माथेफिरूंच्या हातात देशाच्या आर्थिक नाड्या (?)

गेली 30 वर्षे, देशातील आर्थिक नाड्या उद्योगक्षेत्रातील अती-श्रीमंत सायकोपॅथ्सच्या हातात गेल्या आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण संपूर्ण समाजाला दिवाळखोरीकडे नेण्यास हाच वर्ग जबाबदार आहे.

अधिक श्रम व/वा उद्योजकता हेच संपत्ती-निर्मितीचे निकष असल्यास आफ्रिका वा एशियातील बहुतांश महिला एव्हाना लक्षाधीश असायला हव्या होत्या. परंतु तसे काही झाले नाही. जगातील लोकसंख्येच्या जेमतेम 1 टक्का असलेला हा अती-श्रीमंत वर्ग मात्र स्वत:कडील अमोघ बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलता यांचा डांगोरा पिटत आपल्या श्रीमंतीचे समर्थन करत आहे. मुळातच हे गृहितक चुकीचे आहे. ज्या गोष्टींचा दूरान्वयानेही संबंध जोडता येत नाही त्याच्याच आधारे श्रेय लाटण्याचा हा प्रकार आहे. आज जे श्रीमंत आहेत ते तेथे पोचले याची कारणं सर्वस्वी वेगळे आहेत. कारण त्यांनी मोक्याच्या जागा पकडून ठेवल्या आहेत. आपली बुद्धीमत्ता वा असाधारण कौशल्य यांच्या आधारे ते त्या पदावर पोचले नसून समाजातील विषमता, विषमतेचे होत असलेले समर्थन, शोषण व्यवस्था व योग्य घराण्यात त्यांचा झालेला जन्म इत्यादी घटक अनुकूल ठरत गेल्यामुळे ते तेथे आहेत. या मोक्याच्या पदाचे वाटप विषम प्रमाणात होत असल्यामुळे हा विशिष्ट वर्ग त्यावर मक्तेदारी सांगत आहे.

अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषक विजेता डेनियल कान्हमन या मनोवैज्ञानिकाने याविषयी काही संशोधन केले आहे. त्यानी, त्याच्या अभ्यासावरून यश व श्रीमंतीच्या अशा प्रकारच्या व्याख्याच सदोष असून त्या भ्रम निर्माण करत आहेत, असा निष्कर्ष काढला आहे. जगातील 25 आर्थिक सल्लागारांच्यावर गेली आठ वर्षे संशोधन करताना त्याला काही आश्चर्यकारक गोष्टी आढळल्या. या आर्थिक सल्लागारातील सातत्य जवळपास शून्य होते. जुगाराच्या खेळातील छाप-काट्याप्रमाणे यांचा सल्ला सारखा बदलत होता. त्यांच्या सल्ल्यामागे तार्किकतेचा पूर्णपणे अभाव होता. तरीसुद्धा वर्षाकाठी त्यांना भरपूर बोनस, वाढीव वेतन, अतिरिक्त सोई सुविधा मिळतच गेल्या कारण समाजाच्या दृष्टीने ते नेहमीच सुदैवी ठरत होते.

अशा प्रकारची तर्कशून्यता बहुतेक ठिकाणी आपल्याला दिसून येईल. वॉल स्ट्रीटवरील (व इतर शहरातील) शेअर मार्केटचे ब्रोकर्स व फंड मॅनेजर्ससुद्धा -समभागधारक खड्ड्यात गेले तरी - मोठ्या प्रमाणात कमीशन कमवून गब्बर झाले आहेत. त्यांचाही समभागाविषयीचा सल्ला एखाद्या माकडाने छाप काटा टाकत सांगितलेल्या सल्ल्यापेक्षा वेगळा नसतो. मुळात कुशलतेबद्दलचे भ्रम... आपल्या नसनसात भिनलेले आहेत. जास्त श्रीमंत म्हणजे जास्त बुद्धी, जास्त कुशलता यातून आपल्याला बाहेर पडावेसे वाटत नाही.

आर्थिक क्षेत्रातील उच्च शिक्षित वा आर्थिक विशेषज्ञ यांना वगळले तरी इतर क्षेत्रातील परिस्थिती फार वेगळी आहे असे समजण्याचे कारण नाही. तुमच्या ऑफिसमधील तुमचा बॉस खरोखरच इतरांपेक्षा जास्त बुद्धीमान, व्यवस्थापनतज्ञ, वा नेहमीच अचूक निर्णय घेणारा असा आहे का? मुळात तो (वा ती) bluff, bullshit व bullyingच्या जोरावर त्या पदावर आहेत, असेच त्यांना 'ओळखणार्‍यां'चे मत असेल.

