'तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान'चे पाकिस्तानबद्दलचे डावपेच

जकार्तावाले काळे
[तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (पकिस्तानी तालिबान चळवळ-TTP) ही वेगवेगळ्या इस्लामी आतंकवादी गटांची व्यापक संघटना असून २००७च्या डिसेंबरमध्ये असे १३ गट बाइतुल्ला मेहसूद या नेत्याच्या नेतृत्वाखाली एक झाले (कांहीं बाहेरही आहेत). संघटनेचे मुख्य कार्यक्षेत्र अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला पाकिस्तानचा "फाता"[१] हा प्रदेश आहे. या संघटनेची जाहीर उद्दिष्टें पाकिस्तान सरकारला प्रतिकार करणे, पाकिस्तानमध्ये शारि’या कायदा लागू करणे आणि एकत्र येऊन अफगाणिस्तानमधील नाटोच्या सैन्याविरुद्ध लढणे अशी आहेत. (२००९मध्ये बाइतुल्ला मेहसूद मारला गेला).

उद्या त्यांचा विजय होऊन त्यांनी जर पाकिस्तानमध्ये सत्ता काबीज केली तर ते त्यांचे डावपेच भारताविरुद्धही वापरतील. म्हणून त्यांच्याबद्दल माहिती असणे हितावह आहे. हाच या लेखाचा उद्देश].

(पेशावर विश्वविद्यालयात पत्रकारिता या विषयाचे प्राध्यापक असलेल्या (Professor of Journalism in Peshawar University) Prof. Syed Irfan Ashraf यांचा "TTP's Pakistan Strategy" हा लेख DAWN या पाकिस्तानी वृत्तपत्रात दि. 24th October 2011 रोजी प्रकाशित झाला. तो मला खूप आवडला. या लेखाचे हे भाषांतर आहे. त्यांच्या लेखातील कांहीं शब्दांचे अर्थ मला नीट कळले नाहींत म्हणून मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी अतीशय तत्परतेने त्यांची उत्तरे दिली. त्यातला बराच भाग टिपांमध्ये वापरलेला आहे. मूळ लेख http://www.dawn.com/2011/10/24/ttp%E2%80%99s-pakistan-strategy.html इथे वाचता येईल).

पाकिस्तानबरोबरचे सर्व "हिशेब चुकते करण्यास" आणि पाकिस्तानच्या आणि अफगाणिस्तानच्या आपापसातील अविश्वासाचे पर्व संपविण्याच्या प्रयत्नांना खीळ घालण्यास पाकिस्तानी तालिबान आंदोलन (TTP) आता सक्षम झालेले आहे.

गेली दोन-एक वर्षे कोशावस्थेत काढल्यानंतर आता ‘TTP’ च्या दुसर्‍या स्तरावरील नेतृत्वाने आपला मीडियाबरोबरचा संपर्क वाढविलेला आहे आणि त्यांनी आता पाकिस्तानी फौजेवर संघटितरीत्या आणि आत्मविश्वासाने प्रतिहल्ले करण्याच्या नव्या पर्वात पाऊल टाकले आहे.

अलीकडेच पंतप्रधान गिलानींच्या अध्यक्षतेखाली एक सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती. TTP च्या कारवायांवर अंकुश ठेवण्यासाठी तालिबानला चर्चेसाठी आमंत्रित करण्याचा ठराव या परिषदेत संमत करण्यात आला. त्यानंतर वार्ताहारांबरोबर टेलिफोनद्वारा केलेल्या वार्तालापात तालिबानच्या नेत्यांना या ठरावाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी TTP चे उपप्रमुख श्री फकीर महंमद यांनी अशा चर्चेची शक्यता फेटाळून लावली कारण त्यांच्या मतें "पाकिस्तान हे आता एक विश्वासार्ह राष्ट्र राहिलेले नाहीं"[२].

