प्रकाशाचा वेग - नवसिद्धांत.
अन्वयार्थ : विनम्र शंका की सनातनपणा? संदर्भ:- लोकसत्ता, सोमवार, २१ नोव्हेंबर २०११.
भौतिकशास्त्रात दृढमूल असलेल्या गृहीतकाला धक्का देणारा निष्कर्ष सप्टेंबर महिन्यात जाहीर झाला. न्यूट्रिनो हे अतिसूक्ष्म कण प्रकाशाहून अधिक वेगाने प्रवास करतात असे आढळून आले. गेल्या आठवडय़ात पुन्हा केलेल्या प्रयोगातही हाच निष्कर्ष निघाला. प्रकाशाचा वेग कोणत्याही वस्तूला पार करता येणे शक्य नाही हे भौतिकशास्त्रातील प्रमुख गृहीतक. अल्बर्ट आइनस्टाईन यांचे सिद्धांत यावर आधारित आहेत. प्रकाशाचा वेग हा सर्वोच्च आहे हे केवळ गृहीतक म्हणून नव्हे तर गणिती वास्तव म्हणून मानले जात होते. यामुळे त्याच्याबद्दल निश्चितता वाटत होती. अशी निश्चितता कोणालाही हवीहवीशी वाटते. रोजच्या व्यवहारातही माणूस नेहमी निश्चिततेच्या शोधात असतो. काही गोष्टी स्थिर म्हणून गृहीत धरलेल्या असतात. ही निश्चितता, स्थिरता नष्ट झाली की माणूस अस्वस्थ होतो. युरोपातील सर्न प्रयोगशाळेतील प्रयोगानंतर अशीच अस्वस्थता वैज्ञानिक जगात पसरली. आइनस्टाईनच्या सिद्धांताला मर्यादा आहेत हे अनेकांना मान्य होत नव्हते. आइनस्टाईन हा त्यांच्यासाठी प्रेषित होता. मानवी प्रज्ञेचा सर्वोच्च आविष्कार त्यांच्या ठिकाणी झालेला होता. शास्त्रज्ञ म्हणून आणि त्यापलीकडे माणूस म्हणून आइनस्टाईन थोर होते, ऋषीतुल्य होते यात शंकाच नाही. मानवावर खोल परिणाम करणारा दुसरा शास्त्रज्ञ अलीकडील काळात झाला नाही. त्यांच्या सापेक्षतावादाने केवळ भौतिकशास्त्रच नव्हे तर मानवाच्या विचारपद्धतीवरच परिणाम केला. त्या सापेक्षतावादाचा कणा असलेल्या प्रकाशाच्या वेगाच्या सिद्धांताला सर्नच्या प्रयोगाने धक्का दिल्याने अनेकजण बेचैन होणे समजू शकते. मात्र स्वत: आइनस्टाईन यांनी सापेक्षतावाद मांडला तेव्हा अशीच बेचैनी त्या वेळच्या शास्त्रज्ञांनी अनुभवली होती. न्यूटनच्या सिद्धांताच्या मर्यादा त्यांनी दाखवून दिल्या व त्यापलीकडे झेप घेतली. सृष्टीकडे पाहण्याची नवी मिती त्यांनी उघडून दिली. त्याचे गणित मांडले. त्यांच्या पाठोपाठ क्वांटम मेकॅनिक्स मांडण्यात आले. त्यातील गृहीतके बघून आइनस्टाईनही अस्वस्थ झाले होते. देव फासे खेळत नाहीत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली होती. परंतु, वस्तुजाताचा शोध घेत आपण जितके खोल जाऊ तितकी नवी नवी आश्चर्ये उघड होत आहेत व आधीच्या सिद्धांतांच्या मर्यादा दाखवून देत आहेत. नव्या शोधांमुळे आधीचे सिद्धांत कालबाह्य़ होत नाहीत वा खोटे ठरत नाहीत. त्यांची