अक्षरवेल
निसर्गकन्या", "सरस्वतीची लेक" या नावाने ओळखल्या जाणार्या बहिणाबाईंचे मराठी साहित्यात विशेष स्थान आहे.यांच्या नवाचा उल्लेख करताच " अरे संसार संसार ", मन वढाय वढाय" " माझी माय सरोसती " ही गाणी सहज ओठावर येतात. बहिणाबाई निसर्गाच्या सानिध्यात रुजल्या,वाढ्ल्या. पावसाने ओलचिंब झालेल्या मातीचा गंध त्यांच्या मनात दरवळुन तो मधुर शब्दात उमटत असे. मातीच्या सहवासात राहिलेल्या बहिणाबाईंच्या स्वभावात सहाजिकच काळ्याआईची सहनशक्ती,कणखरपणा मृदुता हे गुण उतरलेत. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांच्या रचनेत मातीची ओढ आणि आत्मियता प्रकर्षाने जाणवते. एखाद्या आईच्या मायेन त्यांनी मातीच्या कुशीत बीज अंकुरतांना,रुजतांना,वाढतांना अनुभवलं होतं.त्याचं सहज सोप्या भाषेत शब्दांकन केल :
उन वार्याशी खेयता
एका एका कोंबातून
पर्गटले दोन पान
जसे हात जोडीसान
दंग देवाच्या भजनी
टाया वाजवती पान
जसे करती करोन्या
होउ दे रे आबादानी
जगाचे पोट भरण्यासाठी शेतकरी राब राब राबतो.शेतातील सार्या प्रक्रिया आणि पावसाची आतुरतेने वाट पहाणारा शेतकरी सारे काही चित्र रेखावे तसे शब्दात टिपले आहे. शेतकर्यांच्या अपार कष्टांबद्दल त्या कळवळुन म्हणतात:
शेतकर्या तुझे हाड
शेतामधी रे मुडले
मुडीसनी झाली राख
तापी माईत पडले.
बहिणाबाईंनी आपल्या काव्यात निसर्ग, शेती इ. सोबत घरात -अंगणात-सुखदुखात-सणवार संसार यात जे जे अनुभव आले ते सहज ओवींमधे गुंफले. तो काळ स्त्री ने चौकटीत राहून चुलं-मुल-घर सांभाळत जगण्याचा होता. बहिणाबाईंनी याच चौकटीत राहून वैधव्याचे दु:ख पांघरुन आयुष्यातील सारे आघात न खचता सहन केले. आपल्या आयुष्याचा खडतर प्रवास शब्द शब्द ओवीत गुंफुन सोपा केला. त्या स्वतालाच धीर देतांना म्हणतात:
देव गेले देवाघरी
आठी ठेयीसान ठेवा
डोयापुढे दोन लाल
रडू नको माझ्या जीवा
रडू नको माझ्या जीवा
तुला रड्याची रे सव
रडू हासव रे जरा
त्यात संसाराची चव.
जाणारा आठवणी मागे ठेवून देवाघरी निघुन गेला,पण बहिणाबाईंनी मुलां कडे बघुन बाळाला कुशीत घ्यावे तसे दु:खाला पोटात घेतले. आणि सर्वांना सांगितले:
नका नका आयाबाया
नका करु माझी कीव
झाल माझ समाधान
आता माझा मले जीव
त्या काळी वैधव्याची जाणीव सतत करुन दिली जात असे.अशा स्थितीत एक साधारण स्त्री आयुष्यभर
हे दु:ख पेलत कशी जगली असेल ? पण या दु:खातुन बहिणाबाईंनी स्वताला सावरण्याचा धीटपणा दाखवला. वाटेला येणारी कीव नाकारली. आणि मुख्य म्हणजे या दु:खात गुंतुन न पडता मार्गस्थ झाल्यात. जीवनाकडे बघण्याचा त्यांचा दृश्टीकोन या ओवीत स्पष्ट होतो:
फाटी गेल पांघरुन
नको बोचकू रे चिंध्या
झाल गेल पार पडी
नको काडू आता गिंध्या.
बहिणाबाई जरी स्वताच्या दु:खात गुंतल्या नसतील पण सासर-माहेर च्या कोड्यात मात्र गुंतल्या होत्या.या नात्यांची कोडी त्यांनी ओवीत गुंफ्ली आहेत. जेवढी माया त्यांच्या माहेरच्या रचनांमधे आढ्ळते तेवढाच आदर-जिव्हाळा सासरच्या व्यक्तिचित्र साकारणार्या ओव्यांमधी ही अनुभवायला मिळतो.
