कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प

आयुर्वेदिक सिद्ध घृत
[*आयुर्वेद ही आपली पूर्वापार चालत आलेली अनुभवाधिष्ठित उपचारपद्धती आहे.अनेक वनस्पती औषधी गुणांनी युक्त असतात यात शंका नाही.काही व्याधींवरील आयुर्वेदिक औषधोपचार हे अलोपाथिक उपचारांपेक्षा अधिक प्रभावी असू शकतील.हे सगळे मान्य आहे.मात्र काही ऐतिहासिक सत्यांवरून आयुर्वेद उपचाराच्या मर्यादाही स्पष्ट होतात हे सत्य दुर्लक्षूं नये.
*शिवाजी महाराजांच्या गुढगी आजारावर आयुर्वेद उपयोगी ठरला नाही.
*थोरले बाजीराव पेशवे धारातीर्थी पडले नाहीत. आजारी पडून अकाली वारले.आयुर्वेद उपचारांचा उपयोग झाला नाही.
*थोरले माधवराव क्षय रोगाने गेले.तिथे आयुर्वेदाचा प्रभाव पडला नाही.
*लो.टिळक,स्वामी विवेकानंद यांना मधुमेह होता.त्याकाळी इन्सुलिनचा शोध लागला नव्हता.आयुर्वेद निरुपयोगी ठरला.
*पटकी(कॉलरा),प्लेग.देवी,मलेरिया, पोलिओ अशा रोगांच्या निर्मूलनाच्या संदर्भात आयुर्वेदाचे काही योगदान आहे असे दिसत नाही.
*"आयुर्वेद ही जगातील सर्वश्रेष्ठ उपचारपद्धती आहे.आयुर्वेदोपचारांनी कोणताही रोग पूर्णतया बरा होतो."असे गोडवे गाण्यापूर्वी वरील वस्तुस्थितीचा विचार करावा.
*सध्या आयुर्वेदाच्या संदर्भात अति होते आहे असे दिसते. ते पाहून हसू येते इतकेच.]

