आहारविषयक काही प्रश्न

आपल्या जीवनात सर्वात महत्वाचे काही असेल तर ते म्हणजे चांगली तब्येत. सशक्त माणसाची कार्यक्षमता जास्त असते, तो वेळ आणि पैसा याचा सदुपयोग करून त्याचे ध्येय गाठू शकतो.
सशक्त आणि निरोगी राहायचे असल्यास आपला दैनंदिन आहार आणि व्यायाम या दोन गोष्टींना महत्व आहे. त्यापैकी आहारविषयक काही मुद्दे इथे मांडत आहे. त्या मुद्यांना धरून आहाराविषयी आपापली माहिती आणि अनुभव सर्वांसमोर ठेवावा.

१) आपल्या दैनंदिन आहारात तेलाचे प्रमाण किती असावे ? तेल व तूप यापैकी जास्त उष्मांक कशातून मिळतात? पूर्वीच्या काळी आहारात साजूक तूपाचे प्रमाण खूप असायचे. साजूक तूप आणि तेल या दोन्हींच्या पोषण मुल्यामध्ये काय फरक आहे? जर कोलेस्टरोल चे प्रमाण नियंत्रित ठेवायचे असल्यास शक्यतो कोणत्या प्रकारचे तेल वापरावे?

२) अंडयातून मिळणारी प्रथिने आणि दुधातून मिळणार्‍या प्रथिनांमध्ये काय फरक आहे? एक ग्लास दूध आणि एक अंडे यांचे पोषणमूल्य व पोषकद्रव्ये तुलना कोणी देऊ शकेल काय? अंडयामधला पांढरा भाग आणि पिवळा बलक यांमध्ये कुठले पोषणमुल्य असते? पिवळे बलक खाऊ नये असे म्हणतात ते का? गाईच्या दुधातली पोषक द्रव्ये आणि म्हशीच्या दुधातली पोषक द्रव्ये तुलना?

३) शाकाहारी आहारात प्रथिने डाळी व कडधान्ये यातून मिळतात. आपल्या सर्वसाधारण जेवणात आपण जास्त करून तूर् किंवा हरभरा डाळ वापरतो. या सगळ्या डाळींमध्ये व कडधान्यांमध्ये सारख्याच प्रकारची प्रथिने असतात का? म्हणजे काही डाळी आहारातून वगळल्या तरीही आपण आपली प्रथिनांची गरज भागवू शकतो का?

४) अ ब क ड ई जीवनसत्वे भरपूर असलेले रोजच्या जेवणातले पदार्थ कोणते?
उदा. अ जीवनसत्व- आंबा, गाजर इ.

५) लोह, कैल्शिअम, फोस्फरस इ. खनिज द्रव्यांचे आहारातील स्त्रोत कोणते? जास्त प्रमाणात हि द्र्व्ये असलेले पदार्थ कोणते?

६) मिरची आणि मसाले यांचे काही पोषण मुल्य आहे का? असल्यास कोणते? :)

७) तांदूळ आणि गहू यांचा तुलनात्मक विचार. म्हणजे भात किती खावा आणि पोळी किती खायची हे ठरवता येईल. गव्हामधली पोषकद्रव्ये आणि तांदुळातली पोषकद्रव्ये एकच असतात का वेगवेगळी असतात.

८) फळे सकाळी खावीत का संध्याकाळी खावीत?

९) आंबवलेले पदार्थ (उदा. इडली डोसा इ. ) आरोग्यास चांगले असतात कि वाईट ?

१०) आपण कांदा आणि बटाटा सर्रास वापरतो. बटाटयात जास्त करून पिष्टमय पदार्थ असतात, तसे कांद्याचे पोषण मुल्य काय आहे? कांद्यामध्ये कोणती पोषकद्रव्ये असतात?

११) एखाद्याला आपले वजन कमी करायचे असल्यास त्याचा आहार कसा असावा? त्यासंबंधीचे उपाय. उदा. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यापैकी काय जास्त खावे, काय वर्ज्य करावे?

१२) एखाद्याला आपले वजन वाढवायचे असल्यास त्याचा आहार कसा असावा? (सशक्त राहून)

१३) आपल्या दृष्टीने सर्वात आदर्श नाष्टा, आदर्श दुपारचे जेवण, आदर्श संध्याकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण कोणते?

टीपा:
१) वरील मुद्दे प्रातिनिधिक आहेत, आपापल्या अनुभवाच्या आधारे कमी अधिक मुद्यांची चर्चा होऊ शकते.
२) वरील लेखात पोषणमुल्ये हा शब्द प्रथिने, जीवनसत्वे, पिष्टमय पदार्थ इ. अशा अर्थाने वापरला आहे.
३) या विषयावरील संदर्भांचे स्वागत.
४) शक्यतो भारतीय पध्दतीच्या आहाराचा विचार व्हावा.

लेखनविषय: दुवे:

Comments

हा धागा

हा नरेंद्र गोळे यांचा आहाराविषयक धागा वाचनीय आहे.

एक उपयुक्त दुवा

वरील काही प्रश्नांचे (उदा : गव्हामधली पोषकद्रव्ये आणि तांदुळातली पोषकद्रव्ये एकच असतात का वेगवेगळी असतात? ... कांद्याचे पोषण मुल्य काय आहे? कांद्यामध्ये कोणती पोषकद्रव्ये असतात?... ) उत्तर मिळण्याकरिता दुवा. उदाहरणार्थ कांद्यासाठी.

१०० ग्रॅम कच्च्या कांद्यात ~८९ ग्रॅम पाणी, ~१ ग्रॅम प्रथिन, ~९ ग्रॅम कार्बोहायड्रेट (पैकी ~४ ग्रॅम साखर) आहे. तक्त्यात जीवनसत्त्वांचे-खनिजांचेही प्रमाणही दिलेले आहे.

काही प्रश्नांची सांगोवांगी ऐकलेली उत्तरं

धनंजयने दिलेली साईट आवडली. पण भारतीय पदार्थांसाठी असं काही असेल तर अधिक उपयुक्त वाटेल.

२) अंडयातून मिळणारी प्रथिने आणि दुधातून मिळणार्‍या प्रथिनांमध्ये काय फरक आहे? एक ग्लास दूध आणि एक अंडे यांचे पोषणमूल्य व पोषकद्रव्ये तुलना कोणी देऊ शकेल काय? अंडयामधला पांढरा भाग आणि पिवळा बलक यांमध्ये कुठले पोषणमुल्य असते? पिवळे बलक खाऊ नये असे म्हणतात ते का? गाईच्या दुधातली पोषक द्रव्ये आणि म्हशीच्या दुधातली पोषक द्रव्ये तुलना?

अंड्याच्या पिवळ्या बलकात अधिक प्रमाणात कोलेस्टेरॉल/प्राणिज स्निग्ध पदार्थ असतात. शिवाय त्यात जीवनसत्त्वेही असतात. पांढर्‍या भागात (बलकाच्या तुलनेत्) अधिक प्रमाणात प्रथिनं (बव्हंशी पाणी) असतात.
गाईच्या दुधात म्हशीच्या दुधापेक्षा ओमेगा ६ (का ओमेगा ३? जे शरीरासाठी जास्त चांगलं असतं ते; जे बदाम आणि काही प्रकारच्या माशांमधेही असतं) जास्त असतं. म्हणून गाईच्या दुधातले स्निग्न पदार्थ अधिक चांगले. -- एका जिमच्या डाएटीशनकडून आलेली ऐकीव माहिती. आणखी एक माहिती म्हणजे 'जड' अन्न, उदा. बदाम, डाळं वगैरे, दिवसा आपली हालचाल अधिक असण्याच्या काळातच खावेत. त्यामुळे मेद साठून रहात नाही आणि शरीराला पोषणमूल्येही मिळतात.
भारतात, बरेच प्रयत्न करूनही गायीच्या दुधाचं चांगलं दही लावणं मला जमलं नाही. त्याची ट्रिक कोणाला माहित आहे का?

३) शाकाहारी आहारात प्रथिने डाळी व कडधान्ये यातून मिळतात. आपल्या सर्वसाधारण जेवणात आपण जास्त करून तूर् किंवा हरभरा डाळ वापरतो. या सगळ्या डाळींमध्ये व कडधान्यांमध्ये सारख्याच प्रकारची प्रथिने असतात का? म्हणजे काही डाळी आहारातून वगळल्या तरीही आपण आपली प्रथिनांची गरज भागवू शकतो का?

साधारणतः तृणांच्या बियांमधे त्वचेत चिक्कार पोषणमूल्य असतात. कडधान्यांची त्वचा काढून त्याच्या डाळी करतात. तेव्हा कडधान्य अधिक पोषक असावीत. कडधान्य खाऊन अनेक लोकं वाताचा त्रास होतो अशी तक्रार करतात.
मला एक शंका अशी आहे: कडधान्यांना मोड आल्यास ती जास्त पोषक होतात असं म्हणतात. मोड येतात तेही बीमधलं पोषण वापरूनच का? तसं असेल तर आधी शिजवले/खाल्ले काय, फरक का पडतो?

मूगडाळ पचायला हलकी असावी, आजारातून उठल्यावर, विशेषतः कावीळ इ यकृतसंबंधी रोग, तुरीच्या जागी मूगडाळ खायला सांगतात. बंगाल्यांच्या जेवणात मसूरडाळही बर्‍यापैकी असते जे मराठी जेवणात फारसे दिसत नाही. तीही चवीला चांगली लागते.
बॉडीबिल्डर्स मुद्दाम होऊन आहारात डाळी घेतात असं दिसतंच नाही. त्यामुळे अंडी, दूध, मांसाहार करत असाल तर प्रथिनांसाठीच डाळी खाण्याची आवश्यकता नसावी. पण त्यामधून ब आणि क कडधान्य आणि चोथा मिळतो.

४) अ ब क ड ई जीवनसत्वे भरपूर असलेले रोजच्या जेवणातले पदार्थ कोणते?

कडधान्य आणि डाळींमधे ब आणि क जीवनसत्त्व असतात. ही जीवनसत्त्व पाण्यात विरघळणारी असल्यामुळे कडधान्य/डाळी धुताना, शिजवताना याचा विचार करावा. अंड्याच्या बलकात ड् जीवनसत्त्व मिळतं. मश्रूममधेही ड जीवनसत्त्व असतं. कोवळ्या सूर्यप्रकाशात ड जीवनसत्त्व शरीरात तयार होतं. काही तेलबियांमधे ई जीवनसत्त्व मिळतं असं अंधुक आठवतं आहे.
(तुम्ही उल्लेख न् केलेलं के जीवनसत्त्व पालक आणि कोबीतून मिळतं. भारतीय आहारात लेट्यूस फारसा वापरत नाहीत, पण त्यातही के जीवनसत्त्व मिळतं.)

