"सवंग लोकप्रियता" - एक सवंग लोकप्रिय टीका

"सवंग लोकप्रियता" ही माझ्या मते एक निरर्थक टीका आहे, आणि त्याने संवाद खुंटतो. या शब्दप्रयोगामागे अशी काही कल्पना आहे की "लोकां"ची अभिरुची हीन आहे, "लोक" कलात्मक विचार करत नाहीत. शिवाय दुसर्‍या टोकाचा एक विचार आपण ऐकतो - "सामान्य लोकांना" काही गोष्टी कळायला कठिण जातात, काही गोष्टी स्पष्ट समजतात, असे आपण ऐकतो.

संवादामध्ये मतमतांतर असले की हे मुद्दे म्हणून उपस्थित केले जातात. (उपक्रमावर "सखाराम बाइंडर"बाबत चर्चा चालू आहे, तिथे असे काही शब्दप्रयोग आपल्याला वाचायला मिळाले.) इथे वेगळे उदाहरण देत आहे.

- - -
उदाहरणार्थ :
रामला पॉप संगीत आवडते. श्यामला पॉप संगीत आवडत नाही. त्यांचा मैत्रीपूर्ण संवाद चालू आहे (हे भांडण नाही.)
(भाग अ :)
राम : मायकल जॅकसनच्या "बॅड" मधला त्याचा नाच कौशल्यपूर्ण आहे.
श्याम : असेल. पण आम्हा सामान्य लोकांना त्या नाचातले काही कळत नाही.

(टिप्पणी : श्याम सामान्य लोकांपैकी आहे, आणि राम मात्र सामान्य लोकांपैकी नाही?)
(भाग आ :)
राम : काल माझ्या आवडत्या मायकल जॅकसनच्या कार्यक्रमाला १० हजारांची गर्दी होती.
श्याम : मित्रा, तू तिथे संगीत ऐकायला गेलास, तुझे वेगळे. पण सामान्य लोक तिथे त्याचे सवंग चाळे बघायला जातात.

(टिप्पणी : म्हणजे इथे राम आणि श्याम दोघेही "सामान्य लोक" नाहीत?)
- - -

आपल्यापैकी प्रत्येक जण एकमेवाद्वितीय असतो खरे - पण मग तर कोणीच "सामान्य" नाही. छे - "सामान्य"चा तो संदर्भ नव्हे. आपण सर्वच मिळून "लोक" आणि "सामान्य लोक" असतो. रामची अभिरुची, श्यामची अभिरुची, धनंजयची अभिरुची - सर्व एकमेवाद्वितीय आहेत, हे खरे. पण आपणा सर्वांची मिळूनच तर सामान्य अभिरुची बनते ना?

वरील राम-श्याम संवादात दोन टोकाचे दोष लपलेले आहेत.
भाग (अ) मध्ये श्याम स्वतःकडे सामान्यपण घेऊन रामची अभिरुची "असामान्य" ठरवतो. तेव्हा तो रामला "सामान्यां"मधून बहिष्कृत करतो, आणि त्याची अभिरुची चर्चेला अवांतर ठरवतो. याचे रूप कधी प्रशंसात्मक असते - "राम, तुझ्यापाशी व्यासंग/संवेदनशीलता आहे, म्हणून तुझे मत सामान्यांसारखे नाही." प्रशंसा असली तरी रामचा अनुभव अवांतरच ठरवला. खरे तर राम हा "लोकां"चा भाग असल्यामुळे, त्याचा व्यासंग, त्याची संवेदनशीलता "लोकां"च्या व्यासंगाचा, संवेदनशीलतेचा भाग होतात. संवाद खुंटवणारी ती प्रशंसा म्हणजे मुळी प्रशंसाच नव्हे.

भाग (आ) मध्ये श्याम स्वतःला आणि रामला "सामान्यां"मधून बाजूला काढतो. हा केवळ समोर नसलेल्या लोकांचा तिरस्कार आहे. त्यांची मते मांडायला, त्यांची अभिरुची, आवड-निवड काय आहे, हे सांगायला ते राम-श्यामच्या पुढे नसतात. कसे असणार - ते हजारो-लाखो लोक राम-श्यामच्या आसपास मावणार सुद्धा नाहीत. समोरच्या संवादकाचा सन्माननीय अपवाद सांगून "लोकां"चा असा तिरस्कार करणे मला पटत नाही.

याचा असा अर्थ नाही की श्यामने रामला सांगू नये "तू बहुसंख्यांसारखा नाहीस", किंवा "तू आणि मी बहुसंख्यासारखे नाहीत". पण सप्रमाण सांगावे.

जर श्यामला भेटलेल्या बहुसंख्य लोकांनी सांगितले असेल की "मायकल जॅकसनचा नाच आम्हाला रुचत नाही", तर श्यामने जरूर सांगावे - "राम, मला भेटलेल्या बहुतेक लोकांनी सांगितले आहे, की मायकल जॅकसनचा नाच त्यांना रुचत नाही, त्यांच्यापेक्षा तुझी रुची वेगळी आहे. मला सुद्धा मायकल जॅकसनचा नाच रुचत नाही."
अशाने संवाद खुंटत नाही. राम विचारू शकतो - "श्याम, मला तुझ्या मताचा आदर वाटतो - तो नाच आवडू नये त्याबद्दल मला समजावून सांग. मला मात्र तो आवडतो कारण..." संवाद चालू राहातो.

जर श्यामला भेटलेल्या बहुसंख्य लोकांनी सांगितले असेल की "मायकल जॅकसनचे सवंग चाळे बघायला आम्ही त्याच्या कार्यक्रमाला जातो.", तर श्यामने जरूर सांगावे - "राम, मला भेटलेल्या बहुतेक लोकांनी सांगितले आहे, की मायकल जॅकसनच्या सवंग चाळ्यांसाठी त्याच्या कार्यक्रमाला जातात. मी मात्र त्याच सवंग चाळ्यांमुळे जात नाही. तू मात्र संगीत ऐकायला जातोस हे विशेष." मग राम सांगू शकतो - "श्याम, त्याचे संगीत त्याच्या चाळ्यांना पुरून उरते, ते असे..." संवाद चालू राहातो.

प्रत्यक्षात श्यामला "आपण सवंगपणासाठी असे करतो" सांगणारे लोक कुठे भेटले असतील, हे अविश्वसनीय वाटते. "आपली अभिरुची सवंग आहे" म्हणणारे कोणी मला तरी आजवर भेटले नाही.

श्यामला जर कुठली अपप्रवृत्ती बोकाळलेली दिसत असेल, तर त्याबद्दलही जरूर चर्चा करावी. "आजकाल खूप लोक पॉप संगीत ऐकतात. असे लोक भारतीय संगीत ऐकत नाहीत. कानठळ्यांनी त्यांचे कान बहिरे होतील. वगैरे, वगैरे... पॉप संगीत ऐकणार्‍या लोकांचे वागणे मला आवडत नाही, ते बदलावे." बहुसंख्य लोकांचा आदर म्हणजे त्यांची नेहमीच प्रशंसा नव्हे. आदर करणे म्हणजे टीका करताना मुद्देसूदपणे काय आवडत नाही ते सांगणे. बहुसंख्य लोक हीन नसतात, तर त्यांची अमुक विशिष्ट कृती तमुक विशिष्ट कारणासाठी हीन असते. (अशी टीका मी खुद्द शेवटच्या परिच्छेदात केलेले आहे.)

माझ्या मते "सामान्य लोकांसारखा तू नाहीस (म्हणून तुझे मत ग्राह्य नाही)", आणि "तू वेगळा, मी वेगळा, आणि बाकीचे सामान्य लोक हीन आहेत" हे मुद्दे सकारात्मक मैत्रीपूर्ण चर्चेतून बाद झाले पाहिजेत. प्रथम मुद्दा खरी प्रशंसा नाही, तर दुसरा मुद्दा केवळ माणूसघाणेपणा आहे.

हे मुद्दे ओळखीतल्या खूप लोकांनी वापरलेले मी ऐकले आहेत. मराठी संकेतस्थळ चर्चांवर वाचले आहेत. लहानपणी, कधीकधी आजकालही चुकून मी हे मुद्दे वापरतो. बहुसंख्य लोक हे सवंग मुद्दे वापरतात. आपण सर्वांनी या संवग लोकप्रिय मुद्द्यांचा वापर टाळावा, असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते? हा चर्चाविषय आहे.

