ज्येष्ठ कन्नड व्यंगचित्रकार श्री.बी.व्ही.पांडुरंगाराव

कर्नाटकातील बंगलोरचे जेष्ठ व्यंगचित्रकार श्री.बी.व्ही.पांडुरंगा राव.मध्यप्रदेशातील भिलाई स्टील प्लांट मधून जेष्ठ व्यवस्थापक म्हणून २००१ साली निवृत्त झाल्या नंतर हे बंगलोरला स्थाईक झाले आणि स्वतंत्र व्यंगचित्रकार म्हणून त्यांचा ह्या क्षेत्रातील प्रवास अधिकच जोमाने सुरु झाला. ह्यांनी १९६५ साली अमेरिकेतल्या Cleveland मधील रे बर्न्स ह्या कार्टुनिंग स्कूल मधून डिप्लोमा घेतला आहे.आजपर्यंत ह्यांची असंख्य व्यंगचित्रे कन्नड,हिंदी आणि इंग्रजी दैनिकातून नियमितपणे आणि इतर प्रकाशनां मधून प्रसिद्ध झाली आहेत,तसेच असंख्य व्यंगचित्रे आजवर आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रांच्या उत्सवात,प्रदर्शनात प्रसिद्ध झाली असून २९ वेळा ती आंतरराष्ट्रीय व्यंगचित्रांच्या अल्बम मध्ये प्रसिद्ध केली गेली आहेत.एवढेच काय तर त्यांनी देशभरात आजवर ३७ वेळा त्यांच्या व्यंगचित्रांचा एकपात्री कार्यक्रम सादर केला आहे.त्याची नोंद २०१०-११ साली लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये राष्ट्रीय विक्रम म्हणून घेतली गेली आहे.सर्वात छोट्या आकाराच्या त्यांच्या फ्लिप बुक अँनिमेशनची, ह्या क्षेत्रातील "राष्ट्रीय विक्रम" म्हणून २०१०-११ साली नोंद सुद्धा आहे.ह्या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुण,होतकरुंच्या साठी त्यांनी अनेक शिबिरांचे आजवर आयोजन केले आहे.

त्यांनी कर्नाटक कार्टूनिस्ट असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविण्या बरोबरच भिलाई स्टील प्लांट आणि मध्य प्रदेश विभागवार क्रिकेट सामन्यांमध्ये खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व केले आहे आणि मध्य प्रदेश राज्यस्तरीय क्रिकेट मंडळाचे अधिकृत पंच (क्रिकेट अम्पायर) म्हणून देखील काम पहिले आहे.खेळातील त्यांचे प्राविण्य फक्त एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी मध्य प्रदेश विभागवार बॅङमिंटन स्पर्धेत सुद्धा भाग घेतला आहे.अशा ह्या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाची हि नुसती तोंड ओळख आहे कारण एखादी व्यक्ती किती ब्लॉग्ज सुरु ठेवू शकते,काढू शकते किंवा निदान त्याचा एक हिस्सा बनू शकते त्याचे हे गृहस्थ म्हणजे एक मासलेवाईक उदाहरण आहे.ह्यांचा प्रोफाईल बघितला असता हे गृहस्थ १-२ किंवा १०-२०नव्हे तब्बल ६२ ब्लॉग चालवतात/लिहितात /त्यांच्या व्यंगचित्रांनी रंगवतात हे बघितल्यावर आश्चर्य चकित होऊन आपोआपच तोंडात बोट जाते.

तर अशा ह्या अफलातून व्यंगचित्रकाराची काही व्यंगचित्रे मध्यंतरी माझ्या पाहण्यात आली नि त्या वरील "पांडुरंगा" ह्या त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण सहीने त्याचा मागोवा घेत गेलो असता ह्या अफलातून व्यक्तिमत्वाची ओळख झाली.खरेतर त्यांच्या व्यंगचित्रांना भाषेची गरजच नाही/नसते तरीही नेहमी प्रमाणे मी त्यातील काही व्यंगचित्रांचे माझ्या सवयीने स्वैरानुवादाने मराठीकरण केले आहे.हि व्यंगचित्रे वाचकांचा आनंद द्विगुणीत करतील ह्यात शंका नाही.चला तर मग ....... त्यांची काही व्यंगचित्रे येथे पहावयास मिळतील.

लेखनविषय: दुवे:

Comments

व्यंगचित्रे आवडली

पांडुरंगरावांची व्यंगचित्रे आवडली. विशेषतः पाणी वाचवण्याबाबतची.

आवडली.

व्यंगचित्रे आवडली.

ह्यांचा प्रोफाईल बघितला असता हे गृहस्थ १-२ किंवा १०-२०नव्हे तब्बल ६२ ब्लॉग चालवतात/लिहितात /त्यांच्या व्यंगचित्रांनी रंगवतात हे बघितल्यावर आश्चर्य चकित होऊन आपोआपच तोंडात बोट जाते.

