जाळपोळ आणि बेरजेचे राजकारण
श्री.अरविंद कोल्हटकर यानी 'तीन आठवणी' या लेखात काही हृदयस्पर्शी आठवणी सांगितल्या आहेत त्याचे सर्वच उपक्रमींनी स्वागत केले असल्याचे दिसतेच, शिवाय अशाच धर्तीच्या आठवणी इतरांनीही लिहाव्यात असे प्रियालीताई यानी सुचविलेही आहे. एकप्रकारे या निमित्ताने जुन्या आठवणींच्या तलावात डुंबायला सर्वांनाच भावते हे तिथे प्रतित झाले असून लिखाणाचा तो एक चांगला प्रकारही मानायला हरकत नाही. पण या निमित्ताने मला तिथल्या काही विचार/प्रतिक्रिया क्लेशदायक वाटल्या. खरे तर त्याबद्दल तिथेच प्रतिसादात लिहिणे योग्य ठरले असते पण का कोण जाणे काही बाबींविषयी तिथे लिहिणे म्हणजे तो धागा भरकटून टाकल्यासारखे होईल, म्हणून मनी जे आले आहे ते स्वतंत्र धाग्याच्या रूपाने इथे द्यावे असे वाटले, म्हणून हा प्रपंच.
लेखात श्री.कोल्हटकरांनी
"ह्या हत्येबाबत सर्व ब्राह्मण समाजाला उत्तरदायी मानून त्यांची घरे जाळण्यासाठी ही उत्तम सबब आहे आहे काही समाजकंटकांनी ठरविले." असा उल्लेख केला ते ठीक झाले. अन्यथा त्या घटनेचे उत्तरदायित्व एकजात सार्या 'ब्राह्मणेतेरां' वर टाकण्याची थोर परंपरा सांप्रत महाराष्ट्रदेशी आहे ती तशीच 'मागील अंकावरून पुढे चालू..." सम राहिली असती. गांधीहत्या आणि नंतरच्या घडामोडीवर वा त्यांच्या सध्याच्या जालीय भाषेतील 'अकौन्ट् सेटलिंग" बाबत धाग्यावर, त्याचे स्वरूप पाहता, भाष्य अपेक्षित नाही हे जरी खरे असले तरीदेखील या निमित्ताने त्या घटनेच्या दूषित छाया चर्चेत उमटणे नैसर्गिक मानतो.
"सारे मुसलमान अतिरेकी नाहीत पण सारे अतिरेकी मुसलमान आहेत" या न्यायानुसार गांधीहत्या-जाळपोळ कांडातील सहभागी असलेले सारे ब्राह्मणेतर होते हे मान्य, पण याचा अर्थ सारे ब्राह्मणेतर त्या कांडात सहभागी होते असा जो एक छुपा अर्थ त्यातून ध्वनीत होतो तो संतापजनक आहे. कोल्हटकरांच्याच लेखात त्या वस्तीत त्यांच्यासकट फक्त ३-४ घरे ब्राह्मणांची होती असा उल्लेख आला आहे, याचा अर्थ असा की, जाळपोळ चालू असताना 'पोलिस आले' असा हाकारा करणारी ती व्यक्ती कुणी ब्राह्मणेतरदेखील असण्याची शक्यता नाकारता येत नाही, तसेच नंतर ओळ लावून ती आग विझवण्यासाठी ओढ्यातून पाण्याच्या पखाली घेऊन जे हात पुढे आले ते काय केवळ तीन ब्राह्मणांचेच होते ? गुंडांच्या सामुदायिक उन्मादाला जसे ब्राह्मण पुढे गेले नाहीत तद्वतच त्या (आणि तशाच अनेक) वस्तीतील ज्येष्ठ ब्राह्मणेतर पुढे गेले नाहीत हे जितके सत्य तितकेच हेही सत्यच की अशा प्रसंगी त्यानंतर त्याच ब्राह्मणांची घरे वसविण्यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून वस्तीतीलच ब्राह्मणेतर पुढे आले होतेच, हे ज्याना प्रत्यक्ष झळ पोचली तेदेखील अमान्य करीत नाहीत. कोल्हापूर येथील मेहेन्दळे बंधूंचे 'हरिहर विद्यालय', भालजी पेंढारकरांचा 'जयप्रभा स्टुडिओ' तसेच सखारामपंत रानडे यांचे प्रसिद्ध 'क्षुधा शांती भवन' या उद्रेकात सापडली होती जवळपास वास्तू नष्टही झाल्या होत्या पण नंतर त्यांच्या पुनर्बांधणीत जे हात पुढे आले त्यांची शिरगिणती त्यानी आपापल्या आठवणीत केली आहेच, त्याचा गरजूंनी शोध घेतल्यास त्या नावावरून इनसायडर्स किती अन् आऊटसायडर्स किती होती याचाही लेखाजोखा सापडेल.
