ध्यान: मनावरील कंपने, स्पंदने वा ‘घन अथवा ऋण’ चालना कि ऊर्जा

ध्यान: मनावरील कंपने, स्पंदने वा ‘घन अथवा ऋण’ चालना कि ऊर्जा

ध्यान विषयावरचे ‘उपक्रम’वरील प्रतिसाद फारच उत्तम होते. त्यातल्या काही प्रश्नांमुळे तर मूळ गाभ्यातील कांही मुद्दे ज्यास्त स्पष्ट करण्याची आणि म्हणून या धाग्याची गरज वाटली. प्रस्तुत लेखात मी माझी आजवरच्या अनुभवाने बनलेली, इतरांशी केल्या चर्चेतून तयार झालेली मते मांडत आहे.

परंतु वैयक्तिक मते एकाच अंगाचा विचार असल्याने त्यांत तृटी रहातातच. म्हणून माझ्या मताने सुरुवात करून आपणा सर्वाच्या मतांनी हा विषय समृद्ध व्हावा असे वाटते. हे ‘स्थळ’ व ‘उपक्रम’ अशा विषयासाठी योग्य आहेच. चर्चेत जरूर सहभागी व्हावे.

पदार्थ विज्ञानात (Physics) ऋण ऊर्जा संभवत नाही हा प्रश्न खासच विचार करण्यास लावणारा आहे (१). पदार्थ विज्ञानात (Physics) ऋण ऊर्जा संभवत नाही हे खरेच आहे. आपला बहुतांचा मेडीटेशन कडे बघण्याचा दृष्टीकोन हा शास्त्रीयच आहे व अध्यात्मिक नाही. पण मेडीटेशन मनाशी संबधीत आहेच. मनावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही विचारांचा सुपरिणाम किंवा दुष्परिणाम होत असतो हे आपण दैनंदिन व्यवहारात नेहमीच पहातो. ‘ध्यान २’ वरील एका प्रतिसादावर (२) लिहितांना ‘मन प्रसन्न ठेवण्यासाठी मिळणारी उर्जा घन असावी व ऋण नसावी’ असे म्हणण्यात माझ्याकडून एक पायरी गाळली गेली असे मला वाटते. Positive Strokes व Negative Strokes ह्या शब्दाना घन उर्जा व ऋण उर्जा या पेक्षा घन वा ऋण कंपने / स्पंदने (Vibrations) हा शब्द कदाचित ज्यास्त योग्य ठरला असता. मनातील विचार, त्याने मिळणारी वा होणारी कंपने व त्यातून मनाला मिळणारी चालना (ऊर्जा) व त्याचा शरीरावर होणारा व दिसणारा दृश्य घन व ऋण परिणाम अश्या पायरा होतात. प्रतिसादात एव्हढा उहापोह योग्य दिसला नसता हे मनात (Subconscious mind) असलेले दुसरे कारण असावे. म्हणून त्याचेच धाग्यात रूपांतर केले हे दुसरे कारण.

या वर एक मुद्दा मनात येतो तो असा. एका अमेरिकन अध्यक्षांनी (नांव आठवत नाही) आपल्या आईस लिहिलेल्या पत्रांत म्हटले आहे कि ‘जखमांची तीव्रता जरी सारखीच असली तरी युद्ध जिंकलेल्या सैन्यातील सैनिक बरा होतो तर तेव्हढ्याच तीव्रतेची जखम असलेला युद्ध हरलेल्या सैन्यातील सैनिक त्या आजारातून बरा होतोच असे नाही. हा मनाचा शरीरावर होणारा व दिसणारा दृश्य घन किंवा ऋण परिणाम (उर्जा किंवा कंपने) आहे का? म्हणजेच प्रकृती बरी होण्यास बाहेरील औषधांव्यतिरिक्त मनाचे सामर्थ्य पण आवश्यक असते. पेशंटशी बोलताना पण आपल्याला या गोष्टीचे भान ठेवावे लागते.

विज्ञाना प्रमाणे जशी उर्जा ऋण असत नाही तसे नैसर्गिक अंक (Natural Numbers) घनच असावयास पाहिजेत व असतात ( उदा. २, ३, ४ ......). परंतू आपण -१, -२ अश्या संख्या वापरतो. त्यात relativity किंवा सापेक्षता अभिप्रेत असते. शून्य हा मध्य बिंदू धरून दोन्ही बाजूस घन व ऋण अंक आपण मांडतो. तसेच विचार (thought) हे विचारच असतात. आपण गुणात्मक विश्लेषण करून त्यांना सकारात्मक (Positive) व नकारात्मक (Negative) उपाधी देतो व त्यांची फले ही तशीच असतात असे पाहतो.