Comments

मान्य होण्यासारखा मुद्दा

प्रथम मुद्दा खरी प्रशंसा नाही, तर दुसरा मुद्दा केवळ माणूसघाणेपणा आहे...हे मुद्दे ओळखीतल्या खूप लोकांनी वापरलेले मी ऐकले आहेत. मराठी संकेतस्थळ चर्चांवर वाचले आहेत. लहानपणी, कधीकधी आजकालही चुकून मी हे मुद्दे वापरतो. बहुसंख्य लोक हे सवंग मुद्दे वापरतात. आपण सर्वांनी या संवग लोकप्रिय मुद्द्यांचा वापर टाळावा, असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते?

एकदम मान्य! यात वाद घालण्यासारखे काही दिसत नाही. बर्‍याचदा असे जेंव्हा (सं)वाद घडतात तेंव्हा माझ्या मते खालीलपैकी एक मुद्दा असतो:

  1. तसे बोलून तो विषय तेथेच तोडण्याचा अथवा टाळण्याचा. पहील्या उदाहरणाप्रमाणे तो टाळलाअ जातो आणि दुसर्‍या उदाहरणात तो तोडला जातो. तोडण्याचे कारण कदाचीत आधीचे प्रसंग, अनुभव, एकमेकांविषयी असलेले मनातील राग इत्यादी असू शकतात.
  2. कधी कधी विषय इतका सोपा नसतो. आणि विषय काढणारा तो विषय इरीशिरीने काढतो. तो जर विषय आणि त्यातील टोकाची मते ही जर दोघांच्याही जिव्हाळ्याची असतील तर परीणामी पुढचे विसंवाद चालू होतात.

तुर्तास इतकेच म्हणतो. बाकी नंतर प्रतिसाद देईन.

जिव्हाळ्याचा विसंवाद - एक समर्पक मुद्दा

कित्येकदा जिव्हाळ्याच्या विषयांबद्दल विसंवाद होतात. हे वि-संवाद मित्रांनी एकमेकांशी मोकळेपणाने केले तर फारच उत्तम. ते (वि)संवाद मित्रांनी एकमेकांच्या दरम्यान पुरते दाबून टाकले, तर मित्रकर्तव्य कमी पडते. नाहीतर त्या विषयाबद्दल टोकाची विरुद्ध मते प्रामाणिक जिव्हाळ्याची असू शकतात, हे त्या मित्रांना कळणारच नाही.

(मित्र आहेत, म्हणून विसंवादावेगळे सुसंवादी विषयही अधूनमधून आनंदाने चर्चित असतील हे आलेच. तसेच समाजप्रिय लोक अनोळखी असले तरीही एका अर्थाने मित्रच असतात. अशा समाजप्रिय लोकांनीसुद्धा एकमेकांत विसंवाद-सुसंवाद दोन्ही करत राहावे.)

हा मुद्दा लेखात आला नव्हता, आणि लेखाची विचारधारा एका समर्पक दिशेने पुढे नेणारा आहे. धन्यवाद.

सार्वजनीक

माझा मुद्दा हा मित्रांसंदर्भात कमी आणि सार्वजनीक क्षेत्रातील व्यक्तींसंदर्भात अधिक आहे. हा चर्चाविषय निघायचे कारण "सखाराम बाईंडर" हे नाटक आणि त्यावरील आधीची चर्चा आहे. त्यात काय आहे आणि ते नाटक काय आहे हा वेगळा चर्चा विषय झाला. त्यात मला पडायचे नाही अथवा येथे अवांतर करायचे नाही. फक्त वरील मुद्यासंदर्भात लिहीतो:

एखाद्या नाटकात अथवा कुठल्याही कलाकृतीत माणसातली हिंसा दाखवणे, विकृती दाखवणे हे आक्षेपार्ह आहे का? - याला माझे उत्तर नाही असेच आहे. जसे एखाद्या कलाकारास त्याच्याकलेतून सौंदर्य, आदर्श वगैरे प्रकारचे वास्तव दाखवायला आवडू शकते तसेच एखाद्यास भेदकता, विकृती, हिंसक वास्तव दाखवायला आवडते अथवा महत्वाचे वाटू शकते. यातील एखादी कलाकृती एखाद्याला आवडेल तर दुसर्‍याला नाही तर तिसर्‍याला दोन्ही आवडू शकतात वगैरे.

मग प्रश्न कुठे सुरू होतो? - जर कोणी समाजात निव्वळ आदर्शच आहे, चांगलेच आहे असे स्वप्नाळू सांगायला लागले तर चूक आहे. तसेच माणसातील भेदक हिंसक वृत्ती, विकृती हाचा काय तो समाज आहे असे दाखवणारे पण चूक वाटतात.

समाजात जसे गोलमाल मधील अमोल पालेकर अथवा उत्पलदत्त मिळू शकतो तसेच इन्साफ का तराजू मधील राज बब्बरपण असतो. मात्र "एक बब्बर बसलाय माझ्या खोल मनात दडून" असे कोणी काव्य करत सर्व समाजच तसा आहे असे म्हणू लागले तर चुकीचे ठरते.

रथचक्र, महासागर, बॅरिस्टर आदी नाटकात पण समाजातील विकृती दाखवली आहे पण सरसकट शिक्का मारलेला नाही... तो जिथे मारला जातो आणि त्याचा जिथे उदोउदो केला जातो, तेथे ती टोकाची भुमिका समजून त्याला विरोध होतो. विसंवाद अशा एकेरी चित्रिकरणामुळे चालू होतो असे वाटते - मग ते एकेरी चित्रिकरण निव्वळ संस्कृतीचे असोत, प्रकृतीचे असोत अथवा विकृतीचे...

असे म्हणणारे कोणी असते का?

समाजात जसे गोलमाल मधील अमोल पालेकर अथवा उत्पलदत्त मिळू शकतो तसेच इन्साफ का तराजू मधील राज बब्बरपण असतो. मात्र "एक बब्बर बसलाय माझ्या खोल मनात दडून" असे कोणी काव्य करत सर्व समाजच तसा आहे असे म्हणू लागले तर चुकीचे ठरते.

असे म्हणणारे कोणी मला तरी भेटलेले नाही. कधीकधी दुसरा कोणी असे म्हणत असल्याचा आरोप करणारे आपल्याला भेटते.
म्हणजे "विजय तेंडूलकर, तुम्ही सर्व जगाला विकृत म्हणता", किंवा "अमोल पालेकर, तुम्ही सर्व जगाला विकृत म्हणता" असे बोललेले मी ऐकले आहे.

"मी, विजय तेंडुलकर, म्हणतो की सर्व जग विकृत आहे", "मी, अमोल पालेकर, म्हणतो की सर्व जग विकृत आहे" असे कोणी बोलल्याचे फारसे ऐकिवात नाही.

अर्थात शोषणाचा मुद्दा तेंडुलकरांना नाटके लिहिण्याइतका महत्त्वाचा वाटत होता असे त्यांनीच म्हटले आहे. बलात्कारितेची फरपट सिनेमा बनवण्याइतपत महत्त्वाची वाटत असेल.

रथचक्र, महासागर, बॅरिस्टर आदी नाटकात पण समाजातील विकृती दाखवली आहे पण सरसकट शिक्का मारलेला नाही... तो जिथे मारला जातो आणि त्याचा जिथे उदोउदो केला जातो, तेथे ती टोकाची भुमिका समजून त्याला विरोध होतो.

शिक्का कसा मारला जातो? शिक्का मारलेल्या नाटकांचे उदाहरण देता येईल का? तेंडुलकरांनी "सखाराम बाइंडर"मध्ये सर्व विकृत आहे म्हटले आहे, असे काही लोक म्हणतात. मला मात्र नाटकात तसे दिसले नाही.

(लेडी मॅक्बेथ, सखाराम, वगैरे पात्रांच्या तोंडात "जग वाईट आहे" असे उद्गार निघतात. तशा पात्रांकडून ते अपेक्षितच असतात. त्या उद्गारांनी "खरेच जग फक्त लेडी मॅक्बेथच्या खुनशी महत्त्वाकांक्षेने, सखारामच्या व्यवहारी स्त्रीशोषणाने भरले आहे" असा अर्थ निघत नाही.)

मला तर "जग निखळ विनोदी आणि आनंदाने भरलेले आहे" अशीच पात्रे असणारी एकांगी नाटके कधीकधी खूप आवडतात. हा एकांगीपणाबद्दलचा मुद्दा समजला नाही.

