फेसबुकादी 'सोशल नेटवर्किंग' स्थळांमुळे इतर संवादस्थळांचा र्‍हास होत आहे का?

ही चर्चा केवळ फेसबुकबद्दल नसून फेसबुक सदृश इतर संकेतस्थळांनाही यात गणता यावे तसेच ही चर्चा केवळ मराठी संकेतस्थळांबद्दल नसून इतर कोणतीही संकेतस्थळे जेथे संवाद साधता येतो परंतु संवादाचे स्वरूप लेख आणि प्रतिक्रिया स्वरूपाचे असते त्या सर्व संस्थळांविषयी आहे. अर्थातच, मराठी संकेतस्थळे हा कळीचा मुद्दा यात आहेच. असो.

मध्यंतरी उपक्रमावरील एक-दोन स्नेह्यांशी बोलताना खालील काही मुद्दे निघाले. हे मुद्दे नवीन नाहीत त्यावर या आधीही इतरत्र चर्चा झाली असावी परंतु सद्य परिस्थितीत कोणास काही नवे सुचले, जाणवले का हे नव्याने कळेल.

१. व्यक्त होण्यासाठी कमीतकमी शब्दांची गरज फेसबुकने भागवली आहे. एखादे चित्र टाकले, एकोळी संदेश टाकला तर त्याला येणारे पाच-पंचवीस लाइक्स आणि दहा-बारा प्रतिसाद लक्षात घेता, कष्ट घेऊन एखादा लेख टाकणे आणि मग त्यावर उलट-सुलट किंवा विपर्यस्त प्रतिक्रिया मिळवून खट्टू होण्याची गरज भासत नाही. फेसबुकावर "डिसलाइक" असा पर्यायच नाही हेच फेसबुकाचे खरे यशाचे गणित असावे काय? असा प्रश्न अनेकदा पडतो.

अगदी कालचेच फेसबुकावरचे उदाहरण द्यायचे झाले तर "फिलिंग लेझी!!!" असे कोणा एकीने लिहिले होते आणि त्याला ४-५ लाइक्सही होते. (यात अतिशयोक्ती नाही.)

काहीतरी लिहिल्याचे, खरडल्याचे, डकवल्याचे समाधान फेसबुक देते, तेवढे समाधान इतर संवादस्थळे देऊ शकत नाहीत.

२. हा मुद्दा खास मराठी भाषेवर/ मराठी संकेतस्थळांवर आहे. मराठी संकेतस्थळांवर नवी पिढी नाही, भविष्यात नवी पिढी मराठी संकेतस्थळांकडे वळल्यास ती पिढी ग्रामीण भागातून येणारी असेल. शहरी पिढी ही मराठी शाळेत शिक्षण घेत नसल्याने तिचा सहभाग फारसा नसेल. यावर उपक्रमींना काय वाटते? (हा मुद्दा कोणालाही दुखावण्यासाठी नाही हे कृपया लक्षात घ्यावे. कदाचित हा स्वतंत्र चर्चेचा विषयही ठरू शकेल पण तूर्तास याच धाग्यावर चर्चा व्हावी.) जी पिढी मराठी संकेतस्थळांवर मी पाहिली आहे, तीही आता फेसबुक किंवा तत्सम साइट्सवर अधिक रेंगाळताना दिसते.

एकंदरीतच संवादस्थळांना मरगळ आल्याप्रमाणे भासत आहे. नवे लेखक अभावाने दिसतात. दिसले तरी दर्जा राखणारे आणि सातत्याने लिहिणारे फारच थोडे असतात. तेही तरुण पिढीतील नाहीत. याला कारण एकमेव फेसबुकच आहे असे म्हणायचे नाही पण या मरगळीमागे इतर कोणती कारणे तुम्हाला दिसतात? फेसबुकादी साइट्स संवादासोबत इतर उपक्रमही राबवतात. तिथे अनेकजण खेळांच्या निमित्ताने, कौलांच्या निमित्ताने, प्रश्नोत्तरांच्या निमित्ताने अधिक रेंगाळताना दिसतात.

३. संवादस्थळांवरील मुख्य आकर्षण हे लिखाण नसून लोकांशी बांधलेले राहणे हे आहे असा तिसरा मुद्दा निघाला. येथे पुन्हा मराठी संकेतस्थळांचे उदाहरण घेऊ कारण देण्यालायक तेवढाच डेटा माझ्यापाशी आहे. ज्या संकेतस्थळांवर खरडवह्या किंवा व्यक्तिगत निरोपांची सुविधा आहे तेथे लोक अधिक रमतात. (मायबोलीवर खरडवह्या नाहीत असे वाटते पण मायबोली हे गेली अनेक वर्षे अस्तित्वात असल्याने, तेथे अनेक इतर उपक्रम राबत असल्याने तेथे चित्र वेगळे असणे शक्य आहे, तरीही सध्या ते बदलले असल्यास व्यक्तिशः मला कल्पना नाही.) किंवा

४. फेसबुकावर साइट्सचे पान असणे ही साइट्सची नवी ओळख ठरत आहे. (कृपया लक्षात घ्यावे यात काही गैर आहे असे म्हणायचे नाही. खुद्द उपक्रमाचेही असे पान असावे अशी कल्पना मी मागेच मांडली होती. ही नवी पद्धत रुजू झाली आहे आणि आता सर्वच संकेतस्थळांना, प्रॉडक्ट्सना, फेसबुकचा आधार घ्यावा लागत आहे.) पण याचा त्या संकेतस्थळावर चांगला परिणाम होईल असेच मानले जाते, तसा काही वाईट परिणामही होऊ शकतो असे मानण्यास जागा आहे काय?

ही चर्चा केवळ काही विचार मांडले जावेत म्हणून मांडली आहे. कृपया तिला संकेतस्थळांतील स्पर्धेचा रोख देऊ नये. ही फेसबुकाची जाहिरात नाही किंवा फेसबुक हे या चर्चेतील आरोपी नाही. मध्यंतरी कागदी पुस्तकांचा अंतकाळ जवळ आला आहे का अशी चर्चा मी टाकली होती. त्याप्रमाणेच केवळ हा एक पल्स-चेक आहे किंवा "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" किंवा "सुलभ समाधान" ही माणसाची खरी गरज आहे का हे जाणण्याचे कुतूहल.

चर्चा विषय विस्कळीत झाला असल्यास क्षमस्व!

Comments

चांगला विषय

  1. फेसबुकच्या जमान्यात माहिती गोळा करुन त्यावर मराठीमध्ये माहितीपुर्ण लेख लिहावा असे वाटणारे किती लेखक आहेत? अथवा असे लेख लिहायचा उत्साह किती जणांमध्ये आहे?
  2. अशा स्थळांवर चर्चा होते कि वाद?
  3. अप्रत्यक्ष संवादामुळे आपल्या मुद्याला विरोध सहन होणारे असे किती?

एक डाटा म्हणून सहजच पाहिले, मनोगतावरचा माझा सदस्य काळ आणि उपक्रमावरचा हे ऑर्कुट आणि मग फेसबुकपेक्षा किती तरी जास्त आहे. पण मला आज सुद्धा एकदा तरी उपक्रमावर चक्कर मारावी असे वाटते. या मधल्या काळात ऑर्कुट आले आणि गेले, सध्या तरी फेसबुक आहे आणि गुगल प्लस फारसे दिसत नाही.
अशाच विषयावर आधारित एक चर्चेचा मुद्दा असा होता कि गुगल किती काळ चालेले अथवा गुगल उतरतीला लागले आहे का?


