जाळपोळ आणि बेरजेचे राजकारण

श्री.अरविंद कोल्हटकर यानी 'तीन आठवणी' या लेखात काही हृदयस्पर्शी आठवणी सांगितल्या आहेत त्याचे सर्वच उपक्रमींनी स्वागत केले असल्याचे दिसतेच, शिवाय अशाच धर्तीच्या आठवणी इतरांनीही लिहाव्यात असे प्रियालीताई यानी सुचविलेही आहे. एकप्रकारे या निमित्ताने जुन्या आठवणींच्या तलावात डुंबायला सर्वांनाच भावते हे तिथे प्रतित झाले असून लिखाणाचा तो एक चांगला प्रकारही मानायला हरकत नाही. पण या निमित्ताने मला तिथल्या काही विचार/प्रतिक्रिया क्लेशदायक वाटल्या. खरे तर त्याबद्दल तिथेच प्रतिसादात लिहिणे योग्य ठरले असते पण का कोण जाणे काही बाबींविषयी तिथे लिहिणे म्हणजे तो धागा भरकटून टाकल्यासारखे होईल, म्हणून मनी जे आले आहे ते स्वतंत्र धाग्याच्या रूपाने इथे द्यावे असे वाटले, म्हणून हा प्रपंच.

लेखात श्री.कोल्हटकरांनी
"ह्या हत्येबाबत सर्व ब्राह्मण समाजाला उत्तरदायी मानून त्यांची घरे जाळण्यासाठी ही उत्तम सबब आहे आहे काही समाजकंटकांनी ठरविले." असा उल्लेख केला ते ठीक झाले. अन्यथा त्या घटनेचे उत्तरदायित्व एकजात सार्‍या 'ब्राह्मणेतेरां' वर टाकण्याची थोर परंपरा सांप्रत महाराष्ट्रदेशी आहे ती तशीच 'मागील अंकावरून पुढे चालू..." सम राहिली असती. गांधीहत्या आणि नंतरच्या घडामोडीवर वा त्यांच्या सध्याच्या जालीय भाषेतील 'अकौन्ट् सेटलिंग" बाबत धाग्यावर, त्याचे स्वरूप पाहता, भाष्य अपेक्षित नाही हे जरी खरे असले तरीदेखील या निमित्ताने त्या घटनेच्या दूषित छाया चर्चेत उमटणे नैसर्गिक मानतो.

"सारे मुसलमान अतिरेकी नाहीत पण सारे अतिरेकी मुसलमान आहेत" या न्यायानुसार गांधीहत्या-जाळपोळ कांडातील सहभागी असलेले सारे ब्राह्मणेतर होते हे मान्य, पण याचा अर्थ सारे ब्राह्मणेतर त्या कांडात सहभागी होते असा जो एक छुपा अर्थ त्यातून ध्वनीत होतो तो संतापजनक आहे. कोल्हटकरांच्याच लेखात त्या वस्तीत त्यांच्यासकट फक्त ३-४ घरे ब्राह्मणांची होती असा उल्लेख आला आहे, याचा अर्थ असा की, जाळपोळ चालू असताना 'पोलिस आले' असा हाकारा करणारी ती व्यक्ती कुणी ब्राह्मणेतरदेखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच नंतर ओळ लावून ती आग विझवण्यासाठी ओढ्यातून पाण्याच्या पखाली घेऊन जे हात पुढे आले ते काय केवळ तीन ब्राह्मणांचेच होते ? गुंडांच्या सामुदायिक उन्मादाला जसे ब्राह्मण पुढे गेले नाहीत तद्वतच त्या (आणि तशाच अनेक) वस्तीतील ज्येष्ठ ब्राह्मणेतर पुढे गेले नाहीत हे जितके सत्य तितकेच हेही सत्यच की अशा प्रसंगी त्यानंतर त्याच ब्राह्मणांची घरे वसविण्यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून वस्तीतीलच ब्राह्मणेतर पुढे आले होतेच, हे ज्याना प्रत्यक्ष झळ पोचली तेदेखील अमान्य करीत नाहीत. कोल्हापूर येथील मेहेन्दळे बंधूंचे 'हरिहर विद्यालय', भालजी पेंढारकरांचा 'जयप्रभा स्टुडिओ' तसेच सखारामपंत रानडे यांचे प्रसिद्ध 'क्षुधा शांती भवन' या उद्रेकात सापडली होती जवळपास वास्तू नष्टही झाल्या होत्या पण नंतर त्यांच्या पुनर्बांधणीत जे हात पुढे आले त्यांची शिरगिणती त्यानी आपापल्या आठवणीत केली आहेच, त्याचा गरजूंनी शोध घेतल्यास त्या नावावरून इनसायडर्स किती अन् आऊटसायडर्स किती होती याचाही लेखाजोखा सापडेल.

२. श्री.कोल्हटकर आपल्या लेखात पुढे लिहितात : "द्वैभाषिक आले आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. माझ्या तेव्हाच्या आठवणीनुसार नव्या सरकारने जे अगदी पहिलेपहिले काही निर्णय घेतले त्यांमध्ये जळित कर्जाची बाकी माफ करण्याचा निर्णय होता. यशवंतरावांचे बेरजेचे राजकारण असे होते."

~ काय याचा अर्थ ? कसले आले आहे इथे बेरीजवजाबाकीचे राजकारण ? असले वाक्यप्रयोग या देशात सुरू झाले ते १९७५ च्या आणीबाणी कालखंडानंतर. त्या अगोदर तर महाराष्ट्रात कॉन्ग्रेसचा एक छत्री कारभार होताच होता. अगदी मैलाचा दगड जरी उभा केला तरी मतदार उमेदवाराचे नाव न पाहता प्रथम 'बैलजोडी' नंतर 'गायवासरू' पाहून त्यावर शिक्का मारीत होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळी अत्रे-डांगे प्रभृतीनी उभ्या केलेल्या तुफानातही समिती सत्तेवर येऊ शकली नव्हती. मग यशवंतरावांना दॅट् सो-कॉल्ड् बेरजेच्या राजकारणाची कसलीही गरज नव्हती. द्वैभाषिक राज्याबरोबरच मोरारजी देसाईंचा इथला प्रभाव संपल्यानंतर जे काही स्वतंत्रपणे निर्णय घेणे गरजेचे होते त्यानुसार जळीत कांडात सापडलेल्या संबंधितांची कर्जे माफ करण्याची ती एक घोषणा. इतकेच त्याचे महत्व. [तसे झाले म्हणून राज्यातील तो समस्त ब्रह्मवृंद कॉन्ग्रेसच्या मागे टाळमृदंग घेऊन लागला असेही झाले नाही, शिवाय अनेक आर्थिक धोरणात्मक निर्णयासारखाच सरकारचा, एकट्या यशवंतराव चव्हाण यांचा नव्हे, तो एक निर्णय.]

राज्यात "बेरजेचे राजकारण" करतात ते फक्त 'शिवाजी' हे नाव घेऊनच. आम्हा ब्राह्मणेतरांवर या नावाची पखरण टाकली की आम्ही मग टाकणारा तो झिया उल् हक असला तरी त्याच्यामागे मेंढरागत जाणार ! ही मेन्टॅलिटी ओळखणार्‍यांनी आपल्या स्वार्थासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे असाच या राज्याचा राजकीय इतिहास सांगतो. बाळासाहेबांनी सेना स्थापन करताना नावात 'शिव' ऐवजी 'गोळवलकर' घातले असते तर त्या पक्षाचा जितका विस्तार झाला तितका झाला असता का असा मुद्दा पटलावर आला असता तर काय उत्तर निघेल ?

बेरजेचे राजकारण असेलच तर ते असते सत्तेसाठी सामान्यांना मूर्ख करणे. शे-पाचशे जळीत कर्जे माफ करून यशवंतरावांनी खतावणीत कसली बेरीज मारली असणार ?

३. "युद्धानंतरचे ते दिवस रेशनिंगचे होते आणि आम्हाला रेशनमध्ये 'मिलो' -ज्याला लोक विनोदाने 'मेलो मेलो' म्हणत - नावाचा तांबडा जोंधळा मिळत असे आणि त्याच्या बेचव भाकर्‍या हे आमचे मुख्य खाणे असे."

~ या वाक्यातही एक ट्विस्ट आहे. 'आम्हाला रेशनमध्ये 'मिलो' नावाचा तांबडा जोंधळा मिळत असे." यातून आजचा युवक/युवती [ज्याना त्या काळातील् रेशनिंग स्थिती माहीत् नाही] वरील गांधीहत्या+जाळपोळ वाचून असा अर्थ काढू शकते की, 'आम्हाला' म्हणजे ब्राह्मण लोकांना आणि मग इतरांना यशवंतराव 'शाळू' वाटत होते की काय ? वस्तुस्थिती अशी होती की झाडून सार्‍या राज्यातील जनतेला रेशनिंगवरचा हा कोंडामिश्रीत मिलो घेणे भाग होते. त्यात त्या वेळेच्या परिस्थितीनुसार शिधावाटप पद्धतीत वावगे काहीच नव्हते. मी तर असे म्हणेन की, रेशनिंगमुळे का होईना ब्राह्मणांना 'मिलो' नावाचा ज्वारीचा एक प्रकार असतो याची तरी किमान माहीती तरी झाली; जो बाकीची तमाम जनता बारा महिने चोवीस तास खात असते आणि त्यांच्यासाठी पोळी म्हणजे सणासुदीचा एक प्रकार.

लेखनविषय: दुवे:

Comments

जळीत कांड: आकडेवारी

गांधीहत्येनंतर झालेल्या हिंसक घटनांविषयी अनेक ऍनेक्डोटल गोष्टी ऐकण्यात आल्या. या हिंसक कृत्यांची व्याप्ती व त्यांचे परिणाम जाणून घेण्यासाठी या घटनेविषयी काही आकडेवारी उपलब्ध असल्यास ती कृपया येथे द्यावी. ब्राह्मणांचे शहराकडे वाढते स्थलांतर होण्यास या हिंसक घटना कारणीभूत आहेत, या थियरीविषयीही जाणून घ्यायला आवडेल.
गोडसे भटजींचे पुस्तक वाचल्यास संख्यने अधिक यजमान असलेल्या ठिकाणी (पक्षी शहरांकडे) याज्ञिकी व्यवसाय असलेलेल्या ब्राह्मणांचे स्थलांतर आधीपासूनच सुरू असावे असे दिसते.

इतर प्रतिक्रिया वाचून धाग्याच्या योग्यायोग्यतेविषयी माझे मत नोंदवून टाकतो. कोल्हटकरांच्या सरळ-साध्या आणि 'आक्रस्ताळेपणाचा अभाव' असलेल्या वर्णनांच्या पार्श्वभुमीवर काही प्रतिसादांतून अकारण आक्रस्ताळेपणा जाणवला. त्याविषयी तेथेच चर्चा न करता अशोक यांनी वेगळा धागा काढला हे उचितच आहे.