कक्षा निश्चित होते. एका विशिष्ट कक्षेत ते बरोबर असतात. पण त्यापलीकडे नवी मिती उदयाला येते व तेथील नियम वेगळे असतात. न्यूट्रिनो नव्या नियमांत काम करतात व प्रकाशाच्या वेगाची मर्यादा जुमानत नाहीत. पण यामुळे व्यावहारिक जीवनात आपण घट्ट पकडून ठेवलेल्या अनेक समजुतींना धक्का बसू शकतो. उदाहणार्थ, भूत, भविष्य यातील सीमारेषा अंधुक होते. आजची माहिती भूतकाळात पाठविण्याची शक्यता निर्माण होते. कारण व त्याचे परिणाम दाखविणारे कार्य यांच्यातील सांधा निखळतो. कार्य-कारण संबंधांकडे ठराविक साच्यात पाहता येत नाही. भौतिकशास्त्र अधिकाधिक गूढ होऊ लागते. अशी गूढता नकोशी वाटणारी माणसे वैज्ञानिकांमध्येही असतात. सर्नच्या निष्कर्षांवर त्यांनी झोड उठविली. अनेक शंका उपस्थित केल्या. त्या शंकांचा आदर ठेवून अधिक अचूकतेने पुन्हा प्रयोग करण्यात आला. तरीही निष्कर्ष तोच निघाला. आता पुन्हा काही शंका मांडण्यात आल्या आहेत. त्या वैज्ञानिक अचूकतेच्या आस्थेपोटी विनम्रपणे मांडण्यात आलेल्या आहेत की केवळ जुन्या गृहीतकांचा आग्रह जपण्यासाठी आहेत हे माहीत नाही. पण त्याही दूर करण्याचा प्रयत्न अधिक अचूक प्रयोग करून वैज्ञानिक करणार आहेत. अशा प्रयोगांनी नवा निष्कर्ष अधिक दृढ होईल अशी खात्री सर्नच्या वैज्ञानिकांना वाटते तर आइनस्टाईन खोटा ठरणार नाही अशी भाबडी आशा काहीजण धरून आहेत. येथे आइनस्टाईन खोटा ठरत नाही तर आपली आशा खोटी ठरते हे त्यांच्या लक्षात येत नाही. सृष्टीतील गूढे मानवी कल्पनांच्या पलीकडील आहेत एवढे मात्र निश्चितपणे म्हणता येते.
हा लेख वाचून उपक्रमकरांची आठवण झाल्यावाचून राहिलो नाही. ह्या लेखांत भविष्यकालीन विज्ञानासंबंधी असलेली अनेक विधाने ही माझ्यासारख्यांस साहजिकरीत्या न उमजणारी अशी आहेत; त्यांचे मुळापासून अर्थ आणि तटस्थ स्पष्टीकरण उपक्रम येथे मिळू शकेल ह्याची खात्री वाटते. त्यासह सदरील वार्तेबाबत उपक्रमकरांचे काय विचार आहेत, हे जाणून घ्यावयास आवडेल, हे नक्की.
धन्यवाद.
हैयो हैयैयो
-
Comments
एकनाथांची एक पैची खोट
एकनाथ (संत होण्यापूर्वीचे) एकदा हिशोब करत होते, आणि ताळ्यात एका पैची खोट होती. रात्रभर जागले. काही केली तरी त्यांना हिशोब जुळवता येईना. एकनाथांसारखा सचोटीचा माणूस. प्रयत्नांतही काही कमी ठवलेले नाही. या एका पैचे काय झाले, ते आजतागायत आपल्याला माहीत नाही.
मोठमोठ्या घोटाळ्यांत करोडो रुपयांचा हिशोब लागत नाही. इतकेच काय, बाजारात भाजी आणायला गेलो, तर कधीकधी घरी येईपर्यंत रुपया-दोन रुपयांचा हिशोब लागत नाही.
