छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य : नरहर कुरुंदकर

Kurundkar

आजच नरहर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल.

'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' या पुस्तकाचे वैशिष्ट्य असे आहे की यात शिवाजी महाराजांचा इतिहास, तारीखवार घटना, आकडेवारी यांना पूर्णपणे फाटा दिलेला आहे, जे नरहर कुरुंदकरांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच स्पष्ट केले आहे. छत्रपति शिवाजी महाराजांच्या थरारक आयुष्यातील अगदी मोजक्या पण अतिमहत्त्वाच्या घटनाक्रमांवर नरहर कुरुंदकरांनी प्रकाश टाकला आहे.

या सुरेख पुस्तकाला स.मा. गर्गे यांची सात पानी प्रस्तावना लाभली आहे तरी पुढची पाने कुरुंदकरांनी ज्या तर्कपद्धतीने व्यापली आहेत ती वाचताना वाचक थक्क होतो.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच कुरुंदकरांनी शिवाजी देवाचा अवतार मानला जातो या श्रद्धेचा वेध घेण्याचा परखड प्रयत्न केला आहे. कुरुंदकर म्हणतात "माणसाचा देव ज्या वेळेला केला जातो त्या वेळेला त्याच्या अभ्यासाची गरज संपते, अनुकरणाचीही गरज संपते. हा श्रद्धेने निर्माण होणारा फार मोठा पायगुंता आहे. तो टाळण्याचा आपण यथाशक्ती प्रयत्न केला पाहिजे."
"समाजाला नाट्यमय आणि रोमांचकारी घटनांची जास्त आवड असते. अशा नाट्यमय घटनांवर लक्ष खिळून राहिले म्हणजे मग खरे कर्तृत्त्व दृष्टीआड होण्याचा धोका असतो."

एवढे परखड आणि वस्तुनिष्ठ विचार वाचल्यावर मी खरे सांगायचे तर एकदम थक्क झालो. कुठे हे कुरुंदकरांचे २० व्या शतकातले वस्तुनिष्ठ विचार? आणि कुठे २१ व्या शतकाच्या विज्ञानयुगातील त्या 'फ्रान्सिस गोतिए'च्या बुरख्याआड तथाकथित धर्मवाद्यांनी पुण्यात १०० कोटी रुपये खर्चून उभारलेले छत्रपति शिवाजी महाराजांचे मंदीर? असो.

छत्रपति शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील नाट्यमय घटना मोजक्या ५-६ आहेत असे कुरुंदकर निदर्शनास आणतात. पैकी पहिली अत्भुत घटना ते अफझलखानाचा वध ही मानतात. तर या पहिल्या अत्भुत घटनेआधीची २९ वर्षे ही नाट्यशून्यतेची होती हेही ते परखडपणे दाखवून देतात. शिवाय "छत्रपतिंचे कर्त्तॄत्त्व समजून घेताना या रोमांचकारी घटनांचा मोह आपण टाळला पाहिजे" अशी नेमकी जाणीवही ते करुन देतात.

"त्यांच्या कार्याकडे मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूंचा उठाव म्हणून पाहणे काही जणांना आवडते. प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या चरित्रात अशा धार्मिक संघर्षाला फारसा वाव नाही" असे सांगताना कुरुंदकर पुढे ते सप्रमाणही वाचकाला समजावून देखील देतात. आणि मग वाचकाला आजचे राजकारणी वा तथाकथित धर्माचे रक्षणकर्ते चेव येतील अशी भाषणे वा लेख यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

वतनदारांविरुद्धचा लढा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील खूप कठीण लढा होता. कारण हे वतनदार म्हणजे नुसते त्यांच्याच धर्माची माणसे नव्हती तर नातेवाईक, सगे-सोयरसंबंधातील माणसे होती. प्रश्न दोन : उत्तर एक या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात "शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यांच्याच धर्मातील वतनदार का राहिले, या प्रश्नाचे उत्तर आणि लक्षावधी जनतेने त्यांना ईश्वरी अवतार म्हणून का पाहिले, या प्रश्नाचे उत्तर एकच आहे"

शिवाजी महाराजांनी केलेला संघर्ष हिंदू विरुद्ध मुसलमान अशा स्वरुपात नाकारताना कुरुंदकर मार्मिकपणे म्हणतात - "परस्परांच्या विरोधी उभी राहणारी माणसे कोणत्या ना कोणत्या धर्माची असतातच, त्यांच्यामधील राजकीय ध्येयवादाच्या संघर्षाला दोन धर्मांच्यामधील परस्परविरोधी संघर्ष समजणे हीच एक मूलभूत चूक आहे. मध्ययुगातील अनेक संघर्षांचा अर्थ यामुळे कळू शकणार नाही"

