अजंठा लेण्यांचा कालनिर्णय - एक नवा विचार.

अजंठा लेण्यांचे विहंगम दृश्य
अजंठा लेण्यांचे विहंगम दृश्य

भारताच्या प्राचीन इतिहासात कोणीहि व्यक्ति, स्थान वा घटना ह्यांना काळाच्या एका मर्यादित खिडकीमध्ये बसवणे हे जवळजवळ अशक्यप्राय काम असते. लिखित साधनांचा अभाव आणि खर्‍याखोटया कथांचा सुकाळ ह्यामुळे कशाचाहि काळ ठरवणे हा विषय वादग्रस्त ठरतो. जगप्रसिद्ध अशा अजंठा लेण्यांची हीच परिस्थिति आहे. सर्वसाधारण समजुतीनुसार आठव्या शतकापर्यंत ह्यांची निर्मिति वेळोवेळी होत होती आणि त्या काळापर्यंत कमीअधिक प्रमाणात तेथे भिक्षू, भक्त आणि प्रवाशांचा ओघ तेथे चालू होता. तदनंतर भारतात पुन: वैदिक धर्माचे पुनरुत्थान होऊन बौद्ध धर्म प्रचारातून नष्ट झाला आणि लेणी ओसाड पडत गेली. आसपासच्या अरण्याने लेण्यांचा ताबा घेतला आणि वन्य श्वापदे आणि त्यांची पारध करणारे शिकारी आदिवासी सोडले तर बाकीच्या समाजाला लेण्यांची पूर्ण विस्मृति पडली. ही विस्मृति सुमारे १००० वर्षे चालू राहिली.

मद्रास प्रेसिडेन्सीचा एक लष्करी अधिकारी जॉन स्मिथ हा अजंठाच्या जंगलात शिकारीसाठी फिरत असतांना केवळ अपघाताने त्याला २८ जून १८१९ ह्या दिवशी अजंठा लेण्यांपैकी एका लेण्याचे झाडाझुडपात दडलेले प्रवेशद्वार दिसले. तेथे तो शिरला तेव्हा त्याच्या पायाखाली गेल्या हजार वर्षात साठलेला ५ फूट उंचीचा मातीचा आणि जंगलाच्या गळाठयाचा थर होता पण लेण्याच्या आत त्याला भित्तिचित्रांची आणि पाषाणात कोरलेल्या शिल्पांची अद्भुत दुनिया दिसली आणि तेव्हापासून ही लेणी पुन: जगासमोर आली. त्यांची साफसफाई होऊन तज्ञ अभ्यासकांनी त्यांच्या अभ्यासाला सुरुवात केली. तो अभ्यास आजहि सुरू आहे. १८५० सालानंतर डॉ. भाऊ दाजी, जेम्स बर्जेस, भगवानलाल इंद्राजी, फ्लीट, बुल्हर, जेम्स फर्ग्युसन अशा विद्वानांनी लेण्यातील चित्रे, शिल्प, शिलालेख ह्यांचा अभ्यास सुरू केला.

अजंठा लेण्यांची रचनाकृति
अजंठा लेण्यांची रचनाकृति

तेथील २९ लेण्यांचे निर्मितिकालानुसार तीन भाग मानता येतात. क्रमांक ९, १०, १२ आणि १५अ ही लेणी बौद्ध धर्माच्या हीनयान पंथाची आहेत हे त्यांमधील स्तूपांवरून दिसते. हा पंथ इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांपर्यंत जोर धरून होता पण तदनंतर त्याची पीछेहाट होऊन स्तूपाऐवजी बुद्धमूर्तीची पूजा मानणारा महायान पंथ उदयास येऊन त्याने जोर धरला असे अभ्यासक मानतात आणि त्यावरून अशी सर्वसाधारण समजूत आहे की वर उल्लेखिलेली चार लेणी इसवी सन दोनशेच्या आधी सातवाहन काळात निर्माण झाली. क्र. १६ आणि १७ ह्यांमध्ये बर्‍या अवस्थेतील दोन विस्तृत शिलालेख आपणांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यांतील व्यक्तिनामांच्या उल्लेखांवरून ती लेणी वत्सगुल्म (वाशीम) येथे राजधानी असलेल्या वाकाटक राजवंशाच्या हरिषेण राजाच्या वराहदेव नामक मुख्यमन्त्र्याने आणि त्याच्या एका उपेन्द्रगुप्त नावाच्या मांडलिकाने आपल्या खर्चाने बनवून घेतली आहेत असे दिसते आणि म्हणून त्यांचा काळ इ.स. ४६० ते ४८० असा निश्चित होतो. क्र.१८ आणि क्र.२६ मधील लेखांची अक्षरवाटिका क्र.१६ आणि १७ मधील लेखांच्या अक्षरवाटिकेशी जुळते आणि म्हणून ही लेणीहि हरिषेणाच्या काळाच्या आगचीमागची असावीत असे बर्जेस-इंद्राजी ह्यांचे मत आहे. उरलेली लेणी तदनंतर सातव्या शतकातील असावीत असा आत्तापर्यंतचा तर्क होता.
 