माझे एक शल्यविशारद मित्र सतत म्हणत की घरात बोलताना शुभ गोष्टी बोलाव्यात कारण वास्तू तथास्तु म्हणत असते. मुख्यत: संध्याकाळी जे बोलू ते मागितले धरून त्याला तथास्तु म्हटले तर! यांत सुद्धा वास्तू (वास्तुशास्त्र नव्हे) व शुभ कंपने ही मानवाची कल्पना डोकावते.

रामायण व महाभारत या दोहोंमध्ये पण हाच फरक सांगितला जातो. रामायणाचे दूरदर्शन वरील भाग बघताना त्यातील घटना बघताना छान वाटे. त्याचे संगीत मंगलमय होते. स्नान करून रामायण बघावे असे कित्येकांना (मलाही) वाटे.

त्याविरुद्ध महाभारत या मालिकेचे संगीत कर्कश्श होते. तेथे ते योग्यच होते. दिग्दर्शकांना ‘हा फरक जसाच्या तसा ठेवल्याबद्दल’ दाद द्यावीशी वाटते. इतकेच काय पण घरातील दिग्गज घरात ‘श्री कृष्णाचा (लहानपणचा) फोटो आणावा पण अर्जुनाबरोबरचा (महाभारतातला) युद्धातला रथातला फोटो घरात नसावा’ असे म्हणत कारण घरात तशी भांडणे तर होणार नाही ना अशी आशंका असावी. परत फोटो ठेवून काय होणार? पण फोटो पाहून मनात काय विचार येणार: महाभारत घोळणार. कंपने की उर्जा?

ह्या सर्व गोष्टी कुठेतरी मनात नोंदविल्या गेल्या आहेतच. ते सर्व Subconscious mind मधून लेखणीत उतरतले इतकेच. यांतही कुठेतरी ती कंपनेच मनात उतरतात.

अजूनही एक वेगळा मुद्दा सांगावासा वाटतो. लग्नानंतर मुलीचे नांव बदलण्याची पद्धत होती. आताशा तसे कमी वेळा पहावयास मिळते. माझ्या वडिलांशी या बाबत एकदा सुमारे १५ ते २० वर्षापूर्वी माझे बोलणे झाले होते. त्यांनी मांडलेली कल्पना सुद्धा कंपनांशीच स्पर्श करणारी होती. पूर्वी लग्ने लहान वयात होत असत. अल्लड मुलगी घरात आई, वडील, भाऊ, बहिण, काका इ. च्या कौतुकात लाडात वाढलेली. त्या नांवाची ‘मनात असेल तर काम करीन अन्यथा मैत्रिणींबरोबर खेळेन’ ही वृत्ती. आईच्या घरी दोन्ही गोष्टी (options) शक्य पण त्या काळात सासरी? लाड चालणे कठीण. ‘नव्या घराशी जुळण्यासाठी मूळ नांवाची स्पंदने बदलणे योग्य धरले गेले असेल’ असे माझे वडील म्हणत. आता शिकलेल्या मुली, आधी ओळख असल्याने व साखरपुडा व लग्न यांत बरेच दिवसांचे अंतर असल्याने नव्या घराशी लग्नापूर्वीच रूळतात. वा स्वत:चे करीअर केले असल्याने कित्येक वेळा स्वत:च्या नांवाची समाजात वेगळी ओळख निर्माण केल्यामुळे म्हणा, लग्नानंतर नांव बदलणे कमी झाले आहे. त्याचा relevance सुद्धा कमीच झाला आहे अथवा गरज उरली नाही असे वाटते.

मुलांच्या व मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा ही Positive Strokes व Negative Strokes काम करतात. मानसोपचार तज्ञ सांगतात कि मुलाने एखादे चांगले काम केल्यावर आपण जर ‘छान काम केलेस’ म्हटले तर त्याला आनंद होतो पण दुर्लक्ष केले तर त्याला परत तसे काम करावेसे वाटणार नाही.
उपहारगृहात सुद्धा आपण नुसते आभार न मानता वेटरला बक्षिस देतोच ते पुढल्या वेळी त्याने आपली उत्तम बडदास्त ठेवण्यासाठीच.

आपल्या बोलण्यातली कंपने/स्पंदने शब्दांपेक्षा ज्यास्त महत्वाची ठरतात. कोरड्या शब्दातील ‘आभार प्रदर्शन’ अनैसर्गिक (ritual) तर ओलाव्याने Thank you so much म्हटल्यास हृदयास भिडते.

मेडीटेशन मध्ये तर मनाचाच विचार प्रमुख आहे. मनाचा शरीरावर होणारा परिणाम अनुषंगाने होणारा पण फायदेशीर (Incidental but benevolent) असावा (Positive Strokes ) अनुषंगाने होणारा दुष्परीणामी (malevolent) नसावा. या सर्व गोष्टी मनात असल्यानेच Positive Strokes व Negative Strokes चा उल्लेख करावासा वाटला पण त्याना एनर्जी म्हटले गेले. कंपनांचे/स्पंदनांचे घन वा ऋण ऊर्जेत (एनर्जी) रुपांतर असे पायरीने म्हणावयास हवे होते.

