माझ्या संग्रहातील पुस्तके-१४ 'लमाण'

श्रीराम लागू यांचे नाव हल्लीच मराठी संकेतस्थळावरील एका चर्चेत आले. तेही मी त्यांचे नास्तिकतेचे उदाहरण दिले म्हणून. नास्तिकतेची इतर अनेक उदाहरणे असताना मला लागूंचेच नाव सुचावे याचे कारण म्हणजे गेले काही दिवस मी वाचत असलेले 'लमाण' हे पुस्तक. हे पुस्तक मी अगदी प्रकाशित झाल्याझाल्या २००४-०५ च्या सुमारास पहिल्यांदा वाचले होते. लागूंची दरम्यान असलेली ओळख म्हणजे मराठी चित्रपटांत अप्रतिम अभिनय करणारा ( 'सामना', 'सिंहासन', 'पारध' ) आणि हिंदीत पाट्या टाकणारा ( 'हेराफेरी' (जुना) या चित्रपटातला त्यांचा वेड्याचे सोंग घेतलेला आणि अमिताभ बच्चन-विनोद खन्नाला अत्यंत नाटकीपणे 'क्यूं मिस्टर एम.ए.एल. एल. बी..' असे विचारणारा पोलीस कमिशनर, 'लावारिस' मधील अमिताभचा तसाच नाटकी वाटणारा दारुडा बाप, 'इन्कार' मधील .. असो.अशी लागूंच्या सुमार/ सामान्य हिंदी भूमिकांची लांबलचक यादी आहे) एक ज्येष्ठ अभिनेता अशी आणि इतकीच होती.त्याआधी लागूंचे सुगंधी कट्टा वगैरे चित्रपट पाहिल्याचे अंधुकसे स्मरत होते. आणि अर्थातच 'पिंजरा'. रंगमंचावर अभिनेता म्हणून मी पाहिलेले एकमेव नाटक म्हणजे लागूंचे बहुतेक शेवटचे नाटक 'मित्र'. आता मला ते नाटक फारसे आठवत नाही, पण त्यातला आपले म्हातारपण नाकारण्याचा म्हातारा साकारताना लागूंनी दाखवलेली कमाल शारीरिक उर्जा बघून भारावून गेल्याचे आठवते.पण पक्षाघात झालेल्या अवस्थेतला लागूंचा अभिनय किंचित बटबटीत, जुन्या पठडीचा वाटला होता, हेही आठवते. पण हे एकच नाटक बघून लागू या अभिनेत्याविषयी काही सरसकट मत बनवणे योग्य नाही हे त्या वेळीही ध्यानात आले होते.बाकी लागूंची इतर कोणती नाटके मला बघायला मिळाली नाहीत. लागूंचा 'नटसम्राट' बघणे मला शक्य झाले नाही. 'काचेचा चंद्र' हे भावनाबाईंना खांद्यावर घेतलेल्या लागूंच्या पाठमोर्‍या पोस्टरमुळे ध्यानात राहिले होते. 'सूर्य पाहिलेला माणूस' हे नाटक प्रचंड इच्छा असूनही बघायला जमले नव्हते.
'लमाण' या पुस्तकाच्या नावातच लेखकाची या लेखनामागची भूमिका स्पष्ट होते. 'आम्ही नट म्हणजे नुसते लमाण. इकडचा माल तिकडे नेऊन टाकणारे' हे शिरवाडकरांचे वाक्य या पुस्तकाचा 'मोटो'म्हणून लागूंनी निवडले आहे.अलीकडे 'लमाण' वाचल्यानंतर मनात पहिला विचार आला की हे पुस्तक पुन्हा एकदा वाचावे. एकदा वाचून त्यावर काही लिहावे इतका लहान या पुस्तकाचा जीव नाही. आपल्या एवढ्या दीर्घ आयुष्यात लागूंनी बरेच काही करुन ठेवले आहे. त्यातले बरेचसे मला तरी 'लमाण' वाचूनच कळाले. मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतला, मराठी रंगमंचावरचा एक मुद्दाम दखल घेण्यासारखा नट हा लागूंचा फक्त एक चेहरा झाला. यापलिकडे एक सशक्त निर्माता व दिग्दर्शक, एक चांगला वाचक व अभ्यासक, प्रायोगिक रंगभूमीवरचा एक प्रज्ञावंत कलाकार आणि सामाजिक तळमळ असलेला एक सच्चा माणूस असे लागूंचे अनेक चेहरे 'लमाण' वाचल्यानंतर ध्यानात येतात. अर्थात यासाठी 'लमाण' वाचलेच पाहिजे असे नाही. 'परमेश्वराला रिटायर करा' म्हणणारे लागू सातत्याने या ना त्या कारणारे चर्चेत राहिले आहेतच. तर ते असो. 