आयुर्वेदिक सिद्ध घृत
आयुर्वेदाचे प्रकांड पंडित आणि सर्वज्ञ डॉ.बिल्वाचार्य पंचपात्रे यांची मुलाखत एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या संवाददात्याने घेतली.ती नंतर दूचिवा वरून प्रक्षेपित झाली.त्या मुलाखतीचा काही भाग खाली दिला आहे. या साक्षात्कारात (मुलाखतीत):
.............संदाता=संवाददाता
.............बिल्वश्री=डॉ.बिल्वाचार्य पंचपात्रे...(डॉ.बि.पं.यांचे बिल्वपत्रांविषयींचे संशोधन प्रसिद्ध आहे.बिल्वपत्रातून सकारात्मक धन ऊर्जेचे उत्सर्जन होते.त्याचे एक साप्ताहिक चक्र असते.प्रत्येक सोमवारी या ऊर्जेचे प्रमाण सर्वाधिक असते,हे त्यांनी काढलेल्या आलेखांवरून सप्रमाण सिद्ध होते.अखिलविश्व वेदविज्ञान संशोधन आणि प्रसार मंडळ,मुंजाबाचा बोळ,पुणे या संस्थेने डॉ.बिल्वाचार्य यांच्या संशोधनाला मान्यता दिली आहे हे आपण जाणताच).
.
संदाता: नमस्ते प्रेक्षकहो! आज आमच्या स्टुडिओत विश्वविख्यात आयुर्वेदतज्ज्ञ डॉ.पंचपात्रे साक्षात् उपस्थित आहेत.त्यांच्या आश्रमात आयुर्वेदिक घृतोत्पादन प्रकल्प चालू झाला आहे.त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ.नमस्ते डॉक्टर!
बिल्वश्री: नमस्कार! आयुर्वेदाची महती आणि उपयुक्तता सर्व लोकांना पटली आहे.आयुर्वेदिक उत्पादनांचा प्रसार जगभर वाढत आहे.अशा आयुर्वेदाविषयी आणि आमच्या नवीन प्रकल्पाविषयी चार शब्द सांगण्याची संधी मिळत आहे याबद्दल मी आपल्या वाहिनीचा आभारी आहे.
संदाता: घृत शब्दाचा नेमका अर्थ काय तो आमच्या प्रेक्षक श्रोत्यांसाठी सांगावा.
बिल्वश्री: घृत या संस्कृत शब्दाचा अर्थ गाईचे तूप असा होतो."आज्य" म्हणजे बकरीचे तूप.कारण अजा शब्दाचा अर्थ बकरी,शेळी असा आहे.आज्य तूप काही आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीत तसेच होम-हवनात वापरतात."घृत"तुपाचा वापर मुख्यत्वेकरून खाद्य पदार्थात होतो.आमच्या कपिलाश्रमात आयुर्वेदिक सिद्ध घृतोत्पादन प्रकल्पाचा प्रारंभ झाला आहे.
संदाता: या तुपाला तुम्ही सिद्ध तूप का म्हणता,शुद्ध तूप का म्हणत नाही?
बिल्वश्री: हे तूप शुद्ध असतेच.पण निर्मितिप्रक्रिया करताना काही दुर्मिळ दिव्य आयुर्वेदिक वनस्पतींचे औषधी गुण या तुपात उतरवतात.म्हणून त्याला सिद्ध घृत म्हणायचे.तसेच ते शतधौत असते.
संदाता:कपिलाश्रमात किती गाई आहेत?
बिल्वश्री: आमच्या आश्रमात एकावन आयुर्वेदिक गोमाता आहेत.
संदाता: आयुर्वेदिक गाई?
बिल्वश्री: गाईवर शास्त्रोक्त गर्भसंस्कार झाल्यावर जी शुभलक्षणी कालवड जन्माला येते,ती आयुर्वेदिक गोमाता होय.अशा गाई दुष्प्राप्य असतात.
संदाता: आयुर्वेदिक सिद्धघृत निर्मितीची प्रक्रिया कशी असते?
बिल्वश्री: पहाटे ब्राह्म मुहूर्तावर आश्रमात भूपाळ्या लागतात.तेव्हा गाई जाग्या होतात.आश्रमातील सर्व गोमातांची शास्त्रोक्त षोडशोपचारपूर्वक पूजा करून त्यांना आरती ओवाळतात.शुभ कुंकुमतिलक लावतात आणि त्यांना आयुर्वेदिक गोग्रास देतात.त्यासाठी प्रशिक्षित पुरोहित आश्रमात आहेत.
नंतर आयुर्वेदिक पद्धतीने गोदोहनाचा-- म्हणजे गाईची धार काढण्याचा-- कार्यक्रम असतो.आश्रमातील गोपी ते काम करतात.गोदोहनाच्या वेळी शास्त्रीय संगीत चालू असते.ते ऐकून गाईंना आनंद होतो.त्या अधिक दूध देतात.तसेच त्या गोरसात धनभारित पवित्र ऊर्जा अधिक प्रमाणात असते.
संदाता: तुमच्या आश्रमातील गोस्थाने म्हणजे गोठे पाहिले.वेगवेगळे बारा गोठे आहेत.एकावन्न गाईंकरिता एवढ्या स्थानांचे कारण काय?
बिल्वश्री; तुम्ही गोस्थाने पाहिली.पण त्यांच्या नावांकडे तुमचे लक्ष गेले नाही,असे दिसते.ती बारा राशींची नावे आहेत.प्रत्येक गोस्थानात त्या त्या राशीच्या गाई बांधतात.प्रत्येक गोस्थानात स्वतंत्र ध्वनिवर्धक आहे.गोदोहनाच्या वेळी त्या त्या राशीला अनुकूल अशा रागातील संगीत लावतात.त्यामुळे दुग्धोत्पादन वाढते.
संदाता: गाईला जन्मरास असते?
बिल्वश्री: हो तर.आमच्या सर्व आयुर्वेदिक गाईंच्या जन्मकुंडल्या मी स्वत: केल्या आहेत.प्रत्येक गाईचे संगोपन तिच्या पत्रिके अनुसार होते.
संदाता: या गाईंना कधी आजार होतात का हो?
बिल्वश्री: बहुधा नाहीच.मघाशी एक सांगायचे राहिले.पहाटे गोपूजनापूर्वी प्रत्येक गाईला अभ्यंग करून मग आयुर्वेदिक जलाने शुभस्नान घालतात.तसेच प्रत्येकीवर नियमितपणे आयुर्वेदिक पंचकर्मक्रिया करतात.ही क्रिया माणसांवर करतात त्याहून अगदी भिन्न आहे.आम्ही ती विकसित केली आहे. त्यामुळे आजार उद्भवत नाही.झालाच तर आयुर्वेदिक औषधोपचार करतो.
संदाता: छानच आहे.गोदोहनानंतर पुढची पायरी कोणती?
बिल्वश्री: गोदोहन झाल्यावर त्या गोरसावर मंदाग्निसंस्कार करतात.त्यावेळी वर येणारी साय विरजणात घालतात.अशा रीतीने दही तयार होते.
संदाता: हे आमच्या प्रेक्षकांना चांगले समजले असेल.आता पुढे.
बिल्वश्री: पुढचा कार्यक्रम म्हणजे दधिमंथन. मोठ्या रांजणात दही घालून, दोरीच्या सहाय्याने उंच रवी फिरवून गोपी दही घुसळतात. आम्ही यासाठी कोणतीही यांत्रिक पद्धत वापरत नाही.या मंथनसंस्काराच्या वेळी भक्तिगीते (राधा गौळण करिते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन।..यासारखी) लावतात अथवा गौळणी स्वमुखे गातात.प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चिंतन केल्यामुळे त्यांना प्रिय असलेले नवनीत शुद्ध स्वरूपात चटकन वर येते.त्यामुळे मंथनकार्य त्वरित होते.वेळ आणि श्रम वाचतात.
<स्त्रोन्ग्>संदाता: चांगली कल्पना आहे.आता ते लोणी कढवतात ना?
बिल्वश्री:या नवनीतावर आयुर्वेदिक अग्निसंस्कार करतात.त्यावेळी त्यांत काही दुर्मीळ दिव्य औषधी वनस्पतींची पाने घालतात.त्यांचे औषधी गुण तुपात उतरतात.तसेच या अग्निसंस्काराच्यावेळी सामवेदातील मंत्रांचा घोष अखंड चालू असतो.त्यामुळे अत्यंत शुद्ध, पवित्र, निर्दोष आणि अष्ट सात्त्विक गुणांनी युक्त असे कपिलाश्रम आयुर्वेदिक घृत सिद्ध होते.
संदाता: तुम्ही फार छान समजावून सांगितले.पण घरोघरी अशा प्रक्रियेने तूप करणे शक्य होणार नाही.
बिल्वश्री: म्हणूनच आम्ही निर्मिती प्रकल्प चालू केला आहे ना? आमची उत्पादने शहरातील अनेक मोठ्या विक्रीकेंद्रात उपलब्ध आहेत.ग्राहकांनी त्याचा लाभ ध्यावा.
संदाता: कपिलाश्रमात आयुर्वेदिक तुपाव्यतिरिक्त आणखी कोणती उत्पादने मिळतात?
बिल्वश्री: इथे आयुर्वेदिक गोरस, आयुर्वेदिक दही,आयुर्वेदिक ताक,आयुर्वेदिक लोणी, तसेच आयुर्वेदिक श्रीखंड,आयुर्वेदिक बासुंदी असे सर्व पदार्थ उपलब्ध आहेत.याशिवाय आयुर्वेदिक गोमूत्र,आयुर्वेदिक गोमय,आणि घरोघरी होणार्‍या पवित्र अग्निहोत्रविधीसाठी आयुर्वेदिक गोमली मिळतात.या वस्तूंची मागणी सतत वृद्धिंगत होत आहे.
संदाता: आचार्यजी, मुलाखतीची वेळ आता संपत आली आहे. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कोणता संदेश द्याल?
बिल्वश्री: पुरातन काळच्या ज्ञानी ऋषिमुनींनी हे आयुर्वेदशास्त्र निर्माण केले.जगातील अन्य कोणत्याही उपचारपद्धतीहून आयुर्वेद श्रेष्ठ आहे. त्यात संशोधन झाले नाही असे काहीजण म्हणतात.पण तसा प्रयत्‍न करणे म्हणजे त्या त्रिकालज्ञ ऋषींच्या ज्ञानाविषयी शंका घेणे होय. म्हणून आपण श्रद्धा ठेवावी आणि आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा अवश्य लाभ ध्यावा.
***********************************************************************************

