गुलाबांच्या रोपट्यांची निगा

झाडांची आणि रोपट्यांची निगा राखणारा नीलपक्षी यांचा सुंदर ब्लॉग मला वाचायला मिळाला. त्यातील गुलाबांच्या झाडांवरील लेखाने विशेष लक्ष वेधले. गुलाबाचे नवीन रोपटे कसे तयार करावे, कलम कसे तयार करावे या विषयी मला माहिती हवी होती पण हवी तशी माहिती न मिळाल्याने तो विषय मी तेथेच सोडून दिला होता.

नीलपक्षी यांच्या ब्लॉगवर गुलाबांवर हा लेख मिळाला.

माझ्याकडे गुलाबांतील विविध जातींपैकी हायब्रिड टी, हायब्रिड परपेच्युअल, पॉलिऍथा आणि बुश रोझ असे प्रकार आहेत. रंगांमध्ये वर्णन करायचे झाले तर मंद पिवळा, पिवळाधम्मक, गुलाबी, जांभळट-गुलाबी (Mauve), लाल, केशरी आणि दोन-रंगी (पांढरट पिवळा-केशरी) असे अनेक गुलाब आहेत परंतु मी कधीही कलम करून पाहिलेले नाही किंवा असलेल्या झाडांपासून नवीन रोपटे तयार केलेले नाही.

नीलपक्षींचा लेख वाचून काही प्रश्न पडले ते येथे मांडते -

  1. नवीन रोपटे लावायचे असल्यास फांदी केरेडिक्स पावडरमध्ये बुडवून घ्यावी असे लिहिले आहे. केरेडिक्स पावडर म्हणजे काय आणि ती कोठे मिळेल? (कृपया या प्रश्नाचे उत्तर इतरांनी [अमेरिकेतील सदस्यांनी] दिले तरी चालेल.)
  2. या पावडरमध्ये फांदी बुडवून लगेच काढावी की काही काळ त्यात ठेवण्याची गरज आहे?
  3. गुलाबाचा डोळा कापताना त्याची खोली किती ठेवावी? म्हणजे फांदीतील आतला पांढरट गरही हवा की बाहेरची पातळ साल आल्यास पुरेसे आहे?
  4. शाळेत असताना कलम करण्याची कृती मी पाहिली होती पण ती नेमकी आठवत नव्हती ती या ब्लॉगवरून पुन्हा नजरेस पडली. मी पाहिलेल्या कृतीत खोचलेल्या डोळ्याभोवती माती लिंपून तिला टेपने बंद केले होते. तसे करण्याची आवश्यकता आहे का?
  5. गुलाबाची छाटणी करताना ती एका विशिष्ट जागी (पुन्हा डोळ्यावर) करणे आवश्यक आहे का?

अधिक प्रश्न आठवल्यास नंतर विचारेन.

इतर सदस्यांना फुलझाडे, भाजीपाला यांच्या लागवडीबद्दल प्रश्न असल्यास ते येथे विचारता येतील.

Comments

उत्तरे-

नवीन रोपटे लावायचे असल्यास फांदी केरेडिक्स पावडरमध्ये बुडवून घ्यावी असे लिहिले आहे. केरेडिक्स पावडर म्हणजे काय आणि ती कोठे मिळेल?
केरेडिक्स (सेरेडिक्स) पावडर हे एक रूट हार्मोन आहे, जे मुळांच्या वाढीला चालना देते. ही पावडर मोठ्या प्रमाणात विक्री होणार्‍या झाडांच्या नर्सरीत उपलब्ध असते.

या पावडरमध्ये फांदी बुडवून लगेच काढावी की काही काळ त्यात ठेवण्याची गरज आहे?
या पावडरमध्ये फांदी बुडवून ती लगेच काढावी.

