मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२

राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने 'मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२' आयोजित करण्यात येत आहे. त्यासंबंधीचे संस्थेचे निवेदन इथे दिले आहे.

--------------------------------------------------------------
संगणकावर मराठीतून माहितीचा देवाणघेवाण करण्याचे प्रमाण वाढले आहे. शासनातील विविध विभागांकडे असणारी माहिती लोकांना सहज उपलब्ध व्हावी ह्यासाठी प्रयत्न होत आहेत. कला, क्रीडा, संस्कृती, विज्ञान, अर्थव्यवहार अशा विविध विषयांवरील माहिती आज मराठीतून संगणकावर उपलब्ध होऊ लागली आहे. ह्या व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने राज्य मराठी विकास संस्थेने ह्यापूर्वी २००६ आणि २०१० ह्या वर्षात मराठी संकेतस्थळांची स्पर्धा आयोजित केली होती. ह्या स्पर्धांना उत्तम प्रतिसादही लाभला होता. म्हणून ह्या वर्षीही सीडॅक, मुंबई ह्यांच्या सहकार्याने राज्य मराठी विकास संस्था ‘मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२ ’ ही स्पर्धा आयोजित करत आहे. ही स्पर्धा यंदा तीन गटांत घेण्यात येईल.
१.शासकीय संकेतस्थळे
२. अशासकीय संकेतस्थळे

अ. मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या ह्यांची संकेतस्थळे

आ. इतर संकेतस्थळे
ह्या स्पर्धेतील पुरस्कार पुढीलप्रमाणे देण्यात येतील.
पहिल्या शासकीय संकेतस्थळे ह्या गटासाठी पहिले, दुसरे,तिसरे, असे अनुक्रमे १५,०००, १०,००० आणि ५,००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील. दुसऱ्या अशासकीय संकेतस्थळे ह्या गटातील अ. मराठी वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या ह्या विभागाला पहिले, दुसरे, तिसरे असे अनुक्रमे १५,०००,१०,००० आणि ५,००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील. तर आ. इतर संकेतस्थळे ह्या विभागाला पहिले, दुसरे, तिसरे असे अनुक्रमे ३५,०००, २०,००० आणि १५,००० रुपयांचे पुरस्कार देण्यात येतील.
दि. ०९/०१/२०१२ पासून दि. ३१/०१/२०१२ पर्यंत http://www.rmvs.maharashtra.gov.in ह्या राज्य मराठी विकास संस्थेच्या संकेतस्थळावर तसेच http://www.cdacmumbai.in ह्या सीडॅक, मुंबई ह्यांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेशपत्रिका उपलब्ध करून देण्यात येईल.
वरील कालावधीत स्पर्धकांनी ऑनलाइन प्रवेशपत्रिका संपूर्ण भरून स्पर्धेतील सहभाग नोंदवायचा आहे.
संकेतस्थळासाठी वापरलेली प्रमाणके (स्टॅण्डडर्स), वापरलेला टंक (फॉण्ट), संकेतस्थळाची तांत्रिक गुणवत्ता, वापरासंबंधी पुरवलेल्या सोयी, उपयुक्तता, अद्ययावतपणा, वापरकर्त्यांना सहभागाची सोय (इण्टर अ‍ॅक्टिव्हनेस), माहितीची मांडणी, भाषेचा दर्जा, माहितीचा संग्रह इत्यादी निकषांवरून तज्ज्ञ परीक्षकांकडून सहभागी संकेतस्थळांचे परीक्षण करण्यात येईल.
शासनाचे विविध विभाग तसेच विविध विषयांवर संकेतस्थळे निर्माण करणाऱ्या व्यक्ती, संस्था इत्यादींनी ह्या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे असे आवाहन राज्य मराठी विकास संस्थेने केले आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

अरे वा!

अरे वा! सर्व मराठी संस्थळांना (व त्यांच्या मालकांना) शुभेच्छा! गेल्या स्पर्धेत उपक्रमला पारितोषिक होते असे आठवते. तो लौकिक टिकावा ही सदिच्छा!

बातमीबद्दल सुशांतचे आभार!

ऋषिकेश
------------------
'नाविन्य' हे एकाच व्यक्तीने वेगवेगळ्या आयडीने लिहुन कसे बरे तयार व्हावे?
नुसते नावात गोड पदार्थ घालुन तसे लिहिता थोडेच येते?

धन्यवाद

हि माहिती दिल्याबद्द्ल अनेक आभार. अशा पध्दतीच्या उपक्रमांमुळे किमान मराठी संकेतस्थळांना भेट देण्याचे प्रमाण तरी वाढेल.

स्तुत्य उपक्रम!!

 
^ वर