बाजारगप्पा.. १

राम राम मंडळी,

आज मी येथे आपला राष्ट्रीय निर्देशांक, ज्याला 'निफ्टी' असे म्हणतात त्याबद्दल दोन शब्द लिहिणार आहे.

आज निफ्टी निर्देशांकांने आजपर्यंतची ४२९९ ही सर्वाधिक पातळी गाठली व बाजार बंद होताना तो ४२९३ वर स्थिरावला.

तांत्रिक विश्लेषण :

आजचा बंद भाव - ४२९३.
नजीकचा अटकाव - ४२९९
नजीकचा आधार - ४२३४

उद्याची शक्यता - उद्याही बाजार तेजीत राहण्याची शक्यता आहे. आज रात्री अमेरीकन आणि उद्या सकाळी आशियाई बाजार तेजीत राहिल्यास भारतीय बाजार उद्या तेजीतच उघडण्याची शक्यता आहे. आजपर्यंतची सर्वाधिक ४२९९ ही पातळी ओलांडून बाजार उद्या कदाचित नवा उच्चांक स्थापन करेल असे वाटते. अर्थात हे सगळे अंदाज आहेत. शेवटी बाजार हा त्याच्या गतीप्रमाणेच चालतो. Market is always supreme having its own rules & regulations!

बाजाराबद्दलचे माझे वैयक्तिक मत -

एकंदरीतच भारतीय बाजार गेल्या दोन अडीच वर्षांपासून भयंकर तेजीत आहे असेच म्हणावे लागेल. 'गोर्‍या लोग' इथे प्रचंड पैसा ओतत आहेत हे निर्विवाद!

(बरं का मंडळी, बाजारात आमच्या अवतीभवती नेहमी मारवाडी मंडळीच असतात. ही मंडळी F. I. म्हणजे Foreign Investers, किंवा F. I. I. म्हणजे Foreign Institutional Investers यांचा उल्लेख नेहमी 'गोर्‍या लोग' असाच करतात. 'ए तात्याभाय, साला बजार बहोत तेज है. ये गोर्‍या लोग बहोत पैसा डाल रहा है!' ;) असं म्हणतात. बाजार सुरू असताना मारवाडी लोकांच्या संगतीत खूप मजा येते! ;)

दि ८ फेब्रुवारी २००७ ते ५ मार्च २००७ या काळात निफ्टी निर्देशांक ४२४५ वरून ३५५४ पर्यंत म्हणजे ६९१ अंकांनी घसरला होता. ज्याला 'a fair correction' असे म्हणता येईल. परंतु अवघ्या तीन महिन्यांच्या आतच बाजाराने पुन्हा नवा उच्चांक गाठला यावरून भारतीय बाजार सध्या अत्यंत मजबूत हातांमध्ये आहे असेच म्हणावे लागेल.

असो, मंडळी हा झाला फक्त निफ्टी या निर्देशांकाचा आढावा ज्यात फक्त ५० कंपन्यांचा अंतर्भाव होतो. या ५० कंपन्यांपैकी बर्‍याचश्या कंपन्यांनी त्यांच्या समभागांची उच्चतम पातळी गाठली आहे म्हणूनच निफ्टीनेही त्याची उच्चतम पातळी गाठली आहे हे उघड आहे.

परंतु आजही बाजारात,

अ) अश्या बर्‍याच कंपन्या आहेत की ज्यांचे भाव अजूनही आकर्षक पातळीवर आहेत. आणि,

ब) अश्याही बर्‍याच कंपन्या आहेत ज्यांचे भाव त्यांच्या अर्थिक स्थिती आणि इतर निकषांच्या तुलनेत खूपच जास्त आहेत.

तेव्हा मंडळी, सांगायचा उद्देश हा की बाजार तेजीत असो वा मंदीत असो, या आणि कंपन्या कोणत्या हे ओळखता आले पाहिजे आणि त्यानुसार गुंतवणूक केली पाहिजे किंवा हाती असलेले समभाग विकून फायदा कमावता आला पाहिजे.

