माझा प्रवास

माझा प्रवास

विष्णुपंत गोडसे गुरुजी यांनी १८५७ साली उत्तर हिंदुस्तानाचा प्रवास केला होता. याबद्दल त्यांनी मोडीत लिहून ठेवले होते पण कुणास दाखवण्याचा धीर झाला नव्हता. साधारण १९०० सालच्या सुमारास त्यांनी आपले हस्तलिखित दाखवले. चि.वि.वैद्य यांनी ते १९०७ साली प्रकाशित केले. नॅशनल डिजिटल लायब्ररीत ते येथे उपलब्ध आहे.

मराठीतील हे एक महत्वाचे पुस्तक आहे. शंभर उत्तम पुस्तकांमधे याचा समावेश म.टा. ने केला होता (अशी माझी आठवण आहे.).
आत्मचरित्रात्मक कथनातील एक महत्वाचे पुस्तक, १८५७ सालच्या हकिकतीवर (एकमेव?) प्रत्यक्ष दर्शी मराठी लिखाण अशी त्याची ओळख करून देता येईल. लेखकाचा मोकळेपणा या पुस्तकाच्या वाचनातून जाणवतो.

मराठी पुस्तके साठी या पुस्तकाची निर्मीती करण्याचे काम बरेच दिवस चालू होते. निर्मितीकरण करणार्‍यांच्या अडचणीतून हळू हळू हे पुस्तक मार्गी लागले. हे पुस्तक नेहमीप्रमाणे पीडीएफ आणि एचटीएमएल दोन्ही पद्धतीने देण्याचा विचार होता. पण वेळेवर एचटीएमएल तांत्रिक कारणाने जमले नाही. मराठी पुस्तके मधे हे पुस्तक इथे मिळेल. नेहमीप्रमाणे मुद्रितशोधनाचा प्रयत्न केला आहे. चुका आढळल्यास कळवावे (कुणी चुका दुरुस्त करणार असतील अशा मदतीची आम्हाला गरज आहे.). मूळ पुस्तकाप्रमाणे काही शब्द अर्धवट सोडून दिलेले आहेत. मोडीत लघुकरण करताना कित्येक शब्द समजण्यापर्यंत काही अक्षरे लिहून नंतर दोन दंड लिहिण्याची पद्धत पूर्वी होती. त्याच पद्धतीत हे टंकिले आहे.

मराठी पुस्तके साठी बुद्धचरित्र भाग एक आणि दोन लेखक धर्मानंद कोसंबी सध्या जवळ जवळ तयार आहे. काही दिवसात ही दोन पुस्तके जालावर येतील.

पुस्तकातील काही उतारे येथे देत आहे. मूळ पुस्तक वाचण्यास प्रेरणा मिळावी म्हणून.