मी तत्वज्ञानाचा अभ्यासक नाही. हे सर्व अनुभवातून मनात उतरलेले विचार आहेत. चूक वा बरोबर असे म्हणता येणार नांही. किंबहुना चूक/बरोबर हे मुळातच सापेक्ष आहेत. तुमचे सर्वांचे अनुभव, आणि घन व ऋण एनर्जी वरील विचार ऐकायला/वाचायला आवडेल.

संदर्भ:
१. ‘धम्मकलाडू’ यांचा ‘उपक्रम’: ध्यान २ वरील प्रतिसाद. व्य. नी. मध्ये आपण वापरलेला ‘माहेरची नाळ तोडणे’? हा शब्द प्रयोग चपखल आहे.
२. ‘प्रियाली’ यांचा उपक्रम: ध्यान २ वरील प्रतिसाद.

लेखनविषय: दुवे:

Comments

विज्ञानातील संज्ञा

कंपने, उर्जा वगैरे संज्ञा विज्ञानाशी (फिजिक्स) न जोडता जर सर्वसामान्य भाषेच्या दृष्टीने लेखाकडे पाहिले तर लेख पटण्यासारखा आहे. सतत नकारात्मक विचार केल्याने किंवा दुसर्‍यांकडे संशयित नजरेने पाहिल्याने, इतरांतील फक्त उणिवांकडे लक्ष दिल्याने मनाला अधिकच त्रास होतो हे खरे आहे. अर्थातच, याचा अर्थ नकारात्मक विचार करू नये किंवा उणीवांकडे पाहू नये असा नाही तर त्यासोबत रिजोल्यूशन (उपाय) शोधल्यास फायदा होतो.

तुम्ही इतर विषयांवरही अवश्य लिहावे. वाचायला आवडेल.

संवादी सूर

मुलीचे नाव बदलण्यामागची भूमिका तशी समजून घेण्यासारखी आहे. नाव माहेराशी असलेली एक नाळ आहे. ती तोडण्याचा तो प्रकार असावा की काय?

मी वास्तुशास्त्राला मानत नाही. पण घरात चांगले वातावरण राहावे म्हणून अशुभ बोलू नये, परनिंदा करू नये, शिव्या देऊ नये हे योग्यच आहे. पण ते वास्तुशास्त्राने सांगितले म्हणून नव्हे. मग स्नान उरकून रामायण बघणे असो किंवा आंघोळ उरकून मगच घराबाहेर निघणे किंवा जेवणे असो. परंपरांचा, रूढी इत्यादींचा प्रभाव नकळतपणे होत असतो आणि आपल्या दैनंदिन कृतीतून तो दिसत असतो.

कंपनांची संकल्पना मला पूर्णपणे कळलेली नाही. पण शेवटी हा कंडिशनिंगचाच भाग असावा. उदा. वेटराला बक्षीस देणे किंवा लहान मुलाला चॉकलेट देणे. प्राण्यांना प्रशिक्षित करताना अशा कंडिशनिंगचा वापर करण्यात येतो असे वाटते. असो.

एकाच वेळी अनेक गोष्टींना स्पर्शून जाणाऱ्या तुमच्या लेखनाचा संवादी सूर आवडला. ह्यावर एक चांगली चर्चा होईल असे वाटते. तूर्तास एवढेच.

(व्यनितला मजकूर थोडा संपादित करून वाढवून टाकला आहे.)

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

+१

तुमच्या लेखनाचा संवादी सूर आवडला

+१ सहमत आहे.
या विषयात भर घालण्याइतके ज्ञान नाही. मात्र चर्चा वाचतो आहे.

ऋषिकेश
------------------
धम्मक असेल आपली मते आपली ओळख दाखवून थेट मांडावीत, कायद्याला घाबरून भ्याडासारखे आयडीच्या पदराआड लपु नये

उपक्रमवर स्वागत!

श्री. उल्हास गानू, आपले तीन हि लेख वाचले. दोन लेखातून आपण आपल्याकडील माहिती छानपणे प्रस्तुत केली.
वाचकांनी देखील सभ्यपणे चांगला प्रतिसाद दिला. काहिंनी कौतुक केलं, तर काहिंनी त्यांना माहित नसलेली माहिती मागितली.
तिथं कोणीही विशयासंदर्भात आपल्याशी वाद घातला नाही. नानावटींनी केवळ त्या लेखात 'विद्न्यान' (सायंस ह्या अर्थाने) ह्या शब्दाच्या वापराला आक्शेप घेतला.

आपल्या ह्या तीसर्‍या लेखात तुम्ही इतरांकडे माहिती मागत आहात. कारण आधीच्या दोन लेखात कोणीही त्यांच्याकडची माहिती दिली नव्हती. (जरी प्रतिसाद वा अभिप्राय 'गोड-गोड' होते.)