गुलाबाचा डोळा कापताना त्याची खोली किती ठेवावी? म्हणजे फांदीतील आतला पांढरट गरही हवा की बाहेरची पातळ साल आल्यास पुरेसे आहे?
गुलाबाचा डोळा कापतांना तो आतल्या थोड्या हार्डवूड (कठीण उतींसकट) कापा व नंतर हा डोळा उलटा करून त्यातला कठीण उतींचा (हार्डवूडचा) भाग चाकूने काढून टाकावा.
तसेच ज्या झाडावर (दोन डोळ्यांच्या मधल्या भागात) टी आकाराचा काप घ्याल तो काप सालीच्या आतील फिकट हिरव्या रंगाचा भाग दिसेल इतकाच खोल कापावा. ह्या फिकट हिरव्या रंगाच्या भागात कॅंबियम नावाच्या उती असतात. टी कापातील फिकट हिरवा भाग आणि डोळ्याच्या मागच्या भागातील फिकट हिरवा भाग यांचा एकमेकांना स्पर्श झाला पाहिजे म्हणजे ते दोन्ही एकत्र वाढून गुलाबाचे कलम यशस्वीरित्या तयार होते.
यासाठी खालील व्हिडिओचा दुवा देत आहे-
http://www.youtube.com/watch?v=9FKM-s8XXh8&feature=youtu.be">

अजून एक दुवा - http://www.love-of-roses.com/budding-roses.html

शाळेत असताना कलम करण्याची कृती मी पाहिली होती पण ती नेमकी आठवत नव्हती ती या ब्लॉगवरून पुन्हा नजरेस पडली. मी पाहिलेल्या कृतीत खोचलेल्या डोळ्याभोवती माती लिंपून तिला टेपने बंद केले होते. तसे करण्याची आवश्यकता आहे का?
गुलाबाच्या डोळ्या्वर नुसता सेलोटेप लावला तरी ते पुरेसे आहे. माती लावण्याची गरज नाही. मात्र डोळ्याला पाणी लागणर नाही याची काळजी घ्यावी.

गुलाबाची छाटणी करताना ती एका विशिष्ट जागी (पुन्हा डोळ्यावर) करणे आवश्यक आहे का?
गुलाबाचा डोळा जिथे भरला आहे, त्याच्या खालचे सगळे डोळे छाटून काढून टाकावे. तसेच आवश्यकता असल्यास त्या डोळ्याच्या वरच्या डोळ्यांवर फुटलेल्या फांद्याची छाटणी करावी. मात्र भरलेल्या डोळ्याच्या जागी व्यवस्थित फांद्या फुटल्या आणि त्यांची छाटणी केल्यावरही तो डोळा जळणार नाही इतपत मोठ्या फांद्या झाल्या, की मगच त्या फांद्यांची छाटणी करावी.

धन्यवाद आणि पुढील प्रश्न

प्रश्नांच्या सविस्तर उत्तरांबद्दल धन्यवाद.

तुम्ही दिलेला यू ट्युबचा दुवा गुलाबाच्या काट्यालाच गुलाबाचा डोळा म्हणत आहे असे वाटले. चू. भू. द्या. घ्या. मला वाटत होते की गुलाबाला जेथून कोंब फुटतो तो गुलाबाचा डोळा. नेमका फरक सांगाल का?

कलम करताना कोणता डोळा कुठल्या झाडावर कलम केला त्याचा फरक पडतो का?

उदा. पिवळ्या गुलाबावर लाल गुलाबाचा डोळा लावला किंवा लाल गुलाबावर पिवळ्या गुलाबाचा डोळा लावला तर येणार्‍या रंगांच्या शेड्समध्ये कसा फरक पडतो ते सांगता येईल का?

गुलाबाला जेथून कोंब फुटतो तोच गुलाबाचा डोळा असतो.

गुलाबाला जेथून कोंब फुटतो तोच गुलाबाचा डोळा असतो. यू ट्यूबच्या व्हिडिओत दिसणारा गुलाबाचा डोळाच आहे. गुलाबाचा काटा हा त्याच्या डोळ्यापेक्षा जास्त गडद रंगाचा आणि जास्त अणकुचीदार असतो.