'लमाण' वाचताना लागूंची मुख्यतः एक नाट्य कलाकार म्हणून आणि त्यापलीकडे जाऊन एक माणूस म्हणून असलेली प्रामाणिक निष्ठा सतत जाणवत राहते. अगदी सुरवातीच्या काळातील एक उमेदवार हौशी नट ते नाट्य-चित्र सृष्टीतला एक बुजुर्ग कलाकार या प्रवासात लागूंना आलेले अनुभव, त्यांना भेटलेली माणसे, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटना आपल्याला एक वाचक म्हणून आणि एक नाट्य-चित्र प्रेमी म्हणून अगदी गुंगवून ठेवतात. कलाकाराचे आयुष्य किती कष्टाचे, खडतर असते - विशेषतः लागूंच्या उमेदीच्या काळात तर असंख्य गैरसोयी, अडचणी, गैरव्यवस्था यांनी तर ते केवळ असह्य वाटावे असे कसे होते-, कलाकाराला लाभलेल्या रसिकप्रेमामागे लौकिक यशामागे कलाकाराची केवढी मोठी आणि सतत चालणारी साधना असते आणि पन्नासेक वर्षे असे प्रकाशझोतात राहणे म्हणजे कलाकाराकडे शारीर आणि मानसिक पातळीवरची किती उर्जा असावी लागत असेल याचा अंदाज करता येतो. १९६० सुमाराला लंडनमध्ये कायमचे स्थायिक होणे सहज शक्य असूनही आपण केवळ नाटकाच्या ओढीने भारतात परत आलो असे लागूंनी लिहिले आहे. हे असे करणे किती अवघड आहे याची कल्पना करता येईल. त्या काळात लंडनमध्ये स्थायिक होण्यासाठीची पात्रता लागूंकडे नक्कीच होती. तरीही ते आकर्षण टाळण्यासाठी नाटकावर किती जबरदस्त प्रेम असावे लागेल हेही ध्यानात येते. भालबा केळकरांबरोबर स्थापन केलेली, (आणि भालबांबरोबरच्या मतभेदांनंतर लागूंनी सोडून दिलेली) - जिचे नंतर 'पीडीए' मध्ये रुपांतर झाले ती 'इंटर कॉलेजिएट ड्रॅमॅटिक असोसिएशन', ब्रेख्टच्या प्रभावाखाली भडक अभिनयाकडून वास्तववादी अभिनयाकडे 'पीडीए'ची आणि स्वतःची झालेली वाटचाल, अशा नॅचरॅलिस्ट अभिनयाला भल्याभल्यांचा (अगदी आचार्य अत्र्यांचाही) झालेला विरोध ('अरे, नाटकात नाटकीपणा यायचा नाही तर केंव्हा यायचा? मंत्रपुष्पाच्या वेळी?' हे आठवते!), पु.शि.रेगेंची कविता आणि जी.ए.कुलकर्णी यांचा आपल्या जीवनावर बसलेला पगडा अशा लागूंच्या जडणघडणीस कारणीभूत झालेल्या गोष्टी समोर येतात. (हे मनोरंजक आहे. कारण जी.ए. कुलकर्णी हे 'पु.शि. रेगेंची कविता हा आपल्या आयुष्यातील एक 'ब्लाइंड स्पॉट' आहे असे म्हणत असत!) पुढे जी.ए.वाचताना मराठी भाषिकांमधतला खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचा एकमेव कथाकार म्हणजे जी.ए. असे आपले मत झाले आणि अद्यापही तसेच मत आहे असे लागू लिहितात.
साडेतीनशेच्या वर पानांचे हे आत्मचरित्र लागूंनी अगदी मोकळेपणाने लिहिले आहे. आणि याचा अर्थ त्यांनी फक्त आपल्या मद्यपानाविषयी उघड उघड लिहिले आहे, इतकाच मर्यादित नाही. त्याविषयी (आणि त्यांच्या दोन लग्नांविषयी आणि त्यांना अगदी तरुण वयात आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याविषयी!) तर त्यांनी लिहिले आहेच, पण भालबा केळकर, व्ही. शांताराम, सुहास जोशी, मोहन तोंडवळकर अशा लोकांबरोबरचे लागूंचे व्यावसायिक संबंध, त्या संबंधांमधील ताणतणाव आणि प्रसंगी या लोकांचे काहीसे चमत्कारिक वागणे याविषयीही त्यांनी मोकळेपणाने लिहिले आहे. कुसुमाग्रज, वसंत कानेटकर, विजय तेंडुलकर, गो.पु.देशपांडे, रत्नाकर मतकरी, चिंत्र्यं.खानोलकर,पु.ल. देशपांडे,सरीता पदकी या लागूंच्या समकालीन प्रसिद्ध नाटककारांबद्दल आणि त्यांच्या नाटकांबद्दलची लागूंची मते आणि यांची नाटके करताना लागूंना आलेले अनुभव मुळातून वाचण्यासारखी आहेत. तेंडुलकरांच्या नाटकांविषयी लिहिताना तर लागूंची भाषा अधिकच बहरते. 'गिधाडे' विषयी ते लिहितात,' इतके सर्वार्थाने अंगावर येऊन छाताडावर थयाथया नाचणारे नाटक मी तोपर्यंत वाचले नव्हते. नाटक फार हिंस्त्र होते आणि फार जिवंत होते. अत्यंत निर्घृण हिंस्त्रपणे त्याने माझ्या टराटरा चिंध्या केल्या. अत्यंत निर्दयपणे माझे रक्त त्याने गटारात ओतून दिले आणि मग त्यातलेच एक टमरेलभर तोंडाला लावून घटाघटा गिळून टाकले आणि तृप्तीची घाणेरडी ढेकर दिली'. हे वर्णन किंचित शब्दबंबाळ वाटले तरी 'गिधाडे' ची संहिता ताबडतोब मिळवून ती वाचावी असे वाटायला लावणारे आहे!
