मुंबई ते ठाणे आगगाडी - १८५३ मधली.

आंतरजालावर भ्रमण करीत असतांना आणि गूगलमध्ये ’मराठी’ असा शोध घेत असतांना ’A Short Account of the Railways’ अशा नावाचे एका पुस्तकाचे नाव समोर आले. ह्या शोधामध्ये हे इंग्रजी पुस्तक कोठून शिरले अशा कुतूहलाने पुस्तक प्रत्यक्ष उघडले आणि असे आढळून आले की हे पुस्तक वस्तुत: मराठीत आहे. लॉर्डनर नावाच्या साहेबाच्या Railway Economy नामक पुस्तकातील काही मजकूराचे भाषांतर करून पुस्तक तयार करण्यात आले आहे. भाषान्तरकार कृष्णशास्त्री भाटवडेकर आणि मुद्रक गणपत कृष्णाजी असून Deccan Vernacular Society च्या विद्यमाने ते प्रकाशित करण्यात आले आहे. पुस्तकाचे प्रसिद्धिवर्ष १८५४ असे छापले आहे. (जिज्ञासूंना गूगल बुक्समधील हे पुस्तक http://tinyurl.com/3r6r3ja येथे पाहाता येईल.)

हे सर्वज्ञात आहे की भारतातील पहिली प्रवासी आगगाडी १६ एप्रिल १८५३ साली मुंबई ते ठाणे आणि परत अशी धावली. त्या प्रसंगानंतर एका वर्षाच्या आतबाहेरच हे पुस्तक छापण्यात आले. कोठल्याच बैल-घोडयासारख्या जनावराकडून न ओढताच धावू शकणारे हे अजब यंत्र हा एतद्देशीय नेटिवांना चमत्कारासारखाच वाटत होता. ती आगगाडी कशी धावते आणि तिच्या मागची व्यवस्था कशी आहे हे सोप्या भाषेत त्यांना समजावून सांगण्यासाठी ह्या पुस्तकाची निर्मिति झाली आहे

आगगाडीचे एंजिन कसे काम करते येथपासून गाडीचे तिकीट कसे काढावे आणि गाडीतून सामान कसे घेऊन जावे हे बाळबोध पद्धतीने समजावून सांगितलेले वाचण्यास आज मोठी मौज येते पण त्या काळातील साधाभोळया प्रवाशांना सगळेच नवीन असणार! ह्या वर्णनापैकी पुष्कळसे वर्णन नुकत्याच सुरू झालेल्या हिंदुस्तानी गाडयांना लागू दिसत नाही. ते इंग्लंड अथवा युरोपातील गाडयांबद्दल मुख्यत्वेकरून असावे असे दिसते. ह्या बाळबोध वर्णनामध्ये एकदोन मजेदार तपशील मिळतात. सर्व ठिकाणी ’गाडीची रांग’ असा शब्द train अशा अर्थाने वापरला आहे. गाडयांना ब्रेक लावून थांबवण्याची पद्धत नव्हती, त्याऐवजी गाडी स्टेशनात पोहोचण्याच्या अलीकडेच एंजिन आणि डबे ह्यामधील जोड काढून टाकून एंजिन वेगाने पुढे जाई आणि किल्लीवाला विशिष्ट स्थानी ते एंजिन पोहोचताच रूळ बदलून एंजिनाला शेडकडे पाठवी आणि लगेच किल्लीने रूळ पहिल्यासारखे करून त्यांवरून उरलेले डबे हळू वेगाने घरंगळत स्टेशनाकडे जात असे वर्णन आहे. शेडमध्ये एंजिनाच्या तोंडाची दिशा बदलण्यासाठी एका फिरत्या गोल प्लॅटफॉर्मवर एंजिनास आणून तो प्लॅटफॉर्म पुरेसा फिरवण्याची पद्धत होती. (अशी सोय मी फार वर्षांपूर्वी जुन्या MSM - Madras and Southern Maratha Railway च्या एका छोटया स्टेशनात पाहिल्याचे आठवते.) असे कित्येक मनोरंजक तपशील पुस्तक चाळल्यास वाचायला मिळतील.

पुस्तकाच्या शेवटाशेवटाला १६ एप्रिल १८५३ च्या पहिल्या प्रवासी गाडीच्या बोरीबंदर-ठाणे फेरीचे वर्णन आहे. ते मुळातून वाचण्यासारखे आहे. (ह्या वर्णनाच्या शीर्षकात वर्ष १८५४ असे पडले आहे ती मुद्राराक्षसाची चूक आणि निष्काळजी प्रूफ़रीडिंग आहे असे दिसते.)