काही प्रॉसेक्यूटर त्या कंपनीच्या व्यवस्थापकांना कायद्याच्या कचाट्यात पकडू बघतात. अकांउंटिंगचा लेखाजोखा मागतात. घरचे सोडा - मोठ्या कंपन्यांत अकाउंटिंग कसे करतात त्याचे तपशील मला नीट समजत नाहीत. एकनाथांची एका पैची गोष्ट ऐकून मिपावरील चार्टर्ड अकाउंटंट विशेषज्ञांचे मत काय ते कळावेसे वाटते आहे.
भविष्यकालीन अकाउंटिंगमध्ये सिद्धांत काय असतील? एकनाथांच्या एका पैसारखेच शेकडो किंवा करोडो रुपये हे ताळ्यात येणार नाहीत का?
- - -
थोडक्यात : येथे प्रश्न "स्केल"चा आहे. भौतिकशास्त्राला प्रचंड कोड्यात पाडणारा प्रयोग ६० नॅनोसेकंदांच्या हिशोबाचा आहे. (मनुष्याला कळून येणारे कमीतकमी कालांतर ~२५,००,००,००० नॅनोसेकंद इतके आहे.) स्वित्झरलँडहून निघालेले न्यूट्रीनो इटालीत प्रकाशाच्या ६० नॅनोसेकंद आधी पोचल्याची नोंद आहे. आणि या मोजमापाबाबतही अजून पूर्ण खात्री नाही. पण खात्री झाली, असे क्षणभर मानू.
आणि अंतर वाढले तर हा हिशोबातला घोटाळा मोठा-मोठा होत जात नाही. दूरवरच्या तार्याचा स्फोट होतो, तेव्हा तिथले न्यूट्रीनो आणि प्रकाशकिरण पृथ्वीवर मोजलेले आहेत. न्यूट्रीनो आडथळ्यांना जुमानत नाहीत, प्रकाशकिरणे मात्र अवकाशातल्या धुळीवरून ठोकरा खात-खात येतात. म्हणजे सध्याच्या भौतिकशास्त्राच्याच हिशोबात न्यूट्रीनो प्रकाशकिरणांच्या थोडे आधी पोचायचे गणित आहे. १,६०,००० प्रकाशवर्षे लांब असलेल्या सुपरनव्हा तार्यावरूनचे न्यूट्रिनो केवळ ३ तास आधी पृथ्वीवर पोचले. या नवीन प्रयोगात स्वित्झरलँड ते इटाली ७२० किमी अंतराची शर्यत न्यूट्रीनो ६० नॅनोसेकंदांनी जिंकले, त्याच वेगाने न्यूट्रीनो पल्ला वाढवत गेले, तर त्या तार्यापासून न्यूट्रीनो ५ महिने आधी यायला हवे होते!
म्हणजे भौतिकशास्त्राच्या सिद्धांतात जो बदल होईल, त्यातून अतिसूक्ष्म फरक पडेल - पण ढोबळ घटनांच्या बाबतीत फरक पडणार नाही. सिद्धांतातला मोठा फरक हा मोजमापातला अतिसूक्ष्म फरक होईल. जर न्यूट्रीनो वापरून ६० नॅनोसेकंद पुढचे भविष्य निश्चित कळू शकले, तरी ते अधिक-अधिक आधी कळायचा प्रयत्न केला, तर न्यूट्रिनो शर्यतीत पुढे-पुढे जात नाही. (म्हणजे भविष्याचे वर्तमान झाल्याच्या आसपासच घटनेचे ज्ञान होते).
एक पैचासुद्धा हिशोब लागलाच पाहिजे म्हणून अकाउंटंट लोक त्यांच्या पद्धती अजूनही सुधारत आहेत. पण याचे काय? घरगुती पंचवीस रुपये किंवा कंपनीतले करोडो रुपये यांचा हिशोब लागत नाही : नव्या सूक्ष्म फरकांमुळे त्या घटनांबद्दल आपण मत बदलू का? नाही बदलणार. आणि बदलण्याची गरजही नाही.
सूक्ष्म फरक
इथे पैचा आणि प्रकाशवेगाचा संबंध कसा जोडला धनंजय यांनी हे थोडे पचले नाही.. चु भु द्या घ्या ..
