कपिलाश्रमातील घृतोत्पादन प्रकल्प

आयुर्वेदिक सिद्ध घृत
[*आयुर्वेद ही आपली पूर्वापार चालत आलेली अनुभवाधिष्ठित उपचारपद्धती आहे.अनेक वनस्पती औषधी गुणांनी युक्त असतात यात शंका नाही.काही व्याधींवरील आयुर्वेदिक औषधोपचार हे अलोपाथिक उपचारांपेक्षा अधिक प्रभावी असू शकतील.हे सगळे मान्य आहे.मात्र काही ऐतिहासिक सत्यांवरून आयुर्वेद उपचाराच्या मर्यादाही स्पष्ट होतात हे सत्य दुर्लक्षूं नये.
*शिवाजी महाराजांच्या गुढगी आजारावर आयुर्वेद उपयोगी ठरला नाही.
*थोरले बाजीराव पेशवे धारातीर्थी पडले नाहीत. आजारी पडून अकाली वारले.आयुर्वेद उपचारांचा उपयोग झाला नाही.
*थोरले माधवराव क्षय रोगाने गेले.तिथे आयुर्वेदाचा प्रभाव पडला नाही.
*लो.टिळक,स्वामी विवेकानंद यांना मधुमेह होता.त्याकाळी इन्सुलिनचा शोध लागला नव्हता.आयुर्वेद निरुपयोगी ठरला.
*पटकी(कॉलरा),प्लेग.देवी,मलेरिया, पोलिओ अशा रोगांच्या निर्मूलनाच्या संदर्भात आयुर्वेदाचे काही योगदान आहे असे दिसत नाही.
*"आयुर्वेद ही जगातील सर्वश्रेष्ठ उपचारपद्धती आहे.आयुर्वेदोपचारांनी कोणताही रोग पूर्णतया बरा होतो."असे गोडवे गाण्यापूर्वी वरील वस्तुस्थितीचा विचार करावा.
*सध्या आयुर्वेदाच्या संदर्भात अति होते आहे असे दिसते. ते पाहून हसू येते इतकेच.]