एक अनोखी घटना या शीर्षकाखाली कुरुंदकर म्हणतात - "औरंगजेब मैदानात उतरण्यापूर्वीच शिवाजीसारखा असामान्य नेता दिवंगत झालेला होता. ......"
जदुनाथ सरकारांचा दाखलाही कुरुंदकर देतात की "औरंगजेब लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या, पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता!"
"साधनसामग्री नसताना, असामान्य नेता नसताना, सर्व प्रतिकूल परिस्थितीच्या विरुद्ध जनता न थकता लढत होती. एखादे राज्य टिकवण्यासाठी फारसे मोठे नेतृत्त्व नसणार्‍या जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा ही घटनाच हिंदुस्थानच्या इतिहासात नवखी आहे, एकाकी आहे"

पान क्र. २२ वर कुरुंदकरांनी शिवाजी महाराजांना युवावस्थेत राज्यनिर्मितीची प्रेरणा कुठून मिळाली असेल याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. जिजामातेने रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या असतील. विजयनगरच्या वैभवशाली साम्राज्याची हकीकत ऐकली असेल. दादोजी कोंडदेवांचे शासनचातुर्य पाहिले असेल. ज्ञानेश्वर-नामदेव साधुसंतांपासून प्रेरणा घेतली असेल. असे अनेक तर्क आहेत."पण या बाह्य सामग्रीतून लाखोंच्यापैकी एकालाच प्रेरणा का मिळते, इतरांना का मिळत नाही, याचे समाधानकारक उत्तर कोण, कसे देणार?" असा तर्कशुद्ध प्रश्नही कुरुंदकर उपस्थित करतात.

अफझलखान वधाचा वेध घेताना अफझल खान हा वाईचा सुभेदार होता तेव्हा शिवाजीचा नायनाट हे सुभ्याचा सुभेदार या नात्याने अफझलखानानेच करणे अपेक्षित होते. त्यासाठी आदिलशाही दरबारात शिवाजीचा नाश करण्याचा त्याने विडा उचलण्याची गरज नव्हती व ही केवळ कपोलकल्पित भाकडकथा आहे हेही कुरुंदकर वस्तुनिष्ठतेने निदर्शनास आणून देतात.

त्यानंतर सिद्दी जोहरचा वेढा , शाहिस्तेखानाला अचानक लाल महालात घुसून अचंभित करणे, औरंगजेबाच्या कैदेत असताना दिल्लीहून पलायन या घटनांतून शिवाजी महाराज हे केवळ धाडसीच नव्हते तर कल्पक देखील होते याकडेही कुरुंदकर लक्ष वेधतात. शत्रूच्या नेमक्या वर्मावर घाव कसा घालावा हे शिवाजी महाराजांना अवगत होते.

छत्रपतिंच्या नेत्तृत्त्वाच्या खर्‍या यशाचे मूल्यमापन करताना कुरुंदकर म्हणतात - " २७ वर्षांच्या प्राणघेऊ प्रदीर्घ झुंजीतून जे शिल्लक राहिले, ते मराठ्यांचे खरे राज्य आहे. शिवाजीने पेटवलेली ज्योत कर्ते राजे आणि सेनापति नसताना प्रचंड फौजांच्या विरुद्ध २७ वर्षे अखंड झगड्याला पुरु शकली, यातच त्याच्या नेत्तृत्त्वाचे खरे यश आहे"

गडांची डागडुजी व उभारणी याचबरोबर आरमाराकडे लक्ष हाही शिवाजी महाराजांचा दूरदृष्टीकोन कुरुंदकर दाखवतात. शिवाजी महाराजांनी उभारलेल्या आरमाराने पोर्तुगीज, इंग्रज व फ्रेंच यांना धडकी भरवली होती. पुढील काळात मराठ्यांनी या आरमाराचा वापर केला असता तर कदाचित इंग्रज देशावर राज्यकर्ता झाला नसता. पुढे खुद्द नानासाहेब पेशव्यांनीच आरमार नष्ट करुन मराठी साम्राज्याचा पाया खिळखिळा करण्यात मोठा हातभार लावल्याचेही कुरुंदकर मोठ्या व्यथित मनाने लिहिताना दिसतात.