आपल्या या दीर्घ आणि संपन्न नाट्यप्रवासाविषयी लिहिताना लागूंनी आपल्या आसपास, आपल्या समाजात घडत असलेले चढ उतार डोळसपणे टिपले आहेत. नाटकाच्या निमित्ताने आणि त्याआधीही शिक्षणाच्या, नोकरीच्या निमित्ताने लागूंना अनेक वेळा परदेशप्रवास घडला. त्यामुळे त्यांची नाटकाकडे आणि एकून जीवनाकडे बघण्याची दृष्टी विस्तारित झालेली दिसते. यात परदेशी जाऊन, राहून आलेल्या माणसांना जसा 'इथले आणि तिथले' अशी तुलना करण्याचा मोह होतो, तसा लागूंनाही झाला आहे. भारतीय, विशेषतः मराठी नाटक आणि परदेशी नाटक, मराठी प्रेक्षक आणि आणि परदेशी प्रेक्षक,मराठी समाज आणि परदेशी समाज अशी अपरिहार्य तुलना लागूंच्या लिखाणात आढळते.परदेशी नाटकांची, तिथल्या प्रेक्षकांच्या शिस्तीची वर्णने (आणि लगेचच त्याची भारतीय नाटके, भारतीय प्रेक्षक यांच्याशी तुलना) हे वाचताना बाकी जरा थबकायला होते. 'ते' 'ते' आहे आणि 'हे' 'हे' आहे याचे भान भल्याभल्यांना कसे राहात नाही, असे वाटून जाते. त्या वेळी तांत्रिक सुविधा, सोयी यांनी भारावून गेलेल्या लागूंनी फार नंतर ब्रॉडवेवर नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि त्यातल्या 'नाटका'वर स्वार झालेला तांत्रिक झगमगाट आणि वैभव त्यांना बघवेनासे झाले असे ते लिहितात तेंव्हा ते जरा माणसांत आल्यासारखे वाटतात.
एका गोष्टीचा उल्लेख केल्याशिवाय लागूंच्या या पुस्तकाचे रसग्रहण पूर्ण होणार नाही, ती म्हणजे सामाजिक कृतज्ञता निधी. १९८७ साली सगळ्या महाराष्ट्रात फिरुन 'लग्नाची बेडी' या नाटकाचे प्रयोग करुन महाराष्ट्रात सामाजिक कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना कायमस्वरुपी मानधन देण्यासाठी एक मोठा निधी जमा करण्याचा हा उपक्रम होता. असे करण्याआधी नुसताच लोकांच्या वर्गणीतून असा निधी गोळा करावा अशी कल्पना होती. एव्हाना लागूंचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीत चांगलेच प्रस्थापित झालेले होते. त्यामुळे लागूंनी हिंदी चित्रपटांशी संबंधित मंडळींना या निधीविषयी सांगून त्यांच्याकडून देणग्या घेण्याचा घाट घातला. हजार रुपयांची एक पावती असे त्यांचे पावत्यांचे एक पुस्तक दोन दिवसांत संपले. बी.आर.चोप्रा, अमिताभ बच्चन, जितेंद्र, हेमा मालिनी, परवीन बाबी, अमजद खान अशा मंडळींनी भराभरा पैसे काढून दिले. हे पैसे कशासाठी, कोणासाठी याबाबत कुणी विचारलेही नाही. 'अरे डॉक्टरसाब, आप मांग रहे हैं तो अच्छे काम के लिये ही होगा, आप खा थोडेही जायेंगे' असे म्हणून पावती घेण्यासाठीही न थांबता हे लोक निघून गेले! हे पैसे बाळगताना आपल्याला फार पराभूत वाटले असे लागू लिहितात. एकीकडे समाजाचे काही ऋण मानणारे मराठी लोक आणि दुसरीकडे फक्त पैसा आणि प्रसिद्धीची मस्ती असलेली हिंदी चित्रपटसृष्टी यांच्यातला एक मोठा फरक ध्यानात येतो. अगदी मराठी आणि हिंदी असे सरसकटीकरण करु नये हे मान्य करुनही. आपल्या चकचकीत, प्रकाशझोतात असलेल्या हिंदी चित्रपटातील प्लॅस्टिकच्या भूमिकांविषयी लागूंनी अगदी कमी, जवळजवळ नाहीच इतके लिहिले आहे, हे बघून फार फार बरे वाटते.