ज्या झाडावर डोळा भरला जातो त्याला "स्टॉक" असे म्हणतात, तर ज्या झाडाचा डोळा बसवला जातो त्याला "सायन" असे म्हणतात. ह्या संकरणात स्टॉक झाडाकडून उंची आणि रोगप्रतिकारक क्षमतेसारखे गुणधर्म संकरित गुलाबात येतात, तर सायन झाडाकडून गुलाबाचा रंग आणि पाकळ्यांचा प्रकार असे गुणधर्म संकरित गुलाबात येतात.

कलम करतांना ज्या झाडाची व्हिगर (वाढण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती इत्यादी) जास्त असते अशा झाडावर (स्टॉकवर) कमी व्हिगर असलेला पण आकर्षक रंगाचा, किंवा पाकळ्यांचा गुलाबाचा डोळा (सायन) बसवतात. जर डोळ्याची (सायनची) व्हिगर जास्त असेल, तर कमी व्हिगरच्या स्टॉकवर तो नीट वाढणार नाही.

पिवळ्या गुलाबावर लाल गुलाबाचा डोळा लावला तर त्या डोळ्यावर येणारे गुलाब लाल रंगछटेचे असतील आणि स्टॉकच्या इतर फांद्यांवर येणारे गुलाब पिवळे असतील. सायन लाल गुलाबांच्या रंगछटेत त्यांच्या मूळ रंगछटेपेक्षा खूप जास्त फरक असणार नाही, पण थोडा फरक पडू शकतो. पण सायन गुलाब हे केशरी किंवा अबोली किंवा आंबारंग किंवा मिश्ररंग अशा रंगाचे असणार नाहीत. हाच प्रकार इतर रंगछटांच्या बाबतीतही असतो.

जर तुम्हांला लाल आणि पिवळा गुलाब वापरून केशरी किंवा अबोली किंवा आंबारंग किंवा मिश्ररंग अशा रंगाचे गुलाब मिळवायचे असतील तर त्यासाठी परागसिंचनाची पद्धत वापरून प्रयोग करून बघावे लागतील आणि त्या परागीभवनातून झाडाला धरलेल्या फळातील बिया रूजवून पहाव्या लागतील.

हे कसे करावे?

पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही दिलेली विस्तृत माहिती उपयोगी ठरेल.

जर तुम्हांला लाल आणि पिवळा गुलाब वापरून केशरी किंवा अबोली किंवा आंबारंग किंवा मिश्ररंग अशा रंगाचे गुलाब मिळवायचे असतील तर त्यासाठी परागसिंचनाची पद्धत वापरून प्रयोग करून बघावे लागतील आणि त्या परागीभवनातून झाडाला धरलेल्या फळातील बिया रूजवून पहाव्या लागतील.

हे कसे करावे? नवागतांना करणे जमेल का? प्रत्यक्षात गुलाबाच्या बिया रुजवून रोपटे कसे करावे याचीच कल्पना नाही.

परागसिंचनासाठी योग्य पद्धत कोणती? रंगाचे बारके ब्रश घेऊन भाज्यांसाठी परागसिंचन करून पाहिले आहे.

भाज्यांसाठी परागसिंचन .... त्याच पद्धतीने

रंगाचे बारके ब्रश घेऊन भाज्यांसाठी परागसिंचन करून पाहिले आहे.
त्याच पद्धतीने करायचे. एका रंगाच्या फुलातले पराग दुसर्‍या रंगाच्या गुलाबाच्या कळीच्या पाकळ्या उघडून त्यात लावायचे.

मी गुलाबाच्या बिया कधी रूजवून पाहिल्या नाहीत, त्यामुळे त्याबद्दल अधिक काही सांगू शकणार नाही.

 
^ वर