अजून एका तज्ञाने नावाजलेल्या ब्रिटिश उद्योगातील 39 वरिष्ठ मॅनेजर्सचा अभ्यास केला आहे. Test case म्हणून त्यानी एक चाचणी घेतली. ब्रॉडमूर येथील मानसोपचारकेंद्रात उपचार घेत असलेले अट्टल गुन्हेगार व कार्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ मॅनेजर्स यांना एकाच प्रकारच्या चाचणी पत्रिका त्यानी दिल्या. आश्चर्य म्हणजे या दोन्ही गटातील चाचणीच्या उत्तरात फारसा फरक जाणवला नाही. खरे पाहता मॅनेजर्सनी दिलेल्या उत्तरावरून त्यांच्यावरच उपचार करण्याची गरज आहे असे या तज्ञाला वाटले. सायकोपॅथिक रुग्णांच्या गुणविशेषांचा अभ्यास केल्यास तत्सम गुणविशेष मॅनेजर्समध्येही आढळले. खुशामती, सत्ताधार्‍यांना हाताळण्याची हतोटी, लबाडी इत्यादी गुणविशेष मॅनेजर्समध्ये प्रकर्षाने जाणवत होत्या. स्वार्थकेंद्रीत वृत्ती, इतरांचा मुलाहिजा न ठेवता शोषण करण्याकडे कल, दया सहानुभूतीचा अभाव (दाखवला तरी स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर), अपराधीपणाचा लवलेशही नसणे, इत्यादी गोष्टीच कंपन्यांना ऊर्जितावस्थेत नेतात यावर विश्वास असल्यामुळे कंपन्या चालवणार्‍या मॅनेजर्सच्या रक्तात या गोष्टी भिनल्या आहेत.

एके काळी कंपन्या एवढ्या तत्वच्युत नव्हत्या. कंपनीची धोरणं समाजोपयोगी होत्या. आता मात्र त्या अत्यंत लवचिक, आपले धोरण सतत बदलत ठेवणारे, इतर कंपन्याबरोबर स्पर्धा करताना आपल्याच कंपनीतील लोकांच्या हिताचा बळी देणारे असे झाल्या आहेत. याच प्रकारच्या गोष्टींना कंपन्या प्राधान्य देत असल्यामुळे कंपनी चालवणार्‍या मॅनेजर्सची निवड करताना अशाच गुणविशेषांना प्राधाऩ्य दिले जात आहे. व अशाच मॅनेजर्सची गलेलठ्ठ पगारावर वर्णी लागते. अशा प्रकारचे गुणविशेष असलेल्या एखाद्या गरीब घरातील तरुणाच्यात असत्या तर त्याला जेलची हवा खावी लागली असती. परंतु याच गुणविशेषांच्या जोरावर श्रीमंत घरातील तरूण मात्र मोठमोठ्या नावाजलेल्या व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत सहजपणे प्रवेश मिळवू शकतात.

याचा अर्थ असा नव्हे की सर्वच्या सर्व व्यवस्थापक माथेफिरू आहेत. फक्त आजची अर्थव्यवस्था अशाच सायकोपॅथमधील चुकीच्या गुणविशेषांना उत्तेजन देत आहे, एवढेच नमूद करावेसे वाटते. आर्थिक उदारीकरणामुळे कंपनीतील वरिष्ठांना ट्रेड य़ुनियन्सची भीती राहिली नाही. शिवाय संगनमताने व लाडी लबाडीने नियामक मंडळांना व कर गोळा करणार्‍यांना जवळ जवळ खिशात घातल्यामुळे कुठलीही मनमानी खपून जात आहे. उत्पादन व्यवस्थेला सुरळितपणे कोण चालवत आहे व गैरमार्गाने कंपनीला कोण वृद्धींगत करत आहे, याच्यातील फरक कळेनासे झाले आहे. कंपनीचे सर्वे सर्वा असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी कंपन्याना आर्थिक शोषणाचे कुरण मानत आहेत व आपण करत असलेल्या 'कामा'च्या मोबदल्यात 7 आकडी वार्षिक वेतन, बोनस, व इतर अवाजवी सोई सुविधा पदरात पाडून घेत आहेत. यांच्या या ’कार्यकुशलते’मुळे कंपनीचे मूल्यवर्धन होत नाही. उलट कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यापर्यंत पोचते. हे अधिकारी कंपनीच्या जीवावर पोसत असलेले गांडुळ आहेत की काय हा प्रश्न विचारावासा वाटतो. तेलविहिरींची मालकी असलेल्या शेख - सुल्तानासारखे यांचीही अंदाधुंदी खपवून घेतली जात आहे.