जनतेचे प्रेम शिवाजी महाराजांनी कसे मिळवले? याच्या मुख्य कारणांचा परामर्श घेताना कुरुंदकर म्हणतात - "शिवाजीने जिद्दीने घडवून आणलेला हा वतनदारीचा वध सर्वात महत्त्वाचा आहे" याच जोडीने सर्वसामान्यांच्या स्त्रियांची अब्रू वतनदारांच्या पुंडांपासून वाचवून तिला कुठेही निर्भयपणे फिरता येईल असे राज्य शिवाजीने निर्माण केले, हाही उल्लेख महत्त्वाचा आहे.

सर्वात शेवटी पुस्तकाच्या शेवटच्या २ पानांत रामदास स्वामींचे दोन वेळा आलेले (अनावश्यक) उल्लेख आणि दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातले वादग्रस्त मुद्दे वाचकाने दुर्लक्षित करावे. कारण अलिकडच्या काळात या दिशेने खूप मोठे संशोधन झाले व अनेक पुरावेही समोर आले आहेत, येत आहेत. हा संशोधनाचा विषय आहे. मी करुन देत असलेल्या पुस्तकाच्या परिचयाचा नव्हे. तेव्हा एवढे एवढे सोडले तर बाकीच्या पुस्तकात कुरुंदकरांनी जे विवेचन केले आहे ते खरेच अफलातून आहे.

छत्रपति शिवाजी महाराजांनी गरीब रयतेला वतनदारांच्या जाचातून मुक्त केले यातच त्यांच्या लोकप्रियतेचे आणि यशाचे रहस्य सामावले आहे असे वाचकाच्या लक्षात आणून देण्यास कुरुंदकर पूर्णतः यशस्वी झाले आहेत. आजच्या राज्यकर्त्यांनी केवळ छत्रपति शिवाजी महाराजांच्या नावाचे राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या गुणांची अंमलबजावणी केली तर ते कृत्य खरे शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारे ठरेल.

नरहर कुरुंदकर यांचे हे छोटेसे पुस्तक वाचनीय तर आहेच पण छत्रपति शिवाजी महाराजांना आदर्श मानणार्‍या प्रत्येक मराठी घरात असावेच असे आहे. शिवाय ऐतिहासिक संदर्भासाठीदेखील हे छोटेसे पुस्तक खूप मोठे काम करते.

नरहर कुरुंदकर यांचे छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य हे पुस्तक मी घेतले आहे. तुम्ही घेणार का? :)

लेखनविषय: दुवे:

Comments

सुंदर

सुंदर परिचय.पुस्तक चांगले वाटते आहे. वाचीन् म्हणतो.
बाकी शिवाजीने जिद्दीने घडवून आणलेला हा वतनदारीचा वध सर्वात महत्त्वाचा आहे ह्याबद्दल् इतकेच म्हणू शकेन् की शालेय इतिहासात शिकवल्याप्रमाणे वतनदारीचा हा तथाकथित वध अगदि तात्कालिक ठरला. राजारामाच्या काळापासून लगेचच वतनदारी पुन्हा सुरु होउ लागली. शाहू-पेशवे ह्यांच्या काळात् वाढत वाढतच गेली.

बाकी अफजल्याने विडा उचलल्याचे रंजित वर्णन, शिवाजीने थेट आग्राच्या दरबारात जाउन बादशहावर हाताखालच्या कामचुकार कारकुनावर खेकसावे तसे खेसकणे व त्याला घाबरुन चक्क औरंगजेबानेही त्यांना बोट लावण्यास घाबरणे, कल्याणची सून, रोहिडेश्वराला भारावून जाउन मिसरुड फुटायच्या वयातच आख्ख्या हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याची शिवाजीने घेतलेली शपथ ह्यावर लोकांना अतिरंजित किस्से सांगत , रंगवून् रंगवून गप्पा मारायला का आवडते कुणास ठाउक.
खरे तर ह्यापैकी कुठलीही घटना घडल्याची इतक्या स्पष्टपणे काहीही नोंद नाही. कुठलाच मुत्सद्दी काही आग्र्याला जाउन असले खुळे साहस करनार नाही अन् तीसेक वर्षानंतर आपण अभिषिक्त असणार आहोत हे कितीही थोर असला तरी कुठल्याही व्यक्तिला समजणे शक्य नाही हे वास्तव आपल्याला मान्यही करायचे नाही.
असो.