संघर्शाशिवाय प्रगती होत नसते.

तुमचे विचार, तुमची मते जूनी पुराणी आहेत. बंधनात अडकवणारी आहेत. ध्यान हा विशय अध्यात्माशी संबंधित आहे पण तरीही तुम्ही खोटे बोलत आहात, कि हा सायंसशी संबंधित विशय आहे.

मी आत्तापर्यंत मला माझ्या वाचनांतून, चिंतनातून जे समजले, उमजले ते येथे मांडत आहे. ह्या क्शणापर्यंत माझ्यासाठी तेच सत्य आहे, उद्याच माहित नाही.

आपण स्वत: असतो एक स्वयंचलित संगणक.
आपलं मन असतं ह्या संगणकाचा मॉनिटर.
आपला मेंदू असतो ह्या संगणकाचा सीपीयू.
ध्यान म्हणजे 'फोकस ऑफ अटेंशन'.
मेडीटेशन म्हणजे 'मेंदूच्या गाभार्‍यात दबलेल्या व दाबून ठेवलेल्या विकारांच डिटॉक्सीफिकेशन.'

डिटॉक्सीफिकेशन कसं होतं?
- मानवी शरीराच्या जननेंद्रिय व गुदद्वाराच्या मध्ये असलेल्या शिवणसदृश्य भाग जेंव्हा जमिनीला स्पर्श करत बसले असता, केवळ श्वासावर आपले चित्त एकाग्र केले असता, त्या भागातून 'मेंदूच्या गाभार्‍यात दबलेली विकाररूपी घाण' पृथ्वीच्या गुरुत्त्वाकर्शणाने पृथ्वीकडे ओढून घेतली जाते. मग मेंदूच्या गाभार्‍यात तयार झालेली पोकळी शुद्धस्वरुपातील उर्जा व्यापून टाकते.

पण चित्त एकाग्र कसे करायचे?
- श्वासावर लक्श ठेवून.

पण मनाच्या मॉनिटरवर बर्‍याच गोश्टी सारख्या उमटत राहतात? त्या कधी व्हीडीओ गेम्स सारख्या आपल्याला त्यात गुंतुन ठेवतात. मग काय करायचे?
-ज्या क्शणी आपल्याला आठवण येते कि आपण व्हिडीओ गेम मध्ये गुंतुन खेळतोय कि लगेच पुन्हा श्वासावर लक्श केंद्रीत करायचे. पुन्हा वेगवेगळे गेम, मुव्ही दिसायला लागले, गाणी ऐकू येवू लागली तर त्याकडे अलिप्त पणे पहात पुन्हा श्वासावर लक्श केंद्रीत करायचे.

पण असे कितीवेळा करायचे?
- आठवते कां? जत्रेत पाण्याने भरलेला गोल फुगा विकला जातो, त्या फुग्याला रबरी दोरा असतो. तो रबरी दोरा आपल्या मधल्या बोटात बांधून तो फुगा आधी लांब फेकायचा, तसे केले की तो लगेच आपल्याकडे पुन्हा परत येतो. तो जेंव्हा परत येतो तेंव्हा त्या फुग्याला आपल्या पंजात पकडायचे असते. जोपर्यंत ते करत असताना ध्यान जागेवर असते, तोपर्यंत आपल्या पंजात तो फुगा पकडता येतो. ध्यान नसले कि तो फुगा आपल्या अंगावर येवून आदळतो. अगदी तसेच करायचे. आंघोळ आपण दहा मिनिटापेक्शा जास्त करीत नसतो, अगदी तसेच हा ध्यानाचा खेळ 'डिटॉक्सीफिकेशनासाठी' जास्त वेळ करायची गरज नाही.

पण मनात विकार येतात कुठुन?
- नाकात शेंबुड कुठुन येतो? शेंबुड जसा नित्य नियमाने नाकात तयार होतो, तसेच मनाच्या मॉनिटरवर 'विचार' उमटत असतात. विचारांच्या मागे धावलो कि त्याचे विकार होतात.