मुद्दा हा आहे की प्रकाश वेग हा प्रमाण मानला होता आईन्स्टाईनच्या संशोधनापासून आणि त्यानंतर.. म्हणजे प्रकाश वेग हा अंतिम त्यापेक्षा वेगवान तोच.. हा जो सिद्धांत होता त्यास थोडा का होईना पण धक्का देण्याचे काम या प्रयोगाने केले आहे.. हिशोबाची चूक समजू शकतो पण इथे चूक नसेल असे गृहीत धरल्यास नवीन संशोधनाच्या काय दिशा असतील असा विचार होऊ शकतो..
सूक्ष्म फरकांमुळे मत बदलू का ? हा प्रश्नच विवाद्य आहे .. मग तर सबंध नॅनो तंत्रज्ञानच रद्द होईल ..तिथे तर सगळ्या गोष्टी सुक्ष्मातच चालतात ना..
गणिती भाषेत सांगायचे तर लावायचे ठरवल्यावर सगळे हिशोब मग ते घरगुती वा कंपनीचे असोत, लावता येतात.. ( शक्य असल्यास एक महिना कडकपणे कार्ड व्यवहार करून पाहिल्यास तर सगळे हिशोब छापील मिळतील..)
पण बऱ्याचदा हे हिशोब मोघम राहतात (त्याची कारणे काही असोत!) पण मग हा न्याय संशोधन आणि गणिताना लावता येणार नाही..(नाहीतर आमच्या गणिताच्या मास्तरांनी कधी आमच्यावर छडीचे प्रयोग केले नसते.. )
नवे फरक सूक्ष्म जरी असले तरी मत बदलणार नाही अथवा बदलण्याची गरज नाही हे काही मान्य नाही..
काहीतरी गैरसमज असावा
नॅनो तंत्रज्ञानाचे परिणाम नॅनोस्तरावर बघत आहोत की मॅक्रोस्तरावर बघत आहोत?
नॅनोटेक्नॉलॉजीचे अनेक परिणाम मॅक्रोस्तरावर आहेत (विकिपेडिया दुवे एक दोन तीन). तर वरील वाक्य ठीक नाही : "तिथे तर सगळ्या गोष्टी सुक्ष्मातच चालतात ना".
आणि जर या वाक्याने फक्त सूक्ष्मातच परिणाम असलेल्या बाबतीत बोलायचे असेल, तर अर्थातच मॅक्रोस्तरावर त्या नॅनोतंत्राचे काहीच सोयरसुतक राहात नाही. बाय-डेफिनिशन मॅक्रोस्तरावरची मते बदलणार नाहीत.
याबाबत आपण आइन्स्टाईनची साक्ष काढूया :
"साईडलाइट्स ऑफ् रिलेटिव्हिटी (दुवा)" निबंधसंग्रहातील भूमितीवरील निबंधात तो सांगतो:
याच्या विस्तृत संदर्भाचे भाषांतर असे:
येथे आइन्स्टाईनच्या पूर्ण निबंधाचा दुवा दिलेलाच आहे. त्याचे वाक्य "बाबावाक्यं प्रमाणम्" म्हणून घ्यायची गरज नाही. त्याचा पूर्ण युक्तिवाद तपासता येतो.
शाळेतील गणिताचे मास्तर छडीचा प्रयोग कशाला करतात, ते ठाऊक नाही. (मराठीचे मास्तरही छडीचा प्रयोग करतात.) संशोधनात आणि गणितात (आणि ललितलेखनात) काय चालते, ते महत्त्वाचे नसावे. परीक्षा पास होऊन विद्यार्थी पुढे जावेत हा अदूरदर्शी हेतू असू शकेल. कधीकधी अदूरदर्शी हेतूबद्दल सहानुभूती वाटते.
त्याच निबंधात आइन्स्टाईन म्हणतो :
ही झाकोळलेली गूढ संदिग्धता मास्तरांनी छडीने निर्माण केली असेल, तर मात्र त्यांच्या परीक्षार्थी हेतूचा दूरगामी दुष्परिणाम झाला!
