असली क्या है, नकली क्या है ...

इंग्लंडचा ड्यूक ऑफ एडिनबरो, प्रिन्स चार्लस् यांची सुंदर पत्नी, प्रिन्सेस् डायना ऑफ वेल्सचा 30 ऑगस्ट 1997 रोजी पॅरिस जवळील एका बोगद्यात चालकाच्या निष्काळजीपणामुळे कार अपघातात मृत्यू झाला. तिच्या या अकाली व अपघाती मृत्युमुळे अनेकांना चांगलाच धक्का बसला. कदाचित कुणीही ओक्साबोक्षी रडले नसतील. परंतु प्रत्येक मोठमोठ्या शहरातील ब्रिटिश कॉन्सुलेट किंवा लायब्ररीच्या ठिकाणी पुष्पगुच्छ ठेवण्यासाठी आलेल्यांची लांबची लांब रीघ लागली होती. भावना व्यक्त करण्यासाठी दोन -तीन ओऴी लिहिणार्‍यांची संख्यासुद्धा कमी नव्हती.

तिची मर्सिडीस बेंझ गाडी अपघातात चक्काचूर झालेली होती. कार म्हणून त्यात काही शिल्लक राहिले नव्हते. तरीसुद्धा ब्रिटिश शासन आपल्या जुन्या (व जुनाट!) गोष्टी जपवून ठेवण्याच्या परंपरेप्रमाणे ती गाडी दुरुस्त करून संग्रहालयात ठेवण्यासाठी प्रयत्न करू लागली. ब्रिटनला भेट देणार्‍या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ही एक चांगली वस्तू असेल याची प्रशासनाला खात्री होती. त्या गाडीभोवती अनेक दंतकथा पसरत होत होत्या. ब्रिटिश प्रेसमध्ये रोज याविषयीच्या काहीना काही बातम्या येतच होत्या. सर्व कायदेशीर बाबी हाताळत अपघातग्रस्त कारचा ताबा प्रशासनानी मिळवला. गाडीची दुरुस्ती जग्वारच्या वर्कशॉपमध्ये अत्यंत गुप्तपणे चालली होती. काम जवळ जवळ संपत आले होते. वर्कशॉपचा मॅनेजर खूश होता.

परंतु जगातला एक कुख्यात गुन्हेगार व कार चोर म्हणून नावाजलेला मेंफिस रेने ('Gone in Sixty Seconds' चित्रपट) मात्र जग्वारच्या वर्कशॉपमधील मॅनेजरवर जाम चिडला होता. मेंफिसला प्रिन्सेसची गाडी चोरून कुवेतच्या एका श्रीमंत सुलतानाला विकून भरपूर कमाई करायची होती. याविषयी त्याची बोलणीही झाली होती. जेव्हा मेंफिस रेने वर्कशॉपमध्ये पाय ठेवला तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण वर्कशॉपमध्ये हुबेहूब दिसणार्‍या दोन गाड्या उभ्या होत्या. रेनेने मॅनेजरच्या कपाळावर पिस्तूल रोखून
" जीव प्यारा असेल तर यांच्यातली डायनाची खरी गाडी कोणती हे लवकर सांग"
असा दम भरला. मॅनेजर मात्र अत्यंत थंडपणे
" तू कुठल्या अपेक्षेने आलेला आहेस त्यावर गाडीचा अस्सलपणा अवलंबून आहे. जेव्हा डायनाची गाडी दुरुस्तीला येथे आली तेव्हा त्यातील बहुतेक पार्टस् बदलावे लागतील याचा अंदाज आम्हाला आलेला होता. आम्ही त्या गाडीचे एकेक निकामी पार्ट काढत गेलो व शेवटी बहुतेक सगळे पार्टस् बदलत गाडी उभी केली. त्याच वेळी माझे काही निष्णात कामगार हेच जुने पार्टस् वापरून अजून एका गाडीची जोडणी करू लागले. डावीकडे असलेली नवीन पार्टस् वापरून केलेली गाडी व उजवीकडे असलेली जुने पार्टस् वापरून उभी केलेली गाडी"
" परंतु यापैकी डायनाची गाडी कोणती?"
मला जेवढे माहित आहे तेवढे मी तुला सांगितले आहे. याच्यानंतर तुला काय करायचे ते तू कर" मॅनेजर तणतणला.
मेंफिस रेने मात्र डोके खाजवत या दोन्ही गाड्या कसे घेवून जाता येईल या विचारात.......