पण "सामान्यीकरण"पेक्षा हा मुद्दा वेगळा आहे, हे तुमचे म्हणणे बरोबर आहे. प्रत्येक तिखट पदार्थात थोडासा गूळ घालावा (भयानक नाटकात एक तरी सज्जन पात्र असावे), प्रत्येक गोड पदार्थात थोडेसे तिखट घालावा (सुखद नाटकात एक तरी क्लेशकारक पात्र असावे), नाही तर ते पदार्थ (नाटके) एकांगी होतात, समाजात नाटकाबद्दल विसंवाद उद्भवतात - असा काही हा वेगळा मुद्दा आहे. चर्चा करण्यालायक आहे. वेगळ्या चर्चेत आपण विचार करायला घेऊया.

एक असहमती

राम किंवा शाम ने पॉपसंगीत आवडण्याचे किंवा न आवडण्याचे स्पष्टीकरण देणे ही बाब संयुक्तिक वाटत नाही. कारण एखादी गोष्ट 'क्लिक' होणे ही बाब स्वयंप्रेरित असते.
राम म्हणेल कि मला लाडू आवडतो. का? बस आवडतो हेच त्याचे उत्तर. फार तर तो आवडण्यातले प्रसंगोत्पत वर्णन करुन तो आपले बोलणे चालू ठेवेल. शाम आवडण्या / न आवडण्याबद्दल उदासीन असेल तर त्याला ते ऐकण्यात रुची नसली तरी बाधा नाही. पण त्याला लाडू आवडत नसेल व तो आपल्या न आवडण्या बद्दल आग्रही असेल तर संवाद विसंवादाकडे जाण्याची वाटचाल चालू होईल.
विसंवादाचा मुल्यांक हा सुसंवादाच्या मुल्यांकापेक्षा कमी असेल तर कल सुसंवादाकडेच राहणार. या मुल्यांक काढण्याच्या पद्धती मात्र प्रमाणित नसतात.
प्रकाश घाटपांडे

काही सुचलेले मुद्दे

- कोणाला काय आवडावे हा जसा वैयक्तिक आवडीनिवडीचा मुद्दा आहे , तसेच एखादी न आवडलेली गोष्ट किती नावडावी , त्या नावडीबद्दल किती तीव्रतेने वाटावे आणि कितपत तीव्रतेने बोलावे हीदेखील वैयक्तिक बाब आहे.

- सरसकट विधाने केव्हाही वाईटच. एखाद्या कलाकाराची शैली किंवा मजकूर (किंवा दोन्ही!) आपल्याला आवडत नसेल तर तो ज्याना आवडातो ते लोक बोअर/हीन अभिरुचीचे/स्वतःला शहाणे समजणारे इ. इ. आहेत असे समजून आपण मोकळे होतो. आता , यात सरळसरळ "सरसकट विधाने करणारा" मनुष्यस्वभाव दिसतो हे उघड आहे. शेवटी , सवंग हा शब्द तौलनिक आहे. या शब्दाचा उलटा शब्द म्हणजे उच्चभ्रू. आता , कोण कुणाला उच्चभ्रू वाटेल नि कोण कुणाला सवंग वाटेल , काही सांगता येत नाही.

मला धनंजयच्या वरील लिखाणातून समजलेली सामान्य सूत्रे म्हणजे :

१. सरसकट विधाने टाळा. ज्यावर टीका करायची त्याच्या विशिष्ट गुणदोषांचा सांगोपांगाने विचार करा.
२. अभिरुची या शब्दाबरोबर वर्गवारी ची संकल्पना ( कन्सेप्ट् ऑफ क्लास्) निगडित आहे. एकंदर अभिरुची हा शब्द या संदर्भात काहीसा निसरडा ठरतो.
३. दृष्टीकोनांमधले फरक , मते-मतांतरे होणे हे चर्चेच्या , व्यासपीठाच्या आरोग्याचे लक्षण आहे. मतभिन्नतेतून नव्या ज्ञानाचा संबोध होण्याची जास्त शक्यता. तस्मात् , मतेमतांतरे साजरी करा. ( हे वाक्य celebrate the differnences amongst us या इंग्रजी वाक्याचे मोडकेतोडके भाषांतर ;-) )

सहमत

संपूर्ण सहमत आहे. यावर इथे बरेच सविस्तर लिहीले होते. त्यातील काही भाग.

खरोखरीच उच्च अभिरूची नावाचे काही असते का? कुठल्याही कलाकृतीचा दर्जा चांगला असतो किंवा नसतो. पण कुठलाही कलाप्रकार उच्च किंवा हीन असू शकत नाही. एखाद्या कलाप्रकाराचा किंवा एखाद्या कलाकृतीचा आपण आनंद घेऊ शकतो किंवा नाही यावर बरेचदा मर्यादा असतात. काही कलाकृती समजण्यासाठी त्याबद्दल अधिक तांत्रिक माहितीची आवश्यकता असते तर इतर कलाकृती सहजपणे मनाला भिडतात. बर्गमनच्या चित्रपटांचा आनंद घेण्यासाठी एका विशिष्ट मनोवृत्तीची आणि अभ्यासाची गरज असते. याउलट अमिताभला पडद्यावर बघतानाचा आनंद थेट असतो. त्याच्या 'मास-पॉप्युलॅरिटी'मागचे हे रहस्य आहे. पण म्हणून बर्गमन अमिताभपेक्षा उच्च हे समीकरण डोक्यात शिरत नाही.

जिथे 'ओरिजिनॅलिटी' आणि गुणवत्ता असते ती कलाकृती श्रेष्ठ. कदाचित ती समजून घ्यायला आपण तांत्रिकदृष्ट्या कमी पडतो किंवा तिला स्वीकारायला आपले मन तयार नसते. तिथे पूर्वग्रह किंवा तथाकथित नैतिक मूल्ये आडवी येतात. मग त्या कलाकृतीला चीप, बालिश किंवा हीन अभिरुची असे काहीतरी लेबल दिले जाते आणि 'कल्चरल स्नॉबिशनेस'ला सुरूवात होते.

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

काहि प्रमाणात सहमत .. मात्र..

काहि प्रमाणात सहमत. (म्हणजे सरकसकट वक्तव्ये प्रयत्नपूर्वक टाळावीत, किंवा थेट लेबले देऊ नयेत याच्याशी सहमत) मात्र अशी वाक्ये बोलण्या मागचा हेतु वेगळा असु शकतो. माझ्यामते आपण ज्याला सवंगपणा म्हणताय तो प्रसंगी वाक्-चातुर्याचा अथवा अगदी भाषिक अलंकराचा भागहि असु शकतो.

तुमचेच उदा. घेऊ:
समजा, श्यामला रामला न दुखावता(कारण संवाद मैत्रीपूर्ण आहे, भांडण नाहि) टोमणा मारायचा आहे / थट्टा करायची आहे की की तुलाहि नाचातले काहि कळत नाहि तु फक्त चाळेच बघायला जातोस ;) तर त्याने मैत्रीपूर्ण संवादात
"असेल. पण आम्हा सामान्य लोकांना त्या नाचातले काही कळत नाही. " प्रतिसाद दिला तर त्यात सवंग काय?

किंवा त्याला समजा आडून विचायचे असेल की तिथे काय चाळे चालले होते? मात्र थेट विचारणे शक्य नसेल तेव्हा त्याने जर
"मित्रा, तू तिथे संगीत ऐकायला गेलास, तुझे वेगळे. पण सामान्य लोक तिथे त्याचे सवंग चाळे बघायला जातात. "
असे म्हटले तर त्याला अपेक्षित प्रतिसाद "मी कुठे संगीत ऐकायला गेलो होतो ;)" वगैरे पद्धतीचा खेळकर असु शकतो..

वरील प्रकारची विधाने, रोजच्या बोलीची वैशिष्ट्ये म्हणता येतील. छापील वादासाठी, अथवा लेखी साहित्यामधे याचा उपयोग तितकासा रुचणार नाहि मात्र अश्या दैनंदिन जीवनात सहजतेने बोलल्या जाणार्‍या वाक्यांनाहि सवंगतेचा शिक्का बसु लागला तर मात्र "आम्हि सामान्य जन सवंगच असतो बॉ! " असेच म्हणावे लागेल ;)

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

टोमणा ठीक, पण टोमणा नसल्याचा आभास केल्यास ठीक नाही

तुलाहि नाचातले काहि कळत नाहि तु फक्त चाळेच बघायला जातोस ;) तर त्याने मैत्रीपूर्ण संवादात
"असेल. पण आम्हा सामान्य लोकांना त्या नाचातले काही कळत नाही. " प्रतिसाद दिला तर त्यात सवंग काय?