आयुर्वेदिक सिद्ध घृत
आयुर्वेदाचे प्रकांड पंडित आणि सर्वज्ञ डॉ.बिल्वाचार्य पंचपात्रे यांची मुलाखत एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या संवाददात्याने घेतली.ती नंतर दूचिवा वरून प्रक्षेपित झाली.त्या मुलाखतीचा काही भाग खाली दिला आहे. या साक्षात्कारात (मुलाखतीत):
.............संदाता=संवाददाता
.............बिल्वश्री=डॉ.बिल्वाचार्य पंचपात्रे...(डॉ.बि.पं.यांचे बिल्वपत्रांविषयींचे संशोधन प्रसिद्ध आहे.बिल्वपत्रातून सकारात्मक धन ऊर्जेचे उत्सर्जन होते.त्याचे एक साप्ताहिक चक्र असते.प्रत्येक सोमवारी या ऊर्जेचे प्रमाण सर्वाधिक असते,हे त्यांनी काढलेल्या आलेखांवरून सप्रमाण सिद्ध होते.अखिलविश्व वेदविज्ञान संशोधन आणि प्रसार मंडळ,मुंजाबाचा बोळ,पुणे या संस्थेने डॉ.बिल्वाचार्य यांच्या संशोधनाला मान्यता दिली आहे हे आपण जाणताच).
.
संदाता: नमस्ते प्रेक्षकहो! आज आमच्या स्टुडिओत विश्वविख्यात आयुर्वेदतज्ज्ञ डॉ.पंचपात्रे साक्षात् उपस्थित आहेत.त्यांच्या आश्रमात आयुर्वेदिक घृतोत्पादन प्रकल्प चालू झाला आहे.त्याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ.नमस्ते डॉक्टर!
बिल्वश्री: नमस्कार! आयुर्वेदाची महती आणि उपयुक्तता सर्व लोकांना पटली आहे.आयुर्वेदिक उत्पादनांचा प्रसार जगभर वाढत आहे.अशा आयुर्वेदाविषयी आणि आमच्या नवीन प्रकल्पाविषयी चार शब्द सांगण्याची संधी मिळत आहे याबद्दल मी आपल्या वाहिनीचा आभारी आहे.
संदाता: घृत शब्दाचा नेमका अर्थ काय तो आमच्या प्रेक्षक श्रोत्यांसाठी सांगावा.
बिल्वश्री: घृत या संस्कृत शब्दाचा अर्थ गाईचे तूप असा होतो."आज्य" म्हणजे बकरीचे तूप.कारण अजा शब्दाचा अर्थ बकरी,शेळी असा आहे.आज्य तूप काही आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीत तसेच होम-हवनात वापरतात."घृत"तुपाचा वापर मुख्यत्वेकरून खाद्य पदार्थात होतो.आमच्या कपिलाश्रमात आयुर्वेदिक सिद्ध घृतोत्पादन प्रकल्पाचा प्रारंभ झाला आहे.
संदाता: या तुपाला तुम्ही सिद्ध तूप का म्हणता,शुद्ध तूप का म्हणत नाही?
बिल्वश्री: हे तूप शुद्ध असतेच.पण निर्मितिप्रक्रिया करताना काही दुर्मिळ दिव्य आयुर्वेदिक वनस्पतींचे औषधी गुण या तुपात उतरवतात.म्हणून त्याला सिद्ध घृत म्हणायचे.तसेच ते शतधौत असते.
संदाता:कपिलाश्रमात किती गाई आहेत?
बिल्वश्री: आमच्या आश्रमात एकावन आयुर्वेदिक गोमाता आहेत.
संदाता: आयुर्वेदिक गाई?
बिल्वश्री: गाईवर शास्त्रोक्त गर्भसंस्कार झाल्यावर जी शुभलक्षणी कालवड जन्माला येते,ती आयुर्वेदिक गोमाता होय.अशा गाई दुष्प्राप्य असतात.
संदाता: आयुर्वेदिक सिद्धघृत निर्मितीची प्रक्रिया कशी असते?
बिल्वश्री: पहाटे ब्राह्म मुहूर्तावर आश्रमात भूपाळ्या लागतात.तेव्हा गाई जाग्या होतात.आश्रमातील सर्व गोमातांची शास्त्रोक्त षोडशोपचारपूर्वक पूजा करून त्यांना आरती ओवाळतात.शुभ कुंकुमतिलक लावतात आणि त्यांना आयुर्वेदिक गोग्रास देतात.त्यासाठी प्रशिक्षित पुरोहित आश्रमात आहेत.
नंतर आयुर्वेदिक पद्धतीने गोदोहनाचा-- म्हणजे गाईची धार काढण्याचा-- कार्यक्रम असतो.आश्रमातील गोपी ते काम करतात.गोदोहनाच्या वेळी शास्त्रीय संगीत चालू असते.ते ऐकून गाईंना आनंद होतो.त्या अधिक दूध देतात.तसेच त्या गोरसात धनभारित पवित्र ऊर्जा अधिक प्रमाणात असते.
संदाता: तुमच्या आश्रमातील गोस्थाने म्हणजे गोठे पाहिले.वेगवेगळे बारा गोठे आहेत.एकावन्न गाईंकरिता एवढ्या स्थानांचे कारण काय?
