अजमल कसाबचं काय केलं?

अजमल कसाबचं काय केलं?

आज (२६.११.२०११) मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला तीन वर्षं पूर्ण झाली (म्हणजे हल्ला ज्या दिवशी सुरू झाला त्या दिवसाला कारण तो हल्ला तीन दिवस चालु होता). दोन वर्षांपूर्वी म्हणजे जेव्हा या हल्ल्याला एक वर्षं पूर्ण व्हायला काही दिवस बाकी होते तेव्हा मी मुंबईत दुचाकीवरून रात्रीचा फेरफटका मारायचं ठरवलं. कडक पोलीस बंदोबस्त असेल असा माझा समज होता. रात्री बेरात्री भटकतोय म्हंटल्यावर पोलीस मला हटकतील असं वाटलं आणि त्यामुळे पोलीसांना माझा उद्देश समजावा या करिता व त्यांनाही त्यांच्या कामात त्रास होऊ नये या विचाराने आणि माझ्याकडून सहकार्य व्हावे या हेतूने मुंबई पोलीस आयुक्तांना उद्देशून एक पत्र (https://docs.google.com/viewer?a=v&pid=explorer&chrome=true&srcid=0B9-2h...) टंकलिखीत केले. ठिकठिकाणी असा पोलीस बंदोबस्त असेल व प्रत्येक वेळी मला त्या कर्मचार्‍यांना देण्यास सोयीचे होईल म्हणून या पत्राच्या दहा प्रती सोबत बाळगल्या होत्या.

माझ्या घरातून (निगडी, पुणे येथून) मी सायंकाळी ठीक सहा वाजता निघालो. दादर येथे रात्री साडेनऊ वाजता पोचलो. एका उपाहारगृहात जेवण करून तेथून रात्री सव्वा दहा वाजता बाहेर पडलो. मरीन ड्राईव्ह येथे रात्री पावणे अकरा वाजता दुचाकी वाहनतळावर लावून काही काळ पायी भटकंती केली. त्यानंतर पुन्हा दुचाकीवरून शहराच्या विविध भागांमध्ये चकरा मारल्या. या संपूर्ण कालावधीत मला कुठेही पोलीसांनी हटकले नाही. मुख्य म्हणजे पोलीस बंदोबस्तावर असलेले मला कुठे दिसलेच नाहीत. मरीन ड्राईव्ह येथे एका बाकड्यावर दोन पोलीस गप्पा मारीत बसले होते. इतरही काही ठिकाणी पोलीस खुर्च्यांवर आरामात बसले होते. त्यांना बंदोबस्तावर असलेले असे काही म्हणता येणार नाही. मध्यरात्र उलटून गेल्यावर परगावच्या क्रमांकाची दुचाकी घेऊन (शिवाय माझ्या डोक्यावर ज्यातून चेहरा दिसणे शक्य नाही असे काळ्या काचेचे हेल्मेट होते) रस्त्यावर फिरणार्‍या मला त्यांनी थांबवून हटकायला हवे होते. तसे त्यांनी केले नाही, उलट मीच काही पोलिसांना रस्त्याची माहिती विचारली असता त्यांच्या आरामात मी व्यत्यय आणला असा उद्वेग त्यांच्या चेहर्‍यावर दिसला. त्यामुळे माझ्याकडील पत्राची एकही प्रत मला प्रत्यक्षात कुठेही पोलिसांना देण्याचा प्रसंग आलाच नाही व सर्वच्या सर्व प्रती अजूनही माझ्यापाशीच आहेत.

पोलिसांनंतर ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे असे समजले जाते त्या खासगी सुरक्षा रक्षकांचा अनुभवही फारसा आशादायक नव्हता. ज्या ट्रायडेंट हॉटेल वर हल्ला झाला तिथे अतिशय कडक बंदोबस्त होता, पण सुरक्षेचे निमित्त करून त्यांनी हॉटेलच्या जवळील पदपथावर बांबू लावून अतिक्रमण केले होते व सरळ सरळ हा पदपथही खासगी सुरक्षा रक्षकांच्या मदतीने स्वत:च्या ताब्यात घेतला होता. याच भागात असणार्‍या इतर इमारतींमध्ये जिने व इतर मोकळ्या जागांमध्ये विजेचे दिवे चालु होते पण व्यक्तींचा वावर नव्हता. इमारतींना एकाहून अधिक फाटक होते, पण सेवेवरील सर्व सुरक्षा रक्षक एकाच फाटकापाशी जमून पत्ते खेळत होते तर काहीजण तेथे शेजारीच पथारी टाकून झोपले होते. म्हणजे दुसर्‍या फाटकातून कोणी इमारतीत प्रवेश केला तरी या रक्षकांना त्याचा काहीच पत्ता लागणार नव्हता. शहरातील बहुतेक इमारतींबाबत अशीच परिस्थिती होती.