पीएलसी

प्रॉडक्ट लाईफ सायकल आणि मार्केट सेगमेंटेशन या व्यवस्थापन - विपणन क्षेत्रातल्या कल्पना या विषयाला लागू पडतात का ते पाहू. एखादे उत्पादन बाजारात आणण्याआधी आपण ते कुणासाठी तयार करतो आहोत याची त्या उत्पादकाला पूर्ण कल्पना असणे आवश्यक आहे. सगळ्या ग्राहकांसाठी एकच उत्पादन हे फक्त जेथे पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक आहे अशा किंवा जेथे ग्राहकांना निवडीला वावच नाही अशा ठिकाणी शक्य होते. (उदाहरणार्थ आर्थिक उदारीकरणापूर्वीची भारतातील अनेक उत्पादने; जसे की बजाज स्कूटर). याला सेगमेंटेशन म्हणतात. सॅमसंग या मोबाईल फोनच्या उत्पादकाचे उदाहरण घेऊ. सॅमसंगने ग्राहकांच्या प्रत्येक वर्गासाठी - त्यातल्या उपवर्गासाठी- काही ना काही उत्पादन तयार केले आहे. त्यामुळे सॅमसंग नोकिया, मोटोरोला या दिग्गजांना टक्कर देण्यात यशस्वी ठरले आहे. सेगमेंटेशन न करता एखादे उत्पादन बाजारात आणणे धोक्याचे असते, कारण त्यामुळे ग्राहकाचा गोंधळ होतो. आता दुसरी कल्पना म्हणजे पीएलसीची. एखादे नवीन उत्पादन - मग ती एखादी सेवा (जसे की संकेतस्थळ) किंवा एखादी नवीन कल्पना का असेना - नेहमीच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करुन घेते. त्यामुळे ते उत्पादन लोकप्रिय होते. पण लोकांना सतत काहीतरी नवीन नवीन हवे असते. लोकांच्या अभिरुचीनुसार त्या उत्पादनात तसे बदल होत गेले / केले गेले तर ते उत्पादन जुने असूनही टिकून राहाते. उदाहरणार्थ लाईफबॉय साबण. शंभराहून अधिक वर्षे जुना असलेला हा साबणाचा ब्रॅन्ड आजही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय अंघोळीचा साबण आहे. याचे कारण म्हणजे लाईफबॉयच्या जनमनातील प्रतिमेत योजनाबद्ध रीतीने करण्यात आलेले बदल. त्याला 'रीपोझिशनिंग' असा शब्द आहे. पण एखादे उत्पादन जर लोकांच्या चवीनुसार बदलले नाही किंवा अशा उत्पादनांना अधिक आकर्षक पर्याय उपलब्ध झाले तर पटकन कालबाह्य होऊन विसरले जाते.अर्थात इथला 'पटकन' हा शब्द सापेक्ष आहे. पेजर हे याचे उत्तम उदाहरण आहे. भारतात पेजर आले आले म्हणता म्हणता ते बाजारातून गायबही झाले. कारण त्यांच्याऐवजी अधिक आकर्षक, अधिक सोयीस्कर मोबाईल फोनचा पर्याय ग्राहकांना उपलब्ध झाला होता.
आता हाच तर्क मराठी संकेतस्थळांना लावता येतो का ते पाहू. सगळ्या संकेतस्थळांची उदाहरणे घेण्याची गरज नाही (ते शक्यही नाही!) मनोगताचे काय झाले हे बर्‍याच लोकांच्या स्मरणात असेल. एके काळी मराठीतले सर्वाधिक लोकप्रिय असे हे संकेतस्थळ. दणकेबाज चर्चा, उत्तमोत्तम लिखाण, चर्चा (वादविवादही!) यांसाठी एके काळी प्रसिद्ध. पण मनोगताने काही विशिष्ट ग्राहकवर्ग डोळ्यांसमोर ठेवलेला नव्हता. यानेही यावे, त्यानेही यावे, तिनेही यावे अशी काहीशी मनोगताची भूमिका होती. त्या काळात ते बरोबरही असेल. पण कालांतराने लोक बदलले, लोकांची अभिरुची बदलली, लोकांच्या प्राथमिकताही बदलल्या - पण मनोगत तसेच राहिले! (मनोगताने बदलायला पाहिजे होते असे मला अजिबात म्हणायचे नाही!) मनोगतात झालेले बदल हे वरवरचे - कॉस्मेटिक- या स्वरुपाचेच होते. त्यामुळे हे उत्पादन लवकरच ग्रोथ स्टेजमधून मॅच्युरिटी स्टेजकडे आणि आता तर डिक्लाईन स्टेजमध्ये गेले आहे. आता काही जबदस्त रीपोझिशनिंग झाले तरच या स्थळाचे पुनरुज्जीवन होण्याची शक्यता आहे, अन्यथा नाही. मनोगतात न होणारे बदल आणि वाचकांना उपलब्ध झालेले इतर पर्याय यामुळे मनोगताचे पीएलसी लहानसे ठरले. याउलट उपक्रम आणि मिसळपाव या संकेतस्थळांनी उत्तम सेगमेंटेशन केले आहे. आपला ग्राहक कोण हे या संकेतस्थळांनी बरोबर ओळखले आहे. त्यामुळे आपापल्या वर्तुळात ही संकेतस्थळे आपापल्या मापदंडांनुसार यशस्वी आहेत. सेगमेंटेशन- टारगेटिंग- पोझिशनिंग यातले काहीच न केल्यामुळे मरणावस्था प्राप्त झालेले स्थळ म्हणजे ऐलपैल. सेगमेंटेशन करुनही व्यवस्थापन आणि विपणातल्या त्रुटींमुळे मरण पावलेले संकेतस्थळ म्हणजे बजबजपुरी. मनोगतानेही स्वतःच्या विपणनासाठी - मार्केटिंगसाठी - काही खास प्रयत्न केले नाहीत. याउलट मिसळपाव आणि ऐसीअक्षरे या संकेतस्थळांनी जाणीवपूर्वक स्वतःची प्रतिमा (बरीवाईट- काय असेल तशी!) बनवली, स्वतःला प्रकाशझोतात ठेवले आणि स्वतःचे स्ट्रॅटेजिक मार्केटिंग केले. म्हणून या संकेतस्थळांचे भविष्य उज्वल आहे. असेच काहीसे (पण यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात!) फेसबुकने केले आहे. 'ग्राहकाला काय पाहिजे ते द्या' हा यशस्वी होण्यासाठीचा मूलमंत्र फेसबुकने उत्तम रीतीने राबवला आहे. फेसबुकाचे सेगमेंटेशन उत्तम झाले आहे. या सगळ्या कारणांनी फेसबुक हे लोकप्रिय आहे आणि असणार - मग कुणीही त्याला कितीही नावे ठेवोत किंवा - 'आय हेट धिस टाईमलाईन' असे स्वतःचे स्टेटस ठेवो!
तर फेसबुकामुळे इतर (मराठी ) संकेतस्थळे प्रभावित होतील असे मला तरी वाटत नाही. जो तो आपल्या कर्माने जगतो आणि आपल्या कर्माने मरतो. हे कर्म बाकी नशीब किंवा अपघात असू शकत नाही, असे मला वाटते. मराठी संकेतस्थळांचा फेसबुक हा स्पर्धक आहे, असे मला तरी वाटत नाही.
मूळ चर्चाविषय वाचताना तो काहीसा विस्कळित आहे असे मला वाटले होते, पण या प्रतिसादाचे पूर्वपरिक्षण वाचून या प्रतिसादाच्या तुलनेत तो बराच सुसंगत आहे असे वाटते आहे!

सन्जोप राव
हम तुझे वली समझते, जो ना वादाखार होता

उत्तम प्रतिसाद

एकंदर विवेचन पटले, आवडले.

(अवांतर- मायबोलीवर खरडवही सुविधा आहे. तिथे त्याला 'विचारपूस' असा शब्द आहे. व्यक्तिगत निरोप मात्र नाही.)

मस्तच प्रतिसाद!

उपक्रमावर स्मायलींची सोय असती तर टाळ्या वाजवणारी स्मायली दिली असती!
मस्तच प्रतिसाद!

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

प्रतिसाद आवडला

विश्लेषण सहज पटण्यासारखे आहे.

येन येन हि रुपेण जनो मां पर्युपासते l
तथा तथा दर्शयामि तस्नै रुपं सुभक्तितः ll

:)

प्रतिसाद चांगला आहे. पण शेवटची ओळ सर्वात योग्य आहे :) मुळचर्चा विषय आणि हा प्रतिसाद जरा विसंगत वाटतात पण चर्चा विषयाप्रमाणेच महत्वाचा आहे. संकेतस्थळाचे उद्देश हा दुसरा विषय आहे. थोडक्यात सांगायचे तर तुम्ही दिलेल्या काही स्थळांची निर्मिती हि प्रासंगीक जास्त होती असे वाटते. खास करुन काही स्पष्ट उद्देश अथवा द्रुपल शिकण्यासाठीचे प्रयोग. असो. मुळ मुद्दा चर्चेचा असा आहे कि सध्याच्या साईट लाईफ सायकलमध्ये काय मुद्दे महत्वाचे आहेत आणि ते कमी होण्याची कारणे म्हणजे फेसबुक इत्यादी आहे का?
मुळात इंटरनेटचा वापर हा एक मोठा चर्चेचा मुद्दा आहे. मराठी संकेतस्थळांचे सदस्य हे एकतर मराठीप्रेमापोटी आहेत आणि त्यांना इंटरनेट सहजा सहजी उपलब्ध आहे म्हणून. त्यात मग वर्गवारी करायची म्हटली तर कार्यालयातुन फावलावेळ मिळवून वाचणारे, कदाचित लिहिणारे आणि मग भरपुर मोकळावेळ आणि घरी इंटरनेट असणारे लोकं. खासकरुन ज्यांना इंटरनेटची आवड आहे असे लोकं. त्याच सोबत अनिवासी भारतीय ज्यांना मराठीची नाळ जोडलेली ठेवायची आहे.
आता एकुण मराठी लिहिता वाचता येणारी लोकं आणि संवादस्थळं यांची सांगड घालायची म्हटली तर एक विचित्र चित्र तयार होईल. मला स्वतःला तंत्रज्ञानाचा वापर तळागळा पर्यंत गेलेला आवडेल. त्यात जर मराठी संकेतस्थळे आघाडीवर राहिली तर चित्र वेगळे असेल.
या जोडीला एक नवा मुद्दा आला आहे तो म्हणजे स्मार्ट फोन आणि इंटरनेट. आजची पिढी त्याच्या पुर्ण आहारी गेली आहे. खास करुन गरज नसताना फक्त आत्मसुखासाठी आपल्या फोनवरुन फेसबुकच ऍपचा अमर्याद वापर. त्यामुळे संवादाला तो माणून आणि त्याच्या फोनवरचे फेसबुक हा एकच पर्याय सर्वात प्रभावी राहिला आहे. त्याच प्रमाणे नवे स्मार्ट फोन्स आणि त्यावरची ऍप्स हा सुद्धा एक र्‍हासाचा भाग आहे.
मला वाटते मराठी लोकांसाठी, खास करुन ज्या सर्व प्रकारे इंटरनेट वापरले जाऊ शकते अशा सर्व ठिकाणी चालतील आणि गरजेची असतील अशी मराठी ऍप्स तयार करणे आणि वापरणे जास्त फायदेशीर राहिल आणि संवाद सुद्धा वाढेल.


फरक

फेसबुक आणि मराठी किंवा इतर कोणती संस्थळे तुलना करण्याजोगी नाहीत.

एक तर फेसबुक/ऑर्कुट ही संस्थळे नॉन सिरिअस आणि सोशल नेटवर्किंगसाठीच आहेत. त्यावर एखादा विचार मांडून मतमतांतरे चर्चिणे अपेक्षितच नाही. फेसबुकसारख्या संकेतस्थळावर 'कॉजेस'* नावाचा प्रकार असला तरी त्यावरही त्या कॉजची मांडणी, त्यासाठी करायला हवे असलेले प्रयत्न वगैरे सांगणे अपेक्षित नसते. त्यावर लोकांनी फक्त लाईक करणे सपोर्ट करणे एवढेच अपेक्षित असते. अगदी जे लोक सपोर्ट करतात त्यांच्याकडून लाईक आणि शेअर करण्याखेरीज कसल्याही सकारात्मक/प्रत्यक्ष कृतीची अपेक्षा नसते. [नॉन सिरिअस गप्पा टप्पा करणार्‍या ग्राहकांना आपण अगदीच वायफळ वेळ घालवत नाही असे समाधान देणे हा उद्देश साध्य होतो]

उलट उपक्रम/मिसळपाव/ऐसी अक्षरे या संकेतस्थळांचा उद्देश सदस्यांमध्ये चर्चा घडवणे हाच आहे. त्यातही संजोप राव यांनी म्हटल्याप्रमाणे मिसळपावने आपले वैशिष्ट्य (माफक दंगामस्ती+धमाल यांबरोबरच सिरिअस माल) हे व्यवस्थित बनवले आहे. अश्या संकेतस्थळांवर फेसबुकमुळे काही फरक पडणार नाही असे वाटते. वर लिहेलेले स्युडो-समाधान पुरेसे ठरून चर्चात्मक संकेतस्थळांचा मृत्यू ओढवेल का हे काळच ठरवेल.

*असल्या अनेक फीचर्सचा खरा उद्देश यूजरची वैयक्तिक माहिती वापरण्यास त्याची अधिकृत परवानगी मिळवणे हा असतो असा माझा संशय आहे.

