उपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.
मराठी नाटकांची दयनीय अवस्था
कोब्या
December 22, 2011 - 4:18 pm
अतिशय समृद्ध परंपरा असणार्या मराठी नाटक संस्थेला २१व्या शतकात अशी अवकळा का आली आहे?
सत्तरीच्या दशकात निर्माण झालेली सशक्त नाट्य चळवळ; तेंडुलकर, एलकुंचवार, दळवी असे सशक्त नाट्यलेखन; आता दुर्मिळच नव्हे तर बंद होण्याचे काय कारण असावे? लागू, पाटेकर, अमरापुरकर, फुले वगैरे दिग्गजांची मांदियाळी असणारा मराठी रंगमंच आता पाहवत नाही. जाऊ बाई जोरात, सही रे सही, लोच्या झाला रे असल्या गल्लाभरू नाटकांनी पार विचका केला आहे. थेटरात जाऊन पहावे असे एकही नाटक सध्या येत नाही.
दुवे:
Comments
चर्चा प्रस्तावांची दयनीय अवस्था
'चर्चा प्रस्तावांची दयनीय अवस्था' असं वरील प्रस्तावाचं विडंबन करावं असं मनात आलं होतं, पण विचार सोडून दिला. पण उपक्रमावर अनेक लोक उत्कृष्ट, अभ्यासपूर्ण चर्चाप्रस्ताव टाकतात. त्या तुलनेने हा चर्चाप्रस्ताव म्हणजे 'मी एक मताची पिंक टाकलेली आहे, तिच्याभोवती तुम्ही डिझाइन काढून मोठ्ठं चित्र काढा चला' या स्वरूपाचा वाटतो.
प्रस्तावकांनी अधिक कष्ट घेऊन मांडणी करावी ही विनंती.
राजेश
द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी
लाइक
+१
उपक्रमावर प्रतिसाद लाइक करायचे बटण पाहिजे होते.
(अवांतरःगूगल प्लस ने +१ ची कल्पना उपक्रमावरून ढापली काय?)
||वाछितो विजयी होईबा||
तुमचा काय प्रॉब्लेम आहे?
तुम्हाला चर्चेत सहभागी व्हायचे नसेल तर हे असले ट्रोलिंग कशाला?
काही अनावश्यक मजकूर संपादित. व्यक्तिगत स्वरूपाच्या संवादाकरता खरडवही किंवा व्यनिसुविधेचा वापर करावा.
विडंबन आवरा...
चर्चाप्रस्ताव मोठा हवा याच्याशी सहमती पण त्याचे विडंबन कशाला?
नाटकांचे भलेबुरे दिवस येतजात असतात. आता बुरे दिवस चालले असतील तर पुन्हा कधीतरी भले दिवस येतील. मराठी साहित्यिकांत कुठे नवे तेंडुलकर, दळवी जन्माला आल्येत्?
अनावश्यक मजकूर संपादित.
सहमत आणि...
घासकडवींच्या मताशी सहमत आहे, तरीही...
'मागणी तसा पुरवठा' हा मी पूर्वी मांडलेला मुद्दा अधोरेखित करतो. विचारप्रवर्तक, पुरोगामी नाटकांच्या तुलनेत चटपटीत, चुरचुरीत आणि चार घटका करमणूक करणारे कलाविष्कार हे कायमच लोकप्रिय राहिलेले आहेत. त्यामुळे 'मराठी नाटकांना आज अचानक अवकळा प्राप्त झाली आहे' असे मानण्याचे काही कारण नाही. नवीन नाटक लिहिताना बहुसंख्य लेखक आणि बसवताना निर्माता-दिग्दर्शक यांच्या मनात 'नाटक चालले पाहिजे' हा विचार असतोच. आज फक्त तोच विचार त्यांच्या मनात आहे, असलेला दिसतो आहे इतकेच. बदलले आहे ते इतकेच. तोंडवळकर, लागू यांनी 'आर्थिक नुकसान झाले तरी चालेल, पण काहीतरी अस्सल प्रेक्षकांना देऊ' या भावनेने नाटकांची निर्मिती केली, आज तो विचार हरवत चाललेला दिसतो आहे. पण हे सामान्यीकरण, ही घसरण कोणत्या क्षेत्रात नाही? साहित्य, संगीत, कला... सगळीकडेच काही ना काही स्वरुपात / प्रमाणात हे अधःपतन झालेले दिसते. गद्य लेखन घ्या, कविता घ्या, चित्रपट तर सगळ्यात आधी घ्या.प्रशांत दामलेसारखा ताकदवान अभिनेता वर्षानुवर्षे फक्त एकसुरी, बेर्डट रसिकानुनय करणार्या भूमिका करत राहातो ('सासू माझी ढांसू' हे त्याचे नवीन नाटक!) हे का होत असावे?
नाटक बघणारा आजचा मराठी प्रेक्षक हा मुख्यतः मध्यमवयीन आहे.त्याचे मन कालच्या नाटकात अडकले आहे. त्यामुळे 'जुने ते सोने' म्हणून तो पुनरुजीवित होणार्या जुन्या नाटकांना गर्दी करतो - जर नाट्यसंच जुना असेल तर! एरवी अत्यंत स्वस्तात घरबसल्या बघता येणार्या सुमारातिसुमार मालिका त्याच्या मनोरंजनाची भूक भागवायला पुरेशा आहेत. पंचविशीच्या आतल्या मराठी तरुण-तरुणींचे नाट्यप्रेम हे फक्त विविध करंडकांमध्ये एकांकिका सादर करण्याची 'धमाल' करण्यापर्यंतच आहे. त्यामुळे जे होते आहे त्यात नवल करण्यासारखे काही आहे असे मला वाटत नाही. नवीन, तरुण नाट्यकर्मींमध्येही प्रतिभावान,प्रयोगशील लोक आहेत, नाही असे नाही. पण एकंदरीत 'कला' हे क्षेत्र असे रोडावत जाणार असेच दिसते. आणखी पन्नास वर्षांनी महाराष्ट्रात 'नाटक' हा प्रकार आज आहे त्या स्वरुपात जिवंत असेल का? माझ्या मते नाही.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा
चांगला प्रतिसाद
विस्तृत प्रतिसाद आवडला.