उद्धृत
मूळ अभ्यास लेख इथे वाचता येईल. हा लेख वाचल्यावर कळते की या विषयावर आत्ताच सरसकट विधाने करणे चुकीचे आहे.
या लेखातील एक महत्त्वाचे वाक्य इथे उद्धृत करतो-
"We deliberately do not attempt any theoretical or phenomenological interpretation of the results."
अवांतर :
मराठीच्या मास्तरांची छडी, सहानुभूती आणि संदिग्धता या शब्दांच्या खेळातून मारलेली कोपरखळी.;)
असो.
हाहाहा!
विसुनाना, तुम्ही बर्याचदा काय लिहता हे मला कळत नाही बरंका! ;-)
-Nile
छडीवरचा पोल डान्स
मी काही फार शिकलेला, PhD वगैरे केलेला 'ज्ञानी' माणूस नव्हे, त्यामुळे असेल कदाचित पण इथे साध्या भाषेत तर्कबुद्धीस पटेल असा सरळ विचार करायचा आणि मांडायचा प्रयत्न करतोय...
तर मास्तरांनी आम्हाला ३+३ =९ असे लिहिले म्हणून छडीचा प्रसाद दिला होता.. आणि त्या कंसातल्या अवांतर वाक्यामधल्या छाडीवर तुम्ही पार पोल डान्स केला की राव.. :D ..भले..!!
आता मास्तरांना ३+३ = ९ हे बरोबर आहे हे तुमच्या त्या गणिती तर्कशास्त्रीय निबंधाने पटवू शकाल काय? मास्तराना सोडून द्या.. तुम्ही स्वतःला २+२=५ किंवा ३+३=९ या साध्या गणित क्रिया बरोबर म्हणून पटवू शकाल काय..?
माझ्या गणिताच्या संदिग्धतेबाबत असलेली भूमिका ही या पातळीवर आहे .. आणि मी याच विचाराप्रमाणे या वरील चर्चेबाबत बोलत आहे.. आईन्स्टाईन म्हणाला म्हणून 'प्रकाश वेग' अंतिम नाही.. आणि हे न्यूट्रिनोजच्या संदर्भातले एक निरीक्षण त्या शक्यतांची शक्यता दर्शवते.. एवढाच मुद्दा...
बदल सूक्ष्म असले तरी बदल आहेत एवढे तरी मान्य करुया.. आणि 'नॅनोटेक्नॉलॉजीचे अनेक परिणाम मॅक्रोस्तरावर आहेत' ही गोष्ट आजची.. जेव्हा पहिल्यांदा हे बदलांचे निष्कर्ष सापडले लगेच मॅक्रोस्तरावर परिवर्तीत झाले काय. 'आणि जर या वाक्याने फक्त सूक्ष्मातच परिणाम असलेल्या बाबतीत बोलायचे असेल, तर अर्थातच मॅक्रोस्तरावर त्या नॅनोतंत्राचे काहीच सोयरसुतक राहात नाही. बाय-डेफिनिशन मॅक्रोस्तरावरची मते बदलणार नाहीत' म्हणून मग त्या बदलांचा विचार करायचा नाही असे तर नाही..
"नवे फरक सूक्ष्म जरी असले तरी मत बदलणार नाही अथवा बदलण्याची गरज नाही.." या मुद्द्यावर मात्र मी असहमती दर्शविली होती ती कायम, कारण लगेच मत बदला असे खुद्द शोधणारे म्हणत नाहीत पण नव्या शक्यतांची शक्यता नाकारून पुढचा विचारांसाठी दारे आधीच बंद का करावी..
बाकी निबंधाबद्दल आभार.. 'ऍक्सियोमॅटिक्स' या नवीन विषयाबद्दल उत्सुकता निर्माण झालीय.. वाचतो आणखी आता..