अशा प्रकारे सुरक्षेचे तीन तेरा वाजल्याचे लक्षात आल्यावर मी माझ्या या भेटीतील इतर निरीक्षणांवर आधारित दुसर्‍याच विषयावर एक लेख (http://at-least-i-think-so.blogspot.com/2010/12/blog-post_02.html) लिहून तो ब्लॉग वर प्रसिद्ध केला. अर्थात या भेटीदरम्यान जाणवलेली व विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे मुंबईतील टॅक्सीचालक हेच रात्रीच्या मुंबईचे खरे पहारेकरी. बहूतेक ठिकाणी हे टॅक्सीचालक अतिशय सतर्क असलेले आढळले. त्यांनी मला एका ठिकाणाहून दुसरीकडे कसे जायचे याबद्दल माझ्या विनंतीवरून मार्गदर्शन तर केलेच पण त्याशिवाय मी कोठून आलो आहे व असा का भटकत आहे हेदेखील जाणून घेण्यात त्यांनी रस दाखविला (जे खरे तर पोलिसांकडून अपेक्षित होते). अर्थात या रात्री भेटलेल्या टॅक्सीचालकांमध्ये मराठी भाषिक अभावानेच आढळले, बहुतांश परप्रांतीय च होते.

असो. तर यावर्षी पुन्हा मुंबई भटकंती करून फारसे काही नवीन बघावयास मिळेल असे वाटले नाही. त्याऐवजी दुसर्‍या एका महत्त्वाच्या विषयावर विचारमंथन करून ते प्रकाशित करावे असे मी ठरविले. हा दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे अर्थातच त्या दहशतवादी हल्ल्यातील दहा हल्लेखोरांपैकी पोलिसांनी जिवंत पकडलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब. मी गेली तीन वर्षे आणि आजही कित्येकांच्या चर्चेत ऐकतोय, वाचतोय, पाहतोय तो एकच प्रश्न म्हणजे अजमल कसाबचं काय करणार?

मला वाटतं त्याचं काय करणार ह्यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे अजमल कसाबचं काय केलंत? होय गेली दोन वर्षे ताब्यात असणार्‍या या इसमाचं पोलिसांनी नेमकं काय केलं? काय करता येऊ शकलं असतं? किंवा खरं तर काय केलं जाणं अपेक्षित होतं? आता त्याला फाशी द्या अशी लोकभावना आहे पण गेल्या दोन वर्षांतील घडामोडींवर दृष्टीक्षेप टाकल्यास असं लक्षात येईल की त्याला फाशी देण्याची प्रक्रिया आपणच आपल्या हातांनी अतिशय अवघड करून टाकलीय. जेव्हा ह्या मोहिमेत त्याचे इतर साथीदार जागच्या जागीच ठार मारण्यात आले आणि हा एकटा जिवंतपणे पोलिसांच्या ताब्यात आला त्यावेळेपासून ते आजतागायत उचलण्यात आलेली पावले पाहता या सगळ्या प्रकरणाचा शेवट कसाबच्याच पथ्यावर पडणारा आहे.

कसा तो पाहा :-

सर्वप्रथम ताब्यात आलेल्या कसाबवर खटला चालवायचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी त्याला वकील निवडण्याची संधी देण्यात आली. त्याला ते जमले नाही म्हणून आपल्या तर्फेच त्याच्याकरिता वकीलाची सोय केली गेली (त्यातही दोन वेळा बदल करण्यात आला). आपल्याला असे दाखवायचे होते की आपण कसाबची बाजू पूर्णपणे न्यायाने आणि त्याला ती मांडण्याची सर्वप्रकारे संधी देऊन मगच निर्णय घेणार आहोत (हे सारे आपण कुणाला दाखविणार आहोत? अंकल सॅमला?). जेव्हा हा निर्णय घेतला गेला तेव्हाच कसाबला आपण एक फार मोठा मार्ग उपलब्ध करून दिला तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयांपर्यंतची विविध पातळ्यांवरील न्यायालये आणि त्यात त्याला बाजू मांडण्याची संधी आणि त्याउप्परही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करण्याची खास सवलत. ह्या सगळ्या प्रक्रियांना लागणारा विलंब लक्षात घेता कसाबला सहज दहा ते पंधरा वर्षांचा अवधी आपण बहाल केला हे आपल्यापैकी कुणाच्याच कसे लक्षात आले नाही. कारण यापैकी प्रत्येक पातळीवर जरी त्याच्या विरोधात निर्णय झाला तरीही वरच्या पातळीपर्यंत दाद मागण्याचा अधिकार आपणच त्याला देऊ केलाय. तो आता आपण नाकारला तर मग त्याला सुरूवातीलाच न्यायालयात सादर करण्याच्या निर्णयालाच अर्थ राहत नाही. म्हणजे आता आपण या मार्गावरून हटू शकत नाही. उलट तो प्रत्येक वेळी काही ना काही तांत्रिक मुद्दे (जसे की त्याची गैरसोय होतेय, त्याचा वकीलावर, आरोग्य तपासणी अधिकार्‍यांवर विश्वास नाही वगैर, वगैरे) उपस्थित करून वेळेचा प्रचंड अपव्यय करून आधीच वेळखाऊ असलेली प्रक्रिया अधिकच लांबवू शकतो. त्याशिवाय या कालावधीत तो आजारपणाने, किंवा इतर कुठल्याही कारणाने पोलिसांच्या कैदेतच मृत्यू पावता कामा नये. याकरिता त्याला उत्कृष्ट प्रकारचे अन्न व सर्वप्रकारच्या वैद्यकीय सोयीसुविध पुरविण्याची जबाबदारीही आपोआपच आपल्या शिरावर येऊन पडलीय. त्याच्या विरोधात जनमतही प्रचंड असल्याने त्याला घातपात होण्याची शक्यता गृहीत धरून त्या दर्जाचे संरक्षण पूरविणे हेही मोठे जिकीरीचे व खर्चाचे काम आहेच.