Comments

मुलाखत

काल्पनिक असावी असा भास झाला.

अलिकडेच शंभर वेळा धुतलेल्या तुपाची माहिती वाचायला मिळाली होती.

नितिन थत्ते

+१

काल्पनिक असावी असा भास झाला.

चांगले विडंबन हे प्रामाणिक लेखनच वाटते! 'पो'चा नियम
या लेखनाला गांभीर्याने घेऊन कोणीतरी ग्लर्ज बनविण्याचा धोका वाटतो ;)

अलिकडेच शंभर वेळा धुतलेल्या तुपाची माहिती वाचायला मिळाली होती.

हे काय आहे बुवा?
ती माहिती नसल्यामुळे प्रस्तुत लेखनाचे प्रासंगिक प्रयोजन मला समजलेले नाही.

प्रचंड ह्सू येत होतं

वाचताना प्रचंड ह्सू येत होतं,,,एक अत्यंत विनोदी लेख/मुलाखत/साक्षात्कार इथे दिल्या बद्दल धन्यवाद

http://atruptaaatmaa.blogspot.com

जबरदस्त!

सर्वप्रथम हे लेखन 'उपक्रम'वर टिकून कसे राहिले याबद्दल आश्चर्य ( माहितीची देवाणघेवाण वगैरे) आणि नंतर खूप खूप मनोरंजन. यावरुन तांबे गुरुजींचे हे आठवले!
सन्जोप राव
अज्ञः सुखमाराध्य: सुखतरमाराध्यते विशेषज्ञः|
ज्ञानलवदुर्विदग्धं ब्रह्माऽपि नरं न रञ्जयति||
( अ़ज्ञान मनुष्याला पटविणे सुकर असते, विशेषज्ञाला पटविणे अधिकच सुकर असते. (पण) थोडक्या ज्ञानाने पंडित बनलेल्याला ब्रह्मदेवसुद्धा काही पटवू शकणार नाही.)

लिंक आवडली

मनोगतावरील लेख आवडला. लालित्य पुर्ण वळणाने जाणारा हा लेख उपक्रमावर कसा टिकून आहे? याबद्दल असे म्हणता येईल कि तो मनोरंजन, विरंगुळा, आस्वाद , विचार या सदरात टाकल्याने तो धोरणात बसतो.

प्रकाश घाटपांडे

सहमत

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.प्रकाश घाटपांडे लिहितात

,"मनोगतावरील लेख आवडला"

....तो लेख वाचला. प्रकाश यांच्या मताशी सहमत आहे.

मस्तच

ऋणं कृत्वा घृतम् पीबेत् मधील घृत हेच असावे. अशा घृतासाठी ऋण काढल्यास त्याने आरोग्य संपदा वृद्धींगतच होते.
प्रकाश घाटपांडे

३ चीअर्स फॉर यनावाला

३ चीअर्स फॉर यनावाला

गर्भसंस्कारित गाय हा प्रकार प्रचंड आवडला. यना अगदी पुलंची आठवण करून दिलीत. धन्यवाद
चन्द्रशेखर

निव्वळ गैरसमज

लेख एकांगी आहे.
अनेक ठिकाणी उपचार घेउन शेवटी आयुर्वेदीक उपचारानेच् बरे वाटण्याची असंख्य् उदाहरणे आहेत.

-१

आयुर्वेदिक उपचाराने बरे वाटत नाही असे लेखात कुठेही म्हटलेले नाही. मात्र आयुर्वेदाच्या नावाखाली जो काही भन्नाट प्रकार चालतो, तो फक्त् मांडला आहे. त्याचे एक उदाहरण म्हणजे वर उल्लेख केलेला मनोगतावरिल फर्मास लेख.

आयुर्वेदिक उपचारांनी बरे वाटतही असेल, पण त्यामागची थिअरी ऐकताना कित्येकदा डोक्याला शॉट्ट् बसतो.
मागे कुठल्या तरी अंकात लेखात एका पेप्रात "नारायण तेला"चे महत्व लिहिताना असे काहिसे लिहिले होते :-
"ब्राम्ह मुहूर्तावर नारायण जप पूर्वेकडे तोंड करुन् १०८ वेळेस करावा. मग ताम्र घटिकेतून नारायण तेल घेउन त्याने हळुवार मालिश करावी" आणखी एका लेखात विष्णुनाम वर्ज्य असेल तर कुलदेवतेचे स्मरण करावे असे लिहिले होते.
म्हणजे काय्? सैतानाचे स्मरण करत औषध घेतले तर् अपाय् होणार का? देवाचे स्मरण करत बचकाभर आर्सेनिक(अर्र्र् हे ऍलोपथिक झालं, चला आयुर्वेदिक हिरे किंवा धतुरा समजा) खाल्ले तर अपाय् व्हायचे टळेल का? पारंपरिक समजुतींसोबत आलेल्या ह्या गोष्टी म्हणजे कै च्या कैच आहेत का?