अहो या आणि प्रकारच्या कंपन्या कोणत्या हे ओळखणे आणि त्याप्रमाणे लोकांना खरेदीविक्रीचा सल्ला देणे हाच तर आमचा धंदा आहे! ;)

ही आमची अन्नदाता इमारत. आमची विलक्षण श्रद्धा आहे या इमारतीवर! कधी काळी इकडचा पानवालासुद्धा आम्हाला सांगायचा, 'तात्याभाय, आज रिलायन्स ले लो, खुद धिरुभाई चलानेवाला है!' ;)

असो, बाजारगप्पा पुन्हा केव्हातरी!

आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई २३.

Comments

कृपया शीर्षक बदलावे..

उपक्रमराव,

अनवधानाने सदर लेखाचे शीर्षक 'बाजारागप्पा' असे झाले आहे ते कृपया बदलून 'बाजारगप्पा' असे करावे,

धन्यवाद.

आपला,
(वेंधळा) तात्या.

बदल केले आहेत. - उपसंपादक.

शेअर व ज्योतिष

Market is always supreme having its own rules & regulations!

हे मार्केट रॅशनल कि इरॅशनल नियमात चालते? यात फिक्सिंग चालते का? कुणीतरी कमावत असते तेव्हा कुणीतरी गमावत असते. शेअर मार्केट व ज्योतिष या विषयावर पुण्यात भाग्यसंकेत नावाचा दिवाळी अंक निघतो.सुनंदा राठी या ज्योतिषी व दलाल बाई चालवतात, आम्हाला शेअर विषयातले केवळ प्राथमिक ज्ञान असल्याने भाष्य करता येत नाही. पण ज्योतिष वा शेअर हे दोन्ही अनिश्चितता या भांडवलावर फोफावले आहेत. काही शहाणे लोक मात्र संयम व निरिक्षण यावर यातूनही कमाई करतात.

प्रकाश घाटपांडे

दोन्ही चालते!

शेअरबाजारात दोन्ही चालते.फिक्सींगही चालते आणि संशोधन करून आणि अंदाज बांधून गुंतवणूक करूनही फायदा कमावता येतो. इथे योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता असणारी माणसेच यशस्वी होतात. जेव्हां एकजण कमावतो तेव्हा दुसरा कुणी तरी गमावतो हा तर दुनियेचा नियमच आहे. एकीकडे खड्डा तेव्हा दुसरीकडे भर हे ठरलेलेच आहे.
भाबड्या आशावादावर जगणार्‍या लोकांचे इथे काम नाही. अशी माणसे नेहमीच 'गिर्‍हाईके' ठरतात.
इथे बर्‍याच प्रमाणात सट्टा चालतो. एकाने चढवायचे आणि दुसर्‍याने उतरवायचे अशी चढाओढ चालते. भाव चढवणार्‍यांना 'बैल'(बुल) आणि भाव उतरवणार्‍यांना 'अस्वल'(बेअर) असे म्हणतात.

धन्यवाद

माहितीत भर पाडल्याबद्द्ल धन्यवाद.
प्रकाश घाटपांडे

निफ्टीचा बोल्ट/स्क्रीन/टर्मिनल...

समभाग बाजारशी अधिक ओळख करून घेऊ इच्छिणार्‍यांच्या माहिती करता आम्ही खाली निफ्टीच्या टर्मिनलचे आमच्या संगणकावरील प्रिन्ट स्क्रीनचे चित्र येथे दाखवत आहोत. याला बाजाराच्या भाषेत 'बोल्ट' असेही म्हणतात.

आत्ता बाजार सुरू असल्यामुळे बाजाराचे हे प्रत्यक्ष (लाईव्ह) चित्र आपण पहात आहात. या चित्रात आपल्याला रिलायन्स, ओएनजीसी, इन्फी, विप्रो, टीसीएस, स्टेट बँक, भेल, लार्सन ऍन्ड टुब्रो, आदी निफ्टीवरील महत्वाच्या कंपन्या दिसत आहेत.