एवढा लांबलचक व वळणा वळणांचा मार्ग निवडून आपण त्याच्यावर महत्त्वाचा आरोप काय ठेवला तर देशाविरुद्ध युद्ध पुकारणे. या एका वाक्याने तो नायकपदावर विराजमान झाला. याचे प्रमुख कारण म्हणजे चोरी, खून, बलात्कार हे सारे जगाच्या पाठीवर सगळीकडे निसंशय अपराधच ठरतात म्हणजे कायद्याच्या दृष्टीनेही आणि नैतिकतेच्या दृष्टीनेही. याउलट युद्ध हे ज्या देशाविरोधात लढले जाते त्या देशाच्या कायद्याचा तो भंग होत असला तरी जो देश युद्ध पुकारतो तो त्याला कायदेशीर रीत्या अपराध समजत नाहीच शिवाय नैतिकतेच्या दृष्टीने पाहता तो तर एक पराक्रमाचाच भाग असतो. शिवाय आपण त्याला युद्ध पुकारण्यावरून पकडले असे म्हणत असू तर तो युद्धकैदी झाला आणि मग तो सैन्याच्या ताब्यात जायला हवा आणि सैन्यानेच त्याचा फैसला करायला हवा. असे केल्यास मग तो युद्धकैद्यांच्या दर्जाचा मानून त्याची पाकिस्तानबरोबर आपल्या युद्धकैद्यांच्या बदल्यात देवाणघेवाण करावी लागेल आणि असे केले गेले तर जनमत प्रक्षुब्ध होऊन सरकारच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे.

आता तो देशाविरुद्ध युद्ध पुकारतोय म्हंटल्यावर सैन्याच्या ताब्यात असायला हवा पण आहे मात्र पोलिसांच्या ताब्यात कारण त्याला पोलिसांनी पकडलेय, सैन्याने नाही. (आता इथून पुढचा विचार करता दिसतील त्या आपल्या व्यवस्थेतील त्रुटी) पोलिसांनी पकडले कारण तो शहरात नागरिकांवर शस्त्रांच्या साहाय्याने हल्ला करीत होता. अर्थात पोलीसांनी त्याला पकडले असले तरी कुठलाही कायदा मोडल्याचा ठपका ते त्याच्यावर ठेऊ शकत नाहीत कारण मुळातच त्याला कुठलेही कायदे लागू होतच नाहीत. कायदे इथल्या अधिकृत नागरिकांकरिता बंधनकारक असतात किंवा मग अधिकृतरीत्या व्हिसा घेऊन येणार्‍या परकीय नागरिकांवर. हा तर बेकायदा घुसलेला म्हणजे याला शहरात आल्यावर नव्हे तर देशाच्या सीमेवर घुसखोरी करीत असतानाच पकडायला हवा होता आणि तो ही सैन्याने, पोलिसांनी नव्हे. तसे घडले नाही हा सैन्याचा दोष नाही का?

दुसरे अतिशय महत्त्वाचे म्हणजे कसाब व त्याचे साथीदार साठ तास पोलिसांसोबत / सैन्यासोबत लढता येईल इतका शस्त्रसाठा / दारुगोळा स्वत:बरोबर घेऊन आले. इतका दारुगोळा व शस्त्र सैन्याच्या नजरेखालून सुटून या देशात / शहरात आलेच कसे? त्यानंतरही शहरात पोलिसांनी त्यांना या गोष्टी बाळगण्याबाबत दोषी मानून आधीच अटकेत का टाकले नाही? आपल्या देशात स्वसंरक्षणासाठी देखील सहा इंच किंवा त्याहून लांब पात्याचे हत्यार इथले अधिकृत नागरिकही जवळ बाळगू शकत नाही तिथे नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सर्वस्वी पोलिसांवरच येऊन पडते. या जबाबदारीचाच एक भाग म्हणून शहरातील सर्वच जण या शस्त्रास्त्र कायद्याचे पालन करताहेत याची खात्री करून घेणे, ज्याचे पालन मुंबई पोलिसांनी इमानदारीने केले नाही असे अत्यंत खेदाने नमूद करावे लागते.