मराठी नाट्यसृष्टीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरावा अशाया पुस्तकात छायाचित्रे फार कमी आहेत ही एक ठळक आणि जाणवण्यासारखी उणीव. आहेत त्या छायाचित्रांतून बाकी लागूंचा स्वतःचा अभिनय 'मेलोड्रामाटिक' ते 'मेलो' कसा होत गेला याची एक झलक बघायला मिळते. नाटकात काम करताना पहिल्या काही प्रयोगांनंतर नटाला तेच तेच करण्याचा कंटाळा येऊ लागतो. 'भूमिका जगणे' वगैरे सगळे सुरवातीला ठीक आहे, पण अशा किती भूमिका एक नट किती वेळा जगणार? यावर लागूंनी सांगितलेला तोडगा गमतीशीर आहे. भूमिकेला नाट्याच्या तंत्रात अगदी जखडून टाकायचे. शरीराच्या, चेहर्‍याच्या काय, कोठे हालचाली होतात ते बघायचे आणि नंतर नाटकभर त्यांचा मुक्तपणे वापर करायचा. 'भूमिका जगणे' वगैरेच्या हे बरोबर उलटे तंत्र आहे. म्हणजे या तंत्राचा वापर करुन अभिनय करणारे लागू शैलीचे नट ( 'स्टाइलाइज्ड' अभिनय करणारे- दिलीपकुमार, अमिताभ बच्चन परंपरेतले नट) मूळ भूमिकेशी किती नाळनिराळे राहात असतील हे यावरुन ध्यानात येते.
'लमाण' हा फक्त एका मराठी नटाचा प्रवास नाही, तर तो मराठी नाट्यविश्वाच्या पन्नासेक वर्षांचा एक पातळसर तुकडा आहे. लागूंचेच नव्हे तर इतर अनेक कलाकारांचे नाव, त्यांच्या भूमिका उद्या काळाच्या विशाल फताड्या पावलाखाली नाहिशा होतील. एकूणच कलाकृती जतन करुन ठेवण्याबाबतची आपली अनास्था जगजाहीरच आहे. 'लमाण' मध्ये लागूंच्या सगळ्या भूमिकांची छायाचित्रेसुद्धा नाहीत, याचे कारण असे की ती उपलब्द्धच नाहीत. 'सूर्य पाहिलेला माणूस' (आणि कदाचित 'मित्र') अशा मोजक्याच नाटकांच्या ध्वनिचित्रफिती उपलब्द्ध आहेत. 'नटसम्राट' चे अगदी सपक चित्रण कुठेतरी सरकारी 'आर्काईव्हज्' मध्ये धूळ खात पडले आहे (असा उल्लेख'लमाण' मध्ये आहे, कदाचित आता त्याची ध्वनिचित्रफीत उपलब्द्ध झाली असेल). पण याशिवाय 'खून पाहावा करुन', 'गिधाडे', 'गार्बो' अशा अनेक नाटकांच्या पाऊलखुणाही आज शिल्लक नाहीत याची 'लमाण' वाचून खंत वाटते. हे मराठी नाट्यसृष्टीचे अपयश मानले तरी ते 'लमाण' चे यश मानले पाहिजे.
याचा अर्थ 'लमाण' हे एक सर्वस्वी निर्दोष, आदर्श आत्मचरित्र आहे असा नाही. तसे कोणते पुस्तक आदर्श असते म्हणा, पण 'लमाण' मधील काही दोष लागूंना टाळता आले असते असे वाटते. या पुस्तकात आपल्या कौटुंबिक, खाजगी आयुष्यातील काही शोकांतिकांचा उल्लेख हेतुपुरस्सर टाळणार्‍या लागूंना स्वतःच्या गोर्‍या, घार्‍या कोकणस्थी रुपाचे, आपल्या उत्तम प्रकृतीस्वास्थ्याचे, फाडफाड इंग्रजी बोलण्याचे आणि आपल्या सुरेख अभिनयाचे व त्याला मिळालेल्या रसिकांच्या कौतुकाचे पुनरुल्लेख टाळता आले असते, असे वाटते. एखाद्या व्यक्तीविषयी भरभरुन लिहायचे आणि नंतर तिचे प्रतिमाभंजन करायचे, असेही या पुस्तकात काही वेळा झालेले आहे. अर्थात ही या पुस्तकाची मर्यादा मानायची की लागूंचा प्रामाणिकपणा, हे ज्याने त्याने ठरवायचे.
एकूण 'लमाण' मला फार आवडले. सहसा मी चरित्रे,आत्मचरित्रे यांच्या वाटेला जात नाही, पण 'लमाण' वाचून हे माझे धोरण म्हणजे माझा पूर्वग्रह आहे, आणि तो मला बदलला पाहिजे, असे वाटले.