लागे पायाला चटके
रस्ता तापीसानी लाल
माझ्या माहेरची वाट
मला वाटे मखमल
माझ्या माहेरच्या वाटे
मारे सायंकी भरारी
माझ्या जाययाच्या आधी
सांगे निरोप माहेरी
त्या काळी सासरच्या उंबरठ्यावर पाउल ठेवताच,स्त्रीच्या कष्टांच रहाटगाड अविरत फिरत असे.कष्टाचा हा दिनक्रम त्यांनी सासुरवाशीण या रचनेत असा मांडला आहे:
उठ सासुरवाशीन बाई
उठ मघ्घमराती मांड दयन तू नीट
अन चालव बाई घरोट
उठ सासुरवाशीन बाई
उठ रामपहारी डोईवर घे घडा
उठ बांग फुके कोंबडा
उठ सासुरवाशीन बाई
उठ सयपाकाले पेटव पेटव चुल्हा
वर सूर्यबापा आला
उठ सासुरवाशीन बाई
उठ जानं शेतीकामाचा किती घोर
तू गोठ्या मधलं ढोर
उठ सासुरवाशीन बाई
सुरु झाली वटवट कातवली सासू
पुस डोयामधले आसू
उठ सासुरवाशीन बाई
घे सोशीसन घालू नको वाद
कर माहेरची याद.
एका ग्रामीण स्त्रीचे कष्ट्मय जीवन या रचनेत स्पष्ट होते. खरच, कामाच्या या व्यापातून ती स्व:तासाठी किती वेळ देत असेल ? अशा या कामाच्या रहाटगाड्यात माहेरची आठवण येण सहाजिकच आहे.एका स्त्रीसाठी सासर-माहेर म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आणि या दोन बाजु कुठलाच फरक न करता सांभाळणे हाच तर सुखी संसाराचा मंत्र आहे.माहेरची ओढ प्रत्येक स्त्रीला का असते याचे वर्णन बहिणाबाई "योगी आणि सासुरवाशीन " या रचनेत करतात:
योगी- बसला मी देव ध्यानी
काय मधी हे संकट
बाई बंद कर तुझ्या
तोंडातली वटवट
माझ माहेर माहेर
सदा गानं तुझ्या ओठी
मंग माहेरुन आली
सासरले कशासाठी ?
सासुरवाशीन- अरे लागये डोहाये
सांगे शेतातली माटी
गाते माहेराच गानं
लेक येईन रे पोटी
दे रे दे रे योग्या ध्यान
ऎक काय मी सांगते
लेकीच्या माहेरासाठी
माय सासरी नांदते
देव कुठे देव कुठे
भरसनी जो उरला
अरे उरीसनी माझ्या
माहेरात समावला.
ही रचना केवळ एक संवाद नव्हे. यातील संकेत ओळखणे ही काळाची गरज आहे.काळ बदलला,आज स्त्री विचारांनी आधुनिक आहे, ती आकाशाला गवसणी घालते,अनेक क्षेत्रात उंच भरारी घेते, पुरुषांच्या बरोबरीने पुढे जाते.असे असुनही लेक झाली की आईला-एका स्त्रीला रडु येते हे ल्ज्जास्पद नाही कां ? लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते असे ठसक्यात सांगणार्या बहिणाबाई आणि गर्भात मुलगी असल्याचे कळताच गर्भपात करणारी आजची स्त्री यापैकी खरी सुसंस्कृत माता कोण ?स्त्रीच महत्व जोवर स्त्रियांनाच कळत नाही तोवर स्त्रीमुक्तीच्या सार्या व्याख्या निरर्थक आहेत.हे बहिणाबाईनां फार पूर्वीच उमगले होते.मुलासाठी नवस बोलण्याच्या त्या काळात मुलीचे महत्व त्यांच्यातील स्त्रीने जाणले होते. हे जाणून घेण्यासाठी कुठल्याही शिक्षणाची आवश्यकता नाही,हे त्यांनी सिध्द करुन दाखविले.