सासानियन राजदूत?
सासानियन राजदूत?

ह्या तर्कामागील कारण असे की क्र. १ च्या लेण्यामध्ये एका चित्रात अंगात पर्शियन पद्धतीचे अंगरखे आणि विजारी, डोक्यावर टोकदार टोपी आणि पायात बूट घातलेल्या व्यक्ति दिसतात. त्या व्यक्ति कोणा राजापुढे उभ्या आहेत असेहि दिसते. (राजाच्या पायाजवळ उजव्या अंगाला टोकदार टोप्या डोक्यावर असलेले तिघे हेच ते परदेशी लोक.) सातव्या शतकांमध्ये इराणमध्ये राज्य करणारा खुस्रो द्वितीय हा राजा आणि त्याचा समकालीन बदामीचा चालुक्य राजा पुलकेशी द्वितीय ह्यांच्यामध्ये राजदूतांची देवाणघेवाण झाली होती हे अन्य पुराव्यावरून ठाऊकच होते. त्या माहितीच्या आधारे रॉयल एशिआटिक सोसायटीपुढे १८७९ साली जेम्स फर्ग्युसनने असे मत मांडले की क्र. १ ह्या लेण्यामधील चित्रात द्वितीय पुलकेशीच्या दरबारात आलेल्या सासानियन राजदूतांचे ते चित्र आहे आणि लेण्याचा काळ इसवी सनाचे सातवे शतक हा आहे. मुंबईजवळील घारापुरीच्या लेण्यांचा तोच काळ असावा असे तज्ञांना वाटत होते आणि ह्या दोन्ही तर्कांचा एकमेकास आधार मिळून क्र. १ ला आणि वर उल्लेखिलेली लेणी सोडून बाकी इतरांना ७वे शतक हा काळ निश्चित झाला.

वॉल्टर स्पिंक हे मिशिगन विद्यापीठ, ऎन आर्बर येथील ’कलांचा इतिहास’ ह्या विषयाचे सन्माननीय निवृत्त प्राध्यापक आहेत.

क्र. १७ च्या लेण्यातील परदेशी.
क्र. १७ च्या लेण्यातील परदेशी.

आज त्यांचे वय नव्वदीच्या घरात आहे आणि गेली सुमारे ५५ वर्षे अजंठा लेणी हा त्यांच्या विशेष अभ्यासाचा विषय आहे. दक्षिणेकडे राज्यविस्तार असलेला पुलकेशी त्याचा संबंध नसलेल्या अजंठयात चित्ररूपाने का दिसावा अशी शंका त्यांना आली. प्राध्यापक श्लिंगलॉफ हे अजंठयाच्या चित्रांचे एक ख्यातनाम अभ्यासक आहेत. त्यांच्या मते चित्रातील राजा हा पुलकेशी नसून बुद्ध एका पूर्वजन्मात महासुदर्शन नावाचा राजा होता तो आहे. त्याच्या समोर परकीय वेषातील काहीजण दिसतात ह्यातहि काही विशॆष नाही कारण व्यापारी संबंधामुळे अशा प्रकारचे लोक भारतात नेहमीच दिसत असणार. अजंठयामध्येहि अन्य चित्रात असा इराणी वेष केलेले लोक दिसतात. उदाहरणार्थ क्र.१७ ह्या लेण्यातील हातात पाण्याचे भांडे धरून उभा असलेला सेवकहि अशीच परदेशी प्रकारची टोपी घातलेला दिसतो. थोडक्यात म्हणजे क्र. १ मधील चित्रातील राजा पुलकेशी नाही आणि त्यामुळे ते लेणे ७व्या शतकातील आहे असेहि मानण्याचे काही कारण नाही.