आयुर्वेदिक औषधी निरुपयोगी आहेत असे कुणीही म्हटलेले नाही. मात्र त्यात ह्या अशा पारंपरिक समजूती,श्रद्धा बेमालूम् मिसळून गेलेल्या आहेत.

--मनोबा

उथळपणा

तसे असेल तर मग एक लेख मॉडर्न मेडीसन वर पण येउ द्यात ना ? नेहमी आयुर्वेदालाच का अत्यंत उथळ पणे झोडता ?
मॉडर्न मेडीसन मध्ये तर घृणा येईल अशा गोष्टी सतत घडत असतात. स्वतःच्या पायानी उपचारासाठी गेलेली माणसे शववाहीकेतुन् घरी नेण्याची वेळ आलेली अनेक् उदाहरणे देता येतील्.

फरक

मॉडर्न मेडीसन मध्ये तर घृणा येईल अशा गोष्टी सतत घडत असतात.

त्याला वैज्ञानिक वैद्यक म्हणू नये.
आयुर्वेदातील मुख्य संकल्पनाच निराधार आहेत म्हणून त्याला झोडणे उचित आहे. दाखवा बरे ते त्रिदोष!

अभ्यास करा

अभ्यास केला तर् समजेल्, उथळ् पणे झोडणे ही सगळ्यात् सोपी गोष्ट् आहे. आयुर्वेदातील मुख्य संकल्पनाच निराधार आहेत मग् सरकारने त्या वर् बंदी घालावी.

बंदी

>>आयुर्वेदातील मुख्य संकल्पनाच निराधार आहेत मग् सरकारने त्या वर् बंदी घालावी

(शुद्ध) आयुर्वेदाला केद्रशासनाची मान्यता बहुधा नाहीच. विविध राज्यसरकारे आपल्या अखत्यारीत आपापल्या राज्यात प्रॅक्टिस करण्याची परवानगी देतात. महाराष्ट्रात महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन ही संस्था ही परवानगी व नोंदणी देते. अशी नोदणी प्राप्त असलेले आयुर्वेदिक डॉक्टर महाराष्ट्राबाहेर प्रॅक्टिस करू शकत नाहीत.

अवांतर: ऍलोपथीच्या डॉक्टराना आपल्या उपचारांची जाहिरात करण्याची बंदी असते. तशी जाहिरात करणार्‍या डॉक्टराची मान्यता रद्द होऊ शकते. आयुर्वेदाच्या डॉक्टराना मात्र असले काही नियम लागू नसतात. (मान्यताच नसल्याने रद्द होण्याचा प्रश्नच नाही).

नितिन थत्ते

छ्या!

इतके आपले नशीब कुठचे?
तुम्हाला आयुष माहिती नाही काय?

अभ्यास

अभ्यास केला तर् समजेल्, उथळ् पणे झोडणे ही सगळ्यात् सोपी गोष्ट् आहे.

करतो अभ्यास. पण त्यासाठी आयुर्वेदाचा उपचार-गुण सिद्ध करणारी एखाद दोन जर्नल आर्टिकल्स द्या पाहू.

तुम्ही झोडा ना!

आमचा आयुर्वेदाचा अभ्यास नाही असे तुम्हाला वाटते तर तुम्ही आम्हाला आयुर्वेदातील मुख्य संकल्पना शिकवा. आमचा अभ्यास आहे की नाही त्याची खात्री करून घेण्यासाठी आम्हाला प्रश्न विचारा.
"मुस्लिमांना चार बायका करण्याची अनुमती असते म्हणून आम्हालाही हवी" अशा छापाचा युक्तिवाद करू नका - आम्ही गाय मारणारच, तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही वासरू मारा. ऍलोपथीला झोडणारे लेख शक्य असतील तर तुम्ही लिहा, त्याला आमचा विरोध नसेल. वैज्ञानिक वैद्यक म्हणजे काय ते आम्ही तुम्हाला शिकवू.

फुकटची वकीली आणि

फुकट्ची शिकवणी सुध्दा ?

नेहमी?

तसे असेल तर मग एक लेख मॉडर्न मेडीसन वर पण येउ द्यात ना ? नेहमी आयुर्वेदालाच का अत्यंत उथळ पणे झोडता ?

नेहमी झोडता? इथे तरी आयुर्वेदावर यनावाला ह्यांचा एकच लेख आहे. तुम्हाला योगबलाने दिव्यदृष्टी वगैरे प्राप्त आहे का?
(बाकी यनावालांचा तो उद्देश नसला तरी तुमच्यासारखे उथळ डिवचले गेले की मजा येतो खरा :) ;)

थिल्लर्

अर्थात् आमची पण् अशा उथळपणाने बरीच् करमणूक् होते

चांगले आहे

पण करमणूक होते तर मग रडता कशाला?

बालीशपणा

अशा प्रकारांनी दुसरे रडतात असे समजुन समाधान मानणे हा बालीशपणा आहे.

द्याच

अनेक ठिकाणी उपचार घेउन शेवटी आयुर्वेदीक उपचारानेच् बरे वाटण्याची असंख्य् उदाहरणे आहेत.

सन्मान्य वैद्यकीय साहित्यात (म्हणजेच, आयुर्वेदिक जर्नल्स चालणार नाहीत) प्रकाशित पुराव्यांची माहिती द्या.

गल्लत

संदर्भ वाक्य आणि त्याचा प्रतीवाद यात काहीच समन्वय नाही

असत्य दावा

आयुर्वेदीक उपचारानेच् बरे वाटण्याची असंख्य् उदाहरणे आहेत.

हा दावा खोटारडा आहे. तो सत्य असल्याचे तुमचे प्रतिपादन असल्यास त्याच्या सत्यतेचा विश्वासार्ह पुरावा द्या.

लेख...

लेख छान. पण खरोखर असे कुठे घडले असेल ह्यावर विश्वास ठेवणे अंमळ कठीण वाटते.
मुद्दाम् व्यंगात्म लिहिणे, विडंबन करणे हाच उद्देश असेल तर प्रश्नच नाही.