नितिन थत्ते

पटलं

पटलं व सहमत

लिंक्ड-इनऐवजी उपक्रम

याहू, ऑर्कुट, गुगल, युट्युब, फेसबुक, लिंक्ड्-इन, ट्विटर इ. सेवा अमेरिकेत निर्माण होऊन त्या जगभरात पसरल्या आणि लोकप्रिय झाल्या किंवा झाल्या नाहीत. याऐवजी मराठी साइटी चालविणाऱ्यांनी स्वतःची जागतिक बाजारपेठ तयार केली तर? कल्पना करा फेसबुकऐवजी मिसळपाव, लिंक्ड-इनऐवजी उपक्रम, ट्विटरऐवजी ऐसी अक्षरे...
""मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे." या वाक्यामधील साइटींवर मिळून आज जेवढी सदस्यसंख्या आहे तेवढा एक प्राथमिक डेटाबेस धरून गुगल-प्लस, फेसबुक, लिंक्ड्-इन, ट्विटर इ. सारखे किंवा त्याहीपुढे जाऊन पुढच्या दोन-पाच वर्षांत वेगवेगळ्या वयोगटातील, समाजगटातील लोकांना काय हवे असेल याचे अंदाज बांधून तसे काहीतरी करता येईल. अर्थात यासाठी मराठीचा पदर सोडून इंग्लिशचा हात धरावा लागेल. एकदा सुरवात झाल्यावर आणि हळूहळू किंवा वेगाने मार्केटवर ताबा मिळविल्यावर किमान "मराठी माणूस उद्योगात मागे" असे तरी ऐकावे लागणार नाही!

अतीअवांतर आणि विस्कळीत प्रतिसाद: क्षमस्व!

वामन देशमुख
----------------------------------------------------------------------------------
या इथे विशाल तरुतळी, सुरई एक सुरेची, खावया भाकरी अन् वही कवितेची!

धन्यवाद आणि पुढे

विस्तृत प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे आभार आणि ऋषिकेश, ज्ञानेश..., मूकवाचक आणि चितळे "लाइक" सोडून स्वतःची मते मांडलीत तर चर्चेला हातभार लागेल.

सर्वप्रथम एक स्पष्टीकरण ही फेसबुक आणि मराठी संकेतस्थळे ही तुलना नाही. अशी तुलना केल्यास फेसबुकाने परतून "तुझा पगार किती? तू बोलतो/तेस किती?" असे विचारायला हरकत नाही. ;-) फेसबुक इ.मुळे (आणि फेसबुकच का स्मार्टफोन, आयपॅड वगैरेही चालेल) इतर संवांदस्थळांवर फरक पडला आहे का हे समजून घेण्याविषयी चर्चाप्रस्ताव आहे.

माझ्यामते चाणक्यांचा नवा प्रतिसाद (खरेतर उपप्रतिसाद) हा चर्चाविषयाच्या बराचसा जवळ जात आहे. सन्जोपरावांचा प्रतिसाद उत्तम आहे, पटणारा आहे परंतु तो चर्चेतील पहिल्या मुद्द्यावर बोलतो आहे तेव्हा आता चर्चा थोडी पुढे नेता येते का पाहू.

चाणक्यांनी म्हटल्याप्रमाणे, मराठी संकेतस्थळाचे सदस्य (त्यांना ग्राहक म्हणता येत नाही) हे सुखवस्तू, अनिवासी भारतीय, इंटरनेटचा सहज वापर करू शकणारे आहेत. थत्ते म्हणतात -

उलट उपक्रम/मिसळपाव/ऐसी अक्षरे या संकेतस्थळांचा उद्देश सदस्यांमध्ये चर्चा घडवणे हाच आहे. त्यातही संजोप राव यांनी म्हटल्याप्रमाणे मिसळपावने आपले वैशिष्ट्य (माफक दंगामस्ती+धमाल यांबरोबरच सिरिअस माल) हे व्यवस्थित बनवले आहे. अश्या संकेतस्थळांवर फेसबुकमुळे काही फरक पडणार नाही असे वाटते

म्हणजे किती काळ फरक पडणार नाही? ऑर्कुट हे फेसबुकपूर्वी आलेले संकेतस्थळ. तेथील सदस्यसंख्या लक्षात घेता ऑर्कुट खूप लोकप्रिय होते असे म्हणता येते. आज फेसबुकच्या तुलनेत ऑर्कुटला पाहता फरक पडला आहे असे निश्चित म्हणता येते. अर्थातच, फरक पडण्यासाठी फेसबुक वि. मराठी संकेतस्थळे असे गणित नाही. मनोगतावर मिसळपावमुळे पडलेला फरक किंवा कोणतेही नवे मराठी सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आल्यास त्याचा उपक्रमावर पडणारा फरक सहज दिसून येतो.

यापुढला मुद्दा असा की फेसबुकाने लहान-थोर सर्वांना आकर्षित केले आहे. आता हेच मराठी संकेतस्थळांविषयी पाहू. कोणत्याही मराठी संकेतस्थळांवर इंटरनेटचा मुबलक वापर करणारी टिनेजर आणि त्याहून किंचित मोठी (वयोगट १६-२५ मानू) पिढी दिसत नाही. मध्यंतरी मराठी संकेतस्थळांची संख्या ५०० वगैरे असल्याचे कोणीतरी म्हणाले होते, त्यातील संवादस्थळे १०-१२ असली तरीही मला वाटते त्याप्रमाणे त्यातील एकही नवीन पिढीला आकर्षित करणारे नाही. भविष्यात तसे दिसणे/होणे कठीण वाटते. त्यामुळे फरक पडत नाही असे म्हणता येत नाही.

माणसाला नवीन तंत्रज्ञान आकर्षित करते, एक उदाहरण म्हणून सांगायचे झाले तर माझ्याकडे पूर्वी डेस्क्टॉप होता, मग लॅपटॉप आला, नंतर स्मार्टफोन आला आणि आता आयपॅड. या सर्वांत झाले असे की माझा लेखनाचा वेग कमी झाला. डेस्कटॉपवरून लिहिणे सोपे होते, लॅपटॉपवरून थोडे कठीण झाले. आयपॅडवरून लिहिणे फार कमी झाले. सोपे काय झाले - "लाइक" करणे किंवा एकोळी स्टॅटस अपडेट करणे.

तसेही पाहता मराठी संकेतस्थळावर वावरणारे लोक कोण? तेच ते जुन्या संकेतस्थळावरून रागावून बाहेर पडलेले किंवा तेथे न रमलेले किंवा लमाण (म्हणजे ज्यांची कोणा एकाशी बांधिलकी नाही असे). म्हणून चर्चेत म्हटल्याप्रमाणे या व्यतिरिक्त नवे लोक कोण येऊ शकतील... किंवा जे येतील ते शहरी नसतील असा अंदाज आहे.

प्रतिसाद अर्धवट आहे. मागाहून पूर्ण करेन किंवा वेगळा प्रतिसाद देईन.

फेसबुक आणि ट्विटर

मला एक विचार नेहमी सतावतो तो म्हणजे फेसबुकची लोकप्रियता अथवा फेसबुकचा रिच म्हणता येईल (योग्य मराठी वाक्य सुचत नाहिये.) खरतर फेसबुक आणि ट्विटर दोन्ही बर्‍यापैकी लोकप्रिय आहेत. दोन्ही स्मार्ट फोन्सवर ऍप्लिकेशन म्हणून उपलब्ध असतात. पण त्यामानाने फेसबुकचा प्रचंड वापर होतो. एक उदाहरण म्हणून बोलायचे झाले तर माझे असे नातेवाईक ज्यांना मी वर्षानुवर्षे भेटलो नाही जे मोठ्या शहरांमध्ये रहात नाहीत त्यांचे फेसबुकवर सक्रिय सदस्यत्व आहे. किंबहुना ते खुपच सक्रिय आहेत. पण याच लोकांचा ट्विटरशी काही संबंध नाही. याचे कारण काय असावे? तसेच त्यांच्या फेसबुकवरचा वावर हा मराठी भावनिक चित्रे, कविता, पाट्या असाच असतो.
पण हे सगळे लोकं प्रचंड उत्साहाने फेसबुक वापरतात. या उलट ट्विटरचा वापर शक्यतो मायक्रोब्लॉगिंगसाठी अथवा लिंक्डईन सोबत अथवा तत्सम इंटेग्रेशनसाठी जास्त चांगला असतो. तिथे फेसबुक सारखे लाईक अथवा कट्टा असा प्रकार नसल्याने या लोकांना त्यात काहीच रस नसतो. मुळात सोशल नेटवर्किंगचा फायदा मार्केटिंगच्या लोकांना सर्वात जास्त आहे. बाकी लोकांना फक्त टाईम् पास हाच उद्देश आहे.

जेंव्हा मराठीत टाईप करण्यासाठी फक्त मनोगत होते आणि गमभनचा जन्म झाला नव्हता तेंव्हा मराठीमध्ये व्यक्त होण्यासाठी ते एक उत्तम माध्यम होते. मग लोकांना गमभन मिळाले, त्यानंतर त्याचे द्रुपल सोबत इंटिग्रेशन मिळाले आणि मग द्रुपलाधारित मराठी संकेतस्थळांचे पिक आले. ज्याने मनोगताकडचा लोकांचा ओढा जास्त वेगाने कमी झाला. हि नवे संकेतस्थळे तयार करणारे आणि सदस्यत्व घेणारे हे मग तेच ते जुन्या संकेतस्थळावरून रागावून बाहेर पडलेले किंवा तेथे न रमलेले किंवा लमाण असेच होते/आहेत. हाच प्रकार ऑर्कुट बद्दल पाहता येईल. कदाचित प्रत्येक ऑर्कुटवाल्याचे फेसबुकवर सदस्यत्व असेल. पण गुगलप्लसवर फेसबुकवरच्या प्रत्येकाचे असेलच असे नाही.
संवादस्थळे बनायला वेळ लागतो. एखादा सदस्य नुसताच वाद घालु लागला तर मग लोकांचा ओढा कमी होतो. मराठी स्थळांवर मग तोच तो पणा पाहून जास्त आवाका असलेलं फेसबुक का नाही वापरायचे हा विचार का येऊ नये?

उपक्रमावरच्या लेखना बद्दल म्हट्ल येथे लेख लिहिताना अभ्यासपुर्ण असावा अशी सदस्यांची अपेक्षा असते. असा लेख लिहायला वेळ लागतो. त्यावर चर्चा करण्यासाठी सुद्धा विचार करायला लागतो. :) सगळ्याच सदस्यांना हे रुचते असे नाही. ज्यांना रुचत नाही त्यांना इतर पर्याय आहेतच.

सहमत!

एखादा सदस्य नुसताच वाद घालु लागला तर मग लोकांचा ओढा कमी होतो.