तर मंडळी, वरील चित्रात आपण जर नीट पाहिलेत तर आपल्याला लार्सन ऍन्ड टुब्रो ही कंपनी दिसेल. आम्ही सध्या या कंपनीकडे डोळे लावून बसलेलो आहोत. आज सकाळी बाजार सुरू झाल्यावर आम्हाला या कंपनीत बर्‍यापैकी हालचाल दिसली. आज दिवसभरातला २००५ चा उच्चांक गाठून तिचा भाव १९६० ला स्थिरावला होता. आम्ही १९६० च्या भावाने या कंपनीचे २५ समभाग खरेदी केले. अर्थात सट्ट्यासाठी म्हणून नव्हे. जर भाव वर गेला नसता तर आम्ही हे समभाग पूर्ण पैसे देऊन ताब्यात घेतले असते. पण आमच्या सुदैवाने भाव वधारला! आता हे २५ समभाग आम्ही १९९९ च्या भावाने विकावे अशी सूचना आमच्या संगणकाला दिली आहे. बघुया १९९९ च्या भावाने हे समभाग विकले गेल्यास आम्हाला दलाली कापून प्रति समभाग ३७ रुपये फायदा होईल! ;)

अवांतर -

उपक्रमराव, आपल्या ध्येयधोरणाला जागून आम्ही समभाग बाजार या विषयावर माहितीपूर्ण लेखन करण्याचे अत्यंत सिरियसली ठरवले आहे व त्याप्रमाणे आम्ही ते करतही आहोत. पण आता जरा आम्हाला थोडा विरंगुळा करण्याची सूट द्यावी.
मंडळी, आज बुधवार आहे. नियमानुसार आज सायंकाळी विदेशी व्हिस्कीचे दोन पेग आणि मासळीचं जेवण करण्याकरता आम्हाला लार्सनचे पैसे उपयोगी पडतील असे वाटते! ;) साधना ही आमची नेहमीची कोळीण सध्या गावाला गेली आहे. म्हणून आज आम्ही एका दुसर्‍याच कोळणीकडून मासळी विकत घेणार आहोत. जाता जाता आम्ही तिचेही चित्र येथे देत आहोत! ;) बघा तरी पापलेट किती ताजं आहे ते! ;)

कळावे,

आपला,
(मत्स्यप्रेमी!) तात्या.

लार्सन

तात्या तुमचा लार्सन विकला गेला असणार.

इंट्राडे ट्रेडींग, मार्जिन ट्रेडींग बद्दल माहिती मिळाली तर आनंद होईल..

अभिजित

लेखन सुरू आहे...

अभिजितराव,

आमचा लार्सन विकला गेला बरं का! ;)

इंट्राडे ट्रेडींग, मार्जिन ट्रेडींग बद्दल माहिती मिळाली तर आनंद होईल..

याबद्दल लेखन सुरू आहे. लवकरच विस्तृत लेख टाकतो.

तात्या.

अंदाज खरा ठरला!

मंडळी,

आज सकाळी लार्सन ऍन्ड टुब्रोबद्दल आम्ही बांधलेला अंदाज खरा ठरला. नुकताच लार्सनने २००८ चा नवा उच्चांक स्थापन केला आहे. हा अंदाज आम्ही कसा बांधला, याची स्टॉपलॉस पातळी कशी ठरवावी या सर्व गोष्टींबद्दल आम्ही बाजारगप्पांच्या आगामी येणार्‍या काही भागात सांगू. त्यामुळे कुणा उपक्रमी सदस्याला आर्थिक फायदा झाला तर आम्हाला नक्कीच आनंद वाटेल.

आपला,
तात्या अभ्यंकर,
दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.