--मनोबा

सहमत, आणि रंजक

[*आयुर्वेद ही आपली पूर्वापार चालत आलेली अनुभवाधिष्ठित उपचारपद्धती आहे.अनेक वनस्पती औषधी गुणांनी युक्त असतात यात शंका नाही.काही व्याधींवरील आयुर्वेदिक औषधोपचार हे अलोपाथिक उपचारांपेक्षा अधिक प्रभावी असू शकतील.हे सगळे मान्य आहे.मात्र काही ऐतिहासिक सत्यांवरून आयुर्वेद उपचाराच्या मर्यादाही स्पष्ट होतात हे सत्य दुर्लक्षूं नये.
*शिवाजी महाराजांच्या गुढगी आजारावर आयुर्वेद उपयोगी ठरला नाही.
*थोरले बाजीराव पेशवे धारातीर्थी पडले नाहीत. आजारी पडून अकाली वारले.आयुर्वेद उपचारांचा उपयोग झाला नाही.
*थोरले माधवराव क्षय रोगाने गेले.तिथे आयुर्वेदाचा प्रभाव पडला नाही.
*लो.टिळक,स्वामी विवेकानंद यांना मधुमेह होता.त्याकाळी इन्सुलिनचा शोध लागला नव्हता.आयुर्वेद निरुपयोगी ठरला.
*पटकी(कॉलरा),प्लेग.देवी,मलेरिया, पोलिओ अशा रोगांच्या निर्मूलनाच्या संदर्भात आयुर्वेदाचे काही योगदान आहे असे दिसत नाही.
*"आयुर्वेद ही जगातील सर्वश्रेष्ठ उपचारपद्धती आहे.आयुर्वेदोपचारांनी कोणताही रोग पूर्णतया बरा होतो."असे गोडवे गाण्यापूर्वी वरील वस्तुस्थितीचा विचार करावा.
*सध्या आयुर्वेदाच्या संदर्भात अति होते आहे असे दिसते. ते पाहून हसू येते इतकेच.]

सहमत, आणि रंजक.

कामधेनु

  • या मुलाखतीचे प्रायोजक कदाचित हिमालय उत्पादने, रामदेव बाबा, असतील.
  • आपल्या पुराणात गायीचा उल्ले़ख कामधेनू म्हणूनच केला जात असतो.
  • (कामधेनूवरील ही चित्रफीत!)
  • मध्य प्रदेश शासनानी अलिकडेच गो वंश प्रतिशोध Act (Bill for Protection of Cow Progeny) राष्ट्रपतीकडून पास करून घेतला आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक सोसायटीतील कार पार्किंगबरोबरच गायीसाठी गोठ्याची जागा आरक्षित ठेवावी लागेल. त्यामुळे आयुर्वेदिक गोमातांची पैदास होईल. "Incredible India"!

काल्पनिक की सत्य? ;-)

वरील संवाद काल्पनिक आहे की यनांनी खरेच कोठेतरी तुपासंदर्भात असे संवाद ऐकले आहेत? ;-)

उपक्रमावर ललित लेखन लिहू नये असा संकेत आहे. हे लेखन टिकलेले दिसले. लेखनामागचा उद्देश लक्षात घेता टिकले असावे काय? असो.

वाचून करमणूक झाली. मध्यंतरी सनातन.ऑर्गवर सात्विक वातींविषयी वाचले होते त्याची आठवण झाली.

+१

+१
लेखन मजेदार आहे. पण संपादनमंडळाने ललितलेखन टिकू दिले, ही बाब आश्चर्यकारक वाटते.

माझ्या मते श्री. नानावटी लेखनात करतात ती ललित भागाची कमाल मर्यादा असावी. (श्री. नानावटींच्या लेखांत तृतीयांश-ते-अर्धा भाग विचार-प्रयोगाची-ललित-कथा असते; आणि उर्वरित भाग त्या मुद्द्याविषयी चिंतन असते.)

श्री. यनावाला खुद्द (या पूर्वी) संवाद देऊन संवादात विचारमंथन करतात. तेसुद्धा ठीकच आहे. पण प्रस्तुत लेख उपक्रमाच्या धोरणाकरिता ठीक वाटत नाही.

काल्पनिक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
काही सदस्यांनी शंका प्रदर्शित केली की हे लेखन काल्पनिक आहे किंवा कसे? हे सर्व काल्पनिकच आहे. प्रत्यक्षात असे घडलेले नाही. पण जे लिहिले आहे ते वास्तवापासून फारसे दूर नसावे."आमच्या आश्रमात उत्पादित होणारे तूप अशा प्रकारचे असते" असे प्रकटन(जाहिरात) छापून आले तर ते खरे मानणारे अनेक ग्राहक असतील असे वाटते.

मस्त

लेख/संवाद आवडला.

सध्या आयुर्वेदाच्या संदर्भात अति होते आहे असे दिसते. ते पाहून हसू येते इतकेच.

परवाच आस्था च्यानेलवरती एकजण आयुर्वेदाच्या नावाखाली डाळींबाच्या पानांचा रस कानात ओतायला सांगत असताना पाहिला. ऐकू येण्या संबधीच्या सर्व दोषांचा समूळ नायनाट होतो ह्या खात्रीलायक दाव्यासकट विवेचन चालले होते.

अयुर्वेद वगैरे उपचार पद्धतींचा कच्चा दुवा म्हणजे त्यात कसलेही प्रमाणीकरण नाही. अगदी ढोबळ गोष्टींमधेही एक वैद्यबुवा जे सांगेल त्याच्याशी दुसरा क्वचितच सहमत होतो. दोघांपैकी बरोबर कोण हे ठरवणे प्रमाणिकरण नसल्याने अशक्य आहे.