स्वमनाचा, स्त्रीमनाचा ,काळ्याआईच्यामनाचा सहजतेने ठाव घेणार्या बहिणाबाई,समाजातील घटनांचा -घटकांचा तेवढ्याच सहजतेने ठाव घेतात.एकेकाळी प्लेगच्या साथीने जळ्गावात धुमाकुळ घातला होता,त्याचे वर्णन करतांना त्या म्हणतात:
पिलोक पिलोक
जीव आला मेताकुटी
भाइर झोपड्या
गावामधी मसनवाटी
बहिणाबाईंच्या हदयात माणुसकीचा झरा खळखळुन वाहत होता.म्हणुनच त्यांना इतरांची दु:ख समजुन घेउन शब्दात मांडता आली. त्या काळी खेडयात मनोरंजनाची साधनं फार नव्हती. थकल्या भागल्यां श्रमिकांच रंजन "रायरंग" म्हणजे बहुरुपी गावोगाव फिरुन करत असे. तेच त्याच्या उपजिविकेचे साधन होते.या रायरंगबद्दल त्या म्हणतात:
आला आला रायरंग
करे लोकांचे रंजन
हासवता हासवता
घाले डोयात अंजन
नका म्हनू रे भिकारी
जरा तुम्ही नानावटी
करा गुनांची कदर
हात घाला कनवटी
बहिणाबाईंची विनोदबुध्दी सदा जागरुक असायची.प्रसंगातले गांभीर्य तसेच ठेवून मार्मिकतेचा प्रत्यय त्यांच्या "नहि दियामधे तेल " या रचनेत येतो.
नहि दिया मधे तेल
कशी अंधारली रात
तेल मिये एकदाच
नेली उंदरान वात
वात केली चिंधुकाची
तेल दियात पडलं
सापडेना आकपेटी
घोड आठी बी आडलं
सापडली आकपेटी
आग्या येताळाची लेक
आली आली हाती काडी
लाडानवसाची एक
शिलगावली रे काडी
जोत पेटली पेटली
अंधाराली ब्याहीसनी
मेली इझीसन गेली
बहिणाबाईंच्या रचना उमलत्या फुलासारख्या आहेत. एक एक पाकळी उमलावी तसे शब्द उमलतात,कडवी उकलतात आणि त्यातील आशय अजुन स्पष्ट होत जातो.त्यांच्या काव्यात निसर्ग,शेती,स्त्री-विश्व,स्वानुभाव हे सातत्याने आले असले तरी तत्कालीन सामाजिक स्थितीचा आढावा पण घेतात.त्यांची रचना म्हणजे समर्पक रुपक योजुन एका घटनेचे वा प्रसंगाचे विवरण आहे. सहज-सोपी-साधी-ग्रामीण अहिराणी भाषा त्यांचे काव्यवैशिष्टे ."कशाले काय म्हनू नही " ही त्यांची आशयघनाने ओथंबलेली एक आदर्श रचना :
बिना कपाशिने उले
त्याले बोंड म्हनू नही
हरीनामाईना बोले
त्याले तोंड म्हनू नही
नही वार्यानं हाललं
त्याले पानं म्हनू नही
नही ऎके हरीनाम
त्याले कान म्हनू नही
बहिणाबाईंच्या रचनांचे अजुन एक वैशिष्ट्ये म्हणजे त्यांच्या बहुतांश रचना आठ अक्षरातच गुंफल्या आहेत.गाणी रचतांना दुसरी ओळ आठ अक्षरातच सुचावी याचे आश्चर्य वाटते.कुठलेही अक्षरज्ञान नसतांना त्यांच्या छ्न्दबद्द रचना अदभूत आणि अलौकिक आहेत. बहिणाबाईंना असलेले काव्यज्ञान म्हणजे लहानपणापासून कानावर पडलेल्या ओव्या-अभंग.याच आधारवर फुललेला हा अक्षरवेल सात्विक व सोज्वळ ओवीरुपी फुलांतुन मराठी साहित्यात आजही दरवळत आहे.या अक्षरवेलीवरील सर्वच फुलांचा गंध शब्दात पकडणे म्हणजे एक एक ओवी प्रत्यक्षात अनुभवणे.प्रत्येक रचना सुबक शब्दातले चिंतन व प्रबोधन आहे.हे काव्यविचार मुद्र्णापासून वंचित असल्यामुळे या विचारांचा हवा तेवढा प्रसार झाला नाही याची खंत मनात दाटुन येते.हे विचार जर आधीच सर्वत्र पोहचले असते तर कदाचित मुलगी झाल्याचे दु:ख त्याचे पडसाद आज उमटतांना दिसले नसते.बहिणाबाईंची वैचारिक झेप आणि शब्दसामर्थ्य सांगायचे झाले तर कविवर्य बा.भ.बोरकर यांच्या शब्दातले वर्णन सार्थ ठरेल :
"देव तुझ्या ओटी पोटी,देव तुझ्या कंठी ओठी
दशांगुळी उरलेला , देव तुझ्या दाही बोटी
त्यांनी भरवी गे घास, दुधा मोडुनी भाकर
बोलेन त्या अक्षरात, उमटू दे बीजाक्षर "
जीवनपट: बहिणाबाईंचा जन्म खानदेशातील जळगावापासुन दोन मैल अंतरावर असलेल्या असोदे या गावी नागपंचमीच्या दिवशी सन १८८० साली महाजनांच्या घरी झाला.त्यांच्या आईचे नाव भिमाई. तीन भाऊ- घमा,गना आणि घना तीन बहिणी- अहिल्या,सीता आणि तुळसा.वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे वतनदार खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी झाला. नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी.जळ्गावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तीसाव्यावर्षी बहिणाबाईंना वैधव्य आलं. त्यांनी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत साहित्यसेवा केली. काही रचना काळाच्या ओघात वाहुन गेले काही सोपानदेव चौधरी यांनी टिपुन घेतले.