पुस्तकात काही मनोरंजक चित्रे आहेत तीहि खाली देत आहे. प्रथम दोन पूल आहेत. पैकी पहिला कोणता असावा ह्याबाबत कोणी काही तर्क करू शकेल काय़? वर उल्लेखिलेल्या पहिल्या पहिल्या प्रवासाच्या वर्णनात माहीम आणि शीवच्या पुलाचा एक ओझरता उल्लेख आहे तोच हा असेल काय? तसे असेल तर शीवनंतरच्या खाडीवर तो असेल काय? अशी एक खाडी होती असे मी वृद्ध लोकांकडून ऐकल्याचे स्मरते. दुसरा पूल ठाण्यापलीकडचा खाडीवरील पूल दिसतो. मे १८५४ मध्ये गाडी कल्याणपर्यंत जाऊ लागली कारण खाडीवरचा २२ कमानींचा पूल बांधून तोपर्यंत पूर्ण झाला होता. पूल अद्याप उभा आहे पण लवकरच पाडला जाईल असे दिसते. (http://tinyurl.com/6z65yl6). ह्या पुलाचे सर्वत्र पाहायला मिळणारे चित्रच खाली देत आहे. हे चित्र पुस्तकातील नाही. सर्व ठिकाणी ह्या पुलाचे नाव Dapoorie Viaduct असे आढळते. हे नाव असे का असावे ह्याबाबत कोणी काही तर्क करू शकेल काय?

त्यामध्ये तिसरे चित्र एका छोटया बोगद्याचे चित्र आहे. ठाणे-कल्याणमधील लोकलच्या रुळांवरचा एखादा बोगदा तो असावा काय? कारण ठाण्यापर्यंतच्या प्रवासात बोगदा कोठेच असायचे कारण नाही.

त्या नंतरची बोरीबंदर आणि भायखळा स्टेशनांची चित्रे मजेदार आहेत. आजच्या तेथील स्टेशनांशी त्यांचे काही नातेगोते असेल असे वाटत नाही.

अखेरीस १८५३ मधल्या एंजिनाची दोन चित्रे आहेत. तेथेच तुलनेसाठी अलीकडच्या काळातील महाकाय वाफेच्या एंजिनाची दोन चित्रे जोडली आहेत.

पुस्तकाच्या अखेरीस एप्रिल १८५३ ते मे १८५४ ह्या काळातील महिनेवार उतारू संख्या आणि तिकिटाचे उत्त्पन्न असा तक्ता दिला आहे. त्यावरून असा तर्क निघतो एका प्रवासाचे दरमाणशी तिकीट ४ ते ६ आणे असावे आणि प्रत्येक दिवशी सरासरीने १००० मुंबई ते ठाणे हे प्रवास होत असावेत म्हणजेच ५०० प्रवाशांची रोज वाहतूक होत असावी.

शीवची खाडी?
शीवची खाडी?
ठाण्याच्या खाडीवरील Dapoorie Viaduct
ठाण्याच्या खाडीवरील Dapoorie Viaduct
बोगदा
बोगदा
बोरीबंदर
बोरीबंदर
भायखळा
भायखळा
एंजिन १
एंजिन १
एंजिन २
एंजिन २
अलीकडचे एंजिन
अलीकडचे एंजिन
अलीकडच्या एंजिनाची चाके
अलीकडच्या एंजिनाची चाके

.
.
.

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

.
.

लेखनविषय: दुवे:

Comments

उत्तम माहितीबद्दल धन्यवाद !

उत्तम माहितीबद्दल धन्यवाद !
लोहमार्ग (लोखंडी रस्ते) जाणाऱ्या गावांच्या प्रगतीबद्दल मूळ लेखकाचा अंदाज आज तंतोतंत खरा ठरला आहे.
पुलंचे एक वाक्य आठवले " जुनी संस्कृती नदीच्या काठाने वसली होती, नवी संस्कृती रुळांच्या काठाने वसते आहे ".

