किरणोत्सर्ण, खाणी-अणुभट्ट्या आणि आरोग्य

'डॉन'मधे आज ही बातमी वाचली. भारतातील एकमेव युरेनियमच्या खाणीभोवतालच्या गावांमधे पाण्यातून रेडीयोअ‍ॅक्टीव्ह पदार्थांचा प्रादुर्भाव आरोग्यावर होऊ लागला आहे असे बातमीतील रिपोर्ट नमूद करतो. नुकत्याच झालेल्या फुकुशिमा येथील अणुभट्टीच्या दुर्घटनेमधे असा प्रादुर्भाव 'अपघात' किंवा 'नैसर्गिक आपत्ती' असल्यास होऊ शकतो हे जगाने पाहिले.
आपल्याकडे एकीकडे अणुभट्ट्यां उभारण्याची अहमिका लागलेली दिसते. दुसरीकडे स्वतःकडे एकही अणुभट्टि नसणारा ऑस्ट्रेलिया आपल्याला युरेनियम विकायला तयार आहे. मात्र, आपण अणुभट्ट्यांमागे असताना या बातमीवरून असे दिसते की अणुभट्टीतून/खाणीतून तयार होणार्‍या आण्विक कचर्‍याची विल्हेवाट लावणे आपल्याला जमत नाहिये किंवा ते शक्यच नाही. या बातमीवरून तुम्हाला काय वाटते?

  • आण्विक कचर्‍याची विल्हेवाट लावणे आपल्याला जमत नाहिये का? का या कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे तंत्रज्ञान अजुन तरी तयार व्हायचे आहे?
  • इतर देशांत, जसे अमेरिका, युरोपिय देश जिथे मोठ्याप्रमाणावर अणुभट्ट्या आहेत तिथे हा कचरा कसा संपवला जातो?
  • भारताने अणुभट्ट्यांसाठी घाई करावी का पुन्हा एकदा इराण पाईपलाईनसारखे इतर पर्याय चोखाळायला सुरवात करावी?
  • मुळ प्रश्न पुन्हा उभारहातो: भारतात अणुभट्टी - अणूउर्जा हवी असे तुम्हाला वाटते का?

अर्थात चर्चा याच प्रश्नांवर सिमीत नाहि/नसावी. प्रश्न केवळ दिग्दर्शनासाठी आहेत. याशिवाय अश्या गळतीमुळे आरोग्यावर काय परिणाम होऊ शकतात? ते कायमचे असतात की त्यावर इलाज आहेत? याबद्दलही माहिती असल्यास ती द्यावी.

माझे मत मी चर्चेच्या ओघात देईनच.

Comments

प्रचार आणि सत्य

यातला फरक ओळखता यायला हवा. कोठल्याही कारखान्यामधून विकीरण किती प्रमाणात बाहेर पडतात याची मोजदाद कसोशीने केली जाते, तसेच त्याबद्दल आंतरराष्ट्रीय निर्बन्ध असतात. त्याबद्दल कसलीही तांत्रिक माहिती न देता फक्त "आजार वाढले आहेत" असा ओरडा करणे हे जुने प्रचारतंत्र आहे. त्यांत केलेले दावे साफ खोटे निघालेले आहेत.
प्रश्नांना माझी उत्तरे अशी आहेत.
१.व्यवस्थित जमते
२. अणुकचरा कोणालाही नष्ट करता येत नाही. तो सांभाळून ठेवला जातो
३. इतर उपाय चोखाळायला कुणीच हरकत घेतलेली नाही. त्यांना पर्याय समजण्याचे कारण नाही. औष्णिक ऊर्जा हेच आपले मुख्य साधन पुढील अनेक दशकांसाठी असणार आहे. अणुशक्ती ही त्या इतर सर्व मार्गांनी मिळू शकणार्‍या ऊर्जेत आणखी भर टाकणारी जास्तीची ऊर्जा आहे.
४. हो. तिच्यामुळे देशाच्या विकासाला अधिक चालना मिळेल आणि लवकरच जेंव्हा नैसर्गिक वायू आणि तेल संपुष्टात येईल तेंव्हा हा मार्ग प्रस्थापित झालेला असेल.

अमेरिकेतील धुसमुसणारा राजकीय प्रश्न

यू. एस. अमेरिकेत हा प्रश्न धगधगत नसला, तरी गेली काही दशके धुसमुसत आहे. अणुभट्ट्यांतील वापरलेले इंधन शेकडो वर्षांपर्यंत प्राणिमात्रांना धोकादायक असू शकते. सध्या ते अणुभट्ट्यांच्या जवळच ठेवतात.

या धोकादायक कचर्‍याबाबत काय करावे? यासाठी प्रमुख मार्ग "भूकंप होणार नाही अशा ठिकाणी खोलवर पुरणे" असा कित्येक वर्षे विचारांत आहे. याकरिता "यका पर्वत" हे ठिकाण अग्रक्रमात होते. मात्र नेव्हाडा राज्यात या कल्पनेला मोठाच विरोध झाला. सध्याच्या यू. एस. केंद्र सरकारने ही योजना स्थगित केलेली आहे.

उत्सुकता

उत्सुकता:
-- समुद्रात-महासागराच्या गर्तांमधे कुठे खोलवर गाडता येईल का? नसल्यास कारणे ठाऊक आहेत का?
-- काहि औषधांमधे किंवा 'हेल्थकेअर' सेक्टरमधे युरेनिमयमचा(किरणोत्सर्गाचा) वापर होतो, तिथे या विज उत्पादनासाठी कचरा असला तती या सेक्टरमधे या कचरा वापरता येऊ शकतो का?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

चांगले प्रश्न

ज्या प्रकारच्या अभेद्य कवचांमध्ये ठेऊन हा कचरा सध्या साठवला जातो तशा प्रकारचे जास्तीचे वेष्टण घालून तो समुद्राच्या तळाशी ठेवता येईल. पण तो नुसताच खाली नेऊन ठेवला तर समुद्राच्या अंतर्गत चाललेल्या प्रवाहांमधून जागचा हलून इकडे तिकडे जाण्याची शक्यता आहे, तसेच त्यात आदळ आपट झाली तर त्या कवचामधून गळती होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी आणखी खोलवर खड्डा खणून तो त्यात पुरून ठेवावा लागेल. तांत्रिक दृष्ट्या हे सध्या महाकठीण आणि अत्यंत खर्चिक वाटत असले तरी भविष्यकाळात कदाचित यावर विचार होईल.
अभियान्त्रिकी व बैद्यकीय क्षेत्रांमध्ये इंडस्ट्रिअल रेडिओग्राफी, रेडिएशन थेरापी, ट्रेसर टेक्निक वगैरे अनेक प्रकारे किरणोत्सर्गाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. यासाठी विशिष्ट फ्रिक्वेन्सी किवा वेव्हलेन्ग्थ असलेल्या गॅमा किरणांचे विशिष्ट प्रमाणात उत्सर्जन करणारे स्त्रोत (सोर्स) मुद्दाम तयार केले जातात. अणुकचर्‍यामध्ये अनेक प्रकारच्या किरणोत्सर्गी द्रव्यांचे अनियमित (रँडम) मिश्रण असते. त्यामधून अशा प्रकारची नेमकी द्रव्ये शोधून ती वेगळी करण्यापेक्षा कोबाल्टसारख्या धातूपासून हवा तसा स्त्रोत बनवणे सोपे व स्वस्त असते. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित झालेले आहे. यासाठी रिऍक्टरचाच उपयोग केला जातो.

 
^ वर