दिवाळी अंक २०११: "एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान"

सर्वप्रथम, दिवाळी अंकातील 'एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान' हा लेख वाचणार्‍यांचे व लेख वाचुन अभिप्राय कळविलेल्यांचे अनेक आभार! मला प्रतिसादात तसेच इथल्या व वैयक्तीक इमेल पत्त्यावर अनेक प्रकारच्या विचारणा झाल्या त्याला जाहिर उत्तर देत आहे. खरंतर स्वतःच या विषयावर वेगळा धागा काढणे प्रशस्त वाटत नव्हते मात्र सर्वांच्या सोयीसाठी तसा धागा टाकत आहे:

भूतानला जायचे कसे काय सुचले?

काहि भाग हे सांस्कृतीकदृष्या / सामाजिक-भौगोलिक-ऐतिहासीक फार वेगळे आहेत व अनेक वर्षांपासून त्यांनी ते वेगळेपण कटाक्षाने जपले आहे. त्यातील काहि भागांत जागतीकीकरणाच्या रेट्यामुळे म्हणा, अटळ आर्थिक गरजांमुळे म्हणा ही संस्कृतीची वर्षानुवर्षे धरलेली कास सोडावी लागत आहे. असे काहि प्रदेश बदलत आहेत असे कळल्यावर ते पूर्णपणे बदलायच्या आत तिथे भेट देणे मला महत्ताचे वाटते. भुतानला लोकशाही आली आणि तिथे टिव्हीला मान्यता मिळाल्याची बातमी गेल्या ३-४ वर्षांत कधीतरी वाचली होती. एकदा टिव्ही आला की अनेक गोष्टी बदलतात, त्या फार बदलायच्या आत तिथे जाऊन यावे या विचारांनी तिथे जायला प्रेरीत झालो.

अश्याप्रकारची 'लवकरच बदलतील' अशी शक्यता असणारी अन्य स्थळे सुचवाल का?

श्रीलंका, नागालँड (नवी विटी नवे राज्य-- आता येथे जाणे सुरक्षित झाले आहे, पर्यटकांचा लोंढा वाढायच्या आत जाऊन यावे)
व्हीयेतनाम, कंबोडीया (वेगाने होत असलेले अमेरिकीकरण)
नेपाळ (विषेशतः एव्हरेस्ट बेस कँप -- इथे टार रोड जातो आहे)
कैलास मान सरोवर (तिबेटकडून नव्या टार रोड ची योजना प्रत्यक्षात आणण्यास सुरवात)
हिमाचल प्रदेश मधील लाहौल स्पिती जिल्हा (रोहतांगच्या ऐवजी नुकतेच सोनिया गांधी यांनी भुमिपुजन केलेला बोगदा आला की याचा लडाख व्हायला वेळ लागणार नाही :( )

किती लोक गेला होतात? एकट्या दुकट्याने, कुटुंबासोबत सफरीला जावे का? लहान मुलांसाठी तो प्रदेश कसा आहे?

आम्ही (वेगवेगळ्या वयोगटातील) ७ जण गेलो होतो. सहकुटुंब गेलो होतो (लहान वयातील कोणी नव्हते). रस्त्यावरील प्रवास तसंच फारच (हिलामयीन) घाटाघाटाचा प्रवास व हाय अल्टीट्यूड असल्याने लहान मुलांना नेणे कितपत योग्य आहे हे ज्याचे त्याने ठरवावे. मी लहान मुलांना (८-१० वर्षांखालील) नेणे शक्यतो टाळा असे सुचवेन. या शिवाय गाडी लागणार्‍यांना तर अजिबात नको.
थोडक्यात 'मौज-मजा', 'गंमत', उत्तम भोजन वगैरे गोष्टी येथे नाहीत. लहान मुलांना आवडतील अशी स्थळेही फारशी नाहीत. केवळ अमाप निसर्ग सौंदर्य आहे जे प्रत्येकाला आवडेल याची खात्री आहे. शिवाय अत्यंत वेगळी संस्कृती बघायला मिळेल मात्र त्यासाठी आपणहून प्रश्न विचारायची तयारी असली पाहिजे.

भुतानला जायला काय पर्याय आहेत? खर्च किती?

  • आम्ही मुंबई ते बागडोगरा विमानाने व पुढे अखंड एसयुव्ही केली होती. विमानप्रवास धरून माणशी खर्च ३५-४० हजार् आला होता. (काहिंनी तिकिटे उशीरा काढल्याने भव वाढले होते मात्र ते योग्य व्यवस्थापनाने टाळता येऊ शकेल)
  • दुसरा कमी खर्चिक पर्याय न्यू जलपैगुडी पर्यंत ट्रेनने जाणे हा आहे मात्र तो आर्थिक ताण नसल्यास टाळावा असे सुचवेन कारण हा दोन अडीच दिवसांचा प्रवास इतका शीण आणतो की भूतानमधील प्रवास नकोसा वाटु शकतो
  • तिसरा पर्याय अर्थातच पारोपर्यंत विमानाने जाणे हा आहे. तो बराच खर्चिक आहे. माणशी खर्च ६०-६० हजारा पर्यंत जाईल असा अंदाज करता यावा.