__________
"Do not argue with an idiot. He will drag you down to his level and beat you with experience" - सहकार्‍याच्या दारावरील वाक्य कोणाचे ते माहीत नाही.

जळित कांड, स्थलांतर इ.

१)या जळित कांडाची पार्श्वभूमी(मुख्य कथावस्तू नव्हे) असलेली 'वावटळ' या नावाची श्री. व्यंकटेश माडगूळकर यांनी लिहिलेली एक वाचनीय लघुकादंबरी मराठीत आहे. या चर्चेत तिचा उल्लेख येईल अशी अपेक्षा होती. कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे म्हणून कदाचित तिचा उल्लेख झाला नसावा.
२)ब्राह्मणांच्या स्थलांतराविषयी लिहायचे तर ते पेशवाईपासूनच पुण्याच्या दिशेने सुरू होते. १८१८ नंतर त्याचा रोख बदलून तो मुंबईकडे वळला. पण या सुमारास ब्राह्मणेतरांचेही स्थलांतर मुंबईच्या दिशेने सुरू झाले. हळूहळू स्थलांतरितांच्या संख्येच्या बाबतीत ब्राह्मणेतरांनी लोकसंख्येतला त्यांचा मूळ रेश्यो कायम राखीत ब्राह्मणांना मागे टाकले. सुरुवातीला मुंबईच्या लगतच्या भागातून म्हणजे ठाणे,वसई,पेण,पनवेल इथून लोक येत असत. रेल् वे ने सह्याद्री ओलांडल्यानंतर पुणे,मावळ भागातले लोकही येऊ लागले. किनार्‍यावर वाफेवरची जलवाहतूक सुरू झाल्यावर कारवारपर्यंतच्या कोंकणपट्टीतून मुंबईच्या दिशेने लोकांची रीघ लागली.१९५६ साली कसेल त्याची जमीन या तत्त्वावरचा कूळकायदा अंमलात आल्यावर पुन्हा एकदा ब्राह्मणांच्या स्थलांतराने वेग घेतला तो आताआतापर्यंत कायम होता,फक्त डेस्टिनेशन् मुंबई न राहाता १९६० पर्यंत लंडन्,त्यानंतर थोडा काळ पश्चिम आशिया, नंतर प्रदीर्घकाळ अमेरिका,अलीकडे ऑस्ट्रेलिया आणि आता काही थोड्या प्रमाणात पुन्हा भारत असे बदलत गेले आहे.

धन्यवाद

प्रतिसाद चुकून आधी पाहीलाच नव्हता. धन्यवाद.

'वावटळ' मिळवण्याचा प्रयत्न करतो. स्थलांतराविषयी अधिक माहिती असल्यास स्वतंत्र लेख लिहावा अशी विनंती करतो.

दुर्दैवी

श्री.कोल्हटकरांच्या (माझ्या मते) बिनविषारी आणि निष्पाप आठवणींतून असले काहीतरी काटेरी आणि तिरके काढण्याचा श्री. अशोक पाटील यांचा प्रयत्न बघून वाईट वाटले. रास्वसं, संभाजी ब्रिगेड, शिवसेना, हरी नरके, पुरुषोत्तम खेडेकर, आ.ह. साळुंखे असले उल्लेखही आता इतर प्रतिसादांत आले तर नवल वाटणार नाही. श्री. पाटील यांच्यासारख्या सदस्याकडून असल्या धाग्याची निर्मिती व्हावी हे दुर्दैवी आहे.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

प्रश्न दुर्दैवाचा

दुर्दैव असलेच तर हे आहे सन्जोप राव की तुम्हाला माझ्या प्रयत्नात काहीतरी काटेरी आणि तिरके दिसले, शिवाय थेट रास्वसं ते ब्रिगेडच्या शिलेदारांपर्यंत आपल्या कल्पनेची झेप गेली. ब्रिगेडच्या दप्तरी कोल्हापुरातील 'आपल्या भूमिकेविरुद्ध जाणारे जे मराठे आहेत तीमध्ये अशोक रामचंद्र पाटील' या व्यक्तीचे नाव पहिल्या दहात आहे हे तुम्ही उद्या जरी त्यांच्या पुण्यातील कार्यालयात गेला तरी उमजेल. त्यामुळे तुम्ही म्हणता तसे वरील मंडळींना इथल्या [तसेच अन्यत्रही] चर्चेत आणण्याचे कार्य कुणी केले तर ते त्यांच्याबद्दल सहानुभूती दाखविणार्‍यांकडूनच, माझ्याकडून नव्हे, इतका मी त्या विचारसरणीच्याविरूद्ध आहे. मी सरकारी अधिकारी असल्याने माझ्या सामाजिक कार्याला या क्षणी तरी काही "पॉलिसी" ची बंधने येतात, जी मी पाळणे नि:संशय गरजेचे आहे; हे तर तुम्ही मानाल?

'बिनविषारी' तसेच 'निष्पाप' अशी विशेषणे श्री.कोल्हटकरांच्या लिखाणाला लावण्याची अक्षरमात्र जरूरी नाही इतके ते निखळ आणि आठवणींने हृदयस्पर्शी झाले आहे असे मी सुरूवातीलाच म्हटले असल्याने त्यांच्या लेखाविरूद्ध हे लेखन नसून त्या निमित्ताने परत जो सात खोली खाली गाडण्याच्या लायकीचा 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' वाद प्रतिसादातून उमटत गेला त्याने खरे तर मी खिन्न झालो होतो. मग त्याची कारणमीमांसा शोधताना त्या दोन अयोग्य अशा टर्म 'बेरजेचे राजकारण' तसेच 'मिलो' सापडल्या, ज्या आजच्या पिढीतील उपक्रमींच्या मनी वेगळा ठसा उमटवू शकतील अशा वाटल्या. तीवर स्वतंत्र भाष्य करणे मी योग्य मानले....आणि 'उपक्रमी' सदस्य या नात्याने तो माझा अधिकार असेल असा संपादक मंडळही म्हणेल.

ब्राह्मणांना खुद्द त्यांच्या ज्ञातीतील सदस्य मानणार नाही इतका मी मानतो. माझे गुरुवर्य आणि आपल्या मुलाच्या अगोदर माझी विद्यापीठ परीक्षा फी भरणारे गृहस्थ चित्पावन ब्राह्मण होते आणि माझ्यावरील त्यांची माया ही मी 'पाटील' म्हणून नव्हे तर माझ्यातील जातविरहीत विचारसरणीमुळेही असेल हे मी ठामपणे म्हणू शकतो. आजही पुण्यात नोकरीनिमित्य आलेल्या माझ्या मुलाला कोणत्याही कागदपत्राशिवाय आपला फ्लॅट राहायला देणारे 'फडके' हे ब्राह्मणच आहेत, जे मला गेली ३० वर्षे ओळखतात.

उपक्रमवरील जवळपास सर्वच व्यक्ती उच्चविद्याविभूषित आहेत, त्या त्या क्षेत्रातील त्यांचा गाढा अभ्यास आहे, भरपूर वाचन करणारे हे लोक आहेत, हे त्यांच्या लिखाणावरून आणि मतसादरीकरणावरून प्रकर्षाने जाणवते. मग अशावेळी कालबाह्य झालेली आणि दोन समाजात फळ्या पाडू शकणारी प्रतिबिंबे प्रतिसादात का होईना का पाडावीत हा विचार करणे प्राधान्याचे आहे.

असो. भूमिका समजून न घेता लेखावरून एखादी व्यक्ती अमुक एका जातीविरूद्ध वा बाजूने आहे असा घाईने तर्क आणि पाठोपाठ येणारी गृहितकेही मांडू नये, इतकेच म्हणतो.

असे असेल तर...

'आपल्या भूमिकेविरुद्ध जाणारे जे मराठे आहेत तीमध्ये अशोक रामचंद्र पाटील' या व्यक्तीचे नाव पहिल्या दहात आहे
सात खोली खाली गाडण्याच्या लायकीचा 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' वाद
ब्राह्मणांना खुद्द त्यांच्या ज्ञातीतील सदस्य मानणार नाही इतका मी मानतो.

पाटीलसाहेब, असे जर खरोखर असेल तर हा विषय संपतो. असे असेल तर आपल्या या लेखाचे प्रयोजनच नव्हते.
पुण्यात नोकरीनिमित्य आलेल्या माझ्या मुलाला कोणत्याही कागदपत्राशिवाय आपला फ्लॅट राहायला देणारे 'फडके' हे ब्राह्मणच आहेत
अगदी असेच मीही केले आहे, हे नम्रपणे सांगू इच्छितो...
बाकी लेखनसीमा.
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

कोल्हटकरांचा लेख

कोल्हटकरांचा लेख वाचून मला त्यात काही आक्षेपार्ह आहे असे प्रथमतः वाटले नाही पण त्या लेखात आलेल्या काही प्रतिसादांतील भाग मला अनावश्यक, एकांगी आणि जातीयवादी वाटला.

'आम्हाला रेशनमध्ये 'मिलो' नावाचा तांबडा जोंधळा मिळत असे." यातून आजचा युवक/युवती [ज्याना त्या काळातील् रेशनिंग स्थिती माहीत् नाही] वरील गांधीहत्या+जाळपोळ वाचून असा अर्थ काढू शकते की, 'आम्हाला' म्हणजे ब्राह्मण लोकांना आणि मग इतरांना यशवंतराव 'शाळू' वाटत होते की काय ?

या वाक्यावरून पाटील यांना राग आला असावा असे मला वाटते. राग येणे अगदीच चुकीचे आहे असे मी म्हणणार नाही कारण गांधीहत्या आणि त्या निमित्ताने नेटावर चालणारे राजकारण जुनेच आहे परंतु कोल्हटकरांना तिरकस काही म्हणायचे आहे का हे कोल्हटकरच सांगू शकतील. निदान मला तरी तसे वाटले नाही.

तूर्तास, अनावश्यक वाद न वाढवण्याची विनंती करेन.

अनपेक्षित

श्री. पाटील ह्यांच्याकडून आलेला हा धागा अनपेक्षित. कोल्हटकरांच्या त्या धाग्यावरील काही तापट प्रतिक्रिया वाचून ही प्रतिक्रिया उमटली असावी. कोल्हटकरांच्या लेखात मला तरी आक्षेपार्हसे काही आढळले नाही. बेरजेच्या राजकारणाबाबत पाटील ह्यांनी मांडलेले मुद्दे पटण्यासारखेच आहेत. असे असले तरी कोल्हटकरांनी तो मुद्दा तिरकसपणे मांडला आहे असेही वाटले नाही.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

समजले नाही

कोल्हटकरांचा लेख आणि प्रतिक्रिया पुन्हा वाचल्या. लेखातील घटनेचे वर्णन संयत आणि अलिप्त वाटलेच पण बहुतांश प्रतिसादही आक्षेपार्ह वाटले नाहीत. संजोप राव, विसुनाना वगैरे सदस्यांनी कदम/पाटिल लोकांनी कशी मदत केली हेच लिहिले असताना अशोक पाटलांना हा मुद्दा पुन्हा अधोरेखित करावासा का वाटले ते समजले नाही.