माझा तरी निश्चित! त्यामुळे अनेकदा मी (आणि अजून काही मला माहिती असलेले सदस्य) लॉग इन करण्याचे कष्टही घेत नाही.
कारण तेथे प्रतिसाद दिला तर कचरा वाद घालू सदस्य एखाद्या शब्दावरून फालतू वाद घालत बसणार. त्या ऐवजी नेमक्या सदस्याशी जी-टॉक वर बोलतो. अगदीच जमले नाही तर खरडवही द्वारे संवाद साधतो. तेच ते विषय पाहिले की मुख्य प्रवाहात येणे टाळतो. असेही यनावाला आणि नानावटींचे तेच ते लेख किती काळ वाचणार? (माझ्या मते शशिकांत ओक आणि हे दोघे हे सर्व एका माळेचे मणी आहेत.)

प्रमुख प्रस्तावाविषयी म्हणायचे तर मला वाटते की फेसबुक आणि ट्विटरचा वापर मराठी संकेत स्थळांनी केला पाहिजे. मायबोली तसे करते आहे. एकदा फेबुवर लाईक केले की नवीन घडामोडी अनायासे समजत राहतात. जे आवडीचे आहे तेथे सहजतेने पोहोचता येते. त्यामुळे फेसबुक आणि मराठी संकेतस्थळे यात स्पर्धा आहे असे वाटत नाही पण त्याचा फायदा मराठी संकेतस्थळांनी घेतला पाहिजे.
येथे आलेल्या प्रत्येक नवीन प्रस्तावाचे शीर्षक ट्वीट करणे शक्य आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून घेतला पाहिजे. अजूनही अनेक कल्पना असू शकतात. पण येथे सदस्यांच्या सूचनांना आणि कल्पनांना मालकांकडून किंवा मॉड कडून बहुदा केराची टोपलीच दाखवली जाते असे दिसते. त्यामुळे सध्या इतकेच.

-निनाद

खोडसाळपणा की मूर्खपणा!

असेही यनावाला आणि नानावटींचे तेच ते लेख किती काळ वाचणार? (माझ्या मते शशिकांत ओक आणि हे दोघे हे सर्व एका माळेचे मणी आहेत.)
यनावाला आणि नानावटी ह्यांना ओकांच्या रांगेत बसवणे हे बौद्धिक पंगुत्वाचे लक्षण आहे किंवा शुद्ध खोडसाळपणा तरी.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

अंदाज अपना अपना!

अंदाज अपना अपना!
शशिकांत ओक, यनावाला आणि नानावटी हे सर्व एका माळेचे मणी आहेत
मला हे माझे मत बदलण्याचे काही कारण दिसत नाही. ते तसे आहेतच - एकच विषय घ्यायचा आणि आपटत बसायचे. असो.

बौद्धिक पंगुत्व वगैरे ते घ्या घालून तुमचे तुम्हीच!!

-निनाद

काही प्रमाणात सगळेच

काही प्रमाणात सगळेच आहेत तसे. प्रत्येकाने आपापले विषय पकडले आहेत आणि मुद्दा वळवून तिकडे नेतातच.


अरेच्चा?

पंत आयडी चुकला काय ह्या वेळेला? अहो तुम्ही असे जहाल विचार मांडलेत तर मराठी-विकिप्रसार काय गुंडोंनी करायचा का?

हा हा!!

मराठी विकीपासून हल्ली दूरच राहणे बरे असे वाटू लागले आहे.
तेथले प्रचालक काय वाटेल तसे वागत आहेत असे सध्या दिसते!
हे पाहा चावडी वादनिवारण आणि तेथे झालेला गोंधळ.

वाचा मराठी विकिपिडिया प्रचालक आणि मराठी विकिपिडिया सदस्य यांचा सामना!
-निनाद

बाप रे!

इकडे संपादक असतात तसे तिकडे प्रचालक काय?
थोडक्यात;
"शेवटी माणव हा अपूर्न" - आदरणीय नामू परीट

तेथला

तेथला लोच्या जरा निराळा असतो. कुणीही कोणतेही संपादन करू शकतो ना... पण त्यातही ऍनिमल फार्म सारखे प्रचालक हे 'विशेष सामान्य' असतात. त्यामुळे ते नीनावी डूआय ने कामगिरी साधतात म्हणे! ;)

असो, बहुदा प्रचालकांना सदस्यांशी कसे वागावे आणि प्रचालकांच्या जबाबदार्‍या नक्की काय याचे काही प्रशिक्षणच नसावे असे मानायला जागा आहे. नवीन सदस्यांना प्रोत्साहन देण्या ऐवजी तेथे चुका झाल्यावर नवप्रचालक त्यांचे लेख उडवतात. वाटेल तशा उर्मट सूचना देतात. शिवाय आय पी ब्लॉक करून त्यांचे आंतरजालीय खुनही पाडत असावेत. इतके करून त्या विरुद्ध मागितलेली दाद सरळ थंड्या बस्त्यात हलवलेली पाहून तर मी पण चाट पडलो. कोण कशाला मरायला जातो मग मराठी विकिवर? काशी घाला म्हणा त्या विकीची! (हे पटत नसल्यास मक्का किंवा व्हॅटिकन घातली तरी चालेल. कम्युनिष्टांनी मॉस्को घालून घ्यावी :) नास्तिकांनी झेपत असल्यास आयुका घालावी :)) .)
अर्थात काही सदस्यांचे वर्तनही तसेच आहे म्हणा. काय वाटेल ते लिहितात. आणि आधी लिहिलेले सरळ उडवतात.
"शेवटी माणव हा अपूर्न" - आदरणीय नामू परीट
१००% सहमत आहे. त्या परटाला एक्द विचारा ना, माणव मध्ये संपादक आणि विकिप्रचालक पण येतात का ते...?

अपूर्न माणव
-निनाद

अरे बाप रे!

वाचावे ते नवलच!

हो ना!

मी तर हतबुद्धच झालो आहे ते सर्व पाहून.
याच साठी केला होता अट्टाहास? असा प्रश्न पडला आहे.

-निनाद

असहमत

असेही यनावाला आणि नानावटींचे तेच ते लेख किती काळ वाचणार? (माझ्या मते शशिकांत ओक आणि हे दोघे हे सर्व एका माळेचे मणी आहेत.)

या वाक्याशी असहमत आहे. यनावाला आणि ओक हे आपापल्या विषयावर लिहितात आणि हटून बसतात हे सत्य असले तरी यनांकडे सारासारबुद्धी आणि कॉमन सेन्स खूपच जास्त आहे आणि जनरली त्यांचे लेख समाजोपयोगी असतात. नानावटींच्या विषयी बोलायचे झाल्यास त्यांनी उपक्रमावर वैविध्यपूर्ण लेखन केले आहे. कसेही का होईना, यना, नानावटी आणि ओक हे एकाच माळेचेच काय पण एका ज्युव्लेरी बॉक्समधलेही दागिने नाहीत. ;-)

मान्यवरांचा दुष्काळ

आणखी एक स्वतंत्र मुद्दा मांडते पण चाणक्यांच्या प्रतिसादाच्या निमित्ताने -

मला एक विचार नेहमी सतावतो तो म्हणजे फेसबुकची लोकप्रियता अथवा फेसबुकचा रिच म्हणता येईल (योग्य मराठी वाक्य सुचत नाहिये.) खरतर फेसबुक आणि ट्विटर दोन्ही बर्‍यापैकी लोकप्रिय आहेत. दोन्ही स्मार्ट फोन्सवर ऍप्लिकेशन म्हणून उपलब्ध असतात. पण त्यामानाने फेसबुकचा प्रचंड वापर होतो.

हे बरोबर वाटते. मी स्वतः ट्विटरवर कधीही गेलेले नाही; तूर्तास मला ट्विट करण्याची गरज भासलेली नाही असे समजते. परंतु, फेसबुक आणि ट्विटरवर अनेक मान्यवर दिसतात. त्यापैकी कोणीही संवादस्थळांवर उपलब्ध नाही ही इतकी वर्षे मराठी संकेतस्थळे असून ती कोणाही मान्यवराला आपल्याकडे खेचू शकलेली नाहीत असे म्हणता येईल.

बहुधा याची अनेक कारणे असतील. ट्विट करणे किंवा स्टॅटस अपडेट करणे ही त्यामानाने सोपा भाग झाला. लेख टाकणे, सोबत चित्रे डकवणे हा थोडा तांत्रिक आणि किचकट भाग झाला. तो मान्यवरांना साध्य असेलच असे नाही. याचबरोबर कला हा ज्यांचा व्यवसाय आहे ते लोक ड्रुपल बेस्ड फुकट संकेतस्थळांकडे गांभीर्याने बघणार नाहीत असे वाटते. चांगले लेखक, कवी, समीक्षक, कलाकार, अभिनेते जो पर्यंत या संवादस्थळांना गांभीर्याने घेणार नाहीत तोपर्यंत या संवादस्थळांना एक अपेक्षित दर्जा प्राप्त होणे कठीण वाटते. जर त्यांना नवे काही देता येत नसेल, पुढे जाणे शक्य नसेल तर एके दिवशी ही स्थळे उतरणीला लागणे क्रमप्राप्त आहे.

जेंव्हा मराठीत टाईप करण्यासाठी फक्त मनोगत होते आणि गमभनचा जन्म झाला नव्हता तेंव्हा मराठीमध्ये व्यक्त होण्यासाठी ते एक उत्तम माध्यम होते. मग लोकांना गमभन मिळाले, त्यानंतर त्याचे द्रुपल सोबत इंटिग्रेशन मिळाले आणि मग द्रुपलाधारित मराठी संकेतस्थळांचे पिक आले.

यात तथ्य आहेच. वर म्हटल्याप्रमाणे नवी संकेतस्थळे रुजू होत आहेत हे खरे पण त्यांत वेगळेपण नाही. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने लोकांना खेचून घेण्याची शक्ती नाही. तेच ड्रुपल, तेच गमभन आणि तेच लोक ही वस्तुस्थिती आहे.

