आहे. सर्व तर्‍हांच्या सेन्सॉरशीप धुडकावून लावणारं साहित्य आहे.
हे सारं मराठीत आलं पाहिजे.
- हा विचार तर करून झाला. पण नुसत्या विचारांनी काय होतं?
इतर भाषांमधल्या लेखिकांचं लेखन मराठीत आणण्यासाठी नेमकं काय करता येईल, या कल्पनेला आकार मिळत नव्हता.
मनोविकास प्रकाशनाच्या श्री. अरविंद पाटकर यांनी एका भेटीत सांगितलं की,"मनोविकास आता ललित साहित्याच्या दालनात प्रवेश करतंय."
त्यावेळी "भारतीय लेखिका" या मालेची कल्पना मी त्यांच्यापुढे मांडली.
भारतीय लेखिकांचं स्त्री-जाणिवांशी निगडित असलेलं लेखन मराठीत आणणारी "भारतीय लेखिका" ही पुस्तक-मालेची कल्पना त्यांच्या पसंतीस उतरली. त्यानुसार काम सुरू केलं.
भारतीय लेखिकांची ही निवड त्या भाषेतील प्रातिनिधिक आहे, असं नाही. मात्र या लेखिकांनी आपल्या भाषेतील साहित्यात आणि पर्यायानं भारतीय साहित्यात महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे, हे निश्चित. वय, वर्ग, लोकप्रियता, पुरस्कार असे मुद्दे विचारात न घेता स्त्री-विषयक स्वतंत्र विचार मांडणार्‍या, स्त्री-जीवनाचं समकालीन दर्शन घडवणार्‍या, एकुणात स्त्री-केंद्रित असणार्‍या साहित्याचा विचार इथं केला. त्यानुसार लेखिका निवडण्यास सुरुवात केली. त्या-त्या लेखिकेवरील स्वतंत्र लेख अथवा तिची मुलाखत प्रत्येक पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. त्यावरून त्या प्रत्येकीचा व्यक्ती आणि लेखक असा दुहेरी परिचय वाचकांना होईलच.
जाणिवा समृद्ध करणार्‍या या पुस्तकांचं स्वागत मराठी वाचक आनंदानं करतील, याची खात्री आहे.

Comments

शुभेच्छा

उत्तम भुमिका!
प्रकल्पाला शुभेच्छा!

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

परिचय आवडला

परिचय आवडला. या अनुवाद/पुस्तकासाठी अनेक शुभेच्छा!

संपर्क करायचा आहे.

नमस्कार,मी एक फ्रीलान्स जर्नालिस्ट असून तुमच्या ह्या संपादनाविषयी वाचलं.तुमचा फोन नंबर मिळू शकला तर बरं होईल,जेणेकरुन मला सविस्तरपणे हया विषयावर तुमच्याशी बोलता येईल.तुम्हाला तुमचा नंबर इथे देता येत नसल्यास तुम्ही तो gemmadhura@yahoo.com ह्या माझ्या मेलवर पाठवू शकता आणि ह्या संबंधित अजून काही माहिती असल्यास तीही मेल करा.
धन्यवाद!

 
^ वर