धर्मांतर

गेल्या आठवड्यात महाराष्ट्रात् सुमारे ४०००० लोकांनी "उपरा"कार श्री. लक्ष्मण माने आणि रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली धर्मांतर करून बौद्ध धर्म स्वीकारला. त्याबाबतीत काही प्रश्न पडले:

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मूळ (धर्मांतर) चळवळीशी तुलना केल्यास या घटनेचे सामाजिक आणि राजकीय महत्व किती वाटते?
  2. मी शहरी भागातला आणि माझ्या मनात अथवा आजूबाजूस कधीच जातीचा पगडा नसल्यामुळे प्रश्न विचारतो आहे की :आज - २००७ मधे खरेच किती लोकांना (महाराष्ट्रात) जातीवरून असा त्रास होतो?
  3. म.टा. मधे म्हटले आहे त्याप्रमाणे या ४०००० ना सरकारी दफ्तरी जाऊन या धर्मांतराची नोंद करावी लागेल तशी ते करणार आहेत् की नुसताच (म.टा. लेखाप्रमाणे) "शो"?
  4. मला स्वतःला बाबासाहेबांनी जे केले ते त्यावेळेसाठी योग्यच् केले असे वाटते. परंतु यातून पूर्वी ज्यांनी धर्मांतर केले त्यांच्यात खरेच फरक पडला की नुसतीच पिढ्यानपिढ्या झालेल्या अन्यायाला वाचा फोडताना विद्रोही चळवळ होण्याच्या नादात ही चळवळ नकळत विद्वेषी झाली का? आज जरी बाबासाहेब होणे सोपे नसले तरी धर्मांतरीतांमध्ये किती शिक्षणप्रसार झाला?

Comments

शिक्षणप्रसार होत आहे.

शहरातील लोक अधिक जातीयवादी असतात,अर्थात सर्वच नाही.पण ठिकठिकाणी जात ही असतेच.जात नाही ती जात.महाराष्ट्रात जातीयतेचा प्रश्न गंभीर आहेच.खैरलांजी प्रकरण त्याचे ताजे उदाहरण आहे.धर्मांतरामूळे काही सामाजिक प्रश्न सूटत असतील.आणि धर्मांतर करून, शिक्षणाच्या आणि इतर सवलतींमूळे त्यांचा विकास होत असेल तर हजारो वर्ष शासन करणा-या,आणि जातीयता पोसणा-यांच्या पोटात दूखण्याचे काही कारण नाही .

स्पष्टोक्ता.
अनिलराव.

धर्मांतर

साधना साप्ताहिकात
जातीअंताचा लढा यावर् यशवंत सुमंत यांचा
इथे पुर्वार्ध वाचा आणि इथेउत्तरार्ध

प्रकाश घाटपांडे

भाबडा आशावाद!

धर्मांतर करा अथवा अजून काही करा. जोपर्यंत माणसाच्या मनातील जात, जात नाही तोपर्यंत हा सगळा भाबडा आशावाद ठरेल असे माझे मत आहे. आजवर जे लोक धर्मंतरित झाले आहेत(हिंदूंचे ख्रिश्चन,मुसलमान,बौद्ध वगैरे) त्यांनी आपल्या पूर्वधर्मीच्या(हिंदू)जाती अजूनही टिकवून ठेवलेल्या आहेत असेही माझे निरीक्षण आहे. इतकेच नव्हे तर त्यात प्रादेशिकवाद,शहर-ग्रामीणवाद अथवा गरीब श्रीमंत वाद(ह्या अजून काही नवजाती)हाही ठासून भरलेला असतो.

शहरीकरणामुळे 'रोटी' व्यवहाराच्या बाबतीत हल्ली बरेचसे लोक शाकाहार-मांसाहार असला भेद सोडल्यास बाकी भेद करत नाहीत. शहरात कामाच्या रेट्यामुळे सार्वजनिक जीवनात लोकांना ह्या बाबींकडे लक्ष द्यायला वेळच नसतो हे देखील कदाचित कारण असू शकेल. मात्र मनातून बहुसंख्य लोक(सर्वजातीय) हे जातीयवादीच असतात(विचारी मना तूची शोधूनी पाहे!).

गावाकडे अथवा खेड्यात नेमके काय चित्र आहे ह्याबद्दल नक्की काही माझ्या सारख्या शहरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या माणसाला सांगता येणार नाही.मात्र ठरवून केलेल्या 'बेटी' व्यवहारात अजूनही धर्म,जात,पोटजात,पत वगैरे बघितली जाते किंबहुना त्या बाबतीत सर्वजातीय-धर्मीय लोक आग्रही असतातच.ह्याला प्रेमविवाहही अपवाद नाहीत.इथे त्या सगळ्यांची जाहीर मते आणि वैयक्तिक व्यवहारातली मते ह्यात जमीन अस्मानाचे अंतर असते ही वस्तुस्थिती आहे.

तेव्हा माणूस म्हणून जगायला शिकणे आणि 'जगा आणि जगू द्या' हा मंत्र अंमलात आणण्याची आपली सगळ्यांचीच ज्या दिवशी प्रामाणिक तयारी होईल तेव्हाच खर्‍या अर्थाने समाजमन निरोगी होईल. तोपर्यंत हे सगळे उपाय म्हणजे वरवरच्या मलमपट्ट्या ठरतील.

सहमत

सहमत. लोकांना जात सोडायचीच नसते. फक्त संघटन करून शक्तिप्रदर्शन करायचे असते.


मराठीत लिहा. वापरा.

धर्मांतर

धर्मांतर करा अथवा अजून काही करा. जोपर्यंत माणसाच्या मनातील जात, जात नाही तोपर्यंत हा सगळा भाबडा आशावाद ठरेल असे माझे मत आहे. आजवर जे लोक धर्मंतरित झाले आहेत(हिंदूंचे ख्रिश्चन,मुसलमान,बौद्ध वगैरे) त्यांनी आपल्या पूर्वधर्मीच्या(हिंदू)जाती अजूनही टिकवून ठेवलेल्या आहेत असेही माझे निरीक्षण आहे. इतकेच नव्हे तर त्यात प्रादेशिकवाद,शहर-ग्रामीणवाद अथवा गरीब श्रीमंत वाद(ह्या अजून काही नवजाती)हाही ठासून भरलेला असतो

.
अचूक निरिक्षण आहे. या संदर्भात पुणे विद्यापीठाचे कुलगरू नरेंद्र जाधव यांचे आमचा बाप आणि आम्ही हे पुस्तक खूपच सुंदर आहे,
प्रकाश घाटपांडे

धन्यवाद

साधनाचे दुवे दिल्यावबद्दल धन्यवाद. त्यामुळे साधना आता जालावर वाचू शकतो ते ही समजले आणि आनंद झाला.

डॉ. जाधवांचे "आमचा बाप आणि आम्ही" हे पुस्तक चांगले आणि स्फुर्तीदायक आहे.

हा विषय मांडायचे कारण एव्हढेच आहे की मला कुठेतरी ही (भटक्या-विमुक्त) सामान्यांची दिशाभूल वाटली. कोणी कुठल्या धर्मात राहावे अथवा निधर्मी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला स्वतःला त्याचे "मार्केटींग" बरोबर वाटत नाही. या घटनेत जरी "मार्केटींग" दिसले नाही तरी "सवंग"पणा आणि नकळत (सामान्यांच्या मनात) द्वेषाला खत पाणी घातल्यासारखे वाटले.

 
^ वर