अशा प्रतिसादात आपल्या अनुभवांत बहुधा टोमणाच अभिप्रेत असतो. त्यात सवंग काही नाही. पण टोमण्याला रामने उत्तर नेमके कसे द्यायचे? अशा परिस्थितीत राम जेव्हा म्हणतो, की "असे नाही, मी चाळे बघायला जात नाही..." तर प्रतिसादक म्हणतो - "अरे तुला काय कुठे म्हटले." टोमणा मारणार्‍याने स्वीकार केले की तसा टोमणा अभिप्रेत होता, तर त्यानंतर "तू गाणे आवडले हे खोटे बोलतोस" याबद्दल त्या एका वाक्यापेक्षा अधिक प्रमाण देण्याची तयारी ठेवली पाहिजे.

नाहीतर "तू गाणे आवडले हे खोटे बोलतोस" असे "सामान्य-निंदेच्या" आडून म्हणण्यात काय पुरुषार्थ (किंवा स्त्री-शालीनता) आहे? टोमणा दोघांना समजला, पण नंतर रामच्या खोटारडेपणाचे प्रमाण श्यामने देण्याबाबत हात वर केलेत तर तो संवाद खुंटवण्याचाच प्रकार झाला.

सारांश - टोमणा विनोद म्हणून ठीक आहे. पण आपण समोरच्याला "खोटारडा" म्हणून संवाद बंद करीत आहोत, याबद्दल मग "प्लॉझिबल डिनायेबिलिटी" (शिवी दिल्याबद्दल मानभावी नकार) आणू नये.

किंवा त्याला समजा आडून विचायचे असेल की तिथे काय चाळे चालले होते? मात्र थेट विचारणे शक्य नसेल तेव्हा त्याने जर
"मित्रा, तू तिथे संगीत ऐकायला गेलास, तुझे वेगळे. पण सामान्य लोक तिथे त्याचे सवंग चाळे बघायला जातात. "
असे म्हटले तर त्याला अपेक्षित प्रतिसाद "मी कुठे संगीत ऐकायला गेलो होतो ;)" वगैरे पद्धतीचा खेळकर असु शकतो..

असे खेळकर संवाद होऊ शकतात. मान्य. संवाद खेळकर आहे की नाही, हे आगल्या-मागल्या संवादाच्या संदर्भाने सिद्ध होते. "हीन सामान्यत्व" गंभीर मुद्दा म्हणून प्रस्तुत केला जाऊ नये, असे माझे या चर्चेत मत आहे.

तसे खेळकर संदर्भात कुठले बरे नियम लागू होतात? होळीत, कॉलेज कट्ट्यावर खेळकरपणे आपण शिव्या देतो, त्यांच्याबद्दल काही नियम नसतो. पण बाकी वेळी शिव्या देण्यापूर्वी तशी संतापजनक परिस्थिती असावी अशीच अपेक्षा आपण संवादात करतो.

मला वाटते की "खेळकर परिस्थितीत शब्दाचे अर्थ वेगळे असतात" हा मुद्दा इतका सर्वमान्य आहे, की या ठिकाणी तो गैरलागू आहे. नाहीतर प्रत्येक गणिताच्या पूर्वी मला हे लिहावे लागेल "खेळकर बोलण्यात २+२=५ असेही होऊ शकत असले, तरी या ठिकाणी त्या प्रकारे खेळकर नसलेले गणित सांगतो आहे, आणि इथे २+२=४ असे आहे." अशी (अत्यंत सत्य) प्रस्तावना नाही दिली तरी गृहीत धरली पाहिजे.

सवंग?

माझ्या म्हणण्याचा अर्थ मलाच नीट देता आला नहि असे वाटते. तुम्हि एकूण अन्वयार्थापैकी एक उदा म्हणून दिलेला खेळकर हा आयाम मुख्य मुद्दा मानतात त्या अर्थी मला माझा मुद्दा नीट मांडता आला नाहि. आता वेगळ्या प्रकारे प्रयत्न करतो.

माणूस आपण म्हणता तशी मुद्देसुद चर्चा कधी करतो अथवा करू शकतो?
१. समोरच्याला बोलण्याची इच्छा असेल तर
२. समोरच्याला त्या विषयाबाबत माहिती/ज्ञान असेल तर
३. त्या क्षणी दोन्हि व्यक्तींना त्या विषयाबद्दल बोलण्यात रस असेल तर
४. दोघांचाहि स्वभाव तर्कशुद्ध (सापेक्ष तर्कशुद्धता) मुद्दे मांडू शकणारा आणि तसे मुद्दे मांडु इच्छिणारा असेल तर
आता यापैकी एक किंवा अनेक अथवा सर्व कारणांचा अभाव वरील प्रकारच्या (लेखात दिलेल्या) संवादांना कारणीभूत ठरतो. तुम्हि म्हणता तसा आदर्श संवाद फारच क्वचित बघितला / केला आहे.

"सर्वमसामान्यतः" (माझ्या निरीक्षणातील बहुसंख्य .. खरेतर प्रत्येक जण कधी ना कधी) लोक वरीलपैकी एका अथवा अनेक कारणांमुळे संवाद तोडतातच अथवा घाऊक वक्तव्ये करतात.

माझे म्हणणे असे बोलणे योग्य आहे असे अजिबात नाहि मात्र अश्या सहज बोलल्या जाणार्‍या संवाद तोडणार्‍या वाक्यांना घाऊकपणे सवंगतेच्या साच्यात टाकणे जरा अतीच वाटते.. तसे असेल तर मी संवाद तोडण्याकरता कित्येकदा सवंग वाक्ये बोलतो.

(सवंग)ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

पैकी अनेक गृहीतके लेखाच्या प्रस्तावनेत आहेत

ऋषिकेश यांनी लेखाची अनेक गृहीतके येथे स्पष्ट मांडली आहेत, हे चांगले. ही गृहीतके लेखाच्या प्रस्तावनेत दिलेली आहेत, असे मला वाटले. पण वाटेल तेवढी स्पष्ट नाहीत असेच दिसते.

ऋषिकेश लेखासाठी गृहीतके देतात :

१. समोरच्याला बोलण्याची इच्छा असेल तर
२. समोरच्याला त्या विषयाबाबत माहिती/ज्ञान असेल तर
३. त्या क्षणी दोन्हि व्यक्तींना त्या विषयाबद्दल बोलण्यात रस असेल तर
४. दोघांचाहि स्वभाव तर्कशुद्ध (सापेक्ष तर्कशुद्धता) मुद्दे मांडू शकणारा आणि तसे मुद्दे मांडु इच्छिणारा असेल तर

ही गृहीतके लेखाच्या सुरुवातीला अशा प्रकारे मांडली आहेत :

१. समोरच्याला बोलण्याची इच्छा असेल तर

प्रस्तावनेतल्या पहिल्या वाक्यात मी म्हणतो ..."त्याने संवाद खुंटतो."
त्यावरून वाचकाला असे ध्यानात यावे की जो संवाद खुंटवायचा नाही, अशा संवादांबद्दल माझा लेख आहे. (म्हणजे संवादाची इच्छा आहे, असे गृहीतक आहे.)

२. समोरच्याला त्या विषयाबाबत माहिती/ज्ञान असेल तर

प्रस्तावनेत मी म्हणतो - "संवादामध्ये मतमतांतर असले की हे मुद्दे म्हणून उपस्थित केले जातात."
अशा संवादांबाबत हा लेख आहे. अर्थातच संवादकांना मते आणि मतांतरे असण्याइतपत विषयाबद्दल माहिती किंवा ज्ञान आहे. "पूर्ण/सांगोपांग माहिती/ज्ञान" मात्र अपेक्षित नाही - कोणालाच कुठल्याच बाबतीत तशी माहिती, तसे ज्ञान असू शकत नाही. (हे सामान्यीकरण तार्किक आहे - मानवजीवन मर्यादित आहे, कुठलेही ज्ञान तपशिलांत जाता अमर्याद आहे, त्यामुळे कोणालाच कुठल्याही विषयी पूर्ण ज्ञान नाही.)

३. त्या क्षणी दोन्हि व्यक्तींना त्या विषयाबद्दल बोलण्यात रस असेल तर

हा मुद्दा क्र. १ शी मिळताजुळता आहे. लेखाच्या प्रस्तावनेत लिहिले आहे, की त्या विषयाबद्दल संवादकांनी मत आणि मतांतर दिलेले आहे. "या संवादाच्या प्रसंगात = या क्षणी तसे मत-मतांतर दिले आहे", असे आपोआप स्पष्ट होते असे मला वाटले. पण तसे माझे गृहीतक असल्याचे ऋषिकेश यांनी आता स्पष्ट केलेले आहे. मत आणि मतांतर सांगण्यात या क्षणी संवादकांना रस आहे, असे प्रास्ताविकातून कळावे.