किंचित् अधिक माहिती

काही वर्षांपूर्वींपर्यंत श्री पटवर्धन नावाचे गृहस्थ टाइम्स् ऑफ् इंडिया मध्ये भारतीय रेल् वे विषयी माहितीपूर्ण पत्रे लिहीत. हे श्री पटवर्धन रेल् वे मध्ये मोठ्या हुद्द्यावर काम करून निवृत्त झालेले होते. (त्यांचेही नाव अरविंदच असावेसे आठवते. नक्की नाही.) त्यांचे एक पुस्तकही प्रसिद्ध झालेले होते. त्यांच्या लेखातून कितीतरी मनोरंजक माहिती, रेल् कथा प्रगट झालेल्या आहेत. जी आय पी रेल् वे वरील सध्याच्या शीव स्थानकास त्या काळी माहिम रोड असे नाव होते, कारण माहिम हा महत्त्वाचा आणि मोठा प्रांत होता. जी आय् पी रेल् मार्गावरून माहिम येथे जाण्याचा मार्ग म्हणून माहिम रोड. शीव येथे खाडी तर होतीच होती. माहिमची खाडी थेट आत कुर्ल्यापर्यंत असून ती माहिम बेटाला साष्टीपासून विभागत असे. शीव भागातल्या दलदलीत रेल् मार्ग कसा टाकला गेला त्याचीही सुरस कहाणी त्यांच्याच लेखातून वाचलेली होती. सांताक्रुझ् विमानतळाचा विस्तार करताना कुर्ला भागातला खूप मोठा दलदलीचा पट्टा बुजवला गेला तसेच पूर्वीच्या कल्पना थिएटरच्या आसपासची टेकडीही पाडण्यात आली.
गेल्या दोनतीन शतकांतल्या मुंबईविषयीच्या पुस्तकांमध्ये न.र.फाटक,गंगाधर गाडगीळ,गोविंद माडगावकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. शिवाय भायखळा येथील जिजामाता उद्यानातल्या भाऊ दाजी लाड संग्रहालयात जुने बाँबे गॅझेटीअर्स् ठेवलेले आहेत. या व्यतिरिक्त अ.का. प्रियोळकर यांनी लिहिलेल्या काही चरित्रग्रंथांतूनही आनउषंगिक माहिती मिळते. डेविड् अब्राहम यांच्यकिंग्रजी पुस्तकाचा 'ऐक मुंबई तुझी कहाणी'हा यशवंत रायकर(?) यांनी केलेला अनुवादही बरीच माहिती देतो.

पटवर्धन

त्यांचे नाव जी डी पटवर्धन असे होतेसे वाटते.

साठच्या दशकापर्यंत सध्याच्या पश्चिम द्रुतगती मार्गावरील भाईंदरच्या खाडीवरचा पूल* नव्हता. त्यामुळे मुंबईहून डहाणू, पालघर सूरत वगैरे दिशेने जाणार्‍या एसटीच्या बसेस ठाणे - भिवंडी - वाडा - मनोर अशा मार्गाने जात असत. पूर्व दृतगती मार्गाला अहमदाबाद हायवे न म्हणता घोडबंदर मार्ग म्हणत असत. (ठाणे येथील सध्याचा घोडबंदर मार्ग वेगळा)

*माझ्या वडिलांनी सांगितलेल्या माहितीनुसार बीबीसीआय रेल्वेला (आताची प रे) स्पर्धा होऊ नये म्हणून तो पूल बांधला नव्हता.

नितिन थत्ते

घोडबंदर रोड्

१)पश्चिम द्रुतगतिमार्ग नव्हता तेव्हा पश्चिम उपनगरांतून मुंबईबाहेर जाण्यासाठी एकच रस्ता उपलब्ध होता तो म्हणजे घोडबंदर रोड्. हा रस्ता माहिम कॉज् वे पासून सुरू होऊन ठाणे जिल्ह्यातल्या वसई खाडीवरच्या घोडबंदर ह्या प्रमुख गावावरून पुढे भिवंडी मार्गे जाई. पश्चिम रेल् वे च्या पश्चिम काठाने हा रस्ता बोरिवली रेल् वे स्थानकापर्यंत येई. या स्थानकाच्या उत्तरेला असलेल्या रेल् वे फाटकातून हा रस्ता पूर्वेला उतरे आणि पुढे घोडबंदरवरून ठाण्यापर्यंत जाई. या रस्त्याच्या बोरिवली स्थानकापर्यंतच्या पश्चिमेकडील भागाला आता स्वामी विवेकानंद मार्ग म्हणतात. पूर्वेकडील मार्ग अजूनही घोडबंदर मार्ग म्हणूनच ओळखला जातो.
सध्या पश्चिम दृतगतिमार्गाला काही लोक अहमदाबाद रस्ता म्हणतात तर पूर्व दृतगतिमार्गाला काही लोक आग्रा किंवा नाशिक रस्ता म्हणतात. खरे तर संपूर्ण भारताच्या दृष्टीने पाहाता अहमदाबाद रस्त्याला पश्चिम महामार्ग म्हणणे काहीसे योग्य आहे कारण पुढे मुंबईबाहेरही तो पश्चिम भारतातूनच जातो पण पूर्व दृतगतिमार्ग मात्र मुंबईपुरताच पूर्वेकडे आहे. एन्.एच्.४,एन्.एच्.८,एन्.एच्.१७ वगैरे क्रमांक निदान मुंबईत तरी संदर्भहीन आहेत.
२)ते नाव जी.डी.पटवर्धनच असावे. धन्यवाद.