अरेच्च्या, पापलेटचं चित्र आवडलं नाही वाटतं! ;))

जाता जाता आम्ही तिचेही चित्र येथे देत आहोत! ;) बघा तरी पापलेट किती ताजं आहे ते! ;)

अरेच्च्या! उपक्रमरावांना पापलेटचं चित्र आवडलं नाही वाटतं! ;))

म्हणूनच कदाचित त्यांनी आम्ही इथे दिलेलं चित्र काढून टाकून त्या चित्राचा फक्त दुवाच ठेवला आहे!

असो, अहो दुवा ठेवला आहे हेही नसे थोडके! उत्सुक वाचक पापलेट कसं आहे हे बघायला त्या दुव्यावर जातीलंच! ;)

आम्ही उपक्रमरावांचे आभार मानतो. त्यांनी 'साप भी मरे और लाठी भी न टुटे' ही शक्कल अवलंबली आहे. इसके लिये हम उपक्रमरावके आभारी है. हमे ये दुवा देनेवाली बात पहेले नही सुझी थी. नही तो हमभी दुवा देते थे!

आपला,
(हिंदी) तात्या.

टर्मिनल स्क्रीनला बोल्ट का म्हणतात?

तो बाजाराच्या यंत्रणेला पेचात (नट -बोल्ट) टाकतो म्हणून की सामान्य गुंतवणूकदारांवर विजेच्या लोळासारखा (बोल्ट फ्रॉम द स्काय् )अकस्मात कोसळतो म्हणून?
की आणखी काही मनोरंजक व्युत्पत्ती आहे?

धन्यवाद..

मिलिंदा, (तुला इतर कोण काय म्हणतं याच्याशी मला देणंघेणं नाही. मी आपला तुला 'मिलिंदा' असंच म्हणीन. फार फार तर 'सर्कीट' म्हणीन! ;)

बोल्ट या शब्दाचा अर्थ मला माहीत होता, परंतु तू दिलेले संकेतस्थळ माहीत नव्हते. त्याबद्दल धन्यवाद..

तात्या.

धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

लार्सन २०६०!!/आज की ताजा खबर!

बघा मंडळी! काल आम्ही १९६० च्या भावाला घेतलेल्या लार्सनने आज बाजार उघडल्यावर २०६० हा भाव गाठला! जर आम्ही तो काल १९९९ च्या भावाला न विकता आज विकला असता तर?? ;)

पण मंडळी, बाजारात 'जर-तर' ला काहीही अर्थ नसतो. आपल्या नशीबात असतं तेवढंच आपल्याला मिळतं हा तर जगाचा नियम आहे. मग त्याला बाजार कसा काय अपवाद असणार! ;)

आज लार्सनने २०६० चा भाव दाखवला म्हणून आम्ही तो आज विकायला हवा होता, असं म्हणणे म्हणजे उत्तर पाहून गणीत सांगितल्यासारखे होईल! ;)

आणि समजा लार्सनने आज २०६० ऐवजी १८६० चा भाव दाखवला असता तर??
तर .. तर.. तर... ?;))

तेव्हा बाजारातील नवख्या मंडळींना आम्ही असे सांगू इच्छितो की बाजारात भावनेला आणि 'जरतर' ला जागा नसते. जिचे बाजारी समभाग मूल्य ५६०८४ करोड रुपये आहे (!) अशी लार्सन ऍन्ड टुब्रो ही कंपनी कुणा एका साधना कोळणीला १०० रुपयांची मासळी घेताना तिला 'फार् महाग आहे, वीस रुपये कमी कर' असं सांगणार्‍या तात्या अभ्यंकर करता चालत नाही एवढं लक्षात ठेवलं पाहिजे! ;))

मंडळी, यातला मजेचा भाग सोडा, पण या लहान लहान गोष्टींना शेअर बाजारात खूप महत्व असतं एवढंच आम्ही सांगू इच्छितो. निदान आम्ही तरी याच गोष्टी महत्वाच्या मानल्या आणि शिकलो त्या आपल्यापुढे मांडत आहोत इतकंच! आणि कदाचित म्हणूनच आम्ही या मायावी बाजारात इतके वर्ष सुखसमाधानाने टिकून आहोत.