४. दोघांचाहि स्वभाव तर्कशुद्ध (सापेक्ष तर्कशुद्धता) मुद्दे मांडू शकणारा आणि तसे मुद्दे मांडु इच्छिणारा असेल तर

प्रास्ताविकात मी म्हणतो - "संवादामध्ये मतमतांतर असले की हे मुद्दे म्हणून उपस्थित केले जातात."
"मुद्दे मांडणे" म्हणजे संवादातील तर्कपद्धती आहे (सापेक्ष तर्कशुद्धता). ज्या संवादात "मुद्दे मांडले जातात" अशा संवादांबद्दल हा लेख आहे.

मला तरी वाटते, की ही सर्व गृहीतके मी लेखाच्या प्रास्ताविकात मांडली असती तर शैली आहे त्यापेक्षा बोजड झाली असती. शिवाय "सखाराम बाइंडर" चर्चेचा उल्लेख दिल्यामुळे "संवादकांना संवाद साधायचा आहे, संवादकांना माहिती/ज्ञान आहे, संवादकांत या क्षणी या विषयाबद्दल मतमतांतर आहे" अशा प्रकारची ती गृहीतके उदाहरणातही स्पष्ट होतात.

ऋषिकेश एक निरीक्षण देतात, ते पटण्यासारखे आहे.

ही गृहीतके नसलीत तर "लोक वरीलपैकी एका अथवा अनेक कारणांमुळे संवाद तोडतातच"

जगात विषयांची संख्या अमर्याद आहे, आणि माझ्या जीवनात काळ मर्यादित आहे. त्यामुळे मला खुद्द या करोडो-करोडो-अमर्याद विषयांत रस नाही. ज्ञान/माहिती नाही. या क्षणी चर्चा करायची इच्छा नाही. असे संवाद मी लगेच थांबवण्याची शक्यता आहे. हे खरे. पण अशा संवादांबाबत हा लेख नाही. प्रास्ताविकात "कसले संवाद" हे ध्वनित केले होते, असे मला वाटले. लेख ज्या संवादांबद्दल आहे, तशा एका संवादाचे उदाहरण दिलेही होते. त्यामुळे करोडोंनी संवाद मला नको असले, तरी काही संवाद मला हवे असतात, आणि अन्य संवादकालाही हवे असतात, "आता" हवे असतात, आणि "मुद्देसूद" हवे असतात. अशा संवादांबद्दल हा लेख लिहू नये, असे ऋषिकेश यांना म्हणायचे आहे काय? बहुधा नाही.

ऋषिकेश यांचे दुसरे निरीक्षण माझ्या अनुभवाच्या विपरीत आहे. ते म्हणतात, की वरील चार कारणांमुळे लोक

"घाऊक वक्तव्ये करतात."

"मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही", "काय बोअर करतो आहेस", "अरे हे आता नको", "मला काय ठाऊक?" "मला याविषयी वाद नको - मी म्हणतो आहे ना नाटक घाणेरडे आहे!" अशा सगळ्या प्रकारची विधाने या परिस्थितीत होताना मी ऐकली आहे. पण अशा परिस्थितीत घाऊक वक्तव्ये होतात, असा माझा अनुभव नाही.

होय - हास्यविनोदाने "अरे यातले माझ्यासारख्या सामान्य माणसाला काय कळते - चल दुसर्‍या गप्पा मारू" वगैरे संवाद होतात. पण डोळे मिचकावून, हसून, असल्या देहबोलीने वाक्य "मुद्दा" नसल्याचे संवादक ध्वनित करतो. शिवाय, वरील प्रतिसादात ऋषिकेश म्हणतात, की खेळकरपणा हे त्यांच्या असहमतीचे मर्म नाही. खेळकर नसूनही वरील कारणासाठी घाऊक विधाने होतात, हे त्यांचे निरीक्षण माझ्या अनुभवाशी विसंगत आहे.

ऋषिकेश म्हणतात - "संवाद तोडणार्‍या वाक्यांना घाऊकपणे सवंगतेच्या साच्यात टाकणे अतीच वाटते" आणि शीर्षकात विचारतात ... "(यात) सवंग (काय आहे)?..."
लेखाने प्रास्ताविकातून जे संवाद वगळले आहेत, त्यांच्याबद्दल मी कुठलेही मतप्रदर्शन केलेले नाही. ज्या विषयाबद्दल संवादकांना मत-आणि-मतांतर आहे, ते मतमतांतर संवादात आलेले आहे, आणि संवाद खुंटू नये अशी मुद्देसूद अपेक्षा आहे, अशा संवादांबद्दल लेख आहे. जे संवादविषय मला (आणि ऋषिकेश यांना) नको आहेत (पु.लंनी दिलेली उदाहरणे - कपाशीवरची बोंड अळी, श्रीमंत दुसर्‍या बाजीरावाचे लेखन) त्यांच्याबद्दल लेख नाही. ऋषिकेश यांच्या शीर्षकातल्या प्रश्नाला मी उत्तर देत नाही, कारण त्यांचा प्रश्न या लेखाच्या संदर्भात मला समजलेलाच नाही.

माझ्या प्रास्ताविकातील गृहीतके सुस्पष्ट केल्याबद्दल ऋषिकेश यांचे पुन्हा आभार.

मी : एक स्वघोषित सवंग आणि उच्चभ्रू

डिस्क्लेमर : खालील प्रतिसाद मुख्य चर्चेच्या संदर्भात काहीसा अवांतर - अतएव सवंग - ठरण्याची मोठीच शक्यता आहे. ;-)

ज्या कारणांकरता मी मित्र-मैत्रिणींचे तुच्छतापूर्ण कटाक्षांचा/शेर्‍यांचा/हास्याचा धनी झालो आहे त्यापैकी काही बाबी :

- मला कुमार गंधर्व यांची भजने ऐकायला आवडतात; पण त्यांचा ख्याल मी फार तर पाचेक मिनिटे ऐकू शकतो. झेपत नाही. ( अचानक फरसाण, बीयर , गोविंदा यांची आठवण होते !)
- मला मायकेल जॅक्सन च्या ८० च्या दशकातले व्हीडीओज् अजूनही पहावे वाटतात.
- मला गोविंदाचे १९९०-१९९५ चे सिनिमे अजूनही पहावे वाटतात. म्हणजे कुठे लागले तर एकटक पहात बसतो !
- मी बॉब् डीलन् , एरिक क्ल्याप्टन् यांच्या संगीताचा आनंद घेऊ शकत नाही. त्यांची १-२ गाणी ऐकल्यावर मी सीडी किंवा एम्पी३ चा अल्बम् बदलतो.
- माझ्या घरातल्या शेल्फावर गुरुनाथ नाईक , सुहास शिरवळकर यांची काही पुस्तके आहेत.
- मला वाईन् मधले काहीएक कळत नाही. लोकांना द्यायपुरता मामुली ष्टॉक मी ठेवतो इतकेच.

याउलट माझ्या काही मित्रवर्यांची मी यथेच्छ चेष्टा केलेली आहे कारण
- त्यातल्या काही सवंग लोकांना (हाहाहाहा) पु.ल. देशपांडे यांचे "असा मी असामी"आणि "हसवणूक" मधले लिखाण आवडत नाही. त्यांना ते जुनेपुराणे , आउटडेटेड् वाटते.
- माझ्या काही मैत्रिणींना हृतिक रोशन आवडतो व त्याला अभिनयही येतो असे त्यांचे म्हणणे आहे.

माझी यादी

- गोविंदा-डेव्हिड धवन फेवरिट.
- दादा कोंडकेंचे चित्रपट खूप आवडतात.
- जेम्स जॉइसची युलिसिस शतकातील सर्वोत्कृष्ट कादंबरी आहे असे म्हणतात. दोनतीनदा वाचण्याचा प्रयत्न केला, गमले नाही.
- आत्मपीडा करून घेण्याचा मूड असेल तर कितीही टुकार चित्रपट पाहू शकतो. राहुल रॉयपासून रामसे बंधूंपर्यंत.
- आशिकीची गाणी अजूनही आवडतात. (कुमार सानू नंतर नाकात का गाऊ लागला देव जाणे)

माझ्या काही मैत्रिणींना हृतिक रोशन आवडतो व त्याला अभिनयही येतो असे त्यांचे म्हणणे आहे.

पहिल्या भागाबद्दल काहीच अडचण नाही, दुसरा भाग वादाचा मुद्दा होऊ शकतो. :)

----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

गाढवाला गुळाची चव काय

प्रत्येकाची आवड निरनिराळी असु शकते रुची भिन्न असु शकते हे मान्य. पण तरीही एक चांगली आवड आणि वाईट आवड असेही असते. 'ओम शांती ओम' नावाचा शिणेमा बघून 'वा! सुंदर चित्रपट!!' अशी प्रतिक्रिया देणार्‍याची चित्रपटांची आवड (माझ्या मते) निव्वळ माझ्यापेक्षा वेगळी नव्हे तर वाईटही आहे.( असे मी तरी समजतो.)