आमच्याही घरावर आलेले समाज कंटक, शेजारी श्री.शामराव पाटिल ह्यांनी हा माझाच वाडा आहे असे सांगुन पांगवल्याचे आजीकडुन ऐकले होते. ब्राह्मणांची घरे वाचवण्यासाठी वस्तीतीलच ब्राह्मणेतरही पुढे आले होते ही वस्तुस्थिती नाकारण्याचा प्रयत्न कुणीच केलेला नाही.

प्रतिसाद

वाईट एकच झालं, की आम्हाला कारण नसताना पुढेही ब्राह्मणद्वेषाचे चटके सहन करावे लागले.

एका प्रतिसादातील हे विधान लोडेड (मला आक्रस्ताळेही वाटते) आहे. आक्षेपार्ह नाही. याविषयी मतभेद असू शकतात.

__________
"Do not argue with an idiot. He will drag you down to his level and beat you with experience"? - सहकार्‍याच्या दारावरील वाक्य कोणाचे ते माहीत नाही.

बरोबर

होय म्हणूनच 'बहुतांश' प्रतिसाद असे लिहिले. 'पुढेही ब्राह्मणद्वेषाचे चटके सहन करावे लागले' हे कोल्हटकरांच्या लेखावर थोडे खटकणारे वाटले. (जी भुमिका कोल्हटकरांनी कटाक्षाने टाळली आहे.)

आक्षेपार्ह नाही

श्री अरविंद ह्यांनी काही आक्षेपार्ह लिहिले आहे असे वाटत नाही, पण बळेच वाक्यांचा अर्थ काढत गेल्यास अर्थ/अनर्थ निघू शकतो, तो तसा काढण्याचे कारण प्रियाली/खुद्द श्री. अशोक म्हणतात किंवा मला वाटते त्याप्रमाणे 'अनावश्यक प्रतिसाद' हे असू शकेल.

तसेही उपक्रमवर बामनाविरुद्ध बामनच जास्त बोलतात. (ह.घे.) :)

आक्षेपार्ह

श्री.आजूनकोणमी ~

मी परत एकदा स्पष्ट करू इच्छितो की माझ्या वरील लिखाणात मी कुठेही श्री.कोल्हटकरांनी आक्षेपार्ह लिहिले आहे असे म्हटलेले नाही. श्री.सन्जोप राव यांच्या प्रतिसादावर परत दिलेल्या प्रतिक्रिया वाचल्यानंतरदेखील ती बाब प्रकर्षाने आपल्या नजरेस येईलच. माझी भूमिका इतपत सीमित आहे की त्या निमित्ताने तिथे जे काही प्रतिसाद उमटले त्याकडे छिद्रान्वेषी भूमिकेतून पाहिल्यास कित्येकांना 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादा'चे प्रेत पुन्हा डिसेक्शनसाठी टेबलवर घ्यावे असे दिसल्याचे प्रतीत होईल. "बिटवीन द लाईन्स" वाचण्याची सवय बरी की वाईट हा भाषाप्रभूंचा अभ्यास असेल पण त्यामुळे काहीवेळा इतिहासाची भूते समोर येऊन नाच करायला लागली की मग मुळात तशा प्रकारच्या वाक्यांची एखाद्या चांगल्या वाक्यात गरज होती का ? हाही विचार मनी येतोच.

"बळेच" वाक्यांचा अर्थ काढीत गेल्यास आपल्या ईप्सिताच्या अनुषंगाने मग चटकन सर्व गणिते सुटत जातात. पण जालीय दुनियेत खुल्या मंचावर प्रतिसादात विचारप्रदर्शन करीत असताना भाषेचे भान सुटू देऊ नये अशी अपेक्षा बाळगली तर त्यात काही चुकीचे आहे असे कुणी मानू नये.

सहमत

सहमत, मी आपल्या भूमिकेशी सहमत आहे, 'बळेच' अर्थ तुम्हाला उद्देशून नव्हता तर जळीत इतिहासाच्या संदर्भात सामान्यपणे कोणीपण चुकीचे अर्थ काढू शकतो असे ते शब्दप्रयोग श्री अरविंद ह्यांचे आहेत, पण श्री अरविंद ह्यांना तसे अपेक्षित नव्हते असे मला मनापासून वाटले.

त्रासाबद्दल दिलगीर.

आक्रस्ताळेपणा नव्हे विषण्णता...

कोल्हटकरांनी त्यांच्या धाग्यात 'आम्हाला' हा वापरलेला शब्द त्यांच्या जातीपुरताच मर्यादित असावा, अशा समज/गैरसमजामुळे काही विसंवाद निर्माण झाल्याचे जाणवते आहे.
माझेही त्या धाग्यावरील एक विधान काहींना आक्रस्ताळेपणाचे वाटते आहे म्हणून एक नम्र निवेदन. हे विधान करताना त्याची पार्श्वभूमी आक्रस्ताळेपणाची नसून विषण्णतेची होती. अर्थात ते पासिंग स्टेटमेंट समजून त्यावरुन फार गदारोळ माजू नये, अशी अपेक्षा.

ओक्के

हे विधान करताना त्याची पार्श्वभूमी आक्रस्ताळेपणाची नसून विषण्णतेची होती.

ठीक आहे. या विधानावर अधिक चर्चा करण्याचे टाळतो.

पटले नाही

बेरजेचे राजकारण म्हणजे अधिकाधिक समूहांना सामावून घेणारे राजकारण ही ढोबळ व्याख्या बरोबर आहे काय? तसे असल्यास दुखावल्या गेलेल्या समूहाचा पाठींबा जाऊ नये म्हणून केलेल्या कृतीस 'बेरजेचे राजकारण' असे म्हणण्यात काय चूक आहे बरे. 'बेरजेचे राजकारण' या शब्दप्रयोगास काही नकारात्मक छटा असल्यास त्याविषयी माहीत नाही. जमल्यास अशोक यांनी तशा छटांची माहिती द्यावी.

मिलोविषयी ओळींच्या मधून, खालून-वरून वाचूनही मला कुठे काहीच वावगे जाणवले नाही. निव्वळ बालपणीच्या निखळ इंद्रियनिष्ठ आनंदाची कल्पना आली.

मिलो

"मिलोविषयी ओळींच्या मधून, खालून-वरून वाचूनही मला कुठे काहीच वावगे जाणवले नाही. निव्वळ बालपणीच्या निखळ इंद्रियनिष्ठ आनंदाची कल्पना आली."

~ याविषयीही मधून-खालून-वरून न पाहताही थेट सरळसोट मार्गाने आणखीन् बरेच काही लिहू शकत होतो, पण मग परत कटुतेचे रसायन उकळत राहाण्याची भीती वाटली, म्हणून थांबलो. तुम्हाला हवे तर व्य.नि.तून सांगू शकेन.

अर्थ-अनर्थ

'आम्हाला रेशनमध्ये 'मिलो' नावाचा तांबडा जोंधळा मिळत असे."

ह्या वाक्यातील 'आम्हाला'चा उलगडा खालील वाक्यातुन होतो.

"आमच्याच पेठेत आगटे नावाचे कुटुंब होते. त्यांच्याकडे जमावाची दृष्टि वळली नव्हती. जळिताच्या दिवशी त्यांच्याकडे आमची पाठवणी करण्याचे ठरले. ह्या बातमीमुळे मला मनातून बर्‍यापैकी आनंद झाला कारण आगटयांकडे नेहमी पोळया असतात अशी माझी बालबुद्धीची समज होती "

आगटेही ब्राह्मणच असावेत.
तरीही 'आम्हाला' म्हणजे 'ब्राह्मण लोकांना' असा अर्थ कुणी काढल्यास त्यात लेखकाला कसे जवाबदार धरता येइल?

आगटे आणि पोळ्या

"आगटेही ब्राह्मणच असावेत."

~ इथे शक्यतेचा मुद्दाच नाही, वैद्य. श्री.कोल्हटकरांचे पुढचेच वाक्य ती समजूत दृढ करते, "त्यांच्याकडे जमावाची दृष्टी वळली नव्हती". यात छुपा अर्थ असा की, आगटे ब्राह्मण असूनही जमावाला ते समजले नाही. शिवाय पुढे "आगट्यांकडे नेहमी पोळ्या असतात" ही समजदेखील आगट्यांचे ब्राह्मणत्व सिद्ध करतेच.

"'आम्हाला रेशनमध्ये 'मिलो' नावाचा तांबडा जोंधळा मिळत असे." ~ या वाक्याचा जागी "त्यावेळी रेशनमध्ये मिलो नावाचा तांबडा जोंधळा मिळत असे" हा बदल करा. मग पाहा रचना किती सर्वव्यापी होऊन जाते.

बदल

'आम्हाला' शब्दातुन केवळ ब्राह्मणांनाच मिलो खावा लागत असावा (ब्राह्मणेतरांना मात्र शाळू मिळत होता) असा अर्थ दिसत असल्यास बदल आवश्यक आहे. पण आगटे हेही ब्राह्मणच असल्याने लेखकाच्या बालमनात आगट्यांकडे पोळ्या बनायच्या असा गैरसमज असल्याचे दिसुन येतो. आम्हाला मिलो मिळायचा पण पाटलांच्या घरी मात्र पोळ्या बनायच्या असे वाक्य नाही. 'आम्हाला' म्हणजे कोल्हटकरांना (ना की ब्राह्मणांना) मिलो मिळायचा असा बालपणीचा गैरसमज असल्याचे दिसुन येते.
किस काढल्याबद्दल क्षमस्व!

सुधारणा

किस काढल्याबद्दल क्षमस्व!
कीस म्हणा हो वैद्यबुवा! हा एकच मुद्राराक्षसाचा विनोद अशा गंभीर चर्चेत म्हणजे रामदेवबाबांनी हजारोंच्या (चुकून हजारेंच्या लिहीत होतो!) गर्दीला योगासने शिकवता शिकवता एकीकेडे हळूच एखादे खमंग भजे तोंडात टाकावे तसा वाटला....
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

हाहा

खरंतर हा शब्द लिहिताना एक सेकंद थांबलो होतो पण टायपेपर्यंत डोक्यात नेमके उलट पालट झाले. संपादकांनी कृपया योग्य ती सुधारणा करावी ही विनंती.

आजचा युवक....

