फेसबुकादी 'सोशल नेटवर्किंग' स्थळांमुळे इतर संवादस्थळांचा र्‍हास होत आहे का?

ही चर्चा केवळ फेसबुकबद्दल नसून फेसबुक सदृश इतर संकेतस्थळांनाही यात गणता यावे तसेच ही चर्चा केवळ मराठी संकेतस्थळांबद्दल नसून इतर कोणतीही संकेतस्थळे जेथे संवाद साधता येतो परंतु संवादाचे स्वरूप लेख आणि प्रतिक्रिया स्वरूपाचे असते त्या सर्व संस्थळांविषयी आहे. अर्थातच, मराठी संकेतस्थळे हा कळीचा मुद्दा यात आहेच. असो.

मध्यंतरी उपक्रमावरील एक-दोन स्नेह्यांशी बोलताना खालील काही मुद्दे निघाले. हे मुद्दे नवीन नाहीत त्यावर या आधीही इतरत्र चर्चा झाली असावी परंतु सद्य परिस्थितीत कोणास काही नवे सुचले, जाणवले का हे नव्याने कळेल.

१. व्यक्त होण्यासाठी कमीतकमी शब्दांची गरज फेसबुकने भागवली आहे. एखादे चित्र टाकले, एकोळी संदेश टाकला तर त्याला येणारे पाच-पंचवीस लाइक्स आणि दहा-बारा प्रतिसाद लक्षात घेता, कष्ट घेऊन एखादा लेख टाकणे आणि मग त्यावर उलट-सुलट किंवा विपर्यस्त प्रतिक्रिया मिळवून खट्टू होण्याची गरज भासत नाही. फेसबुकावर "डिसलाइक" असा पर्यायच नाही हेच फेसबुकाचे खरे यशाचे गणित असावे काय? असा प्रश्न अनेकदा पडतो.

अगदी कालचेच फेसबुकावरचे उदाहरण द्यायचे झाले तर "फिलिंग लेझी!!!" असे कोणा एकीने लिहिले होते आणि त्याला ४-५ लाइक्सही होते. (यात अतिशयोक्ती नाही.)

काहीतरी लिहिल्याचे, खरडल्याचे, डकवल्याचे समाधान फेसबुक देते, तेवढे समाधान इतर संवादस्थळे देऊ शकत नाहीत.

२. हा मुद्दा खास मराठी भाषेवर/ मराठी संकेतस्थळांवर आहे. मराठी संकेतस्थळांवर नवी पिढी नाही, भविष्यात नवी पिढी मराठी संकेतस्थळांकडे वळल्यास ती पिढी ग्रामीण भागातून येणारी असेल. शहरी पिढी ही मराठी शाळेत शिक्षण घेत नसल्याने तिचा सहभाग फारसा नसेल. यावर उपक्रमींना काय वाटते? (हा मुद्दा कोणालाही दुखावण्यासाठी नाही हे कृपया लक्षात घ्यावे. कदाचित हा स्वतंत्र चर्चेचा विषयही ठरू शकेल पण तूर्तास याच धाग्यावर चर्चा व्हावी.) जी पिढी मराठी संकेतस्थळांवर मी पाहिली आहे, तीही आता फेसबुक किंवा तत्सम साइट्सवर अधिक रेंगाळताना दिसते.

एकंदरीतच संवादस्थळांना मरगळ आल्याप्रमाणे भासत आहे. नवे लेखक अभावाने दिसतात. दिसले तरी दर्जा राखणारे आणि सातत्याने लिहिणारे फारच थोडे असतात. तेही तरुण पिढीतील नाहीत. याला कारण एकमेव फेसबुकच आहे असे म्हणायचे नाही पण या मरगळीमागे इतर कोणती कारणे तुम्हाला दिसतात? फेसबुकादी साइट्स संवादासोबत इतर उपक्रमही राबवतात. तिथे अनेकजण खेळांच्या निमित्ताने, कौलांच्या निमित्ताने, प्रश्नोत्तरांच्या निमित्ताने अधिक रेंगाळताना दिसतात.