थोडक्यात कसाब, त्याचे साथीदार व त्यांची शस्त्रसामुग्री मुंबई शहराच्या मध्यवर्ती भागात सैन्य अथवा पोलिसांचा पहारा चुकवून आत पोचतात आणि साठ तास शहराला वेठीस धरून अंदाधुंद गोळीबार करतात, कित्येक निरपराधांचे प्राण घेतात हे सारेच अविश्वसनीय आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे या दहा जणांचा मुकाबला आपण हजार जणांच्या मदतीने करतो (पोलीस, एनएसजीचे कमांडो, इत्यादी) आणि शेवटी जेव्हा हे सारे रोखण्यात आपण यशस्वी होतो तेव्हा आपण त्याला आपला विजय (?) मानतो. हे सारेच अतर्क्य आणि आचरटपणाचे नाही का? पुर्वी शिवाजी महाराज अतिशय निवडक मावळ्यांच्या सोबतीने मुघलांवर स्वारी करीत आणि मुघलांचे सैन्य हजारोंच्या संख्येने असले तरी त्याला धूळ चारीत. आजच्या काळात कसाब फक्त मोजक्या दहा साथीदारांसह इथे येतो आणि आपल्याला त्याच्याशी लढायला हजार माणसे लागतात आणि तीही आपल्याच प्रदेशात. युद्धाच्या डावपेचांमध्ये कोण कुणाचे अनुयायी आहेत?

तीन वर्षे झाली कसाब पोलिसांच्या ताब्यात आहे. या कालावधीत त्याला इथपर्यंत येण्यास कोणी मदत केली त्या सैन्यातल्या व पोलिस दलांमधल्या नावांचा अजून आपल्याला छडा लागू नये? पोलिसांनी थर्ड / फोर्थ अगदी हव्या त्या डिग्रीचा वापर करून गुन्हेगारांकडून आतापर्यंत इतर प्रकरणांत माहिती मिळविली आहेच ना? मग या प्रकरणात त्यांना ही माहिती का मिळू शकली नाही? ही माहिती जर तीन वर्षांत मिळविता येत नसेल तर मग त्याला जिवंत पकडून त्याच्या पालनपोषणाचा खर्च करण्यात काय हशील आहे? त्याच्या इतर साथीदारांप्रमाणेच त्यालाही जागच्या जागी संपविता आले असतेच की.

कसाबला जिवंत पकडण्यासाठी स्वत:च्या देहाची चाळण करणार्‍या तुकाराम ओंबळे यांचे बलिदान व्यर्थच गेले म्हणायचे.

लेखनविषय: दुवे:

Comments

उद्वेग

२६/११ च्या घटनेबद्दलचा उद्वेग व्यक्त करणारं लिखाण.

मात्र काही प्रश्न पडतात. ४ नोव्हेंबरच्या रात्री तुम्ही स्कूटर-मोटरसायकलवरून रस्त्यावरून जाणार तर पोलिसांनी हटकावं अशी अपेक्षा का ठेवली होती हे कळलं नाही. कदाचित अशीही शक्यता असेल की तुम्ही पाठवलेल्या पत्राची माहिती सर्व पोलिसांना ताबडतोब करून दिली असेल. आणि त्यांनी तुम्हाला ओळखून यात काही धोका नाही असा योग्य निष्कर्ष काढला असेल. जो सकृद्दर्शनी धोकादायक दिसत नाही (खांद्यावर मोठी सॅक वगैरे) अशा माणसाकडूनही धोका असेल (तो केवळ उशीरा रात्री बाहेर आहे म्हणून) असं पोलिसांनी गृहित धरणं योग्य वाटत नाही.

सैन्याच्या ताब्यात ठेवणं की पोलिसांच्या अखत्यारित ठेवणं याबाबतीत कायदेशीर विचार झालेला नसेल असं काहीतरी लेखात सूचित केलेलं दिसतं. कायद्यानुसार खरं काय करायला हवं होतं या बाबतीत काही स्वतंत्र अभ्यास सादर केलात तर बरं होईल.

ड्यू प्रोसेस बद्दल तक्रार असू शकते, पण ती काही विशिष्ट कारणासाठी अस्तित्वात असते. कोणाला दाखवण्यासाठी पाळण्यापेक्षा योग्य म्हणून पाळायची असते. 'इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी हे इतरांसाठी ठीक आहे, पण कसाबसारख्यासाठीही?' हा प्रश्न विचारताना नक्की कुठे रेषा आखायची हे कसं ठरवणार हा मोठा प्रश्न उभा रहातो. ती रेषा धूसर केली तर सामान्य नागरिकांचे जे हाल होऊ शकतात त्यापेक्षा एखाद्या कसाबची शिक्षा लांबवलेली परवडते.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

उद्वेग आणि आश्चर्य देखील

<< ४ नोव्हेंबरच्या रात्री तुम्ही स्कूटर-मोटरसायकलवरून रस्त्यावरून जाणार तर पोलिसांनी हटकावं अशी अपेक्षा का ठेवली होती हे कळलं नाही. जो सकृद्दर्शनी धोकादायक दिसत नाही (खांद्यावर मोठी सॅक वगैरे) अशा माणसाकडूनही धोका असेल (तो केवळ उशीरा रात्री बाहेर आहे म्हणून) असं पोलिसांनी गृहित धरणं योग्य वाटत नाही. >>