माझा जन्म ८० च्या दशकातला. आजचा युवक असे जर मला मानण्यात येत् असेल तर एक स्पष्ट करु इच्छितो....
पाटिल सरांनी जो "मिलो" प्रकारचा अर्थ लावला जाण्याची भीती व्यक्त केली आहे, तसा अर्थ मी लावलेला नाही. त्यांनी मनःस्ताप करून घेउ नये ही नम्र विनंती.
मला पुनः पुन्हा तो लेख, तिथले प्रतिसाद वाचूनही काहिही खूप विचित्र वाटले नाही. ह्या लेखात काय तक्रार् मांडली आहे तेही नीटसे समजले नाही.

ह्या लेखातली माझ्याशी संबंधित असू शकणारे वाक्ये म्हणजे :-

"सारे मुसलमान अतिरेकी नाहीत पण सारे अतिरेकी मुसलमान आहेत" या न्यायानुसार गांधीहत्या-जाळपोळ कांडातील सहभागी असलेले सारे ब्राह्मणेतर होते हे मान्य, पण याचा अर्थ सारे ब्राह्मणेतर त्या कांडात सहभागी होते असा जो एक छुपा अर्थ त्यातून ध्वनीत होतो तो संतापजनक आहे.

तिथे मी सोडून् फक्त २-३ जणांनीच ब्राह्मण् -अब्राह्मण् हा शब्द् वापरलाय.त्या धाग्यावर माझ्या प्रतिसादात फक्त एकदाच "ब्राह्मण-अब्राह्मण वाद्" हा शब्द् मी वापरलाय. पण तो फक्त श्री ज जोशी ह्यांच्या लेखाणा॰या संदर्भात म्हणून उल्लेख केलाय. मुळात् तुम्ही सगळे हा वाद इतका सिरिअसली का घेताय् हेही समजत नाही. आता माझ्या प्रतिसादाला उपप्रतिसाद् आल्याने तो प्रतिसाद् संपादितही करता येत नाही.
तुमचा हा धागा माझ्या त्या प्रतिसादाशी संबंधित नसेल तर कृपया वरच्या ह्या पाच-सात ओळिंकडे पूर्ण दुर्लक्ष करावे.

इतरत्र पाटिल व कोल्हटकर सरांचे व इतरांचेही जे अभ्यस्त प्रतिसाद येतात त्याबद्दल वाचक म्हणून आभारी आहे, त्यातच त्यांनी स्वतःला व्य्स्त ठेवले तर आम्हाला वैचारिक् मेजवानी मिळतच राहिल.

--मनोबा

मूळ लेखाबाबत तक्रार पटत नाही

मूळ लेखाबाबत तक्रार पटत नाही.

"बेरजेचे राजकारण" या शब्दाचा चांगला अर्थ मला माहीत होता.
आगटे श्रीमंत होते, आणि त्यांच्याकडे गव्हाच्या पोळ्या बनत, कोल्हटकरांच्या घरी ("आमच्या"कडे) मात्र रेशनच्या मिलो-ज्वारीची भाकर बने ; असा अर्थ मी समजला.

छिद्रान्वेष आणि फाटाफूट

ज्या वाचकांवर या लेखाचा रोख आहे त्यांना या 'ब्राह्मण-ब्राह्मणेतर' वादाचे मूळ, त्याचे ऐतिहासिक स्वरूप, परिणाम आणि आजचे पडसाद यांची बरीच माहिती आहे. त्यामुळे त्या विषयाचा कीस(!) इथे काढण्यातून काहीच साध्य होणार नाही.(त्यांच्या ज्या काही असतील त्या वैचारीक भूमिका बदलणार नाहीत.) तरीही या लेखाबद्दल -

'बेरजेचे राजकारण' तसेच 'मिलो'

- १. बेरजेचे राजकारण - यशवंतराव चव्हाण राजकारणी असले तरी उत्कृष्ट समाजकारणीही होते. त्यांनी घेतलेला निर्णय हा सामाजिक बेरीज करण्यासाठी होता असे म्हटले तर वावगे ठरू नये. तुटलेली मने जोडण्यासाठी शासनाची भूमिका काय आहे ते लोकांपर्यंत पोचणे गरजेचे होते. त्यादृष्टीने हा निर्णय योग्यच होता. त्यात त्यावेगळे राजकारण नव्हते असे वाटते.
२. मिलो - 'आम्ही मिलो खात होतो' या वाक्याने काही वेगळे ध्वनित होते आहे असे वाटत नाही. मराठवाड्यातील दुष्काळात ६५ ते ७२ आणि पुढेही काही काळ रेशनवर 'मिलो' (मिलेट) मिळत होते. त्याच्या भाकरी मीही खाल्लेल्या आहेत. मला तरी दुधात केलेला मिलो भाकरीचा लाल कुस्करा खूप आवडत असे.

मी तर असे म्हणेन की, रेशनिंगमुळे का होईना ब्राह्मणांना 'मिलो' नावाचा ज्वारीचा एक प्रकार असतो याची तरी किमान माहीती तरी झाली; जो बाकीची तमाम जनता बारा महिने चोवीस तास खात असते आणि त्यांच्यासाठी पोळी म्हणजे सणासुदीचा एक प्रकार.

-हे वाक्य अतिशयोक्त आहे. त्याआधीचे वाक्य जास्त वस्तुनिष्ठ आहे -

वस्तुस्थिती अशी होती की झाडून सार्‍या राज्यातील जनतेला रेशनिंगवरचा हा कोंडामिश्रीत मिलो घेणे भाग होते.

- त्या रेशनिंग काळाच्या आधी महाराष्ट्रातील समस्त जनतेस स्वच्छ्, पांढरी ज्वारी खाण्याची सवय होती ही वस्तुस्थिती आहे. देशावरील ब्राह्मण इतरांप्रमाणे खपली गहू + ज्वारी आणि कोकणातील ब्राह्मण इतरांप्रमाणे भात+ कडधान्ये यांचा जेवणात वापर करत. स्वयंपाकपद्धतीत जरूर फरक असू शकतो.

चू.भू.द्या.घ्या.

वस्तुस्थिती

@ श्री.धनंजय ~

मूळ लेखाबाबत [किंवा लेखकाबद्दल] कसलीच तक्रार नाही, उलटपक्षी प्रथम त्या लेखातील भावनेच्या ओलाव्याबद्दल लिहिले आहे. त्या वेळेच्या परिस्थितीवरील तेथील वाक्यरचनेतून मला खटकलेल्या काही बाबींचा थेट तिथे उल्लेख न करता [कारण मूळ धागा भरकटण्याची भीती] स्वतंत्र धागा केला इतकेच. एका चांगल्या आठवणीवरदेखील तो जुना वादाचा प्रकार प्रतिसादातून येण्याचा प्रकार सुरू झाल्याचे पाहून मी व्यथीत होणे हा माझ्या स्वभावाचा भाग झाला, मग त्यानुसार नदीच्या पल्याडली बाजू इथे मांडली तर उपक्रमच्या ध्येयधोरणाविरूद्ध काही केले असेल असे मला वाटत नाही.

"बेरजेचे राजकारण" याचा चांगला अर्थ मलाही माहीत आहे. प्रश्न आहे तो इतकाच की जाळपोळ प्रकरणाने सारे राज्य हादरले असता सरकारने नुकसान भरपाई स्वरूपात काही पावले उचलणे क्रमप्राप्त होते. ते काम त्या सरकारने केले इतकेच, त्यात बेरीज-वजाबाकीचे कसले आले होते राजकारण ?... त्यातही नूतन राज्याच्या सुरूवातीच्या पहिल्या वर्षात.

@ विसुनाना ~
नोटेड.

तरीही आपल्या "त्या रेशनिंग काळाच्या आधी महाराष्ट्रातील समस्त जनतेस स्वच्छ्, पांढरी ज्वारी खाण्याची सवय होती ही वस्तुस्थिती आहे." या विधानावर वस्तुनिष्ठ लिखाण करता येईल मला. पण त्या विषयाची व्याप्ती पाहता परत परत तेच कटुतेचे मुद्दे येण्याची शक्यता असल्याने तीवर भाष्य नको असे मी समजतो.

प्रतिसाद

श्री. पाटील,
मतामतांत अंतर असले तरी आपली भाषाशैली फार आकर्षक आहे. आपले लिखाण वाचताना मला माझ्या आवडत्या एका लेखकाच्या शैलीची आठवण येते. ते ब्राह्मणेतर नाहीत, हे खरेच 'दुर्दैवी' आहे!
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

योग्य

तरीही आपल्या "त्या रेशनिंग काळाच्या आधी महाराष्ट्रातील समस्त जनतेस स्वच्छ्, पांढरी ज्वारी खाण्याची सवय होती ही वस्तुस्थिती आहे." या विधानावर वस्तुनिष्ठ लिखाण करता येईल मला. पण त्या विषयाची व्याप्ती पाहता परत परत तेच कटुतेचे मुद्दे येण्याची शक्यता असल्याने तीवर भाष्य नको असे मी समजतो.

आपल्याला असे वस्तुनिष्ठ लिखाण करण्यास आपल्यातील सदसदविवेक बुद्धिचा भावनेशी होणार्‍या संघर्षात विवेकाचा कौल मानावा ही भावना प्रतिबंधित करते आहे म्हणुन आपण तीवर भाष्य नको असे म्हणत आहात असे आम्हाला वाटते. कदाचित आपण तसे लिहिले तर आपण ब्राह्मण द्वेष्टे आहात असा ठपका येउ शकतो किंवा असा संशय असलेल्या उपक्रमीच्या मताला पुष्टी मिळण्याचा संभव आहे.
"त्या रेशनिंग काळाच्या आधी महाराष्ट्रातील समस्त जनतेस स्वच्छ्, पांढरी ज्वारी खाण्याची सवय होती ही वस्तुस्थिती आहे." यावर शब्दोच्छल होउ शकतो. समस्त हा शब्द तर झोडपायला हुकुमाचा एक्का आहे.
पाटील साहेब वादविवादाच्या भरात भावनेच्या आहारी जाउन कटुतेचे मुद्दे येण्याची शक्यता असल्याने आपण भाष्य नको असे म्हणता आहात याच्याशी मी सहमत आहे.
प्रकाश घाटपांडे

ब्राह्मणद्वेष्टे

कदाचित आपण तसे लिहिले तर आपण ब्राह्मण द्वेष्टे आहात असा ठपका येउ शकतो किंवा असा संशय असलेल्या उपक्रमीच्या मताला पुष्टी मिळण्याचा संभव आहे.

एखाद्याला ब्राह्मणद्वेष्टे असण्याचे लेबल लावणे जालकरांना नवीन नाही. कोणाही सोम्यागोम्याने उठावे आणि लेबले लावत फिरावे. अशी लेबले लावणार्‍यांची किंमत किती करावी ते ठरवायला नको पण ब्राह्मणद्वेष्टे हा ठपका तुम्हाला लागू शकतो म्हणून तोंड बंद ठेवावे असे सांगणे अयोग्य वाटते. ही दादागिरी झाली.