अजंठयाच्या पश्चिमेस १८ किलोमीटर अंतरावर घटोत्कच लेणी ह्या नावाने ओळखला जाणारा लेण्यांचा एक समूह आहे. वटवाघळे सोडली तर तेथे सध्या कोणाचाच वावर नसतो. त्या लेण्यांपैकी एकामध्ये वर उल्लेख केलेल्या वराहदेवाचा एक शिलालेख आहे कारण ते लेणेहि वराहदेवाच्या देणगीतूनच खोदले गेले आहे. डॉ. स्पिंक त्या लेण्याला भेट द्यायला गेले तेव्हा शिलालेखाजवळच असलेल्या आणि उत्तम रीतीने कोरलेल्या एका स्तंभशीर्षाकडे (pilaster capital) त्यांची नजर गेली. अशा प्रकारचे काम शिल्पकलेच्या उत्तरकाळचे प्रतीक आहे अशी सार्वत्रिक समजूत होती आणि त्यामुळे हे स्तंभशीर्ष अजंठयामध्ये दिसले असते तर ५व्या ऐवजी ७व्या शतकातील ते काम आहे असाच तर्क काढला गेला असता. येथे मात्र ते काम ५व्या शतकातील आहे हे स्पष्ट दिसत होते. तेथून डॉ. स्पिंकना विचाराची एक नवी दिशा दिसू लागली ती अशी की अजंठयाची सर्व उर्वरित लेणीहि ७व्या शतकातील नसून ५व्या शतकातील आहेत.

डॉक्टरांनी ह्या दिशेने आता अभ्यास सुरू केला आणि अजंठयाच्या लेण्यांच्या जडणघडणीच्या पद्धतीमधून त्यांना नवनवीन गोष्टी जाणवू लागल्या. ह्या एकूण नव्या विचाराचा सारांश थोडक्यात लिहितो.

हीनयान लेणी सोडून बाकी सर्व लेणी वाकाटक सम्राट् हरिषेण ह्याच्या १७-१८ वर्षांच्या राज्यात सन ४६१ ते ४७८ ह्या काळात कोरली गेली आहेत. हरिषेण स्वत: बौद्ध नव्ह्ता पण त्याचे साम्राज्य केन्द्रस्थान वत्सगुल्म ह्याच्या चारी बाजूंना पसरले होते. ऋषिक (अजंठयाचा आसपासचा प्रदेश), अश्मक (ऋषिकाच्या दक्षिणेस), कुन्तल (भीमा आणि वेदवती नद्यांमधील प्रदेश - आजचे सातारा आणि सोलापूर जिल्हे, कर्नाटकाचा काही भाग. एका मतानुसार कुन्तल म्हणजे पैठणच्या आसपासचा प्रदेश आणि विदर्भाचा बराचसा भाग), त्रिकूट (उत्तर कोंकण, आणि हरिश्चन्द्रगडापासून माहुलीच्या किल्ल्यांमधील प्रदेश, शेजवलकरांच्या मते माहुलीच्या किल्ल्याच्या तीन सुळक्यामुळेच ह्या प्रदेशाला त्रिकूट असे नाव पडले असावे असे वाचल्याचे आठवते.), लाट (मध्य आणि दक्षिण गुजरात), अवन्ती (पश्चिम माळवा), कोसल (छत्तीसगड आणि ओरिसाचा पश्चिम भाग), कलिंग (ओरिसा आणि गोदावरीच्या मुखाचा प्रदेश) आणि आन्ध्र (गोदावरीच्या दक्षिणेकडील तेलुगु-भाषिक प्रदेश) इतके भूप्रदेश त्याच्या राज्यात असल्याचा उल्लेख वराहदेवाच्या क्र.१६ ह्या लेण्यामधील शिलालेखात सापडतो. एव्हढया विस्तृत राज्यातील प्रजा मोठया संख्येने बौद्ध होती. त्यांना सन्तुष्ट ठेवण्यासाठी मुख्यमन्त्री वराहदेवाच्या मार्गदर्शनाने त्यापूर्वी दोन-अडीचशे वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या अजंठयामध्ये नव्याने लेणी खोदण्याचे काम सुरू झाले. वाकाटकांच्या साम्राज्याच्या जवळजवळ मध्यवर्ती अशी ही जागा होती आणि त्यामुळे साम्राज्याच्या एका भागाकडून दुसर्‍याकडे जाणार्‍या व्यापार्‍यांना, वाटसरूंना आणि भिक्षूंना विश्रान्तिस्थान म्हणून ती अतिशय सोयीची होती.

