आवडता भक्त
मध्यंतरी Argument वर एक छान लेख वाचनात आला. लेखकाने स्वानुभवावरून म्हटले की शक्यतो वाद विवाद टाळावा कारण ‘जेव्हा वाद सुरु होतो त्याक्षणी दोन्ही बाजूंची मते गोठतात व चर्चा संपते,’. दोन्ही बाजू आपापलेच म्हणणे कसे खरे हे पटवून देण्याचा प्रयत्न चालूच ठेवतात व सहसा निष्पन्न काहीच होत नाही. देव आहे की नाही या विषयाचे थोडे असेच झाली आहे असे वाटते. खरे तर देव आहे वा नाही यापेक्षा देवाच्या नावाने आपणास लुटण्याचा प्रयत्न करणारे त्रासदायक असतात. तिथे अंधश्रद्धेचे प्रगटीकरण होते व समाजाचे exploitation.
माझी देवा बद्दलची मते सहजपणे लहानपणी शाळेच्या अभ्यासक्रमात असलेल्या कवितेने बनली व ती अजूनही तशीच राहिली आहेत. त्या कवितेचा गाभा खालील प्रमाणे:
लहानपणी शाळेत हिंदी पाठ्यपुस्तकात असलेली एक कविता आठवते. त्यात कवीने भगवान विष्णू आणि त्यांचे खास व प्रिय असे भक्त नारदमुनी यांच्यातील सुंदर संवाद वर्णन केला आहे.
कवी म्हणतात, एकदा नारद मुनी भगवंताना विचारतात कि आपला सर्वात ज्यास्त आवडता भक्त कोण? उत्तर सहाजिकच अपेक्षित असते की मुनिवर्य आपणच की. परंतु भगवंत पृथ्वीवरील एका शेतकऱ्याचे नांव सांगतात. नाराजी लपवीत मुनिवर्य त्याचा पत्ता विचारून म्हणतात की अश्या भक्ताला भेटून चार गोष्टी शिकावे म्हणतो.
प्रत्यक्ष पाहिल्यावर चकीत होत्साते मुनिवर्य भगवंताकडे तक्रार करतात कि ‘सकाळी एकदा झोपून उठल्यावर, दुपारी भोजनापूर्वी आणि निद्राधीन होण्यापूर्वी’ असे दिवसातून फक्त तीन वेळाच आपले नांव घेणाऱ्यात आपण काय पाहिलेत जे माझ्यासारख्या आपले संतत नांव घेणाऱ्या भक्तात नाही?
भगवन म्हणतात ‘उत्तर अवघड आहे. विचार करण्यास अवधी हवा तस्मात तेलाने ओतप्रोत भरलेला कमंडलू घेऊन काळजीपूर्वक, सावकाश पृथ्वीप्रदक्षिणा करणे, तोवरी उत्तर तयार ठेवतो. अट मात्र कठीण आहे, त्यातील तेलाचा एकही थेंब पृथ्वीवर सांडता कामा नये. ही काळजी घ्यावी.
आनंदाने पृथ्वीप्रदक्षिणा करून परत आल्यावर भगवंतांचा प्रश्न मुनिवराना चक्रावून टाकणारा होता: ‘पृथ्वीप्रदक्षिणे दरम्यान माझे नांव किती वेळा घेतलेत?’
मुनी म्हणाले ‘वेगळे असे नांव घेतले नाहीच कारण काम कठीणच होते, सर्व लक्ष कमंडलू वरच होते, पण ‘आपलेच तर काम करीत होतो!’
यावर भगवंतांचे उत्तर तयारच होते. तो शेतकारी सुद्धा मी नेमून दिलेलेच काम करतो व तरीही ३ वेळा नांव घेतो म्हणूनच मला जास्त आवडतो.
कल्पनाशक्ती, विचार मांडण्याची उत्तम शैली, व महत्वाचा संदेश! माझ्या मन:पटलावर कायमचा कोरला गेला. हा संदेश छान मार्गदर्शक वाटतो. त्यापेक्षा ‘आपले काम चोख करत रहा’ (व त्याबद्दल देवाकडे काही मागू नका) हा संदेश मनावर कोरला गेला.
कवीचे नांव आठवत नाही पण त्या शाळकरी, संस्कारक्षम वयात अभ्यासलेल्या कवितेचे सार मनात कायम कोरले गेले. देव आहे किंवा नाही यावर वाद घालणे, प्रत्येक बाजूने आपल्या म्हणण्यावर ठाम रहाणे, प्रसंगी एक दुसऱ्यांना मूर्ख, पुराणमतवादी वगैरे म्हणणे यांतून मार्ग कधीच निघत नाही. अशा त्या स्वच्छ विचार असणाऱ्या व ते सुमारे ५० वर्षापूर्वी ठामपणे मांडणाऱ्या कवींना त्रिवार वंदन आहेच.