दुसरा मुद्दा आयुर्वेदाची भलावण करताना पुढे येतो तो म्हणजे ह्या उपचारांना (इफेक्ट नसला तरी) साइड इफेक्ट नसतो हा. हे ही तितके खरे नाही. आयुर्वेदात वरचेवर वापरल्या जाणार्‍या भस्म वगैरे औषधांमधे एखादा जड धातू असतो ज्याचे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तरी शरीराला मोठा अपाय होऊ शकतो. आणि सगळ्यात धोक्याचे म्हणजे ह्या पुड्यांवर अन्न औषध विभागाचे कसलेही निर्बंध नाहीत.

सहमत

दुसरा मुद्दा आयुर्वेदाची भलावण करताना पुढे येतो तो म्हणजे ह्या उपचारांना (इफेक्ट नसला तरी) साइड इफेक्ट नसतो हा. हे ही तितके खरे नाही. आयुर्वेदात वरचेवर वापरल्या जाणार्‍या भस्म वगैरे औषधांमधे एखादा जड धातू असतो ज्याचे प्रमाण थोडे जरी जास्त झाले तरी शरीराला मोठा अपाय होऊ शकतो. आणि सगळ्यात धोक्याचे म्हणजे ह्या पुड्यांवर अन्न औषध विभागाचे कसलेही निर्बंध नाहीत.

हे खरे आहे. अशा प्रकारचे साईड इफेक्टस झालेले लोक माझ्या पहाण्यात आहेत.

स्टेरॉईड्स्..

भिती वाटते ना?

बापरे! डॉक्टर तुम्ही मला स्टिरॉईड्स देणार आहात?

नाही बाळा, मी तुला फक्त ज्येष्ठमधाची काडी (मधुयष्टी if you please) चावायला देणारे..

बापरे! साईड इफेक्ट्स??

नाही बाळा, पूर्ण आयुर्वेदिक उपचार! कसले साईड इफेकट?? (हां, ज्येष्ठमधांतील स्टिरॉईड्स बद्दलच्या लिंक्स् इथे कुणी देईल् का?)

****

वर फक्त उदाहरण झाले. हेवी मेटल्स् जाऊ द्या हो. इंडीयन्स् लाईक् इट. वर्ख असतो विड्यावर सुद्धा. ऍल्युमिनियमचाही चालतो..

:)

मुंबईतील केईएम या रुग्णालयात आयुर्वेदाविषयी संशोधन चालते. डॉ बापट आणि डॉ डहाणूकर या (प्रामाणिक परंतु) आयुर्वेदास भाव देणार्‍या डॉक्टरांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या विभागाच्या निष्कर्षांवर आयुर्वेदद्वेषाचा आरोप शक्य नाही. तेथील तपासात किती औषधांमध्ये स्टीरॉईड आणि जड धातू (रसायनशास्त्रातील धातू, आयुर्वेदातील नव्हे) सापडले ते येथे नमूद करण्यात आलेले आहे.

Large doses of glycyrrhizinic acid and glycyrrhetinic acid in liquorice extract can lead to hypokalemia and serious increases in blood pressure, a syndrome known as apparent mineralocorticoid excess (संदर्भ).
क्ष्

संदर्भ

सापडले ते येथे नमूद करण्यात आलेले आहे.

इथला दुवा एरर दाखवतो आहे. नेमका पेपर मिळू शकेल काय.

सुरेख

संवादात्मक लेख खुशखुशीत! धोरणात बसतो किंवा कसे याची काळजी पंत घेतीलच.

आम्ही घरी गायीचे दुध नुसतेच तापवून पाहिले. सायदेखिल आली नाही तर तुपा-बिपाची गोष्टच नाही! कदाचित तापवताना गायत्री मंत्राची तबकडी वाजवली तर साय धरेल असे वाटते. करून पहायला हवे.

तूर्तास साजूक तुपासाठी म्हशीचे दुध वापरले जाते आहे. (अवांतर - म्हैस काठेवाडी, रत्रांग्रीची नव्हे!)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ललित लेखन

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************

"पण प्रस्तुत लेख उपक्रमाच्या धोरणाकरिता ठीक वाटत नाही. "

»
श्री.धनंजय यांच्या प्रतिसादातून.
अन्य कांही सदस्यांनीसुद्धा असे मत व्यक्त केले आहे. मला हे मान्यच आहे. पण लेखाच्या प्रारंभी काही मुद्ये विचारार्थ मांडले आहेत.त्या आधारे लेख टिकेल असे वाटले. तसेच लेखन काल्पनिक आणि ललित प्रकारात मोडणारे असले तरी सध्याच्या एका सामाजिक प्रश्नावर गर्भित टीका आहे. असे मानणे योग्य व्हावे.सध्या आयुर्वेदासंदर्भात होणार्‍या अवास्तव दाव्यांविषयी अवश्य विचारमंथन व्हायला हवे.कुणाच्याही प्रभावाखाली न जाता चिकित्सक वृत्तीने दाव्यांचे/पुराव्यांचे मूल्यमापन करण्याची क्षमता किमान सुबुद्ध व्यक्तींत तरी असायला हवी या अपेक्षेने लिहिले आहे.

विचारमंथन तर व्हायलाच हवे

विचारमंथन तर व्हायलाच हवे.

गर्भित टीका वगैरे सगळे प्रकार त्यांच्या ठिकाणी ठीकच आहेत. येथे ललित संवादाची भट्टीदेखील जमली आहे.

माहितीपूर्ण लेखात सांगता गर्भित नको. माहिती आणि मंथन लेखातील मोठ्या भागात थेट हवे.

अर्थात धोरणे ठरवणारे संपादक मंडळ आहे. मी नव्हे.

वर दिलेल्या संवादासारखे प्रकार प्रत्यक्षात होतात : अशा संवादाचे उदाहरण उद्धृत करून थेट मंथन करता आले असते.

आपण संपादक नाही..मग नसते फाटे कशाला?

अर्थात धोरणे ठरवणारे संपादक मंडळ आहे. मी नव्हे.