...आणि मग वाचकाला आजचे राजकारणी वा तथाकथित धर्माचे रक्षणकर्ते चेव येतील अशी भाषणे वा लेख यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे शिवाजी महाराज कसे आमच्याच विचारांचे होते, अन् चक्क गांधीवादाने भारून वगैरे गेलेले सेक्युलरवादी वगैरे होते असेही दावे करणारे महाभाग भेटातात. ती दिग्गज् विभूती १७व्या शतकातील दिग्गज् होती हे घ्या की समजून.

--मनोबा

मनोबा धन्यवाद

मनोबा,

तुमच्या प्रतिसादावरुनच् तुमच्यावरचा कुरुंदकरांचा प्रभाव जाणवतो असे म्हटले तर् अतिशयोक्ती ठरु नये. तुमचा प्रतिसाद अगदी आवडला.
नक्की वाचा. कुरुंदकरांच्या सध्या उपलब्ध असलेल्या मोजक्या पुस्तकांपैकी एक् हे आहे.

धन्यवाद,

अनावश्यक मुद्दे.

<सर्वात शेवटी पुस्तकाच्या शेवटच्या २ पानांत रामदास स्वामींचे दोन वेळा आलेले (अनावश्यक) उल्लेख आणि दादोजी कोंडदेव यांच्यासंदर्भातले वादग्रस्त मुद्दे वाचकाने दुर्लक्षित करावे.>

मला वाटते की असे काही वादग्रस्त मुद्दे पुस्तकात आहेत असे लेखाच्या लेखकाने वाचकांना स्वतःहून सांगितल्यानंतर त्यांच्यामधील मजकुराला लेखकाने पूर्णपणे अनुल्लेखाने वगळणे आणि ते 'अनावश्यक' आहेत असे आपले स्वतःचे judgement वाचकांना गृहीत धरावयास लावणे हे योग्य वाटत नाही.

वाचकांना ठरवू देत ते 'मुद्दे' अनावश्यक आहेत काय आणि असल्यास किती. त्यासाठी तुम्ही आता ते मुद्दे सांगायला हवेत.

सहमत आहे

वाचकांना ठरवू देत ते 'मुद्दे' अनावश्यक आहेत काय आणि असल्यास किती. त्यासाठी तुम्ही आता ते मुद्दे सांगायला हवेत.

सहमत आहे
प्रकाश घाटपांडे

+१ सहमत आहे

अरविंदजी आणि प्रकाशजी

निदर्शनास आणून दिल्याबद्दल मनापासून् धन्यवाद.

याबद्दल पूर्ण सहमत् आहे. मी जे लिहिले आहे ते माझे वैयक्तीक् मत् आहे.
बाकी तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच् वाचकांनीच् आपापली मते ठरवण्याच्या मताचा मीही आहे.

पुस्तक वाचून् पूर्ण भारुन् गेलो होतो. त्या आवेगात् लिहिलेला हा पुस्तक परिचय आहे.
वाचकांनी तेवढे समजून् घ्यावे ही विनंती...

धन्यवाद

घाबरता कशाला..

घाबरता कशाला सागरराव.. जे मुद्दे वाटले अनावश्यक ते सांगा की.. आणि तुम्हाला का अनावश्यक वाटले ते पण थोडक्यात सांगा..
जर सबळ पुराव्यांच्यामुळे तुम्हाला तसे वाटत असेल तर त्या पुराव्यांचा ही उल्लेख करा.. एखाद्या गोष्टीबद्दल थोडा जरी विश्वास वाटत असेल तर सामोर मांडावे.. इथेही या लेखाचे 'वाचक' आहेत तेही ठरवतीलच की.. वैयक्तिक मते, भावना, श्रद्धा या गोष्टी यात कुठे येतात.. एक चांगली चर्चा होईल ना ती पण झालीच तर..

आणि जर कोणी तुमचे मुद्दे अनावश्यक नाहीत असे दाखवून दिले तर ते तेव्हा मान्य कराल असा विश्वास व्यक्त करतोय .. (तसेच जर तुम्ही मुद्दे अनावश्यक आहेत असे थोडे जरी पटवू शकला तर इतर सुज्ञ वाचक ते मुद्दे विचारात घेतीलच असाही विश्वास आहे.. ) :)

थोडे स्पष्ट करतो

घाबरता कशाला सागरराव.. जे मुद्दे वाटले अनावश्यक ते सांगा की.. आणि तुम्हाला का अनावश्यक वाटले ते पण थोडक्यात सांगा.