कदाचित, योग्य प्रकारे मुद्दा मांडून पाटील यांना मिलोचे रेशनिंग आणि पांढरी ज्वारी याबद्दल लिहिता येईलही. त्यांना अशाप्रकारे नाउमेद करण्याची गरज कळत नाही.

तरीही,

"त्या रेशनिंग काळाच्या आधी महाराष्ट्रातील समस्त जनतेस स्वच्छ्, पांढरी ज्वारी खाण्याची सवय होती ही वस्तुस्थिती आहे." यावर शब्दोच्छल होउ शकतो. समस्त हा शब्द तर झोडपायला हुकुमाचा एक्का आहे.

याच्याशी सहमत आहे.

पाटील साहेब वादविवादाच्या भरात भावनेच्या आहारी जाउन कटुतेचे मुद्दे येण्याची शक्यता असल्याने आपण भाष्य नको असे म्हणता आहात याच्याशी मी सहमत आहे.

याच्याशीही सहमत आहे.

अधिक वाद वाढवायची इच्छा नसल्याने पाटील यांनी न लिहिण्याचा निर्णय घेतला असल्यास तो योग्य आहे. अन्यथा, त्यांना आपली बाजू मांडावीशी वाटत असेल तर त्यांनी ती मांडावी. त्यांची बाजू त्यांनी मांडल्याने उपक्रमी त्यांना ब्राह्मणद्वेष्टे असे लेबल लावतील ही भीती मला उपक्रमी सदस्यांचा अपमान करणारी वाटली.

चालू द्यात

चालू द्यात!
प्रकाश घाटपांडे

दादागिरी

ब्राह्मणद्वेष्टे हा ठपका तुम्हाला लागू शकतो म्हणून तोंड बंद ठेवावे असे सांगणे अयोग्य वाटते. ही दादागिरी झाली.
कुणाचे काय म्हणणे ही दादागिरी आहे हे कोणाही सोम्यागोम्याने ठरवणे ही दादागिरी (किंवा ताईगिरी) नाही काय?

अधिक वाद वाढवायची इच्छा नसल्याने पाटील यांनी न लिहिण्याचा निर्णय घेतला असल्यास तो योग्य आहे. अन्यथा, त्यांना आपली बाजू मांडावीशी वाटत असेल तर त्यांनी ती मांडावी. त्यांची बाजू त्यांनी मांडल्याने उपक्रमी त्यांना ब्राह्मणद्वेष्टे असे लेबल लावतील ही भीती मला उपक्रमी सदस्यांचा अपमान करणारी वाटली.
हे वकीलपत्र घेण्याचे कारण काय? उपक्रमी सदस्यांचा अपमान होतो की नाही ते न कळण्याइतपत उपक्रमी बुद्दू आहेत काय? पाटील यांनी काय करावे हे न सांगणार्‍यावर टीका करताना आपण पाटील यांनी काय करावे हे सांगू नये याचे भान सुटावे काय? अशी अनावश्यक वकीलपत्रे घेतल्याने काय होते हा त्यांचा आपला इतिहास ताजा आहे...
सन्जोप राव
दर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा
मैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा

थयथयाट कशाला?

कुणाचे काय म्हणणे ही दादागिरी आहे हे कोणाही सोम्यागोम्याने ठरवणे ही दादागिरी (किंवा ताईगिरी) नाही काय?

नाही. दादागिरी झाली हे माझे मत आहे. त्यातून कोणी तोंड बंद करावे अशी इच्छा नाही. तसे म्हटलेलेही नाही. मला सोम्यागोम्या होण्याशी प्रत्यवाय नाही. आपल्याला असला तरी आपण थयथयाट करू नये ही नम्र विनंती.

हे वकीलपत्र घेण्याचे कारण काय? उपक्रमी सदस्यांचा अपमान होतो की नाही ते न कळण्याइतपत उपक्रमी बुद्दू आहेत काय? पाटील यांनी काय करावे हे न सांगणार्‍यावर टीका करताना आपण पाटील यांनी काय करावे हे सांगू नये याचे भान सुटावे काय?

मी कोणाचे वकीलपत्र घ्यावे हा माझा माझा वैयक्तिक निर्णय आहे. त्याची कारणे आपल्याला सांगायची गरज वाटत नाही. उपक्रमी बुद्धू असते तर त्यांच्या लक्षात "पाटलांना लेख वाचून नाही पण प्रतिक्रिया वाचून राग आला असावा" असे आले नसते. ते अनेकांच्या लक्षात आले यातच सर्व आले. तसेही पाटील यांनी काय करावे हे मी आधीच सुचवले आहे हे आपल्या लक्षात का आले नाही याचेही कारण माझ्या लक्षात आले. :-) असो.

अशी अनावश्यक वकीलपत्रे घेतल्याने काय होते हा त्यांचा आपला इतिहास ताजा आहे...

अरे वा! हे तर वैयक्तिक स्कोर सेटलिंग झालं. ते इतर धाग्यांवरही चालू झालेले दिसते. म्हणजेच मुद्दे संपलेले दिसतात. वरील वाक्याचा या चर्चेशी काही संबंध नाही. तसेही "डुकरांशी कुस्ती लढण्यात अर्थ नसतो हेच खरे." - हा फक्त वाक्प्रचार झाला तरीही चर्चेशी संबंधित नसणार्‍या आपल्या थयथयाटाकडे दुर्लक्ष करेन.

+१

वरच्या (संजोप राव यांच्या) प्रतिसादतल्या विकृतीचा मी निषेध करते.

'द सेकंड सेक्स' या पुस्तकासाठी सर्वात जास्त गाजलेल्या सिमोनच्या एका वाक्याची आठवण झाली. "वयस्कर लोकांमधे अवगुण नसावेत ही अपेक्षा चुकीची आहे. माणसात मुळात असलेले अवगुण वयाप्रमाणे कमी कसे होणार?" (भाषांतरीत वाक्य आठवणीतून लिहीलं आहे.)

हा हा हा

कासिद के आते आते खत एक और लिख रखूं
मैं जानता हूं जो लिखेंगे वो जवाब में
सन्जोप राव

वा व्वा ...

काशिदने खतं आणावीत म्हणून मी कधीपासून लिहीतो आहे (काशिद शेतीखात्याचा मंत्री असावा); पण त्याचं (खतांऐवजी) फक्त लेखी उत्तर येणार हे मी जाणून आहे.

अर्थ

हा विनोद असेल तर तर तो अगदी सपक आणि क्षीण आहे. (असे म्हणणे म्हणजे दादागिरी तर नाही ना?) हा या शेराचा आपण काढलेला अर्थ असेल तर शायराने आपल्या कबरीत बदललेली कूस मला स्पष्टपणे दिसते आहे.
सन्जोप राव
स्त्री पुरुष समता जिंदाबाद! स्त्रियांनी मिशा वाढवल्या पाहिजेत! पुरुषांनी कधीकधी का होईना, गरोदर राहिले पाहिजे!

असो

मी कबरीबाहेरच कूस बदलावी का?

असो. माझ्याकडून या धाग्यावर अवांतर बंद.

+१

मी देखील प्रियाली ह्यांच्या मूळ प्रतिसादातील मताशी सहमत आहे, घाटपांडे काकांचा प्रतिसाद मला देखील थोडा औपरोधिक वाटला.
प्रियाली ह्यांचा प्रतिसाद थोडा 'कडक' वाटू शकतो पण त्यांचा मुद्दा योग्य होता असे मला वाटते.

हा हा हा

'समस्त' हा शब्द झोडपायला हुकुमाचा एक्का आहे हे तर खरेच. दुरुस्ती - समस्त म्हणजे ज्यांना परवडत होते अशा समस्त. न परवडण्याइतक्या गरीब असणार्‍या समस्तांना (ब्राह्मण - ब्राह्मणेतर) कदान्न् खावे लागे असे वाचावे.
यावरून एक ईनोद आठवला - (प्रत्यक्ष घडलेला आहे.)
या प्रदेशात समस्त लोकांचे भात हे मुख्य अन्न आहे. (इथे समस्त म्हणजे बहुसंख्य.) तांदळाचे दर सतत चढे आहेत.
मी एका (बर्‍याच) कमी कमावत्या ओळखीच्याला सहानुभूतीच्या स्वरात म्हणालो - "सरकारने रेशनवर दोन रुपये किलो दराने तांदूळ केला ते बरे झाले, नाही का?"(म्हणजे तुला बरे झाले असे अध्याहृत होते.)
त्यावर तो रुक्षपणे म्हणाला - "होय, बरे झाले. गरीबांना अन्न मिळेल. पण तो तांदूळ आपल्या खाण्याच्या लायकीचा नसतो."

यशवंतराव

दोन्ही लेख वाचले. यातील कळीचा मुद्दा यशवंतरावांच्या भूमिकेशी येऊन थडकतो.

कोल्हटकरांच्या लेखनातून थोडेफार असे ध्वनित होते की दंगलीतील लोकांना पाठीशी घालण्यात यशवंतराव सहभागी असावेत. नंतर त्यांनी मते मिळविण्यासाठी थोडीफार भरपाई केली.

हा दंगा प्रामुख्याने यशवंतरावांच्या प्रभावक्षेत्रातल्या भागात झाला असे म्हटले तर वावगे होणार नाही. (विदर्भ, मराठवाडा, कोकण उत्तर महाराष्ट्रात हा नसावा.) तसेच दंगा बरेच दिवस चालला असावा असे ही वाटते. तेव्हा एक जबाबदार राजकारणी म्हणून त्यांच्यावर पाठिंबा दिला असा ठपका येऊ शकतो. तो योग्य आहे की हे मला माहित नाही.

या दंग्याबाबत माझे फारसे वाचन नाही, तसेच अशा कहाण्या वा त्यांचे विश्लेषण मी फारसे ऐकले नाही. दोन्ही लेखक अभ्यासु, माहितगार आणि त्याच इलाक्यातले आहेत (असावेत). या निमित्ताने या दंगलीवर अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक वाचायला आवडेल.

दंग्याची एक पद्धत असते. सहसा अनोळखी लोक दुसर्‍या भागात जाऊन जाळपोळ, लुटालुट करतात. स्थानिक लोक माहिती देतात. एका प्रकारे हा सामुहिक गुन्हेगारीचा प्रकार आहे. लुटलेले काही सामान स्थानिकांकडे सापडते. अगदी छोट्या छोट्या वस्तुंवरून ही ओळख पटते. दंगलपीडित यावरून आपले अनुमान काढत असतो. माझ्या माहितीतल्या एकाने गुजरातेतील दंगलीचे सर्वेक्षण केले होते. त्यातल्या तक्रारी अशा प्रकारच्या होत्या - घरातले पडदे एका घरात लागले. कुणाकडे काही भांडी दिसली वगैरे. अशा लोकांवर दंगलीचा आरोप नसला तरी सहाय्याचा आरोप असतोच. प्रत्येक दंगलीत मदत करणारे आणि वाचवणारे शेजारी लोक दंगल कर्त्यांपेक्षा जास्त संख्येने असावेत.