जुना घोडबंदर रोड = हल्लीचा एस्व्ही रोड (

जुना घोडबंदर रोड = हल्लीचा एस्व्ही रोड (पश्चिम द्रुतगती महामार्ग नव्हे)
पश्चिम द्रुतगती महामार्ग नंतर बांधला गेला. पुढे याचे नामकरण 'अली यावर जंग मार्ग' असे करण्यात आले.

दरम्यान त्याकाळच्या मुंबईचा छान नकाशा विकीपिडीयावर आहे तो येथे देत आहे. यातही एक रस्ता रेल्वे लाईनच्या पश्चिमेकडून जाताना दाखवला आहे. हाच एस्व्ही रोड झाला असावा

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

आगीच्या गाड्या

"हे सर्वज्ञात आहे की भारतातील पहिली प्रवासी आगगाडी १६ एप्रिल १८५३ साली मुंबई ते ठाणे आणि परत अशी धावली."

~ A Short Account of the Railways या पुस्तकात जर १६ एप्रिल १८५३ अशी तारीख असेल तर मग एम्.पी.एस्.सी.; यु.पी.एस्.सी. अभ्यासक्रमासाठी नियत केलेल्या पुस्तकांतील (आणि तत्संबंधी अनेक मार्गदर्शनपर पुस्तकांतील) मुंबई ते ठाणे पहिल्या रेल्वे प्रवासाची दिलेली तारीख "२२ एप्रिल १८५३" ही निश्चितच चुकीची मानावी लागेल. परीक्षेला बसणारी हजारो मुले/मुली '२२' हीच तारीख गृहीत धरतात. [तपासणारे परीक्षकही हीच तारीख ग्राह्य धरत असणार.] असो.

बाकी हे पुस्तक वाचताना मजा येत आहे हे नक्की. विशेषतः १८५३ च्या सुमारासही "प्रवाश्यांनी डब्यात तंबाखू ओढू नये" या बाबत दिलेली सक्त ताकीद. त्याविरूद्ध वर्तन करणार्‍याला होणारा वीस रुपयापर्यंतचा दंड. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या डब्यात पुरुषानी जाणे गैर मानले जाणे. मुंबई-ठाणे पहिल्या प्रवासाचे वेळी रेल्वेच्या आजुबाजूला बोरीबंदरपासून भायखळ्यांपर्यंत "तमासगिरांनी दाटला होता" आदी उल्लेख

या निमित्ताने आठवले ते ज्या तीन "आगीच्या गाड्यांनी" ते २०-२२ मैलाचे अंतर "ओढले" त्यांची नावे 'साहिब, सिंध, सुलतान" अशी ठेवण्यात आली होती. मात्र यामागच्या कारणाचा या पुस्तकात कुठे उल्लेख आलेला नाही. [अर्थात ते तितकेसे महत्त्वाचेही नाही म्हणा.]

@ राही ~ "ऐक मुंबई तुझी कहाणी" चे अनुवादक पुरुषोत्तम धाक्रस आहेत. (ना.सी.फडके यांचा ललितमध्ये "ठणठणपाळ" सदर लिहिणारे जयवंत दळवी नसून पुरुषोत्तम धाक्रस हेच आहेत असा पक्का समज होता. जो दळवीनी कधी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही.)

अशोक पाटील

होय

आज प्रतिसाद पाठवा वर टिचकी मारताना अंमळ घाई होतेय् खरी. ते डेविड् अब्राहमही टाइम्स् ऑफ् इंडियाचे स्तंभलेखक डेविड् हेच ना; की दुसरे कोणी? जुन्या हिंदी सिनेमांतल्या डेविड् नामक चरित्र अभिनेत्याचे नाव डेविड् अब्राहम् होते का ?