मी साधारण त्याच भागातून फिरलो जिथे एक वर्षापूर्वी हा हल्ला झाला होता. दूधाने तोंड पोळल्यावर ताकही फुंकून प्यावे या सूत्रानुसार पोलिसांनी तेथून जाणार्‍या (विशेषत: मी रात्री दोनच्या पुढे फिरत होतो व रस्त्यावर इतर कुणी फारसे नव्हते. शिवाय हेल्मेटच्या काळ्या काचेतून माझा चेहराही दिसत नव्हता) सामान्य लोकांचीही थांबवून चौकशी करायला हवी. मी जिथे राहतो त्या पिंपरी-चिंचवड नवनगर भागात जर उत्तररात्री फिरत असलो आणि पोलिसांच्या नजरेस पडलो तर ते थांबवून चौकशी करतात असा अनुभव आहे. चौकशीत साधारण नाव, पत्ता, कुठून आलात, कुठे चाललात, काय प्रयोजन असे प्रश्न अतिशय सभ्यपणे विचारले जातात. जे मला तरी आवश्यक वाटतात. त्याचप्रमाणे जवळ येऊन वास घेऊन ही बघतात (पिलेला तर नाहीना ह्याची खात्री करून घेतात)

<< कदाचित अशीही शक्यता असेल की तुम्ही पाठवलेल्या पत्राची माहिती सर्व पोलिसांना ताबडतोब करून दिली असेल. आणि त्यांनी तुम्हाला ओळखून यात काही धोका नाही असा योग्य निष्कर्ष काढला असेल. >>

माझ्या ई-पत्राच्या प्रती अगदी रस्त्यातल्या तपासणीनाक्यावरील पोलिसांपर्यंत पोचल्या असतील ही शक्यता फारच धूसर वाटते आणि तसे असेल तरी हातात ती प्रत घेऊन वाहनाचा क्रमांक पाहून खात्री करुन घेणे इष्ट नव्हे का?

<< ड्यू प्रोसेस बद्दल तक्रार असू शकते, पण ती काही विशिष्ट कारणासाठी अस्तित्वात असते. कोणाला दाखवण्यासाठी पाळण्यापेक्षा योग्य म्हणून पाळायची असते. 'इनोसंट अंटिल प्रूव्हन गिल्टी हे इतरांसाठी ठीक आहे, पण कसाबसारख्यासाठीही?' हा प्रश्न विचारताना नक्की कुठे रेषा आखायची हे कसं ठरवणार हा मोठा प्रश्न उभा रहातो. ती रेषा धूसर केली तर सामान्य नागरिकांचे जे हाल होऊ शकतात त्यापेक्षा एखाद्या कसाबची शिक्षा लांबवलेली परवडते. >>

कसाबच्य़ा शिक्षेचा मी आग्रह धरलेला नाहीये. उलट ती फक्त एक औपचारिकताच आहे असे मी म्हणतोय. बाकी माझ्या लेखाचा मुख्य सूर हाच की एवढ्या काळात कसाबचे मदतनीस कोण (जे की भारतीय पोलिस, सैन्यातील अधिकारी व राजकारणी यांच्यापैकीच कुणीतरी आहेत) ज्यांच्यामुळेच तो एवढा शस्त्रसाठा घेऊन सीमा ओलांडून आत आला ते शोधून का काढले नाही? अशी माहिती मिळवायची असते तेव्हा ताब्यात असलेल्या कुठल्याही व्यक्तिला पोलिस तिसरी पदवी दाखवून ही माहिती मिळवितातच ना? मग कसाबच्या बाबतीत पोलिसांनी अजुन हे का केले नाही? की ही माहिती मिळूनही ते ती लपवित आहेत?

प्रश्न

>>एवढा लांबलचक व वळणा वळणांचा मार्ग निवडून आपण त्याच्यावर महत्त्वाचा आरोप काय ठेवला तर देशाविरुद्ध युद्ध पुकारणे.

हे कुठच्या माहितीच्या आधारे लिहिले आहे हे कळले नाही. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे हा अनेक आरोपांपैकी एक आहे (माझ्या माहितीप्रमाणे ८० हून जास्त आरोप ठेवलेले आहेत आणि त्या सर्व आरोपांखाली तो दोषी ठरला आहे). एकमेव आरोप नाही.

अजमल कसाबवर खटला चालवण्याची काही गरज नव्हती असे माझे मत आहे. (तो भारतीय नसल्याने घटनेने भारतीय नागरिकांना दिलेले हक्क त्याला लागू होत नाहीत). परंतु कुठल्याशा आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शननुसार खटला चालवणे गरजेचे होते असे समजते.

प्रसंगानुरूप अपेक्षित विषयावरचा (अपेक्षित त्रागा व्यक्त करणारा) धागा.

नितिन थत्ते

बरोबर आहे तुमचं.

<< हे कुठच्या माहितीच्या आधारे लिहिले आहे हे कळले नाही. देशाविरुद्ध युद्ध पुकारणे हा अनेक आरोपांपैकी एक आहे (माझ्या माहितीप्रमाणे ८० हून जास्त आरोप ठेवलेले आहेत आणि त्या सर्व आरोपांखाली तो दोषी ठरला आहे). एकमेव आरोप नाही. >>

होय मान्य आहे. परंतू त्या आरोपामुळे तो हीरो ठरतो हे ध्यानात घ्या. त्याला मोठे का करायचे?

बाकी मतांशी सहमत.

बहुदा चुकीचे

अजमल कसाबवर खटला चालवण्याची काही गरज नव्हती असे माझे मत आहे.