या सर्व खेळीत आपण फक्त बघ्यांची भूमिका वठवित आहोत. परिस्थितीशरणतेमुळे विरोधाचा क्षीण आवाजही आपल्या तोंडातून निघत नाही. कंपन्यांच्या जाहिरातीमुळे लाचार झालेली माध्यमं अशा अधिकार्‍यांच्या 'सुपरह्युमन कुशलते'चे खोटे चित्रण आपल्यासमोर उभे करत असल्यामुळे आपणही त्याच भ्रमात राहून जीवन जगत आहोत. फक्त श्रीमंतच संपत्तीत भर घालू शकतात हे आपल्यात पूर्णपणे भिन(व)लेले आहे. परंतु संपत्तीचे हे तथाकथित निर्मिक पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोताना ओरबडून विध्वंस करत आहेत व गरीबांच्या शोषणावर त्यांच्या श्रीमंतीचे इमले चढत आहेत. हा निसर्ग नागविला जात आहे. व येथील माणसं दारिद्र्यात ढकलले जात आहेत. याच श्रीमंतानी आपल्यावर दिवाळखोरी लादली आहे.

गेल्या तीस वर्षात असा काय बदल झाला आहे? सर्वात श्रीमंत देश अमेरिकेचेच उदाहरण घेतल्यास 1947 ते 1979 या कालावधीत अमेरिकेतील उत्पादकता 119 टक्के वाढली व त्याच काळात खालच्या स्तरातील 20 टक्के लोकांच्या उत्पन्नात 142 टक्के वाढ झाली. 1979 ते 2009 या कालावधीत उत्पादकता 80 टक्क्यानी वाढली. परंतु याच काळात खालच्या स्तरातील 20 टक्के लोकांच्या उत्पन्नात वाढ न होता 4 टक्के घट झाली. त्याउलट वरच्या स्तरात असलेल्या 1 टक्का श्रीमंतांच्या उत्पन्नात मात्र 270 टक्के वाढ झाली. ब्रिटिश उत्पादन क्षेत्रातसुद्धा अशाच प्रकारची स्थिती आहे. या आकड्यावरून आपल्या श्रमाची विल्हेवाट कशी लावली जात आहे हे लक्षात येईल.

आपण नेहमीच सुटा-बुटातील आपल्या CEOच्या 'कतृमकतृत्वा'विषयी संमोहितावस्थेत असतो. त्याची शैक्षणिक पात्रता, धडाडी, हजरजबाबीपणा, निर्णयक्षमता, माध्यमावरील पकड, शासनदरबारी त्याची उठबस इत्यादीतून त्यानी उभे केलेले कार्पोरेट 'साम्राज्य' पाहत असताना आपण आश्चर्यचकित होतो. परंतु हे तथाकथित 'साम्राज्य' अत्यंत तकलादू असून त्यानी रेखाटलेले आर्थिक चित्र इतरांची संपत्ती लुटल्यामुळे तयार झालेली आहे. त्याच्या या भ्रमाला आपण कधीच आव्हान न दिल्यामुळे आपण मुकाट्याने ही अरेरावी सहन करत आहोत.परंतु हे फार दिवस चालणार नाही हेही कधीतरी त्यांना सांगायला हवे.

Comments

हा हा.... बंदर समझे सिकंदर

माफ करा पण हसू आवरत नाहिये. आख्खा लेख एखाद्या माजी कॉम्रेड वा समाजवाद्याने लिहिलेला असावा असे वाटले.