भेडसा लेख
भेडसा लेख

वराहदेवाच्या प्रेरणेने हे काम सुरू होत असल्याने असल्याने त्याने स्वत:साठी एकूण लेण्यांच्या मध्यस्थानी असलेली जागा क्र. १६ ची मोक्याची जागा घेतली. अजंठयाचा ऋषिक प्रदेशाचा राजा उपेन्द्रगुप्त ह्याने स्वत:साठी त्याच्याशेजारची क्र. १७ ची आणि अन्य काही जागा निवडल्या. इतर बडया धेंडांनी अन्य जागा बळकावल्या. हे करतांना त्यांनी सर्वसामान्य दात्यांना दाराबाहेर ठेवले. सर्वसामान्य नियम असा होता की लहानमोठे देणगीदार आपल्या कुवतीनुसार लहानमोठया देणग्या देऊन कोणी एक पाण्याचे कुंड, कोणी एक बुद्धाची मूर्ति दान करून पुण्याचे धनी होऊ शकत असत. उदाहरणार्थ पुण्याजवळील विसापूर किल्ल्याच्या मागील उतारावरील भेडसा लेण्यातील हा वरील लेख पहा. त्याचे वाचनः ’नासिकान अनदस सेठिस पुतस पुसणकस दान’. नाशिकमध्ये राहणार्‍या आनंद श्रेष्ठीचा पुत्र पुष्यणक ह्याचे दान.

शेलारवाडी लेख
शेलारवाडी लेख

तसाच तळेगावजवळच्या शेलारवाडी लेण्यातील हा लेख पहा:
सिधं धेणुकाकडे वाथवस
हालकियस कुडुबिकस उसभ
णकस कुडुविणिय सिअगुत
णिकाय देयधंम लेणं सह पुते
ण णंगहपतिना सहो
’शुभ असो. धेणुकाकडात राहणारी सियागुणिका, उशभानक जो कुणबी आणि शेतकरी आहे त्याची पत्नी, हिचा, तिचा पुत्र नंद, गृहस्थ, ह्याच्यासह लेण्याचा धर्मादाय’. कार्ले-भाजे येथेहि अशीच पोढी (पाण्याचे टाके) वगैरेंची दाने लिहिलेली दिसतात. आजहि देवळांमधून एकेकटया व्यक्तीने दान केलेल्या घंटा, फरशा, पायर्‍या दिसतातच. १५०० वर्षांपूर्वीहि हीच पद्धति होती. हा सर्वसामान्य नियम अजिंठयात बाजूला ठेवून एकेका पूर्ण लेण्याचे दान बडया लोकांनी एकेकटयाने केलेले दिसते.

प्रधान आणि मांडलिक आहेत तेथे राजा कसा मागे राहणार? हरिषेणाने स्वत:साठी क्र. १ ची जागा निवडली आणि एकूण २९ पैकी सर्वात भव्य लेणे तेथे खोदायला प्रारंभ केला. हे लेणे म्हणजे एक ’विहार’ (भिक्षूंची राहण्याची जागा) असून राजाचे स्वत:चे असल्याने तेथे सर्वच काम राजेशाही होते. तेथील बुद्धाच्या कथाहि बुद्धाच्या पूर्वजन्मींच्या राजेपणाशी संबंधितच होत्या. लेण्याच्या अगदी आत असलेली बुद्धमूर्तीहि नेहमीप्रमाणे मांडी घालून बसलेली नसून आसनावर पुढे पाय सोडून बसलेली आहे. तिची ही बसण्याची पद्धति आणि तिचा भव्य आकार ह्यावरून तिचे राजत्व सुचविले जाते कारण मूर्ति सम्राटाच्या लेण्य़ामध्ये आहे. त्याचे प्रवेशद्वार अजंठयातील सर्व लेण्यांमध्ये उठून दिसेल असे आहे. अशा आणि अन्य अनेक गोष्टींमुळे हरिषेणाचे स्वत:चे लेणे इतरांपासून वेगळे उठून दिसते. ते लेणे म्हणजे आहे.