अरे बापरे! :-)

चित्रे

चित्रे आवडली. पाणी वाचवण्याबाबतची आणि विशेषतः तोंडात तापमापी धरलेल्या आणि उत्तर ध्रुवावरचे बर्फ वितळून सांडणार्‍या पृथ्वीचे चित्र विशेष आवडले. ह्या व्यंद्यचित्रांचे मराठीकरण कोणी केले आहे? (पांडुरंगराव कानडी आहेत असा उल्लेख लेखामध्ये असल्याने हा प्रश्न पडला.)
____________________________________
माझ्या अनुदिनी - वातकुक्कुट आणि विवस्वान

प्रती वरदा यांस,

त्या सर्व व्यंगचित्रांचे मराठीकरण मी स्वतःच केले आणि श्री.पांडुरंगाराव ह्यांना त्यांच्या पूर्वपरवानगी करिता विचारणा केली आणि विशेष म्हणजे त्यांनी मी "मराठीकरण" म्हणजे नक्की काय करणार हे त्यांना निश्चित माहित नसताना देखील मला ग्रीन सिग्नल देऊन नंतर तेथे भेट दिली त्याचे कौतुक करून आपला अभिप्राय नोंदवला.एका मोठ्या कलाकाराचा मला आलेला हा एक सुंदर अनुभव.स्व प्रसिद्धी किंवा कौतुका पेक्षा निव्वळ "उपक्रम"च्या माध्यमातून फक्त ह्या ज्येष्ठ व्यंगचित्रकाराची ओळख जास्तीत जास्त मराठी वाचकां पर्यंत पोहोचावी ह्या सद्हेतूनेच हे पोस्ट मी येथे पुनर्प्रसिद्ध केले."व्यंगचित्र कला हि आजच्या काळात दुर्मिळ होत चाललेली कला आहे,आजच्या तरुणांना हि किंवा अशा प्रकारची चित्रे पाहून जर काही स्फूर्ती मिळाली तर आपल्या सारख्या वाचकांच्या चेहेऱ्यावर ह्या धकाधकीच्या जीवनात किमान स्मित रेषा उमटलेली आपल्याला नक्कीच आवडेल.. नाही का?

चुकलेला वन मॅन शो

श्री.बी.व्ही.पांडुरंगराव यांच्याविषयी अत्यंत आदराने तसेच प्रेमाने लिहिलेला लेख वाचल्यानंतर मी एका आनंदाला केवळ वेळ नाही म्हणून कसा मुकलो याची तीव्रतेने आठवण झाली. तीन-चार वर्षापूर्वी बंगलोरस्थित भाचीकडे घरगुती कार्यक्रमासाठी मुक्कामाला होतो आणि तिच्या नवर्‍याने जाण्याच्या अगोदर एकच दिवस "मामा, तुम्हाला आज एका वन मॅन शो कार्यक्रमाला घेऊन जाणार आहे" अशी आगावू सूचना दिली असूनही केवळ गाडीचे रिझर्व्हेशन त्या अगोदर हातात आले म्हणून त्या कार्यक्रमाला जाऊ शकलो नाही. तिथून निघण्यापूर्वी काहीशा नाराज झालेल्या भाचीच्या नवर्‍याने 'निदान कार्यक्रम सादर करणार्‍या व्यक्तीविषयीतरी गाडीत वाचा" म्हणून एक लीफलेट दिले आणि ते होते नेमके श्री.बी.व्ही.पांडुरंगराव यांच्या या क्षेत्रातील थक्क करणार्‍या प्रवासाविषयीच. भारतातच नव्हे तर बाहेरील कित्येक देशातून त्यांच्या कलेचा झालेला गौरवाचा त्या लीफलेटमध्ये उल्लेख होता - विशेषतः कोरियामध्ये तर त्यांच्या नावाने फॅनक्लब आहेत असे दिसत्ये. हल्ली वयोमानानुसार श्री.पांडुरंगराव यानी ते वन मॅन शो थांबविल्याचे समजते, खात्री नाही.

(श्री.मायनॅक यानी वानगीदाखल निवडलेल्या कार्टून्सचे अत्यंत चपखलपणे मराठीकरण केल्याचे जाणवले.)

एका चांगल्या कलाकाराची इथे ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.

अशोक पाटील

श्री.बी.व्ही.पांडुरंगाराव

पाटील साहेब ,
आपली "ती" संधी हुकली हे वाचून नक्कीच वाईट वाटले.खरे तर त्यांची व्यंगचित्रे बघितल्यावर त्या खालील"पांडुरंग"हे मराठी नाव वाचूनच,त्यांच्या विषयीची माझी उत्सुकता वाढली आणि मागोवा घेण्याचा योग आला.आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

 
^ वर