३. संवादस्थळांवरील मुख्य आकर्षण हे लिखाण नसून लोकांशी बांधलेले राहणे हे आहे असा तिसरा मुद्दा निघाला. येथे पुन्हा मराठी संकेतस्थळांचे उदाहरण घेऊ कारण देण्यालायक तेवढाच डेटा माझ्यापाशी आहे. ज्या संकेतस्थळांवर खरडवह्या किंवा व्यक्तिगत निरोपांची सुविधा आहे तेथे लोक अधिक रमतात. (मायबोलीवर खरडवह्या नाहीत असे वाटते पण मायबोली हे गेली अनेक वर्षे अस्तित्वात असल्याने, तेथे अनेक इतर उपक्रम राबत असल्याने तेथे चित्र वेगळे असणे शक्य आहे, तरीही सध्या ते बदलले असल्यास व्यक्तिशः मला कल्पना नाही.) किंवा

४. फेसबुकावर साइट्सचे पान असणे ही साइट्सची नवी ओळख ठरत आहे. (कृपया लक्षात घ्यावे यात काही गैर आहे असे म्हणायचे नाही. खुद्द उपक्रमाचेही असे पान असावे अशी कल्पना मी मागेच मांडली होती. ही नवी पद्धत रुजू झाली आहे आणि आता सर्वच संकेतस्थळांना, प्रॉडक्ट्सना, फेसबुकचा आधार घ्यावा लागत आहे.) पण याचा त्या संकेतस्थळावर चांगला परिणाम होईल असेच मानले जाते, तसा काही वाईट परिणामही होऊ शकतो असे मानण्यास जागा आहे काय?

ही चर्चा केवळ काही विचार मांडले जावेत म्हणून मांडली आहे. कृपया तिला संकेतस्थळांतील स्पर्धेचा रोख देऊ नये. ही फेसबुकाची जाहिरात नाही किंवा फेसबुक हे या चर्चेतील आरोपी नाही. मध्यंतरी कागदी पुस्तकांचा अंतकाळ जवळ आला आहे का अशी चर्चा मी टाकली होती. त्याप्रमाणेच केवळ हा एक पल्स-चेक आहे किंवा "इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन" किंवा "सुलभ समाधान" ही माणसाची खरी गरज आहे का हे जाणण्याचे कुतूहल.

चर्चा विषय विस्कळीत झाला असल्यास क्षमस्व!

Comments

गर्दी वगैरे म्हणाल तर...

प्रियाली ह्यांनी निखिल जोशींच्या गरम रक्त थंड डोके वर दिलेल्या प्रतिसादाबद्दल - कोणाच्या कुप्रसिद्ध असण्यापेक्षा, लेख आला त्यावेळी संस्थाळावरची वर्दळ कमी होती व त्याचा परिणाम प्रतिसादावर झाला असावा असे वाटते, तसा विषय फारसा गट पाडणारा नव्ह्ता पण चर्चा चांगली होउ शकली असती असे वाटते.

असहमत आहे. संस्थळावर काल गर्दी होती पण इतर लेखांना प्रतिसाद दिसत नाहीत. गर्दी ही अचानक झालेली नाही कारण काल सुट्टी होती किंवा उपक्रमाचा वाढदिवस होता ;-) असे नाही. यावरून लोक येथे वाचत असतात पण आपल्या जिव्हाळ्याच्या विषयांना आणि जिव्हाळ्याच्या लेखकांनाच प्रतिसाद देतात असे दिसते. (किंबहुना म्हणूनच शीर्षकात फेसबुकाचे नाव टाकले आहे.) अन्यथा, चांगला विषय असेल तरीही मुद्दाम कष्ट घेऊन प्रतिसाद देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. (लॉग इन न करताच लाइक म्हणण्याचा पर्याय उपक्रमाने द्यावा ;-)) असे का होते याची कारणे अर्थातच विचार करून लिहिण्यासाठी वेळ, अभ्यास यासोबत दंगामस्ती करणे इतकाच उद्देश असणार्‍यांची उदासीनता इथपर्यंत देता येतील.

फेबुच्या ढीगातून चांगली गोष्ट शोधण्याचे श्रम नको असणार्‍यांसाठी फेबु नाही, तुम्ही करता तो फेबुचा वापर व नवतरुण पिढी करते तो वापर ह्यात फरक आहे व त्यामुळे इकडचा टक्का घसरतो आहे असे वाटते.