हे आतंकवादी हल्ली पाकिस्तान सरकारचे कां ऐकेनासे झाले आहेत? आणि सीमेपलीकडून होणार्‍या हल्ल्यांना एकाएकी असे उधाण येण्यामागील कारणे काय आहेत? दोनेक वर्षांपूर्वी पाकिस्तानी लष्कराने आपली स्वातमधील लष्करी मोहीम इतकी उग्र केली कीं "फाता" भागातील आपल्या शिबिरांतून पाकिस्तानवर असे हल्ले करणे TTP ला अशक्य होऊन गेले आणि त्यातूनच या समस्येचा उगम झाला.

स्वात विभागात कार्यरत असलेल्या तालिबानच्या पावलावर पाऊल टाकत वझीरिस्तानमधून शेकडो आतंकवादी बजौर विभागातील आतंकवाद्यांना येऊन मिळाले आणि त्यांनी एकत्र येऊन बजौरच्या पश्चिमेला असलेल्या अफगाणिस्तानमधील नुरिस्तान आणि कुनार या दोन प्रांतांच्या सीमेवरील महत्वाची नवी ठिकाणे व्यापली.

या स्थलांतरानंतर तालिबान संघटनेने या दोन प्रांतांत आपले बस्तान बसविण्यासाठी खूप कष्ट उचलले. इमारती लाकडाच्या धंद्याशी संबंधित असलेला माफिया आणि तालिबानविरोधी स्थानिक उच्चभ्रू नेते TTP च्या नेत्यांना कुनारमध्ये आपले बस्तान बसू देणार नाहींत हे माहीत असल्यामुळे त्यांनी प्रभावी माजी राज्यपाल मलिक झरीन खान आणि अतिरिक्त दहा लोकांचे खून केले. त्याचा परिणाम म्हणून दीर या शहराजवळील "शाही"पासून चित्राल या शहराजवळील अरुंडूपर्यंतची ८५० किमी लांबीची सीमारेषा या आतंकवाद्यांच्या प्रभावाखाली आली.

असे केल्याने पाकिस्तानी लष्करातील डावपेच आखणार्‍या तज्ञांनासुद्धा हेवा वाटावा असे यश TTP च्या आतंकवाद्यांनी मिळविले.
आपल्या पुनर्गठनामुळे आणि आपापसातील सुधारित संपर्कव्यवस्थेमुळे (networking) परिस्थितीची सारी सूत्रे आता TTP हातात होती. त्यांनी आता पाकिस्तानच्या नैऋत्य भागात दहशतवादाचे थैमान घालायला सुरुवात केली. कारण त्यांना तिथल्या स्थानीय सशस्त्र जनतेला[३] कुठल्याही भावी सुरक्षा करारात भाग घेण्यापासून परावृत्त करायचे होते. ग्रीस देशाच्या एका धर्मादायी संस्थेच्या कार्यकर्त्याचे दोन वर्षांपूर्वीचे अपहरण हा या तर्‍हेचा पहिला प्रसंग होता. बांबोराइत खोर्‍यातून केलेले सहा कामगारांचे अपहरण ही दुसरी घटना होती. त्यापैकी तिघांचा नंतर शिरच्छेद करण्यात आला होता. [४]

हे सहाजण मूळचे "वरच्या दीर"चे[५] रहिवासी होते. इथल्याच स्थानीय सशस्त्र जनतेने (civilian militia) वरच्या दीरच्या "धोग दारा" भागातून अफगाणिस्तानी तालिबान्यांना कित्येक आठवड्यांच्या घनघोर धुमश्चक्रीनंतर हाकलून दिले होते. म्हणून त्यांच्यावर सूड उगविण्यासाठी या सहा जणांचे अपहरण करण्यात आले होते. अशा तर्‍हेने वैयक्तिकरीत्या सूड उगविण्याचा कित्ता TTP ने त्यानंतरच्या कित्येक सीमापार केलेल्या पद्धतशीर घुसखोर्‍यांत गिरविला. दीर आणि चित्रालच्या वेगवेगळ्या ठिकाणी TTP च्या लोकांनी केलेल्या अशा घूसखोर्‍यात १८० माणसे, तीही बहुतांशी सुरक्षादलांची, मारली गेली.
दरोश येथील गुप्तहेर खात्याच्या अधिकार्‍याने मान्य केले कीं त्यांना अशा हल्ल्यांबद्दल कांहींशी पूर्वसूचना असायची व ते त्याबद्दलचे अहवालही सरकारकडे पाठवत असत. तरी या बेलगाम हल्ल्यांना सरकारकडून परिणामकारक प्रत्युत्तर मिळत नव्हते आणि स्थानिक अधिकार्‍यांना या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची हिंमत नसायची.

