मारिओ मिरांडा

1970 च्या दशकातील काही वर्षे मी मुंबईला नोकरी करत असे. अंधेरीला राहून रोज सकाळी लोकल ट्रेन पकडायची. मुंबईच्या प्रसिद्ध डबेवाल्यांमार्फत आलेला डबा लंच टाईम मधे खायचा व संध्याकाळी परत एकदा लोकल ट्रेनमधला गर्दीचा प्रवास करायचा असा माझा मुंबईच्या इतर हजारो किंवा लाखो चाकरमान्यांसारखा दिनक्रम असे. त्या वेळी करमणुकीची काही फारशी साधनेच उपलब्ध नव्हती. सिनेमा म्हणजे बहुधा हिंदी सिनेमे, ते सुद्धा ठराविक ठशाचे, हिरो, हिरॉइन, खलनायक, गाणी शेवटी ठिश्यां ठिश्यां! आणि गोड अखेर, या धर्तीचे! मासिके सुद्धा फारशी नसत. आणि जी काय मिळत त्यांची छपाई तितपतच असे. याच काळात नंतर इंदिरा गांधीनी आणीबाणी लागू केली. सर्वसामान्य माणसाचे जीवन आणखीनच नीरस व कळाहीन बनले.

या सर्व काळात चेहर्‍यावर स्मिताची रेषा हमखास उमटवू शकतील अशा दोनच गोष्टी होत्या. यातली पहिली गोष्ट म्हणजे अर्थातच आर.के लक्ष्मण यांची कॉमन मॅनची रोजची 'यू सेड इट' व्यंगचित्रे आणि दुसरी म्हणजे टाईम्स व इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया मधे प्रसिद्ध होणारी ' मारिओ मिरांडा' या व्यक्तीची व्यंग चित्रे. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे साधी - सोपी असत. त्यात एक किंवा दोन व्यक्ती असत. या उलट मारिओ मिरांडा यांची व्यंग चित्रे पानभर, त्यात शंभर, दोनशे तरी व्यक्ती व यातल्या अनेक व्यक्तींच्या तोंडातून निघालेली मुक्ताफळे, यामुळे एक व्यंग चित्र बघायला किंवा वाचायला निदान 15/20 मिनिटे तरी लागत. जितका जास्त वेळ हे व्यंगचित्र बघावे तितकी जास्त जास्त मजा येत असे. खूप विशाल वक्षस्थळे असलेली स्त्री, गांधी टोपी घातलेले पुढारी, मुंबईचा शेटजी किंवा गोव्यातली कोळीण ते इतक्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने काढत की मारिओ यांचे व्यंगचित्र आले आहे हे लगेच कळत असे.
गोव्यामधला मासळी बाजार किंवा मुंबईच्या रस्त्यावरचा सीन यांचे व्यंगचित्र म्हणजे एक संपूर्ण लेख किंवा कथा असे. लोकलमधून जाताना हातात मारिओचे व्यंगचित्र असले की प्रवास कधी संपत असे ते कळतच नसे.मारिओंनी साकार केलेल्या मिस निंबूपाणी सारख्या व्यक्तीरेखा मी आयुष्यात कधी विसरणे शक्य नाही.
टाईम्स ऑफ इंडिया मधल्या नोकरीतून निवृत्त झाल्यावर मारिओ मिरांडा हे गोव्यात रहात असत हे मला खूप वर्षे माहीतच नव्हते. अगदी अलीकडे काढलेली मुंबईचे रस्ते, प्रसिद्ध ठिकाणे याबद्दलची त्यांची व्यंगचित्रे सुद्धा इतकी अचूक असत की मी त्यांना मुंबईकरच समजत होतो.
आज वयाच्या 85व्या वर्षी या कलाकाराच्या हातातला कुंचला, चित्रे रंगवण्याचे काम सोडून एकदम थांबला आहे. मारिओ मिरांडा आता नाहीत.
तत्कालीन शासनाच्या तथाकथीत समाजवादी धेय धोरणांमुळे भारतात राहणार्‍या माझ्या पिढीच्या तरूणपणातील नीरस आणि कंटाळवाण्या आयुष्यात, आपल्या चित्रांनी आनंदाचे दोन क्षण आणणार्‍या मारिओना माझी श्रद्धांजली.
मला आवडलेली मारिओ यांची काही शेलकी व्यंगचित्रे या दुव्यावर बघता येतील.

