नशीबात नसलेली पुस्तके

महाराष्ट्र टाईम्सच्या आजच्या अंकातला हृषिकेश गुप्ते यांचा हा लेख दोन कारणांनी वाचण्यासारखा आहे. एकतर (या लेखासोबत दिलेल्या लेखकाच्या छायाचित्रावरुन केलेल्या अंदाजानुसार) हा चाळिशीच्या आतला तरुण असूनही त्याने एक पुस्तक मिळवण्यासाठी केलेली धडपड ही मला अत्यंत कौतुकास्पद वाटली. असा एखाद्या पुस्तकाचा झपाटल्यासारखा शोध घेणे आणि ते मिळाल्यावर पराकोटीचा आनंद होणे हे सगळेच काळाच्या प्रवाहात कुठल्याकुठे वाहून गेले आहे असा माझा समज होता. तो या लेखाच्या निमित्ताने काहीसा खोटा ठरला याचा आनंद आहे. दुसरे कारण अगदी परिचित आहे. मराठीतल्या एका प्रसिद्ध लेखकांचे २००९ साली निधन झाले आणि त्यांचा वैयक्तिक पुस्तकसंग्रह रस्त्यावर विकायला आला असे श्री.गुप्ते यांनी लिहिले आहे. अशा प्रसिद्ध संग्रहांचा असा बेवारस अवस्थेत रद्दीसारखा शेवट व्हावा हे कोणाही पुस्तकप्रेमीला अस्वस्थ करणारे चित्र आहे. यातली काही पुस्तके त्या थोर लेखकांनी खूप धडपड करुन, खूप पदरमोड करुन मिळवलेली असतात. त्यातल्या काही पुस्तकांची प्रतिबिंबे त्या लेखकांच्या लेखनात उमटलेली असतात. अशा पुस्तकांना फूटपाथवरील पायरेटेड पुस्तकांच्या शेजारची जागा मिळावी हे काही बरे वाटत नाही. पण हा विचारही जुनाटच झाला असे म्हणावे लागेल. पुण्यातली एक प्रसिद्ध लायब्ररी काही वर्षांपूर्वी 'चालवणे परवडत नाही' या कारणाखाली बंद पडली. त्या लायब्ररीतली सगळी पुस्तके तिच्या मालकाने पन्नास टक्के सवलतील विकायला काढली होती. कारण 'परवडत नाही'! त्या लायब्ररीच्या जागेत आता तो कदाचित डॉलर जिलबी आणि उंधियो विकत असेल आणि ते त्याला 'परवडत' असेल! असो.
पण या निमित्ताने आपल्या नशिबात नसलेली काही पुस्तके मला आठवली. या लेखामुळे कदाचित ही पुस्तके उपलब्धही होतील अशी आशाही वाटू लागली. सगळ्यात प्रथम आठवली ती शशी भागवतांची पुस्तके. कोणे एके काळी पुस्तक प्रदर्शनांत 'रक्तरेखा', 'रत्नप्रतिमा', 'मर्मभेद' या भागवतांच्या पुस्तकांकडे मी अगदी हावरटासारखा बघत असे. त्यातले एकही पुस्तक घेण्याइतके खिशात पैसे नसत. आज निदान ती तीन पुस्तके तरी एका वेळी विकत घेता येतील इतकी ऐपत आहे. पण गेल्या कित्येक वर्षांत यातले एकही पुस्तक मला कोणत्याही प्रदर्शनात, पुस्तकांच्या दुकानात दिसले नाही. दुसरे पटकन आठवणारे नाव म्हणजे रामदास भटकळांचे 'जिगसॉ'. या पुस्तकाच्या शोधातही मी कित्येक वर्षे आहे. काही भरवशाच्या ठिकाणी (मराठी पुस्तकांच्या दुकानात) मी हे नाव घेतले तेंव्हा 'कोण हे भटकळ?' असे त्या विक्रेत्याने फटकळपणाने विचारल्याचे आठवते. दुसर्‍या एका ठिकाणी 'इंग्लिश पुस्तके पॉप्युलरमधे बघा' असे उत्तर खाऊन मी निमूटपणे परतल्याचे स्मरते. अनंतराव कुलकर्णींचे 'मी जेनी' हे पुस्तक आणि माधव आचवलांचे 'जास्वंद' हे पुस्तकही असेच मला चकवून गेले आहे. 'लमाण' वाचल्यानंतर विजय तेंडुलकरांचे 'गिधाडे' ताबडतोब वाचावे / विकत घ्यावे असे वाटले होते. तेही आजवर जमलेले नाही. एका समव्यसनी मित्राने 'जी.एंच्या कथांचा अन्वयार्थ' हे धों.वि.देशपांड्यांचे पुस्तक 'वाचाच' या सदाखाली टाकूनही हे पुस्तक मला आजवर गावलेले नाही. मंटोच्या समग्र कथांच्या मराठी अनुवादाच्या पुस्तकातही मी बरेच दिवस आहे. ते पुस्तकही आजवर माझ्या नशीबी आलेले नाही.
तुम्हाला हव्या असलेल्या काही पुस्तकांनी तुम्हाला आजवर असे फसवलेले आहे काय?

लेखनविषय: दुवे:

Comments

बिल्वदल आणि काळोखातून अंधाराकडे

अनेक वर्षांपासून या पुस्तकांच्या शोधात आहे अजून मिळालेली नाहीत.

१. बिल्वदल :- लेखक श्री. वि. स. वाळिंबे
२. काळोखातून अंधाराकडे :- लेखक श्री. अरूण हरकारे / रावजी प्रकाशन, डोंबिवली.

अजून एक पुस्तक शोधतोय पण ते आता दृष्टीपथात आलेले आहे आणि लवकरच माझ्या संग्रहात असेल अशी आशा आहे.

विचारशलाका :- लेखक श्री. श्रीपाद महादेव माटे

१९९३ साली एक मराठी पुस्तक वाचले होते जे मूळात १९०० साली प्रकाशित झालेले होते. हे पुस्तक वाचून मी माझ्या आहारशैलीत आमूलाग्र बदल केला. दूध व दुग्धजन्य पदार्थ खायचे सोडून दिले. ते पुस्तक पुढे अनेक वर्षे शोधाशोध करूनही सापडले नाही परंतू गेल्याच आठवड्यात त्याचे मूळ इंग्रजी पुस्तक (http://www.soilandhealth.org/02/0201hyglibcat/020160.khune/kuhne.pdf) आंतर जालावर सापडले. आता सोयीनुसार वाचून काढले जाईल.