मला प्रस्तावातच निबंध लिहायला आवडत नाही. जे काही मनात आले ते थोडक्यात मांडले आहे. त्यावर प्रतिसाद-उपप्रतिसादातुन रंग चढावेत अशी अपेक्षा आहे. इथे चर्चा टाकण्यासाठी विशिष्ठ ओळी किमान पाडायलाच हव्यात असा काही नियम नाही. तुम्हाला घासकडवींच्या ट्रोलिंग प्रतिसादाला सहमत का व्हावेसे वाटले समजले नाही.
फुटकळ विचार
१. ज्यांनी नाटकात काम करायचे ते दूरदर्शनच्या पंचवीस वाहिन्यांवरील प्रत्येकी ५-१० मालिकांमध्ये कामे करीत आहेत. रोज एवढ्या मालिकांचा मारा होत असल्याने प्रेक्षकांनाही नाटक पहायचे नसावे.
२. पूर्वीसुद्धा नाटके खूप चालायची असे नव्हते.
३. बदललेली अर्थव्यवस्था हेही एक कारण असावे.
अ. जुन्या व्यवस्थेत अनेक नाट्य अभिनेते बँका, एलआयसी, महापालिका वगैरे संस्थांमध्ये किंवा खाजगी कंपन्यांतूनही नोकर्या करत. त्यांना नावाला नोकर्या करून बहुतांश वेळ नाटके आणि त्यांच्या तालमींमध्ये घालवण्याची मुभा दिली जात असे. बदललेल्या व्यवस्थेत या प्रकारची मुभा दिली जात नसणार कारण यांनी नाटकात काम करण्याचा त्या संस्थेस काहीही फायदा होत नाही. (जेथे कंपन्या नाट्यस्पर्धेत भाग घेतात तेथे तेवढ्यापुरती अशी मुभा दिली जात असेल).
ब. जेव्हा प्रश्नमूलक नाटके येत होती तेव्हाही त्या नाटकांचा खरा प्रेक्षकवर्ग हा उच्चभ्रू मध्यमवर्ग होता. कनिष्ठवर्ग अशा नाटकांना येत नसे. नव्या अर्थव्यवस्थेत या उच्चभ्रू वर्गाने सामाजिक प्रश्नांचा विचार करण्याकडे काहीशी पाठच फिरवली आहे. (कदाचित व्यवस्थेतले प्रश्न सुटणार नाहीत आणि व्यवस्थेने लाभ करून दिला असल्याने व्यवस्था तर बदलायची इच्छा नाही) त्यामुळे तेंडुलकर, जयवंत दळवी, निळू फुले यांच्या नाटकांना प्रेक्षक वर्ग येणार नाहीच. म्हणून ज्या नाटकांना प्रेक्षकवर्ग हमखास येईल असे वाटण्यासारखी (पक्षी-विनोदी) नाटकेच रंगमंचावर आणण्यात निर्मात्यांना रस असणार हे उघड आहे.
४. (खरेतर हे पूर्वीही असायला हवे होते पण नव्हते). ग्राहक पैसे देऊन नाटक पाहण्यास येतो तेव्हा त्याला चांगलाच नाट्यानुभव मिळायला हवा हे अध्याहृत आहे. नाटक किंवा कन्सर्ट सारख्या लाईव्ह कार्यक्रमांत एखाद्या दिवशी प्रयोग रंगला नाही अशी शक्यता असते. आजचा ग्राहक कदाचित ही रिस्क घ्यायला तयार नसावा.
नितिन थत्ते
फुटकळ विचारांशी सहमत ;-)
थत्ते यांच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
जे पूर्वी होते त्याचे स्वरूप सतत बदलत असते. या नियमाला नाटकांनी तरी अपवाद म्हणून कसे राहावे? संगीत नाटकांचा जमाना मागे पडला. तीन अंकी नाटकांचा एकंदर खर्च, डोलारा, दौरे, वेळापत्रक लक्षात घेता मोजक्या प्रमाणात प्रयोग होतात. त्यामानाने सिरिअल्सच्या माध्यमातून कलाकार चटकन आणि सहज घराघरांत पोहोचतात. शिवाय नियमित उत्पन्न, दौर्यांची फारशी गरज नसल्याने कौटुंबिक गरजा पुरवणे इ. इ. अनेक गोष्टी पथ्यावर पडणार्या आहेत.
नाटकांचा आपापला वर्ग असतो. तिकिटे महाग असतात. दर आठवड्याला जाऊन नाटक पाहणे हे बर्याच प्रेक्षकांना परवडण्यासारखे नसते. नाटक बघण्यासाठी प्रवास करून अर्धा-एक दिवस खर्ची टाकावा लागतो. अशी अनेक गणिते नाटकांना पोषक नाहीत.
परंतु म्हणून नाटक ही कला मरेल असे वाटत नाही. तिचे स्वरूप बदलेल हे नक्की.
+
>>परंतु म्हणून नाटक ही कला मरेल असे वाटत नाही. तिचे स्वरूप बदलेल हे नक्की.
नाटकांचे बदललेले स्वरूप म्हणजेच दूरदर्शन मालिका असाव्यात का? पूर्वी दूरदर्शनवर हमलोग नावाची मालिका होती तिचा उल्लेख दूरदर्शनच्या कार्यक्रम पत्रिकेत "धारावाहिक नाटक-हमलोग" असाच असे.
नितिन थत्ते
सिरिअल = नाटक (?)
कदाचित असे म्हणता यावे. सिरिअल्सना नाटकाप्रमाणे एक मुख्य सेट असतो. जुन्या मालिका तर नाटकांप्रमाणे एकाच सेटवर होत. कालांतराने त्यातही फरक पडला. :-) म्हणजे या माध्यमातही बदल येत आहे. आजही सिरिअल्स बघताना जाणवते की पात्रांचे मेक-अप, कपडे, अभिनय हा बर्यापैकी नाटकी असतो. (लाउड असतो) झोपायला गेलेली, झोपलेली, झोपेतून उठणारी सिरिअल्समधली माणसं संपूर्ण साजशृंगारासकट असतात यावरून सिरिअल्सचे सिनेमाप्रमाणे एडिटींग वगैरे होत नसावे असे वाटते. उलट, नाटकाप्रमाणे एकानंतर एक प्रसंग सादर केले जात असावे. अर्थात, या मालिका इतक्या रुजल्या आहेत की त्यांतही सातत्याने बदल येत आहे.