रिच्

रिच = पोहोंच

कल्पकता आणि संवाद

कल्पकतेचा अभाव हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. खरतरं आता मराठी संकेतस्थळांवर वेगवेगळ्या क्षेत्रातले लोकं असतात. सर्वांनी एकत्र येऊन काही नव्या कल्पना विकसित करणे सहज शक्य आहे. पण या स्थळांवर याचा अभाव दिसतो आणि मग संवाद सुद्धा हरवत जातो. मुळात मराठीचा धागा पकडून नव्या गोष्टी करणे गरजेचे आहे. असं नाही कि सरसकट सगळं मराठीमध्ये हवे. पण मला एखादे नवे उत्पादन अथवा संकल्पना विकसित करताना ४ कल्पन मराठी लोकं भेटले तर जास्त छानं वाटतं. गमभनचा जन्म असाच झाला. आता ते मराठीमध्ये अडकुन राहिले नाही. पण मराठी टंकलेखनामध्ये त्याचा जन्म लपला आहे याचे समाधान वाटते. जेंव्हा गमभन तयार होत होते त्यावेळी त्याच्या जडणघडणीमध्ये अनेकांनी सक्रिय भाग घेतला होता. हे झाले एक उदाहरण. असे बरेच काही करता येऊ शकते ज्याने मराठी संवादस्थळे जास्त आकर्षक होतील आणि वेगवेगळ्या वयाचे सदस्य असल्याचा फायदा सुद्धा होईल.


उथळांची मांदियाळी

1. ह्या चर्चेकडे 4-5 मराठी संकेतस्थळांच्या अतिमर्यादित चष्म्यातून बघायला नको. तीच ती जास्तीत जास्त 100-125 मंडळी. तेच ते हेवेदावे. असो. आजकाल प्रत्येक जण, प्रत्येक संस्था -- वर्तमानपत्र, नियतकालिक, कलाकार, कंपन्या, ब्रांड वगैरे वगैरे -- फेसबुक पाने उघडताहेत. ट्विटरखाती उघडताहेत.
कारण तिथून माहिती लवकर पसरते किंवा ग्रहण करता येते.

2. बाकी फेसबुकावर अगदी 2-3 वाक्यांचे किंवा शब्दांचे 'छान', 'अप्रतिम', 'सुरेख', 'सुंदर' प्रतिसाद देण्याचीसुद्धा गरज नसते. फेसबुकवर जिथेतिथे उथळांची मांदियाळी आहे. लाइकले की झाले.

3. मराठीचे 'एक्स्प्लोजन' होण्यासाठी ग्रामीण, निमशहरी भागात इंटरनेटचा वापर वाढायला हवा. आणि भारतातल्या शहरी मध्यमवर्गाकडून फारशा अपेक्षा नाहीत. ही मंडळी चुकून भारतात शिल्लक आहेत आणि नाइलाजाने मराठीत बोलत आहेत, असे कधीकधी वाटते. ह्यांच्या मुलांनी मराठी कधीच त्यागली आहे.असो. वेळेअभावी तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हेही विधान उथळच...

<<मराठीचे 'एक्स्प्लोजन' होण्यासाठी ग्रामीण, निमशहरी भागात इंटरनेटचा वापर वाढायला हवा. आणि भारतातल्या शहरी मध्यमवर्गाकडून फारशा अपेक्षा नाहीत. ही मंडळी चुकून भारतात शिल्लक आहेत आणि नाइलाजाने मराठीत बोलत आहेत, असे कधीकधी वाटते. ह्यांच्या मुलांनी मराठी कधीच त्यागली आहे.>>

हा सगळाच परिच्छेद उथळ आणि विनोदी आहे.
भारतातला शहरी मध्यमवर्ग कशाला नाईलाजाने मराठी बोलेल? त्यांना त्यांची स्वतःची राज्यभाषा आहे की. तुम्हाला महाराष्ट्रातील शहरी मध्यमवर्ग म्हणायचे आहे का? काहीही असो, महाराष्ट्रातील शहरी मध्यमवर्गीय अद्यापही मराठीतच बोलतो कारण त्यांची मुलेबाळे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये जात असली तरी जुनी पिढी मराठी माध्यमात शिकून मोठी झालेली आहे. ही जुनी पिढी मातृभाषा विसरलेली नाही. नवीन पिढीबाबतही बोलायचे झाले तर केवळ कोन्व्हेंटमध्ये जाणारी मुले सक्तीने इंग्रजी बोलतात. इंग्रजी माध्यमाच्या शाळांत सूचनांची व लेखनाची भाषा इंग्रजी असली तरी विद्यार्थी एकमेकांशी मराठीतच बोलतात. वातावरणही टिपिकल मराठीच असते. (भोंडले होतात. हातावर मेंदी काढल्यास शिक्षा होत नाही. पसायदान पाठ करुन घेतात. शिक्षकांशी मराठीत बोलल्यास चालते.) मुले घरी पालकांशी मराठीतच बोलतात. हे अगदी सगळीकडे दिसते.
मला वाटते, की ठाम विधाने करताना काही विदाही दिला जावा.

सहमत

भारतातल्या शहरी मध्यमवर्गाकडून फारशा अपेक्षा नाहीत. ही मंडळी चुकून भारतात शिल्लक आहेत आणि नाइलाजाने मराठीत बोलत आहेत, असे कधीकधी वाटते. ह्यांच्या मुलांनी मराठी कधीच त्यागली आहे.

या वाक्याशी अंशतः सहमत. काही तरुण मंडळी मराठीत बोलत असतील, अगदी स्वखुशीने बोलत असतील, पण त्यांच्यांमध्ये, कविता आणि रेसिपीज् सोडून अन्य लिखाण करणारी मंडळी, बहुधा शून्य टक्के असावीत.

ग्रामीण-अर्धशहरी तरुणांबद्दल असे विधान करणे योग्य नाही. त्यांव्या लिखाणाची भाषा आणि विषय पाहिले, की ही मंडळी कॉन्व्हेन्टशिक्षित नाहीत हे सहज समजून येते. त्यांच्याद्वारेच मराठी जिवंत राहणार असावी.---वाचक्नवी

हिंग्लिश-मिंग्लिश

पण त्यांच्यांमध्ये, कविता आणि रेसिपीज् सोडून अन्य लिखाण करणारी मंडळी, बहुधा शून्य टक्के असावीत.
बरोबर. हा टक्का अतिशय कमी आहे. ही तरुण मंडळी केवळ घरच्यांशी बोलताना मराठीतून बोलतात. अगदी भावाबहिणींशी बोलतानाही हिंग्लिश व मिंग्लिश बोलतात. आमच्या पिढीला माहीत असलेल्या साध्या साध्या शब्दांचेही अर्थ त्यांना ठाऊक नसतात. असो. पिढीगणिक शब्दसंपत्तीचा होणारा ऱ्हास हा आणखी वेगळा मुद्दा आहे.

ग्रामीण-अर्धशहरी तरुणांबद्दल असे विधान करणे योग्य नाही. त्यांव्या लिखाणाची भाषा आणि विषय पाहिले, की ही मंडळी कॉन्व्हेन्टशिक्षित नाहीत हे सहज समजून येते. त्यांच्याद्वारेच मराठी जिवंत राहणार असावी.---वाचक्नवी

ग्रामीण-अर्धशहरी तरुण वर्गाबद्दल माझे असे मत नाही. असो. इतर भारतीय भाषांबाबतही असेच काहीसे थोड्याबहुत प्रमाणात म्हणता येईल.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

उत्तम चर्चा विषय....

पहिला मुद्दा-पटला.फेसबुक हे एक प्रकारचे करमणुक सदर आहे.इथे गांभीर्यानी कोणत्याही विषयाची चर्चा वगैरे होताना दिसत नाही,फक्त तो विषय अहंता/अस्मितेवर आधारलेला नसेल तर.तसे असल्यास हिरिरीने मतप्रदर्शन पाहायला मिळते.एरवी गंभीर किंवा उपयुक्त लेखन आणी फेसबुक हा विसंगत मुद्दा आहे.

दुसर्‍या मुद्या-तील फेसबुक संलग्न राहाण्याची सांगितलेली कारण ही फारशी परस्परपूरक नाहीत.(फेसबुकादी साइट्स संवादासोबत इतर उपक्रमही राबवतात. तिथे अनेकजण खेळांच्या निमित्ताने, कौलांच्या निमित्ताने, प्रश्नोत्तरांच्या निमित्ताने अधिक रेंगाळताना दिसतात.) एवढा एक मुद्दाच बरोब्बर वाटतो.
@भविष्यात नवी पिढी मराठी संकेतस्थळांकडे वळल्यास ती पिढी ग्रामीण भागातून येणारी असेल. >>> हेही तितकसं खरं नाही,किंबहुन या बाबतीत तरुण पिढी/जुनी पिढी/नवी पिढी/भविष्यातली पिढी असा वाद अप्रस्तुत वाटतो.खरा प्रश्न आहे,''मराठी संस्थळ आणी त्यांचे स्वरूप याची नीटपणे माहिती देणारी जाहिरात कुठे होते का..?'' हा आहे. मराठी संस्थळ विविध व्यक्तिमत्वाची आहेत.सर्व प्रकारच्या लोकंवर्गातून त्याला वाचक/लेखक/प्रतिसादक लाभू शकतात.अंतरजालाच्या अनेक इंग्रजी साइट्सची तोंडातोंडी जेवढी जाहिरात आहे.ते मराठी संस्थळांचे बाबतीत होताना दिसत नाही.सामान्यपणे मी ज्या संस्थळांवर वावरतो,जी मला योग्य वाटतात/वाटत नाहीत त्याची माझ्या मित्रमंडळींमधे मी नेहमी चर्चा करतो.यामधे जी मंडळी केवळ फेसबुकवादी आहेत/फोनवर फेसबुक वापरणारी आहेत,त्यांना खरोखरी मराठी संस्थळांविषयी गंध-वार्ता नसल्याचेच मला अढळून आले आहे.याबाबत काहि करणे गरजेचे आहेच. त्यामुळे पिढी ग्रामिण आहे का शहरी आहे...हे विशेष नसुन त्यांच्या पर्यंत मराठी संस्थळ हा विषयच अजुन पोहोचलेला आहे की नाही..? हा खरा प्रश्न आहे. मरगळ वाटण्या मागचं हेही एक प्रमुख कारण आहे.

मुद्दा तिसरा-लिखाण हे आकर्षण नाही,असंही नाही.फक्त संस्थळावर त्यासाठी एकाच जागी मिळणारे बहुविधं पर्याय हा त्यातला कळीचा मुद्दा आहे.कुठल्याही संस्थळानी एखाद्या ठराविक विषयाला/साच्याला वाहुन घ्यावं की घेऊ नये? हा वादाचा मुद्दा आहे. परंतू काळाचा नूर पहात जिथे ''सबकुच एकही जगहा'' असं मॉलसारखं ज्या संस्थळाचं स्वरूप असेल तिथे आकर्षित होण्याचं एक कारण.आपल्याला हवं असणारं/अवडणारं लेखन इथे मिळतं हेही असणार...लोकांशी बांधलेलं राहाण्याचा मुद्दा बरोबर आहेच,त्यामुळे त्याविषयी वेगळं मत नाही.

