एका सुंदर कलेचा अस्त... अपरिहार्य.

आजकाल संगणकाच्या युगात सुंदर हस्ताक्षराचे कौतूक आणि हातावर अतिशय सुंदर व बारीक शेवाया करणाऱ्या आईचे कौतूक या दोन्ही गोष्टी एकाच पठडीतल्या. कारण आता यांत्रिकी करणामूळे विनासायास जर सफाईदार अक्षर लिहीणे (आणि अर्थात शेवाया करणे) जमत असेल तर जून्या कलांना जोपासण्याचा अट्टहास धरणे हे नॉस्टाल्जिकच (गतकालरमणीय ??) म्हणावे लागेल. मी शालेय जीवनापासून माझ्या हस्ताक्षराचे तोंडभरून कौतूक ऐकत आलो आहे. अगदी अलिकडे ही सुंदर मराठी अक्षर पाहीले की लोक आनंदाची (आणि आश्चर्याचीही) प्रतिक्रीया देतात. बऱ्याचदा अर्ज वगैरे लिहीतांना मी मुद्दाम हस्ताक्षरात देत असे. कारण टंकलेखन किंवा संगणकावरून अर्ज तयार करणाऱ्यांचे अक्षरच मूळात चांगले नसते असा माझा समज होता. पण संगणकाच्या युगात हस्ताक्षराने अर्ज लिहून वेळ व श्रम वाया घालवणे हे मागासलेपणाचे लक्षण असल्याचे बोधामृत प्राशन केल्यावर मी हस्तलिखिताच्या अट्टहासातून (आणि सुंदर हस्ताक्षराच्या गर्वातून) बाहेर आलो. आज शतकी बेरजा व वजाबाक्या करणे आपल्याला कैलक्यूलेटर शिवाय जमत नाही. आणि विसाच्या पूढचे पाढे पाठ करणे हे तर आदीमपणाचेच लक्षण ठरेल. (पावकी , सवाकी, दिडकी आठवल्या...) त्यामूळे आता लिहीण्याची बाब ही संगणकीय झाली आहे. काहीबाही सटरफटर नोंदी पूरत्या उरलेल्या हस्ताक्षरलेखनालाही आता जड अंतःकरणाने का होईना निरोप द्यायलाच हवा.

लेखनविषय: दुवे:

Comments

उलट

याच्या बरोबर उलट होणार आहे. टच-स्क्रीनच्या युगात की-बोर्ड बाद होऊन हातानेच स्क्रीनवर लिहिता येईल. त्यातलेही बरेचसे लिखाण स्पीच रेकग्निशनने होईल. हस्ताक्षर चांगले असणे अनिवार्य होईल. त्याशिवाय संगणकावर लिहिणे शक्य होणार नाही. तेव्हा एवढ्यातच तुमच्याकडच्या पुस्त्या फेकून देऊ नका.

~+१

जवळजवळ असेच. म्हणजे स्क्रीनवर लिहिता येईल, आणि लिहिणे सामान्य होईल, याबाबत सहमती.

पण हस्ताक्षर चांगले असण्याची गरज असणार नाही. संगणकाला समजेल, इतपत ठीकठाक असले तर पुरेसे असेल.

+१

दोघांशीही सहमत.
--मनोबा

म्हंजे

ती बेलबॉटम प्यांटीची फ्याशन् परत आडवी इस्त्री घेऊन आली होती तसलं का हो, दुर्मुख साहेब?

पण नव्या जाणीवेचा उदय देखील झाला आहेच की....!

हाताने लिहीणं ही एक सोय होती. आता नव्या काळात हाताने लिहीणं हे गैरसोयीचं असून संगणकावर टंकन करणे हे स्वत:च्या व इतरांच्या सोयीचं आहे.

कागदावर लिहीलेलं जास्त काळ टिकू शकत नाही. पण संगणकाच्या मदतीने टंकलेले मिटवल्या शिवाय मिटू शकत नाही, तसेच ते स्थानांतरीत करणे देखील सोयीचे आहे.