Source: Leviathan - Thomas Hobbs (1651)

तत्वज्ञान नेहमीच अज्ञाताच्या शोधात असते. एखाद्या घटनेची इत्थंभूत माहिती मिळवूनसुद्धा ज्यांची योग्य उत्तरं सापडत नाहीत याबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न ती करत असते. परंतु वर उल्लेख केलेल्या घटनेत दोन्ही गाड्यांबद्दलची सर्व माहिती मिळवूनसुद्धा प्रश्न अनुत्तरित राहिल्याचे आश्चर्य वाटू लागते.

यातील डायनाची गाडी कोणती याबद्दल काहींच्या मनात तरी शंका असण्याचे कारण नाही. ते उत्स्फूर्तेतेने पटकन गाडीची निवड करू शकतील. फक्त त्यांची निवड ज्याप्रकारे या दुर्घटनेकडे ते बघतात यावर अवलंबून असेल. मेंफिस रेने हा डिटेक्टिव्ह असल्यास व डायनाच्या तथाकथित अपघाती मृत्युसंबंधी forensic पुरावे गोळा करण्याच्या प्रयत्नात असल्यास तो नक्कीच जुने पार्टस वापरून उभे केलेल्या गाडीची निवड केली असती. जर तो पुरातन वस्तूंच्या संग्रहाचा शौकीन असल्यास याच गाडीकडे बोट दाखवेल.

परंतु गाडीच्या मालकीहक्कासंबंधी वाद असल्यास दुरुस्त झालेल्या नवीन गाडीलाच डायनाची खरी गाडी म्हणून ओळखेल. कारण याच गाडीत बसून तो आरामात driving करत गाडी बाहेर काढली असती. दुरुस्तीच्या काळातील वर्कशॉपमधील CCTV वरील नोंदी पाहिल्यास दुरुस्त केलेली गाडी अगोदर तयार झालेली व नंतर दुसरी जुन्या पार्टची गाडी उभी राहिलेली दिसेल. त्यामुळे सातत्याचाच विचार झाल्यास पहिल्या गाडीलाच मान्यता मिळेल.

यानंतर तुम्ही खरीखुरी गाडी कोणती हा प्रश्न विचाराल. याचे एकमेव असे ठाम उत्तर असणार नाही. तुम्ही ज्या दृष्टीने गाडीकडे बघत आहात त्यावर ते अवलंबून असेल. परंतु हे उत्तर गोंधळात भर घालणारी ठरेल. माणूस प्राणीसुद्धा या गाडीसारखाच नाही का? आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे आमच्यातील अनेक अवयवांच्या पेशी मरून जात असतात व त्यांची जागा जन्माला आलेल्या नव्या पेशी घेत असतात. चयापचय वा चलनवलन यात थोडासुद्धा फरक न जाणवण्याइतपत बिनबोभाट ही अदलाबदल सतत होत असते. वयोमानाप्रमाणे आपले विचारही बदलत असतात. वयाच्या दहाव्या वर्षीचे विचार विसाव्या वर्षी नसतात. तिसाव्या वर्षी आणखी वेगळे. 40 -50 ला तर पूर्णपणे बदललेले. आपले विचार, आपल्या आठवणी, आपली मतं (convictions), आपला स्वभाव (dispositions)... या सगळ्यात मोठ्या प्रमाणात बदल होत असतात हे आपण नाकारू शकत नाही. काही गुणविशेष काळाच्या पडद्यामागे जातात; काहींचा नव्याने शिरकाव होतो. त्यामुळे आपण पूर्वी जसे होतो तसे आपण आज आहोत का? आपण आपला अस्सलपणा हरवून तर बसलो नाहीत ना?

डायनाची अस्सल गाडी कोणती हे आपण ओळखत नसल्यास यात तुमची चूक नाही. इतर वस्तूंसुद्धा अशाच प्रकारे बदलत बदलत आपल्यापर्यंच पोचत असतात. त्यामुळे अस्सल कोणते व नक्कल कोणते यावर चर्वितचर्वण न करता जे समोर आहे व ज्यात तुमचे interest गुंतलेले आहेत त्यांची निवड करून मोकळे व्ह्यायला हरकत नसावी.

परंतु माणसांच्या बाबतीतसुद्धा हाच पवित्रा आपण घ्यावा का?