असे हे अनेक लेण्यांचे काम ४६१ पासून ४६७ पर्यंत निर्वेध चालले होते. नंतर ऋषिक देशाचा राजा उपेन्द्रगुप्त आणि अश्मकादि अन्य भागातील दाते ह्यांच्यात काही वितुष्ट येऊन उपेन्द्रगुप्ताची स्वत:ची चार लेणी, मुख्यमन्त्री वराहदेवाचे क्र. १६ चे लेणे आणि हरिषेणाचे क्र. १ चे लेणे एव्हढी वगळून बाकीच्यांचे काम स्थगित करण्यात आले.

आठ वर्षे लोटल्यावर अश्मकांनी पुनः उपेन्द्रगुप्तावर मात करून आपल्या लेण्यांचे काम सुरू केले आणि दोनतीन वर्षात ते पूर्णहि केले. उपेन्द्रगुप्त आपले क्र. १७ चे लेणे बुद्धाला अर्पण करण्यापूर्वीच परागंदा झाला आणि लेणे कोरल्यामुळे जे पुण्य त्याला मिळाले असते त्याला मुकला. ४७८च्या सुमारास सम्राट् हरिषेणाचा आकस्मिक मृत्यु झाला. ह्या सर्व इतिहासाचा मूक पुरावा म्हणजे ह्या सर्व लेण्यांमधून जाणवणारे खोदाईचे दोन भिन्न कालखंड. पहिल्या कालखंडामध्ये लेण्यांचे काम काळजीपूर्वक झालेले दिसते, तेथेच दुसर्‍या कालखंडामध्ये घाई आणि नियोजनाचा अभाव जाणवतो.

अशा रीतीने वॉल्टर स्पिंक ह्यांच्या तर्कानुसार अजंठा लेण्यांच्या निर्मितीचा दुसरा कालखंड इ.स. ४६१ ते ४८० एव्हढया काळात पडतो. ७व्या शतकात तो कालखंड पडतो हे जुने मत त्यांना मान्य नाही. अजंठा लेण्य़ांच्या कालखंडाचा गूगलवर शोध घेतला तर आता दोनहि मते पहावयास मिळतात.

हे सर्व वर्णन अति-संक्षिप्त आहे कारण ते संपूर्ण येथे देणे अशक्य आहे. जिज्ञासूंनी त्यासाठी डॉ. स्पिंक ह्यांची पुस्तके वाचावी किंवा थोडक्यात समाधान होणार असले तर त्यांचे http://www.walterspink.com/ हे संस्थळ पाहावे.

चित्रांची श्रेयमालिका.
१. अजंठा लेण्यांचे विहंगम दृश्य - मी काढलेले छायाचित्र.
२. अजंठा लेण्यांची रचनाकृति - विकिपीडिया
३. सासानियन राजदूत? - http://ignca.nic.in/IFLA2010/IFLA_PDF/ignca_IFLA_exhibition.pdf
४. क्र. १७च्या लेण्यातील परदेशी - http://air.w3.kanazawa-u.ac.jp/
५. भेडसा लेख - Inscriptions of the Cave Temples of Western India - James Burgess and Bhagavanlal Indraji
६. शेलारवाडी लेख - Inscriptions of the Cave Temples of Western India - James Burgess and Bhagavanlal Indraji

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर....