Comments
उद्देश
रंजक गोष्टीतून संदेश देण्याची पद्धत आवडली, बाकी वाद आणि संवाद करण्याचा हेतू/उद्देश काय आहे ह्यावर त्याचा निष्फळपणा अवलंबून आहे असे माझे मत आहे, उद्देश सकारात्मक असेल तर चर्चा करणे गरजेचे आहे, तो हेतू न समजल्यास चर्चा वाद वाटू शकते, तसेच करमणुकीसाठी मर्यादित वाद घातला जाउ शकतो, कायमच गंभीर राहून काम करणे सगळ्यांनाच आवडते असे वाटत नाही.
पण बहूदा अशा चर्चेला/मर्यादित वादाला तुमचा आक्षेप नसावा असे वाटते.
उद्देश
हेतू महत्वाचा आणि तो न समजणे निष्फळपणाकडे नेते हा आपला मुद्दा बरोबरच आहे. चर्चेला माझा विरोध नाहीच उलट चर्चेतून सर्वांगीण विचारांतीच योग्य निर्णय येऊ शकतो. मतभिन्नता असणे हे जिवंतपणाचे, सुदृढतेचे लक्षण आहे. भांडणाचा वास Argument मध्ये असतो व तिथे मते फ्रीज होतात तर चर्चेत प्रश्न सोडविण्याकडे किंवा समान मुद्दे शोधून पुढे सरकण्यावर भर असतो म्हणून उकल होऊ शकते. पंच नसेल तर अशा चर्चेतून काहीच निष्पन्न होत नाही.
त्यावरून मध्यंतरी इन्टर्नेट वरएडवर्ड डी बोनो यांचे 6 Thinking Hats वरचे Power Point Presentation बघण्यात आले होते त्याची आठवण झाली. हा विषय मला फारच भावला होता. त्यांत एकाच व्यक्तीने एखाद्या महत्वाच्या विषयावर निर्णय घेण्यापूर्वी ६ वेगळ्या प्रकारे विचार करण्याच्या टोप्या (Hats) घालून सर्वांगीण विचार करणेस सुचवले आहे.
ही संकल्पना नुसती छानच नव्हे तर अत्यंत उपयोगी आहे. त्यांतल्या टोप्या: Rational Thinking (पांढरी टोपी), Emotional/Intuition Thinking (लाल टोपी), Caution/Defensive/Flaw Finding Thinking (काळी टोपी), Positive Thinking (पिवळी टोपी), Creative Thinking (हिरवी टोपी), Process Control Thinking (निळी टोपी).
चर्चेचे सूत्र संचालन करणारा निळी टोपी परिधान करतो व चर्चेमध्ये कुठे अडथळे आल्यास चांगल्या निर्णयाप्रत येण्यासाठी योग्य त्या (प्रकारची विचार) टोपी असलेल्यास प्राधान्य देत चर्चा पुढे सरकवतो. अर्थातच सर्व विषयाबाबत निर्णय येत नाहीच.
त्याचा स्वैर अनुवाद करून ‘उपक्रम’ वर टाकणे आवडेल. पण थोडे कष्टाचे काम आहे. वेळ लागेल.
सहमत
सहमत.
एडवर्ड डी बोनो ची संकल्पना ठाऊक आहे, कमी वेळात किचकट शंकेचे इष्टतम समाधान मिळवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे.
स्वैर अनुवाद नक्की टाका, वाचायला आवडेल.
संदेश
आपले काम चोख करताना ते मला नेमून देणारा देव असलाच पाहिजे, अन् मी त्याचे नांवही अधून मधून घेतलेच पाहिजे हे कशावरून?
(गोठलेल्या मताचा)
आडकित्ता
ता.क.
स्वच्छ विचारवाल्या कवींनी देव आहेच, अन् नारद *आहेत* व तो शेतकरी(ही आहे, व,) हे भक्तच् आहेत हे गृहित धरून टाकले आहे. याबद्दल असहमत. देव नाही इथून सुरुवात करून, किंवा देव आहे किंवा नाही हे चर्चेत न घेताच ती गोष्ट पुनः लिहा ही विनंती.
संदेश
@ देव आहे किंवा नाही हे चर्चेत न घेताच ती गोष्ट पुनः लिहा ही विनंती.
माझ्या मनात असा वेगळा विषय रेन्गाळत आहेच. पूर्णपणे साकारल्यास जरूर असे रूपक् लिहावयास आवडेल.
देव ही कल्पना येथेही रूपकात्मकच आहे. खरे तर काम कुठून् सुरु होते हे बर्याचदा समजतच नाही. तसेच मॅनेजमेण्ट म्हणते कि 'वरिष्ठ् अधिकारी म्हणजे आवश्यक आहे पण वाइट (!) गोष्ट आहे' (Necessary Evil). बॉस कुणालाच आवडत नसावा पण त्याला पर्याय सुद्धा नाही. त्याची नजर नसेल तर कार्यालयातून् लवकर पळ काढणे, आजचे काम् उद्यावर् ढकलणे इ. गोष्टी आपण् पाहतोच्. मैदान असेल तर पन्च, कार्यालय तेथे बॉस. शिस्तीसाठी आपणास बॉस हवा हीच कल्पना साकारलेली आहे असे वाटते.