लेखनविषय: दुवे:

Comments

मनुष्य आणि त्याची ओळख

नानावटी सर , सर्वप्रथम मी आपल्या लिखाण पद्धतीला सलाम करतो कारण एव्हढा क्लिष्ट विषय आपण अतिशय वेगळ्या पद्धतीने सुरुवात करून आल्हाद त्याला हात घातलाय...!
असो.आता विषयासंबंधी.माझा या विषयात कवडीचाही व्यासंग नाही परंतु लहान तोंडी मोठा घास घेतोय, सांभाळून घ्या.माझ्यामते प्रत्येकाची खरी ओळख हि त्याचे विचार असतात.जरी ते वयोमानपरत्वे बदलत असतील तरीही.कारण जरी प्रत्येक वयात त्याच गोष्टी संबंधी जरी वेगवेगळे विचार त्या वयाच्या 'उमज आणि समज' प्रमाणे येतात तरी खरी ओळख त्याच्या प्रकटी करणावर असते. बहुतांशी लोक विचारांच्या अभावाने 'जन्माला आला हेला आणि पाणी भरता भरता मेला' अश्या प्रकारे आपला जीवनक्रम व्यतीत करतात.खरे तर मनुष्य देहापेक्षा त्याचे विचार अमर आहेत. त्यामुळे जरी जीवन चक्रात मनुष्य देह बदलत असला तरी तो विचाराने ओळखला जातो....
चू.भू.दे.घे.

छान.

लेख आणि त्यातला विचार चिंतनीय आहेत.

परंतु माणसांच्या बाबतीतसुद्धा हाच पवित्रा आपण घ्यावा का?

हा प्रश्न महत्वाचा आहे. एकाच नदीत दोन वेळा हात घालता येत नाही असे म्हणतात. तद्वतच आज भेटलेला माणूस उद्या किंचित बदललेला असतो. काळाची थोडीशी पुटे त्याच्या मनावर आणि शरीरावर चढलेली असतात. हा बदल सूक्ष्म असल्याने लगेच लक्षात येत नाही, पण एखाद्या माणसाला अनेक वर्षांनी अचानक भेटल्यावर 'तो बदलला आहे' असे आपल्याला जाणवत राहते. कदाचित त्यालाही आपल्याबद्दल असेच जाणवत असावे.
एखाद्या विषयाबद्दल माझ्या दोन प्रतिपादनांत विसंगती आढळली, तर माझे नंतरच्या काळात केले गेलेले विधान ग्राह्य धरावे, असे गांधीजी म्हणत. कारण माणूस काळाबरोबर शिकत किंवा बदलत जातो यावर त्यांची श्रद्धा होती. ओशोचेसुद्धा त्याच्या विचारांतील विसंगतीबद्दल असेच काहीसे स्पष्टीकरण आहे, असे आठवते. एका (प्लायवूडच्या) जाहिरातीत एक किरकोळ गुन्ह्याचा खटला कसा वर्षानुवर्षे चालत असतो, आणि त्यातले सर्व लोक- न्यायाधीश, वकीलबाई, आरोपी कसे म्हातारे होत जातात (फर्निचर मात्र नवेच राहते) असे दाखवले आहे. व्यवहारातही असे काही खटले दिसतात. काही दशकांपुर्वी केलेल्या कृत्याची सजा एखाद्याला मिळते, तेव्हा ते चूक की बरोबर हे ठरवता येत नाही. कायद्याने याबद्दल 'सज्ञान होण्याचे वय' हा निकष ठरवला आहे, असे दिसते. म्हणजे अमुक एक वयानंतर तुमच्या विचारांची / कृत्यांची जबाबदारी तुम्हाला घ्यावीच लागते, भले कालांतराने तुम्ही त्याबद्दल संपूर्ण बदललेले असा...

असो, हे लिखाण जरासे विस्कळीत झाले आहे. तज्ञांची मते वाचायला आवडेल.

ता.क.- सदर विषयासंदर्भात अनंत ढवळे यांचे काही शेर आठवले,ते इथे देतो आहे. धोरणात बसत नसल्यास रद्द करावेत.

ध्येयवेडा पोरगा तो कोण होता?
थेट माझ्यासारखा तो कोण होता?

पाहिले कित्येक दिवसांनी स्वतःला
आणि जो दिसला मला तो कोण होता...