शिवाय काही अक्व्यार्ड टेस्ट्स् देखिल असतात. उदा. वाइन. पुर्वी मद्य म्हणजे जे प्यायल्यावर चढते ते काहीही चालेल/सारखेच असे वाटायचे. नंतर थोडे पैशे हातात आल्यावर काही त्यातल्या त्यात महाग मद्य प्रकार (मध्यम किंमतीच्या वाईन/स्कॉच) घेतल्यावर त्यातली गंमत कळायला लागली. नुसतेच चढणे महत्वाचे नाही तर पिताना त्याला असलेला स्पिरिट सदृश वास नसणे किती महत्वाचे आहे हे समजू लागले. कालांतराने माझी पुर्वीची चव बदलली. ज्याला मी नुसतीच बदलली असे न म्हणता "सुधारली" असे म्हणेन.

अर्थात ह्याला दुसरी बाजू देखिल आहे. मला सुदैवाने ह्या काहीशा उंची मदिरा चाखायला मिळाल्या म्हणून माझी चव सुधारली. ज्याच्या नशिबात हे नसेल त्याची अजूनही ही चव विकसीत झाली नसेल. अशा व्यक्तिला मी तुझी मद्याची चव दर्जाहीन आहे असे म्हंटले तर नक्कीच ते हिणवणे ठरेल. मला नशिबाने मिळालेल्या संधीचा उपयोग करुन मी दुसर्‍याला कमी लेखतो आहे असाही अर्थ त्यातुन प्रतित होतो. म्हणून अशी माणूसघाणी टिप्पणी करू नये हे १००% मान्य. .

तरीही निदान मनातल्या मनात असेल पण 'गाढवाला गुळाची चव काय' ही म्हण अगदी चपखल बसेल असे कुणीच तुम्हाला भेटले नाही काय?

बिअर ची चव

रामला सुरवातीला गोमुत्रासारखी वाटणारी बिअर ची चव ही नंतर अमृतासमान वाटायला लागते. कारण रामची अभिरुची सुधारली असते. आता श्यामला नंतर ही अनेक वेळा पिउन जर प्रत्येक वेळी गोमुत्रासारखीच वाटत असेल तर त्याला 'गाढवाला गुळाची चव काय?' असा प्रश्न रामच्या मनात आला आणी तो त्याने शामला विचारला तरी मैत्रीपुर्ण संवाद रामने बिअर पीत पीत व श्याम ने पाणी पीत पीत एकमेकात होउ शकतो.
एकदा गाढव लोळताना पाहिले असता ते मला इतके मोकळे व आनंदी वाटले कि मला त्याचा हेवा वाटला. मनातल्या मनात त्याच्याजागी स्वतःला कल्पिले.
प्रकाश घाटपांडे

गैरसमज

प्रत्येकाची अभिरुची मी आवडून घेतली पाहिजे असे माझे वरील लेखातून म्हणणे नाही.

माझी अभिरुची शिक्षणाबरोबर बदलली ही मी प्रगतीच मानतो. पण हा लेखाचा विषय नाही.

"सामान्य लोक" नावाचा काहीतरी प्रकार असतो, हा मुद्दा नाही तर पळवाट आहे. त्या "सामान्या"ची रुची काय असते याबद्दल दोन टोकाची मते प्रस्तुत केली जातात. (अ) "सामान्य" लोकांना कळत नाही, म्हणून एका संवादकाची अभिरुची विचित्र आणि चर्चेस लायक नाही. (आ) "सामान्य" लोकांची अभिरुची हीन असते - एका संवादकाची आवड बहुसंख्यांशी मिळतेजुळते, तेव्हा हा मुद्दा कधीकधी उपस्थित केला जातो.

हे दोन्ही मुद्दे माहितीशून्य आहेत - कारण हे "सामान्य लोक" कोण, हेच निश्चित नसते.

- - -
वरील प्रतिसादातील मुद्द्यांच्या बाबतीत :
चांगली-वाईट आवड

पण तरीही एक चांगली आवड आणि वाईट आवड असेही असते.

या ठिकाणी तुम्ही "सामान्यांची आवड वाईट असते." असा मुद्दा उपस्थित केला नाही. म्हणून तुमचा हा मुद्दा स्वतंत्रपणे विचारणीय असला तरी या लेखाशी संबंधित नाही.

"बहुसंख्य लोकांची अमुक विषयाबद्दल आवड वाईट असते, कारण त्याचा तमुक दुष्परिणाम होतो." अशा प्रकारचे संवादाला पोषक आहे, असे मी लेखात म्हटले आहे. यात "सामान्य लोक" केवळ "सामान्य" म्हणून त्यांचा तिरस्कार नाही, तर "अमुक आवड असणे तमुक कारणासाठी वाईट" असा मुद्दा पुढे केला जातो आहे. यातून चर्चा पुढे जाऊ शकते.

अक्व्यार्ड टेस्ट्स्
(मला वाटते याबाबत आपले मत जुळते आहे.)
"सामान्यां"चा येथे नेमका काय संबंध आहे? जी विशिष्ट अभिरुची शिकण्यासाठी पैसा खर्च करावा लागतो, तितका पैसा बहुसंख्य लोकांपाशी नसतो, असा काही मुद्दा आहे काय? आणि त्यातून "अशा बाबतीत सामान्य लोकांची अभिरुची हीन असते" असा निष्कर्ष काढायचा आहे काय?
मला (आणि तुम्हाला) हा निष्कर्ष ठीक वाटत नाही. "बहुसंख्य लोकांकडे ही विशिष्ट अभिरुची शिकण्याइतका वेळ आणि पैसा नसतो." हे तथ्यात्मक विधान पुरेसे आहे. पैसे/वेळ नसणार्‍यांना "हीन" म्हणून तिरस्कारावेगळे काय हशील आहे?

असे धोरण असल्यामुळे उलटपक्षी माझाही अपमान टळतो. आफ्रिकेतील तुत्सी जमातीच्या स्वयंपाकाबद्दल मला काही माहीत नाही, ती रुची निर्माण करण्यासाठी वेळ आणि पैसा नाही. त्या पाककलेबद्दल माझे अज्ञान आहे, म्हणजेच त्या पाककलेबद्दल माझी अभिरुची हीन आहे असे कोणी म्हणू नये.

गाढवाला गुळाची चव

तरीही निदान मनातल्या मनात असेल पण 'गाढवाला गुळाची चव काय' ही म्हण अगदी चपखल बसेल असे कुणीच तुम्हाला भेटले नाही काय?

बहुधा गमतीने विचारलेला प्रश्न आहे. :-) तरी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.

मला आवडलेले नाटक माझ्या मित्राला आवडले नाही, याबाबत अटीतटीचे वाद झालेले आहेत. असे पुष्कळ अनुभव आहेत. तेव्हा "मला ढळढळीत मधुर वाटते, ते या मित्राला सांगूनही तसे वाटत नाही, काय गाढव आहे..." असा विचार मनात काही काळासाठी येतो. पण कोणाशी बोलून "भांडून" गप्पा मारल्याशिवाय हा विचार येणे टाळतो. कारण वर दिलेले आहे. माझी ही गुळाची चव पैसे आणि वेळ असल्यामुळे जर "अक्वायर्ड" असू शकेल. वेळ आणि पैसा नसेल त्याला गाढव म्हणता येणार नाही. (असे म्हटले, तर तुत्सी पाककलेचा स्वाद न कळला म्हणून ते मला म्हणतील "बंदर क्या जाने अद्रक का स्वाद?" एकमेकांना गाढव आणि बंदर म्हटल्याची चिडवाचिडवी होते, इतकेच. संवादात प्रगती नाही.

सामान्य

सामान्य लोकांची रुची ह्याविषयी सरसकट विधाने करणे चूकच. सामान्य लोकांनी हिमेश रेशमियाला डोक्यावर घेतला तसंच लता मंगेशकरांनाही हृदयी विराजमान केलं. सचिनचा स्ट्रेट ड्राइव्ह बघुन रोमांचित होणारे करोडो सामान्य पाहून सामान्यांची रुची हीन असते असे कुणी म्हणू शकेल का? बहुसंख्यांच्या चष्म्यातुन बघीतले तर असे दिसुन येईल की त्यांची आवड आणि दर्जाचा काहीही संबध नाही. बहुसंख्यांना आवडलेल्या/नावडलेल्या गोष्टी दर्जेदार/दर्जाहीन दोन्हीही असतात. त्यामुळे एखाद्याची (एखाद्या गोष्टीतली) आवड वाईट आहे कारण तो सामान्य आहे ही नक्कीच पळवाट झाली. पण "पसंद अपनी अपनी" कुणाला सफरचंद आवडेल कुणाला चिकू आवडेल ह्या सबबी खाली वाईट आवड झाकणे ही देखिल पळवाट झाली. ह्या एक उपमुद्दा त्यानिमित्ताने मनात आला,जो तुमच्या चर्चेत नसला तरी साधारण त्याच विषयाशी निगडीत असल्याने मांडला. विषयांतर वाटल्यास क्षमस्व!