२. श्री.कोल्हटकर आपल्या लेखात पुढे लिहितात : "द्वैभाषिक आले आणि यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. माझ्या तेव्हाच्या आठवणीनुसार नव्या सरकारने जे अगदी पहिलेपहिले काही निर्णय घेतले त्यांमध्ये जळित कर्जाची बाकी माफ करण्याचा निर्णय होता. यशवंतरावांचे बेरजेचे राजकारण असे होते."
~ काय याचा अर्थ ? कसले आले आहे इथे बेरीजवजाबाकीचे राजकारण ? असले वाक्यप्रयोग या देशात सुरू झाले ते १९७५ च्या आणीबाणी कालखंडानंतर. त्या अगोदर तर महाराष्ट्रात कॉन्ग्रेसचा एक छत्री कारभार होताच होता. अगदी मैलाचा दगड जरी उभा केला तरी मतदार उमेदवाराचे नाव न पाहता प्रथम 'बैलजोडी' नंतर 'गायवासरू' पाहून त्यावर शिक्का मारीत होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळी अत्रे-डांगे प्रभृतीनी उभ्या केलेल्या तुफानातही समिती सत्तेवर येऊ शकली नव्हती. मग यशवंतरावांना दॅट् सो-कॉल्ड् बेरजेच्या राजकारणाची कसलीही गरज नव्हती. द्वैभाषिक राज्याबरोबरच मोरारजी देसाईंचा इथला प्रभाव संपल्यानंतर जे काही स्वतंत्रपणे निर्णय घेणे गरजेचे होते त्यानुसार जळीत कांडात सापडलेल्या संबंधितांची कर्जे माफ करण्याची ती एक घोषणा. इतकेच त्याचे महत्व. [तसे झाले म्हणून राज्यातील तो समस्त ब्रह्मवृंद कॉन्ग्रेसच्या मागे टाळमृदंग घेऊन लागला असेही झाले नाही, शिवाय अनेक आर्थिक धोरणात्मक निर्णयासारखाच सरकारचा, एकट्या यशवंतराव चव्हाण यांचा नव्हे, तो एक निर्णय.]
राज्यात "बेरजेचे राजकारण" करतात ते फक्त 'शिवाजी' हे नाव घेऊनच. आम्हा ब्राह्मणेतरांवर या नावाची पखरण टाकली की आम्ही मग टाकणारा तो झिया उल् हक असला तरी त्याच्यामागे मेंढरागत जाणार ! ही मेन्टॅलिटी ओळखणार्यांनी आपल्या स्वार्थासाठी पुरेपूर उपयोग करून घेतला आहे असाच या राज्याचा राजकीय इतिहास सांगतो. बाळासाहेबांनी सेना स्थापन करताना नावात 'शिव' ऐवजी 'गोळवलकर' घातले असते तर त्या पक्षाचा जितका विस्तार झाला तितका झाला असता का असा मुद्दा पटलावर आला असता तर काय उत्तर निघेल ?
बेरजेचे राजकारण असेलच तर ते असते सत्तेसाठी सामान्यांना मूर्ख करणे. शे-पाचशे जळीत कर्जे माफ करून यशवंतरावांनी खतावणीत कसली बेरीज मारली असणार ?
३. "युद्धानंतरचे ते दिवस रेशनिंगचे होते आणि आम्हाला रेशनमध्ये 'मिलो' -ज्याला लोक विनोदाने 'मेलो मेलो' म्हणत - नावाचा तांबडा जोंधळा मिळत असे आणि त्याच्या बेचव भाकर्या हे आमचे मुख्य खाणे असे."
~ या वाक्यातही एक ट्विस्ट आहे. 'आम्हाला रेशनमध्ये 'मिलो' नावाचा तांबडा जोंधळा मिळत असे." यातून आजचा युवक/युवती [ज्याना त्या काळातील् रेशनिंग स्थिती माहीत् नाही] वरील गांधीहत्या+जाळपोळ वाचून असा अर्थ काढू शकते की, 'आम्हाला' म्हणजे ब्राह्मण लोकांना आणि मग इतरांना यशवंतराव 'शाळू' वाटत होते की काय ? वस्तुस्थिती अशी होती की झाडून सार्या राज्यातील जनतेला रेशनिंगवरचा हा कोंडामिश्रीत मिलो घेणे भाग होते. त्यात त्या वेळेच्या परिस्थितीनुसार शिधावाटप पद्धतीत वावगे काहीच नव्हते. मी तर असे म्हणेन की, रेशनिंगमुळे का होईना ब्राह्मणांना 'मिलो' नावाचा ज्वारीचा एक प्रकार असतो याची तरी किमान माहीती तरी झाली; जो बाकीची तमाम जनता बारा महिने चोवीस तास खात असते आणि त्यांच्यासाठी पोळी म्हणजे सणासुदीचा एक प्रकार.
Comments
+१
असेच म्हणते.
+१
अशा चर्चा उपक्रमावर योग्यप्रकारे चालू शकतात याचा उत्तम नमुना. धन्यवाद!
आभार
-सहमत आहे. संस्थानी बहुजनी समाजाला ब्राह्मणी विचारसरणी सरसकट अमान्य होती असे मीही म्हणत नाही.