पुस्तकांची तहान

हावरटासारखा तो लेख वाचला आणि म.टा.च्या त्या पानावर होत असलेली तांत्रिक गडबड सहन करूनही श्री.गुप्ते याना त्यांच्या जिद्दीबद्दल सलामही पाठविला. [आशा आहे की ती प्रतिक्रिया तिथे अवतरेल.]

नोकरीमुळे अनेकदा विविध गावी जावे लागत असल्याने तिथे सायंकाळी फिरायचे ते अशा आठवणीतील पुस्तकासाठीच. पण गुप्ते याना नारायण धारपांनी सांगितल्याप्रमाणेच ["पुस्तके नशीबात असावी लागतात"] त्यासंदर्भात अनुभवही आले. पु.शि.रेगे यांची 'रेणू' आणि 'मातृका' अशी दोन्ही पुस्तके वाचली तर होतीच, संग्रही नाहीत. पण मौजेच्या उदासिनतेने त्यांची दुसरी आवृत्ती निघणे दुरापास्तच होते. ही जोडी मला कुठल्याही शहराच्या जुन्या बाजारात दिसलेली नाही. शशी भागवतांच्या 'मर्मभेद' चा उल्लेख वर लेखात आलाच आहे. बंगलोरच्या एका जालिय मित्राला 'मर्मभेद' ची किती तहान लागलेली आहे हे माहीत असल्याने समानधर्मीय मित्रांना त्याबद्दल सांगितले आहेच. बघू याबाबतीत 'नशिब पोपट' काय म्हणतो ते.

डॉ.अरुण लिमये संपादित 'झिरपलेली किरणे' नावाचा आणीबाणीच्या कालखंडातील एक छोटासा काव्यसंग्रह. यातील काही कविता फुटकळ स्वरूपात कुठेना कुठेतरी वाचायला मिळाल्या होत्या. पण एकत्रित हा संग्रह अजूनही मिळालेला नाही. "ग्रंथाली" च्या श्री.दिनकर गांगल यांच्यापर्यंत पत्ररुपाने आणि प्रत्यक्षही संपर्क साधला होता. हाती शून्यच.

श्री.गुप्ते यानी "डार्क गॉड्स" बद्दल जी धडपड केली ती वाचताना, त्यावरून आठवले की अशाच एका मोठ्या लेखकाने मला (मी काहीसा भटक्या प्रवृत्तीचा असल्याने) 'टु अ सॅव्हेज् गॉड' हे अल्वारेझचे पुस्तक शोधून आणण्याची विनंती [हा त्यांचाच शब्द] केली होती, जी मी दुर्दैवाने त्यांच्या हयातीत पूर्ण करू शकलो नाही, आणि अल्वारेझ भेटला तो जयपूरच्या एका आडबाजूच्या चौकात, केवळ दहा रुपयाला. डोळ्यात पाणीच आले.

अशोक पाटील

(ताजा कलम : श्री.धों.वि.देशपांडे यांचे 'जी.एं.च्या कथा : एक अन्वयार्थ' आहे माझ्याकडे. तुम्हाला हवे तर जरूर न्या.)

मीच तो

अशोककाका,

बंगलोरच्या एका जालिय मित्राला 'मर्मभेद' ची किती तहान लागलेली आहे हे माहीत असल्याने समानधर्मीय मित्रांना त्याबद्दल सांगितले आहेच. बघू याबाबतीत 'नशिब पोपट' काय म्हणतो ते.

अगदी हेच् लिहायला मी इथे आलो होतो.

मर्मभेद मी गेली कित्येक वर्षे शोधतो आहे.

अशोक काकांच्या कृपेमुळे मला 'आनंद साधले' यांचे "हा जय नावाचा इतिहास आहे' हे ही पुस्तक् अथक परिश्रम करुन् दमल्यानंतर मिळाले आहे. जवळपास ५-६ वर्षे मी 'हा जय नावाचा इतिहास आहे' हे पुस्तक शोधत् होतो. शेवटी अशोक काकांशी परिचय झाला आणि त्यांनी उदार मनाने त्यांच्या संग्रहातील एकमेव प्रत मला दिली.

तद्वतच, शशी भागवतांची मर्मभेद मी जवळपास ७-८ वर्षे शोधतो आहे. पण मर्मभेद काही अजून गवसली नाही...

मातृका

मा. अशोक पाटील,
मी आजच "उपक्रमी" झालो आणि तुमचा ब्लॉग वाचला आणि हे कळलं.
पु.शि.रेगे यांची 'रेणू' आणि 'मातृका' अशी दोन्ही पुस्तके वाचली तर होतीच, संग्रही नाहीत.पण मौजेच्या उदासिनतेने त्यांची दुसरी आवृत्ती निघणे दुरापास्तच होते.
पैकी 'मातृका' हे पुस्तक मजकडे आहे. तुम्हास हवे असलेस मी पाठवण्याचा प्रयत्न करेन.

http://mr.upakram.org/user/4279

अध्यात्मिक पुस्तके

मुलगी नुकतीच झाली असते वेळी, मी घरी होते तेव्हा मुंबईच्या एका उपनगरीय ग्रंथालयामधून अनेक दुर्मीळ अध्यात्मिक पुस्तके वाचावयास मिळाली. तेव्हा नावे टिपून घेतली नाहीत. पण ती पुस्तके मनावर अमीट अशी छाप सोडून गेली. पैकी "चितशक्तीविलास - मुक्तानंदस्वामी" आणि अतिशय रसभरीत "दुर्गासप्तशतीसार" आणि काही मंत्रविषयक पुस्तके वाचनात आली होती. जुनी संस्कृतप्रचुर प्राकृत भाषा अतिशय गोड वाटली. आणि प्रत्येक पुस्तकातून लेखकाने थेट मनाशी संवाद साधला.
तो काळ खूप चांगला गेला. मी आधाशासारखी ती पुस्तके वाचत असे. मला एक मनःशांती अनुभवास येत असे. ज्ञानेश्वरी, दुर्गा सप्तशती, गायत्री उपासना, नित्योपासना या प्रत्येक प्रकारच्या मंत्रांचे विवेचन, अर्थ, फलशृती ...................... म्हणजे मला खरोखर मेजवानी होती.
ती सर्व जुनी पुस्तके मला मिळाली तर परत वाचायची आहेत.
_____________
गिधाडे नाटक जयवंत दळवी लिखित आहे ना? आई ला एम ए ला ८/९ त्यांची नाटके अभ्यासाला होती. मी तेव्हा ८ वी मध्ये होते. सगळीच्या सगळी वाचून पारायणे केली. तसेही दळवी माझे अतिशय आवडते लेखक आहेत. त्यांच्या कथांमध्ये एक तरी वेडसर पात्र असतेच बहुधा.
त्यांचे साहीत्य पुन्हा वाचावयास खूप खूप आवडेल.