Comments

दुवा

लेखातील दुवा दिसत नसल्याने येथे परत देत आहे.
चन्द्रशेखर

आदरांजली

मिरांडा यांना आदरांजली! त्यांनी व्यंगचित्रे रोचक आणि मार्मिक असत!

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

आदरांजली

मिरांडा यांची चित्रे फार लक्षात राहण्यासारखी असत. माझ्या वडिलांनी मला प्रथम या कलाकाराच्या चित्रांकडे बघायला शिकवले हे आठवते.

ही एक बातमी - बेनेगलांचा त्रिकाल मारिओ यांच्या कुटुंबावर आधारित आहे अशी माहिती मिळाली. (हे अर्थातच मला माहिती नव्हते).

'त्रिकाल'

'त्रिकाल'ची कथा मिरांडा कुटुंबावर आधारित आहे की नाही ते ठाऊक नाही पण त्या चित्रपटाचे चित्रीकरण मात्र मिरांडा यांच्या महालसदृश घरात झालेले आहे.गोव्यातल्या लोटली या गावात असलेले हे घर म्हणजे एक पोर्ट्युगीझ् कालीन विला आहे. या घराला तीस खोल्या आहेत आणि त्या सर्व उत्तम जपलेले पोर्ट्युगीझ् कालीन फर्निचर् आणि मारिओ यांची व्यंगचित्रे यांनी सजलेल्या आहेत.
मारिओ हे माझे अत्यंत आवडते व्यंगचित्रकार होते. खूपश्या बारीकबारीक तपशिलाने भरलेल्या त्यांच्या व्यंगचित्रातून ते तपशील हुडकून काढणे हा एक बुद्धिगम्य आनंद होता.जितके निरखावे तितके अधिकाधिक तपशील दिसू लागत आणि एखाद्या गुंतागुंतीच्या कोड्याची उकल केल्याचे समाधान मिळे. मुंबईचा बहुढंगी गजबजाट ते त्यांच्या 'गर्दीचित्रां'तून मूर्तिमंत उभा करीत. त्यांच्या त्या मासळीची टोपली डोक्यावर घेतलेल्या कुर्रेबाज कोळणी,त्या मासळीभोवती घिरट्या घालणारे कावळे,त्यातील एखादा मासा वरच्यावर अलगद लंपास करणार्‍या कावळ्याच्या डोळ्यातला धूर्तपणा,कावळ्याच्या तोंडातून एखादा मासा सुटून खाली पडेल या आशेने आजूबाजूला घोटाळणारी कुत्री मांजरे,टपून बसण्याच्या स्थितीतल्या त्यांच्या शरीराचा तो सावध पण लाचार बाक(बेंड्) सारेच अप्रतिम असे.एवढेच नव्हे तर पार्श्वभूमीवर हातगाड्या,टॅक्सीझ्,बसेस अशा वाहनांनी भरलेले रस्ते,बसमधून थुंकीची पिचकारी उडवलेला आणि ती पिचकारी बस च्या बाहेर झेलावी लागलेला अशी दोन माणसे अश्या अगणित डीटेल्स् ची कशिदाकारी ते चित्रात काढीत.
त्यांची 'मिस् फन्सेका' सतत आठवत राहील.
त्यांना आदरांजली.

अगदी

>खूपश्या बारीकबारीक तपशिलाने भरलेल्या त्यांच्या व्यंगचित्रातून ते तपशील हुडकून काढणे हा एक बुद्धिगम्य आनंद होता.

अगदी.

मुंबायचो कार्टुनिस्ट

मिरांडा गोवेकर वगैरे असतील पण ते अस्सल मुंबईचे कार्टुनिस्ट होते. विशेषतः राही यांनी म्हटल्याप्रमाणे मुंबईच्या कोळणी, मासळी, त्यावर घिरट्या घालणारे कावळे वगैरे चित्रे फार आवडत.