संक्षिप्त माहिती देणे हा उद्देश असेल तर सफल झालेला आहे.
बाकी, ही अशी लेणी दुर्लक्षित कशी काय राहिली हे एक् कुतूहल आहे. ती केवळ बौद्ध होती म्हणून प्रचाराबाहेर गेली हे पटत नाही. त्यातील सौंदर्य,अद्भुतता ह्याने पुढील पिढ्यांना भुरळ घातली नसणे शक्य वाटत् नाही. ती नंतरही ज्ञातच असली पाहिजेत. मग विस्मृतीत जाण्याचे एकच कारण वाटते; एखाद्या फार मोठ्या उलपथापालथीनंतर एकाएकी आख्खा प्रदेश किमान काही दशके निर्मनुष्य झाला असला पाहिजे.
उदा:- एखादा मोठा भूकंप, टोकाचा दुष्काळ,महाभयंकर स्वारी(तालीकोटच्या लढाईनंतर विजयनगरच्या राजधानीचे हंपीजवळ भरभराटीच्या अवस्थेतील एक समृद्ध नगर ते थेट फुटके/पडके अवशेष असे रुपाअंतर व्हायला काही महिनेही लागले नाहित; तसेच काहिसे.)
ह्याप्रकारामुळे तिथली तेव्हाची वस्ती पार ननिघून गेली असली पाहिजे, व नंतर तिथे रान माजल्यावर नव्याने वस्ती केलेल्या मानवसमूहास त्याची कल्पना नसणे, हे घडू शकते.

अवांतरः-
तिथे अजूनही संशोधनास भरपूर वाव आहे. अजिंठा लेणी आहेत त्या सोयगाव तालुक्यातील् काही आडावळणांवरची प्राचीन् मंदिरे ह्या लेण्यांशी नाते सांगतात, त्यांच्या रचनेवरून व इतर् बाबींवरून् बरीच माहिती मिळू शकते.
तीच गत दौलताबादच्या किल्ल्याच्या आसपास्च्या भूभागातील. लहान पोरे म्हणून आम्ही हुंदडण्यास तिथे गेलो असताना किल्ल्याबाहेर जवळपास पाच-सात किमी अंतरावर आम्ही खेळत खेळत चक्क एका दगडी/घडीव भुयारात पोचलो होतो.त्याच्या आसपास् पूर्ण झाडी होती; दुर्लक्षित भाग होता. फार धीर न झाल्याने आम्ही आत शिरलो नाही. नंतर हजारदा त्या भुयाराचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; हाती काहीही लागले नाही. औ.बादच्या पर्यटनपुस्तिकेत वगैरेही त्याचा उल्लेख नाही.स्थानिकांकडे बरीच चौकशी करूनही काही हाती लागले नाही. मोठी मोहिम् हाती घेउन् प्रदेश पिंजून् काढल्यास बरेच काही गवसेल.
असो. माझे म्हणणे इतकेच की त्याच धर्तीवर सोयगाव तालुक्यात शोध घेतल्यास अजूनही बरेच काही हाती लागू शकते.

--मनोबा

रोचक् लेख

प्रथम सांगायचे म्हणजे उपक्रमवर चित्रे टाकण्याचा अट्टाहास न करता अनुदिनीची लिंक दिली असती तर चित्रे बघता आली असती असे वाटते. असो .

या लेखात बरेच संदर्भ व इतिहास देऊन लेखकाने अजंठ्याच्या 29 लेण्यांची तीन कालात विभागणी केली आहे.
1. क्रमांक ९, १०, १२ आणि १५अ ही लेणी बौद्ध धर्माच्या हीनयान पंथाची आहेत हे त्यांमधील स्तूपांवरून दिसते. हा पंथ इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांपर्यंत जोर धरून होता पण तदनंतर त्याची पीछेहाट होऊन हे विधान माझ्या मताने योग्य आहे यात शंका नाही. बुद्ध प्रतिमा दाखवलेली नसली तर त्या शिल्प किंवा चित्राचा कालखंड दुसर्‍या शतकापर्यंतचाच येतो.