ता क - सॉरी बरोबर गिधाडे नाटक तेंडुलकरांचेच आहे. मी विचारले. ते मी त्या काळातच वाचले असल्याने गल्लत झाली.
_______________
शशी भागवतांचे मर्मभेद खूप आवडल्याचे स्मरते. महाविद्यालयीन काळात वाचले होते.
_____________
लेख खरोखर वाचनीय आहे.

"'पुस्तकं अशी सहज मिळत नाहीत. ती नशिबात असावी लागतात.' ती नशिबात असतील तर, स्वत:हून तुमच्याकडे चालत येतात, अन्यथा जग उलथलं तरी ती हाती लागत नाहीत. " - काय सुरेख विचार मांडला आहे नारायण धारपांनी.

अरेरे! आणि वाह्!

एकाचवेळी खेद वाटावा आणि आनंदही व्हावा अशी बातमी आहे ही.

ज्या लेखकाने मला 'डार्क गॉड्स'विषयी सर्वप्रथम सांगितलं होतं ती आणि ज्यांच्या संग्रहात मला ते पुस्तक सापडलं होतं ती एकच व्यक्ती होती. ती व्यक्ती म्हणजे मराठीतील प्रसिध्द भयकथालेखक दिवंगत नारायण धारप!

अरेरे! धारपांच्या वैयक्तिक संग्रहाचा साठा अशाप्रकारे रस्त्यावर विकायला पडावा. :-( सकाळी सकाळी अशी बातमी वाचून बरं वाटलं नाही. परंतु गुप्त्यांच्या पुस्तक शोधापेक्षा मला त्यांनी धारपांची उरलेली सर्व पुस्तके विकत घेऊन सोबत नेण्याचे कौतुक वाटले. अनेक माणसे येन केन प्रकारे पुस्तके शोधतात पण आवडत्या लेखकाचा संग्रह मिळावा आणि तो चटकन विकत घ्यावा हे उद्योग करणारे विरळा असतील.

नशिबात काय नाही यावर फारसा विचार न केल्याने खूप नावे आठवत नाहीत परंतु धारपांच्या कथा वाचून खूप काळ उलटला. त्यांच्या समर्थ कथा "सुष्ट शक्तींचा दुष्ट शक्तींवरील विजय" या तत्त्वावर असल्याने खूप आवडत असे म्हणता येणार नाही. त्यातल्या त्यात लुचाई आवडले होते पण पुढे ते सेलम्स लॉटवरून घेतल्याचे कळले आणि मूळ कादंबरी मिळवली. मंगळावरील जीवसृष्टीवर त्यांची विज्ञानकथा होती असे आठवते. कदाचित ती आता आवडेल असे नाही पण पुन्हा वाचायला मिळावी. मध्यंतरी मतकरींचे अंतर्बाह्य वाचताना चंद्राची सावली या धारपांच्या पुस्तकाचे कौतुक येथे लिहिले आहेच. हे पुस्तक पूर्वी वाचले की नाही तेच आता आठवत नाही. धारपांच्या त्या नंतरच्या कथा/ कादंबर्‍या - चेटकीण, ४४० चंदनवाडी वगैरेंशी काही संबंधच आलेला नाही. परंतु गेल्या काही दिवसांत अचानक पुन्हा पुन्हा समोर येणार्‍या धारपांच्या नावाने ही पुस्तके वाचायची इच्छा होते आहे. अर्थातच, ही ग्रंथसंपदा भारतात असल्याने सध्यातरी नशिबात दिसत नाही.

असो.

खुद्द धारपांनी कौतुक करावे असे पुस्तक; लगोलग शोधलं. डार्क गॉड्स हे पुस्तक सहज उपलब्ध नाही हे खरेच. ऍमेझॉनवर हे पुस्तक स्टॉकमध्ये नाही, इतर युजर्सकडून मागवण्याची मला काळजी वाटते. बार्न्स अँड नोबल्समध्येही नाही. बरं प्रकाशन इतके जुनेही नाही. १९८५ मधील आहे. पुस्तकाचे परीक्षणही सर्वत्र चांगलेच आहे आणि तरीही ते उपलब्ध नसावे?

दिग्गजांकडे नाही तर गावातल्या लायब्ररीत असणे कठीण आहे हे माहित असूनही सहज त्यांचा कॅटलॉग चाळला आणि आश्चर्य; टी.इ.डी. क्लेन यांची Dark gods : four tales आणि The ceremonies ही दोन्ही पुस्तके शेजारच्या गावातील लायब्ररीत उपलब्ध असल्याचे कळले. ती मला लगेच नाही तरी १-२ दिवसांत मागवता येतील. :-)

गुप्ते म्हणतात -

'भयकथाच वाचायच्या असतील तर, डार्क गॉड्स वाचा. टेड क्लेनचं!' मराठीतील एका मोठ्या लेखकानं मला हे सांगितलं. ते १९९९ साल होतं. लेखक माझ्या आवडीचे आणि त्यातनं मितभाषी असूनही ते त्या विशिष्ट पुस्तकावर तेव्हा खूपच खुलून बोलले. त्यांचं ते बोलणं ऐकून मी प्रचंड उत्तेजित झालो.

प्रचंड उत्तेजित होणे हे शब्दशः भाषांतर वाटले तरी सध्या मलाही ते पुस्तक कधी हातात पडते असे झाले आहे हे खरेच! काही गोष्टी अलगद हातात पडतात. वाह्!!