८) फळे सकाळी खावीत का संध्याकाळी खावीत?

आयुर्वेदीक लोकांच्या मते भुकेल्या पोटी फळं शीत असल्यामुळे खाऊ नयेत, त्यामुळे भूक मरते. अमेरिकेत म्हणे सक्काळी सक्काळी थंडगार संत्राज्यूस पिण्याची पद्धत आहे, तरीही अमेरिकन म्हणे जगातले सगळ्यात जाडे लोकं आहेत.

९) आंबवलेले पदार्थ (उदा. इडली डोसा इ. ) आरोग्यास चांगले असतात कि वाईट ?

तुम्ही कोणत्या डॉक्टरला विचारता त्यावर अवलंबून आहे. माझ्या ओळखीतल्या एक आयुर्वेदीक डॉक्टराच्या मते दक्षिणेत जाऊन (जसं काही दक्षिण भारतात सगळीकडे एकसारखी हवा असते!) इडली-डोसा खायला हरकत नाही. आणखी एकाच्या मते दक्षिण भारतासारखी हवा असेल तिथे बिनधास्त् खा. तिसर्‍याच्या मते तिथली हवा आणि महाराष्ट्रातली हवा यांच्यात फार फरक नाही; तसंच पावही आंबवलेला असतो जो युरोपात वर्षानुवर्षे खात आहेत. महाराष्ट्राची हवा या दोन्हींच्या मधली आहे, हवं तेव्हा हवं तेवढं खा.

११) एखाद्याला आपले वजन कमी करायचे असल्यास त्याचा आहार कसा असावा? त्यासंबंधीचे उपाय. उदा. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यापैकी काय जास्त खावे, काय वर्ज्य करावे?

पचवण्यास सोपे कर्बोदकांनी संपृक्त पदार्थ, उदा: साखर, पॉलिश्ड तांदूळ (उदा: बासमती) वगळा. गहू, उकडा आणि/किंवा फारसं पॉलिश न केलेला तांदूळ, ज्वारी, बाजरी जास्त पचण्यासाठी अधिक प्रमाणात शक्ती खर्च करावी लागते. ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स यांच्यासारखी 'हलक्या प्रतीची' तृणधान्यं चांगली. आजकाल आपल्याकडे ओट्सही मिळतात, ते ही तसेच. (वजन कमी करायचं आहे म्हणजे शरीरतला मेद कमी करायचा आहे, स्नायू नाहीत असं मानते आहे.)
माझा अनुभवः सकाळी नाश्त्याला ओट्समधे मनुका आणि/किंवा बेदाणे गोडव्यासाठी आणि बदाम चवीसाठी घालून, हे मिश्रण गरम दूधात घालून खाल्ल्यास भूक बराच काळ भागते. कमी खाऊन पुरतं (ओट्स् पोटात जाऊन पाणी शोषून टम्म फुगतात. पाणी अधिक प्यावं.) आणि मेद कमी तयार होतो. भारतात Quaker Oats साध्या वाण्याकडेही मिळतात; ते गरम दूधात घातले की शिजवावे लागत नाहीत. नाश्ता बनवण्याचे कष्टही घ्यावे लागत नाहीत.

अधिक फायबर्स/चोथा असणारे पदार्थ घेणे उत्तम. चोथ्यामुळे "सकाळी" आराम पडतोच. पण चोथा खाल्ल्यास पोट भरण्याची भावना अधिक लवकर होते त्यामुळे एका वेळेस खाणं कमी होतं. चोथा पचवायला, खरंतर जठराच्या बाहेर जायला वेळ जास्त लागतो त्यामुळे पोट भरलेलं असण्याची भावना अधिक काळ टिकतेही.

अवांतरः ऐकीव माहिती अशी की मंदोदरी हे नावही थोडं 'अश्लील' आहे. मंदोदरी म्हणजे कमनीय स्त्री. अन्नपचन होण्यास खूप वेळ लागल्यामुळे आकार आटोपशीर असणारी ती मंदोदरी.

अतिशय माहितीपुर्ण प्रतिसाद

वा! अतिशय माहितीपुर्ण प्रतिसाद. आवडला!

अवांतरः रात्री गरम दुधात चमचाभर घरचं दहि - विरजण- घालुन ठवळत रहावं. दुघ कोमट- जवळ जवळ रुम टेंपरेचरला आलं की मग थांबावं व झाकुन थेवावं. सकाळी दहि लागतं. फक्त कोणाकडून तरी गायीच्याच दुधाचं विरजण मिळायला हवं. विकतचं दही किंवा इतर प्राणीजन्य दुधाचं दही गायीच्या दुधाला नीट दह्यात बदलत नाही

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

मूगडाळ पचायला हलकी असावी

उत्तम प्रतिसाद.

मूग डाळ पचावयास हलकी असते. इतर कडधान्ये वेगवेगळ्या प्रमाणात पचावयास जड असतात. याचे मुख्य कारण म्हणजे डाळीमध्ये ट्रीप्सिन इन्हीबिटर्स नावाची प्रथिने सुद्धा असतात जी आपल्या शारीरात असलेले व प्रथिने पचविण्यासाठी आवश्यक असे ट्रीप्सिन नष्ट करतात. जितके ट्रीप्सिन इन्हीबिटर्सचे प्रमाण ज्यास्त तेव्हढी ती डाळ पचण्यास कठीण. मुगात यांचे प्रमाण कमी, चवळीत ज्यास्त तर सोयाबीन व राजमा यांत बरेच ज्यास्त.

काही कडधान्ये मोड आणण्यासाठी भिजत घातल्यास ट्रीप्सिन इन्हीबिटर्सचे प्रमाण कमी होऊ शकते (सर्व कडधान्यात नाही). परंतु शिजवल्यावर ट्रीप्सिन इन्हीबिटर्स बऱ्याच प्रमाणात नष्टही होतात, म्हणून ती कडधान्ये पचावयास थोडी अधिक हलकी होतात. म्हणूनच मोड आलेले मूग नुसती चांगली वाफ देउनही शिजवून खाता येतात तर 'वाल, सोया वा राजमा कुकरमध्ये' चांगलाच शिजवावा लागतो (कच्चे खाण्याचा विचारही चूक होतो).

मुगाच्या डाळीची खिचडी लवकर पचते तर तूर डाळीची खिचडी पचावयास वेळ लागल्याने त्यानंतर भूक उशिरा लागते.

कडधान्यांना मोड

मला एक शंका अशी आहे: कडधान्यांना मोड आल्यास ती जास्त पोषक होतात असं म्हणतात. मोड येतात तेही बीमधलं पोषण वापरूनच का? तसं असेल तर आधी शिजवले/खाल्ले काय, फरक का पडतो?

मोड येण्याच्या प्रक्रियेत कडधान्यातली काही पोषक तत्त्वे जीवरासायनिक प्रक्रियेमुळे अन्य पोषक तत्त्वांत बदलतात. (अर्थात मूलद्रव्ये-एलिमेन्ट्स् म्हटली तर तीच असतात. पण संयुगे वेगळी असतात.) काही जीवरासायनिक प्रक्रिया करणारी एन्झाइमे वेगवेगळ्या जनावरांमध्ये नसतात. उदाहरणार्थ ग्लूकोझपासून क-जीवनसत्त्व बनवायची प्रक्रिया मानवाच्या पेशींमध्ये होऊ शकत नाही. त्याच प्रमाणे काही ब-जीवनसत्त्वांबाबतही. (पोरकिड्याच्या पेशींमध्ये मात्र या प्रक्रिया होऊ शकत असाव्यात. पोरकिडा फक्त सुके धान्य पोखरून तगू शकतो, फळफळू शकतो.) या प्रक्रिया करणारी एन्झाइम-साधने वनस्पतीच्या पेशीत असतात. सुक्या कडधान्यातल्या जैविक प्रक्रिया सुप्त असतात तेव्हा त्यातील पेशींमध्ये जीवनसत्त्वांची आवश्यकता नसते. त्यांचे प्रमाणही थोडेच असते. मोड येताना जसे पेशींचे एधन (?मेटॅबॉलिझम?) वाढू लागते, तसे त्यातील पेशी गरजेप्रमाणे जीवनसत्त्वे तयार करू लागतात, कडधान्यामधले त्यांचे प्रमाण वाढते.

+१

टंकनश्रम वाचवलेत, आभार्र.

--मनोबा

+२

+१ - अदिती
+१ - धनंजय.

धन्यवाद.

कडधान्यांना मोड

उत्तम स्पष्टिकरण

दृष्टिकोन्...

पौष्टिक् आहार म्हणजे काय ह्यावर वेगवेगळ्या तज्ञांची अगदि टोकाची आणि विरुद्ध मते वाचायला मिळालेली आहेत.
काही ठिकाणी अगदि दोन् शास्त्रांतच भांडण दिसून् येते. पारंपरिक समजुतीनुसार् दुधामधाने लडाबडलेले पदार्थ उत्तम्, तर आधुनिक वैद्यकानुसार(गावठी भाषेत ऍलोपथी) कोलेस्टिरॉल , क्यालरिज च्या नावाने ह्याच पदार्थांबद्दल् बोटं मोडली जातात.

आयुर्वेदात नुसते पदार्थाचे "पोषणमूल्य" पाहिले जात नाही तर त्यातील् "गुण" सुद्धा पाहिला जातो. आधुनिक शास्त्र म्हणते गुण-बिण, अन्न-संस्कार वगैरे सर्व भाकड्कथा आहेत. फाट्यावर मारा.पौदा:- तूप अमुक एका प्रकारे बनवले व मग भरपूर खाल्ले तरी कोलेस्टिरोल वाढत नाही असे आयुर्वेद वाले सांगतात.)

पारंपरिक गोश्टी म्हणतात शिजवलेले खा(अगदि मोड आलेली कडधान्येही) तर आधुनिक विअद्यकशास्त्र त्याच गोष्टी फायबर,जीवनस्त्वांच्या व इतर पोषणमूल्यांच्या अधिक मात्रेसाठी ते कच्चेच खा म्हणते.

सविस्तर प्रतिसाद देण्यासाठी रुमाल टाकून् ठेवतोय.
एक थम्ब् रूल् नक्कीच सांगू शकतो, local food* हे सहसा परंपरेने , हजारो वर्षाच्या अनुभवाने,निरिक्षणातून सिद्ध झालेले असते, त्या त्या हवेत तेच मानवते.
आपल्याकडे असाल तर भाजी-भाकरी,ब पिठलं-भाकरी ब्येष्ट. दक्षिणेत गेलात तर भरपूर भात खाण्यास संकोच नसावा.