(काही कमी जास्त लिहिले गेले असेल तर सोडून द्या... आणि अशीच उपयोगी माहिती येऊ द्या.. आणि हो, मास्तर नसते तर आम्ही नक्की शेतमजुरी करीत राहिलो असतो आणि नक्कीच खूप काही शिकलोय त्यांच्याकडून.. कोणाचे ही "बाबावाक्यं प्रमाणम्" मानू नका हे पण त्यानीच शिकवले. 'न्युटन म्हणजे सर्व सत्य' असे जेव्हा समजत होतो तेव्हा सोप्या शब्दात सापेक्षतावाद पण त्यानीच सांगितला.. छडीचा फक्त भावार्थ.. बाकी तुमच्यासाठी 'अदूरदर्शी' असलेल्या हेतूबद्दल सहानुभूतीची नक्कीच गरज नाही असे वाटते.. असो.. अवान्तर टाळतो.. )
होय, पटवू शकतो, पण अवांतर फार होईल
होय, पटवू शकतो, पण अवांतर फार होईल. शिवाय ते गणित "सुंदर" नसेल तर लवकरच कंटाळा येईल.
(साधारणपणे असेच काहीतरी, पण अधिक "सुंदर" उदाहरण आइन्स्टाईनने त्याच्या निबंधात दाखवलेले आहे. [यूक्लिड] ऍक्सियमप्रमाणे प्रतलावरती अगणित वर्तुळे मावू शकतात, तर वेगळ्या ऍक्सियमप्रमाणे फक्त मर्यादित संख्येत वर्तुळे मावू शकतात. म्हणजे वर्तुळाला वर्तुळ जोडून अंतराची बेरीज केली, तर बेरीज पुढे अशी बेसुमार वाढत जाते की वर्तुळांची संख्या मर्यादित असली, तरी प्रतल पुरत नाही. म्हणजे थोडेफार २+२=५ सारखे, पण अधिक सुंदर. २+२+२... [अगणित नव्हे] = इन्फिनिट, असे काहीसे)
विचाराची दिशा अशी : ऍक्सियोमॅटिक्स मध्ये "२", "३", "५", "९", "+" आणि "=" चिन्हांचा अर्थ अनुमानधपक्याने किंवा उपजत जाणिवेने घेता येत नाही. त्यांच्यासाठी नेमकी गृहीतके सांगावी लागतात.
- - -
माझ्या ७वी-८वीच्या गणीताच्या पुस्तकातला एक धडा आमच्या शिक्षकाने शिकवला नाही. पण बालभारतीच्या पुस्तकात धडा होता, हे विशेष. "क्लॉक अरिथ्मेटिक" असे धड्याचे नाव होते. त्यात त्यांनी दाखवले होते की घड्याळ गोल असल्यामुळे १,२,...११,१२, १, २,... असा अंकांचा क्रम दिसतो. त्यामुळे १+२ = ३. आणि ११+२ = १. वगैरे. अशा प्रकारे एक स्वयंपूर्ण आणि तर्कशुद्ध अंकगणित तयार होते. मात्र या अंकगणितातला "+" आणि बाकीच्या पुस्तकातला "+" यांच्यात काहीसा फरक आहे. आणि काहीसे साम्यही आहे. वेगळीच गृहीतके घेतलेले हे तर्कशुद्ध अंकगणित होय. रोजच्या आयुष्यात अगदी उपयोगी असलेले घड्याळ समोर ठेवल्यामुळे "हा काय उगाच विचित्रपणासाठी विचित्रपणा" असे मनात आले नसते. "ऍक्सियोमॅटिक्स" हा शब्द धड्यात नव्हता. पण या उदाहरणावरून विद्यार्थ्यांच्या मनात अनायासे थोडेसे रुजले असते, की वेगवेगळी गृहीतके घेतली, तर अगदी वेगवेगळ्या तर्कशुद्ध अंकगणितपद्धती उभ्या राहातात. एकमेकांच्या संदर्भात त्या वेगवेगळ्या पद्धतींना अर्थसुद्धा राहात नाहीत. पण प्रत्यक्ष जगात कुठल्या परिस्थितीत कुठले अंकगणित लागू करायचे, ते जगाच्या प्रत्यक्ष तपासणीवरून ठरते.