Comments

उत्तम परिचय

"लमाण" आणि "तोच मी" (प्रभाकर पणशीकर) ही मी एकाचवेळी घेतलेली दोन पुस्तके. मराठी नाट्यसृष्टीमध्ये आपापल्या वाटचालीने स्वतःच्या नावाला निश्चित एक वलय प्राप्त करून देणारे हे दोन कलाकार. पैकी पहिले उच्चविद्याविभूषित तर दुसरे शून्यातून (खर्‍या अर्थाने 'राबराबून') धडपडीला सुरुवात करणारे. डॉ.लागूंच्याच शब्दात "वडील स्वतःच डॉक्टर असल्याने आणि त्यांच्या प्रॅक्टिसचा जम पुण्यात उत्तम बसल्यामुळे आमच्याकडे काही हलाखीची स्थिती वगैरे मुळीच नव्हती." तर पंतांच्या घरी नेमकी या उलट स्थिती. पण अशा भिन्न स्थितीत वाढलेल्या या दोघांनी रंगभूमीवर जो नावलौकिक मिळविला (आणि एकाने व्यावसायिक पातळीवर मिळालेल्या यशाने हुरळून जाता आपल्या गुरूंच्या - भालबा केळकर - शिकवणीला न विसरता प्रायोगिक रंगभूमीवरही तितक्याच तळमळीने प्रेम केले, तर दुसरीकडे पंतांनी व्यावसायिक रंगभूमीवर जे अचाट यश मिळविले त्यालाही तोड नाही. पंतांनी तर पुढे ज्यांच्याशी संबंध तोडून टाकण्याइतपत वाद झाला त्या मो.ग.रांगणेकर या आपल्या गुरूलाच 'तोच मी' अर्पण केले आहे. दोघांचीही या क्षेत्रातील गुरूंवर असलेली भक्ती लक्षणीय आहे.)