शिवाय भरपूर सिझनल फळे खावीत. दुआ:- उन्हाळ्यात भरपूर आंबा ओरपण्यास(सालीसकट) लाजू नये. त्यापाठोपाठ पावसाळ्यात येनारा जांभूअळही खाल्ला की आंब्याने होअणारे बरेचसे दुष्परिणाम् आपोआप् उतरतात.(बर्‍युआच जणांना अधिक् आंब्याने ग्यासेस् वगैरे होतात, पचनशक्ती मंदावते.)
थोडक्यात स्वतःचा आहार ऋतुचक्रानुसार फिरता ठेवावा.

त्यातल्या त्यात बरीचशी बरी माहिती "माझा साक्षात्कारी हृदयरोअग " मध्ये डॉ अभय बंग ह्यांनी स्वतःवरच काही प्रयोग करून् दिलेली आहे. ती वाचावी.

* हली आपल्याकडचे वडा-पाव्, पाव-भाजी,मिसळपाव,भरपूर रसायने घालून् फुअगवलेल्या इडल्या,वडे ह्यांना मराठी/स्थानिक अन्न म्हणायची विचित्र टुम् निघाली आहे. लोक चक्क् सपरिवार् हे पदार्थ् भरपूर , अगदि जेवनास पर्याय म्हणून हाणतात. एखादे वेळेस, गंमत म्हणून्, अपरिहार्यता म्हणून् ठिक आहे. सातत्याने असे करणे (व स्वतःलाच "हे इथलेच आहे" किंवा "अमक्या अमक्या ठिकाणची मिसळ लै फेमस आहे, त्याने काही त्रास होत नाही" जिभेचे चोचले म्हणून् मीही खातो, तुम्हीही खा, पण उगाच त्याला पौश्टिक् व निरुपद्रवी म्हणण्याचा नालायकपणा करु नका असे कळवळून सांगावेसे वाटते.)

सविस्तर प्रतिसादासाठी रुमाळ टाकुन् ठेवतो आहे.
--मनोबा

काही मजकूर संपादित. उपक्रमावर लिहिताना सार्वजनिक शिष्टाचाराचे उल्लंघन कृपया करू नये.

..........असली बडबड करणे .......... वाटते.

लेख आणि सर्व प्रतिसाद अत्यंत माहितीपूर्ण......
परंतु मनोबांचा एक शब्द खटकला.सल्ला देण्याच्या अभिनिवेशात तो आला असेल मात्र संयमाची अपेक्षा.उपक्रम या व्यासपीठाचा पावित्र्यभंग होऊ नये हे आपल्याच हातात आहे नाहीतर बाजारबसव्या इतर व्यासपीठात आणि आपल्यात फरक तो काय....?
खात्री आहे मनोबा खिलाडीवृत्तीने घेतील कारण मी त्यांच्या लेखांचा पंखा आहे.........

"अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी......"

आयुर्वेदाचा मार्ग

आयुर्वेदातल्या समजूती आणि आहारशास्त्रातल्या समजूती यात बराच फरक असतो. (त्यातच आजकाल आयुर्वेद रोज बम्बार्ड होत असतो) त्यामुळे खरा गोंधळ उडतो.

१) दूध तूप भरपूर खावे- इति आयुर्वेद. हाडांची झीज भरून निघण्यासाठी ते आवश्यक असते.
आहारशास्त्र कॅल्शिअम वर भर देते. आहारशास्त्र दूध तूप ऐवजी तेल चांगले असे सांगते.

२) काही पदार्थ उष्ण असतात आणि काही थंड असतात. म्हणजे नक्की काय? या गोष्टीचा आहारशास्त्रामध्ये काही विचार केलेला आहे काय ?

अंदाजपंचे दाहोदरसे.

>>पौष्टिक् आहार म्हणजे काय ह्यावर वेगवेगळ्या तज्ञांची अगदि टोकाची आणि विरुद्ध मते वाचायला मिळालेली आहेत.
काही ठिकाणी अगदि दोन् शास्त्रांतच भांडण दिसून् येते. पारंपरिक समजुतीनुसार् दुधामधाने लडाबडलेले पदार्थ उत्तम्, तर आधुनिक वैद्यकानुसार(गावठी भाषेत ऍलोपथी) कोलेस्टिरॉल , क्यालरिज च्या नावाने ह्याच पदार्थांबद्दल् बोटं मोडली जातात.

जेव्हा एकूण अन्नाची उपलब्धता कमी असेल तेव्हा अधिक कॅलरी देणारे पदार्थ उत्तम समजले जात असावेत. समृद्धीच्या काळात ते तितकेसे योग्य नाहीत. म्हणजे मेळघाटातील कुपोषित बालकांना या पदार्थांना घाबरायचे कारण नाही.

अवांतर: पौष्टिक वगैरे शब्दांचा नक्की अर्थ फॅटनिंग असा आहे की जीवनसत्त्वे वगैरेंनी समृद्ध असा आहे ते ठाऊक नाही. "पोटाला चांगले" असे म्हटले जाणारे पदार्थ सारक (लॅक्सेटिव्ह) आणि बंधक दोन्ही प्रकारचे असतात.

नितिन थत्ते

फॅटनिंग असा आहे की जीवनसत्त्वे

भारतीय परंपरेनुसार पौष्टिक गणले जाणारे पदार्थ पिष्टमय् सोडून् काहीही होत.
"पौष्टिक पदार्थांनी मेदवृद्धी होणे स्वाभाविकच असते" ही मान्यता आहे. मेदवृद्धी "फॅटनिंग"च्या बरीच जवळ जाते. पण फक्त फॅटनिंग पदार्थांचेच गोडवे गायचे असते तर त्यांनी तेलकट पदार्थांचेही गोडवे गायले. तेल प्या तेल् खा असले सल्ले दिले असते.
पण सल्ले फक्त तुपकट पदार्थांचेच दिले आहेत, तेलकटचे नाहित.
ह्यांच्या मतांनुसार दूध, सुकामेवा, भिजवलेला सुकामेवा आणि धातूवृद्धीकर लाडू (आळिव,गोडंबी, डिंक ह्या सर्वांचेच् लाडू) पौष्टिक् आहेत.
म्हणजेच ह्यांनी पौष्टिक म्ह्टलेले पदार्थ तुपकट् आहेत्, तेलकट नाहित.
म्हणजेच भरपूर प्रोटिन्स्, विटामिन्स व खनिजे ज्यातून मिळतात ते पौष्टिक . ते फॅटनिंग आहेत की नाहित हे गैर लागू. असतीलही किंवा नसतीलही.

बाकी
जेव्हा एकूण अन्नाची उपलब्धता कमी असेल तेव्हा अधिक कॅलरी देणारे पदार्थ उत्तम समजले जात असावेत. समृद्धीच्या काळात ते तितकेसे योग्य नाहीत. म्हणजे मेळघाटातील कुपोषित बालकांना या पदार्थांना घाबरायचे कारण नाही.
हे निरिक्षण म्हणजे चौकार आहे. कमीतकमी शब्दांत अचूक संदेश.

--मनोबा

आजारी मुलांचा आहार

कुपोषित बालकांना सध्या आम्ही शेंगदाण्यांची पूड पाण्यात कालवून देतोय. थोडी मोठी मुले शेंगदाण्यांचे लाडू खाऊ शकतात. ते त्यांना दिले जातात. या लाडूंमध्ये डाळे / दाळवं देखील मिसळतात. जेव्हा मनुष्यबळाअभावी लाडू बनवणे शक्य होत नाही, तेव्हा चुरमुरे + शेंगदाणे + फुटाणे देतो. त्यामुळे चांगला फरक दिसून येतो.
याखेरीज एच.आय.व्ही. / एड्स झालेल्या मुलांसाठी काम करणार्‍या काही चांगल्या संस्थांसोबत मी गेली काही वर्षे आहे. तिथे आमच्या डॉ. साठे या सिनियर मैत्रिणीने एका संस्थेसोबत वर्षभर आहाराचे उत्तम प्रयोग केले. त्यामुळे सुरुवातीला मुलांचे वजन वेगाने घटायचे ते स्थिरावले. कालांतराने काही मोजक्याच मुलांचे का असेना पण वजन वाढलेदेखील. योग्य आहार, व्यायाम आणि आपुलकी-जिव्हाळ्याची वागणूक या तीन गोष्टींमुळे आता मुलांच्या आयुष्यातली वर्षं वाढताहेत, हे नक्कीच महत्त्वाचे आहे.
ते पॅटर्न आता इतरत्रही वापरण्याचा / वापरण्यास सुचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अत्यंत कमी खर्चात पोषक आहार कसा देता येईल आणि अभाव शोधून त्यानुसार प्रत्येक मुलाला काय द्यायचे, हे ठरवले. त्यातले काही पदार्थ इतके रोचक आहेत की मी एरवीही घरी बनवण्यास सुरुवात केली. त्यातला खूप पौष्टिक पदार्थ म्हणजे गुळाचा वापर करून केलेली लाल भोपळ्याची खीर. हा बारा महिने बनवणे शक्य असलेला आणि दूध उपलब्ध नसले तरी करता येणारा आणि हमखास न बिघडणारा पदार्थ आहे, त्यामुळेही मला प्रिय आहे. :-).

भारतीयांसाठी आहार विषयक चे मार्गदर्शक पुस्तक

भारतीयांसाठी आहार विषयकच मार्गदर्शक पुस्तक (ICMR), हा सन्दर्भ् जरूर पहावा.

http://www.ninindia.org/DietaryguidelinesforIndians-Finaldraft.pdf

शास्त्रद्न्यानी / तद्न्यानी बनविलेले हे १२६ पानी पुस्तक खूपच माहितिपूर्ण आहे. ते विनामूल्य इन्टरनेट वर आहे. कुठले पदार्थ कमि, माफक्, भरपूर किन्वा आवश्यक् तेव्ह्ढे इ. तसेच रोजच्या आहारातले त्यान्चे प्रमाण दिले आहे.
..............................

Nutrition & Dietetics: http://www.textbooksonline.tn.nic.in/Books/11/Std11-Nutr-EM.pdf
ही दाक्षिणात्य पदार्थानवरील माहितिसुद्धा छान् आहे. यात इतरही माहिति छान् आहे. उदा. पाणी किति प्यावे पासून् ते खाद्य पदार्थ व त्यातील विटामिन्स इ.

प्रतिसाद

वर प्रतिसादांत अनेकांनी चांगली माहिती पुरवली आहे. अधिक देण्यासारखे फारसे काही नाही. अदितीचा, धनंजयचा प्रतिसाद आणि गानूंचा दुवा माहितीपूर्ण आहेत. तरीही,

वजन कमी करणे म्हणजे नेमके किती वजन कमी करायचे आहे ते ठरवायला हवे. काडीसारखे अंग, सुरकुतलेले हात पाय यांना आजकाल सुंदर म्हणायची फॅशन आहे. बहुधा लांबून अशा व्यक्ती सुंदर दिसत असाव्या. प्रत्यक्षात तिशीच्या वर गेल्यावर अशाप्रकारच्या अंगकाठी ठेवणार्‍या व्यक्ती सुरकुतलेल्या, शिरा न् शिरा मोजून घ्याव्या अशा दिसतात. वजन कमी करून स्टॅमिना कमी होत असेल, थकवा जाणवत असेल, उत्साह कमी होत असेल तर अशाप्रकारे वजन कमी करणे धोकादायक आहे ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रमाणापेक्षा थोडेफार अधिक वजन असणार्‍या व्यक्तींना डाएट करायची गरज आहे ही कल्पना भ्रामक आहे.