नाही! नाही कळले.
- आता तुम्ही एका सार्वजनिक ठिकाणावर बसला आहात. मेंदूने मनाच्या पडद्यावर 'नाकात काहितरी सुकल्यासारखे झाले आहे' असा संदेश दिला. त्या संदेशाची एक कॉपी हाताच्या बोटांनाही मिळाली. हात हे कर्मेंद्रिय, सहाजिकपणे ऑर्डर फॉलो करणे त्यास क्रमप्राप्त आहे. हळूच करंगळीच्या नखाने तुम्ही नाकातील सुकलेली कवनी - सुकलेला काहिसा चिकट शेंबुड तुम्ही कोरून कोरून काढला. एक काम झाले. डोळे हे देखील कर्मेंद्रिय, ते द्न्यानेंद्रिय म्हणून ही काम करते. डोळ्यांनी तो सुकलेला काहिसा करड्या रंगाचा चिकट पदार्थ पाहिला. मेंदूला संदेश मिळाला - काम फत्ते! आता पुढे काय?
मेंदुने ऑर्डर दिली 'गाढवांनो विचारताय काय? त्याची विल्हेवाट लावा लगेच. पण हो! कोणी आपल्याकडे पहात तर नाही नां? ह्याची खबरदारी जरूर घ्या! जशी ऑर्डर मिळाली त्याप्रमाणे बुद्धी पुढे आली. तीने बोटांना सांगितले, टिचकी मारा आणी हवेत उडवून द्या त्या चिकट पदार्थाला. बोटांनी तसे केले. डोळ्यांनी पाहिले. त्या वेळेत चेहर्‍यावर मख्ख भाव आपोआप उमटले. अरे हे काय तो पदार्थ आता अंगठ्याला चिकटलेला आहे. च्यायला आत्ता काय करायचे? मनाच्या पडद्यावर एक्सेप्शन थ्रो झाले. बुद्धी पुन्हा पुढे आली. ती म्हणाली, आधी त्या चिकट शेंबडाची व्यवस्थित गोळी बनवा, मग इकडे तिकडे पाहून, चेहर्‍यावर गोंधळलेले भाव न आणता पुन्हा फेका.

पुरे पुरे काय हे? किती घाण-घाण बोलता तुम्ही.
- विचारांच्या मागे धावले कि त्यातून विकार अशाप्रकारेच जन्म घेतात. आपल्या मनात समाजाची, कायद्याची भीती असते म्हणून असे अनेक विकार मेंदूच्या गाभार्‍यात दाबून ठेवलेले असतात. त्याचा योग्य पणे निचरा ध्यानाची क्रिया करून केला जावू शकतो. साठलेल्या विकारांच्या निचरा करण्याच्या सभ्य पद्धतीला मेडिटेशन म्हटले जाते.

मला काही शंका आहेत

पाश्चात्य देशात ओ येईल इतकी सुबत्ता, नीटनेटकेपणा, सुबक शरीरे, सुंदर चेहरे, गोंडस मुले, आकर्षक पेहेराव पाहून पाहून एक प्रकारची धन स्पंदने भलेही निर्माण होत असतील. पण "भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे", "श्रद्धा और सबुरी", ".... प्रसन्न" आदि भाबडे बोल वाचायला मन आसुसते. भले मोठ्या मोठ्या मॉल मध्ये दर सप्ताहान्ताला जाता येते पण जेव्हा ६ महीन्यातून मंदीरात १ शेजारती मिळते तेव्हा डोळ्यात पाण्याच्या धारा लागतात. इतक्या सुबत्तेमध्ये जर कुटूंबसुखच नसेल तर त्या सुबत्तेला धन कंपन म्हणायचे का ऋण?
भारतात गरीबी जरूर असेल पण त्या गरीबीनेच आपण किती सुदैवी आहोत याची पदोपदी जाणीव देऊ केलेली होती. मग एखादा भिकारी नजरेस पडणे हे धन कंपन म्हणायचे का ऋण?

जसे "पैसा" हा स्वतः चांगला किंवा वाईट नाही तर त्याचा विनियोग कसा होतो, त्याची प्राप्ती कशी होते यावर त्याची शुभाशुभता अवलंबून आहे. त्याचप्रमाणे स्वतःहून काही धन अथवा ऋण असते काय? की आपला अनुभव त्याला रंग देतो?
महाभारताचा फोटो पाहून मला त्यातील सारथ्य करणारा श्रीकृष्ण आणि त्याचे नेतृत्व दिसू शकेल तर अन्य कोणाला महाभारतातील भांडणे. मग हे कोण ठरविणार की त्या प्रतिमेची कंपने धन आहेत अथवा ऋण.

आवरा

धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती! ;) आवरा!

ओ येणे

पाश्चात्य देशात ओ येईल इतकी सुबत्ता, नीटनेटकेपणा, सुबक शरीरे, सुंदर चेहरे, गोंडस मुले, आकर्षक पेहेराव पाहून पाहून एक प्रकारची धन स्पंदने भलेही निर्माण होत असतील.

प्रत्येकाला हे देखावे बघून भले वाटत असेलच असे नाही. काही जणांना डिस्पॅरिटीची जाणीव होऊन शिसारीही येऊ शकते. (ओ येईल म्हणजे ओकारी येईल असेच तुम्हाला म्हणायचे असावे.)