मागे एखाद्या सिरिअलच्या टायटल्सच्या पार्श्वभूमीवर त्यांची व्यंगचित्रे येत का? नेमकं आठवत नाही.

मालगुडी डेज

माझ्या आठवणीप्रमाणे ती सिरियल मालगुडी डेज ही होती पण त्याची रेखा चित्रे लक्ष्मण यांची होती.

चन्द्रशेखर

मालगुडी नाही

मालगुडी डेज आणि आताही आर. के. लक्ष्मणच्या कॉमन मॅनवर सिरिअल येते त्यांनां लक्ष्मणची चित्रे आहेत. पण इतरत्र टायटल्सच्या मागे मिरांडांची चित्रे पाहिल्यासारखे वाटते. सिरिअल का चित्रपट ते आठवत नाही. कदाचित चूक असावी.

मिले सूर मेरा तुम्हारा मध्ये मारिओ कार्टून काढताना दिसतात असे वाटते. कदाचित तेच मला आठवत असावे. चू. भू. द्या घ्या

असो.

मिरांडा यांना आदरांजली!

मिरांडा यांना आदरांजली!

मी जेंव्हा वयात येत होतो तेंव्हा त्यांची व्यंगचित्रे जी वर्तमान पत्रा व्यतीरीक्त येत असत, कदाचित दिनदर्शिका अथवा कोणत्यातरी मासिकातील असावीत, मन लावून, अगदी आवडीने पहात असे. कारण भल्या मोठ्या चित्रात ही प्रत्येक छोट्या-छोट्या चित्रामध्ये काहितरी स्टोरी आहे असे जाणवायचे. जास्त वेळ पाहिल्यावर ती चित्रे मला चलतचित्रेच आहेत असे वाटू लागायची. त्यातील स्त्रीयांची चित्रे मी आंबट शौकिनासारखी पहात असे.

स्मरण

समयोचित स्मरणलेख आवडला. मिरांडा यांनी व्यंगचित्रकलेचे कोणतेही औपचारिक प्रशिक्षण घेतलेले नव्हते हे वाचून नवल वाटले. जन्मजात प्रतिभा म्हणतात ती हीच तर. त्यांच्या चित्रांत काळानुरुप होत गेलेला बदलही रोचक आहे. उत्तरोत्तर त्यांची चित्रे अधीक धीट होत गेली.
मिरांडा यांना आदरांजली. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे भारतीय लोक झपाट्याने काळाच्या पडद्याआड जात आहेत आणि इतर बरेच रांगेत उभे असल्यासारखे आहेत ही कातर करुन टाकणारी जाणीव आहे. (किंवा वय झाल्याचे लक्षण आहे!)
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

वय झाल्याचे लक्षण

मारिओ मिरांडा यांच्या व्यंगचित्रांचा मी सुध्दा चाहता (फॅन) आहे. त्यांना मनःपूर्वक आदरांजली. मारिओ मिरांडाच्या चित्रांवरून ते नेहमी मला तरुण, मिश्किल आणि रसिकच वाटायचे. त्यांनी व्यंगचित्रे काढणे नेमके कधी थांबवले (होते की नाही?) ते ठाऊक नाही, पण त्यांनी पूर्वी काढलेली चित्रेसुध्दा आता आताच पाहिल्यासारखी वाटतात, इतकी त्यांची स्मृती खोलवर रुतून बसली आहे.
थोडेसे अवांतरः साठी उलटलेल्या वरिष्ठ नागरिकाला एका माणसाने विचारले, "कोणाला वृध्द म्हणायचे?"
त्याने उत्तर दिले, "थांबा, मी माझ्या वडिलांना विचारून सांगतो."
त्याचे वडील लिथेच होते. त्यांनी सांगितले, "माझ्याहून दहा वर्षांनी मोठ्या लोकांना वृध्द म्हणायला माझी काही हरकत नाही."
थोडक्यात आपले वय झाल्याचे लक्षण कोणालाच स्वतःत दिसत नाही. आणि तेच माझ्या मते चांगले आहे.

 
^ वर