अगदी बरोबर! माहितीपूर्ण आणि ललित ह्यांना वेगळी करणारी ठळक रेषा दरवेळी असतेच असे नाही. अशा वेळेस संपादक त्यांच्या तारतम्याने ते ठरवतात असा इथला अनुभव आहे. त्यामुळे अमके चौकटीत बसते का? वगैरे खुसपटं संपादक सोडून इतरांनी काढण्यात काय हशील? अर्थात हे तुम्हाला उद्देशुन नाही, हे लेखन अजून इथे कसे असे विचारणार्‍या सर्वांना उद्देशुन आहे.

सहमत| असहमत

माहितीपूर्ण आणि ललित ह्यांना वेगळी करणारी ठळक रेषा दरवेळी असतेच असे नाही. अशा वेळेस संपादक त्यांच्या तारतम्याने ते ठरवतात असा इथला अनुभव आहे.

सहमत.

अमके चौकटीत बसते का? वगैरे खुसपटं संपादक सोडून इतरांनी काढण्यात काय हशील?

अमके चौकटीत बसते का? असा प्रश्न विचारणारे काही खोडसाळ सदस्य उपक्रमावर होते. संकेतस्थळाने त्यांच्यावर योग्य कार्यवाही केली होती असे लक्षात आहे. परंतु या चर्चेत असा प्रश्न विचारणारे हे रोजचे उपक्रमी वाचक आहेत. त्यांनी अशा शंका विचारणे मला रास्त वाटते. किंबहुना, अनेक प्रकाशित झालेल्या लेखांवर सदस्य अशाप्रकारची टिप्पणी करतात आणि ते कधीकधी संपादकांना लेखांवर पुनश्च नजर फिरवण्यास भाग पाडते असे वाटते. या लेखाबद्दल तसेही म्हणता येत नाही. हे ललित लेखन आहे हे स्पष्ट दिसते आहे. तेव्हा संपादकांच्या डुलक्या म्हणायला हवे. :-)

असो. माझ्यामते नित्यनियमाने लिहिणारे लेखक आणि लेखनाचा उद्देश माहित असल्याने लेखन टिकले असावे. तरीही, यनावाला यांनी उपक्रमाच्या धोरणांचा आदर करून अशाप्रकारचे* लेखन पुनश्च टाकू नये अशी विनंती करते.

* अशाप्रकारचे म्हणजे वरील संवाद यावा. तो करमणूकप्रधान आहे यात शंका नाही. वाचूनही मनोरंजन झाले पण त्यावर जी त्रोटक टिप्पणी आहे ती विस्ताराने यावी. यामुळे बॅलन्स साधला जाईल.

हा हा...

छान करमणुक झाली.

अवांतरः मध्यंतरी एका इस्कॉन वाल्या मित्रानं "हाउ दे ट्रीट आवर मदर काउ" असा विषय असलेला एक लेख पाठवला होता. त्याच्याखालीच एक विडीओची लिंकपण होती. त्या विडीओत गाई आणि तस्तम प्राण्यांचे पाश्चात्य कत्तलखान्यातले हाल दाखवले होते. अक्षरशः अंगावर काटा आला बघून. त्या प्राण्यांना हाल-हाल करून मारतात हो. अगदी पोल्ट्री मधल्या कोंबड्यांची पण अवस्था बघवत नाही. पण मग विचार केला, ह्या प्राण्यांचा आकार मोठ्ठा आहे म्हणून त्यांचा आकांत दिसतो. शेवटी जीव तो जीवच. डीडीटी घातलेल्या मुंग्या किंवा बेगॉन मारलेली झुरळं सुद्धा अशीच तडफडत असतील. मग विचार करणं सोडून दिलं. :)

किडेमुन्ग्या

असाच विचार हिटलरच्या बाबतीत करणारे असू शकतील का?

अलबत!

इतर प्राणी आणि माणसं ह्यांच्यामधे जीवशास्त्राच्या दृष्टीनं काहीच फरक नाही. समाजशास्त्रात मात्र माणूस या प्राण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. :)

नियम पाळणे आवश्यक

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
हे पटले.
प्रियाली म्हणतात,"यनावाला यांनी उपक्रमाच्या धोरणांचा आदर करून अशाप्रकारचे* लेखन पुनश्च टाकू नये "
तसेच
"पण प्रस्तुत लेख उपक्रमाच्या धोरणाकरिता ठीक वाटत नाही. "

असे श्री.धनंजय लिहितात.
. ..
दोघांचेही म्हणणे योग्यच आहे. आपण ज्या ठिकाणी वावरतो,सोयी-सुविधा वापरतो तिथले नियम पाळायला हवेत याविषयी दुमत नाही.या संदर्भात इतःपर दक्षतापूर्वक प्रयत्नशील राहीन.

माहितीपूर्ण

हे आयुर्वेदवाले आपली उत्पादने विकण्यासाठी काय काय लालित्यपूर्ण लांड्यालबाड्या करतात हे सांगणारे अत्यंत माहितीपूर्ण लेखन. जाता-जाता: कालच राज्याच्या मेडिकल काउन्सिलांनी कॅन्सर आणि एचआयव्हीसाठी अक्सीर इलाजाचा दावा करणाऱ्या रामदेव बाबांविरुद्ध ठराव पास केला आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

हं

नागपूरच्या आयएमए चे सदस्यांनी या महनीय बाबांकडून मेडियासमोर माफीनामा लिहून घेतला आहे असे मला 'फर्स्ट् हँड् इन्फरमेशन' ने ठाऊक आहे,..

लेख आवडला

या बाबा आणि पंत लोकांनी आयुर्वेदाची आणि अध्यात्माची अशी काही सांगड घालून ठेवली आहे की बस्स.
आयुर्वेद शुध्द आहे अशी दवंडी पिटणारे लोक स्वत:च तो अशुध्द करताहेत.

कठीण आहे.