कधी कधी नशीब हात देऊन जाते असे म्हणतात ते हे असे असावे. ;-)

जिद्द

मंगळावरील जीवसृष्टीवर त्यांची विज्ञानकथा होती असे आठवते. कदाचित ती आता आवडेल असे नाही पण पुन्हा वाचायला मिळावी.
मंगळावर की काय ते नक्की आठवत नाही पण परग्रहावर वस्तीला जाणारा माणूस आणि तिथला त्याचा संघर्ष यावर धारपांची 'जिद्द' नावाची सुरेख कादंबरी आहे. तिचीही नवी आवृत्ती निघणार असे धारपांनी मला एकदा फोनवर सांगितले होते. माझ्याकडे कुठेतरी अगदी जीर्ण झालेले ते पुस्तक असेल...

सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

मंगळावरची माणसे

नाही, जिद्द नसावे. मंगळावरची माणसे का असेच काहीसे नाव आहे. पुस्तक तसे जुने असावे. ७३-७४ किंवा त्यासुमारास प्रकाशित झालेले. त्याकाळी रोचक वाटेल अशी कथा होती. मंगळावरून याने येतात. त्यातून किंचित बुटके आणि हिरवट रंगाचे परग्रहवासी पृथ्वीवर सर्वत्र एकाचवेळेस हल्लाबोल करतात. त्यांना भाषेची अडचण नसते किंबहुना अमेरिकेत लोकांना सरळसोट मॅक आणि बेट्सी अशी हाक मारतात तर महाराष्ट्रात बाईला ठकी म्हणून हाक मारतात. दारावर, खिडक्यावर सहज बसू शकणारे असे हे प्राणी असतात आणि उठता बसताना ते "प्रिंगत" बसतात. :-)

पुढे अर्थातच पृथ्वीवासी त्यांचा मुकाबला करतात अशीच गोष्ट असावी.

हे पुस्तक वाचल्याला ३० वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला असावा पण ते डोक्यात बसले आहे इतकेच. हॉलिवूडमधले घाणेरडे किळसवाणे परग्रहवासी पाहण्यापेक्षा मला अजूनही हे पुस्तक पुन्हा वाचायला आवडेल.

असो. धारपांच्या कथांवर स्टार प्रवाहवर मालिका वगैरे सुरु असल्याचेही कळले.

ऍमेझॉन

ऍमेझॉनवर हे पुस्तक स्टॉकमध्ये नाही, इतर युजर्सकडून मागवण्याची मला काळजी वाटते.

बिनधास्त घ्या. मी बर्‍याचदा मागवली आहेत. फार फार तर दिड डॉलर जाईल.

मी जेनी

अनंतराव कुलकर्णींचे 'मी जेनी' हे पुस्तक आणि माधव आचवलांचे 'जास्वंद' हे पुस्तकही असेच मला चकवून गेले

यात मी जेनी या पुस्तकाची लेखिका जेनीच असून मी फक्त शब्दांकन केलय अस अं अ. कुलकर्णी म्हणतात. पुस्तकावर सुद्धा शब्दांकन अं अ कुलकर्णी असच लिहिलय. मला पुस्तक खुप आवडल. भुभु वरचे पुस्तक् आहे ना!
प्रकाश घाटपांडे

जास्वंद्

वरील श्री.घाटपांडेसरांचा प्रतिसाद वाचताना लक्षात आले की श्री.राव यानी त्यांच्या लेखात आचवलांच्या 'जास्वंद' चा उल्लेख केला आहे. पण हे पुस्तक तसे दुर्मिळ नाही. मला तर अलिकडेच 'अक्षरधारा' च्या प्रदर्शनात मिळाले. २००१ ची आवृत्ती आहे [मौजेचीच]. तब्बल २६ वर्षांनी दुसरी आवृत्ती निघाली आहे. आजही बर्‍याच [अर्थात नावाजलेल्या] पुस्तक विक्रेत्यांकडे 'जास्वंद' उपलब्ध असणार.

[अवांतर : "जास्वंद" च्या ब्लर्बवर पुस्तकाची महती सांगणारी एक टिपणी आहे. त्यात म्हटले गेलेले एक वाक्य फार सुंदर आणि तितकेच प्रभावी वाटते : "आचवल-समीक्षा - साहित्यकृतीच्या अम्लान सौंदर्याचे नित्यनवे दर्शन घडविणारी." ~ यातील 'अम्लान सौंदर्य' हा कौतुक-प्रयोग फार भावला.]

अशोक पाटील

मराठी पुस्तकांचा शोध अवघड

मराठी पुस्तकांचा शोध घेणे खरच अवघड जाते. इंग्रजी मध्ये amazon वर शोध घेतल्यास त्या पुस्तकाबद्दल सहज माहिती कळू शकते. पण मराठी पुस्तक शोधणे म्हणजे एक दिव्य असते. त्यातून रहस्यकथा वगैरे लोकप्रिय साहित्य असेल तर थोडे तरी सोपे पण जर क्लासिक हवे असेल तर फार त्रास असतो.
(ऐमेझोन सारखे एखादे संकेतस्थळ मराठीत का निघत नाही कुणास ठाऊक? )

मध्यंतरी शांता शेळके यांची "चौघीजणी" ही कादंबरी शोधायला फार त्रास झाला होता. विकत मिळाले नाही त्यामुळे एक ग्रंथालय लावले तेथे एकच जुनी प्रत सापडली.

त्यातल्या त्यात पुलंची पुस्तके सगळीकडे सापडतात असा अनुभव आहे.