अस्वस्थामा

घाबरण्याचा प्रश्नच् नाहिये. हा केवळ पुस्तक परिचय होता. मुख्य म्हणजे कुरुंदकरांच्या लेखणीची या निमित्ताने सर्व वाचकांना ओळख करुन् देण्याचा प्रामाणिक प्रयत्न होता.
वादग्रस्त मुद्दे टाळायचे यासाठी होते की कुरुंदकरांच्या विचारांचे महत्त्व कळावे व अधिकाधिक वाचकांनी कुरुंदकरांचे लेखन वाचावे.

वादग्रस्त यासाठी म्हटलो की दादोजी आणि रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचा इतिहास आता जुना झालाय. नवनवे पुरावे व नवनवी मतांतरे सातत्याने यासंदर्भात् पुढे येत् आहेत. या अनुषंगाने प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. आणि निष्कारण कोणाच्या भावना दुखवायची माझी इच्छा नाही.

मला व्यक्तीशः शेवटच्या २ पानांत रामदासस्वामींचा २ वेळा आलेला उल्लेख व दादोजींना शिवाजी महाराजांचे गुरु म्हणून मान्य केलेले ( जे अलिकडच्या संशोधनातून ते त्यांचे गुरु नव्हते हे सिद्ध झाल्याचे मेहेंदळेंसारख्या तज्ज्ञ इतिहाससंशोधकाने मान्य केले आहे) या बाबी खटकल्या. हे पुस्तक २००३ साली प्रकाशित् झाले. आणि कुरुंदकर १९८२ सालीच निवर्तले होते. कुरुंदकरांच्या मृत्युनंतर हे पुस्तक २१ वर्षांनी प्रकाशित् झाले आहे. त्यामुळे कोणीतरी या पुस्तकाचे संपादन केले आहे हे उघड आहे. कुरुंदकरांचे एकंदरीत लेखन पाहता या गोष्टी मला पटल्या नव्हत्या. म्हणून मला ते मुद्दे अनावश्यक वाटले. बाकी व्यक्तीशः रामदास स्वामी हे मोठे संत होते आणि दादोजी हे कुशल शासक याबद्दल माझ्याही मनात् अपार् आदर आहे.

बाकी माझे मत चुकीचे असेल तर ते मान्य करण्यात मला कोणताही कमीपणा न येता उलट आनंद वाटेल. :)

अवांतरः अस्वस्थामा आधी मी अस्वस्थ आत्मा असे वाचले होते ;)

गैरसमज..

थोडा गैरसमज होतोय..
एकंदरीत कुरुंदकरांच्या लेखनाबद्दल मला काहीच म्हणायचे नाहीय.. त्यांचे मत अनावश्यक जरी वाटले तरी आता ते काढून टाका असे कोणी म्हणत असेल तर त्याला ठाम विरोध असेल (फार तर तळ टीप टाका पुस्तकात अगदीच वाटले तर )..
परंतु तुमचे मत मात्र नक्कीच अनावश्यक वाटले नाही असे म्हणावयाचे होते.. आणि इथे भावना दुखावण्याचा प्रश्न येत नाही असे वाटते.. तुमचे मत मान्य आहे की तो इतिहास जुना झालाय.. आणि नवीन संशोधन जे पटण्याजोगे वाटते ते मान्य करण्यात कोणालाच काही हरकत नसावी असे वाटते..

तुम्ही तुम्हाला जे वाटते ते मांडलेत तर त्यात दिलगीर वाटण्या जोगे काही नाही.. आणि आपला वरचा प्रतिसाद (ते ' वाचकांना विनंती' वगैरे वगैरे ) पाहून तसे वाटले ते लिहिलेय.. [आमच्या सातारी भाषेला समजून घ्या आणि काही मनावर घेऊ नका.. :)]

बाकी मध्यंतरी या विषयावर एक लोकप्रभा मध्ये लेख वाचला होता.. आणि त्याची प्रतिक्रिया पण वाचली होती.. तेही परस्पर विरोधी मते अगदी साक्षी पुराव्यांसकट मांडलेली बघून कोणावर विश्वास ठेवावा हे आम्हा पामरास काही कळेनासे झाले... त्यात वरून विकि वर पण थोडी धुसर माहितीच बघायला मिळाली..
ज्यांना काही माहिती असेल त्यांनी सांगावे.. इथे आधी ही चर्चा झाली असेल तर दुवे दिलेत तरी चालेल..