एके काळी कंपन्या एवढ्या तत्वच्युत नव्हत्या. कंपनीची धोरणं समाजोपयोगी होत्या.
हे म्हणजे जरा अतिच होतय. मानवी समाजाचा,समाजमनाचा इतिहास पाहिला असता नेहमीच ८०% लोक -२०% संपत्ती वगैरे pareto principle ची उदाहरणे दिसतात. जमेल तितकी हडेलहप्पी करणे, स्वतःपुरते पाहणे हे खोल कुठेतरी मानवी मनातच आहे. कंपनीत "माणसे" ठेवली की "मानवी घोटाळे " होतात. हीच् माणसे "व्यवस्थे"त वा "सरकारात" ठेवली तर् तिथेही गडबड होतेच.
१९४७-१९७९ ला बरेच काही चांगले होते व आता बरेच काही बिघडले आहे हे पटत नाही.
संत श्री कैलाश् खेर ह्यांनी "खोसला का घोसला" ह्या धमालपटात ("चक् दे फट्टे " ह्या सुरेल गाण्यात)सांगून ठेवलेल्या ओळी सार्वकालिक सत्य वाटतात :-
ये दुनिया मस्त कलांदर
ता अटे उट्टे बैठा बंदर
समझे अपणू सिकंदर
एदे चक् दे फट्टे

ये दुनिया वारि वारि
छक दे सारे नर नारी
तु कहनु बनिया भिखारी

तुमची तळमळ समजते पण आताच खूप काही बिघडले आहे हे पटत नाही.

--मनोबा

देशाच्या आर्थिक नाड्या

कुणाच्या हातात असायला हव्यात?
त्याच्या हाताता त्या कशा जातील? त्यासाठी त्याने काय करायला पाहिजे?
नाड्या हातात आल्यानंतर तो त्या कशा सांभाळेल? त्याला त्याचे ज्ञान आहे का?
तो स्वार्थी बनून आपली तुंबडी भरणार नाही कशावरून?

बाप रे बाप ! प्रश्नच प्रश्न! यांची सरळ सोपी उत्तरे असती तर किती चांगले झाले असते. पण ते तसे कधीच नव्हते. निदान गेल्या तीन पिढ्या मी तत्कालीन राज्यकर्त्यांच्या नावाने शंख केला जातांनाच ऐकत आलो आहे. तो करणेदेखील आवश्यकच आहे. त्यामुळे थोडा आळा बसेल असे निदान वाटते तरी. चालू द्या!

हे काय आहे?

अरे बाप रे! भयानक लेख आहे. नेमका कोणाचा आहे? यातील एकेका वाक्याचे खंडन करणे हे वेळखाऊ काम असून तेवढी उर्जा आणि शक्ती वाया घालवण्याचा बेत नसल्याने लेख पटला नाही एवढेच सांगते.

भावनाप्रधान लेख

बरीचशी उदाहरणं पटली नाहीत. पण एकूण लेखातला विचार कळाला आणि पटलासुद्धा.

आपण आणि ते

असा लेखात निराशेचा सूर आहे. अलिकडे हा सूर अनेक ठिकाणी ऐकायला येतो आहे हे मुद्दाम नमूद करावेसे वाटते.

सगळे काही आलबेल नक्कीच नाही. पण म्हणून जगबुडी झाली हाही विचार नको. बदल हवे असतील तर थोडा धीर धरायला काय हरकत आहे?

चीड कळली पण पुढे काय?

तुमच्या चिडचिडीबाबत सहानुभूति दाखवूनहि असे विचारतो की ह्यावर काय इलाज तुम्ही सुचवाल? परिस्थिति अशी कधी नव्ह्ती? सत्याची चाड, सार्वत्रिक समता, दलितांची काळजी, पात्रतेनुसार स्थान आणि समृद्धि एवंगुणविशिष्ट रामराज्य केव्हा आणि कोठे होते हे कळल्यास तसे परत करण्याचा मार्ग शोधता येईल.

पैशाभोवती सगळे फिरते हे त्रिकालाबाधित सत्य शेकडो ठिकाणी वेगवेगळ्या शब्दात सांगितले आहे. उदा. भर्तृहरि:

यस्यास्ति वित्तं स नर: कुलीन:
स पण्डितः स श्रुतवान् गुणज्ञः|
स एव वक्ता स च दर्शनीयः
सर्वे गुणा: काञ्चनमाश्रयन्ते||

आणि म्हणूनच

सुवर्णमेवार्जय निष्फला गुणा:

हा सिनिकल सल्ला द्यावासा वाटतो

लेख

नोबेल पुरस्कार विजेते डॅनियल कान्हमन ह्यांचे थिंकिंग फास्ट अँड स्लो हे नवे पुस्तक सध्या वाचायच्या यादीत आहे. लायब्ररीत चाळले असता सुरुवात खूप रोचक वाटली होती.