निसर्गाच्या मुक्त विद्यापिठात सर्वोच्च पदवी घेउन बहुश्रुत व्यक्तिमत्व असलेल्या बहिणाबाईंनी ३ डिसेंबर १९५१ साली जगाचा निरोप घेतला. १९५२ साली "बहिणाबाईंची गाणी " हे पुस्तक ज्येष्ठ साहित्यिक प्र.के.अत्रे यांच्या प्रस्तावनेसह क्विवर्य सोपानदेव चौधरी यांनी प्रकाशित केले.
विनीता देशपांडे
Comments
ललित लेखन
हा तर उघडउघड ललित लेख आहे, उपक्रमावार ललित लेखन चालू शकते?---वाचक्नवी
अर्धवट सहमत
वरील लेख ललित लेखनाची झाक असणारा असला तरी त्यात बहिणाबाईंच्या कवितांचा परिचय करून देण्यात आला आहे. अर्थातच, तो परिचय अपुरा वाटत असल्यास सहमत आहे.
तरीही, साहित्य आणि साहित्यिक या वर्गीकरणाकडे येणारे धागे ललित लेखनाचा भास देऊ शकतात. चू. भू. द्या. घ्या.
लेखिकेने यापेक्षा जास्त शब्दांत बहिणाबाईंचा परिचय आणि रसग्रहण करून दिले असते तर आवडले असते.
असहमत, किंवा स्पष्टीकरण
"ललित"ची अन्यत्र व्याख्या काही का असेना, उपक्रमावर "लेख लिहा" पानावरती पुढील मार्गदर्शन आहे :
किती अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण असावे, हे प्रत्येक लेखकावर अवलंबून आहे.
वरील लेख रसग्रहणात्मक तर आहेच.
जर वाचक्नवींच्या टिप्पणीचा रोख असेल की "चालू नये" तर मी असहमत आहे. जर त्यांचा नुसता "चालते का?" असा प्रश्न असेल, तर "मार्गदर्शनाच्या तत्त्वानुसार चालावे" असे माझे स्पष्टीकरण आहे.
बहिणाबाई अत्यंत प्रभावी कवयित्री
बहिणाबाई अत्यंत प्रभावी कवयित्री आहेत.
त्यांच्या काही ओव्यांचे रसग्रहण केल्याबाबत धन्यवाद.
बहिणाबाईंचे आयुष्य खडतर होते : वैधव्य त्या काळात तर अधिकच जाचक असे. तरी बहिणाबाईंचा वास्तववादी आशावाद स्पष्ट दिसतो. तुमच्या निबंधाचा हा विषय असावा, आणि तो उदाहरणांसह पुरेशा विस्ताराने सांगितला आहे.*
*एक सुचवणी : पुढच्या लेखात सुरुवातीला विषयाची मर्यादित चौकट ढोबळपणे सांगाव्या. नाहीतर "हा बहिणाबाईंच्या जीवनाचा आणि काव्याचा आढावा आहे", अशी एखाद्या वाचकाची कल्पना होईल. आणि लेखाच्या शेवटी अपुरेपणाची भावनाच वाचकाला जाणवेल. येथे पुन्हा लेखन कराच, अशी विनंती आहे, हे सांगणे नलगे.