अवांतर: धन किंवा ऋण अशा प्रकारची स्पंदने मोजायला मीटरे असायला हवी. वोल्टमीटर, ऍममीटरसारखी. स्पंदनांचे रेटिंग किती हे सांगता यावे. प्रत्येकाला त्याच्या क्षमतेनुसार धन किंवा ऋण स्पंदनांच्या वहनाची परवानगी द्यायला हवी. असो. वास्तुशास्त्र, कंपने, धन किंवा ऋण स्पंदने ह्या गोष्टींचा विज्ञानाशी काही संबंध नाही. पण कुणी शिवी हासडली तर बहुधा वाईट वाटतेच. एखादा अभाव अनुभवला की उदासी येतेच. असो.

सदस्य ह्यांनी खाली धष्टपुष्ट गरीब आणि लुळीपांगळी श्रीमंती असे भाष्य केले आहे. त्यावरून मुनव्वर राना नावाच्या कवीच्या दोन द्विपदी आठवल्या:

सो जाते हैं फूटपाथ पे अख़बार बिछाकर
मज़दूर कभी नींद की गोली नहीं खाते

अल्लाह ग़रीबों का मददगार है 'राना'
हम लोगों के बच्चे कभी सर्दी नहीं खाते

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

धन्यवाद

>> वास्तुशास्त्र, कंपने, धन किंवा ऋण स्पंदने ह्या गोष्टींचा विज्ञानाशी काही संबंध नाही.>>
अगदी हेच म्हणायचे होते.
>> पण कुणी शिवी हासडली तर बहुधा वाईट वाटतेच. एखादा अभाव अनुभवला की उदासी येतेच. असो. >>
आणि हेसुद्धा की जरी बहुतांशी गोष्टी करड्या रंगात असल्या तरी काही गोष्टी खरोखर ब्लॅक अँड व्हाईट असतात.

माझे म्हणणे अधिक समर्पक रीतीने विषद केल्याबद्दल आभारी आहे.

वैज्ञानिक मुलामा

. Positive Strokes व Negative Strokes ह्या शब्दाना घन उर्जा व ऋण उर्जा या पेक्षा घन वा ऋण कंपने / स्पंदने (Vibrations) हा शब्द कदाचित ज्यास्त योग्य ठरला असता. मनातील विचार, त्याने मिळणारी वा होणारी कंपने व त्यातून मनाला मिळणारी चालना (ऊर्जा) व त्याचा शरीरावर होणारा व दिसणारा दृश्य घन व ऋण परिणाम अश्या पायरा होतात

या धन ऋण उर्जेवरुन आम्हाला डॉ भा नि पुरंदरे यांची आठवण आली.

डॉ. बी. एन. पुरंदरे यांनी १९८५ च्या ज्योतिषसंमेलनात वैद्यक ज्योतिषाच्या सेमिनारमध्ये खालील विधाने केली होती :-
१) समाजातील सात टक्के व्यक्ति धनभारित असतात. २८ टक्के व्यक्ति ऋणभारित असतात व बाकीचे उदासिन असतात. व्यक्ति कोणत्याप्रकारची आहे हे त्याच्या तळहातावर रुद्राक्ष धरुन ठरवता येते. धनभारित व्यक्तिमधे आत्मिक सामर्थ्याने रोग बरा करण्याची, अंतर्ज्ञानाने भविष्य बरोबर सांगण्याची शक्ती असते. अशा व्यक्तिंनी पाणी दिले तरी त्याचे औषध बनते.
२) गरोदर स्त्रीच्या पोटावर रुद्राक्ष धरुन मुलगा की मुलगी होणार हे आधी कळते.
३) डॉ. पुरंदरेंनी ऑपरेशन करुन एक जुळे काढले. त्यांचे पोषण करणारी वार एकच होती. वैद्यकशास्त्र सांगते की अशी जुळी भावंडे अगदी एकसारखी असतात. परंतु तेवढया वेळात चंद्राने नक्षत्र बदलल्याने त्या मुली पूर्णपणे वेगळया रंगरुपाच्या, गुणाच्या झाल्या.
हे दावे सिद्ध करण्याची जबाबदारी त्यांचेवर येते असे आव्हान लोकसत्तेच्या १९.१.८६ च्या अंकात डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी 'भविष्याचे भ्रमजाल` या लेखातून दिले. परंतु या बाबत त्यांचा कुठलाही प्रतिसाद आलेला नाही.
(ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... वरुन उधृत)

ध्यानावरील लेख वाचता त्याचा फायदा सश्रद्ध माणसाला नक्की होत असणार असे सकृत दर्शनी वाटते. उपक्रमावरील पाखंड्यांना त्याची काय अनुभुती येणार? गानू साहेब उपक्रमाचे पोतडे उलगडून या विषयावरील पुर्वीच्या चर्चा जरुर वाचा.
(अंध)श्रद्धांना वैज्ञानिक मुलामा हा लागतोच त्याच्या शिवाय त्या आधुनिकतेचा बुरखा कशा पांघरणार? अशा लेखनामुळे लोकभ्रम ची आठवण येते. ध्यानामुळे मिळणारे समाधान् हे व्यक्तिसापेक्ष असल्याने त्या विषयी भाष्य करु शकत नाही. त्यात आनंद मिळत असेल तर चांगलीच गोष्ट आहे

प्रकाश घाटपांडे

उदासीनतेबाबत पटले नाही

१) समाजातील सात टक्के व्यक्ति धनभारित असतात. २८ टक्के व्यक्ति ऋणभारित असतात व बाकीचे उदासिन असतात. व्यक्ति कोणत्याप्रकारची आहे हे त्याच्या तळहातावर रुद्राक्ष धरुन ठरवता येते.