निवडून आलेले लोकप्रतिनिधीही काळजीत पडले होते. "जसजशी आतंकवाद्यांची ताकत वाढत होती तसतशी पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यामधील गुप्तमाहितीची घेवाण-घेवाण, मार्गदर्शनपर बैठका आणि लष्करी अधिकार्‍यांच्या परस्पर-भेटी याबद्दलचा आमचा विश्वास कमी होत चालला होता" असे चित्रल विभागाचे प्रमुख मुजफ्फर अली यांनी सांगितले.

अलीकडेच सुरक्षादलाच्या जवानांना तिथे पाठविण्यात आलेले आहे. पण या मोहिमेला लगेच यश मिळेल अशी अपेक्षा करणे चुकीचे ठरेल असे निरीक्षकांचे मत आहे. पण कांहीं विश्लेषक हे मान्य करत नाहींत. त्यांच्या मते पाकिस्तानी सैन्याला भुलवून त्यांना जास्त धोकादायक आघाडीवर खेचणे हाच या आतंकवाद्यांचा मूलभूत उद्देश आहे. आतंकवादाबाबतच्या एका तज्ञाच्या मतें अपहरण करणार्‍या आणि स्थानिक पैसेवाल्यांना भाडोत्री सैनिक पुरविणार्‍या संस्थांसाठी डवपेचांच्या दृष्टीने महत्वाची नूरिस्तानची जागा आणि आतंकवादामुळे कणखर बनलेले नूरिस्तानचे लोक अशा सीमापार चकमकींसाठी आदर्श आहेत.

पाकिस्तानने सैन्य तैनात केल्याने आतंकवाद्यांच्या कारवायांवर कसलाच अंकुश बसला नाहीं आणि यात आश्चर्य वाटायचे कारण नाहीं. एका आठवड्याच्या आतच खालच्या दीर[६] भागात चकमकी सुरू झाल्या. पाठोपाठ आणखी दोन-तीन चकमकी झाल्या आणि त्यात १५ आतंकवद्यांना कंठस्नान घातल्याचा दावा अधिकार्‍यांनी केला. पण या हल्ल्यांमुळे सीमेच्या अफगाणिस्तानच्या बाजूला रहाणार्‍या नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे हे सर्वात जास्त भयावह आहे.

सीमेवरील या चकमकींमुळे काबूल येथे उस्फूर्त निदर्शनांनी जोर धरला आणि त्यामुळे पाकिस्तान व अफगाणिस्तान या देशांमधील संबंधांत तणाव वाढला. पख्तूनिस्तानमधील दहशतवादी कृत्यांचा आढावा घेतल्यास असे दिसून येते कीं लोकमताचा फायदा नेहमीच TTP ला मिळतो. इथेही सीमेवरील प्रतिगामी संस्कृतीचा फायदा TTP च्या आतंकवाद्यांना मिळतो व ते सरकारच्या नाजूक परिस्थितीचा पूर्ण फायदा घेतात. याही वेळी पाकिस्तानची परिस्थिती नाजूकच आहे.