डेव्हिड

परत होय, राही. "डेव्हिड अब्राहम" म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील चरित्र अभिनेता जे 'डेव्हिड' या नावाने पडद्यावर वावरत. "हिस्ट्री ऑफ बॉम्बे" च्या लेखकाचे नाव आहे डेव्हिड एम्.डी.

पण असो. चालायचेच, या किरकोळ चुका असतात स्मरणासंदर्भात. तुम्हाला ते तपशील आठवतात तेच महत्त्वाचे.

अशोक पाटील

डेव्हिड

हिंदी चरित्र अभिनेते डेव्हिड यांचे नाव डेव्हिड अब्राहम चौलकर (चेउलकर) होते.

नितिन थत्ते

डापूरी व्हायाडक्ट - दापोडीचा पूल!

थोडे गूग्लून पाहिल्यावर असे आढळले की 'डापूरी व्हायाडक्ट' नावाने दिले गेलेले प्रकाशचित्र हे मूळ मुंबईतील पुलाचे नसून पुण्याच्या पुलाचे आहे. हा बोपोडी -दापोडी दरम्यानचा (हॅरिस ब्रिज) रेल्वेपूल असावा.
दापोडीला इंग्रजांचे ठाणे होते आणि लॉर्ड एल्फिन्स्टन दापोडीतच रहात असे. तसेच १८५४ मध्ये पुण्याकडूनही मुंबईच्या दिशेने रेल्वे मार्गाची बांधणी सुरू झाली होती. [BB&CI (Bombay Baroda & Central Indian) ]

मूळ ब्रिटिश म्युझियममधील या चित्राचे वर्णन 'मुंबईजवळील पूल' असे आहे. त्या चित्राचा कर्ता अज्ञात असल्याने तो पूल नक्की कुठे आहे ते ब्रिटिश म्युझियमला देखील पक्के माहित नाही. त्यांनीच त्यासंदर्भात विचारणा केलेली आहे. पण या अर्धवट माहितीचा संदर्भ घेऊन इतर सर्व ठिकाणी हा पूल (सध्याच्या) बृहन्मुंबईतच असावा असे नमूद केलेले आढळते. हा दुवा पहावा - http://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/photocoll/d/019pho0000254s3...
हा फोटो-

आणि

हा फोटो -

एकाच पुलाचा आहे असे माझे मत झाले आहे.

(ब्रिटिश म्युझियम, विकी , पॅनोरामियो.कॉम आणि लालम यांचे प्रकाशचित्रांबद्दल आभार.)

+१

(दापोडीचा पूल असल्याची) माहिती बरोबर असावी. दापुरी हे नावही बरेचसे जुळते.

फोटो पाहिल्यावर ठाणे खाडीवरील पूलाला इतक्या कमानी कशा? असा प्रश्न पडलाच होता. शिवाय सध्या खाडीवर जो पूल आहे (ठाणे आणि कळवा यांच्या मध्ये) त्यातला काही भाग तरी लोखंडी गर्डर्सचा आहे (पक्षी-खाली 'उघडा असलेला').

नितिन थत्ते

हा पूल दापोडीचाच दिसतो आहे.

विसुनानांचे म्हणणे अगदी योग्य दिसते. मलाहि तीच शंका आली होती कारण ठाणे-कल्याण परिसरात 'दापूरी' असे नाव पुलाला द्यावे असे कोणतेच ठिकाण नाही.

सुदैवाने दोन्ही चित्रे एकाच ठिकाणाहून, म्हणजे मुंबईहून गाडी पुण्याकडे येतांना पुलाच्या पुण्याकडील शेवटाच्या उजव्या हाताकडच्या बाजूने घेतलेले दिसतात आणि त्यामुळे दोन्ही चित्रांची तुलना सहज करता येते. त्यांमध्ये पुढील गोष्टी अगदी मिळत्याजुळत्या आहेत.

१) जुन्या चित्रात १४ कमानींनंतर आणि नव्या चित्रात १३ कमानींनंतर आधारासाठी टेकू म्हणून केलेले काही बांधकाम दिसते, जसे बांधकाम चर्चेसमधील भिंतीनाहि केलेले असते. नव्या चित्रात एक कमान कमी दिसते ह्याचे कारण ते अधिक पुढून घेतलेले आहे. सर्वात अलीकडची कमानहि त्यात अर्धीच घेतलेली आहे.
२) टेकूच्या पलीकडे दूरच्या अंतरात दोन्ही चित्रात ८ कमानी दिसतात. नव्या चित्रात त्या सहज दिसतात, जुन्यामध्ये त्या काळजीपूर्वक मोजले तर दिसतात.
३) पुलाचा कठडा दोन्ही चित्रात सारखाच दिसत आहे.
४) कमानींच्या बांधकामाचे तपशीलहि जुळते आहेत.