दंगलकर्ते हे अल्पसंख्य असतात यावर माझा विश्वास आहे. बहुसंख्य लोकांना त्यामुळे दूषण देणे अयोग्य आहे. पण याबाबत राजकारणी लोकांवर संशय न घेणे हे मला कठीण वाटते. अशा राजकारण्यांनी स्वतः पुढाकार घेऊन हे थांबवले असेल, दोषींना पकडून शिक्षा दिली असेल तर त्यांच्यावर ठपका येऊ शकत नाही. राजकारण्यांनी हतबलता दाखवणे हे अयोग्य समजीन.

यशवंतराव कदाचित या सर्व गोष्टी करून चुकले असतील किंवा नसतील. त्यावर वाचायला आवडेल.

प्रमोद सहस्रबुद्धे

प्रमोद

यशवंतराव चव्हाण

प्रमोद जी ~

"याबाबत राजकारणी लोकांवर संशय न घेणे हे मला कठीण वाटते."

~ या विचाराला, मला वाटते, दंगलीची पूर्वपिठीका लक्षात घेतली तरच ठोस रूप येऊ शकेल. ज्या काळात तसेच परिस्थितीत दंगल [याचे प्रकार एकापेक्षा अधिक असतात] घडली त्या मागची कारणमीमांसा शोधणे गरजेचे असते आणि मगच आपण थेट [बेधडक म्हणत नाही] त्या त्या वेळेच्या राजकारण्याकडे बोट दाखवू शकू.

उदा. गुजरात दंगल. नरेन्द्र मोदींवर त्याबाबत संशय घ्यावा वा न घ्यावा यावर आजही अगदी सुप्रीम कोर्टात ते ते वकील टेबलवर मुठी आदळत पुराव्यांची पाने फडफडवत आहेत. या मुद्द्यावर केवळ गुजराथच नव्हे तर अन्यत्रही खुले मतदान घेतले तर मोदींच्या बाजूने तसेच विरुद्ध जाणार्‍या मतांची लक्षणीय असेल.

पण गांधीहत्येनंतर राज्यात उसळलेली दंगल. होय, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात याचा जाणवण्याइतपत उद्रेक झाला होता. सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर आदी भागात आजही चटका बसलेल्यापैकी कुणी ज्येष्ठ आजोबा हयात असतील तर ते त्याबाबतीतल्या आठवणी सांगायला पुढे येतात. पण विश्वास ठेवा, कुणीही 'अमुक एका नेत्याच्या शिकवणीवरून समाजकंटकांनी आमच्या मालमत्तेचे नुकसान केले' असे म्हणत नाही. ज्या कारणावरून तो भडका उडाला होता ते कारणच इतके धक्कादायक होते की त्यातून निर्माण झालेल्या चिडीसाठी "ऐरा नाही तर गैरा तरी झोडपून काढा" ही मनोवृत्ती बळावली. कोणत्याही ब्रॅण्डच्या केरोसिनची गरजच नव्हती असा त्या काळातील मौखिक इतिहास सांगतो.

राहता राहिला श्री.यशवंतराव चव्हाण यांचा त्या काळातील अशा घटनांतील सहभाग.
मुळात यशवंतराव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर फलंदाजीसाठी उतरले ते साल होते १९४६, सातार्‍याचे आमदार म्हणून. त्यावेळी हे राज्य 'बॉम्बे प्रेसिडेन्सी' या नावाने ओळखले जात होते आणि मा.बाळासाहेब खेर मुख्य मंत्री [त्यावेळेचा शासकीय हुद्दा होता प्रोव्हिन्सचे प्राईम मिनिस्टर]. १९४८ च्या गांधीहत्येच्या वावटळीत यशवंतराव चव्हाण कोणत्याही खात्याचे मंत्री नव्हते. त्यांचे स्थान होते ते फक्त गृहखात्याचे सचिव [त्यावेळी या पदाला थेट 'सेक्रेटरी' असेच म्हणत. 'सचिव' हे पदरूप तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या शब्दकोशाच्या टांकसाळीत अजून तयार झाले नव्हते.]

दंगलीच्या काळात [म्हणजे जे काही नुकसान व्हायचे ते झाल्यावर] यशवंतरावांनी फक्त आपल्या मतदारसंघात आमदार या नात्याने नव्हे तर आपल्या भागातील लोकांना भेटणे गरजेचे आहे असे वाटल्याने भेटी दिल्याचे सातार्‍याचे अधिकृत गॅझेट सांगते. [याबाबतचा त्यांचा आणि भाई माधवराव बागल यांचा पत्रव्यवहार कराडच्या कै.वेणूताई चव्हाण स्मृती ग्रंथालयात अभ्यासकांना पाहण्यास मिळतो].

बाळासाहेब खेरांनीच दंगलग्रस्तांना आवश्यक ते [प्रथम मदत, नंतर वित्तपुरवठा] साहाय्य केले. अजूनही केले असते पण दंगलीचे तसेच नुकसानीचे पडसाद दिल्ली दरबारी नोंदविले जाणे क्रमप्राप्त असल्याने ते कशाप्रकारे आणि कोणत्या भाषेत टंकले गेले असतील ते फक्त त्यावेळेचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे होम मिनिस्टर मोरारजी देसाई आणि दिल्लीतील कैलाशनाथ काटजू या दोघांत राहिले. काटजू आणि पं.नेहरू यांच्यात जे काही गुफ्तगू झाले असेल ते असो पण त्याची परिणती बाळासाहेब खेरांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले आणि कुणीही सक्षम "मराठा लॉबी" चा उमेदवार [स.का.पाटील होते पण ते स्वत:ला कधी मराठी माणूस म्हणवून घेतही नसत.] नसल्याने नव्याने निर्माण झालेल्या महाराष्ट्र-गुजराथ [कागदोपत्री आता 'बॉम्बे स्टेट] द्वैभाषिक राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून साहजिकच मोरारजी देसाई यांची निवड झाली आणि त्यानी मग यशवंतराव चव्हाण याना अन्नधान्य पुरवठा खात्याचे कॅबिनेट मिनिस्ट्रर बनविले. साल होते १९५२.

इथून खर्‍या अर्थाने महाराष्ट्राला मुंबईत 'यशवंतराव चव्हाण' नावाचा एक मंत्री आहे आणि ते राज्यातील जनतेला धान्यवाटपासाठी योग्य ते प्रयत्न करणार आहे हे उमजले. 'मिलो' आणि रेशनिंगचा रस्ता व्यापक अर्थाने सुरू झाला तो तिथून. पुढील "संयुक्त महाराष्ट्र चळवळ" आणि 'मुंबईसह झालाच पाहिजे' ह्या घडामोडीवर इथे लिहिण्याचे काही प्रयोजन नाही कारण तो इतिहास इथल्या सर्वच 'उपक्रमी' ना तोंडपाठ असेल. मोरारजी देसाईंच्या काळात यशवंतरावांना स्वतंत्र असे काही निर्णय घेणे अवघडीचे वाटत असणार यात संदेह नाही, कारण गुजराथी मंडळी आणि मराठी मंडळी यांच्यात पसरलेले संशयाचे धुके, जे १९६० पर्यंत दाटच राहिले होते. मात्र १ मे १९६० नंतर नव्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यानी जे काही आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक निर्णय घेणे जरूरीचे होते ते लागलीच घेतले, त्यापैकी "ती कर्जमाफी". अशा स्थितीत गांधीहत्या दंगलीत "प्रोव्होकेशन" साठी त्या वेळचे राजकारणी [इररिस्पेक्टिव्ह ऑफ् पार्टी टॅग्ज्] असतील असे म्हणणे त्यांच्या कार्याचा अधिक्षेप होईल.

अजूनही बरेच लिहिण्यासारखे आहेच, पण सध्या आपल्या समोर जो विषय आहे त्याच्या अनुषंगाने इतपत दप्तर ठीक वाटते मला.

संयुक्त महाराष्ट्र

पुढील "संयुक्त महाराष्ट्र चळवळ" आणि 'मुंबईसह झालाच पाहिजे' ह्या घडामोडीवर इथे लिहिण्याचे काही प्रयोजन नाही कारण तो इतिहास इथल्या सर्वच 'उपक्रमी' ना तोंडपाठ असेल.

हा इतिहास थोडाफारच माहीत आहे. शाळेत असतांना अत्रेंच्या 'कर्‍हेचे पाणी'चा एक खंड (क्रमांक आठवत नाही) वाचल्याचे स्मरते. पण त्यातही सकापाटील, मोरारजी देसाई यांच्यावर अत्र्यांनी भाषणातून टिका केली होती एवढेच ठाऊक आहे. अत्र्यांना एवढी भाषणे हशा आणि टाळ्यासकट कशी लक्षात राहत याचे आश्चर्य वाटते.

जाऊ द्या अशोकराव..

अशोकराव,
ती घटना उत्स्फूर्त होती आणि तिला कोणत्याही राजकीय नेत्यांची चिथावणी नव्हती, असे ऍबसोल्यूट विधान होऊ शकत नाही कारण दंगा उत्स्फूर्त असता तर त्याचे पडसाद एकाचवेळी देशाच्या विविध भागांत (किमान मराठी ब्राह्मण जिथे जिथे आहेत तिथे) उमटले असते. पण अगदी महाराष्ट्रातही चारपैकी ३ विभाग (कोकण, मराठवाडा, विदर्भ) शांत राहिले. (त्यावेळी मुंबई इलाखा व संस्थानी मुलूख अशी विभागणी होती, हा संदर्भ ध्यानात आहे.)
ज्यांनी नजरेसमोर घर जळताना पाहिले त्यांना जाळणार्‍यांची नावेही माहित होती. चिथावणी देणारे राष्ट्रीय पातळीवरील नेते नसले तरी एका पक्षाचे स्थानिक पातळीवरील प्रभावी कार्यकर्ते होते आणि त्यातील अनेकजण पुढे प्रस्थापित पुढारी झाले. आजही जुन्या पिढीतील लोकांना तो तपशील चांगलाच ठाऊक असेल. मुद्दा हा आहे, की आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्या घटना समोर पाहिलेली पिढी अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. ज्या नेत्यांचा आपण उल्लेख केलात त्यांच्यापैकी कुणीही हयात नाही. अरविंदराव बालवयात का होईना, पण घटनेचे साक्षीदार आहेत, मात्र तुम्ही, मी व उपक्रमावरील बहुसंख्य प्रतिसादकर्ते हे दुसर्‍या व तिसर्‍या पिढीतील आहेत/असावेत.

वादाला इथेच पूर्णविराम द्या, अशी स्नेहपूर्वक विनंती करतो. तुम्ही चांगले वाचक आहात, आता तुमच्यातील लेखक बाहेर येऊ द्यात.