चांगले हस्ताक्शर असणे ही पूर्वीची गरज होती. आताच्या काळात आपल्याला जे सांगायचे आहे ते व्यवस्थित शब्दात, वाक्यात ओतता येणं गरजेचे आहे. व्याकरण विशयाचा हा भाग आकळून घेणं गरजेचे आहे. कारण कार्यालयात काम करताना, किंवा कायद्या संबंधाबाबतचे काम करताना तो अभ्यास उपयोगाचा पडू शकतो.

रावले यांचेशी सहमत

+१०१...टू...रावले सतीश,दुसरं असं की जुन्या/उपयुक्त वाटणार्‍या/असणार्‍या गोष्टी ज्यांना सोडायच्या नाहीत,त्यांच्या काही नविन तंत्रद्न्यान हे सोडा आणी आंम्हास स्विकारा म्हणुन पाठिस पडत नाही...

http://atruptaaatmaa.blogspot.com

हरकत नाही

हरकत नाही. :-(

माणसाने दगडावर कोरणे, भाजलेल्या मातीच्या पाट्या बनवणे, भूर्जपत्रांवर लिहिणे, शाईचा वापर ते बॉलपेन वगैरे करता करता अनेक जुन्या गोष्टींना फाटा दिला आहे. तरीही या कला संपुष्टात आल्यात असे म्हणता येत नाही. लेखनाचेही तसेच होईल. अद्यापही शाळा, कॉलेजांत अनेक विषयांसाठी हातानी लेखन करावे लागते. अनेकदा मिटींगमध्ये नोट्स घेताना मी त्या कागदावर खरडते. हे असे सुरू राहिल. अंतकाळ एवढ्या लवकरही आलेला नाही पण बदल निश्चित असतो. त्याची खंत वाटली तरी ती तेवढ्यापुरतीच असावी.

दासबोधः दशक १९वा: शिकवणनाम

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
यात सुंदर हस्ताक्षराविषयीं लिहिले आहे:
शिष्याने बाळबोध अक्षर|घडसून करावे सुंदर| जे देखतांचि चतुर | समाधान पावती||
वाटोळें सरळें मोकळें|वोतले मसीचें काळें|कुळकुळीत वोळी चालल्या ढाळे|मुक्तामाळा जैशा||
पहिले अक्षर जें काढिले|ग्रंथ संपेतो पाहात गेले|येक्या टांकेचि लिहिले|ऐसे वाटे||
अक्षराचे काळेपण|टांकाचे ठोसरपण|तैसेचि वळण वांकण सारिखेची||
वोळीस वोळी लागेना|आर्कुली मात्रा भेदीना|खालिले वोळीस स्पर्शेना| अथवा लंबाक्षर|| भोवतें स्थळ सोडोनि द्यावे|मध्येच चमचमीत ल्याहावे|कागद झडतांही न झडावें|लागेचि अक्षर||
[आर्कुली=रफार]

शिष्याने नव्हे, ब्राम्हणे

शिष्याने बाळबोध अक्षर|घडसून करावे सुंदर| जे देखतांचि चतुर | समाधान पावती||
ही ओवी दासबोधात मूळ अशी आहे:
ब्राह्मणें बाळबोध अक्षर| घडसुनी करावें सुंदर |
जें देखतांचि चतुर| समाधान पावती ||१||
दुवा: http://sanskritdocuments.org/marathi/dndAs/dAsabodh19_unic.html

हा संपूर्ण समास मी ज्या शिक्षण संस्थेत शिकलो, तिथे सुप्रसिध्द सुलेखनकार श्री. आर. के. जोशी याच्या अतिशय सुंदर हस्ताक्षरात भित्तीचित्राच्या स्वरूपात लावला होता. तो अजूनही स्मरणात आहे. तिथेही ब्राम्हणे असाच शब्द होता.

- स्वधर्म

सुंदर हस्ताक्षर मात्र दुर्मिळ

प्रियाली यांच्याशी सहमत..
लिहिणे इतक्या लवकर मरेल असे काही वाटत नाही.. परंतु सुंदर हस्ताक्षर मात्र दुर्मिळ होईल असेच वाटतेय..