नेमक्या विचाराबद्दल धन्यवाद. :-)

वास्तवदर्शी निरीक्षणे

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
मराठी संस्थळांविषयी प्रियाली यांनी नोंदविलेली निरीक्षणे वास्तवदर्शी आहेत.फेसबुकाची फारशी माहिती नाही. तिथे गेल्यावर कुठे काय वाचायचे तेच कळत नाही(मला).कुठे काही वाचनीय असेल पण ते शोधता येत नाही.असो.
..

"मराठी संकेतस्थळांवर नवी पिढी नाही, भविष्यात नवी पिढी मराठी संकेतस्थळांकडे वळल्यास ती पिढी ग्रामीण भागातून येणारी असेल. शहरी पिढी ही मराठी शाळेत शिक्षण घेत नसल्याने तिचा सहभाग फारसा नसेल."

.
असे प्रियाली म्हणतात ते पटण्यासारखे आहे.
..अनेक वाचकांना उपक्रमसारखी मराठी संस्थळे आहेत याची माहितीच नसावी. तसेच स्वत:चा संगणक असला तरी बहुसंख्य मराठी माणसे संगणावर देवनागरी मराठी कसे लिहावे हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत नाहीत असे वाटते.

अतिशय जिव्हाळ्याचा विषय

भविष्यात नवी पिढी मराठी संकेतस्थळांकडे वळल्यास ती पिढी ग्रामीण भागातून येणारी असेल.

या बाबतीतील माझा अनुभव या वाक्याशी बराचसा जुळणारा वाटतो आहे. मी इंग्रजी व मराठी या दोन्ही मधून ब्लॉगिंग करत होतो. अलीकडे असे जाणवू लागले की माझ्या परिचितांपैकी जे तरूण वर्ग या सदराखाली मोडतात त्यांना माझे मराठी ब्लॉग वाचण्यात स्वारस्य नाही व बहुदा त्यांना ते समजतही नसावेत. मराठी वाचन प्रेमी आहेत ते ज्येष्ठ नागरिक आणि मुख्यत्वे ग्रामीण वाचक. समाजाच्या वरच्या वर्गातील मंडळींना बहुदा मराठी कळतच नाही किंवा ते वाचण्यात रस नसावा. खालच्या वर्गातील उदंड वाचक वर्ग ब्लॉगला मिळताना दिसतो. या सगळ्या वाचकवर्गाला विचारप्रवर्तक लेखन फारसे रुचत नाही असे वाटते. तो व ती यापुढे फारसे जावे असे त्यांना वाटत नसावे.
मराठी लेखनावर आलेली दुसरी मर्यादा ऍन्ड्रॉइड फोन्स मुळे आली आहे. यावर मराठी फॉन्ट्स नीटसे दिसत नाहीत. अनेक मंडळी अलीकडे ब्लॉग्स फोन्सवरच वाचताना दिसतात.
इंग्रजी ब्लॉग्सना जगभरातून वाचक मिळतात त्यामुळे अगदी घरगुती विषयांवरील लेखन तितकेसे वाचले जात नाही. त्यामुळे बर्‍याच वेळा विषयांवर मर्यादा येतात. मात्र विचार प्रवर्तक लेखांना उत्तम दाद मिळते
त्यामुळे अनेक वेळा कोणत्या भाषेत लिहावे हे मला सध्या पुष्कळ वेळा समजतच नाही. परिणामी मराठी लेखन आपोआपच कमी होत चालले आहे. खेद होत असला तरी ही सत्य परिस्थिती आहे.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

सहमत आहे.

मराठी वाचन प्रेमी आहेत ते ज्येष्ठ नागरिक आणि मुख्यत्वे ग्रामीण वाचक. समाजाच्या वरच्या वर्गातील मंडळींना बहुदा मराठी कळतच नाही किंवा ते वाचण्यात रस नसावा. खालच्या वर्गातील उदंड वाचक वर्ग ब्लॉगला मिळताना दिसतो. या सगळ्या वाचकवर्गाला विचारप्रवर्तक लेखन फारसे रुचत नाही असे वाटते. तो व ती यापुढे फारसे जावे असे त्यांना वाटत नसावे.