सहमत
सर्व मुद्दे पटले.
हे कारण सगळ्यात जास्त पटणारे वाटते.
नाटक? ढोलताशे चं प्र
नाटकाचं काय घेउन बसलात? नाटकाने सुरुवातीला प्रवेश करत एक् मोठा वर्ग(मुख्यतः अभिजन) आपल्यामागे नेला.
जेव्हा नाटके तथाकथित सुवर्णकाळात होती तेव्हा हळूहळू वासुदेव,भारूड,भजन व कीर्तन हे अस्सल लोककलाप्रकार मागे पडत गेले.
(आता तर इतके विस्मृतीत जाउ लागले आहेत की कित्येकांना भजन् व किर्तनात फरक असतो का हे ही ठाउक् नाही व असलाच तर तो काय ह्याचा अजिबात पत्ता नाही.)
तर सिनेप्रकार लोकप्रिय होताना नाटके मागे सारली गेली.
वाढत्या शहरीकरणासोबत कसेबसे का असेना, रूप पालटून का असेना नाटके राहतीलच.
पण काळाचा प्रभाव त्यावर राहणार,सापेक्ष दर्जा किंवा धाटणी बदलत राहणारच.
paradigm shift हे सगळ्याच गोष्टीत असणार आहे.
बाकी राजेश ह्यांच्याशी सहमत.
अवांतर :- अशात तुम्ही कुठली नाटके पाहिलीत?
१.खुद्द लागूंनी प्रचंड तारिफ केलेलं , मराठिच्या मानानं वेगळ्या धाटणीवरचं "माकडाच्या हाती शॅम्पेन" पाहिलत?
२.काही वर्षापूर्वी आलेले "कळा ह्या लागल्या जीवा " व "चाहूल" बद्दल ऐकलय? नक्की चैन कुठे संपते, गरज् कुठून् सुरु होते ह्याबद्दल
डोक्याचा भुंगा करणारी ही नाटके नाण्याच्या बरोब्बर विरुद्ध बाजू मांडतात. नैतिक मूल्ये, त्यांची कालसुसंगतता ह्याबद्दल बोलतात.
३. "साठेचं काय करायचं" हे mediocre व्यक्तीची बोच दाखवणारं सादरिकरण पाहिलत?
४.गिरीश जोशी,मुक्ता बर्वे ह्यांनी काम् केलेल्या "फ़ायनल ड्राफ़्ट " बद्दल् आपलं काय मत आहे?
५.हल्लीचं "काटकोन् त्रिकोण " पण बरं आहे म्हणतात.
असो. आयटी हमालाच्या भूमिकेत पुन्हा शिरून् माझ्या कामास्तव गमन करत आहे.
लखू रिसबूड बनू लागलेला
--मनोबा
अशात तुम्ही कुठली नाटके पाहिलीत?
अवांतरात आलेले प्रश्न अवांतर अजिबात नाहीत. तेंडुलकरांची नाटकं प्रथम मंचित झाली तेव्हा कानेटकर आणि कोल्हटकरांच्या नाटकांना प्रेक्षकांची गर्दी होती. सचिन कुंडलकर, इरावती कर्णिक, मनस्विनी लता रवींद्र, धर्मकिर्ती सुमंत, गिरीश जोशी, विवेक बेळे असे सध्याचे रंगकर्मी जी नाटकं करतात ती मूळ चर्चाप्रस्तावातल्या सध्याच्या नाटकांच्या यादीपेक्षा अधिक गंभीर असतात; ती समीप रंगमंचावर सादर केली जातात; त्यांना गर्दी करणारा प्रेक्षकवर्ग आहे; त्यात तरुण मुलांचं प्रमाण लक्षणीय आहे. त्या नाटकांची दखल न घेता मराठी रंगभूमीच्या सद्यस्थितीविषयी अरण्यरुदन करता येणार नाही असं म्हणेन.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
समीप रंगमंच
समीप रंगमंच ही काय भानगड आहे? म्हणजेच प्रायोगिक रंगभूमी का? मी पेपरमधे आलेल्या जाहिराती वाचुन नाटक पाहायला जातो त्यात तुम्ही वर दिलेले एकही नाव दिसत नाही. पण तुमच्या प्रतिसादाने उत्सुकता वाटत आहे. ही नाटके कुठे पाहयला मिळतील? त्यांचे प्रयोग कधी होतात ह्याची माहिती कुठे मिळते? मुंबईबाहेरच्या लोकांनाही मुंबईत न येता पाहायला मिळू शकतील का? इ. कृपया मार्गदर्शन करावे.
थोडेफार
थोडेफारच सांगु शकतो.
१."माकडाच्या हाती शॅम्पेन" सादरकर्त्या चमूचे नाव नक्की ठाउक् नाही. बहुतेक आनन्द इंगळे, संदेश कुलकर्णी, संदेश जाधव, शर्वाणी पिल्लेने अशी टीम् होती. माझ्या ऐकण्यात् नाव पेप्राच्या समीक्षणातूनच आले होते. यशवंतराव चव्हाण् व् बालगंधर्व मध्ये तेव्हा दोनेक् वर्षाखाली बरेच प्रयोग् झाले. दोनेक् महिन्याखालीही एकदा बोर्ड् दिसला, पण् पहाण्यचा योग ह्यावेळेस नव्हता.
२."कळा ह्या लागल्या जीवा " वीकांताला उगीचच जाउन् स पे मधील भरत नाट्य मंदीरावर चक्कर टाकायची सवय् आहे.
पुरुषोत्तम् करंडक ते व्यावसायिक रंगभूमी असा प्रवास केलेल्या ह्या नाटकाला पाचेक वर्षापूर्वी एका हौशी ग्रुपने तिथे सादर केले होते कुठल्यातरी समाजकार्य देणगी वगैरे साठी.तेव्हा पाहिले.
पुण्यामध्ये भरत् नाट्य मंदिरात् असे सततचे उद्योगी उचापती बरेच भेटतात्. मुंबैत बहुदा छबिलदासला प्रायोगिक व प्रायोगिकतेकडून् व्यावसायिकला शिरु पाह्णारे असे भेटावेत.
