अभिनेत्रीचं आत्मचरित्र
जर... एक अभिनेत्री आत्मचरित्र लिहिते आहे, तर तुम्हांला तिच्या आत्मचरित्रात काय ( आणि काय-काय) वाचायला आवडेल?
उदा. नाटककार चं.प्र. देशपांडे यांनी सुचवलेय की : मुख्यतः तिच्या आयुष्यात आलेली आव्हाने ( म्हणजे तिला जी आव्हाने वाटली ती ) आणि त्यांना तोंड देण्याच्या बाबतीत तिची मानसिक आणि आकलनाची काय प्रक्रिया घडली आणि निर्णय कसे घेतले गेले आणि आता त्या एकूण प्रक्रियेबद्दल वेगळेच काही वाटते का -- यात मला इंटरेस्ट वाटेल. ती अभिनेत्री कोण वगैरे माहीत नसताना आणखी म्हणजे -- संबंधप्रकार -- ते हँडल करण्याची तिची पद्धत -- हेही इंटरेस्टिंग वाटेल. इतरांपेक्षा तिला ताण जास्त असणार असे मला अंदाजाने वाटते. त्याबद्दलही यावे. अंदाजे अपेक्षा सांगण्याला मर्यादा आहेत. ज्या वेळी ती कोण आहे हे विश्वासाने सांगणे शक्य होईल तेव्हा आणखी बोलू. अभिनयाबद्दल तिच्या कल्पना काय ..... जाऊ दे -- ती काय बोलू शकणारी आहे ते कळायला हवे --
Comments
प्रांजळपणा हवा
कांही आत्मचरित्रात आत्म जास्त आणि चरित्र थोडे असा प्रकार जास्त आढळतो.
तो टाळून आपल्या आयुष्यात घडलेल्या वळण देणार्या घटना (ज्यात ती स्वतः सहभागी नसूही शकेल),
त्यापासून मिळालेला धडा, आयुष्यात आलेल्या जवळच्या/दूरच्या व्यक्ती आणि त्यामुळे आपल्या व्यक्तीमत्त्वात झालेले (योग्य/अयोग्य) बदल
हे प्रांजळपणे मांडावेत.
लेखिकेने तिच्या स्त्रीत्वाचा (या इंडस्ट्रीत) काही फायदा करून घेतला का?/ किंवा त्याचा काही तोटा झाला का?
ती स्त्री नसती तर (म्हणजे पुरुष असती तर) तिला जे यश/अपयश मिळाले त्यावर काही परिणाम झाला असता का?
हेही अभिनिवेश टाळून सांगावे.
तसेच आत्मचरित्र हे रटाळ असू नये, स्वतःवर झालेले अन्याय/अत्याचार (मी मुळात किती चांगला/ली आहे पण समाजामुळे मला काही अयोग्य करणे कसे भाग पडले) यांचे गार्हाणे गात बसू नये. या बरोबरच जर काही सनसनाटी लिहायचे असेल तर शक्यतो इतरांची टोपणनावे वापरावीत.
(अर्थातच हे लेखिकेच्या बुद्धीमत्तेच्या/समजेच्या कुवतीवर अवलंबून आहे. अन्यथा हे तिने इतर कुणाकडून तरी व्यवस्थित लिहवून घ्यावे.)
थोडक्यात सांगायचे तर त्या अभिनेत्रीला जराही न ओळखणार्या कुणीही ते आत्मचरित्र वाचले/ त्याचे इतर भाषेत केलेले भाषांतर वाचले तरीही ती एक उत्तम कादंबरी वाटावी.(डॉ. झिवागोसारखी.)
असं सांगता येणार नाही
मला तरी.
तिने तिला जे योग्य वाटेल ते सांगावं. आवडलं की नाही हे आम्ही (वाचक) नंतर ठरवू.
आत्मचरित्र कस्टमाईज करण्यात काय मजा !
+१
+१
--मनोबा
माफक अपेक्षा
आत्मकथन प्रांजळ हवे, स्वत:च लिहिलेले हवे इतकी(च) माफक अपेक्षा
ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये
अपेक्षा
ज्या कारणांनी लोक फिल्मी मॅगझिन्स हाती धरतात त्या कारणानेच बहुतांश लोक अभिनेत्रीचे आत्मचरित्र हाती धरतील. त्यातून सनसनाटी कथानक, गॉसिप्स इ. वाचायलाच लोकांना आवडते असा काही आत्मचरित्रांवरून म्हणता येईल. बहुतेक नट-नट्यांची आत्मचरित्रे झरझर डोळ्याखालून घातली आणि कंटाळा घालवला इतक्याच लायकीची वाटलेली आहेत. ती संग्रही ठेवावी किंवा त्यांची पारायणे करावी अशी नसतात.