सहमत आहे. दोन्ही वर्गांची सांस्कृतिक जडणघडण ही धर्म, लैंगिकता, श्रद्धा-अंधश्रद्धा, राजकारण, समाजकारण या विषयांत मिळती जुळती नाही.

अनेक वेळा कोणत्या भाषेत लिहावे हे मला सध्या पुष्कळ वेळा समजतच नाही. परिणामी मराठी लेखन आपोआपच कमी होत चालले आहे. खेद होत असला तरी ही सत्य परिस्थिती आहे.

+१

मला वाटत नाही

फेसबुकावर सगळे भेटतातच म्हणून मराठी संकेतस्थळांवर न लिहीणार्‍यांचे प्रमाण कमी असावे.

माझ्या मते लोकांना स्वतःसारखे वाचन लेखनाची आणि त्याहूनही अधिक म्हणजे वादांची आवड असलेले मित्र-मैत्रिणी आजूबाजूला सापडत असतातच असे नाही. त्यामुळे जेथे अशी हालचाल दिसते, तेथे लोक जातात. ती कधी फेसबुकावर असते, कधी मसंवर असते एवढेच.

पुढील पिढीपर्यंत मसं वाचणारे लोक कमी होणार आहेत हे मात्र वाटते आहे. माझ्याच काही मैत्रिणींपैकी अनेकजणींना वाचन आवडत नाही असे नाही, पण त्या आपण होऊन मराठी संकेतस्थळाकडे येत नाहीत. आल्या तरी टिकत नाहीत.

अशी काही बाही हालचाल टिकण्यासाठी काही तरी सणावारांप्रमाणे प्रॉजेक्ट करावे लागतात असेही वाटते.

मरगळ

माझ्या मते काही काळासाठी सगळ्या जुन्या खेळाडूंनी निवृत्ती घ्यावी. तेच गुर्जी की फुर्जी आणि त्यांच्या त्याच छापातल्या प्रतिक्रिया हे मरगळीचे कारण आहे.

"काय" लिहिले आहे यापेक्षा ते "कुणी" लिहिले आहे हे महत्वाचे?

बर्‍याचदा "काय" लिहिले आहे यापेक्षा ते "कुणी" लिहिले आहे यावर आधारून प्रतिक्रिया येतात. त्यामुळेही अनेक संस्थळे कंटाळवाणी होऊ शकतात हे माझ्या अल्पानुभवावरून झालेले मत आहे.
----------------
सुधीर काळे

वाचायचे की नाही

प्रतिसादच काय, "काय" लिहिले आहे यापेक्षा ते "कुणी" लिहिले आहे हे पाहून ते वाचायचे की नाही हे ही ठरवता येते कारण त्यात काय असणार याचा अंदाज असतोच. :)

-निनाद

या शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द द्यावेत

माफ करा! संकेतस्थळ, संवाद स्थळ, संस्थळ आणि सोशल नेटवर्किंगस्थळ यांच्यातील नेमका फरक न कळल्यामुळे प्रचंड घोळ उडाला आहे! या शब्दांचे इंग्रजी प्रतिशब्द द्यावेत ही विनंती. तरच लेख मला कळेल असे वाटते.
----------------
सुधीर काळे

इंग्रजी प्रतिशब्द

संकेतस्थळ = वेबसाइट
संस्थळ = साइट (संकेतस्थळ = संस्थळ [सुटसुटीत शब्द])

संवादस्थळ = इंटरॅक्टिव वेबसाइट - जेथे लेखक, प्रतिसादक यांचा संवाद, गप्पा-टप्पा, कंपू/ समुदाय यांच्यात बातचीत होते.

बर्‍याचदा "काय" लिहिले आहे यापेक्षा ते "कुणी" लिहिले आहे यावर आधारून प्रतिक्रिया येतात. त्यामुळेही अनेक संस्थळे कंटाळवाणी होऊ शकतात हे माझ्या अल्पानुभवावरून झालेले मत आहे.

काय लिहिले आहेपेक्षा कुणी लिहिले आहे याला अधिक महत्त्व देणे हे फार पूर्वीपासून चालत आलेले आहे. ते संकेतस्थळांचे वैशिष्ट्य नाही पण तुम्हाला त्याची जाणीव संकेतस्थळांवर नव्याने होणे शक्य आहे.