आमच्या शिक्षकाने हा धडा शाळेत शिकवला नाही, याबाबत अजून थोडेसे वाईट वाटते. अंकगणिताबाबत असलेला एका प्रकारचा "मिस्टिसिझम" थोडा खिळखिळा झाला असता. मग पुढच्या शिक्षणात वेगळी गृहीतके असलेले गणित समजून घेताना थोडे सोपे गेले असते.
(क्लॉक ऍरिथ्मेटिक पुढे-पुढे नेले म्हणजे "ट्रिगोनोमेट्री" होय.)
- - -
आणखी एक गंमत म्हणजे यूक्लिडचे समांतर-गृहीतक अमान्य करायचे. म्हणजे त्रिकोणातील कोनांची बेरीज १८० डिग्री आहे वगैरे अमान्य करता येते. त्या गृहीतकातून उपजणारी शालेय गणिते अमान्य करण्यातून उभा राहाणारे गणित "सुंदर" आहे.
- - -
ट्रिगोनोमेट्री घ्या, किंवा नॉन-पॅरालेल-पॉस्चुलेट-भूमिती घ्या, किंवा अंकगणित घ्या. वेळप्रसंग आला, तर कुठला प्रकार जगात प्रत्यक्षात लागू आहे? ते त्या प्रकारांच्या अंतर्गत तर्कशुद्धतेवरून ठरत नाही. त्यांच्यातील परस्पर-विसंगती तर विचारात घ्यायचीच नसते - ऍक्सियम्स वेगळे असल्या कारणामुळे. जगाचे निरीक्षण करून ठरवायचे असते, की वेगवेगळ्या तर्कशुद्ध गणितपद्धतींपैकी कुठली गणितपद्धती या परिस्थितीत लागू आहे?
- - -
- - -
येथे तुमचा गैरसमज झालेला आहे. म्हणून मुद्दामून वरच्या प्रतिसादात १९८७अ सुपरनोव्हाचा उल्लेख दिलेला आहे. सुपरनोव्हावरून न्यूट्रीनो प्रकाशकिरणांच्या केवळ ३ तास आधी आले, ५ महिने आधी आले नाहीत. नवीन शोध लावणारे असे म्हणणार का, की शक्यतांची दारे उघडी ठेवायची म्हणून १९८७अ सुपरनोव्हा बद्दल मत बदलणार आहोत, आणि त्यातील न्यूट्रीनो ५ महिने आधी आले अशी घोषणा करणार आहोत? तर नव्हे. न्यूट्रीनो ७२० किमी अंतर अधिक वेगाने गेले असतील (६० नॅनोसेकंद आधी), तरी १४०,००० प्रकाशवर्षे जाईपर्यंत त्यांचा वेग कमी झाला पाहिजे, हेसुद्धा दाखवणारा नवीन सिद्धांत तयार करावा लागेल. म्हणजे नवीन सिद्धांतासाठी दारे बंद नाहीत. पण नव्या सिद्धांतातही जे मॅक्रो निरीक्षण आधीच झालेले आहे - १९८७अ सुपरनोव्हा - त्याची सोय लावलीच पाहिजे. सिद्धांत नवा आणला तरी मॅक्रोनिरीक्षणात न्यूट्रीनो प्रकाशकिरणाच्या पुढे जात नाही हे मान्यच ठेवावे लागेल.
(सुपरनोव्हापासून न्यूट्रीनो प्रकाशकिरणाच्या आधी ३ तास आले कारण त्या लांब प्रवासात प्रत्येक प्रकाशकिरण एकदातरी धूलिकणावरून परिवर्तित होऊन थोड्या लांबच्या रस्त्याने येतो. न्यूट्रीनो मात्र थेट येतात.)