(अर्थात हा खर्च प्रवासी भारतीय नागरीक आहेत असे गृहितक धरून दिलेले आहे. नसल्यास खर्च दुप्पटीहून अधिक धरावा :) )

तुम्ही गेला होतात त्यापेक्षा वेगळी स्थळे प्रेक्षणीय आहेत का?

होय. आम्ही केवळ पश्चिम भूतान व मध्य भुतानचे एक स्थान (पुनाखा) बघितले. इतर अनेक स्थळे आहेत. दुर्गम भाग व कठीण रस्ते यामुळे सर्व स्थळे बघायची असतील तर बराच जास्त वेळ ठेवावा लागतो

भुतानला जायचा उत्तम काळ कोणता

पर्यटनासाठी भूतानसाठी एप्रिल ते जून हा उन्हाळ्याचा काळ उत्तम काळ आहे. पावसाळा अतीतीव्र असल्याने भूतान पावसाळ्यात पूर्णपणे बंद असते. हिवाळ्याचा मध्य सोडल्यास (डिसेंबर ते फेब्रुवारी) हा हिवाळ्यात अनेक सण, उत्सव असतातच शिवाय पक्षीनिरिक्षणासाठी हिवाळा सुरू होताना व संपतानाचे दिवस निवडावेत या काळात काहि स्थानिक पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. ट्रेकिंगसाठी मात्र् एप्रिल ते जून उत्तम

भुतानला स्वतःचाना आधुनिक राजकीय इतिहास आहे का?
भुतान-नेपाळ अस्थिरता आहे असे ऐकले आहे. तिथे जाणे कितपत सुरक्षित आहे?

होय भुतानला आधुनिक इतिहास आहे. काहि दशकांमधे त्यांचे आणि नेपाळचे (खरंतर गुरखा जमातीचे) वितुष्ट आहे होते (आहे). (बहुदा गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात) नव्या घटनेनुसार केवळा भुतानच्या 'मुळ रहिवासी व त्यांच्या कुटुंबियांना' भुतानचे नागरीक म्हणून मान्यता दिली.
भुतानचे नागरीक सोडल्यास इतरांना भुतानमधे कायम वास्तव्यास परवानही नाही. इथे अनेक असलेले नेपाळी अचानक 'परदेशी' झाले. भुतानने त्यांना हाकलून लावले. त्यांनी भारताकडे आश्रयाची याचना केली मात ती भारताने फेटाळली. सध्या हे निर्वासीत नेपाळ मधे रहातात व हा प्रश्न युनोमधे खितपत पडला आहे. मधे-मधे याविरुद्ध निदर्शने वगैरे होतात मात्र पर्यटकांना असुरक्षित केल्याचे ऐकिवात नाही.
याशिवाय काहि विद्रोही भारतील आतंकवादी/लनक्षलवादी/डावे मुलतत्त्ववादी भुतानमधून आपला क्यांप चालवायचे त्यांना काहि वर्षांपूर्वीच हाकलण्यात भुतानच्या सेनेने यश मिळवले आहे. विकीपिडीयावर अधिक विस्ताराने माहिती मिळावी

या व्यतिरिक्त काहि प्रश्न/ अभिप्राय/पुरवणी असल्यास या धाग्यावर द्यावेत ही विनंती

लेखनविषय: दुवे:

Comments

छान ... आणि

ऋषिकेश,

मस्त लेख लिहिलाय. भुतानकडे पर्यटनखात्याची जबाबदारी संभाळायला बिनीचा शिलेदार कुणीच नाही असे ऐकून आहे... टाकायचा का प्रस्ताव ;)

विषयात भर -
सध्या हे निर्वासीत नेपाळ मधे रहातात व हा प्रश्न युनोमधे खितपत पडला आहे.
हे चित्र आता बदलले आहे. भारताने व नेपाळने या लोकांना स्विकारण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर १५-२० वर्षे हे लोक नेपाळमधील युनोच्या कँप मध्ये रहिले. मागील ३ वर्षांपासून त्यांचे स्थलांतर चालू आहे. यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या देशांनी या लोकांना आश्रय दिलाय. पण बिचार्‍यांचे नशीब बर्‍यापैकी फाटके आहे. स्वतःची ओळख मिटू नये म्हणून भुतान सोडावे लागलेल्यांना इथे मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती मिशनरी गळाला लावत आहेत. एक सेवा संघटना यांच्यासाठी झगडते आहे पण मिशनर्‍यांच्या तुलनेत खूपच तोकड्या शक्तीमुळे या आपल्या संस्कृती बांधवांच्या भावी पिढ्यांसोबत हे बंध राहतील का नाही याची शंका आहे.