आतंकवाद्यांचा एक-कलमी कार्यक्रम आहे आणि तो म्हणजे पाकिस्तानवर जबरदस्त वार करणे. या पार्श्वभूमीवर जर आतंकवाद्यांच्या ताकतीचा अभ्यास केल्यास TTP कडून पाकिस्तानला असलेला धोका स्थलांतरानंतर प्रमाणाबाहेर वाढला आहे.
अलीकडेच मीडियाला पाठविलेल्या निवेदनात TTP च्या सरदारानी भलतीच थेट स्वरूपाची भाषा वापरलेली आहे. अफगाणिस्तानमध्ये कार्यरत असलेल्या नाटोच्या फौजांवर हल्ले करण्याआधी आम्हाला पाकिस्तानी लष्कराबरोबरचा आमचा हिशेब चुकता करायचा आहे असे TTP च्या स्वात विभागाचे माजी प्रवक्ते सिराजुद्दिन यांनी सांगितले.

पाकिस्तानच्या नैऋत्य विभागाला अस्थिर करण्याच्या TTP च्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी पाकिस्तानने १०,००० सैनिक तिथे तैनात केले आहेत, पण तरीही त्यांचे हे उद्दिष्ट किती यशस्वी होईल याचे आताच भाकित करणे सोपे नाहीं. पण हे काम वाटते त्यापेक्षा जास्त गंभीर आणि कठीण आहे हे नक्की.

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही कीं TTP ने चित्राल येथे २७ ऑगस्टला केलेल्या हल्ल्याला मदत केल्याबद्दल पाकिस्तानने नाटोलाच दोष दिला आहे. यात पाकिस्तानचे ३१ सैनिक धारातीर्थी पडले होते. एक मित्रराष्ट्र एका खतरनाक आतंकवादी संघटनेला दुसर्‍या मित्रराष्ट्राविरुद्ध सहाय्य करेल यावर विश्वास ठेवणेच कठीण. पण हे प्रत्यक्ष पाहिलेल्यांच्या साक्षी फारच बोलक्या आहेत.

या चकमकीच्या भागाला मी (अश्रफसाहेबांनी) दिलेल्या अलीकडच्याच भेटीत नाटोने TTP च्या आक्रमणाला हवाई संरक्षण दिले होते हे उघड दिसत होते! यावेळची नाटोंच्या विमानांची उड्डाणे नेहमीची "टेहेळणीची उड्डाणे" होती या विधानांबद्दल मला (अश्रफसाहेबांना) शंका आहे कारण सीमेपासून कांही मीटर्स अंतरावर उभे असलेले अझीझुल्ला म्हणाले, "आम्ही इथेच रहातो आणि हवाईदलाची नेहमीची टेहळणीसाठी केलेली उड्डाणे आणि असामान्य हवाई हालचाली यांच्यातील फरक आम्हाला नक्कीच समजतो!"

लगेच यानंतर काबूलवर दोन हल्ले पाठोपाठ झाले आणि एका आत्मघातकी बाँबहल्ल्यात अफगाणिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष बरहानुद्दिन रब्बानी ठार झाले. या घटनांनंतर या प्राणघातक युद्धात कोण काय करत आहे हे कांहींसे स्पष्ट झाले. अमेरिकन अधिकार्‍यांनी तर काबूलवरील या हल्ल्यांचा "पाकिस्तानच्या समर्थनाने हक्कानी आतंकवाद्यांच्या टोळीने सूडभावनेने केलेला प्रतिहल्ला" असा अर्थही लावून टाकला.
या पार्श्वभूमीवर एकमेकांवर दोषारोप करण्याचा हा सततचा प्रकार पाहून एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे पाकिस्तान आणि अमेरिका या दोन देशांमधील वितुष्ट इतके विकोपाला गेलेले आहे कीं पाकिस्तानला आणि अफगाणिस्तानला अफगाणिस्तानचे अवघड त्रांगडे गुण्यागोविंदाने रक्तपात न होऊ देता आपापसात सोडवताच येणार नाहीं. "तुम्ही आमच्या शत्रूंना मदत करा, आम्ही तुमच्या शत्रूंना मदत करू" या तत्वावर सारे काम चालले आहे असेच अनुमान एका संरक्षणविषयक विश्लेषकाने केले!

टीप -

[१] Federally Administered Tribal Areas. यात पाक अफगाण सीमेवरील डोंगराळ भाग येतो. त्यात उत्तर आणि दक्षिण वझीरिस्तान आणि इतर कांही भाग मोडतात. खालील नकाशे पहा.

http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/0/06/Swat_NWFP.svg/5...

http://fata.gov.pk/images/stories/fata1.png

http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/5/5e/Federally_Admin...