हा विचार लॉजिकलीदेखील पटला नाही.
७% धनभारित
२८ % ऋणभारित

व उरलेल्या उदासीन...

उदासीनता ही ऋणभारितच नाही का?

न्यूट्रल् या अर्थाने जरी म्हणायचे असेल् तरी तटस्थ हा शब्द् जास्त योग्य लागू होतो. पण् उदासीनता नाही. उदासीनता म्हणजे दुर्लक्ष करण्यासारखा अर्थ बोध होतो

उदासीन

उदासीनता ही ऋणभारितच नाही का?

नाही

न्यूट्रल् या अर्थाने जरी म्हणायचे असेल् तरी तटस्थ हा शब्द् जास्त योग्य लागू होतो. पण् उदासीनता नाही.

उदासीन हा न्युट्रल अशा अर्थाने वापरलेला आहे/ जातो.
मोल्सवर्थ मधे पहा उदासीन
प्रकाश घाटपांडे

उदासीन हा न्युट्रल अशा अर्थाने वापरलेला आहे/ जातो.

हे आपले म्हणणे योग्यच वाटते. त्याला पदार्थविद्न्यानात् ही अधार आहेच.

जसे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन व् न्युटरॉन

बरोबर आहे

उदासीन म्हणजे न्यूट्रल.
उदास म्हणजे दु:खीकष्टी.

त्याचा फायदा सश्रद्ध असणार असे....

सश्रद्ध माणसाला फायदा होतो हे तर् बरोबरच् आहे. श्रद्धा म्हणजे देवावरील असे आपणास् म्हणावयाचे असावे.

पण इतरानाही फयदा होऊ शकेल. याचे कारण् म्हणजे मनाला व शरीराला मिळणारी विश्रांती. देवाचे नाव घेणे वा त्याविरहित सुद्धा मेडिटेशन करता येतेच.

डॉ. बी. एन. पुरंदरे यांची दूरदर्शन वरील मुलाखत सुद्धा मी ऐकली होती. मला सुद्धा त्यातील कित्येक् गोष्टी पटण्यास कठीण वाटल्या होत्या.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे अंधश्रद्धेवर् मोठे आहे. त्यांचा लेख आवडला.

अंधश्रद्धा वाईटच. त्याचा उपयोग समाजाला फसवण्यासाठी होतो. मेडीटेशनसाठीही गंडा देत हे मी २० वर्षांपूर्वी पाहिले. व ते कमी व्हावे म्हणून मेडीटेशन वर माहिती मिळवली. मी सन्शोधक. या विषयावर अभ्यास करून प्रसंगी इतरांशी चर्चा करून धागेदोरे जाणून घेतले, उपयोग बघितला व मगच लेख लिहिले.

पब मेड या शास्त्रीय / वैद्यकीय प्रबंध प्रसिद्ध करणाऱ्या स्थळावर आपणास मेडीटेशनच्या बाबतीत कितीतरी माहिती मिळेल. Instead of is wrong, along with medicine is correct.

अल्फा वेव्हज्

अल्फा वेव्हज् आणि ईईजी फीडबॅक यामुळे काही पेशंट्सना विशेष फायदा होतो.
उदा. पॅथॉलॉजिकल डिसीझ नसणार्‍या पण तशी सिम्प्टंप्स दाखवणार्‍या पेशंट्समध्ये.
एका मध्यमवयीन बाईंना गुडघेदुखीमुळे चालताही येत नसे. पण त्यांना होणार्‍या वेदना तर 'खर्‍याच' होत्या. सर्व शास्त्रीय चाचण्यांमध्ये कोणताही दोष आढळला नाही.
याच इस्पितळातील 'सायकॉलॉजी' डिपार्टमेंटमधील बायोफीडबॅक थेरपीमुळे त्यांना बरे 'वाटू' लागले.
'सायकॉलॉजीकल डिसॉर्डर्स' जर अल्फा वेव्हज् मुळे बर्‍या होत असतील तर 'मेडिटेशन'मुळेही तसाच फायदा होऊ शकेल असे वाटते.
***
मुळात सायकॉलॉजी आणि बायोफीडबॅक हे शास्त्रीय नाहीत असाही प्रतिवाद होऊ शकतो. पण ते इतर उपचारपद्धतींपेक्षा शास्त्राच्या/विज्ञानाच्या जास्तीत जास्त जवळ आहेत असे म्हणतो.