अर्थात श्री.राव म्हणतात त्याप्रमाणे रूढार्थाने "लमाण" हे डॉ.श्रीराम लागू यांचे आत्मचरित्र नव्हे, किंबहुना डॉक्टरांनी सुरुवातीला मनोगतातच वाचकास चेतावणी दिली आहे की, "आत्मचरित्र लिहिण्याइतका मी मोठा नाही. माझ्या एकूण नाट्यप्रवासाचा हा धावता आढावा आहे. मित्रांच्या आग्रहाला बळी पडून हे लिखाण झालेले आहे. त्यामुळे त्यात अभिनिवेश कसलाच नाही."

अशी प्रांजळ कबुली पहिल्याच पानावर असल्याने मग त्यानी आपल्या खाजगी जीवनातील गोष्टींना टाळले असल्यास ते त्यांचे स्वातंत्र्य वाचकांनी स्वीकारलेच पाहिजे. होते असे की, 'कलाकार' (मग तो चित्रपटसृष्टीतील असो वा रंगमंचावरील) आणि त्याचे/तिचे 'चरित्र' हे रंगीबेरंगी (च) असले पाहिजे असे सर्वसामान्य वाचकच नव्हे तर कित्येक बाजारी प्रकाशकांचाही आग्रह असतो. कलाकाराच्या जीवनात 'तसली' प्रकरणे असतातच हे जणू ग्राह्य मानलेच जावे असा अलिखित संकेत आहे. पु.लं.चा 'अन्तू बर्वा' ही त्याना तर्जिनानासिकान्यायाप्रमाणे "तुमच्या नाटकधंद्यात तसले काहीतरी चालतेच ना" असे खवचटपणे विचारतो त्यालाही सर्वसामान्य रसिकाची चघळायला काहीतरी चविष्ट असलेच पाहिजे हीच वृत्ती कारणीभूत असते. डॉक्टरांनी असला खपाऊ मालमसाला टाळून केवळ 'नाटकातील डॉ.श्रीराम लागू' हीच एक भूमिका घेऊन 'लमाण' चे लिखाण केल्याचे नक्कीच जाणवते आणि म्हणून ते भावतेही. [अर्थात 'पिंजरा' 'सिंहासन' 'सामना' यांचे उल्लेख त्या प्रवासात येणे अटळ आहेच कारण त्याना या भूमिका मिळाल्या त्या केवळ त्यांनी रंगभूमीवर मिळविलेली लोकप्रियता. - 'पिंजरा' चित्रपटाच्या या नायकाला चित्रपटाचे मानधन म्हणून केवळ अडीच हजार मिळाले होते हे वाचून - शिवाय घरून येताना आपल्या जेवणाचा डबाही आणावा लागे - मराठी चित्रपटसृष्टीच्या श्रीमंती (?) ची कल्पना येते.]

जी.ए.कुलकर्णी यांच्या 'कथा' विषयी त्याना किती आदर होता हे 'लमाण' मध्ये कित्येक ठिकाणी प्रतित होते. डॉक्टरांना त्याना आवडेल त्या कथेवर आधारित चित्रपट दिग्दर्शनाची ऑफर एका निर्मात्याने दिली त्यावेळी त्यानी जीएंचेच सर्व कथासंग्रह पुनःश्च वाचून काढले. पण तसे पाहिले तर खुद्द ते स्वत:च कबुली देतात "करमणूक करणे हे कलाकृतीचे एक कार्य असू शकते, पण प्रत्येक कलाकृतीने करमणूक केलेच पाहिजे असा हट्ट धरता येणार नाही. दादा कोंडक्यांचे 'विच्छा..." आणि निळूभाऊंचे 'कथा अकलेच्या कांद्याची' हे निखळ रंजनाचे उत्तम कलात्मक अनुभव आहेत. पण मर्ढेकरांची कविता अथवा जी.एं.च्या कथा यांच्याकडून रंजनाची अपेक्षा करणे निखालस चूक ठरेल." कदाचित या मुद्द्यावरूनच निर्माता आणि होऊ घातलेले दिग्दर्शक डॉ.श्रीराम लागू यांच्यामध्ये 'जी.ए.कुलकर्णी' हा विषय बाजूला पडला असेल.