नेसेसरी एविल्.
Necessary Evil
विषय लिहिताना रोमन अक्षरे वापरू नयेत.............................
साहेब
जर हीच तुमची देव या संकल्पने बाबतची मते असतील, तर तुमचे माझे एकमत आहे.
नसतील तर सांगा, पुढे बोलू.
वाद, मते-मतांतरे आणि जाऊ द्या हो!
वाद घालायला माझी हरकत नाही. मतांतरे होण्यासही हरकत नाही परंतु वाद घालताना ते मुद्देसूद असावे. पोरकट वाद, वैयक्तिक उणीदुणी, उगीचच शंका आणि कीस काढत राहणे वगैरे हेल्दी वादाची उदाहरणे नाहीत. आडमुठेपणा हे देव मानणार्यांचे किंवा न मानणार्यांचे वैशिष्ट्य नाही.
मार्ग काढायचा आहे हे केवळ गृहितक आहे. कदाचित मार्ग काढायचा नसेलच. देवाची असलेली आणि नसलेली काठी ;-) घेऊन इतरांना झोडपता येते ना मग झाले तर. देवाचे नाणे कोणत्याही बाजूने पडले तरी कौल पडतोच. ;-)
लेट गो, जाऊ द्या हो, आता रजा घेतो हं! अशी वृत्ती नसेल तर वाद फक्त चिघळतच राहतात. किंबहुना, ते चिघळावे हाच उद्देश असावा. कोण जाणे!
देवाने नेमुन दिलेले ?
+१ यात लपुन केलेल्या भ्याड खोड्याही आल्याच
बाकी मुळ लेखाबद्दल, कथा म्हणून आवडली. बाकी 'काम करत रहा' हे ही योग्य, पण ते काम करविणारा कोणीतरी आहे, किंवा कोणा देवाने ते मला नेमुन दिलेले काम आहे हे पटत नाही (फारतर मला माझं काम माझा बॉस/क्लायंट नेमुन देतो, त्यात देव कुठे आला?)
ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये
देव आहेच की ह्यात....
क्लायंटला अमुकच एका उमेदवाराची निवड का कराविशी वाटली?
किम्वा मुळात अमुक एका कंपनीचाच इंटरव्यू द्यावासा सदर उमेदवारास का वाटला/इंटरव्यु द्यायची बुद्धी कशी झाली हे कर्ता-करविता थेरीवाल्यांचे मुद्दे आहेत.
आता बोला.
--मनोबा
पाडलेल्या बोधकथा
अशा प्रकारच्या 'पाडलेल्या' बोधकथा पुर्वी ऐकलेल्या आहेत. काय बोधामृत पाजायचे आहे हे अगोदर गृहीत धरुन त्याभोवती कथा गुंफलेली असते. प्रवचनात अशा कथांचा सुकाळ असतो. आपापल्या पंथांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी अशा कथा वापरल्या जातात. कालांतराने वापरुन वापरुन गुळगुळीत झाल्या कि नवीन कथा पाडल्या जातात. यातुन मनोरंजन होते. कथेकरी बुवांना श्रोते कम अनुयायी मिळतात. अनुयायी वाढले की मठ तयार होतात.
अस्तिक नास्तिक वाद तर शतकानुशतके चाललेच आहे. अशा वादांना अंत नसतो. पण यातुन वाद-संवादाची खाज भागते. ती पुनःपुन्हा उफाळून येत असते. हे असच चालायच.
प्रकाश घाटपांडे
वेगळा स॑देश
कंटाळवाणा लेख
शी काय बोअर लेख आहे. माझ्या जन्म पत्रिकेनुसार मी राक्शस गणाचा. मला वाद घालायला आवडतो, भांडायला आवडते. मला त्यातून (आसूरी म्हणा हवं तरं) आनंद मिळतो.
लेख वाचताना असे वाटले कि वाघाचे चामडे अंगावर घेतलेली शेळी समोर आहे. आणि मला लगेच प्रतिसाद देणे भाग पडले.
लेखाची सुरवात कोणत्यातरी लेखकाच्या (त्याचे नांव देखील दिले गेले नाही) मताने सुरवात केली आहे. ते मत लेखकाला 'अगदी पटले' असे देखील कुठेही न म्हणता उगीचच आपल्या बालपणीची गोश्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
गोश्ट गैर नव्हती. गोश्ट सांगण्यात देखील काही गैर नाही. पण इतर कोणा लेखकाचे विचार वा मते पुढे ढाली सारखे ठेवून त्यामागे लपत देवा बद्दलच्या लहान मुलांना सांगण्याजोगी कल्पना इतरांना सांगणे मला अजिबात आवडले नाही.
पत्रिका !
राक्शसगणाचे रावलेसाहेब जन्मपत्रिकेवर वी श्वास ठेवतात, हे वाचून आश्चर्य वाटले.
बाकी कथा चांगली आहे. आधी ऐकली होतीच, पण बोध नव्हता घेतला. :)