मंडळी, शेअर बाजार हा कुणाच्या बापाचा नाही. म्हटलं तर ती एक आगच आहे. तिच्याशी कधी कुणी खेळू नये व तिला कधी कुणी ऍन्टिसिपेट करू नये!! नाहीतर कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात रात्री एक वाजता एका आठशे रुपये पगार असलेल्या वॉर्डबॉयला कधीकाळी बिगबुल म्हणून नावाजल्या गेलेल्या हर्षद मेहताच्या एकाकी डेड बॉडीला घेऊन जाताना आम्ही पाहिले नसते!

आज की ताजा खबर - आज झी टीव्ही आम्हाला थोडा आकर्षक वाटतो आहे. पण अद्याप आम्ही त्यात सौदा केलेला नाही!

असो! 'बाजारगप्पा' हे तात्या अभ्यंकरांच्या अनुभवाचे बोल अहेत. पटले तर घ्या नाहीतर सोडून द्या! ;)

तात्या.

--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

एक विचार!

मंडळी, काल आम्ही १९६० चा भावाला लार्सनचे २५ समभाग विकत घेतले होते ते आम्ही कालच १९९९ च्य भावाला विकले. दलाली वजा करता आम्हाला प्रति समभाग ३७ रुपये, म्हणजे एकूण ९२५ रुपये मिळाले.

कधी काळी नोकरीकरता भर दुपारच्या उन्हात वणवण करत असताना आम्ही पवई येथे असलेल्या लार्सन ऍन्ड टुब्रो या कंपनीतदेखील मुलाखतीसाठी गेलो होतो. तेव्हा लार्सनने आम्हाला काही कारणांमुळे नोकरी नाकारली होती आणि आम्ही निराश होऊन तेथून परतलो होतो. पण काल याच कंपनीने आम्हाला घरबसल्या ९२५ रुपये मिळवून दिले हेही नसे थोडके! अब लार्सनके साथ कोई गिला शिकवा नही! ;)

मंडळी, आयुष्यात निराशेचे प्रसंग येतात, नाही असं नाही. पण हमे उसके भी आगे देखना है और जिना है, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे! खरं की नाही? ;)

आपला,
(तत्वज्ञानी) तात्या.

धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

एक विचार-प्रतिसाद


मंडळी, आयुष्यात निराशेचे प्रसंग येतात, नाही असं नाही. पण हमे उसके भी आगे देखना है और जिना है, एवढं लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे! खरं की नाही? ;)



धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

वा ! तात्या अनिश्चितता पचवण्याचे तत्वज्ञान आवडले.
प्रकाश घाटपांडे

आम्हालाही!

तुम्हाला लार्सन कडून जसा फायदा झाला तसा आम्हालाही होऊ शकतो का?
आमचं डीमॅट अकाउंट आहे आणि ७-८ कंपन्यांचे समभाग ही आहेत आमच्याकडे

------------------------------------------------
कृपया खिडकीतून पत्रं टाकू नयेत.आमटीत पडतात.चव बिघडते.

अवश्य..

तुम्हाला लार्सन कडून जसा फायदा झाला तसा आम्हालाही होऊ शकतो का?

अवश्य होऊ शकतो. आम्ही आपल्याला या विषयात योग्य ते मार्गदर्शन करू!

------------------------------------------------
कृपया खिडकीतून पत्रं टाकू नयेत.आमटीत पडतात.चव बिघडते.

ही सही बाकी एकदम अनवट असून सेन्स ऑफ ह्युमरचे क्लासिक उदाहरण आहे असे आम्हाला वाटते! ;)

आपला,
(बोका!) तात्या.

--
धन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी! ;)

 
^ वर