तेव्हा, सदर अभिनेत्रीला आत्मचरित्र लिहिण्यापूर्वी त्या पाठचा उद्देश काय हे ठरवता यायला हवा. बुरखे फाडणे, सनसनाटी निर्माण करणे की आपली यशस्वी/ अयशस्वी वाटचाल, सदर क्षेत्रातील फायदे-तोटे, आव्हाने, त्यांना तिने दिलेले तोंड हे उद्देश आहेत हे नेमके करावे. वर नानांनी लिहिल्याप्रमाणे हे करताना एखाद्या उत्तम लेखक/ लेखिकेची मदत घ्यावी, जी या आत्मचरित्राला योग्य शब्दरूप देऊ शकेल.
सापेक्ष
बहूदा "अभिनेत्री कोण आहे?" ह्यावर उत्तर अवलंबून असावं फरीदा जलालचं आत्मचरित्र वाचवं असं किती जणांना वाटेल? सिल्क स्मिता असेल तर किती जणांना वाटेल हे आपण थोड्या दिवसापुर्वीच पाहिलं. *
तुमच्या प्रश्नाला निरपेक्ष उत्तर मिळेल असं वाटत नाही.
*सिल्क स्मिता/फरीदा जलाल उत्तम अभिनेत्र्या आहेत असं बर्याच जणांच म्हणण आहे.
ज्येष्ठ की नवी?
ज्येष्ठ असली तर वेगळ्या गोष्टी वाचायला आवडतील. तिचे अनुभवविश्व मोठे असणार.
नव्या अभिनेत्रीकडे मात्र अनुभवाचा कोष मर्यादित असेल. त्या मर्यादित अनुभवविश्वाला विलक्षण जाणिवेने दाखवणे, ही अपेक्षा असेल.
(सध्या मार्क ट्वेनचे आत्मचरित्र वाचतो आहे (अभिवाचनाची ध्वनिफीत ऐकतो आहे.) त्याच्या सूचनेप्रमाणे त्याच्या मृत्यूनंतर १०० वर्षांनी, २०१० साली, त्याचे प्रकाशन सुरू झाले. त्याचे म्हणणे आहे, की जोवर आपल्या म्हणण्याचा व्यक्तिगत परिणाम होऊ शकणारे लोक जिवंत असतील, तोवर लेखक प्रांजळपणे लिहूच शकत नाही. शिवाय काही केले तरी लेखक स्वतःकडे तटस्थ दृष्टीने बघू शकत नाही. या दुसर्या त्रुटीबाबत मात्र त्याला फारसे वाईट वाटत नाही. कारण असे, की लेखक किती का काही लपवू पाहातो, त्या लपवण्याच्या कृतीतून वाचकाला त्याचा स्वभाव कळून येतो.)
पांढरा ठसा महत्त्वाचा आहे
(सध्या मार्क ट्वेनचे आत्मचरित्र वाचतो आहे (अभिवाचनाची ध्वनिफीत ऐकतो आहे.) त्याच्या सूचनेप्रमाणे त्याच्या मृत्यूनंतर १०० वर्षांनी, २०१० साली, त्याचे प्रकाशन सुरू झाले. त्याचे म्हणणे आहे, की जोवर आपल्या म्हणण्याचा व्यक्तिगत परिणाम होऊ शकणारे लोक जिवंत असतील, तोवर लेखक प्रांजळपणे लिहूच शकत नाही. शिवाय काही केले तरी लेखक स्वतःकडे तटस्थ दृष्टीने बघू शकत नाही. या दुसर्या त्रुटीबाबत मात्र त्याला फारसे वाईट वाटत नाही. कारण असे, की लेखक किती का काही लपवू पाहातो, त्या लपवण्याच्या कृतीतून वाचकाला त्याचा स्वभाव कळून येतो.) -धनंजय
हे मार्क ट्वेनचे म्हणणे आहे म्हणून नव्हे तर स्वयंभूपणे हा विचार मान्यच आहे.
म्हणूनच म्हटले होते-
"थोडक्यात सांगायचे तर त्या अभिनेत्रीला जराही न ओळखणार्या कुणीही ते आत्मचरित्र वाचले/ त्याचे इतर भाषेत केलेले भाषांतर वाचले तरीही ती एक उत्तम कादंबरी वाटावी.(डॉ. झिवागोसारखी.)"
मार्क ट्वेनने लिहीलेले आत्मचरित्र त्याच्या मृत्यूनंतर १०० वर्षांनी प्रसिद्ध झाले. ते ऐकत असता ते प्रांजळ आहे आणि १०० वर्षानंतरही त्यातील व्यक्तिगत उल्लेखांच्या संदर्भांविना आकर्षक आहे असे वाटते का? तसे असेल तर ते आत्मचरित्र म्हणून आदर्श आहे.
आत्मचरित्रांसाठी नवा साचा
मार्क ट्वेनला या कृतीमधून आत्मचरित्रांसाठी एक नवा साचा तयार करायचा होता. आत्मचरित्र जीवनातील तारखांच्या क्रमानुसार नाही, तर लेखनकाळातील रोजनिशीसारखे लिहिलेले आहे.