(मराठी संकेतस्थळांवरील भांडणे बघता मन उद्विग्न होते. बेरजेच्या राजकारणावर वाद घालताना पुढे वजाबाकीचे राजकारण नको व्हायला, ही तळमळ. अर्थात काळ घडवेल ते मान्य)

धन्यवाद

मी लिहिलेल्या मुद्याबद्दल अधिक लिहिले याबद्दल धन्यवाद.

यशवंतरावांच्या बद्दल अधिक माहिती कळाली, आणि त्या माहितीमुळे त्यांच्यावरील आरोप (असल्यास) थोडा बोथट होतो. विशेषतः त्यांनी या दरम्याने केलेल्या कामांमुळे (आपण उल्लेखिलेला पत्रव्यवहार.) त्यांच्या वरील आरोपांची धार थोडी जास्त बोथट होते.

हा दंगा किती दिवस चालला हे माहित नाही. पण जास्त दिवस चालला असेल तर उत्स्फुर्ततेकडून तो योजनाबद्धतेकडे सरकतो. या बद्दलही वाचायला आवडेल.

प्रमोद

कारण

ज्या कारणावरून तो भडका उडाला होता ते कारणच इतके धक्कादायक होते की त्यातून निर्माण झालेल्या चिडीसाठी "ऐरा नाही तर गैरा तरी झोडपून काढा" ही मनोवृत्ती बळावली.

कुठल्याही दंगलीचे समर्थन करण्यासाठी अशी विधाने वापरली जातात असे वाटते. अशा प्रकारची उथळ विधाने गुजरात दंगलींनंतरही ऐकावयास मिळाली होती. अशोक यांनी गांधी-हत्येनंतरच्या हिंसेचे समर्थन केले आहे असे सूचित करायचे नाही, हे कृपया ध्यानी घ्यावे. मात्र अशा प्रकारच्या विधानांमुळे नकळतपणे 'चीड येऊन केलेली सामुहीक हिंसा घृणास्पद नाही' या युक्तिवादाला बळकटी मिळते.

**या चर्चेतून काही चांगली सामाजिक निरीक्षणे बाहेर येतील असे वाटले होते परंतु तसे काही होईल असे सध्या वाटत नाही.**

_____
अनेकदा प्रतिसाद संपादन करण्याचे समर्थन: I was working on the proof of one of my poems all the morning, and took out a comma. In the afternoon I put it back again. - Oscar Wilde.

आता विषय निघालाच आहे तर -

श्री. अशोक पाटील म्हणतात -

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात याचा जाणवण्याइतपत उद्रेक झाला होता. सातारा, सांगली, मिरज, कोल्हापूर आदी भागात आजही चटका बसलेल्यापैकी कुणी ज्येष्ठ आजोबा हयात असतील तर ते त्याबाबतीतल्या आठवणी सांगायला पुढे येतात.

-याचे कारण या भागाची ऐतिहासिक, वैचारिक आणि समाजिक पार्श्वभूमी होय.
१. कृष्णे-पंचगंगेचे पाणी जिथून वाहते त्या काळ्या, कसदार मातीच्या खोर्‍यात असंख्य जमिनी 'स्वतः न कसणार्‍या' ब्राह्मणांच्या (कुलकर्ण्यांच्या) मालकीच्या होत्या.म्हणजे हे लोक जमिनींवर स्वतः कष्ट न करता इतरांकडून त्या कसवून घेत. पण पश्चिम महाराष्ट्रात केवळ ब्राह्मणच जमीनदार होते असेही नाही. शिवाय ही जमिनदारी देशाच्या इतरही अनेक भागात सुरू होती. (बंगाल, आंध्र ही ठळक उदाहरणे.)
२. पश्चिम महाराष्ट्रात ब्राह्मणेतर समाज (विशेषतः उच्चवर्णीय) देशाच्या इतर भागांच्या मानाने सधन आणि इंग्रजी पद्धतीचे ज्ञान घेतल्याने पुढारलेला होता.(पुणे आणि सातारा या पूर्वसत्ता/शैक्षणिक केंद्रांची जवळीक.) या समाजाच्या पुढार्‍यांना काँग्रेस पक्षावरील ब्राह्मणांचे वर्चस्व मान्य नव्हते.
३. कोल्हापुरात सत्यशोधक समाजाच्या (केशवराव जेधे- दिनकरराव जवळकर) विचारसरणीला अवलंबणारे अनेक नेते अस्तित्त्वात होते. त्यांना ब्राह्मणी विचारसरणी मान्य नव्हती. (याचेच एक रूप छ. शाहू महाराज आणि लो. टिळक यांच्यात भास्करराव जाधव,अण्णासाहेब लठ्ठे व प्रो.म.गो.डोंगरे यांनी माजवलेला वेदोक्त/पुराणोक्त वाद - करवीर पीठ शंकराचार्य इ. होते.)तसेच मार्क्सवादी विचारसरणीचे भाई माधवराव बागल यांचाही कोल्हापुरात दबदबा होता.
४. कुंडल - ताकारी इ. जुन्या दक्षिण सातारा जिल्ह्यातील गावात प्रति-सरकार स्वरूपातील सशस्त्र आंदोलनांचा चांगलाच जोर होता. त्यामुळे नाथा लाड, नागनाथ नायकवडी, रत्नापा कुंभार, बापू लाड आदि ब्राह्मणेतर या (त्यावेळी) तरुण रक्ताच्या क्रांतिकारक नेत्यांना जनसामान्यांचा बराच पाठिंबा होता.

या आणि अशा धुमसत्या कारणांचा परिपाक म्हणून म. गांधींच्या हत्या एका ब्राह्मणाने केली हे कारण पुढे करून ही हिंसक कारवाई झाली. हा नथुराम गोडसे कोण ते या भागातील 'समस्त'(;)) ब्राह्मणांना त्याआधी माहीतही नसेल. इतकेच नव्हे तर यातील बहुसंख्य ब्राह्मण या जळीतानंतरही आजन्म काँग्रेसचे मतदार राहिले.(माझ्या आजोबांना तर वयाच्या ऐंशीव्या वर्षीही 'काँग्रेसला मत देऊ नका' असे सांगितले तर राग येत असे.)

...
-थोडक्यात यशवंतराव चव्हाणांचा या जळितात हात होता असे म्हणता येत नाही. केवळ ते कराडचे होते आणि पुढे काँग्रेसचे प्रमुख नेते बनले म्हणून ते याला जबाबदार मानता येत नाही.

पुन्हा चु.भू. द्या. घ्या.

अवांतर : माझ्या आजोबांकडून ऐकलेला किस्सा : किर्लोस्करवाडी तर कुंडलपासून केवळ ४ कि.मी. अंतरावर आहे. किर्लोस्करवाडीचा कारखाना जाळायला आलेल्या मंडळींनी बरोबर पेट्रोलचा टँकरच आणला होता. (शंतनुराव किर्लोस्कर जमावाला सामोरे गेले आणि त्यांनी "तुमचाच कारखाना.. जाळताय तर जाळा पण उद्यापासून कामावर कुठे जाल? पैसे कसे मिळवाल?" असा प्रश्न विचारला तेव्हा जमाव पांगला वगैरे उल्लेख केले जातात.) आतली गोष्ट अशी की शंतनुरावांनी श्री. मोरारजींमार्फत पंतप्रधान पं. नेहरूंना फोन लावला. तेव्हा नेहरूंनी ताबडतोब चक्रे हालवून कि. वाडीत मिलिट्री आणली. ती तेथे १ महिनाभर होती.
(टीप : माझे आजोबा ३/४ आयुष्य कि.वाडीत रहात होते. तसेच रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कै.श्री.भाऊराव पाटील काही काळ कि.वाडीत कामाला होते.इ.इ.)

इतिहासाची पाने चाळता

सलग तीन दिवस खात्याच्या कोर्ट केसीसमध्ये गुंतलो असल्याने इच्छा असूनही 'उपक्रम' वर प्रत्यक्ष भाग घेऊ शकलो नव्हतो [भोजनवेळे दरम्यान कोर्टाशेजारी असलेल्या टाऊन हॉल येथे जाऊन जालीय-वाचनमात्र होतो हे आवर्जुन सांगितले पाहिजे, त्यामुळे विचाराच्या चक्रांनाही काही प्रमाणात वंगण मिळाली. असो.]

@ सन्जोप राव
"आपले लिखाण वाचताना मला माझ्या आवडत्या एका लेखकाच्या शैलीची आठवण येते."
~ जर आपली अंगुली धारवाडच्या कडेमनी कंपाऊंडकडे निर्देश करीत असली तर त्यात माझा किती मोठा सन्मान तुम्ही करीत आहात याची खुद्द तुम्हालाच जाणीव व्हावी असे म्हणेन. मी स्वतः त्या लेखकाचा किती जबरदस्त चाहता आहे हे सांगण्यासाठी मला धाग्यावर धागे काढावे लागतील आणि तरीही त्यांच्या लिखाणातील 'जीवघेण्या' जादूचा पुसटसाही स्पर्श माझ्या अल्पस्वल्प लेखन-धाटणीला होऊ शकणार नाही हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. (तरीही या अकृत्रिम कौतुकाबद्दल मी मनःपूर्वक आभार मानतो.)

@ क्रेमर (१)
आचार्य अत्रे यांची मुलुखमैदान तोफ आजकालच्या चॅनेल्सच्या भाषेत बोलायचे तर २४*७ विविध विषयावर गरजत असे आणि त्याना विषयांचेही काही वावडे होते असे नाही. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे ते तापलेले दिवस होते आणि 'मुंबई' आमच्यापासून हिरावून घेतली जाण्याच्या शक्यतेने समिती पक्षीय मतभेद बाजूला ठेवून एक दिलाने काम करीत होती आणि जनतेच्या संतापाला जे धुमारे फुटत होते त्याचे शब्दरूप 'नवयुग' 'मराठा' मधून प्रतिदिनी अत्र्यांच्या लेखणीतून बरसत असे. लोकही [अगदी शेतकरी-कामकरी पासून ते लब्धप्रतिष्ठित गणला गेलेला वर्गही] अगदी कामधाम बाजूला ठेवून अत्रे काय म्हणतात याची अधाशासारखी वाट पाहत हा इतिहास आहे. जबरदस्त स्मरणशक्ती, प्रचंड वाचन आणि समूहाची अतोनात नशा या त्रिफळेचे चूर्ण अत्र्यांना अन्य कोणत्याही घटकांपेक्षा प्रिय होते. त्यामुळेच ते सांगत असलेल्या भल्याबुर्‍या कोणत्याही गोष्टीवर वाचक चटदिशी विश्वास ठेवत असे, किंबहुना ते त्याला हवेहवेसे वाटे.