समग्र समास

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.स्वधर्म यांनी लेखनक्रिया या समग्र समासाचा संदर्भ दिला हे छान झाले.समास वाचून त्या काळच्या लेखनसामग्रीची कल्पना येते.त्याकाळीं कागद दुर्मीळ होता.
* "शिष्याने बाळबोध अक्षर"... या ऐवजी दासबोधात "ब्राह्मणे बाळबोध अक्षर..." आहे असे स्वधर्म म्हणतात ते खरेच आहे.

मदत पाहिजे.

जुन्या कला टिकल्याच पाहिजेत.

मला गारगोटीवर गारगोटी आपटून एका झटक्यात आग पेटवायची सुंदर कला शिकायची आहे. ही कला शिकवणारे क्लास कुठे मिळतील?

नितिन थत्ते

अवांतर : कदाचित पुढच्या काळात सुंदर अक्षरवाल्याची काही पत्रास राहू नये. जर प्रत्येक जण संगणकावर लिहील तर प्रत्येकालाच आपले प्रेझेंटेशन/कम्युनिकेशन सुंदर अक्षरात करता येईल. सुंदर अक्षर राहीलच .... ते काढू शकणार्‍याची काहीच खास पत नसेल

सहमत आणि गारगोटी

सुंदर अक्षर राहीलच .... ते काढू शकणार्‍याची काहीच खास पत नसेल
थत्ते यांच्या वरील मताशी मी सहमत आहे.

गारगोटी पेटवण्याची कला..

मी लहानपणी वृद्ध माणसे चिलिम ओढतांना पाहीलेली आहेत. त्यावेळी ते त्यांच्या तंबाखूच्या डबीशेजारी असलेल्या कप्प्यातून दोन गारगोट्या आणि चिमूटभर कापूस काढून चिलम पेटवायचे. हे मोठ्या उत्सुकतेने मी पाहीलेले आहे. आता चिलम (गांजा) ओढण्याची कला (?) सुद्धा अस्तंगत होते आहे. गारगोटीवर आग पेटवायची कला याच लोकांकडून शिकाव्या लागतील.

अजून

जाडसर पिठाची भाकरी हातावर अलगद थापून खरपूस भाजण्याची कलासुद्धा काही दिवसांनी अस्तंगत होईल असे वाटते.

भाकरी - ही अस्तंगत न होवो

भाकरी हे खाद्य अस्तंगत न होवो, अशी माझी आशा आहे.

(ज्वारी आणि बाजरी दर एकरी गव्हा-मक्यापेक्षा कमी उत्पन्न देतात, बहुधा. असे असल्यास ज्या ठिकाणी गहू-वगैरे पिकू शकत नाहीत तिथेच ही धान्ये प्रकर्षाने पिकवत राहातील.)

मी स्वतः भाकरी परातीत थापतो. हातातल्या हातात थापायला मला जमत नाही.

हम्म

मलाही भाकरी आणि भाकरी करण्याची कला टिकावी असे वाटते.
इथे फारसे चांगले पीठ मिळत नाही, जुने पीठ असते, म्हणून गरम पाणी घालून करते पण अनेकदा एवढी सुबक भाकरी होत नाही. (बहुदा नाचता येईना. .)
http://www.youtube.com/watch?v=csx8CCq-9tY

बाकी हाताने लिहीण्याची गरज आणि कला पूर्णपणे नाहीशी होईल असे वाटत नाही.

बरोबर आहे

गेले कित्येक वर्ष मी किराणासामान किंवा चेकबुक/जमा पर्ची या शिवाय काही लिहिले असेल असे आठवत नाही.
घरातल्या लहान मुलांना (विषेशत: इंग्रजी शाळेत जाणार्‍या) मराठी अक्षरे गिरवताना कसेसेच वाटते. काय माहीत, त्यांच्या काळात हे असे लिहावेच लागणार नाही बहुतेक.

 
^ वर