रोजच्या कुठल्याशा घटनेचे (किंवा कालच्या शेवटच्या धाग्याचे) निमित्त घेऊन प्रत्येक प्रकरणाची सुरुवात होते. मग त्या अनुषंगाने आपल्या आदल्या आयुष्यातल्या घटना सांगायच्या. त्यातल्या त्यात त्याचा प्रयत्न आहे, की सुरुवातीच्या प्रकरणांत बाळपणातल्या आठवणींची वर्णने अधिक यावीत, आणि नंतरच्या प्रकरणात पुढली-पुढली. परंतु बाळपणातल्या एखाद्या घटनेतून तरुणपणातील कुठल्या आठवणीचा धागा लागत असेल, म्हातारपणच्या घटनेचा धागा लागत असेल, तर बेलाशक त्या घटना द्यायच्या. मात्र पात्रे त्या घटनेतही नि:संदर्भ नाहीत, ही उत्तम काळजी ट्वेन घेतो.
एखाद्या प्रकरणात ट्वेन त्याच्या ओळखीच्या (आप्त किंवा त्या दिवशी डोक्याला ताप दिलेल्या!) व्यक्तीचे चित्रण देतो. अशा वेळी स्वतःच्या जीवनाच्या वेगवेगळ्या काळांत त्या व्यक्तीशी झालेले व्यवहार सांगतो. हे (मी) आवर्जून सांगतो, की ही उपकथने मुळीच विस्कळित वाटत नाहीत.
अशी कादंबरी मी अजून वाचलेली नाही. (काळ विस्कळित केलेल्या कादंबर्या वाचल्या आहेत, पण हे खरेच तसे वाटत नाही.) उदाहरणार्थ, त्याच्या ऐन हातातोंडाशी येऊन मृत्यू पावलेल्या मुलीचे कथानक काही प्रकरणे अधून-मधून चालले. अतिशय हळवे लेखन आहे. तिच्या संदर्भाने मग दुसर्याच कुठल्या घटना-आठवणी मध्येच येतात. सगळे काही सुसंदर्भ आहे. पण हे संदर्भ कसे? कादंबरीत असावी त्या प्रकारची एकजिनसी वस्तू नाही. हे जे काय सांगितले जाते आहे, त्यातून एक बाप म्हणून ट्वेन कसा घडला हे सांगून जाते.
आत्मचरित्रात एके ठिकाणी ट्वेन "ताज्या वार्ता वि. इतिहासकथन" यांच्या फरकाचे विश्लेषण करतो. माझ्या मते बहुतेक कादंबर्या या काल्पनिक इतिहासकथन असतात. त्यांना तसे कथासूत्र असते. ट्वेन म्हणतो, की त्याला हे आत्मकथन कसे बनवायचे आहे? वार्ता आणि इतिहासकथनाचा सुवर्णमध्य साधायचा आहे. वार्तांचा ताजेपणा हवा, आणि इतिहास-कथनाचा एकजिनसीपणा काही प्रमाणात हवा.
परंतु लेखन अतिशय आकर्षक आहे. तीन खंडांच्या आत्मचरित्राचा पहिला भागच प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे पुढचे भाग येतील तसे वाचेन.
बर्ट्रंड रसेलचे आत्मचरित्रही "साच्या"साठी अभ्यसनीय आहे. व्यक्तिगत तपशील गमतीदार वाटतील, बर्ट्रंड रसेलची स्वभाववैशिष्ट्ये किंवा घडण उघड करून दाखवतील अशा सुसंदर्भ कोंदणातच दिले आहेत. माझ्या आवडत्या पुस्तकांपैकी ते एक आहे (किंवा "होते" - वयाच्या २०-२२व्या वर्षी वाचले, त्यानंतर वाचलेले नाही.)
अभिनेत्री आणि अभिनेता ह्यांत फरक कशाला?
एक अभिनेत्री आत्मचरित्र लिहिते आहे, तर तुम्हांला तिच्या आत्मचरित्रात काय ( आणि काय-काय) वाचायला आवडेल?
अभिनेत्री आणि अभिनेता ह्यांच्यात का बरे फरक करावा? अभिनेत्री ज्या काळात, ज्या वातावरणात वावरली किंवा ज्या माणसांशी तिचा संबंध वेगवेगळ्या प्रकारे (म्हणजे दिग्दर्शक, नट-नट्या म्हणून) आला ते सगळे वाचायला आवडेल. ह्याशिवाय तिला काकेमामे किती होते. तिची पार्श्वभूमी काय वगैरे वगैरेही त्यात असतेच. बाकी प्रांजळ आत्मकथन वगैरे बोलायला ठीक आहे. असो. मला 'सांगत्ये ऐका' आवडले होते.
बाकी चं. प्र देशपांडेंनी जे काही सुचवलेय, जसे काही सुचवलेय ते वाचून एखादी अभिनेत्री लिहिणेच थांबवणार नाही ना अशी धास्ती वाटते.
असो. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा.
"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"