ज्या माणसाला पथ्य सांगितलेले नाही त्या माणसाने सर्व खावे*. सर्व चवींचे खावे किंबहुना चव डेवलप करावी परंतु जे काही खावे ते प्रमाणात खावे. याच बरोबर आपल्या शरीराला काय पचते, काय पचत नाही याचा आढावा स्वतः तो माणूसच घेऊ शकतो. तेव्हा आत्मपरीक्षण करून आपल्याला काय "सूट" होते ते ठरवावे. गानू यांनी दिलेल्या दुव्यात कोणत्या गोष्टी बिनदिक्कत खाव्या, कोणत्या रोज खाव्या, कोणत्या आठवड्यात १-२ दा खाव्या आणि कोणत्या गोष्टी क्वचित कधीतरी खाव्या याचे सुरेख चित्र दिले आहे. ते पाहून आपला आहार नियमित केल्यास अनेक गोष्टी साध्य होतील असे वाटते.

* सर्व खावे याचा अर्थ खाण्याची इच्छा होते ते. जर खाण्याची इच्छा होत नसेल तर जबरदस्ती नसावी. अर्थातच, तेलकट-तूपकट, गोड खाण्याची जेव्हा इच्छा होते तेव्हा त्याचे परिणाम डोक्यात आधी घ्यावेत.

अधिक भर १....

वजन कमी करणे म्हणजे नेमके किती वजन कमी करायचे आहे ते ठरवायला हवे. काडीसारखे अंग, सुरकुतलेले हात पाय यांना आजकाल सुंदर म्हणायची फॅशन आहे. बहुधा लांबून अशा व्यक्ती सुंदर दिसत असाव्या. प्रत्यक्षात तिशीच्या वर गेल्यावर अशाप्रकारच्या अंगकाठी ठेवणार्‍या व्यक्ती सुरकुतलेल्या, शिरा न् शिरा मोजून घ्याव्या अशा दिसतात. वजन कमी करून स्टॅमिना कमी होत असेल, थकवा जाणवत असेल, उत्साह कमी होत असेल तर अशाप्रकारे वजन कमी करणे धोकादायक आहे ही पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रमाणापेक्षा थोडेफार अधिक वजन असणार्‍या व्यक्तींना डाएट करायची गरज आहे ही कल्पना भ्रामक आहे.
प्रचंड सहमत.

मुळात वजन फक्त आहार नियंत्रणाने कमी करायचा प्रयत्न करु नये. केलाच तर अंगाशी येउ शकतो हे ध्यानात घ्यावे.
मियमित बर्‍यापैकी व्यायाम हा अत्यावश्यक आहे. व्यायाम म्हणजे भरपूर वजनेच उचलली पाहिजेत असे नाही. सतत(म्हणजे दिवसातले ८-१० तास) होत असलेली साधारण हालचालही पुरेशी ठरु शकते.जसे की कपडे धुणे, भांडी घासणे, बागकाम करणे,चालणे, टेबल टेनिस खेळणे वगैरे. किंवा बैठे काम असलेल्या माणसाने एक अवश्य करावे; निदान पाउण ते एक तासभर तरी चालत जावे. किम्वा -- धावावे किंवा तासभर बॅड्मिंटन खेळावे, नातवंडांना खेळवावे किंवा तालमित जावे.
आहारातून कुठलीच गोष्ट १००% वर्ज्य वगैरे करु नये. अगदि अ‍ॅलर्जी वगैरे असली तर गोष्ट वेगळी.
दुधाबाबतः- दूध व दुग्धजन्य पदार्थातून भरपूर प्रथिने, विटॅमिन्स मिळतात हे अगदि खरे. पण त्याच सोबत भरपूर प्रमाणात कोलेस्टिरोलही येते. मुळात दुधातून मिळणारे द्रव्य सर्वच मानवी शरिरात शोषले जाते असे नाही. तसेच सर्वच मानवी शरिरात दुधातील वाइट गोष्टीही शोषल्या जातात असे नाही. म्हणजेच, दूध(फुल क्रिम मिल्क) सरसकट सर्वांनाच(सामान्य तब्येतीच्या) चांगले किंवा वाइट आहे असे म्हणता येत नाही. पण बीपी व हृदयधक्का बस्सोन गेलेल्यांनी मात्र त्याच्या वाटी न गेलेलेच उत्तम. ह्याबाबतीत आयुर्वेदवाल्यांकडे दुर्लक्ष केलेलेच उत्तम.

अंडी:- अदितीने म्हटल्याप्रमाणे अंड्याच्या पिवळ्या भागात प्रचंड विटॅमिन्स व कॉलेस्टिरोल एक्वटलेली असतात.
पांडहर्‍या भागात नुसतेच प्रोटिन्स. काही शहाणे नुसतेच पांढरा भाग खातात.मात्र त्यामुळे ते प्रचंड विटॅमिन्सला मुकतात. मग त्या विटॅमिन्स साठी जीव पणाला लावून पिवळा भाग खात सुटावा का? तर तसे नाही. जीव पणाला वगैरे लावायची गरज नाही. दिवसाला एका अंड्याचा एक पूर्ण पिवळा भाग किंवा आठवड्यातून चार अंडी शरीर सहज, विनातक्रार पचवु शकते; त्यातील मेदाचा त्रास होउ न देता. थोडीफार वर सांगितलेली हालचाल तेवढी अंगाला असावी, म्हणजे झाले.
अंड्यातून मिळणार्‍या जीवनसत्वांत ड जीवनसत्वही असते. ते शाकाहारात जवळपास कुठेच मिळणार नाही. तीच गत b12जीवनस्त्वाची. तेही दुग्धजन्य पदार्थ वगळता शकाहारी म्हणवणार्‍यांना म्मिळणार नाही. थोडक्यात आठवड्यातून चार अंडी हे तुमच्या आहराला अत्यंत पूरक,महत्वाचा असा घटक होत. न चुकता खावेत.
भारतात सर्वत्र पांढरी अंडी मिळतात. युके वगैरे मध्ये लालसर, ब्राउअनिश मिळतात. त्यांच्या पोषणमूल्यात काडीचाही फरक नाही. चिंता नसावी.

तांदूळ :- सामान्य माहितीप्रमाणे गहू,तांदूळ म्हणजे पिष्टमय पदार्थ मानतात. हे ठिकच. पण त्यातही हातसडीचा तांडूळ कुठे खात्रीशीर स्त्रोताकडून मिळाला तर अगदि चढ्या भावानेही बिनदिक्कत घ्या. प्रचंड फायबर व इतर घटक मिळतात. पॉलिश केलेले जे धान्य शहरी माणसे खातात त्यातून जवळपास ९९% लोकांना नुसताच चकचकीत असा तांदळातील पिष्टमय भाग खावा लागतो. ते त्याच्या सालीला मुकतात. शिवाय थोड्याफार प्रमाणात तांदळातूनही(व अगदि पोह्यातूनही) लोह वगैरे मिळते म्हणे.(खात्री नाही.)

फायबरः- अरे हो, वरती मी फायबर म्हणालो. नाही का? फायबर, तंतूमय पदार्थ म्हणजे तुमचा चोथा तयार करणारे पदार्थ. हे नसले तर तुमच्या पोटावर काय आफत ओढावते हे एखादेवेळेस पोट साफ न झालेली, खडा होत असलेली, कॉन्स्टिपेशन झालेली व्यक्तीच तुम्हाला सांगू शकते. हे घटक तुमच्या जेवणात हवेतच हवेत. पत्ता कोबी,पालेबहज्या, फळांच्या व कडधान्यांच्या साली ह्यातून ते तुम्हाला मिळते. फायबरचा अत्यंत म्हत्वाचा गुण म्हणजे त्याने तुमचे पोट साफ तर राहतेच, पण फायबर तुमच्या आहरातील कोलेस्टिरोल धरून ठेवते. त्यामुळे तुमचा रक्तप्रवाह सुरळित राहतो. रक्तदाब व हृद्रोग्यांनी ह्यामुळेच भरपूर फायबर खावेत. फायबरचा अजून एक स्त्रोत म्हणजे भिजवलेले मेथीचे दाणे. हे अत्यंत उपकारक. शिवाय सांधे दुखीही कमी करतात.

तिखट/काळे मिरे :- जिथे जिथे जमेल तिथे तिथे अत्यंत अळणी किंवा कमी लाल तिखट असलेले पदार्थ खावेत. घरी पदार्थ बनवताना जमेल तिथे सर्वत्र लाल तिखटाला पर्याय म्हणून काळे मिरे वापरावेत. ह्यामुळे अल्सरचे निम्मे चान्सेस कमी होतात. पोटाचे आरोग्य व्यवस्थित राह्ते आणि काळ्या मिर्‍यांमुळे तुमची रोगप्रतिकारक क्षमता उत्तम राहते. काळ्या मिर्‍याचे अजूनही उपयोग आहेत, पण त्यांचा मी थेट उल्लेख न करण्याचे मला बंधन घालण्यात आले आहे. सध्या ते अत्यंत उपयुक्त असतात, व मुगाची खिचडी करताना आख्खे मिरे खिचडी सोबत उकडायला म्हणून तर कधी मिरपूड ह्या रुपात खात रहावेत इतकेच सांगू शकतो. भावना सम्जून घ्याव्यात.

साखर्/गूळ :- साखरेपेक्षा गुळाला प्राधान्य द्या. हे नेहमीच जमेल असे नाही. चहा-कॉफी ह्या रुपातून साखर पोटात जातेच, तेवढ्याने बिघडत असे काही नाही, पण सातत्याने साखरेचा चढा वापर चांगला नव्हे. घरच्या घरी पदार्थ करताना तरी गूळ वापरत चला. नुसता गूळ , गूळ्-शेंगदाणे, गूळ- तूप हेही उत्तम लागतात.