2. बुद्धमूर्तीची पूजा मानणारा महायान पंथ उदयास येऊन त्याने जोर धरला हे वाक्य योग्य वाटत नाही. महायान पंथ दुसर्‍या शतकानंतर जास्त प्रबल होत गेला हे जरी सत्य असले तरी तो पंथ बुद्धमूर्तीची पूजा करणारा आहे हे पटत नाही. बुद्ध प्रतिमा चित्रात किंवा शिल्पात दर्शविण्यास सुरूवात आणि महायान पंथाचा उदय या दोन गोष्टी साधारण एकाच कालखंडात घडल्याने असा समज बर्‍याच लोकांचा होतो. परंतु त्यात तथ्य वाटत नाही. महायान पंथाच्या कोणत्याही सुक्तात बुद्धपूजा करावी असे सुचवलेले नाही. माझ्या माहिती प्रमाणे सम्राट कनिष्क याच्या कालखंडात मथुरा येथील शिल्पात प्रथम बुद्धमूर्ती साकार झाली. सगुण व निर्गुण यातील फरक येथे आहे.
3.क्र. १६ आणि १७ ह्यांमध्ये बर्‍या अवस्थेतील दोन विस्तृत शिलालेख आपणांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यांतील व्यक्तिनामांच्या उल्लेखांवरून ती लेणी वत्सगुल्म (वाशीम) येथे राजधानी असलेल्या वाकाटक राजवंशाच्या हरिषेण राजाच्या वराहदेव नामक मुख्यमन्त्र्याने आणि त्याच्या एका उपेन्द्रगुप्त नावाच्या मांडलिकाने आपल्या खर्चाने बनवून घेतली आहेत असे दिसते आणि म्हणून त्यांचा काळ इ.स. ४६० ते ४८० असा निश्चित होतो. क्र.१८ आणि क्र.२६ मधील लेखांची अक्षरवाटिका क्र.१६ आणि १७ मधील लेखांच्या अक्षरवाटिकेशी जुळते आणि म्हणून ही लेणीहि हरिषेणाच्या काळाच्या आगचीमागची असावीत या लेण्यांच्या कालखंडाबद्दल कोणताच विवाद नाही असे लेखक म्हणतो आहे.
4. उरलेली लेणी तदनंतर सातव्या शतकातील असावीत असा आत्तापर्यंतचा तर्क होता. लेखाचा उर्वरित भाग ही लेणी सातव्या शतकातील नसून त्या आधीची असली पाहिजेत असे मत प्राध्यापक श्लिंगलॉफ यांच्या संशोधनावर आधारून लेखकाने केले आहे. या साठी दिलेली उदाहरणे बघून या तर्कात काही गैर आहे असे वाटत नाही.
मुळात ही लेणी 7व्या शतकात असावी हा तर्क बर्जेस सारख्या इतिहास संशोधकांच्या एकोणिसाव्या शतकात केलेल्या अभ्यासावर आधारित आहे. व हा केवळ तर्क आहे. बर्जेस, इंद्राजी, व्हिन्सेन्ट स्मिथ वगैरे मंडळींनी केलेले तर्क अनेक ठिकाणी चुकीचे असल्याचे आढळून आले आहे. त्या प्रमाणे येथेही झाले असावे.
5. या कालातील भारतवर्षाचा इतिहास बघितला तर काही रोचक निरिक्षणे करता येतात. त्यापैकी तीन निरिक्षणे मी खाली देतो आहे.
अ.) दुसर्‍या शतकात भारतवर्षाच्या वायव्येला असलेल्या गांधार व पंजाब मध्ये आधी राज्य करत असलेल्या शक व पहेलवी राजांची कुषाण राजांनी हकालपट्ती करून सत्ता ताब्यात घेतली होती. हे राजे दक्षिणेला भडोच मधे येऊन त्यांनी गुजरात व माळवा मधे आपली सत्ता प्रस्थापित केली होती. यानंतर सातवाहन राजांचा पराभव करून महाराष्ट्राचा भागही त्यांनी ताब्यात घेतला होता. काही काळासाठी शालीवाहनाने महाराष्ट्र स्वतंत्र केला असला तरी या राजांचा पूर्ण बिमोड झालेला नव्हता. अजंठा व भडोच मधील अंतर लक्षात घेता, अशा परिस्थितीत इराणी किंवा मध्य एशियातील वस्त्रे एखाद्या व्यक्तीने परिधान केलेली दर्शवली जाणे याला फारसे महत्व दिले जाऊ नये.
ब.) सातव्या शतकापर्यंत बौद्ध धर्माची लोकप्रियता उतरणीस लागली होती. चिनी भिख्खू शुएनझांगने याचा अनेक ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळे या काळात नवी लेणी खोदण्यासाठी देणग्या दिल्या जाण्याची शक्यता कमीच आहे.
क.) आंध्र प्रदेशातील अमरावती येथे प्रति ताजमहाल म्हणता येईल असा एक संगमरवरी स्तूप दुसर्‍या शतकात बांधला गेला होता, या अमरावतीला शुएन झांगने सातव्या शतकात भेट दिली होती. त्याच्या अमरवतीच्या वर्णनात तेथील बुद्ध विहार कसे पडीक होत चालले आहेत या बद्दलचे दु:ख्ख व्यक्त केले आहे. पण स्तूपाचा उल्लेखही नाही. म्हणजेच या कालापर्यंत ज्यावर असलेल्या अप्रतिम शिल्पकलेचे नमुने नंतर सापडले तो स्तूप लोकांच्या स्मरणातूनही गेलेला होता. बर्जेसने मात्र खुशाल शुएनझांनने अमरावतीचा स्तूप बघितला होता असे विधान आपल्या लेखनात केलेले आहे.
या सगळ्या मुद्यांवरून सम्राट हर्षच्या कालात व तदनंतर म्हणजेच सातव्या शतकात, बौद्ध धर्माची एकूण स्थिती, निदान दक्षिण भारतात तरी फार चांगली होती असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. त्यामुळेच प्राध्यापक श्लिंगलॉफ म्हणतात त्यात बरेच तथ्य असावे असे मला तरी वाटते.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