सदर लेख 'ऑक्युपाय वॉलस्ट्रीट' चळवळीच्या शिखरा दरम्यान कुणीतरी लिहिलेला वाटतो. मध्यंतरी असे बरेच आकडे वेगवेगळ्या लेखांमधुन यायचे. ९९% वि. १% हा असंतोष त्यातुनच आला आहे जो ऑक्युपाय चळवळीचा पाया होता.

अशा प्रकारची तर्कशून्यता बहुतेक ठिकाणी आपल्याला दिसून येईल. वॉल स्ट्रीटवरील (व इतर शहरातील) शेअर मार्केटचे ब्रोकर्स व फंड मॅनेजर्ससुद्धा -समभागधारक खड्ड्यात गेले तरी - मोठ्या प्रमाणात कमीशन कमवून गब्बर झाले आहेत. त्यांचाही समभागाविषयीचा सल्ला एखाद्या माकडाने छाप काटा टाकत सांगितलेल्या सल्ल्यापेक्षा वेगळा नसतो. मुळात कुशलतेबद्दलचे भ्रम... आपल्या नसनसात भिनलेले आहेत. जास्त श्रीमंत म्हणजे जास्त बुद्धी, जास्त कुशलता यातून आपल्याला बाहेर पडावेसे वाटत नाही.

सध्या फूल्ड् बाय रँडमनेस् हे तलेब ह्यांचे पुस्तक वाचत आहे ज्यामधे ह्याच विषयावर मस्त लिहिले आहे. पुस्तक मस्ट रीड आहे.

जगाच्या पाठीवर

लेख वाचताना, मला जगाच्या पाठीवर चित्रपटातील गदीमांनी लिहीलेले, बाबूजींनी स्वरबद्ध करून आर्त स्वरात म्हणलेले आणि तितक्याच आर्त अभिनयाने राजा परांजप्यांनी सादर केलेल्या गाण्यातील ओळी आठवत गेल्या:

इथे फुलांना मरण जन्मता, दगडांना पण चिरंजीवीता
भोरी बाभळी उगाच जगती चंदन माथी कुठार

लबाड जोडीती इमले माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या
पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार

वाईट तितके इथे पोसले, भले पणाचे भाग्य नासले
या पृथ्वीच्या पाठीवर ना माणसास आधार

अजब तुझे सरकार!

या चित्रपटातील नायकाच्या हातात सामान्य असला तरी अनेक गुण असून देखील केवळ अशा विषण्णावस्थेत विचार करत बसल्याने काहीच घडत नाही... म्हणून अशा अवस्थेत कधी रहायचे नसते असे वाटते. (अशा अवस्थेत जाणे यात नवल नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात असे क्षण येऊ शकतात, येतात, पण त्यातच रमल्यास आपल्या हातून काहीच घडू शकणार नाही असे वाटते.)

वर मन यांनी म्हणल्याप्रमाणे हा लेख वाचताना साम्यवादाची आठवण होणे देखील अपरीहार्यच आहे. देशात अतिश्रीमंत आहेत, नवश्रीमंत आहेत आणि बर्‍याचदा त्यांना केवळ त्यांच्या कर्तुत्वावरच देशाचे अर्थशास्त्र चालले आहे असे वाटते... पण त्यांच्याइतकेच जबाबदार (सायकोपॅथ?) राजकारणी देखील नाहीत का? शेवटी धोरणे तेच ठरवतात. उद्योजक नसलेले आणि कामगारांचे नेते म्हणणार्‍या नेतृत्वाने कामगारांना रस्त्यावर आणल्याची उदाहरणे काय सांगते? ते कुणामुळे झाले? तीच गोष्ट वैद्यकीय क्षेत्रात पण दिसते आणि अगदी शैक्षणिक क्षेत्रात पण... मग केवळ हा दोष कुणाचा म्हणायचा? माझ्या लेखी सरसकट असे सर्वच सायकोपॅथ नाहीत का जबाबदार नाहीत.

आणि इतके सगळे असताना देखील, आपल्यात (समाजात) नक्की काय कमी आहे याचा विचार करत त्या साठी कामे करणारे पण आहेत. त्यांना असले प्रश्न देखील पडत नाहीत अथवा त्यांच्या (लेखात संबोधलेल्या आर्थिक नाडेकर्‍यांच्या) मार्गावर तितकी अथवा त्याहून अधिक शिक्षण-बुद्धी वगैरेने पात्रता असून देखील, जाण्याची इच्छा देखील होत नाही. असो.