बिल्वश्री; तुम्ही गोस्थाने पाहिली.पण त्यांच्या नावांकडे तुमचे लक्ष गेले नाही,असे दिसते.ती बारा राशींची नावे आहेत.प्रत्येक गोस्थानात त्या त्या राशीच्या गाई बांधतात.प्रत्येक गोस्थानात स्वतंत्र ध्वनिवर्धक आहे.गोदोहनाच्या वेळी त्या त्या राशीला अनुकूल अशा रागातील संगीत लावतात.त्यामुळे दुग्धोत्पादन वाढते.
संदाता: गाईला जन्मरास असते?
बिल्वश्री: हो तर.आमच्या सर्व आयुर्वेदिक गाईंच्या जन्मकुंडल्या मी स्वत: केल्या आहेत.प्रत्येक गाईचे संगोपन तिच्या पत्रिके अनुसार होते.
संदाता: या गाईंना कधी आजार होतात का हो?
बिल्वश्री: बहुधा नाहीच.मघाशी एक सांगायचे राहिले.पहाटे गोपूजनापूर्वी प्रत्येक गाईला अभ्यंग करून मग आयुर्वेदिक जलाने शुभस्नान घालतात.तसेच प्रत्येकीवर नियमितपणे आयुर्वेदिक पंचकर्मक्रिया करतात.ही क्रिया माणसांवर करतात त्याहून अगदी भिन्न आहे.आम्ही ती विकसित केली आहे. त्यामुळे आजार उद्भवत नाही.झालाच तर आयुर्वेदिक औषधोपचार करतो.
संदाता: छानच आहे.गोदोहनानंतर पुढची पायरी कोणती?
बिल्वश्री: गोदोहन झाल्यावर त्या गोरसावर मंदाग्निसंस्कार करतात.त्यावेळी वर येणारी साय विरजणात घालतात.अशा रीतीने दही तयार होते.
संदाता: हे आमच्या प्रेक्षकांना चांगले समजले असेल.आता पुढे.
बिल्वश्री: पुढचा कार्यक्रम म्हणजे दधिमंथन. मोठ्या रांजणात दही घालून, दोरीच्या सहाय्याने उंच रवी फिरवून गोपी दही घुसळतात. आम्ही यासाठी कोणतीही यांत्रिक पद्धत वापरत नाही.या मंथनसंस्काराच्या वेळी भक्तिगीते (राधा गौळण करिते मंथन अविरत हरीचे मनात चिंतन।..यासारखी) लावतात अथवा गौळणी स्वमुखे गातात.प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चिंतन केल्यामुळे त्यांना प्रिय असलेले नवनीत शुद्ध स्वरूपात चटकन वर येते.त्यामुळे मंथनकार्य त्वरित होते.वेळ आणि श्रम वाचतात.
<स्त्रोन्ग्>संदाता: चांगली कल्पना आहे.आता ते लोणी कढवतात ना?
बिल्वश्री:या नवनीतावर आयुर्वेदिक अग्निसंस्कार करतात.त्यावेळी त्यांत काही दुर्मीळ दिव्य औषधी वनस्पतींची पाने घालतात.त्यांचे औषधी गुण तुपात उतरतात.तसेच या अग्निसंस्काराच्यावेळी सामवेदातील मंत्रांचा घोष अखंड चालू असतो.त्यामुळे अत्यंत शुद्ध, पवित्र, निर्दोष आणि अष्ट सात्त्विक गुणांनी युक्त असे कपिलाश्रम आयुर्वेदिक घृत सिद्ध होते.
संदाता: तुम्ही फार छान समजावून सांगितले.पण घरोघरी अशा प्रक्रियेने तूप करणे शक्य होणार नाही.
बिल्वश्री: म्हणूनच आम्ही निर्मिती प्रकल्प चालू केला आहे ना? आमची उत्पादने शहरातील अनेक मोठ्या विक्रीकेंद्रात उपलब्ध आहेत.ग्राहकांनी त्याचा लाभ ध्यावा.
संदाता: कपिलाश्रमात आयुर्वेदिक तुपाव्यतिरिक्त आणखी कोणती उत्पादने मिळतात?
बिल्वश्री: इथे आयुर्वेदिक गोरस, आयुर्वेदिक दही,आयुर्वेदिक ताक,आयुर्वेदिक लोणी, तसेच आयुर्वेदिक श्रीखंड,आयुर्वेदिक बासुंदी असे सर्व पदार्थ उपलब्ध आहेत.याशिवाय आयुर्वेदिक गोमूत्र,आयुर्वेदिक गोमय,आणि घरोघरी होणार्‍या पवित्र अग्निहोत्रविधीसाठी आयुर्वेदिक गोमली मिळतात.या वस्तूंची मागणी सतत वृद्धिंगत होत आहे.
संदाता: आचार्यजी, मुलाखतीची वेळ आता संपत आली आहे. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना कोणता संदेश द्याल?
बिल्वश्री: पुरातन काळच्या ज्ञानी ऋषिमुनींनी हे आयुर्वेदशास्त्र निर्माण केले.जगातील अन्य कोणत्याही उपचारपद्धतीहून आयुर्वेद श्रेष्ठ आहे. त्यात संशोधन झाले नाही असे काहीजण म्हणतात.पण तसा प्रयत्‍न करणे म्हणजे त्या त्रिकालज्ञ ऋषींच्या ज्ञानाविषयी शंका घेणे होय. म्हणून आपण श्रद्धा ठेवावी आणि आयुर्वेदिक उपचारपद्धतीचा अवश्य लाभ ध्यावा.
***********************************************************************************

Comments

प्रतिसाद आवडला.

.

 
^ वर