"वॉन्टेड" पुस्तकांची यादी

१. हृषिकेश गुप्ते हा नव्या पिढीतला फार चांगला गुढकथालेखक आहे. त्याचा एक संग्रह मनोविकास प्रकाशनाने अशातच प्रकाशित केला आहे. तो वाचून मी आवर्जून त्यांच्याशी बोलले होते.
२. मी माझ्या संग्रहातली पुस्तकेही ( मेल्यावर लोकांनी रद्दीत देण्याआधीच :-)...) काढते आहे. वरील यादीतील जी पुस्तके माझ्या संग्रहात असतील त्यांना व्यनि करते आहे. फक्त वसईहून घेऊन जाण्याची व्यवस्था ज्याची त्याने करावी.
सन्जोप ने मांडलेला मुद्दा महत्त्वाचा आहे. ज्या लेखक / समीक्षक / संग्राहकांनी वाचनालयांना / विद्यापीठांना / महाविद्यालयांना आपली ग्रंथसंपदा दिली, तिथली अवस्थाही पाहवत नाही. (( एका विद्यापीठात तर अशी स्वतंत्र कपाटे केलीत. त्यांना कुलुपे आहेत. आणि त्यातील पुस्तकांची यादी पाहण्यासाठी ग्रंथपालांना मनवावे लागते आणि पुस्तक हवे असेल, तर कुलगुरूंची परवानगी मिळवून आणावी लागते... (बिचार्‍या देणगीदारांचा आत्मा जर पुस्तक असता तर पाने सुटी सुटी होऊन तरळत राहिला असता...)) त्यामुळे जे त्या पुस्तकांची वाट पाहणारे आहेत, त्यांच्यापर्यंतच पुस्तके पोहोचवावीत. अखेर आज व्यक्तीच काही करू शकतील, संस्था नाही... असं म्हणावं वाटतंय.
इतरांनीही आपली "वॉन्टेड" पुस्तकांची यादी इथे द्यावी.

हवी असलेली पुस्तकं

पुस्तक नशिबात असावं लागतं हे खरं वाटावं अशीच परिस्थिती आहे.
दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांची २ पुस्तकं गेली ५-७ वर्षंं मी शोधतो आहे.
१. महाराष्ट्र भाषेचे व्याकरण, सातवी आवृत्ती (१८७९)
२. महाराष्ट्र भाषेच्या व्याकरणाची पूरणिका (१८८१)
प्रा. कृष्ण श्रीनिवास अर्जुनवाडकर ह्यांच्या 'मराठी व्याकरणाच्या इतिहासात' ह्या पुस्तकांचा उल्लेख होता. ही पुस्तकं त्यांनी मराठी साहित्य परिषदेच्या ग्रंथालयात असल्याचा उल्लेख होता. मी तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहून आलो पण ही पुस्तकं तिथे नाहीत. मुंबई आणि पुणे येथील बरीचशी ग्रंथालयं पाहून झाली आहेत. पण काही उपयोग झाला नाही. ही पुस्तकं संग्रहासाठी मिळाली तर फारच छान. निदान ती वाचायला तरी मिळायला हवी आहेत.
मला संग्रहासाठी हवी असलेली पण शोधूनही अद्याप न गवसलेली पुस्तकं म्हणजे
०१. कवी चंद्रशेखर ह्यांचा 'चंद्रिका' हा कवितासंग्रह (१९३२)
०२. ना. गो. जोशी ह्यांचं 'मराठी छंदोरचना : लयदृष्ट्या पुनर्विचार' आणि इतर छंदःशास्त्रविषयक पुस्तकं
०३. बा. भ. बोरकर ह्यांचा 'पांयजणां' हा कोंकणी कवितासंग्रह
०४. निर्णयसागर मुद्रणालयाच्या जावजी दादाजी ह्यांचं चरित्र - पु. बा. कुलकर्णी
०५. प्रियोळकर-संपादित 'दादोबा पांडुरंग तर्खडकर ह्यांचं आत्मचरित्र'
०६. प्रास प्रकाशनाचं अल्लादिया खाँ ह्यांचं चरित्र
०७. देनिसच्या गोष्टी (आधीची संपूर्ण आवृत्ती - नव्या आवृत्तीत बहुधा संक्षेप केला आहे असं आठवतं)
०८. वा. वि. भट ह्यांनी लिहिलेलं इतिहासाचार्य राजवाडे ह्यांचं चरित्र
०९. छत्रपती शाहू महाराजांनी दिलेले आदेश, शासननिर्णय ह्यांचा संग्रह

वेचक

योगायोगाने कालच मी ऐसीअक्षरेवर अर्जुनवाडकरांचे एक पुस्तक वाचत असल्याबद्दल लिहीले - "मराठी व्याकरण: वाद आणि प्रवाद". मी त्यांनी संपादिलेले "महाराष्ट्र प्रयोग चंद्रिका" नावाच्या एका जुन्या मराठी व्याकरणाच्या शोधात होते. जालावर गुगलून पाहताना त्यांच्या लेखनासंबंधित वेचकहे संकेतस्थळ सापडले. त्यांनी शुद्धलेखनावर "पंतोजी" या टोपणनावाने ललित मासिकात लिहीलेले लेख तेथे संग्रहित आहेत. "प्रयोगचंद्रिका" च्या शोधात मी स्थळावरचा पत्ता पाहून त्यांनाच विचारायला गेले. दुर्दैवाने त्यांच्याकडेही प्रत नव्हती, आणि देशमुख अँ कंपनी या प्रकाशकाकडेही नंतर मला सापडली नाही. पण "मराठी व्याकरण: वाद आणि प्रवाद" आणि "मराठी व्याकरणाचा इतिहास" हे दोन्ही मी त्यांच्याचकडून विकत घेतले. त्यांच्याकडे अधिक प्रती आहेत की नाही माहित नाही, पण तुम्ही विचारू शकता.

*********
धागे दोरे
*********

देनिसच्या गोष्टी

देनिसच्या गोष्टी आता पुण्याच्या उर्जा प्रकाशनाने प्रकाशित केल्या आहेत. त्यांच्या वेबसाईटवर मिळेल.

१, विजयपथ

एक पुस्तक खूप शोधले पण आता प्रकाशन बन्द झाले असे ऐकले..
१, विजयपथ.
by अविनाश धर्माधिकारी..

हे पुस्तक विकत घेण्याची इच्छा आहे.. बघुयात..

पुस्तके

मूळ लेख आणि त्यावरचे स्फुट दोन्ही आवडले. शाळेत असताना मनोरंजक भौतिकशास्त्र नावाचे रशीयन अनुवादित पुस्तक एका मित्राकडे चाळले होते ते खूप आवडले म्हणून विकत घेण्यासाठी खूप शोध घेतला पण शेवटपर्यंत मिळाले नाही. मुंबईला नेहरू तारांगणाजवळ मिळतात असे नंतर समजले पण तेव्हा एका पुस्तकासाठी मुंबईला जाणे शक्य नव्हते.

अवांतरः लेख थोडा जुना आहे का? सहज शोधले तर डार्क गॉडस् ऍमेझॉनवर सापडले. अवघ्या दिड डॉलरमधे वापरलेली प्रत उपलब्ध आहे.