चाहूल पाहिले नाही. त्याबद्दल् ऐकून् आहे.
३. "साठेचं काय करायचं"
४."फ़ायनल ड्राफ़्ट "
दोन्ही वरीलप्रमाणेच.
५."काटकोन् त्रिकोण "
सध्या बरेच प्रयोग इकडे पुण्यात् सुरु आहेत. यशवंतराव व बालगंधर्वला बोर्ड् दिसतात अजून् जाणे झाले नाही.
चांगले असे काही मिळाले नाही, तर् मी फार काही अभिजात किम्वा सशक्त् असे मिळावे ही अपेक्षा कमी करतो आणि निव्वळ मनोरंजन् व निर्मितीमूल्ये म्हणून प्रशांत दामले वगैरेंची हाताला लागतील् ती पाहतो. मग ते "चार दिवस प्रेमाचे" असू देत्, "गेला माधव्" असू देत् किंवा "एका लग्नाची गोष्ट्". साध्याश्याच, predictable कथानकेही चांगली निर्मितीमूल्ये व शुसशुशीतपणा ह्यामुळे बांधून ठेवतात. विशेषतः "एका लग्नाची गोष्ट". ह्या सर्वाची चव काहिशी बामणी, अळणी आहे हे मान्य्. पण् साधे वरण भात तूपाचा सात्विक् आनंदही वर्ज्य नसावा.
(पु लं चे वार्यावरची वरातही मला आवडते. त्यात काही फार सशक्त साहित्यिक मूल्ये किंवा आशयघन् असे काही वाटले नाही, तरीही पाहतो, निव्वळ् वेळ् चांगला जावा म्हणून. )
ह्याहूनही अधिक अशी प्रचंड माहिती त्या क्षेत्रात मुशाफिरी करणारे किंवा लक्ष ठेउन असणारे मिपाकर भडकमकर् मास्तर देउ शकतील असे त्यांच्या मार्मिक व अभ्यस्त लिखाणावरून् वाटते.
--मनोबा
प्रतिसाद
माहिती बद्दल आभारी आहे पण माझा प्रतिसाद तुम्हाला उद्देशुन नाही, तो चिंज ह्यांना दिलेला उपप्रतिसाद आहे. तुम्हाला दिलेला प्रतिसाद खाली पाहावा.
नाही पाहिले
बर्याच दिवसात एकही नाटक पाहिलेले नाही. नाटक पाहावे म्हणून पेपरात जाहिराती बघत असताना एकही बघण्याजोगे नाटक सापडेना. त्या वैतागातुनच हा प्रस्ताव मांडला. तुम्ही दिलेली नावे टीपुन घेतली आहेत, पाहायला मिळाली तर जरूर बघेन.
समीप रंगमंच
समीप रंगमंच (किंवा इन्टिमेट थिएटर) यामध्ये रंगमंच आणि प्रेक्षक यांत कमी अंतर असणे अभिप्रेत असते. त्यामध्ये मंचीय अवकाश बर्याचदा संकुचित असतो आणि प्रेक्षकसंख्यादेखील कमी असते. त्यामुळे नाटकाचा खर्च आणि उत्पन्न कमी होतात. हौशी नाट्यकर्मींना त्यामुळे हे माध्यम सोयीचे जाते. याचे परिचित मराठी उदाहरण म्हणजे मुंबईत छबिलदास शाळेत पूर्वी होणारे नाट्यप्रयोग. पुण्यात शनिवार पेठेतला सुदर्शन रंगमंच सध्या यात गणला जाईल. वर दिलेल्या सर्वांची नाटके मी वर्तमानपत्रातल्या जाहिराती वाचूनच पाहिलेली आहेत. मन यांच्या वरच्या प्रतिसादात उल्लेखलेली 'फायनल ड्राफ्ट्', 'माकडाच्या हाती शॅम्पेन' (मूळ नाव 'मारुती आणि शॅम्पेन') आणि 'काटकोन त्रिकोण' ही तिन्ही नाटके मुळात समीप रंगमंचावर सादर झाली होती. चांगला प्रेक्षकवर्ग लाभू लागल्यावर ती नाटके (जवळपास त्याच संचात) मोठ्या रंगभूमीवर सादर होऊ लागली. त्यांतले अनेक नट मराठी चित्रपट/मालिकांच्या प्रेक्षकांनाही सुपरिचित आहेत - उदा: आनंद इंगळे, मुक्ता बर्वे, मोहन आगाशे.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
आभारी आहे
इथुन पुढे ह्या नाटकांच्या जाहिरातींवर लक्ष ठेवेन. समीप रंगमंच कल्पना छान वाटत आहे.
अश्य प्रतिसादांसाठीच हा धागा काढला होता.
मजकूर संपादित.
प्रतिसाद संपादित
शेजारच्या धाग्यावर(http://mr.upakram.org/node/3592) माझाही प्रतिसाद विनाकारण उडालेला दिसतोय. कुणालाही टार्गॅत् करणारा, विनाकारण् वैयक्तिक कुजकट रोख वगैरे नसणारा व ज्यात कुठेही स्कोर सेटलिंग वगैरे सुरू नसताना व ज्य्साठी मला बरेच टंकनश्रम घ्यावेअ लागले तोही प्रतिसाद उडालएला दिसल्याने वाइट वाटले.
इतके श्रम घेतल्यावर एखाद्याला माझा प्रतिसाद निरुपयोगी वाटूही शकेल व निरुपद्रवी वाटावा, शक्यतो उपयुक्त वाटावा ह्याची काळजी नियमित घेत असूनही श्रम फुकट गेल्याने संतापही आला
उपक्रमावर विषयांतर करणारे, इतर सदस्य चर्चा करत असताना त्या चर्चेत बाधा आणणारे प्रतिसाद संपादित केले जातात. या कारणास्तव या चर्चेतील काही प्रतिसाद संपादित केले आहेत. मन या सदस्याचा कोणताही प्रतिसाद उपक्रम संपादनाने संपादित केलेला नाही. परंतु मूळ विषयाशी संबंधित नसणार्या आणि मूळ चर्चेत बाधा आणणार्या प्रतिसादांवर यापुढे कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.