नवा सिद्धांत नाही
न्यूट्रिनोजच्या वेगाबद्दलचे हे एक फक्त निरीक्षण झालेले आहे. त्यामुळे जुन्या सिद्धांतानुसार केलेल्या भाकिताला (किंवा त्यामागील गृहीतकृत्याला) धक्का बसला असला तरी त्यासंबंधीचा नवा सिद्धांत अद्याप कोणी मांडलेला नाही.
चर्चा
लोकसत्तेतील लेख वाचला होता. हैयो हैयैयो तो चर्चेस आणल्याबद्दल त्यांचे आभार.
न्युट्रिनो हे प्रकाशवेगापेक्षा जास्त वेगाने जात असतील तर सापेक्षतावादातील काही गृहितकांचा पुनर्विचार करावा लागेल हे साहजिक आहे. विज्ञानात गृहितकांचा पुनर्विचार एरवीही करता येतो ती गोष्ट वेगळी. पण प्रयोगातील वारंवारीता अजूनही नीटशी प्रस्थापित झाली नसावी असे एकंदर वाचनावरून वाटले. अशी वारंवारिता ध्यानात आल्यास प्रयोगाचे मूल्य वाढेल. त्याच बरोबर पॉपरच्या फॉल्सिफिकेशन तत्वाचा वापर होऊन या प्रयोगातील विविध अंगांकडे पाहिले जाईलच. या कसोटीतूनही प्रयोग उतरला तर त्याच्या परिणामांना नाकारणे मूर्खपणाचे ठरेल. पण तोपर्यंत सबूरीने घेतले पाहिजे. माझ्या मते अजून ती वेळ आलेली नाही.
यापूर्वीही प्रकाशवेगाहून जास्त वेगाने धावणार्या संदेशाची कल्पना केली गेली होती. क्वांटम एन्टॅन्गल्मेंट मधे असे काहीसे घडेल असा त्यावर एक आक्षेप होता. विशेषतः हा आक्षेप बोह्मनी मांडलेल्या (विज्ञानजगतात फारसा मान्य नसलेल्या) सिद्धांतावर होता. याच बरोबर टॅकियोन नावाच्या कल्पित कणाचा सिद्धांत सुदर्शन यांनी मांडला होता. हा कण त्यांच्या मते भूतकाळात जाणार ऋणमासाचा वगैरे होता. काही प्रयोगात प्रकाशाचा वेग मोडल्याचा दावा पूर्वीही झाला होता.
लोकसत्तेतील लेखात वैज्ञानिक भाबडेपणाबद्दल लिहिले आहे. कदाचित ते खरे असेल म्हणजे काही जण भाबडी असतीलही पण बहुतेकांना भाबडे मानणे धार्ष्ट्याचे ठरेल. चर्चेत संदर्भ दिलेल्या आइन्स्टाईनच्या उतार्यावरूनही ते सहज कळते.
चर्चेच्या निमित्ताने नवीन माहिती कळली. विशेषतः धनंजय यांनी दिलेला संदर्भ आणि विसुनानांनी संदर्भित केलेला निबंध यामुळे चांगले वाचायला मिळाले.
प्रमोद
विज्ञान कशाला म्हणावे?
विज्ञानाची एक व्याख्या अशी आहे :
सायन्स् इज् द कंटीन्युअस् डिस्कव्हरी ऑफ् इट्स् ओन् मिस्टेक्स्.
धन्यवाद.
धन्यवाद.
प्रतिसाद वाचतो आहे, त्यासह विषय समजावून घेतो आहे. वरकरणी कठीण वाटणारे विषय सोपे करून मांडण्याची उपक्रमकरांची हातोठी वाखाणण्यायोग्य आहे. सार्या प्रतिसादकर्त्यांस धन्यवाद.
--
सॆन्दमिऴ् नाडॆऩ्ऩुम् बोदिऩिले इऩ्बत्तेऩ् वन्दु पायुदु कादिऩिले
ऎङ्गळ् तन्दैयर् नाडॆऩ्ऱ पेच्चिऩिले ऒरु सक्ति पिऱक्कुदु मूच्चिऩिले
हैयो हैयैयो!