बौद्ध धर्माची लोकप्रियता

सविस्तर प्रतिसाद आवडला.

बौद्ध धर्माची लोकप्रियता शंकराचार्यांचा उदय होइपर्यंत टिकून् होती असा सामान्य प्रवाद/समजूत आहे.
त्यांनी अभिजनांवर घातलेले गारुड,केलेले तर्क खंडन-मंडन ह्यामुळे पूर्वीचे बौद्ध मत मागे सारले जाउ लागले.
आपले म्हणणे पटावे म्हणून त्यांनी कित्येक् ठिकाणी बौद्ध मतेच उद्धृत केल्याचे जे मानत ते त्यांना "प्रच्छन्न बौद्ध" म्हणत.

आता हर्ष वर्धन् ह्याच्या काळात आलेला चिनी प्रवासी युआन श्वांग आदि शंकराचार्यांच्या किमान शतकभर आधी होउन गेला असे मानले तर तो आला तेव्हाच उतरती कळा लागली होती हे कसे पटावे?

दुरुस्ती जी सर्वमान्य् समजूत् आहे त्यात करावी की सध्या इथे दिलेल्या गृहितकात?

--मनोबा

सातव्या शतकातील बुद्ध धर्म

सातव्या शतकातील बुद्धधर्माच्या परिस्थितीची सर्वात अचूक जाण शुएन झांगच्या वर्णनावरून येत्ते कारण ते त्याच वेळेस लिहिलेले आहे. भारत वर्षातील बौद्ध धर्माच्या हलाखीच्या परिस्थितीबद्दल शुएन झांगने त्याच्या पुस्तकात अनेक ठिकाणी हळहळ व्यक्त केली आहे. वानगीदाखल या संदर्भावर जाऊन पृष्ठ क्रमांक २२१ ते २२३ वाचावी. येथे शुएन झांग अशा एका ठिकाणच्या विहाराचे वर्णन करतो आहे जेथे १००० च्या वर भिख्खू पूर्वी अध्ययन करत असत. आता (शुएन झांगच्या कालात)तेथे कोणीही नाही असे तो म्हणतो आहे. या परिस्थितीस तिथला पर्वत चित्र विचित्र आकार धारण करत असल्याचे मोठे गमतीदार कारण त्याने दिले आहे पण तो भाग अलाहिदा. सबंध पुस्तक वाचल्यास आणखी अनेक उदाहरणे मिळू शकतील.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

शीर्षकात एक दुरुस्ती...

मराठी,हिंदी व इंग्लिश ह्या भाषांत सदर ठिकाणास अजिंठा,अजंठा आणि अजांता/अजांटा असे म्ह्टलेले ऐकलेले आहे.
शीर्षकात त्यानुरुप उचित नाव ठेवावे.
--मनोबा

लेख आवडला

लेख आणि चंद्रशेखर यांचा प्रतिसाद दोन्ही आवडले. धन्यवाद.

 
^ वर