प्रती अवांतर : अस्वस्थ आत्मा या अर्थानेच हे 'अश्वत्थामा' चालीवरचं आहे.. शेवटी काय दोन्हींची कथा एकच.. तेल मागत फिरतात इथं तिथं.. झालं... :)

अलिकडच्या अद्ययावत चर्चांची माहिती

अस्वस्थामा,

[आमच्या सातारी भाषेला समजून घ्या आणि काही मनावर घेऊ नका.. :)]

काय सांगता? तुम्हीही सातारकर? छानच

अहो २ सातारकर आणि १ कोल्हापूरकर माझे अत्यंत घनिष्ठ मित्र आहेत तेव्हा मला या भागातील लोकांच्या विशाल हृदयाची कल्पना अगोदरपासून आहेच. :)

लोकप्रभातील या चर्चा मी वाचल्या आहेत. पण अलिकडेच काही इतिहास संशोधकांची चर्चा झाली त्यातून यावर प्रकाश पडेल.

महाराष्ट्र टाईम्स मध्ये अगदी अलिकडे काही चर्चा झडल्या, त्यांचे दुवे देतो आहे.

गजानन मेहेंदळे यांची मटातील मुलाखत

श्री. संजय सोनवणी यांचा इतिहास संशोधक श्री. गजानन मेहेंदळे यांची मते खोडणारा लेख

मेहेंदळेंऐवजी श्री. कस्तुरे यांनी सोनवणींना दिलेले उत्तर

कस्तुरेंनी पुरावे न देता हे उत्तर दिले होते याचा परामर्श घेणारा श्री. संजय सोनवणी यांचा लेख

अलिकडेच या चर्चेचे वाचन् झाले होते त्या पार्श्वभूमीवर कुरुंदकरांचे हे सुंदर पुस्तक वाचनात आले. केवळ म्हणूनच् तो उल्लेख केला होता.

उत्तम पुस्तकपरिचय

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.सागर यांनी "छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य " या नरहर कुरुंदकर लिखित पुस्तकाचा यथायोग्य शब्दांत चांगला परिचय करून दिला आहे.धन्यवाद! कुरुंदकरांचे काही लेख वाचले आहेत. मात्र संपूर्ण ग्रंथ वाचले नाहीत.या लेखाच्या निमित्ताने आता कुरुंदकरांचे सर्व लेखन वाचण्याचे ठरविले आहे.
* अनावश्यक मानून टाळलेल्या मुद्द्यांविषयी श्री,प्रकाश घाटपांडे आणि श्री.अरविन्द कोल्हटकर यांच्या विचारांशी सहमत आहे.

धन्यवाद सरजी

यनावाला,

तुमच्यासारख्या विद्वान व्यक्तीचा प्रतिसाद नेहमीच् मला प्रोत्साहित् करत् असतो.

कुरुंदकरांचे सर्व लेखन् सध्या फक्त् ग्रंथालयांतूनच् बघावयास मिळते. महाराष्ट्रात् असाल तर् तुम्ही नशीबवान् आहात. कुरुंदकर वाचायला मिळू शकेल.

मी त्यांची अनेक पुस्तके कित्येक वर्षे शोधतो आहे, पण् विकत् घ्यायला उपलब्धच् नाहियेत :(

निवडक कुरुंदकर लवकरच ...

तुमच्या माझ्या सारख्या कित्येक जणांची प्रतिक्षा लवकरच संपेल अशी चिन्हे आहेत. "निवडक कुरुंदकर" लवकरच चार खंडांमध्ये प्रकाशित होणार आहे, असे खात्रीलायकरित्या समजते. :-)

अरे वा

"निवडक कुरुंदकर" लवकरच चार खंडांमध्ये प्रकाशित होणार आहे, असे खात्रीलायकरित्या समजते.

मग तर खूपच् छान होईल.

दीपकराव माहितीबद्दल खूप् खूप् धन्यवाद :)

आता फिल्डींग लावून् ठेवतो आणि कुरुंदकरांचे ग्रंथ प्रकाशित झाले की लगेच उचलतो

शिवाजी आणि अफजलखान

कुरुंदकरांचा एक धडा मराठी भाषेत इयत्ता आठवी ते दहावी दरम्यान कधीतरी आम्हाला होता; तो बहुधा याच पुस्तकातील असावा. कारण,

छत्रपति शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील नाट्यमय घटना मोजक्या ५-६ आहेत

हे वाक्य त्यात होते. (किंवा या पुस्तकातील नसेल तरी इतर निबंधातील असेल ज्यातील विचार या पुस्तकातही आले असावे.)