राजकारणी तर राहू देत, पण मर्ढेकर, दुर्गा भागवत, चि.त्र्यं.खानोलकर, भाऊ पाध्ये, दि.पु.चित्रे आदी आधुनिक साहित्याकडे वाचकाला नेऊ पाहणारी मंडळीही त्यामुळे अत्र्यांच्या रोषाला पात्र झाली होती. 'मराठा' सारखे ताकदवान आणि दूरगामी परिणाम करू शकणारे दैनिक हाताशी असल्याने अत्र्यांच्या लिखाणाला कसल्याही सेन्सॉरच्या कात्रीची गरजच नव्हती. माधव जूलिअनसारखा हळवा कवी माणूस अत्र्यांच्या वाग्बाणाने विव्हळ होऊन पुणे सोडून विजनवासात गेल्यासारखा झाला होता. [वेगळा विषय आहे हा]

@ योगप्रभू
"आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे."
नक्कीच. अगदी वादातीत मुद्दा आहे. खरं सांगायचं तर या दोन धाग्यावर चर्चिले जाणारे विषय + शिवाजीनंतर + सावरकर + हिंदुत्व + जातीय श्रेष्ठत्वाच्या कल्पना + काश्मिर + पाकिस्तान + काळा पैसा + राजकारण अशा तत्सम विषयांना जालीय दुनियेवर कधीही 'हे राम' म्हणावे लागणार नाही की काय असेच वाटू लागले आहे. होते असे की, लक्ष द्यायचे नाही असा निर्णय घेतला तरी कुठेतरी केव्हातरी असा काही एक मुद्दा पटलावर येतो की मग त्याविषयी स्वतःजवळ अधिकृत माहिती असेल तर ती देणेही निकडीचे वाटते. तसे करण्यामागील भावना "पेटला आहेच तर चेतवू या परत हा वन्ही" अशी कधीच असत नाही, पण अजाणतेपणी काहीवेळा घडते तसे हे मान्य करायला हरकत नाही. पण तुमचा आपुलकीचा सल्ला मात्र मनी कोरून ठेवला आहे इतपतच या क्षणी तरी म्हणू शकतो.

@ क्रेमर (२)
"'चीड येऊन केलेली सामुहीक हिंसा घृणास्पद नाही' या युक्तिवादाला बळकटी मिळते."
~ समाजशास्त्रीय दृष्टिकोणातून या विधानाकडे पाहिल्यास केलेल्या/झालेल्या सामुहिक हिंसेची आपल्याला हवी तशी शल्यचिकित्सा करून आपण केले तेच किती योग्य असा टिळा मिरविण्याचा सोस असलेली जी मंडळी असतात त्याना या युक्तिवादाची गरज असू शकते असे मला वाटते. स्वातंत्र्यपूर्व काळात वा त्यानंतर झालेल्या हिंसासाराच्या घटनांचे विश्लेषण आता आपण हाती असलेल्या अनेक पुराव्याच्या आधारे करून त्याचा लसावि काढू शकतो. पण इसापनितीतील त्या लांडग्याला ते कोकरू खायाचेच असल्याने मग त्याने जसे 'हे पाणी तू नाही तर तुझ्या बापाने घाण केले होते' असा स्वतःच आरोप करून मग परत स्वत:च न्यायाधिश होऊन बकर्‍याच्या हत्येचे न्यायदानही करून टाकले, त्याचप्रमाणे 'नथुराम हा आरएसएसचा असो वा नसो, पेपरात आलेलं खरंच असणार मग ज्या अर्थी तो आरएसएसचा त्याअर्थी समस्त खाकीचड्डीवाले गांधीबाबांच्याविरूद्ध' हा प्रमेयही समाजकंटकांच्यादृष्टीने सोयिस्कर सुटला. 'पण आता नथुराम तर आपल्यासमोर नाही आणि हातातील पलिता तर फुरफुरतोय, तो तसाच कृष्णा-पंचगंगेच्या पाण्यात टाकायचा ? नाही ना ? मग आहेतच की डझनावारी घरे आपल्या गावात शाखेच्या इसमांची. चला तिकडे.' ही सामुहिक गर्दीची हिंसेचा मानसिकता. हे जरूर मान्य की, अशा टोळकीचा एखादा तरी प्रमुख असतो पण त्याचा मगरूर त्याच्या तिठ्ठ्यापुरताच सीमित असतो. [जाळपोळीच्या मागे 'वतनदारी' चा काटा हा एक मुद्दा आहेच; पण त्यासाठी वेगळ्या धाग्याची गरज लागेल इतका तो स्वतंत्रविषयव्याप्तीचा आहे.]

"ऐरा नाही तर गैरा" चे दुसरे उदाहरण म्हणजे सीमाप्रश्नावरून १९६९ मध्ये बेळगांव आणि कोल्हापूर पेटले होते त्याचे देता येईल. कर्नाटकातील सौंदत्ती हे गाव 'यल्लमा देवी'च्या वस्तीने भाविकाच्या दृष्टीने तिर्थयात्रेचे ठिकाण. राज्याच्या विविध भागातून दरसाली जुन-जुलैमध्ये लक्षावधी मराठा आणि इतर बहुजन समाजातील भाविक एस.टी.च्या स्पेशल गाडीनी सौन्दत्तीला जात असतात आणि तसाच लक्षावधी रुपयांचा कररूपी महसूल कर्नाटक सरकारलाही मिळत असल्याने त्यांचे सार्वजनिक वाहतूक खातेही प्रवाशांची छान व्यवस्था तिथे करत असते. पण १९६९ मध्ये या प्रथेला डाग लागला आणि सीमाप्रश्नाचे भांडवल करून कन्नडवेदिकेने [शिवसेनासम बंगलोरची लोकसंघटना, जी आजही कार्यरत आहे] कोल्हापूरच्या गाड्या नेमक्या टिपून त्यातील यात्रेकरूंना बेदम मारहाण केली. ती बातमी इथे येऊन थडकल्यानंतर सीमाग्रस्त संघटनेने स्थानिक शे.का. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने एकजुटीने शहरातील तमाम कन्नड/कामत/म्हैसुरी हॉटेल्सची बेफाम जाळपोळ केली. सेंट्रल बस स्टेशनवर जथ्याने जाऊन तिथे आगारात असलेल्या कर्नाटक राज्य परिवहन बसेसची नासधूस करण्याचा त्यांचा मानस होता, पण तेथील सुरक्षा अधिकार्‍यांनी वेळीच पोलिस बंदोबस्त तिथे आणल्याने त्या बसेसना काही नुकसान पोहोचले नाही. "ठकास महाठक" या उक्तीप्रमाणे सामुहिक उद्रेकाची ही प्रक्रिया एकवेळ मुद्द्यांच्या समर्थनार्थ आपण मान्य करू या. पण झाले असे की, अनावर आणि उन्मत झालेल्या त्या जमावाला कर्नाटक बसेस जाळता न आल्याची रुखरुख होती ती त्यानी त्या परिसरात असलेल्या 'सोळंकी आईसक्रिम' च्या देखण्या दुकान मालिकेला पेटवून शमविली. वास्तविक भांडण होते ते कर्नाटकी वृत्तीविरूद्ध पण हाती समोर आले ते 'राजस्थाना'तून कोल्हापूरात वर्षानुवर्षे स्थायिक झालेले कोल्हापूरकरांना चवीच्या आईसक्रिमची सवय लावणारे मितभाषी 'सोळंकी' परिवार ज्यांचा या सीमावादाशी कसलाही संबंध नव्हता. पण इथे ती उक्ती 'ऐरा नाही तर गैरा' लागू झाली. जी गांधीवधाच्यावेळीही प्रचलित होती.

@ विसुनाना

~ रा.शाहू महाराजांच्या कारकिर्दीत संस्थानी जनतेच्या मनावर सत्यशोधक समाजाच्या विचारसरणीचा प्रभाव पडणे नैसर्गिकच मानावे लागेल. शिवाय मुंबई-पुण्यानंतर उच्च शिक्षणाच्या अनेकविध सोयीसवलती या संस्थानिकांनी आपल्या प्रजेला सवलतीच्या [मागासजातींसाठी तर राहणेजेवणासह मोफत] दरात शिक्षणाची जी उपलब्धता निर्माण करून दिली होती तिचाच परिपाक म्हणजे जेधे-जवळकर-विठ्ठल रामजी शिंदे-बागल आदी अनेक पुरोगामी विचारांच्या पुढार्‍यांना स्थानिक पातळीवर मिळालेला पाठिंबा होय.

संस्थानी बहुजनी समाजाला ब्राह्मणी विचारसरणी सरसकट अमान्य होती असे म्हणणे त्या विचारसरणीचाच अपमान केल्यासारखे होईल. महालक्ष्मी अंबाबाईच्या देवळात आजही ब्राह्मणाने दिलेलाच प्रसाद इथल्या भक्तजनाकडून सश्रद्ध ग्रहण केला जातो हे त्या विचारसरणीचेच फलीत आहे. कोणतेही मंगल कार्य ब्राह्मणाच्या उपस्थितीशिवाय इथला कट्टर मराठाही करत नाही. 'विचारसरणीला विरोध' होता तो 'मी म्हणेल ते शास्त्र' ह्या हट्टाला. अन् तोही अत्यंत अपमानस्पदरितीने समजावून सांगण्याच्या तर्कटाला. 'महाराज तुम्ही शूद्र असल्याने तुम्हाला वेदोक्ताचा अधिकार नाही' असे त्या पहाटे खुद्द स्व:त आंघोळ न केलेल्या नारायणभटाने ज्या वर्णवर्चस्वाच्या जोरावर सांगितले ते संस्थानाच्या राजाला अपमानस्पद वाटले तर ते अनैसर्गिक कसे मानता येईल ? त्यावेळी तर नदीघाटावर महाराजांच्या समवेत बागल नव्हते, भास्करराव जाधव वा लठ्ठे नव्हते तर जवळ होते खुद्द राजारामशास्त्री भागवत यांच्यासारखे विद्वान ब्रह्मज्ञ. आणि जर भागवतांनीच जर नारायणभटाला पुरोणोक्त म्हणण्यापासून रोखले तर मग त्यात मराठ्यांना कसा आणि कोण दोष देणार ?

पुढचा इतिहास न उगाळण्यातच शहाणपणा आहे. कारण मग वेदोक्तातून पुढे येते ते 'ताईमहाराज प्रकरण आणि टिळक'....परत तीच यात्रा इथे करावी लागेल.

तरीही या लेखाच्या निमित्ताने आपण या भागाची केलेली वास्तपुस्त आनंददायी वाटली हे म्हणावेच लागेल. धन्यवाद.

अशोक पाटील

समारोप आवडला

चर्चाप्रस्तावाचा उत्तम समारोप. धन्यवाद.

+१

उत्तम आणि समतोल समारोप. विसुनानांचा प्रतिसादही आवडला.

 
^ वर