माफक अपेक्षा

सर्वात प्रथम सर्व प्रतिसादकर्त्यांचे (व वाचकांचे) आभार. कारण 'उपक्रमा'च्या पिचवर माझ्यासारख्यांच्या लेखाला नेहमीच शून्य वा फार तर 2-3 रन्सवर (प्रतिसाद) out व्हावे लागते. असो.

मुळात हा लेख Occupy Wall Street सारख्या घटनेच्या संबंधातील इतर काही लेखावर आधारित आहे. परंतु आपल्याही देशातील परिस्थिती फार वेगळी आहे असे समजण्याचे कारण नाही. कदाचित हे लोण आपल्या इथेही पोचू शकेल. (अण्णांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद याचेच द्योतक असावे.) त्याचीच ही एक mild reaction आहे.

अती श्रीमंत उद्योजक वा अर्थतज्ञ वा व्यवस्थापक यांचीच फक्त चूक आहे किंवा फक्त तेच समाजाला नागवत आहेत असे नसून जनसामान्याला चहूकडून मार बसत आहे. मग त्यात अर्थतज्ञ असलेले आमचे पंतप्रधान व त्यांच्या भोवतीचे इतर अर्थतज्ञ असतील, (भ्रष्ट) राजकीय नेते असतील. अणुतज्ञ, आहारतज्ञ, मस्तवाल प्रशासन, कायदे तज्ञ, न्यायालयीन व्यवस्था इ.इ यांचाही सहभाग असेल. मात्र त्यांच्या ध्येय धोरणांचा फटका आपल्याला बसत आहे. अण्णा हजारेंचे आक्रंदन अरण्यरुदन होण्याच्या मार्गावर आहे. (अण्णांच्या उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचाराच्या संबंधातील सगळ्या गोष्टी पटतही नसतील - पंरतु त्यानी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतील.) या सर्व गोष्टीकडे बघितल्यास हताशपणे बघत बसण्याशिवाय आपल्याला काही उपाय सापडत नाहीत.

30-35 वर्षापूर्वी फार चांगली परिस्थिती होती व अलिकडेच ती फार बिघडली आहे असे काही नसून त्याकाळीसुद्धा शोषण व्यवस्था कार्यरत होती हे नमूद करावेसे वाटते. कदाचित त्यावेळचा समाज ते निमूटपणे सहन करत असेल. आता मात्र ते सहन करण्यापलिकडे होत असेल. (पंचतारांकित हॉस्पिटलमधील भोगळ कारभारामुळे शंभरेक रुग्ण आगीत होरपळून मरतात तेव्हा दोष कुणाला द्यावे? दैवाला की ढिसाळ कारभाराला? )

लेखाचा सूर सिनिकल आहे कारण परिस्थितीच तशी आहे. काही सूज्ञ यातूनही मार्ग काढण्याच्या प्रयत्नात आहेत हे मान्य करताना त्यांच्या संस्था वा प्रयत्न वाळवंटातील आश्वासक बेटं आहेत असेच म्हणता येईल.

यावर उपाय? माहित नाही. कोण पुढाकार घेतील? कल्पना नाही. आपण काय करावे? कळत नाही.
याचा अर्थ असा नव्हे की याला solution नाही. मार्ग आहे व त्याचाच आपल्याला शोध घ्यायचा आहे.

कदाचित लेखातील argumentsचे मुद्दे बरोबर नसतीलही. परंतु लेखातील आशयाकडे बघावे ही माफक अपेक्षा!

वाचकांची माफक अपेक्षा

सर्वप्रथम नानावटींनी या धाग्यात येऊन प्रतिसादातून आपले मत प्रकट केले त्याबद्दल आभारी आहे. वरील लेखात फक्त सिनिकल किंवा नकारात्मक सूर आहे एवढेच पटत नाही. मुख्य म्हणजे लेखात जे म्हटले आहे त्यापेक्षा वेगळी परिस्थिती कधी होती? पूर्वापार नाड्या राजकारणी आणि व्यापारी/ उद्योगपतींनीच आवळून धरल्या आहेत. असे असताना अचानक उठून सर्वांना सायकोपॅथ ठरवायचा उद्देश कळत नाही.

