अभिरुची म्हणजे नक्की काय?

गेल्या आठवड्यात 'उत्सुकतेने मी झोपलो' वाचले.. आणि या प्रश्नाचा किडा डोक्यात वळवळू लागला.. तसा आधी पण हा प्रश्न पडायचा.. या वेळेस तो जास्त तीव्रतेने जाणवला म्हणून मांडतोय..
या पुस्तकाबद्दल बऱ्याच लोकांकडून ऐकले होते.. पण शेवटची कथा सोडली तर बाकी पुस्तक दर्जाच्या बाबतीत ठीक ठीक देखील वाटले नाही.. मग प्रश्न पडला की इतक्या लोकांनी का त्याला नावाजले असेल ? की चार समीक्षकांनी चांगले म्हटले म्हणून बाकीचे म्हणत आहेत ?

बऱ्याच चित्रांच्या बाबतीत पण हीच गोष्ट, म. फी. हुसेन (अथवा तसाच कोणीही नावाजलेला चित्रकार) यांचे चित्र आहे हे सांगण्याची का गरज पडावी.. आणि मग त्याला कोट्यावधी रुपयांचे मूल्य कशाबद्दल ? मग मूल्य चित्राचे की चित्रकाराच्या नावाचे.. मग ती विकणारे, विकत घेणारे अथवा त्यावर भरभरून लिहिणारे 'कलेचे जाणकार' कसे म्हणावेत?
आमचा एक मित्र म्हणे की 'म. फी. हुसेन' यांनी कागदावर पानाची पिंक टाकली तरी तिला 'मॉडर्न आर्ट' म्हणून लोक करोडो रुपये देउन विकत घेतील आणि समीक्षक त्यात काय काय दिसते आहे ते जड जड शब्दात लिहीत बसतील.. मग याही बाबतीत जगाची दांभिकता जास्त वाटत नाही का ?

मी पिकासोची, Vincent van Gogh किंवा Renoir या सारख्या प्रसिद्ध चित्रकारांची प्रदर्शनातली चित्रे पहिली आहेत आणि तेव्हा देखील जरी हे अद्वितीय चित्रकार असले तरी काही चित्रे फक्त त्यांच्या नावावर तिथे येउन बसली आहेत असे वाटत राहते..
'काफ्का' सारखा ताकदीचा लेखक देखील ढीगभर भरकटलेला दिसतो बऱ्याच ठिकाणी.. तरीही त्याला 'अगम्य' असं तर्क विवेचन देत लोक justify करू लागतात तेव्हा ती आंधळी भक्तीच नाही का ठरत.. तेच मराठी लेखकांच्या (व कलाकारांच्या ) बाबतीत ही म्हणता येईल..

मग प्रश्न उठतो की एकदा चांगला कलाकार म्हटले की त्याच्या कलेला खराब म्हणणे हा फक्त निवडक समीक्षकांचा अधिकार उरतो का? मग उच्च अभिरुची आणि इतर असेही भेद हे लोक ठरवणार काय ?

इथे एक कथा समोर ठेवावीशी वाटते..
एकदा एका पुजाऱ्याने जाहीर केले की उद्या सकाळी देव स्वतः प्रकट होणार आहे मंदिरात.. पण अट एकच, फक्त पुण्यवान लोकांना तो दिसेल.. पापी लोकांना नाही..
मग काय दुसऱ्या दिवशी मंदिरात आलेल्या सगळ्याच लोकांना देव दिसला.. त्याचे पितांबर आणि मुकुट याच्या चर्चा सुरु झाल्या..
थोडक्यात काय तिथे सर्वच जण पुण्यवान ठरण्याची धडपड करत असल्यावर नसलेला देव पण दिसणार.. आणि ज्यांना नाही दिसला ते पापी ठरणार..

मग तसेच इथे जर एखादी कलाकृती चांगली नाही म्हटले तर 'अरसिक' ठरू कलेच्या प्रांतातले अडाणी ठरू या भीतीपायी तर बऱ्याच कलाकृतींना hype केले जात नसेल काय ?
या क्षेत्रातही मग देव, काही बडवे आणि मग स्वतंत्र विचाराना बंधने (अप्रत्यक्षपणे अर्थात! ) अशी व्यवस्थाच होतेय नाही का?

कदाचित मला चर्चा विषय नीट मांडता आला नसेल.. जे मनात आलेय ते लिहिले आहे..परंतु भावार्थ घ्यावा..

लेखनविषय: दुवे:

Comments

फरक कळत नसेल...

अभिरुचीचे लेबल लावलेली प्रत्येक गोष्ट चांगली आहे अशी समजूत ज्याप्रमाणे चुकीची आहे त्याप्रमाणे प्रत्येकाला प्रत्येक चांगल्या वाईटातला फरक कळतो अशी समजूत करणे मुळात चुकीचे आहे.

चित्रकलेतील मला फारसे कळत नाही; मला हुसैन यांची चित्रे अभिजात वाटत नाहीत. ही वाक्ये मी जोडून लिहिते कारण ते सत्य आहे. कदाचित, चित्रकलेची मला जाण असती तर चित्रांत वापरलेले रंग, पोत आणि फराटे वेगळे भासलेही असते आणि हुसैन यांची चित्रेही आवडली असती.