शेंगदाणे-फुटाणे:- नुसते भाजलेले शेंगदाणे सालीसकट खाल्ल्यास अत्यंत उपयुक्त असे चांगले कोलेस्टिरोल(good cholesterol) देतात. सालीतून फायबर देतात. थोड्याफार प्रमाणात प्रोटिन्सही देतात. तस्मात, शेंगदाणे-फुटाणे हे अधून मधून भाजून सालीसकट खाल्लेले उत्तम. बाजारात जे साल काधलेले मिळतात, त्यापेक्षा हेच घरगुती उत्तम. घरिच "बसणार" असाल तर "चखणा " म्हणून पूर्ण सालीसकत भाजलेले शेंगदाणे खा, भाजलेले नको. बादवे, चखणा म्हणून काकडी,गाजर, बीट रूटाही चालतात म्हणे.(पिण्याचा अनुभव शून्य, त्यामुळे पुस्तकी माहिती.) चालत असतील तर तळलेल्या काजू-शेंगदाणे-बदाम ह्यापेक्षा साधे दाणे किंवा असे सॅलड(काकडी-गाजर्-बीट) उत्तम.

फळे :- सर्वच फळे उत्तम. पपई,खरबूज वगैरे डोळ्यांसाठी चांगले. सफरचंड लोह देते. केळीतून कॅल्शिअम. थोडक्यात, कशातून काय मिळते, हे लक्षात ठेवत बसणे कठिण. प्रत्येकच फळातून काहीनाकाही चांगले मिळतेच हे लक्षात ठेवून दिसेल ती, मिळतील ती फळे खात चला. पण प्लीज फळाची पोषणमूल्ये मिळवण्यासाठी म्हणून ज्यूस नका हो पिउ. म्हणजे मजा म्हणून ज्यूस प्यायला हरकत नाही, पण ज्यूस पिउन आपण फार काही पोषक, शरीरास उपकारक सेवन केले आहे अशा भ्रमात नका हो राहू. ज्यूसमधून काही त्या फलाकडून अपेक्षित असलेले सर्वच घटक मिळतात असे नाही.
कंपनीच्या बसमधून जात असाल तर कित्येकदा बसमध्ये, कधी डेस्कवर, कधी चालता चालता, कधी फोनवर लाडे लाडे फोनवर हितगूज करताना, सर्वच वेळी फळे खाउ शकतो. फळसेवनाने तुम्मच्या जीवनात गोडी वाढेलच.

लिंबु:- जाता येता लिंबु तुमच्या आहारात ठेवावा. जमेल तितका पिळुन घ्यावा. इतके लिंबु खाउन कुणी आपणास आंबटशौकीन म्हटले तरी पर्वा करू नये. लिंबातील क जीवनसत्व तुम्हाला दिवसभर तरतरीत ठेवण्यास चहा-कॉफीएच्या कैकपट मदत करेल. शिवाय हे अधिक प्रमाणात घेतले जाउन अपाय झाला असेही होउ शकत नाही. हे जलविद्राव्य असल्याने अधिक प्रमाणात आलेच तरी शरीर पाण्यासोबत बाहेर टाकतेच, चिंता नसावी. म्हणजे काय, तर दिवसाला एक्-दोन ग्लास लिंबुपाणी असेल तर उत्तम. शिवाय क जीवनसत्वाने शरीरातील लोहसात्मीकरण अधिक चांगले होते. म्हणजे समजा तुम्हास लोहाची कमतरता आहे, तुम्ही त्यासाठी लोहपूरक औषधी/आहार घेताय पण उपयोग दिसत नाही, असे असेल, तर नक्कीच तुमच्या खाण्यात क जीवनसत्व गरजेपेक्षा कमी असू शकेल.

आवळा :- लिंबासारखेच बरेच गुण व इतरही काही. पण आवळा काही बाराही महिने मिळत नाही. मग काय करावे?

च्यवनप्राश :- आवळ्याचे बहुतांश सर्व फायदे, व इतरही अनेक पौष्टिक गोष्टी ह्यात असतात. घरात आणोन ठेवा. दिवसाला एक दोन चमचे खात रहा. वेळही चांगला जाइल, झालाच तर फायदाही होइल.

मधः- अनेक अँटि ऑक्सिडंट ह्यात असतात. अँटि ऑक्सिडंट म्हणजे असे घटक जे तुमच्या शरीराचे ऑक्सिडेशन मंदावतात. ऑक्सिडेशन म्हणजे शरीर वार्धक्याकडे झ्हुकण्याची क्रिया. दिवसभरात एखादा चमचा गरम पाण्यात घेउ शकता.च्यवनप्राश घेत असाल तर हे वेगळे घ्यायची गरज पडू नये.

अजून एक गोष्ट म्हणजे आपल्याला वाटते तसे उत्तम पोषण मूल्य असलेले सर्वच काही महाग असते असे नाहीं निदान हल्ली नवीन उदयास आलेल्या मध्यमवर्गाने तरी अशी तक्रार करु नये.

--मनोबा

संदर्भ माहित नाही

काळ्या मिर्‍यांनी स्त्रियांचे हॉर्मोन्सचे संतुलन सांभाळले जाते असे कानावर, वाचनात आले आहे. विशिष्ट प्रकारच्या योगासनांबद्दलही हेच ऐकीवात आहे.
पूर्वी अनेकदा जेवणात गोड म्हणून च्यवनप्राश खायचे. केस गळणं त्यामुळे बरंच कमी झालं होतं.

ग्रीन टी+मध+लिंबू

मधः- अनेक अँटि ऑक्सिडंट ह्यात असतात. अँटि ऑक्सिडंट म्हणजे असे घटक जे तुमच्या शरीराचे ऑक्सिडेशन मंदावतात. ऑक्सिडेशन म्हणजे शरीर वार्धक्याकडे झ्हुकण्याची क्रिया. दिवसभरात एखादा चमचा गरम पाण्यात घेउ शकता.

ग्रीन टी हा वजन कमी करण्याचा सोपा आणि दुष्परिणाम विरहित(?) मार्ग समजला जातो. (का ते माहित नाही) ग्रीन टी हे एक उत्तम अँटी ऑक्सिडंट आहे. तसेच मध. ग्रीन टी+मध+लिंबू हे माझ्यामते एक "डेडली कॉम्बिनेशन" ;-) आहे. याची चटक लागू शकते. रोज कॉफी ढोसणारे अमेरिकन (आणि त्यांच्या नादी लागलेले इतर) पाहिले की कीव वाटते.

अप्रतिम पण....

ग्रीन टी हा एक भन्नाट् प्रकार आहे. पण त्यातल्या त्यात चांगला ब्रांड कुठला?(भारतात मिळणारा)

--मनोबा

लिप्टन

भारतात बहुधा लिप्टन मिळत असावाच. अमेरिकेत बरेच ब्रँड्स मिळतात पण मी लिप्टनशिवाय इतर वापरून पाहिलेले नाहीत.

माहितीपूर्ण प्रतिसाद

सर्वच प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. वाचून सविस्तर सारांश टंकेन. धन्यवाद.

अधिक् भर २:-

whole wheat grains जमेल तितके खा. मैदा टाळा. बेकरीतील वस्तू ब्रेड्,खारी,टोस्ट्,बिस्किट हे तुमच्या तब्य्तेतीला त्रासदायक असतात.(अधून मधून घेतले तर काहीही निघडत नाही. पण प्रमाण अगदि मर्यादित हवे.) कॉर्न फ्लेक्ष खाणे महाग वाटू शकेल पण नुसते मक्याचे कणीस भाजून खाल्ले तर चविष्ट तर असतेच, शिवाय सालीसकट खाल्याने इतर फाय्दे मिळतात ते वेगळेच. शिवाय त्यातील ताजेपणामुळे ते शरीरात लवकर शोषले जाते.स्वस्तही असते.

मांसाहर करत असाल तर तळून बनवलेल्या पदार्थांपेक्षा भाजलेले पदार्थ कधीही चांगले हे लक्षात ठेवा. शिवाय मांसाहार जिरवायला तितका जठराग्नी प्रदिप्तही असायला हवा. अंगाला व्यायाम हवा.

मुळात अमुक् गोष्ट् किंवा अमुक प्रकारच्या गोष्टी १००% काढून् टाकणे व्यवहार्य् ठरत् नाही.
शिवाय फक्त खाद्यान्नाची यादी, त्या प्रत्येकाची उपयुक्तता व अनिष्टता द्यायची म्हटली काही हजार पानेही अपूरी पडतील हे निश्चित. म्हणूनच guidelines तेवढ्या वरती दिल्यात. त्यावर चालत जाउन स्वतः अभ्यास करून्,अनुभव घेउन व तज्ञांचा सल्लाही घेउन आहार ठरवणे बरे.
You can not get always get the best food. But you can certainly choose the best amongst available.

सध्या मी ऐन गद्धे पंचविशीत असल्याने अजून माझ्याकडील माहिती अनुभवसिद्ध असल्याचे छातीठोकपणे म्हणू शकत नाही. पण एक नक्कीच सांगू शकतो की मुळात माझा आहार माझ्या रूममेट्स पेक्षा दांडगा आहे.अडीच्-तीन चपात्यात ही मंडळी ढेर होत असताना मनोबा सहा-सात चपात्या अन् जेवणानंतर मस्तपैकी पान खाउनही टुण्टुणित (वजनाच्या भाषेत ५६किलो, बीएमाय २१) कसा काय राहू शकतो ही त्यांची असूयायुक्त तक्रार आहे. माझे उत्तर एकच :- अरे मी "खूप" खातही असेन, पण मी "काय" खातो हेही जरा पहा ना. आणि तितके खाता यावे म्हणून मी स्वतःला किती मेहनत करायला लावतो तेही पहा ना.

आहाराबद्दल अजून काही माहिती http://www.misalpav.com/node/1740http://mr.upakram.org/node/1231 मिळेल. ही मुख्यतः चर्चात्मक व तार्किक आहे. अधिक शास्त्रशुद्ध माहिती मिसळपाववरील खादाड अमिता ह्या आयडीच्या हरेक धाग्यात मिळेल.

@फिरस्ता :- आमच्या कशाबशा लिहिलेल्या चार-दोन् ओळिंकडेही कुणाचे लक्ष असते हे पाहून बरे वाटले. कुठलाही प्रतिसाद एखाद्या सदस्याला वैयक्तिक होउ नये इतकीच काळजी आजवर् घ्यायचो, ह्यापुढे कुठले शब्द वापरतोय् ह्याचीही काळजी घेइन. अर्थातच, कुणीतरी आत्यंतिक गैरसम्जातून् किंवा बेफिकिरीतून केलेली कृती बघून आमचे तुकोबा म्हणतात तशी आमची अवस्था व्हायची :- "बुडती हे जन, देखवेना डोळा" व मग कळवळून् तर कधी वैतागून् असे प्रतिसाद लिहिले जातात.

--मनोबा

धाग्यातील् प्रश्न....