संपादन
तिथे तुमच प्रतिसाद मला अजूनही दिसत आहे. पहिलाच प्रतिसाद आहे ना? आणखी एखादा प्रतिसाद् दिला होता का? जर खरंच निरुपद्रवी प्रतिसाद उडला असेल तर रीतसर व्यवस्थापनाला कळवा पण इथे प्लीज डोन्ट फीड द ट्रोल्स! इथली चर्चा मराठी रंभभूमी ह्या विषयावर आहे उपक्रम संपादन ह्यावर नाही.
दयनीय नाहीये
बाकी ठिकाणचे माहित नाही पण पुण्यात नाटकांना बरेच पोषक वातावरण आहे. जुनी संगीत नाटके भरत नाट्य ने चांगल्या स्वरूपात आणली आहेत. मध्यंतरी 'वा गुरू' किंवा बर्व्यांचे हर्बेरियम होतेच की. शिवाय काटकोन त्रिकोण सारखे सर्वांसाठी विचारमंथन आहेच.
काही नाटके विनोदी असणारच की. त्यात सुध्दा दामले (सोबत रिमा) वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतायत. शिवाय, तरुण वर्गात पुरूषोत्तम करंडक ची धावपळ चालू आहे.
तुम्हाला चांगली उत्तम नाटके हवी असतील तर प्रायोगिक रंगभूमीच हवी. शनिवारात 'सुदर्शन' मध्ये येऊन बघा नाटक कसे असते ते !
नक्की पाहिन
इथले प्रतिसाद वाचुन माझेही मत बदलू लागले आहे. इथे शिफारस केलेली नाटके पाहण्याचा विचार करत आहे.
बेसमेन्ट थिएटर
समीप रंगमंचाच्या संकल्पनेवर आधारित "बेसमेन्ट थिएटर" ही कल्पना शिकागोत चालते. त्यांची काही नाटके मध्यंतरी पाहण्याचा योग आला होता. ही संस्था हौशी मंडळी चालवत असली आणि सध्या त्यांचे प्रयत्न लहान स्वरूपाचे असले तरी त्यांचा प्रयत्न स्तुत्य वाटतो.
काळमहिमा
चर्चा प्रस्तावक जेव्हा 'दयनीय' अवस्था म्हणतात त्यावेळी नाटकाविषयीची ही स्थिती आणि त्याची परिणामकता ही या विशाल राज्यातील मुंबई आणि पुणे या दोनच शहरांपुरती मर्यादित आहे हे लक्षात घेतले तर अन्य ३३ जिल्ह्यांना 'मराठी नाटक जगले की मेले' याची चिंता करण्याचे बिलकुल कारण नाही. 'नाटक' हा समाजप्रबोधनाचा एकेकाळी विषय असेलही पण कालानुरूप त्या व्याख्येत बदल होत गेले आणि अगदी परवापरवापर्यंत "दोन घटके अंमळ करमणूक रसिक मना" या चालीवरच त्यांची वाटचाल दिसत होती आणि मग दूरदर्शन अधिक शेकड्यांनी निर्माण होत गेलेल्या चॅनेल्सनी या करमणुकीचे मीटरच बदलून टाकल्यावर मग 'नाटक' या संकल्पनेचे प्रयोजन जवळपास शून्यावरच आल्याचे पाहणे [जरी प्रशांत दामले एकट्याच्या जीवावर प्रयोग खेचत असले तरी तेही आता थकत जाणारच] जर रसिकांना भाग पडत असले तर तो केवळ कालमहिमा आहे असे म्हणावे. त्यात दयनीयता येऊ शकत नाही.
भव्यदिव्य म्हटली गेलेली नाट्यपरंपरा फक्त दोनच गावातच घुटमळत राहिल्याने अधेमधे तोंडी लावणापुरते नाशिक, कोल्हापूर, सांगली अशा ठिकाणी एकदोन फेर्या झाल्या की संपली या कंपन्यांची नाट्यकला जिवंत ठेवण्याची परंपरा. परभणी, वाशिम, भंडारा, बीड, अकोला, गोंदिया अशी नावे तरी या नाट्यनिर्मात्यांच्या आरामगाड्यांच्या चाकांनी पाहिली असतील का ? मग या गावांतील लोकांना कसली पडली असेल काळजी मराठी नाट्यसंसाराची.
एकेकाळी नाटकांच्याबरोबरीनेच चित्रपट संगीताच्या जलशांचे पिक इथे उदंड झाले होते. बाबला, मेलडी मेकर्स्, म्युझिकल मेकर्स, मीनल सिंग, फाल्गुनी पाठक आदींनी त्या त्या हवेत हात धुवून् घेतले होते. जादुगार रघुवीर, भैरव आदीनीही. पण आता जसे हे करमणुकीचे सारे प्रकार टीव्ही/डिश/केबलमुळे इतिहासाच्या बासनात गेले आहेत तीच गत मराठी नाटकांची झाली आहे (किंवा होत आहे) असे म्हटले पाहिजे. चित्रपटनिर्मिती अपवाद ठरण्याचे कारण म्हणजे त्याच्या सादरीकरणात कालानुरुप बदल होते तर गेले आहेतच शिवाय टीव्हीची भूक भागविण्यासाठीही त्याची आवश्यकता आहेच.
नाटकाच्याबाबतीत हा विकल्प नसल्याने तो व्यवसाय दप्तरी जमा झाला तर आश्चर्य वाटायला नको. [श्रीकांत मोघे तरी आता दुसरे काय सांगणार आपल्या भाषणात ? तेच : "मराठी माणसाने नाटक जिवंत ठेवले पाहिजे. टीव्हीपासून दूर राहिले पाहिजे..." इ.इ. कोण ऐकणार ?]
अशोक पाटील
हम्म्...
'नाटक' हा समाजप्रबोधनाचा एकेकाळी विषय असेलही
अजूनही असावा. अभिजनात अजूनही सनाट्य् संकल्प्नेचा पगडा आहे. जिथून् बहुतांशी प्रशासकीय् अधिकारी येतात व समाज मनाच्या घडणीवर् थोडाफार का असेना पकड् ठेवून् असतात अशा वर्गात् नाट्यप्रेम् आजही आहे. माझ्या माहितीतील् असे प्रशासकिय नोकरदारांचे व उच्चपदस्थांचे परिवार नाटकाचा नियमित् प्रेक्षक् आहे.