परंतु याचबरोबर पी. एफ. चँग या चायनीज रेस्टॉरंटची वाहवा करणार्‍या माझ्यामते मूर्खांच्या प्रशंसेवर मी कडाडून टीका करू शकते कारण मला चायनीज खाण्यातला आणि किंमतीतला फरक कळतो.

असो.

दांभिकपणा हा सर्वत्र दिसतो. बर्‍याचदा इतर लोक वाहवा करतात म्हणून आपल्याला चांगल्या वाईटातला फरक कळत नसणारे अनेकजण वाहवा करण्यार्‍यातले असतात. जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती का आवडत नाही हे स्पष्टपणे सांगणारे जेवढे दिसतात तेवढे ती का आवडली हे स्पष्टपणे सांगणारे दिसत नाहीत असे मला वाटते.

सहमत

दांभिकपणा हा सर्वत्र दिसतो. बर्‍याचदा इतर लोक वाहवा करतात म्हणून आपल्याला चांगल्या वाईटातला फरक कळत नसणारे अनेकजण वाहवा करण्यार्‍यातले असतात. जर एखादी गोष्ट आवडत नसेल तर ती का आवडत नाही हे स्पष्टपणे सांगणारे जेवढे दिसतात तेवढे ती का आवडली हे स्पष्टपणे सांगणारे दिसत नाहीत असे मला वाटते.

सहमत आहे.

अभिरुची, उच्चभ्रू आणि प्रगल्भता

विषय रोचक आहे, श्रेष्ठ सामाजिक/वैचारिक परिस्थितीतील लोकांच्या विवक्षित (अभिरुची) आवडी-निवडी बहुसंख्यांच्या आवडी-निवडीपेक्षा वेगळ्या आहेत आणि त्या आपण आपल्यात रुजवू शकत नाही ह्याची टोचणी किंवा त्याबद्दल असणारी तुच्छता हा विचार सार्वत्रिक/समसमान असतो/असावा.

पिकासोचे चित्र किंवा पांडूरंगाच्या देवळाचा डोलणारा कळस ह्या दोन्ही गोष्टी स्वानुभवाशी निगडित आहे, दोन्हीही किंवा दोघींपैकी एखादी गोष्ट नाकारणारे/स्वीकारणारे असणारच, पण दोन्ही गोष्टींची(अनुभवाची) व्यक्तिनिरपेक्ष सिद्धता करणे दुरापास्त आहे, तशी गरजही नाही.

पण ह्या मनोवृत्तीवर एक सर्वसाधारण स्पष्टीकरण असे असते - वयानुसार आनंद मिळवण्याच्या गोष्टी/जागा बदलत जातात, ह्याला जबाबदार असणार्‍या घटकांपैकी एक घटक 'वैचारिक प्रगती' आहे, त्या वैचारिक प्रगतीमुळे गोष्टीतील आनंद कमी होत जाण्याची जाणिव होते, शरीरसुखाशिवाय किंवा बरोबर वैचारिक सुख/आनंद अधिक मिळणार्‍या गोष्टींचा अभ्यास जास्त होतो, तो अभ्यास कमी असणार्‍यांना काहीवेळा हीन लेखले जाते किंवा तो अभ्यास न करणारे स्वत:ला हीन समजू लागतात.

स्वानुभवातून मिळणार्‍या व्यक्तिसापेक्ष आनंदाची तुलना मानसिक असंतुलनाशी काहीवेळा होते, पण अनुभव व्यक्तिसापेक्ष असल्याने नक्की सत्य काय आहे हे उलगडणे कठीण होते.

वैचारिक प्रगतीमधे वृत्तीमधे सकारात्मक बदल असणे खरं तर अपेक्षित असायला हवे, तसे झाल्यासच प्रगल्भता आहे असे म्हणता येइल, पण सकारात्मक वृत्तीशिवाय असलेली वृत्ती तथाकथित उच्चभृ असते असे म्हणता येइल, पण ते माझे वैयक्तिक मत असेल.

पसंद अपनी अपनी

प्रत्येकाची आवड थोडीफार वेगळी असणारच. [ पण 'अभिरुची' ह्या शब्दासाठी 'आवड' हा शब्द वापरला तर आपले उच्चभ्रूपण कसे दिसणार? साधीशी गोष्ट घुमवून फिरवून (तेच हिन्दीतले घुमाफिराके) मोठमोठाल्या भारी शब्दांत सांगितली नाही तर मग आपण दर्जेदार कसले? ]

आपल्याला आवडेल ते बघावे, ऐकावे. फार ताण घेऊ नये. सगळे काही काळ ठरवतो. आणि ठरवेपर्यंत आपण काळाआड ('काळोत्तर' म्हणणार होतो) गेलेलो असतो. असो. पसंद अपनी अपनी, खयाल अपना अपना असे म्हणायचे. तूर्तास एवढेच.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

सवंग

या निमित्ताने एक जुनी रोचक चर्चा आठवली.

नितिन थत्ते

तुमची अभिरुचीही उच्च !

वा! काय नेमका दुवा दिलात! चर्चा पुन्हा वाचायला मजा आली.
त्यावेळच्या चर्चा अजून आठवता म्हणजे तेव्हा चर्चांचा दर्जा उच्च असेलच (होताच) पण तुमची अभिरुचीही उच्च आहे :)

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

 
^ वर