दीड डॉलरमध्ये

नवं पुस्तक ४० डॉ. असताना दीड डॉलरमध्ये खरेच चांगल्या प्रती उपलब्ध असतात का? पूर्वी एक दोनदा मला बरा अनुभव आला नाही. म्हणजे वापरलेली प्रत आहे अशी जाहीरात केलेली आणि चेक आउटच्या वेळेला प्रत नाही असे कळले. अर्थात, हा तसा जुना किस्सा आहे पण या अनुभवामुळे मी पुन्हा अशा गोष्टींच्या वाट्याला गेले नाही.

आणि दीड डॉ. च्या पुस्तकाला ६-७ डॉ.चं शिपिंग? :-( अर्थात, नवीन पुस्तकापेक्षा कमी पडते हे खरे पण अंगापेक्षा भोंगा मोठा वाटतो. म्हणूनच कदाचित गुप्त्यांना त्यांच्या मित्रांनी टोलावले असेल.

शिपिंग

आणि दीड डॉ. च्या पुस्तकाला ६-७ डॉ.चं शिपिंग?

ऍमेझॉनवर पुस्तकांसाठी ३.९९ डॉलर फिक्स शिपिंग असते बाहेरचा सेलर असला तरी. फिडबॅक रेटिंगही असते ते पाहून बिनधास्त घ्यायचे. मी बर्‍याचदा मागवली आहेत. एखाद वेळेला 'वेरी गुड कंडीशन' असे वर्णन केलेले पुस्तक मला 'ऍक्सेप्टबल' कंडीशनचे वाटले होते तेवढ सोडल्यास अनुभव चांगला आहे.

लेख

लेख थोडा जुना आहे का?
नाही हो. कालच्याच मटामधला.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

प्रति

जुना म्हणजे गुप्त्यांनी मागे लिहिलेला असावा. मटाने काल छापला असावा.

चारुता सागर

चारुता सागर (दिनकर दत्तात्रेय भोसले) यांचे कथासंग्रह 'मामाचा वाडा','नदीपार' आणि 'नागीण'. आता पुन्हा प्रकाशित होतील की नाही याची कल्पना नाही.
'नशिबाने'(?) थोड्याशा वाळवीने खाल्लेल्या पण फोटोकॉपी करण्यायोग्य प्रती इथे ग्रंथालयात सापडल्या.

नशीबाने

'नशीबाने' या शब्दावर कुणीतरी चिमटा काढण्याची वाटच बघत होतो. मूळ किश्श्यात धारपांनी तो शब्द वापरला असे लिहिले आहे, म्हणून मी तो शब्द तसाच ठेवला. ताजमहालाला विटा नकोत वगैरे. बाकी पुस्तक काय,काहीही नशीबात असत किंवा नसत नाही यावर विश्वास आहेच. नशीब माझे!
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

विश्वास की श्रद्धा?

पुस्तक काय,काहीही नशीबात असत किंवा नसत नाही यावर विश्वास आहेच.

-विश्वास आणि श्रद्धा हे दोन्ही शब्द सर्वसाधारणपणे व्यक्तीसापेक्ष असतात असे लोक म्हणतात असे निरीक्षण आहे. ;)
(म्हणजे एकाचा विश्वास दुसर्‍याला श्रद्धा वाटू शकते.)
असो.

तरी थोडा फरक

माझ्या वापरण्यात तरी त्या दोन शब्दांच्या अर्थच्छटांमध्ये बराच फरक आहे.

"विश्वास" म्हणजे भविष्यात घडतील अशा घटनांबाबत आपण भाकित करतो, त्या भाकिताबाबत काही प्रमाणात निश्चिती वाटणे.
"श्रद्धा" म्हणजे भूतकाळातल्या, वर्तमानातील किंवा सार्वकालिक गृहीत/कृत्यांबाबत (फॅक्टबाबत) निश्चिती.*
(*तर्काच्या निष्कर्षाबाबत निश्चिती असण्याला साधारणपणे "श्रद्धा" म्हणत नाहीत. गृहीतके (प्रेमिस) आणि तर्कशास्त्रीय पद्धतीबाबत जी-जी निश्चिती वाटते, त्याच युक्तिवादातील श्रद्धा होत.)

विश्वास कमीअधिक असू शकतो. तो १००% असला पाहिजे, असा हट्ट आपण एकमेकांकडे करत नाही. (म्हणजे "उद्या मुंबई शेअरबाजार शाबूत असेल याबाबत मला >९९% विश्वास आहे, आणि शंभर वर्षांनी तो शाबूत असेल याबाबत मला ~७५% विश्वास आहे, आणि हजार वर्षांनी तो शाबूत असेल याबाबत मला <१०% विश्वास आहे." असे म्हटले तर कोणी मला हटकणार नाही.) म्हणून कुठल्या बाबतीत कमीअधिक विश्वास असण्याबाबत समाजात फारसे वादविवाद होत नाहीत.

श्रद्धेबाबत मात्र समाजात अधिक वादविवाद होतात. कारण भूतकाळातील आणि वर्तमानातील गृहीतकृत्यांबाबत ठाम सत्यासत्यता असली पाहिजे अशी आपली धारणा असते. फारतर सत्यासत्यतेविषयी आपण अजून शहानिशा केलेली नसते... पण शहानिशा केल्यावर १००% सत्य किंवा १००% असत्य ठरेल अशी आपली धारणा असते. वगैरे.

हेवा वाटतो

उपलब्ध असलेल्या पुस्तकांतीलच बरीच पुस्तके वाचायची शिल्लक असल्याने मिळत नसलेल्या पुस्तकाबद्दल क्वचित रुखरुख लागते पण अशी गहिरी बोच लागत नाही.

अशी बोच लागून पुस्तके मिळवून वाचणारे वाचक् पाहिले की हेवा वाटतो.

ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?