[२] यांचेही मत भारतासारखेच?-अनुवादक

[३] मूळ लेखकाने ई-मेलद्वारा दिलेली माहिती: जेंव्हां पकिस्तान सरकारला आतंकवाद्यांशी युद्ध करायचे असते तेंव्हां ते non-tribal भागात तिथल्या जनतेला सुरक्षा-मंडळे निर्माण करण्याची विनंती करते तर tribal भागात "लष्करी" लोकांना हे काम सांगितले जाते. लष्करी म्हणजे स्थानीय सशस्त्र जनता (Civilian Militia). हे लोक सुरक्षेसाठी नागरिकांची मंडळें स्थापन करतात आणि ही मंडळे पाकिस्तानी सैनिकांच्या बाजूने आतंकवाद्यांशी लढतात. त्यामुळे आतंकवादी नेहमी या सुरक्षा-मंडळातल्या लोकांना त्यांनी पाकिस्तानी सैनिकांना मदत करू नये म्हणून धमक्या देतात. या मंडळातले बरेचसे लोक पंजाबच्या आतल्या भागातून-खेड्यापाड्यातून-आलेले असतात आणि त्यांना फाता विभागाबद्दल फारशी जाणीव नसते. आतंकवादी नेहमीच गनिमी पद्धतीने लढतात आणि त्यामुळे या सुरक्षा मंडळांची मदत फारच निर्णायक ठरते. म्हणून कुठेही हल्ला करायच्या आधी जनतेने सैन्याची बाजू घेऊ नये म्हणून आतंकवादी त्याबद्दल सखोल अभ्यास करतात. यासाठी ते त्यांना धमक्या देतात, बर्‍याच लोकांना अतीशय क्रूरपणे ठार करतात आणि जे लोक सैन्याला पाठिंबा देतात त्यांचा अनन्वित छळ करतात. तरीही स्वातमधील मोहिमेनंतर खूप पठाणांमध्ये तालिबानविरोधी लोकमत तयार झाले आहे आणि ते तालिबानविरुद्ध सशस्त्र लढा द्यायला तयार होतात. शत्रूबरोबर असे एकत्र होऊन लढायची पठाणांची परंपराच आहे.

[४] Upper Dir

[५] मूळ लेखकाने ई-मेलद्वारा दिलेली माहिती: स्थानीय सशस्त्र जनता पठाणी परंपरेनुसार स्वेच्छेने शत्रूविरुद्ध लढा जाहीर करून एकत्र येते. दोन-एक वर्षांपूर्वी मलकांड डिव्हीजनमधील वरच्या दीर जिल्ह्यातील धोग दारा विभागातील सात खेडी एकत्र आली आणि त्यांनी तालिबानविरुद्ध युद्धाची घोषणा केली. या खेडूत लढवय्यांनी अफगाणी तालिबानच्या एका गटावर हल्ला केला. हे अफगाणी तालिबानचे लोक धोग दाराच्या आसपास रहात होते आणि त्यांनी पाकिस्तानमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये आत्मघाती हल्ले सुरू केले होते. या तालिबान्यांना खेडूत लढवय्यांनी तिथून पिटाळून लावले. म्हणून या तालिबान्यांनी सूड घेण्यासाठी धोग दारातील या सहाजणांचे चित्रालमधून अपहरण केले आणि त्यांना ठार केले आणि सर्वांना जणू एक संदेशच दिला कीं जे लोक तालिबानशी लढतील त्यांना योग्य संधी मिळताच अशीच शिक्षा दिली जाईल.

[६] Lower Dir

हा लेख दि. २९ ऑक्टोबर २०११ रोजी ई-सकाळवर प्रसिद्ध झाला.
लिंक आहे: http://72.78.249.107/esakal/20111029/5314141164214683280.htm

लेखनविषय: दुवे:
 
^ वर