हे तुमचे मत योग्यच आहे. केवळ गरज नव्हती असे नसुन हे बहुदा चुकीचे आहे.
आता उद्या सुरू होणार्‍या सुनावणीत सुप्रीम कोर्टात कसाबचा बचाव काय असेल याची चुणूक आजच्या डी एन ए मधे आली आहे. दोन रोचक बातम्यांचे दुवे देतो.
१० ऑक्टोबर
२८ नोव्हेंबर - बचावाची चुणूक

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

काहीतरीच

४ नोव्हेंबरच्या रात्री तुम्ही स्कूटर-मोटरसायकलवरून रस्त्यावरून जाणार तर पोलिसांनी हटकावं अशी अपेक्षा का ठेवली होती हे मलाही कळलं नाही. किंबहुना असं प्रत्येकाला ते हटकत बसले तर पहाटे दोन वाजताही मुंबईच्या रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होईल. लोकल्समधले बाँबस्फोट संध्याकाळच्या गर्दीचा फायदा घेऊन केलेले होते. रात्री गर्दी नसल्यामुळे तेव्हाच दहशतवाद्यांपासून सर्वात कमी धोका असावा.

घासकडवी आणि थत्ते यांचे प्रतिसाद आवडले.

'संशयित'

किंबहुना असं प्रत्येकाला ते हटकत बसले तर पहाटे दोन वाजताही मुंबईच्या रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होईल.

नुस्त्याच फिरणार्‍या लोकांची चौकशी करणे कदाचित तापदायक ठरेल, पण अपरात्री पत्ता विचारणारा माणूस संशयास पात्र ठरण्याची शक्यता अधिक असु शकते, त्यामुळे पोलिसांनी चौकशी करायला हवी होती असे मला देखिल वाटते, 'संशयित' कसे ठरविणार/शंका घेणार हा मुद्दा असु शकतो पण वेळ-परिस्थिती-माणुस बघता शक्यता अधिक असुच शकते.

समजलं नाही

अपरात्री पत्ता विचारणारा माणूस संशयास पात्र ठरण्याची शक्यता अधिक असु शकते

हे समजलं नाही.

किती वाजल्यानंतर लोकांची चौकशी करावी असं तुमचं मत आहे? अपरात्री मी अनेकदा मुंबई-ठाण्यात भटकले आहे आणि तेव्हाही सामसूम अशी दिसलीच नाही. उलट 'मामां'ना पत्ते विचारले की वयस्कर मामा "बाळ वेळेत घरी जा" वगैरे सल्ले द्यायचे.

खुलासा

उलट 'मामां'ना पत्ते विचारले की वयस्कर मामा "बाळ वेळेत घरी जा" वगैरे सल्ले द्यायचे.

कदाचित तुम्ही स्त्री असल्यामुळे असेल, मला स्वतःला रात्री १/२ नंतर (कधी,कधी) मुंबईत हिंडताना कंपनिचे ओळखपत्र बाळगावे लागे, किंवा इतक्या उशिरा कुठून येतो आहे ही विचारणा होत असे, मग सिनेमाचे तिकिट किंवा कामाला उशिर झाल्यास ओळखपत्र दाखवावे लागले आहे.

हेच अपेक्षित आहे...

<< मला स्वतःला रात्री १/२ नंतर (कधी,कधी) मुंबईत हिंडताना कंपनिचे ओळखपत्र बाळगावे लागे, किंवा इतक्या उशिरा कुठून येतो आहे ही विचारणा होत असे, मग सिनेमाचे तिकिट किंवा कामाला उशिर झाल्यास ओळखपत्र दाखवावे लागले आहे. >>

अगदी नेमकं लिहीलंय. तुम्हाला आलेला अनुभव योग्य आणि अपेक्षित असाच आहे. असाच अनुभव मला पुण्यात येत असतो आणि त्या रात्रीही मुंबईत मला असाच अनुभव अपेक्षित होता आणि तसा न आल्याने मी सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उभं केलंय.

शिवाय इतर अनेकांनी म्हंटलंय त्याप्रमाणे त्या रात्री दोन नंतर फारशी गर्दी नव्हतीच. किंबहुना काही रस्त्यांवर तर मी एकटाच फिरत होतो. थेट चौकात आल्यावर टॅक्सीवाले वगैरे दिसत होते.

<< कदाचित तुम्ही स्त्री असल्यामुळे असेल, >>

स्त्री असो वा पुरूष प्रत्येक नागरिकाने मध्यरात्री उशिरानंतर रस्त्यावर वावरत असताना आपल्या इतक्या उशिरापर्यंत बाहेर असण्याचे प्रयोजन, आपली ओळख व कुठून कुठे जात आहोत याविषयी पोलिसांना पटेल असे स्पष्टीकरण सोबत तयार ठेवले पाहिजे. तुम्ही नुकताच येऊन गेलेला यशराज फिल्म्सचा 'लव का द एण्ड' हा चित्रपट पाहिला का? त्या उत्तररात्री भटकणार्‍या व त्याविषयी कुठलेही योग्य स्पष्टीकरण देऊ न शकणार्‍या तीन महिलांना पोलीस अटक करतात असे दाखविले आहे.