हम्म

पूर्वी मलादेखील असे वाटायचे पण आता माझे मत बदलले आहे. उदा. गोविंदा-डेव्हिड धवनचे चित्रपट बर्‍यापैकी टुकार असतात तरीही मला बघायला आवडतात. का ते आकाशातल्या बापालाच ठाऊक. आवड जशी जोपासता येते तशी बदलतही असावी. ओम शांती ओम मला आवडणे शक्य नाही पण ज्यांना आवडतो त्यांना आवडू देत बॉ असा विचार हल्ली करू लागलो आहे. अर्थात दर्जा हा वेगळा मुद्दा आहे. ओम शांती ओम मध्ये शाहरूनचा अभिनय आवडला तर ठीक आहे पण तो सर्वोत्कृष्ट अभिनेता आहे असे कुणी म्हणाले तर वादाचा मुद्दा होऊ शकतो.
मला आवडते म्हणून हेच सर्वश्रेष्ठ आणि बाकी सर्व हीन असे कुणी म्हणायला लागले तर अडचण होते. मग अमुक एक लेखक (शक्यतो प्रसिद्ध, डायहार्ड फ्यानलोक असणारा)वाचला नाही असे चारचौघात सांगितले तर अरे, मग तू काय वाचले? असे विचारले जाते.
थोडक्यात सांगायचे तर कुठलीही आवड वाइट असते असे वाटत नाही. पण मला अमुक आवडते म्हणून ते चांगले (किंवा अमुक चांगलेच आहे म्हणून मला आवडते) असे म्हटले तर ते चूक आहे. (सगळीकडे असे मला वाटते.)
----
“What people say about you is none of your business” - Sean Stephenson

इंद्रियप्रधान-बुद्धीप्रधान

धनंजय आपल्याशी सहमत आहे. कुणाच्या आवडीवर टिका करुन ती हीन आहे असे दाखवायचा प्रयत्न करु नये हे संवाद चालू ठेवण्यासाठी बरोबरच आहे.

अनेकदा आपल्याला आज जे आवडते ते उद्या आवडत नाही. आणि त्यामुळे आज ज्यांना आपण सामान्य समजतो अश्यांत उद्या आपणच शिरतो आणि मग कालच्यांना अप्रगत रुचीचे म्हणू लागतो. माझ्या बाबतीत असे घडले आहे :) (कारण आवड बदलली असे म्हणण्यापेक्षा आपल्यांत प्रगती झाली असे म्हणणे बरे वाटते.)

सवंग या शब्दाचा अर्थ भरपूर असा असावा असे मोल्सवर्थ मध्ये पाहून वाटते आहे. या आधी मला तो शब्द सव्यंग (व्यंग असलेले) शब्दाचा अपभ्रंश असेल असे वाटायचे. कुणी अधिक माहिती दिली तर नक्की काय ते समजेल.

आपल्या रुची बाबत मला एक गोष्ट वाटते ती मांडतो.
शरीरा पेक्षा मन सूक्ष्म आणि बुद्धी त्याहुन सूक्ष्म. शरीरप्रधान रुचींपेक्षा बुद्धीप्रधान रुचींना बरेचदा जास्ती किंमत दिली जाते. शरीरकष्ट करुन पोट भरणार्‍यापेक्षा बुद्धीजीवी वरचे समजले जातात. या न्यायाने बहुधा (उदाहरणार्थ) लैंगीक विनोदा पेक्षा बौद्धीक-साहित्यिक विनोद यांना जास्त मान मिळतो. अश्या वेळी असे विनोद समजणारे श्रेष्ठ ठरतात आणि इतर सामान्य. हाच तर्क इतर सर्वच आवडिनिवडींबाबत प्रत्येक माणूस आपल्या परिने करुन समोरचा आपल्या पेक्षा खालच्या (इंद्रियप्रधान-स्थूल) आवडी असणारा आहे की (बुद्धीप्रधान- तरल- सुक्ष्म) जाण असणारा आहे याचे मूल्यमापन करतो आणि समोरच्याची पातळी ठरवून मोकळा होतो.

संवादासाठी असे ठरवणे योग्य नाही हे बरोबर. आणि चर्चेमध्ये जे इतर मुद्दे आले आहेत उदा. बनणारी रुची त्यासाठी पैसा-वेळ यांची संधी इत्यादी, हे सुद्धा विचार करण्यासारखे आहे.

--लिखाळ.

रुची भिन्नतेचा आदर

रुची भिन्नतेचा आदर करुन संवाद साधणे हे एका मर्यादापर्यंत शक्य होते. पण बोंबीलाच्या वासाने एकाची लाळ गळुन भुक निर्माण होते तर दुसर्‍याची मळमळ होउन भुक नाहीशी होते. अशा वेळी सहजीवनाचे बंधन हा जाच वाटु लागतो. अशा प्रसंगी प्रत्येकाला स्वतःचा अवकाश दिला तरच एकाचे 'अमृत' हे दुसर्‍याचे 'विष' ठरण्याचे प्रसंग टाळता येतात. म्हणुनच समानशीले व्यसनेषु सख्यम् |
आपल्या आनंदात (अभिरुचीत)इतरांना सहभागी करुन घेतले कि आनंद(अभिरुची) बहुगुणीत होतो(ते).
प्रकाश घाटपांडे

अभि ह प्रत्यय

बरोबर आहे. पण रुचीला अभि हा प्रत्यय लागला की खरा प्रश्न निर्माण होतो.

+१

रुची भिन्नतेचा आदर करुन संवाद साधला पाहिजे, कोणत्याही विचारांचा सवंग टीका म्हणून विचार करु लागल्यास अशाने संवाद थांबेल.

उदाहरण क्र. १) : काल सखुला विचारले, तुला जी.ए. कुलकर्णी चे लेखन आवडते का ? ती म्हणली, नाय आवडत. त्यायची 'पात्र' नियती ठरवेल तिथे जातात. ते मला आवडत नाय.

उदाहरण क्र.२) : संजोपराव, वर्षानुवर्ष जी.ए.कुलकर्णीवर अभ्यासपूर्ण लिहितात. वाचक कंटाळले पर ते लिहायचे अजून थांबले नाही. जी. एंच्या कथांचा अर्थ ते भारावून सांगतात.

उदाहरण क्र.३) : भालचंद्र नेमाड्यांना विचारले गेले, ''जी.एंच्या दीर्घकथा किंवा ग्रेसची कविता वाचकांना समजत नाही,वाचकांना दुर्बोध वाटतात. यावर तुम्हाला काय म्हणायचंय ? तेव्हा ते म्हणाले ' मलाही प्रत्यक्षात त्या कळत नाही. जी.ए. गोंधळून गेलेले आहेत. त्यांना काय सांगायचं, कसं सांगायचं- ते कळत नाही. त्यांच्या कथातलं भटकत, भरकटत जाणं हे एक थीम म्हणून चांगलं आहे. ते सिंबलही असेल. पण भटकत जाणे म्हणजे पलायनवाद आहे''.....पुढे त्यांचे लेखन आवडत नाही यावर ते बरेच बोलतात. (पाहा : नेमाडे यांचे साहित्यः एक अन्वायार्थ पृ.क्र.१५९)

वरील तीनही उदाहरणावरुन म्हणता येते की, सामान्य असामान्यांचे मत कलाकृतीबद्दल/ लेखकाबद्दल हे वेग-वेगळे असते. प्रत्येकाची रुची वेगळी असते, आन तिचा आदर केला पाहिजे.

ह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा इचार करायमधी आपून टैम नै घालीत फटकन लिहून मोकळं !

बाबूराव :)

गैरसमज अथवा वेगळा मुद्दा

माझ्या लेखाचे सूत्र हे नाही की रुचिभिन्नतेचा आदर करावा.
(संवाद साधावा, हे सूत्र आहे खरे. पण ते गृहीतक आहे. संवाद साधायचा नसला तर माझा लेख त्या संदर्भात अप्रस्तुत आहे.)