असो. एका कसदार अभिनेत्याच्या आणि समाजाप्रती कृतज्ञतेची जाणीव मनी सतत बाळगणार्‍या व्यक्तीच्या 'लमाण' बद्दलचे परीक्षण वाचून सदस्यांना मूळ पुस्तक वाचण्याची भावना नक्की होईल इतके चांगले लिखाण श्री.सन्जोप राव यांच्याकडून झाले आहे.

अशोक पाटील

"तोच मी"

"तोच मी" माझ्याही वाचण्यात फार पूर्वी आले होते. त्यातील रांगणेकरांबद्दल पंतांनी दिलेला तपशील (मुख्यतः "तो मी नव्हेच" च्या मालकीसंदर्भात व वादासंदर्भात) आणि अत्र्यांनी "तो मी नव्हेच" च्या खुद्द प्रस्तावनेतच दिलेला तपशील ह्यात बरीच, धक्कादायक म्हणावी अशी तफावत आढळली. दोन्ही समोरासमोर ठेवले, तर एक मान्य करणे भाग आहे की कुणीतरी एकाने थेट कपोलकल्पित घटना बेधडक सांगितली आहे, किंवा कुणीतरी एकाने एक घटना काळजीपूर्वक कथनातून गाळली आहे,लपवली आहे.
इतकेच नाही तर पणशीकरांच्या नंतरच्या काळातील दिवाळी अंक वगैरेतील मुलाखतीतूनही काहीशी वेगळी माहिती समजली. मग नक्की खरे काय??
असाच किस्सा ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल ह्यांच्या "तिसरी घंटा" ह्यातील तोरडमल-मोहन वाघ ह्याबद्दल सांगता येइल. तिथेही स्वतःची(च्) बाजू मांडली आहे.

आधीच वाचनाची फारशी हौस नाही, जी काही आहे, त्यात आत्मचरित्र जवळजवळ नाहिच अशी स्थिती असताना हे सर्व हाती लागले ; व आत्मचरित्रे फारच वैयक्तिक, गाळिव व सोयीस्कर माहिती देतात, पूर्ण माहिती न देता हेवेदावे असणार्‍यांचे भलतेच चित्र उभे करतात असे वाटले. आत्मचरित्र वाचनाचा कंटाळा येण्याचे हेही एक कारण ठरले.

तस्मात्, मूळ लेखावर यथोचित प्रतिक्रिया देउ शकत नाही. पण परिक्षणासोबतच एक विचार मांडायची शैली आवडलीच. परिक्षण हे निव्वळ पुस्तकाचे वर्णन(पृष्ठसंख्या, प्रकाशक) असे मर्यादित न राहता वेगवेगळे आयाम स्पर्शून गेले, मनातील विचारतरंग मांडून गेले हे महत्वाचे.

--मनोबा

सरस

अत्यंत ओघवत्या भाषेत लिहीलेला (आणि तरीही) 'लमाण'मधले बारकावे ध्यानात आणून देणारा लेख.
हे केवळ रसग्रहणही नव्हे किंवा केवळ परीक्षणही नव्हे. त्या दोहोंसह आणखीही काही जाणवते. लागूंच्या पुस्तकाचे गुणदोष काय आहेत हे सांगतानाच प्रस्तुत लेखकाला ते तसे आहेत असे का वाटले? त्याची मिमांसाही होते म्हणून या लेखाला वेगळेपणा प्राप्त होतो.

अवांतर :
'उपलब्ध' हा शब्द नेमका कसा लिहावा? - उपलब्द्ध की उपलब्ध. माझ्या मताने तो उपलब्ध असा असावा. कृपया स्पष्ट व्हावे.

उत्तम

माझ्या संग्रहातील पुस्तकेची नवी आवृत्ती पाहून आनंद झाला! मस्त परिचय. तुमच्याच लेखातले एक वाक्य वापरून म्हणते - "हे परीक्षण लमाण ची संहिता ताबडतोब मिळवून ती वाचावी असे वाटायला लावणारे आहे!" विसुनानांशी सहमत: रसग्रहण + परीक्षणाचा उत्तम बॅलेन्स तुम्हाला पुस्तक परिचयात जमतो. पुस्तकाचेच नव्हे तर त्याच्या विषयाच्या आणि लेखकाच्या संदर्भाचा ही चांगली, मार्मिक ओळख होते.