दुसरे असे की स्वतः पंत् (प्रभाकर पणशीकर), मधुकर तोरडमल ही मंडळी वगावोगाव प्रयोग् करून् आल्याचे सांगतात. तसेच् पुढेही सुरू राहिल् ही आशा.
शास्त्रीय् संगीत् ऐकणार्यांचा वर्गही लोक संगीत व चित्रपट संगीत ऐकणार्यांच्या तुलनेत निव्वळ् आकड्यांचा विचार् केला तर खूप म्हणजे खूपच कमी आहे. म्हणून शास्त्रीय संगीत बंद पडले असे काही होत नाही. एका मर्यादित वर्गात(किंवा ऐकणार्यातील उच्चभ्रू, अभिजन ह्यांच्यात) ते टिकून् राहिलच.paradigm shift हा तुम्ही मांडलेला मुद्दा मीही मांडला आहे वरती, पण् त्याने मुख्यतःअ नाटक व्यवसायाच्या भरभराटीला मर्यादा येतात, नाटक् बंद् पडेल् असे नाही.
सर्वात् म्हत्वाचा मुद्दा असा की नाटक् ही खुद्द् अस्सल कलावंताची भूक् आहे. आपण केलेल्या कामाला समोर तिथल्या तिथे पावती मिळाल्याने जी किक् बसते त्यास तोड नाही असे कित्येक अभिनेते आवर्जून् सांगतात. चित्रपटातील काम् तुलनेने तित्के जिवंत् वाटत् नाही अशी त्यांची तक्रार् असते. लक्ष्मीकांत बेर्डेही हा उद्देश मनात ठेउन "सर आले धावून" म्हणत् रंगमंचावर उतरले होते. आजारपणामुळे मात्र पुढे सारेच बारगळले. त्यामुळेच आता स्टार बनलेले अभिनेते स्वतः रंगभूमी जिवंत ठेवतील ही आशा आहे.
तसेही आजच्या काळात रिऍलिटी शोज्, शारूख्-कत्रिनाचा लाइव्ह पर्फोर्मन्स वगैरे "जिवंत" पाहण्यासाठी पब्लिक पैसे मोजून् "शो"ज् बघायला येतच. तसेच ते थिएटरकडाही येइल हीही शक्यता.
--मनोबा
चळवळीविषयी प्रेम ?
"प्रशासकीय् अधिकारी येतात" ~ हो. मान्य, येत असत, तो इतिहास झाला. पण तो त्यांच्या सार्वजनिक जीवनातील पब्लिक रिलेशनचा एक भाग म्हणून. त्यात नाट्यचळवळीविषयी किती आपुलकी आणि फॅमिलीसह एकत्र जाण्याचे नाट्यथिएटर हे एक चांगले ठिकाण म्हणून जावे, हा किती महत्वाचा हेतू याचाही विचार होत असे. (किती जिल्हाधिकारी आपल्या फॅमिलीचे योग्य त्या दराचे तिकिट काढून नाटकाला येत असत? हा खरे तर संशोधनाचा भाग नाही, ते कायम निमंत्रितच. मग काय बिघडते जायाला ? आणि प्रत्येकवेळी जिल्हाधिकारीच थिएटरमध्ये असतील असेही नाही. त्यांच्या फुकटच्या पासावर 'ब' दर्जाचे भाऊसाहेब, रावसाहेब दिमाखात खुर्च्या अडवित.) तसे मग डॉक्टर्स, वकीलही पूर्वी अत्रे, शिरवाडकर, कानेटकर, मतकरी, दळवी यांच्या नाटकांना गर्दी करत असतच. त्यांच्या दिवसभराच्या दगदगीतून बाहेर पडण्यासाठी 'नाटक' हा एक कौटुंबिक रिलिफ होता. बरेच हौशी कलाकारदेखील या दोन व्यवसायातून निर्माण झालेले दिसत असतच. पण परत तोच मुद्दा ~ काळाच्या ओघात रिलिफची आणि हौसेची व्याख्या बदलत गेली आणि नाटक मग बॅक बेन्चवर गेले. एकेकाळी कॉलेजीसची वार्षिक गॅदरिंग्ज हा नाट्यकलेची शान वाढविणारा 'इव्हेन्ट्' असायचा. तोरडमल, परदेशी, मयेकर, एलकुंचवार, बर्वे आदी मंडळींनी या क्षेत्रात जे नाव कमाविले त्याची गंगोत्री त्यांच्या कॉलेजचे प्लॅटफॉर्म्स होते. पण पुढे शासनानेच अशा गॅदरिंग्जवर बंधने आणली जी विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी मानली आणि प्रथम निवडणुका व नंतर गॅदरिंग ह्या संकल्पना महाविद्यालयातून हद्दपार झाल्या. पुढच्या पिढीतील मुलांमुलींचेही नाट्यकलेपेक्षा टीव्हीच्या चमचमाटाकडे (साहजिकच) अधिक लक्ष गेल्याने त्यानाही आपल्या सांस्कृतिक जीवनाचे काही नुकसान झाल्याचे दिसले नाही, दिसत नाही. मुंबई आणि पुणे या दोनेक ठिकाणी तुरळक प्रमाणावर युवकात प्रायोगिक तत्वावर समजल्या जाणार्या चळवळीत धकधक चालल्याचे आढळते, पण त्यात भाग घेणार्या मिलिंदमुग्धेचे त्याच्या जोरावर कधी छोट्या आणि मोठ्या पडद्यावर जाईन अशीच भावना असते.
त्यामुळे इंग्लंड, अमेरिका येथील नाट्यकलेविषयीच्या शेकडो वर्षाच्या परंपरेची तार इथल्या परंपरेशी जोडून हाती काही येणार नाही.