उपक्रम हे मराठी संस्थळांवरील वैचारिक दृष्ट्या परिपक्व असलेल्या लोकांचा अधिकतम वावर असलेले संस्थळ आहे असे माझे गृहितक आहे. इथे, श्रद्धा अन् विश्वास यांतील सूक्ष्म सीमारेषा जोखून पाहिली जाते, असे येथील चर्चा वाचून बर्‍याचदां जाणवले आहे. तरीही, या धाग्यावर बरेच ट्रॉलिंग पाहिले. असो. इथे प्रतिसाद धाग्यापेक्षा मोठा होण्याचा प्रमाद संभवतो आहे, तो सहन करून पुढे टाईप करतो.

अभ्यास करीत गेलो, तर, मानवी शरीर. अन् इतरही सगळीच शरीरे. प्राणी असोत की वनस्पती. उत्क्रांती होत एकत्र आलेल्या या अणूरेणूंनी एक् 'होमेओस्टॅसिस्' किंवा 'सेल्फ् करेक्टिंग् सिस्टीम' तयार केलेली आहे असे जाणवते. स्वतःमध्ये असलेली उणीव/आजारपण दुरुस्त करण्याची स्वयंभू उर्मी प्रत्येक जीवात असते. व्हायरस सारख्या अर्धवट जिवंत जीवांपासून मानवासारख्या अती उत्क्रांत जीवांपर्यंत, हे होतच आले आहे.

मानवाने हे 'दुरुस्त' होणे पाहिले. त्याची नक्कल केली. "monkey see monkey do" यालाच वैद्यक म्हणतात. आदीम टोळी करून रहाणार्‍या माणसांत, टोळीच्या प्रमुख योध्याबरोबरीचे स्थान त्या टोळीतील 'वैद्यास' होते. अन् अजूनही आहे.

हेच ग्लॅमर फार लोकांस भुलविते. (म्हणूनच 'क्वॅक्स्' उदयास येतात, ज्यांबद्दल् प्रस्तुत मूळ लेख आहे.) आज 'ती' टोळी फार प्रगत झालेली आहे. ३ लाख वर्षे अन् ३-५ हजार वर्षे. ज्ञात इतिहास अन् मनुष्य जन्माचा इतिहास (अंदाजे)

आजही आपण आपल्या चिमुकल्यास काही झाले, तर डॉक्टरापेक्षा कुणी आज्जी सांगते तसे वागतो. त्यात डॉक्टराच्या फीचा विषय असो, किंवा केमिस्टाच्या बिलाचा. (डॉक्टराची फी १५०. केमिस्टाचे बिल् १२००. आपले 'लॉजिक'=डॉक्टराने लिहिले:म्हणजे त्याचीच कमाई.) किंवा आज्जीवरील विश्वासाचा. यात, १० पैकी ६ वेळा, 'स्टॅटिस्टिकली सिग्निफिकंट्' बहुधा... आज्जी ची ट्रीटमेंट बाळाला बरे करते.

असे आपल्याला वाटते.

या ६ पैकी ५ वेळा, 'होमिओस्टॅसिस'ने काम केलेले असते. हे समजून घ्यायची आपली तयारी कधीच नसते. "I did NOT consult a Doctor, yet my child got better" हा 'ईगो' यात असतो. असो.

आता मुद्दा.

टोळीतील मानवांच्या काळापासून, The people who were wearing the Mantle of the Healer were not stupid. हे जे लोक होते, अन आहेत, ते मानवी जीवाचे 'बरे' करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आयुर्वेद लिहिला गेला, तेव्हांचे 'योद्धे' अन् आजचे यांत फार फरक नाही. त्यांनी जी निरिक्षणे केली, की उदा. मधूमेही रुग्णाच्या लघवीस मुंग्या लागतात.. It is uncomparable. Too good! अरे वा! पण. त्याच आयुर्वेदाने मधुमेह 'असाध्य' म्हटला. याच आयुर्वेदाची तत्वे कधीतरी १२-१३व्या शतकांत मध्य पूर्वेस गेली. ती युनानी झाली. ती युरोपात गेली. (तुर्कांनी कॉन्स्टँटीनोपल्.. वै???) तिथे 'एलोपथी' माजली होती. मग् 'होमिओपथि' पण् येऊन गेली होती. मग् नंतर 'मॉडर्न' मेडिसिन इ..

मी वैद्यकशास्त्राचा विद्यार्थी आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण संपवून मला २५-३० वर्षे झाली आहेत. तरीही मी विद्यार्थी आहे. मला माझ्या 'स्पेशालिटी' बद्दल् शिकत रहावे लागते, अन्यथा, मला २०-२५ वर्षे ज्युनियर असे लोक येउन माझे दुकान बंद करू (पाडू) शकतात. हिप्पोक्रॅटिक ओथ् मधे, मी मला येत असलेले वैद्यक माझ्या सहकार्यांना विनामूल्य शिकवीन, असे एक् वाक्यही आहे. (सध्या मेडिकल काऊन्सिल महाराष्ट्रातील डॉक्टरांस 'कंटीन्यूड् मेडिकल एज्युकेशन'चे १२ तास पूर्ण करून त्यांचे रजिस्ट्रेशन नूतनीकरण करण्यास भाग पाडत आहे. हे अवांतर्. 'तुमच्या' आरोग्यासाठी)

इतकी बडबड केली तिचा उपयोग झाला की नाही ते ठाऊक नाही. आता समारोप करतो.

आयुर्वेदाशी भांडण यासाठी, की हे जे 'ज्ञान' आहे, ते सुमारे १००० वर्षांपूर्वी थिजले. ते ज्ञानच 'अल्टिमेट' आहे असा दावा करणारे सर्व भोंदू आहेत, अन् जर आपण तो दावा मान्य करीत असाल तर आपण अंधश्रद्धाळू आहात, असे माझे म्हणणे आहे.

इति लेखनसीमा.

+१

छान.

 
^ वर