ब्रेख्टच्या प्रभावाखाली भडक अभिनयाकडून वास्तववादी अभिनयाकडे 'पीडीए'ची आणि स्वतःची झालेली वाटचाल, अशा नॅचरॅलिस्ट अभिनयाला भल्याभल्यांचा (अगदी आचार्य अत्र्यांचाही) झालेला विरोध ('अरे, नाटकात नाटकीपणा यायचा नाही तर केंव्हा यायचा? मंत्रपुष्पाच्या वेळी?' हे आठवते!), पु.शि.रेगेंची कविता आणि जी.ए.कुलकर्णी यांचा आपल्या जीवनावर बसलेला पगडा अशा लागूंच्या जडणघडणीस कारणीभूत झालेल्या गोष्टी समोर येतात. (हे मनोरंजक आहे. कारण जी.ए. कुलकर्णी हे 'पु.शि. रेगेंची कविता हा आपल्या आयुष्यातील एक 'ब्लाइंड स्पॉट' आहे असे म्हणत असत!)

वैचारिक विश्वाचे निराळे धागे असे एकत्र आले आणि एखादी अनपेक्षित विण पहायला मिळाली की आनंद होतो.
"लगेच वाचायला हवे" ची माझी यादी वाढत चाललीय - सो मेनी बुक्स, सो लिटल टाइम...
*********
धागे दोरे
*********

शोध घेणे आले!

चला आतालायब्ररीत या पुस्तकाचा शोध घेणे आले!
बाकी सन्जोप रावांना किती वेळा पुस्तकांच्या सुचवण्याबद्दल धन्यवाद द्यायचे! छ्या! ;)
असो. धन्यवाद! :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

धन्यवाद !

'लमाण' गेल्या वर्षी वाचले, फार आवडले.
डॉक्टरांनी यात फक्त 'अभिनेता श्रीराम लागू' (त्यातही मुख्यतः रंगकर्मी श्रीराम लागू) यांचा जीवनपट दाखवला आहे, हे उल्लेखनीय आहे. कारण लागूंना महाराष्ट्र कला-बाह्य कारणांनी तितकाच ओळखतो. त्यांचे सामाजिक आणि खाजगी जीवन या चरित्रात फारसे दिसत नाही. ही उणीव नक्कीच नाही, कारण पुस्तकाचा उद्देश पहिल्या पानापासून सुस्पष्ट आहे.

कलावंत कसा घडतो, कलेचे प्रयोजन काय वगैरेसंबंधी लागूंची मते पुस्तकात विषयाच्या अनुषंगाने (नाटकात स्वगत येते, तशी) येतात. ती फार सुरेख आहेत. या प्रांतात काहीतरी करू इच्छिणार्‍यांनी फ्रेम करून भिंतीवर लावावीत अशी ती वचने आहेत.

(अवांतर- 'झाकोळ' नावाचा मराठी सिनेमा आधी पाहिला होता. त्यात श्रीराम लागूंच्या मुलीची भूमिका करणारी चिमुरडी ही उर्मिला मातोंडकर आहे, हे पुस्तक वाचल्यानंतर कळले. :))

सुंदर पंचनामा

लमाण छान आहे की नाही हे माहित नाही पण तुम्ही रसग्रहण छान करता हे नक्की, एवढा सुंदर पंचनामा (सकारात्मक) तुम्हीच करू जाणे.

लिहा..लिहित रहा.

उत्तम

परीक्षण अतिशय आवडले. त्रुटी जमेस धरूनही 'लमाण'सारखी पुस्तके मराठी साहित्यात महत्त्वाची आहेत, यात वादच नाही. डॉ. लागूंच्या दीर्घ कारकीर्दीत त्यांचे भूमिकांबद्दलचे बदलत गेलेले विचार आणि 'नटाने आपले शरीर हे एका साधनाप्रमाणे वापरले पाहिजे' ही अंगी मुरवलेली भूमिका ह्या गोष्टी पुस्तक वाचताना जाणवत राहतात.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

 
^ वर