अफज़लखान आणि शिवाजी यांच्याबाबत जी नाट्यमय घटना सांगितली जाते किंवा रंगवली जाते ती तरी तेवढीशी नाट्यमय आहे का हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. याला धर्मयुद्धाचे जे स्वरूप दिले जाते त्यात तथ्य नसून ती राजकारणाची खेळी होती असे असले तरी धर्माचे नाव घेतले गेले नव्हते असेही नाही.

विजापूरकरांचे खरे शत्रू मुघल. शिवाजी नाही. शिवाजी हा काही जिल्ह्या-परगण्यांचा जहागिरदार. आदिलशहाच्या "नाममात्र" पदरी असणारे परंतु जवळपास स्वतंत्र असणार्‍या शहाजीराजे, बहलोलखान वगैरे सरदारांइतकीही शिवाजीची पत नव्हती. (शहाजीचा पुत्र ही एक जमेची बाजू असावी.) शिवाजीला हुसकावून लावण्याची मागणी औरंगजेबाने अदिलशाहीकडे केली होती आणि मुघलांना नाराज करणे अदिलशहाला परवडणारे नव्हते.

कान्होजी जेध्यांना पाठवलेल्या फर्मानात अदिलशहा म्हणतो की 'शिवाजीने निजामशाही अंमलात असणार्‍या कोकणातील मुसलमानांचा छळ केल्याने आणि त्यांना लुटल्याने त्याच्या पारिपत्यासाठी अफज़लखानाची नेमणूक केली आहे.'

परंतु अफज़लखानावर मंदिरे पाडण्याचा विशेषतः तुळजापूर येथील मंदिराला उपद्रव केल्याचा आरोप केला जातो ते तुळजापूर त्याच्या वाटेवर नव्हते. अर्थातच, याचा अर्थ खानाने उपद्रव केला नाही असा नसून ज्या मोठ्या मंदिरांची नावे घेतली गेली ती नाट्यमयता वाढवण्यासाठी घेतली गेली असावी.

- सेतुमाधवराव पगडी यांच्या छत्रपती शिवाजी या पुस्तकातून घेतलेला गोषवारा.

यावर अधिक लिहिता येईल परंतु वेळ नाही. :-(

बाकी, परिचय आवडला.

+१ सहमत आहे

ज्या मोठ्या मंदिरांची नावे घेतली गेली ती नाट्यमयता वाढवण्यासाठी घेतली गेली असावी.

प्रियाली
तुमच्याशी सहमत आहे.

कान्होजी जेध्यांना आदिलशहाने असे फर्मान का पाठवले ते माहित नाही. पण अफझलखान हा स्वतः वाईचा सुभेदार होता त्यामुळे हे फर्मान म्हणजे खानाला विरोध होऊ नये यासाठी आदिलशहाच्या राजकीय खेळीचा भाग असावे.

अधिकाधिक लिहायला तुम्हाला वेळ् मिळो ही इच्छा :)

काहिशी असहमती...

विजापूरकरांचे खरे शत्रू मुघल. शिवाजी नाही. शिवाजी हा काही जिल्ह्या-परगण्यांचा जहागिरदार. आदिलशहाच्या "नाममात्र" पदरी असणारे परंतु जवळपास स्वतंत्र असणार्‍या शहाजीराजे, बहलोलखान वगैरे सरदारांइतकीही शिवाजीची पत नव्हती.
दोन्ही वाक्यांच्या प्रारंभीच "सुरुवातीच्या काळात" असे लिहिले तर जास्त बरोबर ठरेल. नाही का?
कारण शेवटच्या काळात वैभवी व बलाढ्य मुघल साम्राज्यातील अत्यंत मह्त्वाचे व्यापारी शहर (की बंदर) असणारे सूरत दोनदा लुटणे, बादशाही चाकर आहोत असे सांगितल्यावरही फर्मान धुडकावून लावणे, साल्हेर मुल्हेर च्या खुल्या मैदानातील लढाईत मुघलांचा पराभव करण्याच्या काळात केलेला विस्तार व शेवटी दक्षिणेतील मोहिम ह्यात त्यांची पत वाढलेलीच दिसून येते, लढून मिळवलेली दिसून येते.