तेव्हा कायद्याच्या राज्यात आपल्या उत्तररात्री उशिरा फिरण्याचे पर्याप्त कारण प्रत्येकाजवळ असलेच पाहिजे. त्याचप्रमाणे असे फिरणार्‍यांची चौकशी करून या कारणांची पोलिसांनीही खात्री करुन घ्यायला हवी. जर कोणी योग्य स्पष्टीकरण देऊ शकत नसेल तर अशा व्यक्तीला ताब्यात घेणे हे समाजातील इतर घटकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गरजेचे आहे.

आऊटपुट आणि सल्ला

या विषयांत मतांतरे असणे स्वाभाविक आहे, पण एवढा आटापिटा करून आपण नक्की काय मिळवले? हा प्रश्न पडतोच. ना पाकिस्तानने हल्ल्यातला आपला सहभाग मान्य केला, ना जगात त्यांची काही (अतिरिक्त) नाचक्की झाली, ना कुणी यासाठी त्यांच्यावर निर्बंध लादले, ना हल्ल्यामागचे मास्टरमाईन्ड भारताच्या हवाली केले गेले..
हे असेच होणार हे आपल्यापैकी बहुतेकांना माहित असते आणि त्याचा त्रागाही करू नये असे कुणी सुचवत असेल तर त्याचे शहाणपण त्याला लखलाभ असो ! या त्राग्याच्या भावनेशी मी समरस होऊ शकतो. अगदी 'शास्त्रकाट्याची कसोटी' लावली तरीही या भावनेला कोणी अयथार्थ ठरवू शकत नाही, ठरवू नये.

---------------------------------------------

अवांतर-
(विशेषत: मी रात्री दोनच्या पुढे फिरत होतो व रस्त्यावर इतर कुणी फारसे नव्हते. शिवाय हेल्मेटच्या काळ्या काचेतून माझा चेहराही दिसत नव्हता)

हे धोकादायक आहे. आपल्याकडचे रस्ते आणि रहदारीची अवस्था पाहता रात्रीच्या वेळी काळ्या काचेचे हेल्मेट वापरणे- तेही पुणे-मुंबई अशा लांबच्या प्रवासात- अयोग्य आहे असे माझे मत आहे. काच बदलून पूर्ण पारदर्शक काच वापरावी, असा सल्ला देतो. :)

आभार आणि स्पष्टीकरण

<< आपल्याकडचे रस्ते आणि रहदारीची अवस्था पाहता रात्रीच्या वेळी काळ्या काचेचे हेल्मेट वापरणे- तेही पुणे-मुंबई अशा लांबच्या प्रवासात- अयोग्य आहे असे माझे मत आहे. काच बदलून पूर्ण पारदर्शक काच वापरावी, असा सल्ला देतो. :) >>

प्रतिसाद व सल्याबद्दल धन्यवाद.

रात्रीच्या वेळी जिथे रस्त्यावर मोठे सोडियम व्हेपर दिवे बसविलेले आहेत अशा महापालिका क्षेत्रातील रस्त्यांवर काळे काचेतून मला रस्ता दिसायला काही अडचण होत नाही. जिथे अशी योजना नाही अर्थात शहराबाहेरील महामार्गावर या काचेमुळे दिसण्यास अडथळा होतो व त्यावेळी मी ही काच वर करतो. काच बदलून पूर्ण पारदर्शक केली तरी शहराबाहेरील महामार्गावर त्या काचेतून (प्रत्यक्षात ही काच नसून ऍक्रिलिक असल्याने व त्यावर अतिसूक्ष्म ओरखडे असल्यानेच) येणार्‍या प्रकाशकिरणांचे अपस्करण होऊन दिसण्यास अडचणच होते असा माझा दुचाकीवरील एक लक्ष किलोमीटर प्रवासतून काढलेला निष्कर्ष आहे.

हरून अल रशीद

अश्या प्रकारे सुरक्षा सज्जतेची चाचणी घेण्याचे काम श्री गुगळे यांनी स्वतःच्या शिरावर घेऊ नये असा कळकळीचा सल्ला चेतन सुभाष गुगळे यांना देऊ इच्छितो.

न जाणो, देव न (?) करो, पोलिसांना नसता संशय येऊन "मंत्रालय/विधानभवन उडवण्यासाठी मोटारसायकलवरून जाणार्‍या एका खतरनाक अतिरेक्याचा चकमकीत मृत्यू झाल्याची" बातमी दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रांतून वाचायला मिळायची. :-(

नितिन थत्ते

धू धू धुणे

न जाणो, देव न (?) करो, पोलिसांना नसता संशय येऊन "मंत्रालय/विधानभवन उडवण्यासाठी मोटारसायकलवरून जाणार्‍या एका खतरनाक अतिरेक्याचा चकमकीत मृत्यू झाल्याची" बातमी दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रांतून वाचायला मिळायची. :-(

"पोलिसांवर पाळत ठेवणार्‍याला पोलिसांनी धू धू धुतले" अशी बातमीही वाचण्यास मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रच्याकने, गूगळे तुम्ही हरून अल रशिदसारखे वेषांतर करून ४ नोवेम्बरच्या रात्री बाहेर पडला होता का?