१) आपल्या दैनंदिन आहारात तेलाचे प्रमाण किती असावे ?
सामान्य् भारतीय घरगुती जेवण् किंवा अगदि हाटेलांचाही विचार केल्यास् "अत्यल्प् हवे" हे उत्तर. आपण अत्यल्प् खाय्चे ठरवल्यावर् सहज् जे थोडेफार पोटात जाते, ते पुरेसे असते. मुख्य म्हणजे तेल् काही फक्त तळलेले पदार्थ,फोडणी,तर्री ह्यातूनच मिळ्ते असे नाही. भाजलेल्या शेंगदाण्यासारख्या घटकातूनही ते मिळत् असतेच. "नक्की किती मिलीलिटर तेल एका दिवसात खावे" ह्याची आकडेवारी "माझा सक्षात्कारी हृदयरोग" मध्ये बंग ह्यांनी दिली आहे, इतर नियतकालिकातूनही मिळेल. रूल ऑफ थम्ब सांगू शकतो, रोजच्या रोज् तर्री असलेले पदार्थ,तळलेले पदार्थ् खात् असाल् तर् थांबवा. कधीतरी मौज् म्हणून् ते ठिक् आहेत् खायला एरव्ही नाही. तसेही तललेले पदार्थ् पचण्यास जड् होतात. शक्य् तिथे शक्य् ते भाजूनच खा.(उदा:- पापड)
त्याहून महत्वाचे म्हणजे एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळले गेलेले हातगाड्यांवरचे पदार्थ अत्यंत त्रासदायक् ठरतात् हेही ध्यानात् असू द्यात.

तेल व तूप यापैकी जास्त उष्मांक कशातून मिळतात?
आयड्या नाही बुवा.
साजूक तूप आणि तेल या दोन्हींच्या पोषण मुल्यामध्ये काय फरक आहे?
फरक असा आहे की तुपातून काही विटामिन्स तरी मिळतात म्हणे. तसेच् थोडे थोडे खात् राहिल्यास् ते पोटाला वगैरेही चांगले असते.

जर कोलेस्टरोल चे प्रमाण नियंत्रित ठेवायचे असल्यास शक्यतो कोणत्या प्रकारचे तेल वापरावे?

ऑलिव ऑइल बेष्ट् म्हणतात. पण ते भारतात् मिळायची मारामार. तेव्हा समप्रमाणात मोहरी(सरसो?),शेंगदाणे व् सूर्यफूल् वापरा असे भारतीयांना बंग ह्यांनी सुचवले आहे.

अंडयातून मिळणारी प्रथिने आणि दुधातून मिळणार्‍या प्रथिनांमध्ये काय फरक आहे
ग्लासभर दुधापेक्षा दोन्-तीन् अंड्यातून नक्कीच जास्त प्रोटिन्स व विटामिन्स् मिळतात. शिवाय दूध ग्लासभराहून् अधिक घेता येत नाही. घेतल्यास इतर काही खाता येत् नहई बराच वेळ. मी पाच-सात् अंडी खाउन् निय्मित भोजन् करतो. म्हणजेच इतरांनाही हे जमू शकेल् असे वाटते.
बादवे, भारतातल्या पिशवीबंद दुधातून् काही म्हणजे काहिच पोषण मिळत् नाही हो. ८०-९०% पिशवीबंद दूध हे भयानक् भेसळ केलेले असते. अन्न व भेसळ प्रतिबंधक अधिकारी व त्यांना भेसळ नजरेस् आणून् देणार्‍या काही एनजीओ कडून् ऐकलेल्या गोष्टी भयानक् आहेत. आपण् दुधाच्या नावाखाली फक्त् पांढरा द्रव पदार्थ् घेतो. युरिया वगैरे काय् काय् त्यात असते देव जाणे. तस्मात् पिशवीबंद दूधाकडून् फक्त चवीची अपेक्षा ठेवावी.
अंड्यात अजून भेसल करायला माणूस शिकलेला नाही. तर ते मात्र खात र्‍हावा.
गाई-म्हशीचे दूध व तुलना सांगू शकत नाही. पण् दूध् हे काही सर्वांनाच उपकारक् (किंवा सर्वांनाच हानीकारक)असते असे नाही हे नक्कीच.

३) तूर व हरभरा डाळीचे प्रमाण कमी पकरून त्याऐवजी मूग डाळ किंवा थेट हिरवे मूग् शिजवून् किंवा भिजवून खाता आले तर उत्तम्. शाकाहार्‍यांनी आधीच आहारात् कमी असलेली प्रथिने एकूण डाळीचे प्रमाण कमी करून् अजून् कमी करून् घेउ नयेत. तूर डाळ बर्‍याच पित्त प्रकृतीच्या लोकांना झेपत नाही, पचत नाही अशी तक्रार असते. घरात एखादा सदस्य पित्ताने वारंवार् ग्रस्त असेल् तर तूर डाळीऐवजी इतर वापरलेल्या उत्तम.

४) अ ब क ड ई जीवनसत्वे
सॅलड,पालेभाज्या,फळे,मोड आलेली कडधान्ये* ह्यातून जवळजवळ सर्व जीवनसत्वे मिळतील. जी शिल्लक् राहतात ती सुपोषित शरीर स्वतः तयर करु शकते. किम्वा अंड्याच्या पिवळ्या भागातून् घ्यावीत(ह्याला पर्याय नाही.). दह्यातूनही ब जीवनसत्वाचे सर्व प्रकर मिळतात. पण पुन्हा तेच रडगाणे, आपण दही म्हणून् जे काही घेतो त्याचा तोटाच धिक् होणार. त्यात खरे दही केवळ अल्पांशाने असते.

सॅलडः- काकडी,गाजर,बीटारूट (हल्ली कच्ची पत्ता कोबी देतात सॅलडच्या नावाखाली पण त्यातून् निव्वळ फायबर मिळेल,कानेकांचे कच्च्या पत्ता कोबीने पोटही खराब होते.)
फळे:- आंबा,जांभूळ,सफरचंद,केळी,द्राक्षे,पपई,खरबूज्,टरबूज,रामफळ.
मोड कडधान्ये :- भिजवलेले मूग,मटकी,बदाम

५) लोह, कैल्शिअम, फोस्फरस इ. खनिज द्रव्यांचे आहारातील स्त्रोत कोणते? जास्त प्रमाणात हि द्र्व्ये असलेले पदार्थ कोणते?
सॅलड,पालेभाज्या,फळे,मोड आलेली कडधान्ये व अंडी. कमी अधिक प्रमाणात हातसडीच्या तांदलातूनही मिळतातंआचणी लाडू, नाचणी सत्व(दुधाच्या लापशीतून् घ्यायचे) ह्यातूनही मिलतात. सुकामेव्यात असतात. सुकामेव्यात सर्वात महत्वाचे म्हणजे बदाम्,खजूर,(भिजवलेल्या)मनुका/किसमिस,डिंक लाडू ह्यातून् मिळेल. च्यवनप्राश मधूनही मिळतात. सुकामेवा ह्या नावाखाली शंभरएक वस्तू मिलतात. त्यातील् मला सर्वात महत्वाचे वाटलेले वरती दिले आहेत. खजूर न मिळाल्यास खारिक घ्यावी; पण प्राधान्य खजूरास. खजूर अधिक् दिवस टिकत नाही, ते लवकर संपवावे लागते.

६) मिरची आणि मसाले यांचे काही पोषण मुल्य आहे का? असल्यास कोणते? :)
नक्की ह्यातून् कुठले घटक् मिळतात ठाउक नाही. पण मर्यादित प्रमाणात घेतलेले हे पदार्थ एकूअणच पचवनव्यवस्था उत्तम् ठेवतात असे आयुर्वेदवाले म्हणतात. मसालाही काळा मसाला अपेक्षित आहे, जो पूर्वी घरोघरी गृहिणी बनवायच्या स्वतः, हाटेलातला पनीर-बास्केट्, पनीर्-टिक्का संगे येणारा मसाला नव्हे. तसेही तुमच्या ओट्यावर नेहमी हळद,काळे मिरे/मिरपूड,जीरे,धने ,कोथिंबीर हे घटक् असावेत, ते सतत तुम्च्या वापरातही असावेत हे इष्ट.ह्या वस्तू मसाल्याच्या जवळ् जातात म्हणून् ह्याच प्रश्नांत् उल्लेख् केला इतकेच.

७) तांदूळ आणि गहू यांचा तुलनात्मक विचार. म्हणजे भात किती खावा आणि पोळी किती खायची हे ठरवता येईल. गव्हामधली पोषकद्रव्ये आणि तांदुळातली पोषकद्रव्ये एकच असतात का वेगवेगळी असतात.
आयड्या नै. लोकल फुड् ब्येश्ट. पुण्ञात असाल तर भोजनात दोन्ही थोडे थोडे* असलेले उत्तम्. गहू आणि तांदूळ ह्यात पिष्टमय् पदार्थ हाच प्रमुख भाग् असतो. पण चांगल्या तांदळात् थोड्याफार प्रमाणात लोहही मिळते.

थोडे थोडे म्हणजे नक्की किती हे सांगू शकत नाही.

८) फळे सकाळी खावीत का संध्याकाळी खावीत?

आयुर्वेदवाले रात्री खाउ नका म्हणतात फळे. इतर लोक म्हणतात भूक् असेल् तेव्हा खा, रात्र असो की दिवस्.मी तरी नेह्मी ब्यागेत घेउन् फिरतो. लागली भूक् एक एक करत खात जातो. ट्रेकला वगैरे कधी गेलो तर डबा न्यायच्या ऐवजी हे ssss अस्से ढिगभर फळे घेउन् जातो व अधून् मधून् चरत राहतो.

९) आंबवलेले पदार्थ (उदा. इडली डोसा इ. ) आरोग्यास चांगले असतात कि वाईट ?
दिवसला दोन्-चार इडल्या खाल्ल्या नाश्त्याला तर काहीही बिघडू नये.त्याला वाइट का म्हणतात ते अजून आठवत नाही.

१०) कांद्याचे पोषण मुल्य काय आहे? कांद्यामध्ये कोणती पोषकद्रव्ये असतात?
प्रत्येक पदार्थातून् पिष्टमय्,प्रोटिन्स् किंवा फॅट् ह्यापैकीच काही मिलाले पाहिजे असे नाही. कांद्यात हे तानही घटक जवल जवळ् नसतातच. कांद्याने वीर्यशुद्धी होते व शरीराचे तापमान् संतुलित राहण्यास मदत होते. त्यातला त्यात कच्चा कांदा आहारात असलेला बरा, तोही दिवसा.
पावसाळ्यात् कच्चा कांदा खाल्ल्याने अजीर्ण होते.

११) एखाद्याला आपले वजन कमी करायचे असल्यास त्याचा आहार कसा असावा? त्यासंबंधीचे उपाय. उदा. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यापैकी काय जास्त खावे, काय वर्ज्य करावे?
अतिरिक्त वजन कमी करण्यासाठी आहर् नियंत्रण् फक्त् पूरक् आहे, खरा जोर व्यायामावर हवा. तरीही महाराष्ट्रात(कोकणाबाहेर) असाल तर मुख्य भोजन् म्हणून् ज्वारीच्या भाकर्‍या खात चला. इतर गोष्ट अधून मधून् खान्यास हरकत नाही.

