आमची दिल्ली-चंदिगडला हद्दपारी

देवाचिये दादुलेपनाचा उबारा|
न साहावेचि साताहि सागरा||
भेणें वोसरूनि राजभरा |
दिधली द्वारावती ||
(अर्थः- देवाधिदेव भगवान श्रीकृष्ण ह्यांच्या तेजाने सातही सागर हैराण झाले व त्यांनी आपल्यातला काही भाग काढून कृष्णांस द्वारकानगरी दिली.) असे आद्य कवी नरिंद्र ह्यांना कृष्णाची स्तुती करताना म्हटलय.
बहुतेक आमचेही तेज आमच्या खड्डुस बॉस व सहकार्‍यांना सहन होत नसावे.मला उत्तर भारतात तडीपारीसाठी(डेप्युटेशनवर) पाठवायची म्हणूनच ह्यांनी व्यवस्था केली आहे.

मी नको नको म्हणत असतानाही बॉसनी शेवटी दिल्ली-चंदीगढचा प्रोजेक्ट(मोहिम) दिलाच. माझ्या अतुलनीय कौशल्यावर प्रसन्न होउन कंपनी मला थेट तिकडे पाठवते आहे. "दिल्ली अब दूर नही" अशी स्थिती खरोखर आली आहे.
ह्यापूर्वी पुण्याच्या पब्लिकपैकी उत्तर भारताच्या राजधानीच्या ठिकाणी आदरणीय श्री शिवाजीराव शाहाजीराव भोसले ह्यांचे व त्यानंतर दक्षिणेत कैक लढाया जिंकलेले सदाशिव(राव/भाउ) चिमाजी भट ह्यांचे जाणे झाले होते म्हणे.
पैकी पहिल्यास तिथले वातावरण अजिबात आवडले नाही, व त्या उर्मट लोकांना सुशासन काय असते हे दाखवण्यासाठी त्यांनी परत येउन इथे स्वतःचे स्वतंत्र राज्य उभारले.तर दुसरा असा काही गेला की परतलाच नाही.
ह्या सर्व प्रकारामुळे एकूणच मराठी मनांत स्वतःहून सतत दिल्लीला जाउन रहावे असे कधीच वाटले नाही.

ह्यापुढील सहाएक आठवडे माझे वास्तव्य दिल्लीला असेल्.त्यापुढील वीसेक आठवडे मी चंदीगडला असेन्.मला आता तुम्ही जालिय मित्र, हितचिंतक ह्यांची मदत लागणार आहे. फुकटात सल्ले हवे आहेत.
शंका :-
१.राहण्याची व्यवस्था कंपनीनं केलीए गुडगावला. आता गुडगावला राहायचं म्हणजे तिथलं एकूणच वातावरण्/संस्कृती कशी आहे, ह्याबद्दल सल्ला हवाय(बहुतेकांनी सल्ला दिलाय की तिथे उगी कुणाशी डोके लावत बसू नकोस म्हणून. कधीही घोडा/चाकू/कृपाण वगैरेचे दर्शन होउ शकते म्हणे.)

२.संपूर्ण NCR(दिल्ली+नवी दिल्ली+नोयडा+गुरगाव) मधली आवर्जून जावीत अशी खादाडीची ठिकाणं कुठली?

३.दिल्लीत पाहण्यासारखे काय आहे?

४.तिथली अनवट ठिकाणं कुठली?(जसं पुणे म्हटल्यावर शनिवारवाडा,शिंदे छत्री सारेच सांगतात, पण भुलेश्वर्,बनेश्वर ही ठिकाणंही आवर्जून जावीत अशी आहेत,पण कमी लोकांस ठाउक आहेत.)

५.पूर्वी अप्पूघर होते, अजूनही सुरु आहे काय? नसेल तर अजून कुठले adventure sports आहेत काय?(कोकणात/सह्याद्रीत बर्‍याच ठिकाणी बंजी जम्पिंग्,पॅराग्लायडिंग वगैरे सुरु आहे तसे काही)

६.सध्या कोण कोण इथले जालवासी तिथे आहेत? ह्यापूर्वी कुणाचं वास्तव्य होतं काय?

७.दिल्लीत राहिल्यावर दोनेक दिवसाची वीकांतास सुट्टी काढली तर आसपास जाण्यासारखं काय काय आहे? जसं पुण्यात दोन्-तीन दिवसांची सुट्टी काढली की जाण्यासारखं म्हणजे गोवा. तसच काहिसं.

८.देहरादून्/मसूरी,चार धामांपैकी काही धाम ह्यापैकी कुठेही दिल्लीहून जाणे सोपे आहे की चंदीगडहून?

९.अ‍ॅग्रो टुरिझम असे काही पंजाब्-हरयाणा-दिल्ली पट्ट्यात आहे का? कोणते ठिकाण आहे?
खास त्या भूभागात म्हणवली जाणारी सुपीक जमीन, भल्ल्या मोठ्ठ्या नद्या,भरपूर दहि-दूध -लोणी-तूप्,फळे-भाजीपाला ह्यांचा अनुभव घ्यायचा असेल तर कुठे जावे? म्हणजे एखाद्या ठिकाणी खास शेतात दोन्-चार दिवस रहायचे सोय आहे का?

१०.मोबाइलचे काय करु? सध्या माझ्याकडे एअरटेल पोस्टपेड आहे. तिथे नवीन कार्ड घ्यावे काय? कोणते घ्यावे? आहे त्या एअरटेलचे काय करावे? एखादी भारी स्किम ठाउक आहे का?