समयी ते सिपाई बोलूं लागले. एक सिपायाचे वय ५० सीचा सुमार होता व एक ३५ साचा सुमार होता. दोहोंपैकी वृद्ध सिपाई याणे बोलण्यास आरंभ केला. इंग्रज सरकार आजदिनपर्यंत राज्य चांगल्या रीतीने करीत आले. परंतु थोडे दिवसावर सरकारची बुध्धी नष्ट जाहाली आहे. कारण गुदस्त साली म्हणजे पाचचार महिन्यावर सुमारे विलायतेकडून काही चमत्कारिक बंदुका म्हणजे कडामिनी, तुबुक अशा तर्हेचच्या हिंदुस्थानात पाठविल्या. त्या बंदुकास गोळी सुमारे जांभळा एवढी लागते. त्याही गोळ्या विलायतेहून इकडे आल्या, त्या बंदुका व गोळ्या पाहून सिपाई लोकांस आनंद जाहला. कारण पहिल्या बंदुकापेक्षा दोनसे कदम गोळी जास्त जात्ये. याकरिता सर्व हिंदुस्थानात बंदुका वाटल्या गेल्या व त्या बंदुकाकरिता काडतुसे तयार विलायतेस करून इकडे सर्व छावण्यांतून पाठविली. ती काडतुसे दातांनी तोडून कार्य करावे लागते. हिंदुस्थानात कलकत्त्यापासून चार कोसावर दमदम म्हणून जे छावणीचे मोठे ठिकाण आहे, तेथे काडतुसे करण्याचा कारखाना सुरू केला आहे. तेथे येक गोष्ट अशी घडली की, कोणी एक ब्राह्मण सिपाई येके दिवशी येका तळ्यावर पाणी भरीत होता, तेथे एक चांभार येऊन त्याजपासी त्याचा लोटा पाणी प्यावयास मागू लागला. तेव्हा ब्राह्मण सिपाई याणे त्याला सांगितले की, मी जर आपला लोटा तुजपासी दिला तर तो विटाळेल, म्हणून तो माझ्याने देववत नाही. ते ऐकून तो चांभार त्यास म्हणाला अहो, तुम्ही जात जात म्हणोन फार उडया मारू नका. आता जी नवी काडतुसे करीत असतात, त्यास गाईची व डुकराची चरबी लावितात. आणि ती चरबी स्वता आपले हातानी काढून देतो. आणखी ती काडतुसे तुम्हाला दातांनी तोडावी लागणार, मग तुमचे सोंवळे ते कोठे राहिले. उगाच रिकामा डौल कशास पाहिजे. असे होता होता दोघे हातपिटीस आले. त्यांची मारामार चालली तेव्हा आसपासचे लोक बहुत जमले. त्यांनी झालेला सर्व वृत्तांत ऐकिला.

काही दिवसानी मोरोपंत तांबे यांचे कुटुंब कैलासवासी जाहाले. ते समई झासीवाली राणी ही मुलगी वयानी पाच चार वर्षांचा सुमार असावा. पुढे तांबे याणी ती मुलगी वाढीवली. दुसरे घरात माणूस नव्हते. नेहमी होमशाळेत बापाबराबर येऊन तेथेच खाणेपिणे सर्व बापाबराबरच श्रीमंताकडे होत असे. मुलीस बालबद व मोडी लिहिण्याचा अभ्यास चांगला ठेविला होता व ती मुलगी लहानपणी फार अचपळ असे. बापाची लाडकी असे. कारण तांबे यांस या मुलीसिवाय दुसरे अपत्य कन्या किंवा पुत्र नव्हते, आणि तिची आई कैलासवासी जाहालेली. ही कन्या पोरकी सबब वाड्यांतील सर्व मंडळी त्या मुलीचे लाडच करीत असत, आणि मुलगीही फार हुषार व निर्मळ, शाहाणी गौर वर्णाची, अंगानी कृष व उफाट्याची उंचीची उभारणी चांगली असे. नाक सरळ, कपाळ उंच व डोळे कमलपत्राप्रमाणे वाटोळे असून मोठेमोठे व कान मुखाला शोभा देणारे असे असून मध्यभाग कंबर शरीराचे झोकाप्रो। बारीक होती. असी मुलगी पित्याचे घरी दिवसेदिवस वाढत असता वरवर्णिनी जाहाली. दाहा अकरा वर्षांची जाहाली. विवाह करावा तर स्थळाची योजना होईना. कराडे ब्राह्मण ब्रह्मावर्ती थोडे होते सबब तेथे