मुद्दा चौथा-याविषयी काहिही मनन झालेले नसल्यामुळे मत देत नाही... :-)

नवी पिढी

भविष्यात नवी पिढी मराठी संकेतस्थळांकडे वळल्यास ती पिढी ग्रामीण भागातून येणारी असेल. >>> हेही तितकसं खरं नाही,किंबहुन या बाबतीत तरुण पिढी/जुनी पिढी/नवी पिढी/भविष्यातली पिढी असा वाद अप्रस्तुत वाटतो.खरा प्रश्न आहे,''मराठी संस्थळ आणी त्यांचे स्वरूप याची नीटपणे माहिती देणारी जाहिरात कुठे होते का..?'' हा आहे.

हा वाद नाही आणि या चर्चेसाठी तो अप्रस्तुतही नाही. याचे कारण असे की संकेतस्थळावरील ज्येष्ठ (वयाने नाही, अनुभवाने) तुम्हाला याबाबत सांगू शकतील की अनेकदा जाहीरात करूनही लोक येत नाहीत. अर्थातच याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही अशी की मराठी लेखन करणारी पिढी आता तिशीत पोहोचली आहे. जी पिढी पन्नाशीच्या आसपास आहे ती इंटरनेट माध्यमाशी जवळीक साधून नाही. जवळीक साधून असली तरीही मराठी टायपिंग जमतेच असे नाही.

एक उदाहरण बघा - १५ वर्षांचा मुलगा, त्याची आई आणि त्याची आजी यांना मी एकत्र फेसबुकावर पाहिले आहे. हेच जर मराठी संकेतस्थळाबाबत पाहिले तर काही नवरा-बायको संकेतस्थळांवर दिसतात पण मागची-पुढची पिढी दिसत नाही.

जाहीरातीअभावी मराठी संकेतस्थळांची माहिती लोकांत पसरलेली नाही असा अंदाज काही अंशी खरा आहे पण जाहीरात होतच नाही हे खरे नाही. अनेक संकेतस्थळांवर जाऊन पाहिल्यास "आमच्या संकेतस्थळाविषयी वर्तमानपत्रात लेख आला होता" टाइपच्या चर्चा/ लेख वाचता येतील. दिवाळी अंकांमध्ये मराठी संकेतस्थळांविषयी लेख छापून आलेले आहेत. एका मराठी संकेतस्थळावरून दुसर्‍या मराठी संकेतस्थळाची जाहीरातही होत असते. तोंडी जाहीरात होत असतेच पण लक्षात घेतले तर त्या जाहीरातीला भूलून येणारे आणि टिकणारे फारच कमी असतात. जे असतात तेही रिटायर झालेले किंवा अनिवासी झालेले भारतीय बहुत करून असतात.

अर्थातच, जाहीरातीसाठी जर पैसे मोजावे लागले तर आधी मराठी संकेतस्थळांना पैसे कमावणे गरजेचे आहे. पैसे कमावण्यासाठी काहीतरी वेगळे करून दाखवणे आणि ते वेगळे करून दाखवण्यासाठी तंत्रज्ञान, पैसा आणि माणसे (तंत्रज्ञ आणि ग्राहक) हाताशी असणे गरजेचे आहे. असो.

नवी पिढी म्हणजे जिला मराठी बोलता येते, भोंडले करता येतो, मेंदी लावता येते, पोळी लाटता येते किंवा मराठी वाचता येते अशी पिढी नसून जिला मराठीत लेखन करून व्यक्त होता येते अशी टीनेजर्स पासून पुढे पिढी आहे आणि अशी शहरी पिढी हळूहळू नष्ट होत आहे हे सत्य आहे.

फेसबुकावरील तीन पिढ्या

एक उदाहरण बघा - १५ वर्षांचा मुलगा, त्याची आई आणि त्याची आजी यांना मी एकत्र फेसबुकावर पाहिले आहे. हेच जर मराठी संकेतस्थळाबाबत पाहिले तर काही नवरा-बायको संकेतस्थळांवर दिसतात पण मागची-पुढची पिढी दिसत नाही.

ही मंडळी फेसबुकवर काय करीत होती हे पाहिले आहे? नित्यकर्मांची जंत्री, गप्पाटप्पा, चकाट्या आणि चांभारचौकशा यांव्यतिरिक्त काही? यांपेक्षा काही वेगळे करणारीं मंडळी मला अजून भेटलेली नाहीत.---वाचक्नवी

सोपे आहे ना!

ही मंडळी फेसबुकवर काय करीत होती हे पाहिले आहे? नित्यकर्मांची जंत्री, गप्पाटप्पा, चकाट्या आणि चांभारचौकशा यांव्यतिरिक्त काही? यांपेक्षा काही वेगळे करणारीं मंडळी मला अजून भेटलेली नाहीत

अहो फेसबुकावर मंडळी गप्पाटप्पा आणि चकाट्या पिटायलाच येतात. मध्यंतरी एका नवर्‍याने "लिवींग अर्ली टुडे!" असा ऑफिसातून संदेश टाकला होता. त्यावर बायको म्हणते "डार्लिंग, लेट्स गो फॉर ए लाँग ड्राईव टुनाइट!" देवाशप्पथ यात अतिशयोक्ती नाही पण नवरा बायकोच्या या संवादात फेसबुक कशाला हवं? असो. या वाक्यांवर ८-१० लाइक्स असले तर आश्चर्य वाटायला नकोच.

तेव्हा सांगायचा मुद्दा असा की माणूस लेखन करतो ते दुसर्‍यांना "अपडेट" करण्यासाठी आणि स्वतःला व्यक्त करण्यासाठी. दोन्ही करताना त्याला प्रशंसा ही हवी असतेच. फेसबुकावर तसे केल्याने; ते सुद्धा स्मार्टफोनवरून वगैरे; अहंकार सुखावून मिळत असेल, प्रशंसा होत असेल तर इतर संवादस्थळांवर ओढा कमी होईल का असा प्रश्न पडतो. तेथे लेखन करणे आणि त्याला ऍप्रिशिएट करणे इतके सोपे झाले आहे की कोण कशाला बसून, मेहनत घेऊन ४-५ पानी लेख टाकेल.

नेमका मुद्दा

अहंकार सुखावून मिळत असेल, प्रशंसा होत असेल तर इतर संवादस्थळांवर ओढा कमी होईल का असा प्रश्न पडतो.

हा एकदम नेमका मुद्दा पकडला आहे. फेसबुक सारख्या स्थळांचे यश यातच सामावले आहे. फेसबुकचा चांगला वापर करणारे आहेतच. पण हां, तुम्ही मांडलेला मुद्दा एकदम मान्य. खास करुन उपक्रमावरच्या चर्चांमध्ये अहंकार दुखावणारे प्रतिसाद आले की सदस्य म्हणतात "हा मी चाललोच कसा... " कदाचित उपक्रमावर एक पुणेरी पाटी लावावी. येथे अहंकार सुखावले जात नाहीत. :)
आपण सदस्यांचे वर्गीकरण गरजेचे आहे. खास करुन लेखक आणि वाचक (खास करुन प्रतिसाद देणारे ) असे. लेखनाचे एक आहे. येथे लेख लिहायचा असेल तर चांगलाच असावा असे येथे जुन्या असणार्‍या लेखकांना वाटतेच वाटते. खरंतर अनेकदा चांगला अभ्यास सुद्धा केला जातो.
एक मुद्दा असा सुद्धा आहे कि पोलिटिकली करेक्ट अथवा विन-विन सिच्युएशमध्ये राहणे पसंत करणारा वर्ग जास्त आहे. खास करुन एकमेकांचा अहंकार सुखावणारे. उपक्रमावर अथवा इतर कोणत्याही स्थळावर सहमत, आवडले, असे प्रतिसाद देणारे हमखास असतातच. ते चुकीचे आहे असे नाही. पण त्या सोबत थोडा सविस्तर प्रतिसाद दिल्यास लेखकाला आपले काय चुकले अथवा काय आवडते आहे हे कळायला मदत होते. असो. सध्या इतकेच. :)

लाईक

लाईक. चर्चाप्रस्ताव आणि सर्व प्रतिसाद.
- - -
वैयक्तिक अनुभव :
मी खुद्द रोज मराठी संवादस्थळांवर अधिक वेळ खर्च करतो, आणि फेसबुकवर पुष्कळ कमी. फेसबुकवर आजवर एक-दोनदाच काही "लाईक" केलेले आहे. परंतु तसे करायची इच्छा मला का होत नाही, याचे कारण भलतेच अतार्किक आहे. लाईक केलेल्या वस्तूबाबत काहीही नवीन झाले, तर "नोटिफिकेशन" येते. आणि काही नोटिफिकेशने चालू ठेवावी, काही बंद करावी ते कसे, हे शोधायचा मला आळस आहे.
पूर्वीपेक्षा मराठी संवादस्थळांवर माझा वावर थोडा कमी होतो आहे हेसुद्धा खरे.

- - -
संपर्कस्थळ वि. संवादस्थळ
फेसबुक हे संपर्कस्थळ म्हणून अधिक उपयोगाचे आहे, आणि संवादस्थळ म्हणून कमी. खरे तर हे दोन प्रकार एकमेकांच्या बाजारपेठेत प्रतिस्पर्धी नाहीत. ("उपभोक्त्यांचा रिकामा वेळ" या बाबतीत मात्र बाजारपेठ एकच आहे, हे खरे.)

- - -
युवकांची वानवा
१८-२५ची पिढी मराठी संकेतस्थळांवर कमी प्रमाणात आहे, असे मलादेखील वाटते. महाराष्ट्रात राहाणार्‍यांनी सर्वेक्षण करण्यासारखा विषय आहे. माझ्या पुतणे-भाचरांपैकी बहुतेक लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेलेले आहेत. (हे सर्व युवक-युवती मुंबई-पुणे-नागपुर शहरात आहेत, त्यामुळे सर्वेक्षण म्हणून मर्यादित उपयोगाचे आहे.) मराठीमध्य लेखी अभिव्यक्ती करण्याबाबत त्यांचा फारसा रस नाही.
मला वाटते की मराठी माध्यमात शिकून, साहजिकरीत्या मराठी भाषेत लेखी अभिव्यक्ती करणारे जे युवालोक असतील, त्यांच्यापर्यंत मराठी संवादस्थळे पोचू शकतील काय? हे युवा कुठे सापडतात - महानगरांच्या बाहेर जिल्ह्यांच्या ठिकाणी वगैरे अधिक प्रमाणात आहेत काय?
- - -

गर्भितार्थ(?)