बोंबिलाचे उदाहरण माझ्या लेखाला द्यायचेच झाले तर असे :

बोंबील आवडणारा शिसारी येणार्‍याला म्हणतो
प्रकार १ :
"माझ्यासारख्या सामान्य लोकांना बोंबील आवडतो. तुला शिसारी येते म्हणून तू विचित्र आहेस."
प्रकार २ :
हीन अभिरुचीच्या सामान्य लोकांना बोंबिलाचा स्वाद कळत नाही. माझी अभिरुची दर्जेदार असल्यामुळे मला तो स्वाद आवडतो. तुला हीन सामान्यांसारखे व्हायचे नसेल, तर तूही उच्च अभिरुचीने बोंबील आवडून घे.

शिसारी येणारा बोंबील आवडणार्‍याला म्हणतो :
प्रकार १ :
"माझ्यासारख्या सामान्य लोकांना बोंबीलाच्या वासाने शिसारी येते. तुला तोच वास आवडतो म्हणून तू विचित्र आहेस."
प्रकार २ :
हीन अभिरुचीच्या सामान्य लोकांना बोंबिलाचा उग्र वास आवडतो. माझी अभिरुची दर्जेदार असल्यामुळे मला तो दुर्गंध आहे हे कळते.. तुला हीन सामान्यांसारखे व्हायचे नसेल, तर तूही बोंबिलाला दुर्गंधी समज.

या दोन्ही प्रकारची विधाने दोन्ही बाजूंनी अर्थशून्य आहेत. प्रकार २चे वाद सामान्यांचा तिरस्कार करणारे आहेत. हे लेखाचे सूत्र आहे. भिन्न रुचीचा आदर करून बोंबील मुद्दामून आवडून/नावडून घेण्याबद्दल माझा लेख नाही.

भिन्न रुची असतात त्यांनी कधीकधी सहजीवन अशक्य होते, हा तुमचा मुद्दा महत्त्वाचा आणि पटण्यासारखा आहे. त्या मुद्द्याला लेखातल्या सूत्राने मुळीच बाध होत नाही.

सवंग

लेखातल्या एकूण विचारधारेशी सहमत. परंतु आपण सखाराम बाईंडरचा उल्लेख या संदर्भात केला आहे म्हणून थोडेसे.

जेव्हा लोक सवंगपणा असे म्हणतात तेव्हा त्यांना पुढील अर्थ अपेक्षित असतो.
एखादी कलाकृती उदा सखाराम बाईंडर कलाकाराने काही प्रश्न मांडण्याच्या दृष्टीने निर्माण केली आहे. त्यात वातावरणनिर्मितीच्या साठी काही प्रसंग रंगवलेले आहेत. परंतु ते प्रसंग हा काही त्या कलाकृतीचा विषय नाही. असे असताना जर् कोणी ते प्रसंग पाहण्यासाठी ती कलाकृती पहायला जात असेल तर त्याला हीन (अभि)रुची म्हणावे लागेल.
इन्साफ का तराजू या चित्रपटाचा विषय, बलात्कारित स्त्रीची समाजाकडून होणारी ससेहोलपट हा आहे. त्यात अर्थातच बलात्काराचे दृष्य आहे. जर प्रेक्षक त्या दृष्यासाठी वारंवार तो सिनेमा पहात असतील तर त्यांना सवंग म्हणणे योग्य होईल. निर्माता जर त्या दृष्याचे जास्त तपशीलवार चित्रण करून त्या दृष्याचा सूचक उपयोग चित्रपटाच्या जाहिरातीत करीत असेल तर सवंगतेचा आरोप योग्य म्हणावा लागेल.
(प्रांजळपणे कबूल करण्याची गोष्ट म्हणजे विशिष्ट वयात आम्ही अनेक मित्र अशा उद्देशाने काही चित्रपट पहात होतो. आता बहुधा पाहणार् नाही आणि त्या विशिष्ट वयोगटातील प्रेक्षकांना कदाचित नावेही ठेवू)

मायकेल जॅक्सनच्या नृत्य-गायनाच्या बाबतीतही असे म्हणता येईल.

(शारदा नाटक देवलांनी जरठ-कुमारी विवाहासंबंधाने लिहिले होते. पण ते संगीत नाटक असल्यामुळे लोक त्यातील संगीत ऐकण्यासाठी येतील आणि मूळ विषय बाजूलाच रहात असेल तर त्या वेळी लोकांना सवंग म्हणता येईल का?)

नेमका या बाबतीत लेखातील परिच्छेद

या बाबतीत लेखात एक परिच्छेद आहे -

श्यामला जर कुठली अपप्रवृत्ती बोकाळलेली दिसत असेल, तर त्याबद्दलही जरूर चर्चा करावी. "आजकाल खूप लोक पॉप संगीत ऐकतात. असे लोक भारतीय संगीत ऐकत नाहीत. कानठळ्यांनी त्यांचे कान बहिरे होतील. वगैरे, वगैरे... पॉप संगीत ऐकणार्‍या लोकांचे वागणे मला आवडत नाही, ते बदलावे." बहुसंख्य लोकांचा आदर म्हणजे त्यांची नेहमीच प्रशंसा नव्हे. आदर करणे म्हणजे टीका करताना मुद्देसूदपणे काय आवडत नाही ते सांगणे. बहुसंख्य लोक हीन नसतात, तर त्यांची अमुक विशिष्ट कृती तमुक विशिष्ट कारणासाठी हीन असते.

इन्साफ का तराजू बाबत तुमचे विश्लेषण साधारण या प्रकारचे वाटत आहे. तुम्ही कारण, निरीक्षणाचा विदा (विशिष्ट वयात स्वतःच्या मित्रमंडळातील निरीक्षणाबद्दल डेटा) वगैरे, दिला आहे.
"इन्साफ का तराजू चित्रपटाचा विशिष्ट वयातील माझ्या मित्रांचा आणि माझा आस्वाद बलात्कारपीडितेच्या सामाजिक मुद्द्याकडे दुर्लक्ष करणारा होता. बलात्कारित स्त्रीची ससेहोलपट परदु:खशीतळपणे बघत, संकुचित लैंगिक दृष्टीने त्या वयात आम्हा मित्रांना आनंद होत होता. तो आस्वाद या कारणासाठी हीन होता." असे काही तुमचे उदाहरण दिसते.

"आम्ही सामान्य मुले होतो, त्या सामान्यपणामुळे 'इन्साफ का तराजू' बघताना आमचा आस्वाद हीन होता" असे जर तुमचे म्हणणे असेल, तर ते लेखाशी असहमती दाखवणारे असते. पण तुमचे म्हणणे लेखातील उद्धृत परिच्छेदाच्या चौकटीतच आहे असे वाटते. तुमच्या उदाहरणाचे असे वाचन योग्य आहे ना?

असेच् म्हणायचे आहे.

होय् तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.

सवंग आणि सामान्य

या शब्दांचे मला समजलेले अर्थ असे आहेत.
सवंग या शब्दाच्या सोबतीला बहुतेक वेळा लोकप्रियता हा दुसरा शब्द दिसतो या दोन्हींचा मिळून 'चीप पब्लिसिटी' असा अर्थ मला अभिप्रेत आहे. मराठीत त्याचा अर्थ फारसे श्रम न घेता (कदाचित लायकी नसतांना ) सहजपणे मिळालेली लोकप्रियता असा होईल.
सामान्य सामान्य माणसे याचा अर्थ (माझ्या आकलनाप्रमाणे ) विशेष तीव्र बुद्धीमत्ता किंवा खास प्रशिक्षण यांनी पारंगत न झालेला. मी एकादा विषय शिकून त्यात प्राविण्य मिळवले तरी इतर असंख्य विषयांच्या बाबतीत मी सामान्यच असणार. एकाद्या विषयाचा मुद्दाम अभ्यास न करतासुद्धा त्यातले जेवढे आपल्याला माहीत असते त्याला माझ्या समजुतीप्रमाणे सामान्यज्ञान म्हणतात.
माझ्या मते सामान्य हा शब्द कोणाला तुच्छ किंवा हीन लेखत नाही, फक्त तो माणूस त्या विषयातला तज्ञ नाही एवढेच दर्शवतो. मी स्वतःला सामान्यच समजतो. त्याबद्दल माझ्या मनात यत्किंचित हीनभावना नाही. मला एकादी गोष्ट माहीत नाही असे सांगायची मला लाज वाटत नाही. या भूमिकेचा मला अनेक नव्या गोष्टी शिकतांना फायदा झाला आहे. या थोड्याशा विषयांतराबद्दल क्षमा असावी.

 
^ वर