गरीब गरिबाच्या मुली सुरूप चांगल्या गोत्रासी पडणार्या. अशा बहुत पाहिल्या, परंतु कोठे जमेना. याचे कारण गंगाधर बाबा राजा हा लौकिकात आठ प्रकारचे षंढ आहेत, त्या प्रो। हा राजा षंढ आहे. गंगाधर बाबाचे आचरण असे होते की, आपले वाड्यात माडीवर दोहोचोहो रोजी पुरूष वेष टाकून स्त्रीचा वेष घ्यावा. पैठणी नेसून जरीकाठी चोळी अंगात घालीत असे. मस्तकावर शेंडी फारच मोठी राखिली होती व काही कृत्रिमी केश लावून सुगंधी तेले लावून वेणी घालीत असे. कधी सर्व वेणीतील नग घालून पाठीवर सोडलेली असे. कधी खोपाही वेणीस असे. मूद वगैरे अलंकार सर्व घालीत असे. गळ्यात मोत्याचे पेंडे व गुजराथी ठुसी वगैरे गळसर्या हि घालून सरी व मोहराची माळ कंठा व मोत्यांच्या माळा घालून हातात गोट पाटल्या व बांगड्या व नाकांत नथ व पायांत तोडेजोडवी वगैरे सर्व स्त्रियांचे अलंकार जडावाचेसु॥ घालून स्त्रियाबराबर बोलणी वगैरे करीत असे. अशा कारणावरून गरीब लोक असा वर पाहून देणे त्यापेक्षा मुलीस पाण्यात लोटणे हे चांगले असे बोलत. काही लोक असे म्हणत की, आठ प्रकार षंढात आहेत त्यापो। हा असावा. शास्त्रांत आठ प्रकारच्या लखणापूर्वक व्याख्या आहेत त्यापो। सचेतन पुरुषाचे सिस्न हातात धरून खेळ केला म्हणजे त्या षंढास चेतना व्हावी हा एक प्रकार त्यातच आहे. हा प्रकार या राजास असावा. आणि हेच खरे, कारण प्रथम स्त्रीला येक पुत्र जाहाला होता. ती स्त्री व्यभिचारणी नव्हती, पतिव्रता साध्वी होती असे सर्व सांगतात. याजवरून राजा पुरूष आहे, असे गरीब लोक म्हणणारे त्याचे गोत्रासी व टिपणासी पडूं नये. हा राजा बहुत करून महिन्याचे महिन्यास स्त्रियासारखा एकीकडे बसून अस्पर्श दशा तीन दिवस भोगून चवथे दिवसे नाहाणाचा समारंभ मोठा करीत असे. नाहाणे जाहाले म्हणजे पलंगावर निजून पलंगाखाली अग्नी ठेवून केश वाळवीत असे. असे वेडे वेडे चाळे जरी करीत होता, तरी राज्य संमधे नोकरीचे मनुष्यास व रयतेस जरब फार ठेविली होती. न्यायानी विचारपूर्वक नीतीने राज्य चालविले होते. साहेब लोकात सतेजपणे महत्वीने आपला मोठेपणा सांभाळून राहात असे.

तात्यांनी कानपूर सर केले
कानपुरावर गंगातटात धूस बांधून म्हणजे वाळूच्या गोण्या पोती भरून कोटासारख्या शास्त्राप्रमाणे रचून व्यूह बांधून आंत गोरे लोकांची पलटणे होती. त्याणी त्या धुसाचा आश्रय करून लढाई माजवीत असत. बाहेरून काळे लोक लढत असत. परंतु त्यांचा धूस तोफांनी तुटेना. बहुत दिवस लढाई सुरूच होती. तों हे सिंदे सरकारचे मुरारीवरचे छावणीचे लोक गेले हेही बहुत लढले, तथापि कानपूर हाती येईना. इकडे श्रीमंत नानासाहेब यांचेमार्फत व्यूह कोणत्या आंगानी फोडावा याजबो। नेपाळी ब्राह्मण अनुकूल करून त्यास पाच साहाशे रू॥ देऊन कानपुरास आणून त्यास सर्व तेथील धूस दाखविला. त्याणी सांगतल्याप्रो। तोफांचे मोर्चे बांधून तोफांचा भडमार चालता जाहाला. आतूनही तोफा व कडामिनीचे बार होऊ लागले. बिगूलादि वाद्यें वाजूं लागली. रणधुमाळी सुरू जाहाली. वीर येकमेकांस मोठाल्या आरोळ्या देऊ लागले. ते समई विषसंमधी गोळे धुसात टाकीत चालले. तेणेकरून आतील सर्व लोक त्रस्त होऊन डोळे फुटून मनुष्य तडफडून स्वर्गाचा रस्ता धरू लागली. काळे लोक नाकसबी. सबब हे सर्व विषाचे गोळे तेथेच खर्च जाहाले आणि गोरे लोक बहुधा मरण पावले व काही गंगेकडील बाजूनी बाहेर पडले, हे काळे लोकांनी धरून कैद केले. या युद्धांत बाळासाहेब पेशवे स्वता मोरच्यावर जाऊन तोफेस बत्ती देत होते. ईश्वराने जय दिल्हा. कानपूर हस्तगत जाहाले व गोरे लोकांचे सर्व