अजून काही मुद्दे

१. फेसबुकवर फ्रेंड्स निवडता येतात.
२. तापदायक वाटणारे / ठरलेले, अश्लील मेसेजेस पाठवणारे इ. लोक अनफ्रेंड करता येतात.
३. अतिच झाले असेल तर कुणाला 'ब्लॉक' देखील करता येते.
४. आपल्या स्टेटसवर कुणी चुकीच्या मतांचा प्रचार करत असेल ( उदा. मी एकदा विनायक सेन यांच्याविषयी लिहिलं होतं, तेव्हा काही हिंदुत्ववादी लोकांनी 'साध्वी ऋतंभरा' आणि सनातन संघटना यांच्याविषयीही मी असेच बोलावे, लिहावे याचा आग्रह धरला होता आणि काहींनी मी माओवादी असून त्यांना मदत करत असलाचे आरोप मी खुलासा करूनही वारंवार केले होते.) तेव्हा ती मते आपण आपल्या वॉलवरून 'काढून फेकू शकतो'.
५. अनेक लोकांमध्ये चर्चा होते व तिला गती असते. तात्कालिक महत्त्वाच्या विषयांसाठी ही गती गरजेची असते. उदा. ही आजची लिंक पहा : http://www.facebook.com/kavita.mahajan.5
यात मी असे मांडले होते : लिंगभेद मानणार्‍या पुरुष न्यायाधिशांना व पोलीस अधिकार्‍यांना प्रशिक्षणाची गरज आहे असे वाटते आहे. नवरा जिथे जाईल तिथे त्याच्यामागे बायकोने सीतेसारखे गेले पाहिजे, असे विधान काल एका न्यायाधिशाने केले. मध्यंतरी न्यायाधीशांचे एक सर्वेक्षण झाले होते, त्यात "बायकोला अधूनमधून एखादी थोबाडीत मारायला हरकत नाही" असे बहुतांश न्यायाधिशांचे मत होते.
दिल्लीत एका नववधूला मारहाण करत रस्त्यावर आणून ट्रकखाली ढकलण्याची घटना घडली. तोवर तिच्या माहेरचे लोक बातमी कळून तिथे पोचल्याने ती बचावली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तातडीने रक्त द्यावे लागले. ते दुर्मिळ गटाचे होते. ते आमच्या एका कार्यकर्त्या मित्राने दिले. मग पोलीस पोचले. तेव्हा तो पोलीस अधिकारी तिला म्हणाला की,"नवर्‍याविरुद्ध तक्रार करायला तू कोण मोठी पतिव्रता लागून गेली आहेस?" जिच्याविषयी काहीच माहिती नाही तिच्या चारित्र्यावर हा अधिकारी का संशय घेतोय म्हणून जाब विचारला, तर तो म्हणाला,"परपुरुषाचं रक्त घेतलंस ना आत्ताच... मग हा 'व्यभिचार'च झाला!"
या महापुरुषांचा सत्कार आपण कसा करावा? काही कल्पना सुचताहेत का?
---- यावर आज तिथे वकील, डॉक्टर, विद्यार्थी इत्यादींसह अनेक क्षेत्रांमधील लोक उत्तम चर्चा गांभीर्याने करत आहेत.
मराठी साइट्सवर ही गती नसते.
६. ट्विटर वर केवळ अपडेट देता येतात, मिळतात आणि शब्दमर्यादा आहे. मराठी लिहिले तर रोमन प्रमाणे मोजले जाऊन खूपच कमी शब्द लिहिता येतात. चर्चा होतच नाहीत. मेसेज दिले-घेतले जातात. ते 'इतरां'ना समजत नाहीत. त्यामुळे फेसबुक अधिक खुले आहे.
७. फेसबुक स्टेटस हा तर मला लेखनाचा एक 'नवा रूपबंध' (फॉर्म) वाटतो. कविता, लेख, कथा इ. नसलेले काही निव्वळ 'नोंद' म्हणून सुचत असते, ते तिथे लिहिता येते.

आपापले ब्लॉग

This comment has been moved here.

योग्यच!

This comment has been moved here.

 
^ वर