संधि

आजच मी वरदा बुक्स चे श्री ह. अ. भावे यांचे कडे गेलो. होतो. त्यांचे कडे असलेला वैयक्तिक पुस्तकांचा साठा आता ते काढत आहेत. जवळ पास ४ ते ५ हजार पुस्तके आहेत. त्यातली बरीच पुस्तके त्यांनी प्रकाशनासाठी संदर्भ म्हणुन त्या त्या वेळी घेतली होती.
जालावरील पुस्तक प्रेमींसाठी त्यात काही पुस्तके मिळाल्यास ते द्यावयास विनंती त्यांना केली आहे. त्यांनी ती मान्य केली असून एखादा रविवार वा सोयीच्या वेळी त्यांच्या खजिन्यात शोध घेता येईल.
वरदा बुक्स ने प्रकाशित केलेल्या पुस्तकांची काही यादी आपल्याला उपक्रमावरील या चर्चेत पहायला मिळेल.
अवांतर- अधिक वशिल्यासाठी यनावालांशी संपर्क करा
प्रकाश घाटपांडे

वरदा प्रकाशन

'वरदा प्रकाशन' - ह.अ.भावे ह्यांच्याकडून मी सुमारे १२ वर्षांपूर्वी तीनचारवेळा त्यांनी पुनर्मुद्रित केलेली जुनी दुर्मिळ पुस्तके घेतली होती. पुस्तके facsimile पद्धतीने छापण्यात आली होती आणि तरीहि त्यांच्या किमती ५००-६०० च्या घरात होत्या. किंमत इतकी जास्त का असे मी त्यांना विचारले. त्यांचे उत्तर असे होते, "अशा पुस्तकांना मागणी फार कमी असते. मी ह्यांच्या ४००-५००च प्रती काढतो. त्यातील २००-३०० जरी विकल्या गेल्या तरी माझे भांडवल सुटते. ज्यांना पुस्तक हवेच असते असे लोक आनंदाने किंमत देतात आणि एक जुने पुस्तक कायमचे नष्ट होण्यापासून मी त्याला वाचवले आणि ज्या मर्यादित संख्येच्या वाचकांना ते हवे होते त्यांना मी ते दिले हा आनंद मला मिळतो." मला हे लगेच पटले.

वरदा

अनेक वर्षांपूर्वी संशोधन करत असताना भाव्यांनी मला काही पुस्तकं मिळवून देण्यात खूप मदत केली होती. कपाटातून त्यांच्याच प्रतीची देखील छायाप्रत त्यांनी मला काढून दिली होती. जयकर लायब्ररीतून घरी जाताना तिथे डोकावून त्यांच्या बरोबर चर्चा-चहा होत असे. मग त्यांना अनेक वर्षे हवे असलेले एक पुस्तक मी मिळवून द्यायला मदत केली - त्यांनी केलेल्या मदतीची थोडीशी परतफेड करून मला खूप बरे वाटले.
हा धागा पाहून त्याची आठवण झाली, आणि काल वरदाला पुन्हा भेट दिली. पुस्तकांच्या खजिन्याच्या खोलीत थोडा वेळ घालवला... एकूण मजा आली!
*********
धागे दोरे
*********

बांदेकरांचं बाळ

हृषिकेश गुप्ते यांची अंधारवारी संग्रहातील एक गूढकथा येथे वाचता आली. फार आवडली. कथासंग्रह विकत घेण्याची इच्छा होते आहे. नशिबात कधी असेल तेव्हा बघू. ;-)

अवांतरः मायबोलीवरून कोणी अमेरिकेतील मंडळी पुस्तक खरेदी करतात का? करत असल्यास अनुभव कसा आहे ते कळवावे.

गानू आजींची अंगाई

'इत्यदि २०१० दिवाळी' मध्ये गुप्ते यांची 'गानू आजींची अंगाई' ही कथा वाचली होती...एक नंबर आहे! टेरिफिक...

रावसाहेब

आचवलांचे जास्वंद नि धों. विं. चे जी. ए. वरील पुस्तक दुर्मिळ नसावे असा तर्क आहे. मी नुकतेच धो. विं. चे पुस्तक साधना मिडीया सेंटर मधे पाहिल्याचे स्मरते (जेमतेम तीन आठवड्यापूर्वी). जास्वंद देखील रसिकमधे पाहिले होते नुकतेच. नाहीच मिळाली तरी माझी वाचण्यासाठी नेऊ शकता.

या निमित्ताने मलाही लाख् प्रयत्नांनंतरही न सापडलेली पुस्तके नि एक लेख आठवला.
जी.ए. एक पोर्ट्रेट - सुभाष अवचट
जी.ए. नावाचे स्वप्न - अप्पा परचुरे

आणखी 'शरदबाबूंच्या स्त्रिया' या शीर्षकाचा एक लेख शोधतो आहे. दुर्दैवाने लेखक कोण हे ठाऊक नाही. संदर्भ कुठे वाचला ते ठाऊक नाही (नजरेसमोर ते पान नि त्या पानावर चौथ्या ओळीत ते शीर्षक असे नजरेसमोर आहे पण पुस्तकाचे नाव आठवत नाही. गंमत आहे.) लेखाचा लेखक शांताबाई, आचवल यांच्यापैकी एक असावा असा ढोबळ अंदाज आहे.

द्या टाळी!

'जास्वंद' मिळाले. धों.वि. मला वाचायला द्या आणि अवचट व परचुरे माझ्याकडून न्या. जमले! हे लवकरच करु.
चला, या लेखाचे सार्थक झाले म्हणायचे!
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

मंटो

मंटोच्या समग्र कथांच्या मराठी अनुवादाच्या पुस्तकातही मी बरेच दिवस आहे. ते पुस्तकही आजवर माझ्या नशीबी आलेले नाही.
: सन्जोप, मंटोचा मराठी अनुवाद वाईट आहे. त्यात सगळी धग, नजाकत गायब होऊन जाते. शक्य तर मुळातूनच वाचा. देवनागरीत समग्र मंटोचा पूर्ण मोठा खंड उपलब्ध आहे. हार्डबाउंड व पेपरबॅक आवृत्ती दोन्हीही आहे. ( असाच समग्र अमृता प्रितम देखील आहे. रॉयल साइज आणि सात कादंबर्‍या / कथा / कविता इत्यादी सगळे एकत्र. म्हणजे पाहूनच वेड लागायची पाळी.)
हिंदी / उर्दू पुस्तकांच्या वाचनात कुणाला रस असेल, तर काही चांगल्या पुस्तक योजना आहेत. त्यांची माहिती देईन.