छान लेख

३ही लेख छान वाटले, थोडे गोग्गोड वाटले पण छान आहेत.

मी स्वत: मेडिटेशन चा अनुभव घेतला आहे व त्याचा फायदा जाणवतो हे नक्कीच आहे, तुमचा अनुभव इतरांना नक्कीच मार्गदर्शक आहे.

धन/ऋण उर्जेबाबत देखिल सहमत, मनाचा शरीरावर होणारा परिणाम विज्ञानालाही मान्यच आहे, सोमॅटोफॉर्म विकृती/व्याधी किंवा सायकोन्युरोइम्युनोलॉजी मधे ह्यासंबंधातच विचार केला गेला आहे.

बाकी महाभारत/रामायण/मुलीचे नाव बदलणे हे सर्व तुमचे वैयक्तिक अनुभव आहेत त्याबद्दल मी सहमत नाही, पण त्याची चर्चा इथे अवांतर ठरेल.

चांगलाच आहे

लेखातील विचार चांगलाच आहे.

- - -
उपमा वापरण्याबाबत एक टिप्पणी :

मनावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही विचारांचा सुपरिणाम किंवा दुष्परिणाम होत असतो हे आपण दैनंदिन व्यवहारात नेहमीच पहातो.

येथील "सकारात्मक विचार", "नकारात्मक विचार", "सुपरिणाम" आणि "दुष्परिणाम" हे शब्द नेमके आहेत. यथार्थ आहेत. हे चपखल शब्द उपलब्ध असताना स्पर्शात्मक उपमा (कंपने, स्पंदने), गणिती-अर्थशास्त्रीय उपमा (धन, ऋण), किंवा भौतिकी उपमा (ऊर्जा) या क्वचित अलंकारासाठी वापराव्या. त्यानंतर पुन्हा "सकारात्मक" वगैरे नेमके शब्द वापरल्यास बरे असते. कारण उपमा संदिग्ध असते. त्या पुन्हा-पुन्हा वापरल्या तर संदिग्धतेमुळे गैरसमज होऊ शकतो. किंवा जे थेट सांगता येते, त्यात आडवळणे येतात.
(कंपन=थरथरणे किंवा कापणे; स्पंदन=[हृदयासारखे] नियमितपणे ताठरणे;)
उदाहरणार्थ :

‘जखमांची तीव्रता जरी सारखीच असली तरी युद्ध जिंकलेल्या सैन्यातील सैनिक बरा होतो तर तेव्हढ्याच तीव्रतेची जखम असलेला युद्ध हरलेल्या सैन्यातील सैनिक त्या आजारातून बरा होतोच असे नाही. हा मनाचा शरीरावर होणारा व दिसणारा दृश्य घन किंवा ऋण बरावाईट परिणाम (उर्जा किंवा कंपने) आहे का? म्हणजेच प्रकृती बरी होण्यास बाहेरील औषधांव्यतिरिक्त मनाचे सामर्थ्य पण आवश्यक असते.

यातील संदिग्ध उपमा खोडल्या तर युक्तिवाद अधिक थेट होतो आणि सहज पटतो. धन आणि ऋणाचा मुद्दा लेखाजोख्यातला (बुककीपिंगमधला) अथवा अंकगणितातला आहे. या उपमेने कल्पना अधिक स्पष्ट होण्याऐवजी मर्यादित होते. कारण संख्यांची वजाबाकी नसली, तरी शरिरावरचा सुपरिणाम किंवा दुष्परिणाम पटण्यासारखा असतो. मन किंवा शरीरात जय-पराजयामुळे कुठल्याच प्रकारची थरथर होत नसली, तरी मनातील भावनांचा शरिरावर परिणाम होतो ते थेटच पटते. अशा प्रकारे उपमांची अडगळ काय करते? मनःस्थितीचा शरिरावर परिणाम होतो, ही उघड्या डोळ्यांना दिसणारी गोष्ट काल्पनिक बनवते : म्हणजे आधी मनःचक्षूंपुढे मनात सुखाची किंवा दु:खाची वेगवेगळी थरथर कल्पावी लागते, त्या थरथरीची धन-ऋण वजाबाकी करण्याची कल्पना करावी लागते, आणि त्या वजाबाकीचा परिणाम शरिरावर होत असल्याची कल्पना करावी लागते.

आमची ध्याना बद्द्लची सु-धारणा

ध्याना बद्दल आमची धारणा,,मंजे वैताग आला,की निवांत घोरत पडणे

http://atruptaaatmaa.blogspot.com

लेख आवडले

तिन्ही लेख आवडले.

येन येन हि रुपेण जनो मां पर्युपासते l
तथा तथा दर्शयामि तस्नै रुपं सुभक्तितः ll

 
^ वर