पूर्वीपेक्षा मराठी संवादस्थळांवर माझा वावर थोडा कमी होतो आहे हेसुद्धा खरे.

यात काही गर्भितार्थ दडलेला आहे का असे जाहीर विचारते आहे कारण वाक्य मला महत्त्वाचे* वाटले. तुमची हरकत नसेल तर सांगा अन्यथा आग्रह नाही. :-)

साहजिकरीत्या मराठी भाषेत लेखी अभिव्यक्ती करणारे जे युवालोक असतील, त्यांच्यापर्यंत मराठी संवादस्थळे पोचू शकतील काय? हे युवा कुठे सापडतात - महानगरांच्या बाहेर जिल्ह्यांच्या ठिकाणी वगैरे अधिक प्रमाणात आहेत काय?

असे मी ठामपणे सांगू शकत नाही पण शहरांच्या बाहेर जिथे इंग्रजी माध्यमाची उपलब्धतता कमी आहे तेथे अद्यापही मराठीत शिकणारी नवी पिढी आहे आणि तिलाही व्यक्त होण्याची गरज आहे असे मानायला हरकत नाही. इथे मला पुढे काही मुद्दे मांडायचे आहेत परंतु तसे केल्याने त्यातून गैर अर्थ निघेल की काय अशी भीती वाटते तरीही सर्वांची क्षमा मागून लिहिते की -

शहरी संस्कृती आणि शहराबाहेरील संस्कृती, भाषावापर यांत जर तफावत असेल तर अशी मंडळी एकाच छत्राखाली आनंदाने राहू शकतील का असा विचार मनात येतो.

* महत्त्वाचे अशासाठी की प्रत्येक संकेतस्थळावरून एस्टॅब्लिश झालेले काही सदस्य कालांतराने बाहेर पडतात. ते सर्वच नाराजीने बाहेर पडतात असे म्हणत नाही पण काहीतरी बदलते, फरक पडतो त्यामुळे वावर मंदावतो असा अंदाज आहे.

शिदोरी कमी झाली

:-)
शिदोरी कमी झाली, हेच महत्त्वाचे. काही अभ्यासकरून दर्जेदार लिहावे, म्हटले, तर वर्षाला एक-दोन लेख तितके लिहिता येतात.

मराठी संवादस्थळावर पहिल्यांदा आलो, तेव्हा "आता मराठीत लिहू-वाचू शकतो" म्हणून आदली तुंबलेली संविवादिषा* बाहेर पडली. (*भुकेल्याला खाय-खाय "बुभुक्षा" असते, तशी गप्प बसलेल्याला बोल-बोल "संविवादिषा" असते, असा हा शब्द मी पाडलेला आहे.) पण आता जेवल्यानंतर मंद-मंद डुलक्या घेत पान चघळावे, तशी अधून-मधून चर्चा करतो आहे.

पटण्यासारखे

शिदोरी संपल्याचा अनुभव मलाही आहेच, त्यासोबत नेहमीच्या कामांचे डोंगर आणि मोकळ्या वेळात फेबुवर फार ऍक्टिव नसले तरी उगा इथे तिथे डोकावून पाहणे, आयपॅडवर ऍप्स डाउनलोडवून टाइमपास करणे यात वाचन संपले आहे. बहुधा, इतर अनेकांचेही असेच काहीसे होत असावे. :-)

दुसर्‍या शब्दांत, निखिल जोशींच्या प्रतिसादात तथ्य आहे हे पुन्हा स्पष्ट झाले.

इंग्रजीची स्पर्धा नसावी

नवीन पिढी इंग्रजीत शिकत असल्यामुळे तिला मराठीत अभिव्यक्ती करण्याची आवड, कुवत, मर्यादा, सवड नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. परंतु, त्या पिढीतील कितीजण इंग्रजी फोरमांवर अभिव्यक्ती करतात? रिचर्ड डॉकिन्सच्या फोरमवर काही काळ चर्चा केल्यावर मी तेथे जाणे सोडले आणि उपक्रमवर आलो. आयआयटी बाँबे च्या अंतर्गत, वार्ता हे (बुलेटिनबोर्ड या आधारावर बनलेले) इंग्रजी चर्चासंस्थळ आहे. पाच वर्षांपूर्वी तेही प्रचंड लोकप्रिय होते. हल्ली तीनचारच जुने सदस्य उरले आहेत आणि फारशी हालचालही होत नाही, मारामारी तर नाहीच.
माझा अंदाज असा की सदस्यांच्या आयुष्यभरातील अनुभव, मतांची शिदोरी संपल्यावर, सर्वांना एकमेकांच्या मतभिन्नता समजल्यानंतर, संस्थळ सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला किमान ओघ (क्रिटिकल मास) संपतो, त्यांच्या नव्या मतांचा ओघ अर्थातच अपुरा पडतो. त्यानंतर केवळ नवागतांच्या आधारे संस्थळ टिकणे अवघड असते.

रोचक

प्रतिसाद रोचक आहे.

नवीन पिढी इंग्रजीत शिकत असल्यामुळे तिला मराठीत अभिव्यक्ती करण्याची आवड, कुवत, मर्यादा, सवड नाही असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. परंतु, त्या पिढीतील कितीजण इंग्रजी फोरमांवर अभिव्यक्ती करतात?

तुमचे म्हणणे योग्य आहे म्हणूनच वर असेही म्हटले आहे की व्यक्त होण्यासाठी कमी शब्द आणि कृतींची गरज पडते आहे. (उदाहरणादाखल डेस्कटॉप ते स्मार्टफोन प्रवास) माझ्यामते, माणसाला वैविध्य लागते किंवा बांधून ठेवणारी नाती लागतात. ते जर प्राप्त होत नसेल तर तो पुढले ठिकाण बघतो. का कोण जाणे पण गेल्या काही काळात मराठी संकेतस्थळांवरही केवळ बांधणारी नाती निर्माण झाली आहेत म्हणून लोक ये-जा करतात की काय असे वाटू लागले आहे.

माझा अंदाज असा की सदस्यांच्या आयुष्यभरातील अनुभव, मतांची शिदोरी संपल्यावर, सर्वांना एकमेकांच्या मतभिन्नता समजल्यानंतर, संस्थळ सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेला किमान ओघ (क्रिटिकल मास) संपतो, त्यांच्या नव्या मतांचा ओघ अर्थातच अपुरा पडतो. त्यानंतर केवळ नवागतांच्या आधारे संस्थळ टिकणे अवघड असते.

हा विचार रोचक आहे पण पटणारा वाटला.

स्पष्टच सांगायचे झाले तर या चर्चेला येणारा प्रतिसाद तुमच्या 'गरम रक्त थंड डोके'ला का आला नाही. ती चर्चा देखील उत्तम होती पण नवागत किंवा कुप्रसिद्ध (सॉरी!) लोकांसमोर व्यक्त होण्यापेक्षा ओळखीच्या लोकांसमोर व्यक्त होणे सोपे असते असे तर काही नव्हे?

+

दुसर्‍या परिच्छेदाशी सहमत.

सदस्यांचा वावर कमी होतो हे निरीक्षण या परिच्छेदातून जस्टिफाय होते.

नितिन थत्ते

+१

+१
दुसरा परिच्छेद विषेश पटला. असे होते खरे. अगदी या धाग्यातही लिहायचे बरेच आहे मात्र त्यातील महत्त्वाचे अनेकांनी आधीच लिहून ठेवले आहे. विचार केला तर त्यापेक्षा वेगळे काही लिहिता येणार नाही असेही नाही. मात्र अताशा असा खास विचार वगैरे करून इथे (मराठी संस्थळांवर) लिहायचा उत्साह क्वचितच असतो.

ऋषिकेश
------------------
<<स्वाक्षरी निद्रीस्त आहे>>

प्रतिसाद

प्रस्तुत धागा आणि त्याला आलेले प्रतिसाद वाचनीय आहेत. संस्थळांवर वावरणारे या नात्याने हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे हे खरं.

अनेक चांगले मुद्दे इथे चर्चेत आलेले आहेत. सन्जोपरावांनी केलेलं प्रोडक्ट् लाईफ सायकल् विवेचन विशेष चिंतनीय वाटलं. आणि नवीन शहरी पीढीला मराठी सायटींबद्दल देणंघेणं नाही हा मुद्दाही पटला.

फेसबुकावर काही ग्रुप्स् मला दिसतात ज्यात मराठी भाषेमधे लोक बोलताना दिसतात. उदा. "वाचू आनंदे" असा ग्रुप् आहे. काही संगीतविषयक ग्रुप्स् मधे मराठी भाषेत गाण्यांची माहिती देता घेताना लोक दिसतात. मुद्दा असा की, फेसबुकावरही मराठीमधे चर्चा करण्याकरता वेगळे विभाग बनत आहेत.

फेसबुकाचं मराठी संस्थळांपुढे असलेलं आव्हान मोठं आहे हे नि:संशय.

तरीही...

मी उपक्रमवर अगदी अशात आले, ते या साइटबाबत एका मित्राने सांगितलं व लिंक पाठवली, म्हणून. या व अशा साइट्स माहीतच नसतात, हे एक कारण. अनेक जागी जाऊन पाहिल्यावर कळते की तीच ठरावीक मंडळी पुन्हा सगळीकडे असतात, चर्चांचे विषयही अनेकदा तेच असतात. फेसबुकवर उथळपणा चालतो, तसाच मराठी साइट्सवरही थिल्लरपणा चालतो. उगाच वादासाठी वाद घालणे, असभ्य खोडसाळ प्रश्न विचारणे यात वेळ वाया घालवला जातो. हेच लेखन वृत्तपत्र - मासिकांमध्ये केले तर मानधन मिळते... मराठी साइट्सवर त्यामुळे स्वतंत्रपणे लेखन नेमके का करावे, असे वाटते. खेरीज मोकळेपणी लिहिण्यासाठी स्वतंत्र ब्लॉग्ज असतातच.
फेसबुकमुळे अनेक व्यावहारिक फायदे होतात. एखाद्या वस्तूची ( मग ते पुस्तक का असेना ), उपक्रमांची, कार्यक्रमांची जाहिरात चांगल्या रीतीने होऊ शकते. अनेक क्षेत्रांमधली मंडळी ( ज्यांची एरवी नावे ठाऊक असतात, पण मुद्दाम कुणी ओळख करून घेण्यास जाईलच असे नाही.) परिचित होतात. यांच्या सोबतीतून चांगले वाचणे, ऐकणे, पाहणे अद्ययावत होत राहते. ( आपल्या मित्रयादीत कोण आहेत यावर हे अवलंबून.) माझ्या तीनेक प्रकल्पांसाठी खूप चांगले गट फेसबुकच्या माध्यमातूनच तयार झाले. आणि मी अनेक प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकले. उत्तम छायाचित्रकार, चित्रकार, लेखक, गायक, अभिनेते... अनेक मंडळी. खेरीज वाचकांशी थेट संवाद शक्य झाला व वाचक नसलेले अनेक लोक तेथील नोंदींच्या निमित्ताने पुस्तकांकडे वळू लागले.
संवादासोबतच फेसबुकमुळे संपर्कात राहणे वाढले. आपापल्या वेळेनुसार ते करता येत असल्याने सोपे वाटते. खासगीपणाच्या कल्पना आता बर्‍याच बदलल्या आहेत. त्यामुळे आधीच्या पिढ्यांना खासगी वाटणार्‍या गोष्टी वॉलवर जाहीर शेअर केल्या जाताना दिसतात. माझी मुलगी जसं कधी मला फोन करते, कधी एस.एम.एस., कधी मिसकॉल, तर कधी फेसबुकच्या मेसेजबॉक्समध्ये वा वॉलवरही काही लिहिते. या सगळ्या व्यक्त होण्याच्या, शेअर करण्याच्या तर्‍हा आहेत आणि त्या वेळी जी सुचेल, सोयीची वाटेल ती तर्‍हा वापरली जाते.
तरीही मराठी संकेतस्थळांवर मला डोकवावेसे वाटते, कारण मोजकी का होईना, पण गांभीर्याने काम / विचार / लेखन / वाचन करणारी मंडळी इथे भेटतात आणि अर्थातच इथल्या चर्चा ( तुलनेत ) अधिक सविस्तर असतात.