"लमाण" मध्ये डॉ.श्रीराम लागू यानी स्पष्ट म्हटले आहे की, "रंगभूमीची खडतर तरीही रमणीय वाट मी पकडली ते काही केवळ स्वतःला आनंद मिळावा, समाधान मिळावे एवढ्याच माफक हेतूने नव्हे - तर रंगभूमी या माध्यमाचे, समाजाच्या सांस्कृतिक जीवनात जे महत्वाचे स्थान आहे आणि ज्या स्थानावरून् ती आज भ्रष्ट झालेली दिसते आहे - ते स्थान तिला सन्मानाने परत मिळवून द्यावे, म्हणून." ~ डॉक्टरांचे हे प्रकटन ते ज्या काळाशी संबंधित आहे, त्या काळात तर मराठी रंगभूमी बहरात होती, तरीही त्याना समाजाच्या सांस्कृतिक स्थानावरून ती भ्रष्ट झाल्याचे वाटत होते. मग त्याच नाट्यकलेचे समाज जीवनात काय स्थान उरले आहे, याचा अंतर्मुख होऊन विचार केल्यास आज या कलेला जी दयनीय अवस्था प्राप्त झाली आहे, तिचे उत्तर निश्चित मिळेल.
अशोक पाटील
तरी
तरीही नाटक कला टिकेल ( किंवा टिकावी) असेच वाटते.
wishful thinking म्हणा हवे तर.
--मनोबा
विशफुल
वेल् --- मी तुमच्या या विशफुल थिंकिंगच्या विरुद्ध बिलकुल जाणार नाही. फक्त त्या थिंकिंगचे रिअलिटीमध्ये रुपांतर होण्याबाबत साशंक आहे, इतकेच.
अशोक पाटील
दोन मुद्दे
नाटकातून समकालीन समस्या मांडणं आजही होत आहे. वर उल्लेख केलेल्या 'चाहूल' किंवा 'साठेचं काय करायचं'सारखी नाटकं किंवा रसिका जोशी लिखित-अभिनीत 'व्हाईट लिली नाइट रायडर'सारखी अलीकडची नाटकं ही समकालीन जगण्याबद्दल काहीतरी गंभीर म्हणू पाहतात. ज्यांना रंजनच हवं आहे त्यांना अर्थात प्रशांत दामले प्रभृती उपलब्ध आहेत.
हाच मुद्दा दोन्ही बाजूंनी लावता येतो. जब्बार पटेल आणि फैय्याजपासून ते अतुल कुलकर्णी वगैरे सोलापूरचे नाट्यकर्मी मुंबई-पुण्यात आले तेव्हा गाजले. असंच प्रशांत दळवी-चंद्रकांत कुलकर्णींबद्दल म्हणता येईल. महेश एलकुंचवार नागपूरचे, पण त्यांची नाटकं मंचित झाली ती मुंबई-पुण्यात. गंभीर नाटकांचा प्रेक्षकवर्ग हा प्रामुख्यानं मध्यमवर्गीय असतो आणि मुंबई-पुण्यात या वर्गाची लोकसंख्या लक्षणीय आहे हे याचं साधं कारण आहे. तुम्ही वर उल्लेख केलेल्या अनेक गावांत आज काहीतरी गंभीर सादर करायचं म्हणजे नाट्यकर्मींच्या पोटात गोळा येतो; कारण मुंबई-पुण्यासारखे फक्त मोबाईलचे आवाजच नाहीत तर मंचावरच्या बायकांविषयीची अर्वाच्य भाषेतली जाहीर टिप्पणीसुद्धा सहन करावी लागते. प्रयोग चालू असताना प्रवेश संपल्यावर विंगेत येऊन ढसढसा रडणार्या आणि 'पुन्हा या गावात प्रयोगाला येणार नाही' असं म्हणणार्या मुंबई-पुण्याच्या नाट्यकर्मी मला माहीत आहेत.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
समस्या आणि बाजू
"नाटकातून समकालीन समस्या मांडणं आजही होत आहे."
~ मान्य. पण कुणासाठी ? फक्त शिवाजी मंदीर, षण्मुखानंद वा बालगंधर्व, भरत इथल्या प्रेक्षकांसाठी ? असे असेल (नव्हे आहेच) तर मग वाढली नाट्यपरंपरा !
"प्रयोग चालू असताना प्रवेश संपल्यावर विंगेत येऊन ढसढसा रडणार्या आणि 'पुन्हा या गावात प्रयोगाला येणार नाही' असं म्हणणार्या मुंबई-पुण्याच्या नाट्यकर्मी मला माहीत आहेत."
~ याची दुसरी बाजू, जी कलाकारांची आहे, मला माहीत आहे - अगदी प्रखरपणे. अमुक एक ब्रँड् कोल्हापुरात मिळाला नाही, म्हणून प्रयोगाआधी ठेकेदाराच्या धाकट्या भावाला दुचाकीवरून निपाणीला दामटविणार्या 'वीर संभाजी' ला मी स्वतः पाहिले आहे, अनुभवल्या आहेत नखर्यांच्या विविध छटा, मध्यस्थी करणार्या इथल्या नाटक ठेकेदारांना मिळालेली अपमानस्पद वागणूकही पाहिली आहे. शरम वाटली होती मला, घृणा आली होती या मराठी नाट्यसंसाराच्या पडद्यामागे पाहिलेल्या मानापमानाच्या प्रयोगामुळे.
त्यामुळे लेट् अस नॉट व्हेन्चर अवरसेल्व्हज् टु डिग धिस गार्बेज.
अशोक पाटील
आग सोमेश्वरी...?
मला एकंदरीत असं वाटतं आहे की तुमचा ज्यांच्यावर राग आहे ते वेगळे लोक आहेत; मुंबई-पुण्यात काही वेगळं करू पाहणारे ताज्या दमाचे हौशी नाट्यकर्मी त्यात येत नाहीत. गंभीर नाटकं करणारे आपली नाटकं मुंबई-पुण्याबाहेर न्यायला तयार असतात, पण त्या गावांत कुणीतरी प्रयोग घ्यायला लागतो. कारण या नाटकांचं अर्थकारण छोट्या जिवाचं असतं. तमाशे किंवा व्यावसायिक रंगभूमीला परवडणारे बालगंधर्व, शिवाजी मंदिर त्यांना परवडत नसतात म्हणून तर मुंबई-पुण्यातही सुदर्शनसारख्या छोट्या रंगमंचांपुरतंच त्यांचं नाटक सीमित असतं. तुमच्या प्रतिसादांत तुम्ही जे 'स्टार' वागणुकीचे मासले दिले आहेत तेसुद्धा बहुधा या नाट्यकर्मींना परवडणारे नसतात; ते स्टार लोकांनाच परवडतात आणि स्टार लोकांचेच असे नखरे पुरवले जातात. त्यामुळे तुमची टीका काहीशी अस्थानी वाटते आहे. असो.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
नखरे
तसे पाहिले तर तुम्ही 'असो' म्हटल्याने या विषयातील आपल्या चर्चेला विराम मिळाला असे गृहित धरले आहे.