१२) एखाद्याला आपले वजन वाढवायचे असल्यास त्याचा आहार कसा असावा? (सशक्त राहून)
ठाउक् नाही. मी दनक्यात खाउनही माझे वजन मागची पाच-सात वर्षे "जैसे थे" राहिले आहे. त्यामुले पास.

१३) आपल्या दृष्टीने सर्वात आदर्श नाष्टा, आदर्श दुपारचे जेवण, आदर्श संध्याकाळचा नाष्टा आणि रात्रीचे जेवण कोणते?
असे काही एक् म्हणून् ठराविक् सांगता येणार नाही. गाइडलाइन्सला अनुसरुन,ऋतुचक्रानुरुप् काहीही चालेल. शिवाय वय्,लिंग व व्यवसायाचे स्वरूप ह्या गोष्टी आहारनिश्चिती साठी महत्वाच्या आहेत. मी खातो ते आणि तसे अमिताभ बच्चन आजोबा खाउ लागले तर दोन् दिवसात ढेर होतील. आमच्या हापिसातल्या लुक्क्डसुंदर्‍या सहकारिणींसारखे किंवा काकूंसारखे चमचा चमचा मी खायचे ठरविले तर भुकेने निम्मा होइन.

फार जाअस्त्त आहार नियंतरण करु गेल्यास् तुम्ही तुमच्या शाळा-कॉलेज-ऑफिस इथे odd man out होउ शकता, म्हणूनच मर्यादेत राहून् सर्वांसोबत सर्वच गोष्टी थोड्याथोड्या बर्‍या.

--मनोबा

चर्चा अत्यंत उपयुक्त

सर्व चर्चा अत्यंत उपयुक्त अशी आहे.
यात राहिलेली एक माहिती देते, ज्युसेस् विषयी. रोज सकाळच्या एक बाउल नाश्त्यानंतर त्या त्या ऋतूमध्ये पिकणार्‍या ( मिळणार्‍या नव्हे, कारण आजकाल मुंबईत तरी कोणत्याही ऋतूत काहीही मिळते. आता आंबे आलेदेखील इथे.) प्रमुख भाज्यांचे रस घेणे मला प्रकृती ताळ्यावर आणण्यासाठी खूप उपयोगाचे ठरले आहेत. प्रामुख्याने दुधी, आवळा, गाजर, बिट, काकडी यांपैकी कोणतातरी एक ताजा ज्युस मी रोज सकाळी घेते. कोरफडीचा तयार अर्क मिळतो. तो आठवड्यातून एक दिवस घेता येतो. गव्हांकुराच्या रसाचा प्रयोग मात्र मी कधी केला नाही.
हे सारे आहाराचे प्रयोग अर्थात तज्ञ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार केले तर (आणि तरच ) उत्तम परिणाम दिसतात. प्रकृती नीट राखण्यासाठी, बिघडलेली प्रकृती दुरुस्त करण्यासाठी व वजन कमी-अधिक करण्यासाठी. प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते, त्यामुळे नुसते वाचून वा दुसर्‍याचे ऐकून स्वतःवर प्रयोग करणे अयोग्यच नव्हे तर घातकही ठरते.
कॅल्शिअमच्या नुसत्या गोळ्या घेण्यापेक्षा नाचणीच्या पिठाचे लाडू उपयुक्त ठरतात. पोळी/भाकरी/भाताचे प्रमाण कमी करून भाजी, कोशिंबीर, दाळी यांचे प्रमाण तितकेच वाढवणे, हे योग्य ठरते.
सतत प्रवास करणार्‍या, म्हणून बाहेर राहणार्‍या व बाहेरचे खाणापिणार्‍या व्यक्तींसाठी पुन्हा काही वेगळे आहाराचे प्रकार आखावे लागतात.
दारूसोबत चखणा म्हणून अनेकदा 'नमकिन' पदार्थ खाल्ले जातात. ते दारूपेक्षा अधिक तापदायक ठरतात. चवीसाठी खाल्ले तरी थोडे खावेत कारण त्याने तहान वाढून अधिक दारू प्यायली जाते. चखण्यात काकडी, मोसंबी, मटारचे दाणे ( सोलून न ठेवता पितानाच हवे तितके सोलून घ्यावेत. त्यामुळे वेळही जातो. आणि 'सावकाश' पिणे उत्तम, ते साधते.) असे ज्यातून पाणी मिळेल असे पदार्थ ठेवले, तर भरपाई होते.
पाणी पिणे हे देखील आहारात फार महत्त्वाचे आहे, ज्याचा मी कधीही विचार केला नव्हता आणि कुठलेही पाणी पित राहिल्याने अनेक आजार उदभवले. पाणी शुद्ध करणार्‍या यंत्राविषयीही अनेक मते-मतांतरे आहेत.

+१ -१

प्रमुख भाज्यांचे रस घेणे मला प्रकृती ताळ्यावर आणण्यासाठी खूप उपयोगाचे ठरले आहेत. प्रामुख्याने दुधी, आवळा, गाजर, बिट, काकडी यांपैकी कोणतातरी एक ताजा ज्युस मी रोज सकाळी घेते.
उल्लेख् केलेल्या भाज्या निय्मितपणे माझ्या भोजनात सॅलड रुपाने कच्च्या व इतर रुपात (भाजी म्हणून शिजवून,भाजून,गाजर हलवा,दुधी भोपळा हलवा) असतात.
हे इतरांनाही करणे कठिण वाटत नाही. जर भाज्या मिळत नसतील् तर पर्याय् म्हणून् ज्युसेसचा विचार व्हावा असे माझे मत.

कोरफडीचा तयार अर्क मिळतो.
हे उत्तम. कोरफड वगैरे अर्क रुपातच साठवून् ठेवलेली शहरी बहगात् सोपी पडते. ताजी मिळणे/पिकवणे सहजसाध्य् नाही.

तो आठवड्यातून एक दिवस घेता येतो
नियमित घेता हे उत्तम्. पण असे शेड्युल,नियमितता सर्वांनाच जमेल असे नाही. म्हणूनच मी नुसत्या गाइडलाइन्स दिल्यात. उपलब्ध पदार्थातूनच त्यातल्या त्यात सर्वोत्तम खाद्यान्न निवडणे शहरी चाकरमान्यास भाग पडते. त्याची माहिती असणेही हितावह. "अमुक अमुक ह्या ह्या भाज्या, ज्युस तुमच्या आहारात् ठेवा" असा सल्ला मदत म्हणून देणे समजू शकतो, पण सांगितलेले पदार्थ् उपलब्ध् असतातच् असे नव्हे. म्हणून् त्यांचे पर्यायही माहित् असलेले बरे.
उदा:- माझ्या gym instructor ने सकाळी मला रोज दोन्-तीन् अंडी खाण्यास सांगितली. पण् अंड्यांच्या गाड्या सकाळी उपलब्ध नसतातच मुळी. हापिसाच्या धकाधकित अंडे घरी शिजवणे तसेही आवाक्याबाहेरचे असते व् घरी आणल्यास त्यामुळे घरातील् इतरांचीही "मने दुखावतात". मग "सकाळी अंडी खा" हा सल्ला म्हणून् ठिक् पण व्यवहारात त्याचा ऑप्शन् असू शकतो रोज् म्मोड् आलेली कडधान्ये हाणणे. भिजवलेले बदाम भरपूर खाणे. व् संध्याकाळी गाड्या लागल्यावर् ताजी, गरम् उकडलेली अंडी खाणे . म्हणजेच, सल्ला परिस्थितीनुसार बदलतो.

कॅल्शिअमच्या नुसत्या गोळ्या घेण्यापेक्षा नाचणीच्या पिठाचे लाडू उपयुक्त ठरतात.
+१००. पुण्यात औंध,कोथरुड,सगळ्या पेठा,चिंचवड अशा बर्‍याच ठिकाणी नाचणीचे लाडु मिळतात्. माझे आवडते नाचणी सत्वही मिळते. दुधात् घालुन् गोड,चविष्ट लापशी तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. पत्ते हवे असल्यास मला संपर्क करावा. हा भयंकर महत्वाचा मुद्दा उपस्थित केल्याबद्दल कवितातैंचे लाख् आभार.

पोळी/भाकरी/भाताचे प्रमाण कमी करून भाजी, कोशिंबीर, दाळी यांचे प्रमाण तितकेच वाढवणे, हे योग्य ठरते.
+१०००.भाजी, कोशिंबीर, दाळी ह्या यादीत फळे व मोड आलेली कडधान्ये घालू इच्छितो.

दारूसोबत चखणा
ह्याबद्दल् वरती माझ्या प्रतिसादात आधीच खरडले आहे.

पाणी पिणे हे देखील आहारात फार महत्त्वाचे आहे,
+१००००. फक्त पाणी अचानक ढेरगबह्र पियु नये, सतत थोडे थोडे प्यावे हा सल्ला. विशेषतः बैठे काम करणार्‍यांनी एक् सोपी युक्ती करावी. पाण्याची बाटली भरूनच डेक्सवर् ठेवावी. जात येत घोट् घोट पाणी तोंडात मुरवत मुरवत प्यावे. तोंड,जीभ हल्केसे ओले ओले राहिल. प्रसन्न वाटॅल व् झोपही येणार नाही. दुसर्‍या दिवशी पोटही नीट् साफ राहिल.

--मनोबा

५ अवर्स एनर्जी : एक अवांतर प्रश्न

मला बर्‍याच दिवसांपासून एक प्रश्न आहे आणि त्यासाठी वेगळी चर्चा सुरू करणे अनावश्यक वाटते म्हणून येथेच विचारते.

५ अवर्स एनर्जी, रेड बुल, मॉन्स्टर वगैरे एनर्जी बूस्टर पेयांचा हल्ली सुळसुळाट झाला आहे. इतका सुळसुळाट की पूर्वी मला वाटायचे की रात्री जागून पार्टी करण्यासाठी लोक हे पेय पितात पण मग पाहिले की ऑफिसात ८ तास काम करण्यासाठीही हे पेय घेतले जाते. या पेयांचे काही दुष्परिणाम नाहीत का?

रेड् बुल...

अतिसामान्य आर्थिक परिस्थितीत असल्याने ह्या श्रीमंती प्रकरांना अजून स्पर्शही केलेला नाही. मात्र रेड् बुल व त्यासदृश पेयांत कॅफिनचे प्रमाण भरपूर असते असे ऐकले आहे.
अधिक मात्रेत कॅफिनचे संभाव्य दुष्परिणाम (निद्रानाश,भूक् कमी होणे, लोह-कॅल्शिअम् कमी शरीरात नीट शोषले न जाणे वगैरे) ह्यानेही होतील हा अंदाज. पण खात्री नाही.