केवळ अशक्य

धू धू धूमकेतू,

थत्ते म्हणतायत तसं एकवेळ पोलिस मला लांबून गोळी घालु शकतील कदाचित. परंतु तुम्ही म्हणताय तसं घडणं मात्र अंमळ कठीणच आहे कारण मला ताब्यात घेतल्यावर एकदा का त्या पोलिसांना माझं नाव कळलं की ते असं काही करण्यापूर्वी दहावेळा विचार करतील. माझ्याकडे इतर कागदपत्रांबरोबर हा (http://www.loksatta.com/daily/20061111/mv04.htm) कागदही असतो नेहमी (आणि मोबाईलमध्ये ही लिंक देखील).

<< रच्याकने, गूगळे तुम्ही हरून अल रशिदसारखे वेषांतर करून ४ नोवेम्बरच्या रात्री बाहेर पडला होता का? >>

तशी मला कधीच गरज वाटत नाही; उलट चेतन सुभाष गुगळे या माझ्या मूळ रुपातच मला जास्त सुरक्षित वाटते. जालावरदेखील मी कधी यापेक्षा वेगळी ओळख वापरलेली नाहीये. फक्त माझं नावच पुरेसं आहे त्या पंखाच्या जाहिरातीत सांगतात तसं..

कहर आहे....

मूळ थत्त्यांचा प्रतिसाद "अतिरेक्याला गोळी" वगैरे. त्यावर् धूमकेतू व् अ त्यावर चेतनरावाम्चे "माझे नावच पुरेसे आहे" म्हणणे.

कोण म्हणतं साला आमच्याकडे फक्त माहितीपूर्ण असल्यामुळं एखाद्या गोष्टीची कमी आहे.
वैचारिक्, माहितीपूर्ण्, मनोरंजन सर्वच तर आहे की.

तूफानी धाग्याबद्दल चेतनरावांचे खास आभार. पण पुढील वेळेस पासून देशाची घेता तशीच स्वतःचीही काळजी घ्या.

--मनोबा

धन्यवाद

<< कोण म्हणतं साला आमच्याकडे फक्त माहितीपूर्ण असल्यामुळं एखाद्या गोष्टीची कमी आहे.
वैचारिक्, माहितीपूर्ण्, मनोरंजन सर्वच तर आहे की. >>

या प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

<< तूफानी धाग्याबद्दल चेतनरावांचे खास आभार. पण पुढील वेळेस पासून देशाची घेता तशीच स्वतःचीही काळजी घ्या.>>

इथल्या काही सदस्यांचे प्रतिसाद पाहता मला तरी वाटतं की स्वतःची काळजी ही घ्यायला हवीच पण केवळ रस्त्यावरून चालतानाच नव्हे तर संकेतस्थळावर लेखन प्रसिद्ध करतानाही.

चर्चा प्रस्ताव तुमची स्तुती करण्याहेतू ठेवला आहे कां?

चर्चेचा प्रस्ताव ठेवला ठिक आहे. पण चर्चा कशाची करायची? चर्चा करायची की गप्पा मरायच्या? गप्पा मारून मुळ समस्या सूटू शकते कां? समस्या सोडवण्यासाठी चर्चा-गप्पा कामाच्या नसतात. मग चर्चा कशासाठी असतात. एखाद्या समस्येकडे आपण जास्त व्यापक पद्धतीने पाहू शकू ह्या हेतूसाठी सामान्य मंडळी असो वा त्या विशयातील आभ्यासक चर्चा करतात.

चर्चेच्या प्रस्तावात स्वत:च्या कार्याबद्दल इतरांनी चर्चा करावी असे वाटते असेल तर 'अजमल कसाबचं काय झालं?' हे शीर्शक व दिशा व बाकीची गोश्ट चूकीची वाटते.
केवळ 'अजमल कसाब' बाबत चर्चा करायची असती तर सुरवातीचाफाफट पसारा अगदीच निरुपयोगी व वाचकांचा वेळ वाया घालवेल असाच होता.


मजकूर संपादित.

लेख वाचनातील समज कमी पडली. असो...

बहुदा लेख वाचनात आपल्याकडून काही त्रुटी राहिली असल्यानेच लेखात मांडलेले दोन्ही मुद्दे व त्यातील परस्परसंबंध आपल्या ध्यानी आलेला नाहीये. असो. हा लेख यापूर्वीच (http://at-least-i-think-so.blogspot.com/2010/11/blog-post_26.html#commen...) प्रसिद्ध झाला असताना त्यावर रणजीत फरांदे या प्रकाशकाने दिलेली प्रतिक्रिया इथे मांडत आहे.

<< वरील लेखात दोन प्रमुख मुद्दे आले आहेत. पाहिला सुरक्षा व दुसरा कसाब. दोन्हीमध्ये एक समान सूत्र आहे ते म्हणजे आपला ढिसाळपणा. हा ढिसाळपणाच आपल्या देशाचा गुणधर्म आहे व तोच आपल्याला इतर प्रगत देशांपासून वेगळे करतो. >>

आशा आहे की, या वाक्यांमधून आपल्याला लेखातले हे दोनही मुद्दे कळायला मदत होईल.

 
^ वर