तरीही तुमच्या प्रतिसादातील "....आणि स्टार लोकांचेच असे नखरे पुरवले जातात" या एकाच वाक्याबद्दल मला (अनुभवाने) सांगणे गरजेचे आहे की, एरव्ही जोड्याजवळसुद्धा उभे करून घेण्याची लायकी नसलेल्या या 'स्टार' लोकांचे नखरे ठेकेदार धंद्यातील एक अपरिहार्यता म्हणून पुरवित असतो, हौसेने नाही. [जे नामवंत म्हटले गेलेले स्टार वैकुंठाला गेले ते देखील अशा फुकट पुरविल्या गेलेल्या नखर्यांच्या आहारी जाऊनच.]
आज 'सुदर्शन' मध्ये प्रतिभा झळकविणार्या ज्या रंगकर्मींचा तुम्ही उल्लेख करता त्यांचा प्रवासही बालगंधर्वपर्यंत आला की आपोआप त्यांच्यातही 'स्टार' लागण होतेच होते. मग तोच 'आमचे नखरे पुरवा' खेळ परत चालू.
अशोक पाटील
प्रवास
ते स्टार होतात तोवर गंभीर अभिव्यक्तीसाठीची त्यांची आचदेखील संपलेली बऱ्याचदा आढळते आणि तोवर ताज्या दमाचे इतर कलाकार त्यांची जागा भरून काढतात असा अंदाज आहे. म्हणून म्हणतो की तुम्ही म्हणता त्या लोकांचं वर्तन टीका करण्यासारखंच असतं, पण त्यांच्याविषयी मी बोलत नाही आहे; अन् ज्यांच्याविषयी मी बोलतो आहे त्यांना असे नखरे परवडत नाहीत; म्हणून त्यांच्यावर अशी टीका केलेली काहीशी अस्थानी वाटते आहे.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
रोचक चर्चा
पुणे-मुंबई वि. लहान शहरातली नाटकं अशी चर्चा वाचून अशुतोष पोतदारांचा हा लेख आठवला. लोकसत्तेत हाच लेख मराठीत आहे असा अंदाज आहे, पण या कम्प्यूटरवर मला तो नीट दिसत नाहीय.
*********
धागे दोरे
*********
धन्यवाद । गोलबल
आशुतोष पोतदार यांचा इंग्रजी लेख वाचला. लेखातील काही मुद्दे दखलपात्र आहेत. लेखाला संपादनाची प्रचंड गरज असल्याचे जाणवले. बाजूलाच 'सबमिशन गाइडलाइन्स' पाहून आणखीच वाईट वाटले. लेखात गोलबल (golbal) हा एक शब्द वारंवार वापरलेली दिसतो. सुरुवातीला हा शब्द 'ग्लोबल' असावा असे वाटले पण तसे नसावे हे उरलेला लेख वाचतांना ध्यानात आले. हा शब्द नेमके काय दर्शवतो हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.
____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.
दुव्यांबद्दल धन्यवाद
दुव्यांबद्दल धन्यवाद. लोकसत्तामधला लेख* हा वार्तांकन स्वरूपाचा आहे, तर सीगलमधला लेख काही वैचारिक मुद्दे मांडू पाहतो. golbal हा शब्द एका मध्य लटपटीत अडकलेल्या मानसिकतेसाठी वापरलेला असावा असा अंदाज आहे. इंग्रजीतले पंक्चरसारखे शब्द मराठीत 'पंचर' म्हणून येतात तेव्हा ते धड इंग्रजी नसतात अन् प्रमाण मराठीतही जसेच्या तसे समाविष्ट होऊ शकत नाहीत. इथे 'ग्लोबल' शब्दाला असं रूप देऊन त्याद्वारे धड 'ग्लोबल' न झालेल्या अन् आधुनिक-पारंपरिक द्वंद्वात अडकून पडलेल्या मानसिकतेविषयी लेखक बोलत आहे असं वाटतं. लहान गावांतला नाट्यकर्मी मुंबई-पुण्यात येऊन 'ग्लोबल' बनू पाहातो अन् त्याचं golbalपण हरवतं यांसारखे किंवा लहान गावांतल्या नाट्यकर्मींवरचे प्रभाव किंवा अधिक टोकदार जातसंघर्ष वगैरे मुद्द्यांत हे जाणवतं.
* - ब्राउजरचं कॅरॅक्टर एन्कोडिंग 'वेस्टर्न' केलं तर लेख दिसतो आहे.
- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
शहरी निमशहरी
"golbal हा शब्द एका मध्य लटपटीत अडकलेल्या मानसिकतेसाठी वापरलेला असावा असा अंदाज आहे."
~ सहमत. लोकसत्ताच्या त्या लेखात golbal ला "निमशहरी" असे नामकरण दिल्याचे दिसते, जे आशुतोष पोतदारांनाही अपेक्षित असावे. वर्षानुवर्षे मुंबई-पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र असे सरळसरळ दोन गट नाट्यचळवळीशी निगडित आहेत, मग ते हौशी असो वा समांतर सादरीकरणाबाबत. गोलबलपासून प्रवासाला सुरुवात करणारा रंगकर्मी मुंबईपुण्यात आला की तो ग्लोबलच्या घरट्यात घुमू लागतो असे काहीसे पोतदार सुचवितात, जे योग्यच आहे.
लेखकाचा 'लेखकराव' कसा आणि का होतो याच पंक्तीतील गोलबल ते ग्लोबल गट आहे.
(अवांतर : 'वेस्टर्न' एन्कोडिंग मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. काल मलाही लोकसत्तेतील तो लेख गार्बेज दिसत होता. पण आज वेस्टर्न सेटिंगमुळे ठीक झाले.)
अशोक पाटील
चिंतातुर जंतूंच्या पहिल्या
चिंतातुर जंतूंच्या पहिल्या प्रतिसादाशी सहमत, तसेच कलेचे केंद्रिकरण होणे देखिल अपरिहार्य आहे असे वाटते.