सायकोपॅथिक रुग्णांच्या गुणविशेषांचा अभ्यास केल्यास तत्सम गुणविशेष मॅनेजर्समध्येही आढळले. खुशामती, सत्ताधार्‍यांना हाताळण्याची हतोटी, लबाडी इत्यादी गुणविशेष मॅनेजर्समध्ये प्रकर्षाने जाणवत होत्या. स्वार्थकेंद्रीत वृत्ती, इतरांचा मुलाहिजा न ठेवता शोषण करण्याकडे कल, दया सहानुभूतीचा अभाव (दाखवला तरी स्वत:च्या फायद्यासाठी त्याचा वापर), अपराधीपणाचा लवलेशही नसणे, इत्यादी गोष्टीच कंपन्यांना ऊर्जितावस्थेत नेतात यावर विश्वास असल्यामुळे कंपन्या चालवणार्‍या मॅनेजर्सच्या रक्तात या गोष्टी भिनल्या आहेत.

मला वाटतं मराठी संकेतस्थळांवरील अनेकजण मॅनेजर्स असतील, डायरेक्टर असतील किंवा इतरांवर नियंत्रण ठेवणारे इतर महत्त्वाचे पद भूषवत असतील. मॅनेजर होणे ही काही समाजातील विशिष्ट किंवा थोडक्या गटाची मक्तेदारी नाही किंवा आजकालच्या जगात विशेष गोष्टही नाही. उलट, पूर्वी अधिकाराची पदे ही एका विशिष्ट गटाची मक्तेदारी असे आणि तेव्हाही परिस्थिती बिकटच होती. तरीही त्यांना सायकोपॅथच्या रांगेत बसवून काढलेला वरील सर्वसाधारण निष्कर्ष चकित करणारा आणि निराशादायक आहे. किंवा सनसनाटी आहे.

असो. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा. लेख वाचून त्याचा संदर्भ लक्षात येत नाही. नानावटींच्या म्हणण्याप्रमाणे -

मुळात हा लेख Occupy Wall Street सारख्या घटनेच्या संबंधातील इतर काही लेखावर आधारित आहे. परंतु आपल्याही देशातील परिस्थिती फार वेगळी आहे असे समजण्याचे कारण नाही. कदाचित हे लोण आपल्या इथेही पोचू शकेल. (अण्णांच्या आंदोलनाला मिळालेला प्रतिसाद याचेच द्योतक असावे.) त्याचीच ही एक mild reaction आहे.

हे संदर्भ लेखात देणार कोण? जर मूळ संदर्भ लेखात असते तर आगापीछा लागला असता. अर्थातच, आगा पीछा लागल्याने लेख पटेल असे नाहीच.

असो.

मला एका उपक्रमी सदस्यांनी हा लेख व्य. नि. तून पाठवला होता. त्या लेखात आणि आपल्या लेखात कमालीचे साम्य आहे. त्याचा संदर्भ आपल्या लेखात असता तर वाचकांना उपयोग झाला असता.

संदर्भ

संदर्भ १, व संदर्भ २ मधील आशयावरून हा लेख बेतला आहे.
यातील अनेक लेख याच विषयाशी संबंधित आहेत. कदाचित वाचकांना उपयोगी पडू शकतील.

लेखाशी सहमत

लेखात लिहिलेल्या प्रत्येक वाक्याशी सहमत.
उपाय काय? माहित नाही. याचे कारण जे कोणी उच्चपदस्थ आहेत ते त्या पात्रतेचे नाहीत हे सांगण्यासाठी इतरांना अधिकारच नाही.

लेख अजिबात आवडला नाही

या आर्थिक सल्लागारातील सातत्य जवळपास शून्य होते. जुगाराच्या खेळातील छाप-काट्याप्रमाणे यांचा सल्ला सारखा बदलत होता.

म्हणजे परिस्थिती कशीही बदलली तरी एकाच पध्दतीचे सल्ले त्यांनी द्यावे असे तुमचे म्हणणे आहे का? आणि तसे त्यांनी दिले तरी तुमच्यासारखे त्यावर टिका करतील की हे लोक बदललेली परिस्थिती लक्षात न घेता एकाच प्रकारचे सल्ले देतात!!

वॉल स्ट्रीटवरील (व इतर शहरातील) शेअर मार्केटचे ब्रोकर्स व फंड मॅनेजर्ससुद्धा -समभागधारक खड्ड्यात गेले तरी - मोठ्या प्रमाणात कमीशन कमवून गब्बर झाले आहेत. त्यांचाही समभागाविषयीचा सल्ला एखाद्या माकडाने छाप काटा टाकत सांगितलेल्या सल्ल्यापेक्षा वेगळा नसतो.