पर्याय

माणसे बदलतात, कदाचित पुन्हा पुन्हा सुध्दा बदलतात, हे खरे आहे, पण कोण्त्याही क्षणी तो बदललेला एकच माणूस शिल्लक असतो. त्याचा पूर्वीचा अवतार अंतर्धान पावलेला असतो. त्याची आठवण काढता येते, तो माणूस मिळत नाही. त्यामुळे उदाहरणात दिल्यासारखे दोन पर्याय कोणत्या ही क्षणी उपलब्ध नसतात.

समोरचा माणूस असली आहे की तो ढोंग करत आहे हे ठरवणे एवढाच उद्देश असेल तर त्याची परीक्षा घ्यावी लागेल आणि असली नकली यांचा निवाडा करावा लागेल. पण लेखाचा उद्देश तो दिसत नाही.

डायनाच्या गाडीच्या चॅसिससकट एकूण एक पार्ट जर चक्काचूर झालेले असले आणि बदलले गेले असले तर जुनी गाडी राहिलीच कुठे? ती मूळची गाडी जर मागणीबरहुकूम तयार केलेली (टेलरमेड) असेल तर तशाच आणखी दोन गाड्या पुन्हा बनवल्या गेल्या एवढाच त्या दुरुस्तीच्चा अर्थ होईल. संग्रहालयात ठेवण्यासाठी त्या चक्काचूर झालेल्या गाडीला त्याच तुटक्या मोडक्या अवस्थेत ठेवण्यात काही अर्थ आहे.

नानावटी सरांचे लिखाण थोडे गूढ असते. त्यातली ग्यानबाची मेख कदाचित माझ्या लक्षात आली नसेल.

सहमत आहे

माणसे बदलतात, कदाचित पुन्हा पुन्हा सुध्दा बदलतात, हे खरे आहे, पण कोण्त्याही क्षणी तो बदललेला एकच माणूस शिल्लक असतो.

आणि जे काही शिल्लक आहे किंवा जे काही पूर्वी होते त्याला असली-नकली नक्कीच म्हणता येत नाही. बाल्यावस्थेतून तारुण्याकडे जाताना किंवा तारुण्याकडून मध्यमवय आणि मध्यमवयाकडून वार्धक्याकडे जाताना जे बदल होतात ते होताना आधीची अवस्था नकली असते असे म्हणता येत नाही.

डाएनाच्या जॅग्वारवरला जॅग्वार कोणी काढून घेतला आणि स्वतःच्या गाडीवर बसवला आणि तिलाच जॅग्वार म्हणायला सुरुवात केली तर त्याला नकली म्हणता येईल. अन्यथा, जॅग्वारच्याच वर्कशॉपमध्ये पार्ट बदलले तर नकली हा पर्याय बाद आहेत.

एकंदरीत उदाहरण गंडलेले वाटले. पूर्वी अशा प्रकारच्या गोष्टी येत -

एका मोठ्या अपघातात रमेश आणि सुरेश यांना जबर मार लागतो आणि दोघे जखमी होतात. रमेशचा मेंदू निकामी होतो आणि शरीर ठीक ठाक असते तर सुरेशचे शरीर चक्काचूर होते पण मेंदू ठीक असतो. स्वतंत्ररीत्या दोघांना वाचवणे डॉक्टरांना शक्य नसते म्हणून डॉक्टर सुरेशचा मेंदू रमेशच्या डोक्यात बसवतात. तर मग ही व्यक्ती सुरेश म्हणून ओळखावी की रमेश म्हणून?

बहुधा हेच गुळगुळीत उदाहरण येथे योग्य ठरले असते.

असो. बाकी डाएना आणि जॅग्वार गाडी दोन्ही आवडत असल्याने गोष्ट वाचायला मजा वाटली.

मांडणी आवडली.

यावरून अलिकडेच वाचनात आलेली ही कविता आठवली.

दृष्टीकोन

नानावटी साहेब लेख आवडला.
आपण म्हणता त्या प्रमाणे "त्यामुळे अस्सल कोणते व नक्कल कोणते यावर चर्वितचर्वण न करता जे समोर आहे व ज्यात तुमचे interest गुंतलेले आहेत त्यांची निवड करून मोकळे व्ह्यायला हरकत नसावी.

परंतु माणसांच्या बाबतीतसुद्धा हाच पवित्रा आपण घ्यावा का?"

ह्या देशातील राजकारण्यांच्या बाबतीत गेली ६३ वर्षे जनता हेच करत आली आहे.

 
^ वर