१०० रु.त १० पुस्तके

या दहा पुस्तकांच्या संचाची किंमत केवळ १०० रु. आहे. टपालखर्च निराळा. बोधी प्रकाशनाने नुकतेच अजून काही प्रकाशित केल्याचे ऐकलेय. तेही कळवते. ही सर्व पुस्तकं केवळ "उत्तम" आहेत. प्रकाशक स्वतः एक "सर्कीट" लेखक आहेत. आणि इतर प्रस्थापित लेखकांनी त्यांना १० रु.त पुस्तक विकण्याच्या कल्पनेला पाठबळ देऊन आपली पुस्तकं दिली, हे थोरच आहे निव्वळ. मला चंद्रकांत देवताले यांनी कळवले होते आणि आधी मी जरा कंटाळा केला की कुठे पोस्टात जाऊन मनिऑर्डर करायची?! पण केली. पुस्तकं हाती आली. आणि चकित झाले. असे उपक्रम वाचकांसाठी केले जातात. त्यामुळे वाचक म्हणून आपली जबाबदारी वाढते की आपण जास्तीत जास्त संख्येने पुस्तकं खरेदी करावीत.

1. जहां एक उजाले की रेखा खिंची है : नंद चतुर्वेदी
२. भीगे डैनों वाला गरूण : विजेंद्र
३. आकाश की जात बता भइया : चंद्रकान्त देवताले
४. प्रपंच-सार-सुबोधनी : हेमंत शेष
५. कुछ इधर की - कुछ उधर की : हेतु भारद्वाज
६. जब समय दोहरा रहा हो इतिहास : नासिरा शर्मा
७. तारीख की खंजडी : सत्यनारायण
८. आठ कहानियां : महीप सिंह
९. गुडनाईट इंडिया : प्रमोदकुमार शर्मा
१०. घग्घर नदी के टापू : सुरेंद्र सुंदरम्

बोधी प्रकाशन, जयपुर
एफ-७७, सेक्टर ९, रोड नं. ११, करतारपुरा इंडस्ट्रीयल एरिया, बाईस गोदाम, जयपुर ३०२००६
फोन : ०१४१-२५०३९८९ / ९८२९०१८०८७

उपयुक्त

फारच उपयुक्त माहिती. धन्यवाद. असे आणखीही उपक्रम असतील तर कळवा.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

कुरुंदकरांचा "मागोवा" संग्रह

साधारण वीस वर्षे नरहर कुरुंदकरांचा "मागोवा" लेखसंग्रह शोधत होतो. गेल्या महिन्यात तो हाती लागला.

हा संग्रह शालेय वयात वाचला होता, आणि संग्रहाचे नाव लक्षात राहिले नव्हते. त्यामुळे गेली कित्येक वर्षे मी अप्पा बळवंत चौकात जाऊन दुकानदारांना विचारत असे : "नरहर कुरुंदकरांचे पुस्तक आहे... त्यात हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताबाबत लेख आहे..." अर्थातच माझे वर्णन अपुरे होते. दुकानदार नरहर कुरुंदकरांचे हाती सापडेल ते एखादे पुस्तक दाखवत. याचा एक फायदा म्हणजे कुरुंदकरांची अन्य पुस्तके विकत घेऊन वाचली.

पण मागच्या महिन्यात "मागोवा" पुस्तक सापडले, याचा खूप आनंद वाटतो आहे.

वा.

वा..पण नक्की कुठे सापडले हे सांगू शकाल काय? अप्पा बळवंत चौकातच(एखाद्या दूकानातच) सापडले काय?

साधना ग्रंथ प्रदर्शन/दुकान; शनिवार पेठ

साधना ग्रंथ प्रदर्शन/दुकान (शनिवार पेठ पोलिस चौकीजवळ) मिळाले. (धन्यवाद, मुक्तसुनीत.)
तिथे काही बहुप्रसव लेखकांची पुस्तके लेखकाच्या नावाखाली गठ्ठ्याने ठेवली होती. (नाहीतर पुस्तके विषयानुसार प्रदर्शित केलेली आहेत.)

देशमुख आणि कंपनी

कुरुंदकरांच्याच भजन, शिवरात्र ह्या दोन पुस्तकांसाठी मी ब-याच ठिकाणी पायपीट केली होती. पूर्वी ही पुस्तके इंद्रायणी साहित्य प्रकाशनाने बाजारात आणली होती, मात्र काही वर्षांपूर्वी. साधारण एक-दीड वर्षांपूर्वी मात्र योगायोगाने दोन्ही पुस्तके मला मिळाली. झालं असं, बालगंधर्व पुलाजवळून जात असताना इंद्रायणी साहित्यच्या कार्यालयाची पाटी मला दिसली. सहज म्हणून चक्कर टाकली आणि विशेष म्हणजे कुठल्याश्या संमेलनासाठी की प्रदर्शनासाठी म्हणून पाठवलेली आणि पुन्हा परत आलेली अशी ही शेवटची दोन पुस्तके त्यांच्याकडे शिल्लक होती !! खूप आनंद झाला होता तेव्हा !!!

बाकी कुरुंदकरांची सध्या उपलब्ध असलेली बहुतेक पुस्तके (धार आणि काठ, जागर, आकलन, थेंब अत्तराचे, मागोवा, रुपवेध, रंगशाळा इ. ) देशमुख आणि कंपनी प्रकाशनाची आहेत. न्यु इंग्लिश स्कूल, टिळक रोड समोरच त्यांचे कार्यालय आहे. कुठे नाही मिळाली तरी इथे नक्कीच मिळतील ही पुस्तके. :-)

देशमुख आणि कंपनी
दूरध्वनी क्रमांक - ०२० २४४७६८४१

कुरुंदकरांचे शिवरात्र आणि भजन नुकतीच पुन्हा बाजारात आली आहेत. भजन बहुतेक श्रीविद्या प्रकाशनाने, तर् शिवरात्र बहुतेक कॉन्टीनेंटल किंवा देशमुख कंपनी नेच बाजारात आणले आहे. :-)

अनेक धन्यवाद

@धनंजय + दीपक - अनेक धन्यवाद. वा!

सारीपाट---वसुधा वाघ

उपरोल्लेखित पुस्तक सध्या "आउट ऑफ प्रिंट" आहे असे ऐकतोय.
"उपक्रमीं"पैकी कुणाकडे हे मिळेल का?
................................................कृष्णकुमार जोशी

रक्तरेखा

रक्तरेखा हे पुस्तक कुठे मिळेल ?

 
^ वर