--मनोबा

पुन्हा

>>त्याहून महत्वाचे म्हणजे एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळले गेलेले हातगाड्यांवरचे पदार्थ अत्यंत त्रासदायक् ठरतात् हेही ध्यानात् असू द्यात.

"एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळले गेलेले" कशास म्हणावे. तळून थंड करून पुन्हा तापवलेले का? कारण आमच्याकडे पहिला पदार्थ (पुरी, वडा, पापड) फक्त नव्या तेलात तळला जातो. दुसर्‍या पासून पुढचे वडे आम्ही त्याच तेलात तळतो. प्रतेक वड्यासाठी नवीन तेल घेत नाही. आधी तळलेला वडा पुन्हा तळला तर तो मात्र खूप तेलकट होतो एवढे खरे.

बाकी तळण झाल्यावर उरलेले तेल दुसर्‍या दिवशी भाजी आमटीला मात्र वापरतो.

नितिन थत्ते

हम्म्....

तळून थंड करून पुन्हा तापवलेले का?
हा प्रश्न "तळून थंड करून पुन्हा तापवलेले तेल का?" असा आहे असे गृहित् धरतोय.
असे करु नये असे ऐकले आहे. काहीतरी सॅच्युरेटेड का अन् सॅच्युरेटेडचे लफडे होते म्हणतात. केमिस्ट्रीचे माहितगार् किंवा आहारशात्राचे विद्यार्थी अधिक् सांगू शकतील.

--मनोबा

क्लॅरिटी

>>काहीतरी सॅच्युरेटेड का अन् सॅच्युरेटेडचे लफडे होते म्हणतात.

ओके. पण ते केव्हा होते? तेल थंड करून परत तापवल्यामुळे की तळतानाच सुमारे २०-३०-५०-१०० वडे तळून झाल्यावर किंवा १० मिनिटे-एक तास तेल तापत राहिल्याने ? असे क्लॅरिफिकेशन हवे आहे. म्हणजे ३० मिनिटे तळण झाल्यावर तेल टाकून देऊन नवीन घ्यावे का?

नितिन थत्ते

समाधान..शंका

एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळले गेलेले" कशास म्हणावे. तळून थंड करून पुन्हा तापवलेले का? कारण आमच्याकडे पहिला पदार्थ (पुरी, वडा, पापड) फक्त नव्या तेलात तळला जातो. दुसर्‍या पासून पुढचे वडे आम्ही त्याच तेलात तळतो. प्रतेक वड्यासाठी नवीन तेल घेत नाही.

हा हा हा!...दुसर्‍या पासून पुढचे वडे वगैरे त्याच तेलात तळल्यावर तेलाला घटत्या उपयोगितेचा सिध्दांत लागू होतो.

आधी तळलेला वडा पुन्हा तळला तर तो मात्र खूप तेलकट होतो एवढे खरे.

आधी तळलेला वडा कशास म्हणावे, किती तळल्यावर तो आधी तळल्यासारखा होतो? तेवढे तळल्यानंतर जर तो काढला नाही तर तो परत तळला असे म्हणता येईल काय?

हाहाहा!

एकाच तेलात पुन्हा पुन्हा तळले गेलेले" कशास म्हणावे. तळून थंड करून पुन्हा तापवलेले का? कारण आमच्याकडे पहिला पदार्थ (पुरी, वडा, पापड) फक्त नव्या तेलात तळला जातो. दुसर्‍या पासून पुढचे वडे आम्ही त्याच तेलात तळतो. प्रतेक वड्यासाठी नवीन तेल घेत नाही. आधी तळलेला वडा पुन्हा तळला तर तो मात्र खूप तेलकट होतो एवढे खरे.

चिच्चा, असे केले तर साक्षात् अंबांनीसुद्धा भिकेला लागायचे. ;-) हाहाहा!

बाकी तळण झाल्यावर उरलेले तेल दुसर्‍या दिवशी भाजी आमटीला मात्र वापरतो.

हो तसे करणे बरे, मीही हेच करते पण एकदा पदार्थ तळले की दुसरे काही तळण पुढल्या १५-२० दिवसांत होत नसल्याने त्याच तेलात पुन्हा तळणे हा प्रश्न सहसा उद्भवत नाही.

पुन्हा पुन्हा तळलेले

@ दुसर्‍या पासून पुढचे वडे आम्ही त्याच तेलात तळतो. प्रतेक वड्यासाठी नवीन तेल घेत नाही. आधी तळलेला वडा पुन्हा तळला तर तो मात्र खूप तेलकट होतो एवढे खरे......

आपण करता ते बरोबर आहे गैर् नाही. (वडा वगैरे परत गरम करण्यासाठी आता मायक्रोवेव्ह ओव्ह्न चान्गला). घरी प्रथम वापरून उरलेल्या तेलात आपण अधिक तेल घालून ते परत परत वापरत नाही, तर ते तेल सम्पवले जाते. गृहिणींचे अंदाज बरोबर असतात, सर्व तळणी झाल्यावर थोडेच तेल उरते व ते पुढे एकदा वापरण्यात अडचण नाही. बऱ्याचदा आधी पापड तळून उरलेल्या तेलात खिचडीची फोडणी होते व ते तेल तेथेच संपते.

पुन्हा पुन्हा तळणे हे वडापाव सारखे पदार्थ विकणाऱ्या गाडी वर पहावयास मिळू शकते (होटेल मधेही होत असेल पण आपणास पहावयास मिळत नाही). उदा. पहिले तेल जसे कमी होत जाते तसे ते न फेकता त्याच कढइत (त्या कमी उरलेल्या तेलात) डब्यातून परत ज्यास्त तेल घातले जाते व असे हे दिवसभर् चालू शकते.

तेल हे संतृप्त (Saturated) व असंतृप्त (Unsaturated) अशा फॅटी आम्ले व ग्लिसराईड्सचे मिश्रण असते (सेंद्रीय पदार्थ). त्यातील असंत्रुप्त आम्लात जे द्विरेशीय (डबल बॉन्ड) असतात ते अश्या वारंवार तापवण्याने त्या ठिकाणी रासायानिक क्रिया घडून अशा उच्च तापमानास तापवलेल्या तेलात polycyclic aromatic hydrocarbons बनू शकतात (ज्या पासून कर्करोग सुद्धा होऊ शकतो). म्हणून म्हणून वारंवार तापवले तेल वापरणे टाळावे. खाली एक 'त्या मानाने नवा' सन्दर्भ देत आहे पण तेलासम्ब्नधीच्या गोष्टी बऱ्याच आधी - कित्येक दशके पूर्वीपासून- माहीत आहेत.

http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/20687968

फोडणी

१.तेलाचा वापर न करता "कोरी फोडणी" हा एक रोचक प्रकार मी पाहिला आहे. पातेले / कढई इ. चांगले कडकडीत तापवून त्यात तेल न घालता नुसती मोहरी घातली की ती तेलात तडतडावी तशीच तडतडते व पदार्थाला खमंग चव देते.
२.अनेक आदिवासी जमातींमध्ये तर तेल वापरलेच जात नाही. पदार्थ नुसता भाजला वा शिजवला जातो. त्यामुळे मूळ चवीचे अन्न कसे लागते हे समजते. :-).
३.तिसरा प्रकार म्हणजे नुसते तेल वापरून ( मोहरी / जिरे इत्यादींची फोडणी न करता ) पदार्थ बनवले जातात. असे पदार्थ बंजारा आणि धनगर समाजात मी खाल्ले आहेत. हे पदार्थ बहुदा मातीच्या भांड्यांमध्ये रांधले जातात, असेही एक निरीक्षण आहे.

सहमत.

>>३.तिसरा प्रकार म्हणजे नुसते तेल वापरून ( मोहरी / जिरे इत्यादींची फोडणी न करता ) पदार्थ बनवले जातात. असे पदार्थ बंजारा आणि धनगर समाजात मी खाल्ले आहेत. हे पदार्थ बहुदा मातीच्या भांड्यांमध्ये रांधले जातात, असेही एक निरीक्षण आहे.<<

होय, हा प्रकार मी शहरी भागात खाल्ला आहे, फोडणी न देता, कच्च्या तेलातले मीठ+तिखट+पोहे(पातळ), चावावे लागतात पण चांगले लागतात असा अनुभव आहे.

बाकी पहिला प्रकार फारच रोचक, तसा खाउन बघितला पाहिजे.

सहमत

देशावर पूर्वी (सुमारे ५० वर्षापूर्वी) भाज्या फार महाग वा उन्हाळ्यात मिळणे कठीण तेव्हा 'चविष्ट असे वरणाचा गोळा त्यावर कच्चे तेल, तिखट, काळा मसला व मीठ' सुद्धा भाजी ऐवजी खाल्लेले आठवते. मित्राच्या शेतावर शेतकरयाकडे अतीशय तिखट अशा झुणक्यावर कच्चे तेल खाल्ल्याचे आठवते. लसणीच्या तिखटावर सुद्धा तेल घेण्याचा प्रघात पाहिला आहे. दूध व भाज्या आज ज्या प्रमाणात मिळतात त्यावरून् त्या काळाचा व टन्चाइचा अन्दाज् येणार नाही.

दडपे पोहे हा प्रकार फारच् सुन्दर् लागतो. तेल खाण्यात हवेच. थोड्या प्रमाणात चान्गले लागते व चालते आणि हरकत नसावी पण सर्रास तसे खाणे चान्गले नसते. अती तेल खाणे व कोलेस्टेरोल व् हृद्यरोग वाढते प्रमाण हे समिकरण सतत पहावयास मिळते. वान्ग्याचे भरीत, भाजी व भजी यात तेलाचा अन्श वाढता होत जातो.

फार्माकोलोजी सुत्रा प्रमाणे कमी प्रमाणात (योग्य प्रकारे दिल्यास्) विषसुद्धा औषधी/गुणकारी तर अयोग्य प्रमाणात औषध सुद्धा विष होऊ शकते. (It is the Dose that matters). खूप ज्यास्त प्रमाणात घेतल्यास पाणी सुद्धा अपायकारक ठरू शकते.

सारांश भाग-१

खाण्यासाठी योग्य पदार्थ:-

अंडे, दूध, तूप, मोड आलेली कडधान्ये, डाळी, ओट्स, बदाम, खारीक, खजूर, फळे, चुरमुरे + शेंगदाणे + फुटाणे, हातसडीचा तांदूळ, पालेभाज्या, कडधान्याची/फळांची साले, मिरे, गूळ, लिंबू, आवळा, मध, च्यवनप्राश, दुधी, आवळा, गाजर, बिट, काकडी, नाचणीचे पीठ, गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, कांदा, बटाटा.

हे पदार्थ रोजच्या आहारात योग्य प्रमाणात घेतले तर शरीराची शक्यतो सर्व पोषकद्रव्यांची गरज भागू शकते.

 
^ वर