शिवाजीला हुसकावून लावण्याची मागणी औरंगजेबाने अदिलशाहीकडे केली होती
त्याला नेहमीच शिरेसली नाय घेता येत. शहाजीराजांना कैद झाल्यावरही "आमच्या माणसाला(शहाजींना) कैदेतून (मुकाट्याने) सोडा" असे फर्मान दिल्लीकरांचे आलेच होते.प्रत्यक्षात काही भोसले त्याकाळात किंवा त्याआधीही बराच काळ(निजामशाही पडल्यापासून) मुघलांकडे नव्हते. पुढे जीव असेस्तोवर गेलेही नाहित.

अर्थात चर्चा कुरुंदकरांचे पुस्तक व पुस्तकातील उतारे ह्यापुरतीच मर्यादित असेल तर प्रतिसाद बाद समजावा. नाहीतर शिवकाल हा एक सदाहरित चर्चाविषय् आहे.

--मनोबा

गरज नाही

दोन्ही वाक्यांच्या प्रारंभीच "सुरुवातीच्या काळात" असे लिहिले तर जास्त बरोबर ठरेल. नाही का?

ज्या काळाविषयी (अफझलखान येथे येण्याचा) तो प्रतिसाद आहे तेथे मुद्दाम सुरुवातीच्या काळात असे लिहिण्याची गरज नाही. नंतरच्या काळात आदिलशाही खिळखिळी झाली असता काय झाले त्याबद्दल प्रतिसाद नाही.

शहाजीराजांना कैद झाल्यावरही "आमच्या माणसाला(शहाजींना) कैदेतून (मुकाट्याने) सोडा" असे फर्मान दिल्लीकरांचे आलेच होते.प्रत्यक्षात काही भोसले त्याकाळात किंवा त्याआधीही बराच काळ(निजामशाही पडल्यापासून) मुघलांकडे नव्हते. पुढे जीव असेस्तोवर गेलेही नाहित.

कोणी कोठे जाण्याची येण्याची गरज नाही/ नव्हती परंतु आमचे सतत तुमच्यावर लक्ष आहे किंवा आडून पाडून ढवळाढवळ केल्याने आपला वरचष्मा आदिलशाहीवर राहतो हे मुघल जाणून होते.

नंतरच्या काळात आदिलशाही खिळखिळी झाली असता काय झाले त्याबद्दल प्र

नंतरच्या काळात आदिलशाही खिळखिळी झाली असता काय झाले त्याबद्दल प्रतिसाद नाही.

ठिक. मुद्दा स्पष्ट झाला.

आडून पाडून ढवळाढवळ केल्याने आपला वरचष्मा आदिलशाहीवर राहतो हे मुघल जाणून होते.

अगदि अगदि. असेच ते कुतूबशाहीलाही करायचे व त्यातूनच म्हणे आकण्णा व मादण्णा ह्या कर्तबगार, कुतुबशहाशी एकनिष्ठ सरदारांची हत्याही केली गेली. जाउ देत. ते अवांतर होइल.

--मनोबा

सर्वांनाच लागू

पुस्तक परिचय चांगला आहे.
बाकी प्रतिसादांमध्ये जो उल्लेख आला आहे तो भाग वगळायला नको होताच. वाचकांना काय ते ठरवू द्यावे (चर्चा करू द्यावी) असेच माझेही मत आहे.

कुरुंदकरांनी छत्रपतींना देवत्व बहाल करण्याबद्दल जी मते व्यक्त केली आहेत ती सर्वच ऐतिहासिक (ठरवल्या गेलेल्या) पूरूषांना लागू पडतील असे वाटते. कुरूंदकरांची मते ही वस्तूनिष्ठ वाटतात तशी मिमांसा म्हटल्याप्रमाणे सर्वांचीच करता येईल.

मान्य आहे

वाचकांना काय ते ठरवू द्यावे (चर्चा करू द्यावी) असेच माझेही मत आहे.

बाबासाहेब,

हे मला मान्य आहे. चर्चा झाली तर मी वेळोवेळी माझ्या परीने भर टाकेनच

पुस्तक परिचय आवडला

पुस्तक परिचय आवडला.

मिळाले तर वाचले पाहिजे हे पुस्तक.

नक्की वाचा

धनंजय हे पुस्तक उपलब्ध आहे आणि फक्त् ५० रुपयांत मिळते :)

तेव्हा नक्की वाचा

 
^ वर