छान

आता भूतानला गेलेच पाहिजे! यंदा पूजेच्या सुट्टीत गँगटॉक ला जायचा बेत रद्द झाला, आणि आम्ही जलपायगुडी जिल्ह्याच्या एका लहानशा गावात गोरुमारा जंगलाजवळ काही दिवस होतो. तेथून दूरवर डोंगर दिसत होते, आणि त्या पलिकडेच भूतान असे सगळे सांगत होते. उडी टाकून चटकन फेरी टाकून यावे असे सारखे वाटत होते - या भागात एवढ्या उत्तरेकडे ही माझी पहिलीच ट्रिप.
रेल्वे स्टेशनवर लोक सर्रास भूतानी पैसे ठेवतात हे दिसले. एक चहावाल्याने मला सुट्टे भारतीय की भूतानी पैसे हवेत हे विचारले. मी भूतानी पैसे घेऊन काय करू, असे म्हणून आपलेच पैसे घेतले. "भूतानला जाऊन आलात हे घरी सगळ्यांना सांगा" असे तो म्हटला.
"कितने पास लेकिन कितने दूर" असे तेव्हा वाटले होते, पण लेख वाचल्यावर जायची हुरहुर पुन्हा लागली आहे. माहिती बद्दल धन्यवाद.

एकदा टिव्ही आला की अनेक गोष्टी बदलतात

१००% सहमत.

गारुमारा

आम्ही देखील परतताना 'गारुमारा' जंगलात एक संध्याकाळ व एक पहाट घालविली
मुळ जंगलात गवे, हरणे, काळविटे आनि दुरवर डुंबणारे काहि गेंडे दिसले. मात्र गारुमारा येथे जायच्या वाटेवर जंगली हत्तीनी दर्शन दिले. नुसते दर्शन दिले नाही तर ऐन रस्त्यात उभे राहुन काहि मिनिटे आमची हवा टाईट केली ;) प्रत्येक् मदमस्त हत्तीने रस्ता ओलांडून पुन्हा जंगलात दिसेनासे होइपर्यंत जीव मुठीत घेऊन गाडीत बसून होतो :)

आम्हाला जंगलात काहि छान पक्षी दिसल्याने मी खुश होतो (बाकीच्यांना जंगल तितकेसे आवडले नाहि कारण जीपच्या आवाजाने जवळ फारसे कोणते प्राणी फिरकत नाहीत :( ). मला दिसलेल्या पक्षांमधे दोन वेगळ्या प्रकारचे धनेश हा सगळ्यात मोठा फायदा होता

बाकी भुतान मधुन आणल्या असे सांगता यावे अश्या बर्‍याच वस्तु गारुमारा येथे मिळतील ;)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अरे वा

काय योगायोग!

मला ही गोरूमारात फिरण्यात मजा आली नाही. जीप चा आवाज, आणि डीझेल चा वास. वर मोबाइलवरून कलकत्त्याला ब्रेकिंग न्यूज कळवणारे जंगल-निसर्ग-उपभोग्ते : "आज फक्त हरिण दिसलं! गेंडा पाहिलाच नाही! इथली सीनरी फार सुंदर आहे! खूप फोटो काढलेत! पूजाचे पंडाल बघायला गेला होतात का?" वगैरे वॉचटॉवरवर उभे राहून जोरजोरात बोलणे. भयानक त्रासदायक. मागे मेलघाटला गेले होते तेव्हा गाइडला सोबत घेऊन जंगलात पाई फिरण्याची परवानगी होती. तासंतास मस्त फिरलो होतो, आणि शेवटी त्याच्याच गावात घरी जाऊन जगातली सर्वोत्कृष्ट अंडा-करी खाल्ली होती. असो.

गोरूमारात प्राणी फारसे दिसले नाहीत. मदमस्त हत्ती तर नाहीच, पण भल्या पहाटे गेटकडे जाताना जंगलात शिरताच आमची गाडी बंद पडली. बॉनेट उघडून खाटखूट चालू होती तेवढ्यात एक गवा जवळूनच रस्त्यावर आला. आमच्याकडे शांत नजरेने काही सेकंद पाहून रस्ता ओलांडून गेला. श्वास सापडतो तो तोच पुन्हा रस्त्यावर हजर! पण नशीब लगेच आल्या वाटेने जंगलात नाहीसा झाला. आदल्या दिवशी उगीच जवळ जाऊन हिरोगिरी दाखवणार्‍या छायाचित्रकाराला गेंड्याने भोसकल्याचे ऐकले होते. नशीब गव्याला आम्ही फारसे इंटरेस्टिंग वाटलो नाही.

:)

मस्तच अनुभव.
अश्या आठवणी वाचल्या की माझं मीना प्रभु यांच "पडद्यावरल्या सिंहापेक्षा प्रत्यक्षातला ससा काय थरथर देऊन जातो!" हे वाक्य आठवतं. हा सुंदर परिच्छेद मी मागे पुस्तकविश्ववर टंकला होता. इथे वाचता येईल

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

रोचना व ऋषिकेश

आपल्या दोघांचे वरील प्रतिसादात्मक संभाषण आवडले- आणि कुणाच्या तरी खरडवहीत डोकावताना येते तशी अपराधीपणाची भावनाही मनात आली नाही! - धन्यवाद.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

 
^ वर