फेसबुकचे फायदे

फेसबुकवर उथळपणा चालतो, तसाच मराठी साइट्सवरही थिल्लरपणा चालतो. उगाच वादासाठी वाद घालणे, असभ्य खोडसाळ प्रश्न विचारणे यात वेळ वाया घालवला जातो. हेच लेखन वृत्तपत्र - मासिकांमध्ये केले तर मानधन मिळते... मराठी साइट्सवर त्यामुळे स्वतंत्रपणे लेखन नेमके का करावे, असे वाटते. खेरीज मोकळेपणी लिहिण्यासाठी स्वतंत्र ब्लॉग्ज असतातच.

अगदी नेमका मुद्दा, नेमक्या व्यक्तीकडून. मला वाटते वर हेच सांगायचे होते. धन्यवाद!

फेसबुकचे फायदे मान्य आहेतच. किंबहुना, हे फायदे इतर संवादस्थळांपेक्षा खचितच अधिक असल्याने तेथील रहदारी मंदावेल का असाच प्रश्न पडला आहे.

तरीही मराठी संकेतस्थळांवर मला डोकवावेसे वाटते, कारण मोजकी का होईना, पण गांभीर्याने काम / विचार / लेखन / वाचन करणारी मंडळी इथे भेटतात आणि अर्थातच इथल्या चर्चा ( तुलनेत ) अधिक सविस्तर असतात.

हे ही मान्य आहेच. फक्त प्रश्न आहे की मराठी संकेतस्थळाचा हा वापर अजून किती काळ चालेल? कारण हीच मंडळी फेबुवरही आहेतच.

'फेसबुक' ही चुकीची कल्पना..

नावाप्रमाणे फेसबुक मराठी-इंग्लिश दिसायला फेस(मराठी) व असायला बुक(इंग्लिश) आहे, तसे मराठीचे नाही. माझी पहीली चर्चा 'सर्वात मोठ्ठा दानवीर-दुर्योधन' ही चर्चा आजही ताजी वाटते. तसा सगळीकडे नुसता फेस आहे.

माझे मत

वरच्या चर्चेत बहुतेक सर्व मुद्दे आले आहेत असे वाटते. सहमत असलेल्या काही मुद्द्यांचा आधी थोडक्यात उल्लेख करतो.

" संकेतस्थळांवर तोच तोच पणा येतो. अनेकांची मतं कळल्यावर पुन्हा पुन्हा तेच प्रतिसाद द्यायचा कंटाळा येतो." या मताशी सहमत. धनंजय यांच्या तीनही मुद्द्यांशी सहमत.

यांशिवाय माझ्यासाठीचा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि तो म्हणजे संपादन. मराठी संकेतस्थळांच्या आपापल्या प्रकृती आहेत आणि त्यामुळे संपादनाची गरज आहे हे जरी पटत असले तरी संकेतस्थळांवरील संपादन आणि धोरणं माझ्या वावरासाठी मला आवडत नाहीत. गेल्या तीन वर्षांचा अनेक संस्थळांचा माझा अनुभव एकुणात चांगला नाही.

फेसबुक की ट्वीटरवरती उथळांची मांदियाळी आहे असे मत वर व्यक्त झाले आहे. पण कोणाची मांदियाळी बघायची आणि कोणाची नाही याचं मला स्वातंत्र्य आहे. फेसबुक, ट्वीवर वरती खाजगी गोष्टी शेअर करण्याबाबत वरती विरोध दर्शवला गेला आहे. पण खर्‍या आयुष्यातही खाजगी गोष्टी उघडपणे बोलणारे असतातच. ज्याला जे शेअर करायचे आहे तो ते करत असतो. कोणी "डार्लिंग्, लेट्स गो फॉर अ लाँग् ड्राईव्ह" असे फेसबुकावर लिहले तर काय् बिघडले हे मला तरी कळत नाही. याविषयीच्या कविता महाजन यांच्या मताविषयी सहमत आहे.

-Nile

थ्रेट

>>ज्याला जे शेअर करायचे आहे तो ते करत असतो. कोणी "डार्लिंग्, लेट्स गो फॉर अ लाँग् ड्राईव्ह" असे फेसबुकावर लिहले तर काय् बिघडले हे मला तरी कळत नाही.

योग्य मुद्दा आहे. फक्त यासारख्या गोष्टींसाठीच असलेल्या फेसबुकची इतर संवादी संस्थळांना थ्रेट आहे का हा प्रश्न आहे.

नितिन थत्ते

हम्म!

ज्याला जे शेअर करायचे आहे तो ते करत असतो. कोणी "डार्लिंग्, लेट्स गो फॉर अ लाँग् ड्राईव्ह" असे फेसबुकावर लिहले तर काय् बिघडले हे मला तरी कळत नाही. याविषयीच्या कविता महाजन यांच्या मताविषयी सहमत आहे.

बिघडले असे म्हटलेले नाही. फेबु संवादातील उथळपणा दाखवून दिला आहे. बाकी, मनुष्य मांदियाळीतून आपल्याला हवे ते उचलतो हे तुमचे निरीक्षण बरोबर आहे. सिद्ध झालेलेही आहे.

गेल्या तीन वर्षांचा अनेक संस्थळांचा माझा अनुभव एकुणात चांगला नाही.

विधान पटणारे आहे. किंबहुना, काही संकेतस्थळांचाही काही सदस्यांविषयी अनुभव चांगला नसतो हे मी जाणून आहे.

तरीही, ही चर्चा काही मराठी संकेतस्थळांची धोरणे यावर नाही, ती त्या दिशेने वळवू नये ही विनंती.

उत्तम चर्चा

उत्तम चर्चा.

फेसबुकामुळे मराठी संवादस्थळांचाच नव्हे तर बर्‍याच संवाद कट्ट्यांचा(कॉलनीतल्या कट्ट्यापासून ते मराठी नियतकालिकांपर्यंत) र्‍हास होत आहे असे वाटते, मोबाईल द्वारे संवादाची सहजता आणि त्वरीत मिळाणार्‍या प्रतिसादाच्या सोयीमुळे बराच वेळ फेबु/टिवटिव वर जातो असे दिसते, ते नसते तर बर्‍याचा लोकांचा ओढा मराठी/इतर संस्थाळांकडे वाढला असता असे वाटते.

उपक्रमसम संस्थाळांनी मोबाईल अॅप्सची सुविधा दिल्यास अधिक वाचकांपर्यंत पोहचणे शक्य होईल.

निखिल जोशींशी सहमत, पण नवागतांची संख्या जास्त असल्यास त्यांच्यामुळे संस्थळास चालना मिळू शकते पण वैचारीक मुदलाची वानवा ह्या कारणाशिवाय नवखा येथील कर्मठ(भासणारे) वातावरणात घाबरून सहभाग घेत नसावा असे वाटते, येथील ब्राम्हणांनी थोडी इतरांना पण संधी द्यायला हवी.

धनंजयशी देखील सहमत, सगळी व्यासंगी मंडळी खाय-खाय झाल्यावर पान खात बसले असावेत असे वाटते.

इतर संस्थाळांचा (एसी अक्षरे, मिसळपाव) परिणाम देखील आहेच, तिकडच्या खुल्या वातावरणात इकडच्याच बर्‍याच मित्रमंडळींशी गप्पा मारयाला अवडणे सहाजिक आहे, उपक्रमचा वाचकवर्ग संमिश्र आवडीचा असल्याने तो इकडे/तिकडे ओढला गेल्याची शक्यता आहेच, अर्थात सगळीकडेच सगळे सारखेच आहे किंवा कालांतराने होते.

प्रियाली ह्यांनी निखिल जोशींच्या गरम रक्त थंड डोके वर दिलेल्या प्रतिसादाबद्दल - कोणाच्या कुप्रसिद्ध असण्यापेक्षा, लेख आला त्यावेळी संस्थाळावरची वर्दळ कमी होती व त्याचा परिणाम प्रतिसादावर झाला असावा असे वाटते, तसा विषय फारसा गट पाडणारा नव्ह्ता पण चर्चा चांगली होउ शकली असती असे वाटते.

कविता महाजन ह्यांच्या प्रतिसादाबद्दल - केवळ व्यक्त होण्यासाठी, वृत्तपत्रे, नियतकालिके, ब्लॉग्ज् आहेतच, पण अशा फोरम्सवर लेखनापेक्षा चर्चेद्वारे विचारमंथन होणे अधिक महत्वाचे दिसते, फेबु हे संपर्कस्थळ म्हणूनच फक्त वापरले जावे असे आहे, त्याचे फायदे तुम्ही सांगितले आहेतच पण ते फायदे मराठी संस्थळांकडून (प्रत्यक्ष)अपेक्षीत नसावेत असे वाटते, फेबुच्या ढीगातून चांगली गोष्ट शोधण्याचे श्रम नको असणार्‍यांसाठी फेबु नाही, तुम्ही करता तो फेबुचा वापर व नवतरुण पिढी करते तो वापर ह्यात फरक आहे व त्यामुळे इकडचा टक्का घसरतो आहे असे वाटते.

 
^ वर