सातत्याने शेअर बाजाराविषयी योग्य आडाखे बांधता येणारे लोक फारच विरळे.पण वरचेवर चुकीचे सल्ले देत असलेल्यांची उचलबांगडी पण तितक्याच लवकर होते हे तुम्ही का लिहित नाही?

अजून एका तज्ञाने नावाजलेल्या ब्रिटिश उद्योगातील 39 वरिष्ठ मॅनेजर्सचा अभ्यास केला आहे. Test case म्हणून त्यानी एक चाचणी घेतली. ब्रॉडमूर येथील मानसोपचारकेंद्रात उपचार घेत असलेले अट्टल गुन्हेगार व कार्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ मॅनेजर्स यांना एकाच प्रकारच्या चाचणी पत्रिका त्यानी दिल्या. आश्चर्य म्हणजे या दोन्ही गटातील चाचणीच्या उत्तरात फारसा फरक जाणवला नाही. खरे पाहता मॅनेजर्सनी दिलेल्या उत्तरावरून त्यांच्यावरच उपचार करण्याची गरज आहे असे या तज्ञाला वाटले.

३९ हा आकडा कोणतेही अनुमान काढायला पुरेसा आहे का? बरं त्या चाचणीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न होते, त्यावरील उत्तरातून मानसिक परिस्थिती कशी समजून येते याविषयी थोडे तरी लिहा की राव.

अशा प्रकारचे गुणविशेष असलेल्या एखाद्या गरीब घरातील तरुणाच्यात असत्या तर त्याला जेलची हवा खावी लागली असती. परंतु याच गुणविशेषांच्या जोरावर श्रीमंत घरातील तरूण मात्र मोठमोठ्या नावाजलेल्या व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेत सहजपणे प्रवेश मिळवू शकतात.

किती हवेतील आणि तारतम्य सोडून विधाने कराल? मी भारतातील अशाच एका नावाजलेल्या व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचा पदवीधारक आहे. For your kind information मी श्रीमंत घराण्यातला अजिबात नाही. त्या संस्थेत प्रवेश मिळवायला आणि प्रवेश मिळाल्यानंतर मी खूप परिश्रम घेतले आहेत. आणि या प्रकाराला तुम्ही सहजपणे प्रवेश मिळविणे म्हणत असाल तर मला या सल्लागार किंवा उच्चपदस्थांची नव्हे तर तुमचीच किव कराविशी वाटत आहे. उचलली जीभ आणि लावली ताळ्याला. माझ्या संस्थेच्या प्रवेशप्रक्रियेत केवळ आव्हानात्मक प्रश्न होते. अशी कोणतीही गोष्ट नव्हती की जी केल्यामुळे एखादा माणूस तुरूंगात जाईल.

असो. असल्या सबझुटवादी (cynic) लेखांची किंमत कागदाच्या कपट्याएवढी पण नाही.

---विल्यम जेफरसन क्लिंटन

लेख आवडला

लेख आवडला पण वाचकन्च्या प्रतिक्रिया वाचुन् धक्का बसला , सामान्य माणुस किति भोळसट असतो .
म्हनजे आसे कि
१) कोर्टात न्याय मिळतो असे त्याला वाटत असते कारण त्यांनी कोरता मध्ये कधीही पाय ठेवलेला नसतो
२)शासन व्यवस्था हि लोकांनी लोकांसाठी निर्मान केली आहे असे त्याला वाटत असते
३) शेअर बाझार हा सामान्य गुताव्णूक्दाराना पैसे मिळवून देण्या साठी असतो
४) आपले वित्त मंत्री हे स्वतःच्या डोक्याने बजेट तयार करतात
इत्यादी ...
सदर लेखात उल्लेच केलेला लेखक Daniel Kahneman हा नोबेल विजेता आहे , त्याचे लेख किंवा संशोधन हे Judgment and decision-making या विषयांवर गाजलेले आहे , आणि तोच या लेखाचा मूळ हेतू आहे कि , ससामान्य माणूस किंवा समाज हा कशा पद्धतीने विचार करत असतो , त्याचे सारांश जरी विकीपेडीआ वर वाचले असते तर नानावटी याचा लेख समजण्यास मदत झाली असती

 
^ वर