११.दोनेक दिवसात मी निघेन.पण २६एप्रिलला नागपूरला मित्राच्या लग्नासाठी जाय्चे आहे. त्यासाठी दिल्ली-नागपूर व नागपूर्-दिल्ली असे विमान तिकिट काढावे म्हणतोय.
कुठले तिकिट काढणे इष्ट होइल? जिथे तिकिट काढल्याने रोख डिस्काउंट किंवा इतर एखादे कूपन मिळते अशी एखादी वेबसाइट आहे काय ?(प्रीपेड मोबाइल आम्ही एका वेबसाइटद्वारे चार्ज केला तर चार्ज जितक्याचा केला, तितक्याचे आम्हाला मॅक डी चे कूपन्स मिळतात. तसे काही आहे का?)

१२. तिकडे चाललोच आहे तर एवढ्या दूर जाणे होतच आहे तर अजून काय काय करणे शक्य आहे? (तुम्ही अयदी द्या, सगळ्या गोष्टी नाही करता येणार ह्याची कल्पना आहे. पण दिलेल्या यादीपैकी सर्वात आवडलेल्या/सोयीस्कर गोष्टी तरी केल्या जातीलच. तेव्हा यादी लांबलचक होइल, ह्याची चिंता नको.

१३. मुळात जाणे टाळायचे असेल तर बॉसवर भानामती वगैरे करून त्याच्याकडून इथलीच असाइनमेंट घेण्यासाठी एखादा खात्रीशीर मांत्रिक वगैरे आहे काय? उपाय न झाल्यास तो पैसे परत देइल काय?

१४.खन्ना,बात्रा,लोधी.सोधी,पहवा,सिंघानिया,चोप्रा,कपूर्,बन्सल,कक्कड, तन्नेजा,रहेजा,चौहान,वासन ही नावे व दिल्ली-पंजाब्-हरयाणा ह्यांचे कल्चर (संस्कृतिक वातावरण) म्हणजे सध्या बॉलीवूड मध्ये दाखवले जाणवले धत्तड्-तत्तड,पोषाखी ,भरजरी कल्चरच ना?

--मनोबा

लेखनविषय: दुवे:

Comments

अभिनंदन!

आयुश्यात काही गोश्टी आपल्या इच्छेविरुद्ध होणं हे देखील चांगलच असतं.

माझी बदली पिथमपूर, मध्यप्रदेश येथे झाली होती, तेंव्हा देखील तिथं जाणं जीवावर आलं होतं. पण मला इथे राहायचच नाही, मी इथून लवकर निघून परत मुंबईला जाईन असाच विचार मनात पक्का केला होता त्यामुळे तिकडच्या कालावधी मजेत जगलो नाही. उलट सहकर्मचार्‍यांशी फटकून दूर राहिलो. पण हे असं सगळ्यांचच होतं असं अनुभवाने कळते आहे.

दिल्ली- गुरगावला कंपनीच्या ट्रेनिगपर्वानिमित्त जाणं झालं होतं. मी दिल्लीत खूप वर्शापूर्वी गेलो होतो. आता गुरगावमध्येच मुक्काम ठरवला जातो. पूर्वीपेक्शा दिल्लीत आत्ता म्हणे खूप सुधारणा झाली आहे. गुरगांव रेल्वेस्टेशनकडचा परीसर व गुरगाव शहर परिसर यांमध्ये जमिन-आस्मानाचा फरक आहे. गुरगावात तुमची राहण्याची सोय कुठे केली गेली आहे? शहर भागात प्लॉटवरील रॉहाउसेस हि पद्धतच जास्त पाहण्यात आली होती. शहराचं नियोजन अगदी ढिसाळ आहे.रस्त्याच्या कडेला पावसाचं पाणी जाण्यासाठी नाले देखील नाहीत. वीजेसाठी जनरेटर लागतोच.

दिल्लीत खाण्यासाठी दह्यासोबत गरमगरम् पराठे मस्त लागतात. त्यानं पोट देखील भरतं.
गुरगावात नेपाळी लोकं रस्त्यावर मोदकासारखा दिसणारा पदार्थ (मोमो असं काहिसं नांव होतं) खाल्ला होता, तेंव्हा पोट बिघडलं होतं.

दिल्लीत लोटस टेंपल, कुतुबमिनार (पूर्वीच कुठलंस हिंदू देऊळ पाडून तेथे इस्लामी बांधकाम केलेलं आहे.), इंडियागेट व आजूबाजूचा परिसर भेट देण्यासारखा आहे.

गुरगावात मराठी लोकं राहतात. (कदाचित बदली झालेली मंडळीच असावीत.)

एअरटेल मोबाईल तिथं व्यवस्थित चालतो. माझा ही एअरटेलच आहे.

पुन्हा बदली कशी होईल? ह्या प्रश्नाचं उत्तर माहित नाही. माझी मध्यप्रदेशहून पुन्हा बदली होत नव्हती तेंव्हा माझं माझ्या तेथील बॉसशी भांडण झालं होतं त्याचा परिणाम माझ्यावर खोटा आरोप लागला जावून 'सस्पेंड' व्हावं लागलं होतं. सस्पेंशन मधून बाहेर आल्यानंतर पुन्हा मुंबईला येता आलं. तो काळ खूप कठिण होता. त्या वळणावर हे शिकलो की, काहीतरी शिकणं गरजेचे असेल, तर मग ते आनंदानं का शिकू नये? स्वत:ला त्रास करून का शिकावे?

आत्ताच पोचलोय....

एअरटेल बरय इथे. हा प्रतिसादही एअरटेलच्या नेटवर्कमधूनच देतोय.
डी६/७ इथे उतणं झालय. रो हाउस सारखाच प्रकार आहे.(सर्विस्ड् अपार्टमेंट्स्)
इथल्या भाषेची मोठी मौज वाटते आहे. आपल्याला हिंदी येतं/समजतं हा मझा समज पार चुकिचा ठरलाय.
--मनोबा

 
^ वर