जवळजवळ सर्वत्र, छापील पुस्तकांमधे आणि इंटरनेट संस्थळांमध्ये, जुने चित्राचे वर्णन 'ठाण्याची खाडी ओलांडताना हिंदुस्तानातील पहिली आगगाडी' असे आढळते. ते चुकीचे आहे असे दिसते. रेल्वे खात्याचीहि तीच समजूत आहे असे दिसते. (पहा http://www.irfca.org/gallery/Trips/west-konkan/ngrail/?g2_page=2).

मात्र जुन्या 'दापूरी' पुलाचे चालू नाव हॅरिस ब्रिज आहे हेहि बरोबर दिसत नाही. रेल्वे पुलाशेजारीच जो रस्त्याचा पूल आहे त्याचे हे नाव आहे. माझ्या तर्कानुसार हे नाव १८९०-९५ सालातील मुंबईचे गवर्नर लॉर्ड हॅरिस ह्यांच्यावरून दिलेले असावे. १८८५ साली छापण्यात आलेल्या पूना डिस्ट्रिक्ट गॅझेटीअर च्या पान १५६ वर ह्याचे त्रोटक वर्णन आहे. (पहा http://tinyurl.com/768ztbh). त्यानुसार हा पूल १८४२ साली बांधला गेला आणि तो काही पक्क्या बांधकामाचा आणि काही लाकडी होता. गॅझेटीअरमध्ये त्याला कोणतेहि नाव नाही, यद्यपि पुण्यातीलच वेलस्ली आणि फिट्झेराल्ड ह्या पुलांची नावे देण्यात आली आहेत. शक्यता अशी असावी की गवर्नर हॅरिसच्या काळात ह्या पुलाचे लाकडी काम बदलून सर्व पूल पक्क्या कामाचा करण्यात आला आणि त्याला हॅरिसचे नाव देण्यात आले.

(अवांतर - हॅरिस ह्यांचे क्रिकेटप्रेम प्रसिद्ध होते. ते इंग्लिश क्रिकेट टीमचे एकेकाळी कॅप्टन होते. हिंदुस्तानातील त्यांची कारकीर्द विशेष यशस्वी ठरली नाही. त्यांच्या क्रिकेटप्रेमातून क्रिकेटचे 'हॅरिस शील्ड' मुंबईत सुरू झाले. पहा http://en.wikipedia.org/wiki/Lord_Harris.)

सहमत आहे आणि क्षमस्व.

वरील प्रतिसादाशी संपूर्णपणे सहमत आहे.
शिवाय माझ्या वरील प्रतिसादात चुकून ब्रिटिश म्युझियम असा उल्लेख झालेला आहे. तो ब्रिटिश लायब्ररी असा वाचावा. क्षमस्व!

संगम पूल

@ विसुनाना ~
याच पुलाला पुणेकर "संगम" पूल म्हणूनही ओळखतात काय ? कारण या नावाचाही उल्लेख एकदोन ठिकाणी वाचल्याचे/ऐकल्याचे स्मरते.

अशोक पाटील

नाही.. तो हा नव्हे

विकीमॅपियावर "दापोडी व्हायाडक्ट" Coordinates: 18°34'29"N 73°50'6"E
विकीमॅपियावर "संगम पूल" Coordinates: 18°31'46"N 73°51'38"E

संगम पूल मुळामुठेच्या संगमाजवळ आहे तर डापूरी व्हायाडक्ट बोपोडी-दापोडीच्या दरम्यान आहे. त्याबद्दल अधिक माहिती -
http://www.irfca.org/gallery/c/view/31916.html?g2_page=4 येथे आढळली.
जुने फोटो आहेत. वर्णनानुसार संगम पूल आज रस्त्यावरील पूल असला तरी १९२६ पूर्वी तो रेल्वेचाच पूल होता. :
हे पहा...

फोटोज्

सुरेखच. दोन्ही ठिकाणांची माहिती आणि संबंधित छायाचित्रही पाहाण्यास मिळाली. देशाच्या प्रगतीबाबत झालेल्या घडामोडींचा ऐतिहासिक धांडोळा घेत असताना काहीवेळा फोटोज् चे महत्व शब्दांपेक्षा किती जास्त ठसते हे या धाग्यावरून समजून येईल.

धन्यवाद विसुनाना.

अशोक पाटील

 
^ वर