ब्रह्मावर्ती कत्तल व लूटमार
श्रीमंत गंगापार गेल्यावर तिसरे दिवसी सकाळी चार घटका दिवसास ब्रह्मावर्ती हाला सुरू जाहाला. क्षेत्रामध्ये गोर लोक येताच सडकबिज्यन सुरू केले म्हणजे क्षेत्राचे रस्त्यावर जो पुरुष सापडेल त्यास मारावा. याप्रमाणे बहुत लोक मारले गेले व गोरे घरांत सिरून रूपे व सोने सापडले तेवढे लुटून नेले व जेथे जेथे त्यांस संशय आला तेथे तेथे भूमी व भिंती खणून अर्थ काढून घेतला. याखेरीज त्या प्रसंगात काही लोकांनी घरांतील अर्थ काढून आपले कंबरेस बांधून रस्त्यानी ध्रुवघाटाकडे जाऊ लागले. तो गोरे किंवा काळे लोकांची भेट जाहाली म्हणजे त्याणी तो अर्थ घ्यावा. गोरेकाळे कोणी ज्यास भेटले नाहीत त्यांचा अर्थ गांवलुटारू, गंगापुत्र वगैरे दांडगे लोकानी अर्थ लुटावा. याप्रो। क्षेत्रांत दंगा माजून राहिला. मग तेथील प्रजेचे दुःखास पारावार नाहीसी जाहाली. ब्रह्मावर्ती त्या दिवसी बारा वाजत तेथपर्यंत गोरे लोकांची सोने रूप्याचीच लूट जाहाली. नंतर क्षेत्रांतून गोरे श्रीमंतांचे वाड्यात गेले. इकडे क्षेत्रांत मंद्राजी काळे लोकांनी भांडेकुंडे चीजवस्तु, चिरगुट कपडे वगैरे तमाम सर्व जिनसांची लूट सुरू केली. तो दिवस सायंकाळपर्यंत लुटीचा होऊन दुसरे दिवसी

गोर्‍या बायकास आश्रय
रात्रौ गारदन साहेब येकटाच निघोन वाड्यापासी येऊन पहारेकरी यांस कळविले की, लक्षुंबाई साहेबांची आताच समक्ष भेट घेणे आहे तर माझी भेट करावी. त्याजवरून बाईसाहेबांस कळविले नंतर बाईसाहेब स्वता येऊन साहेबास खुर्ची बसण्यास देऊन आपणही बसल्या.
नंतर गारदन साहेबानी असे सांगितले की, आमचे काही होवो परंतु आमच्या बायकांचे संरक्षण आपले हातून जाहाले पाहिजे. माझी बायको नाजुक फार आहे तिजसारखी या हिंदुस्थानात इरोपीन लोकांच्या बायका आहेत यांत असी सुरूप नाजुक व चातुर्य दुसरी बायको नाही. तशात ती गरोदर सात महिन्यांची आहे, यास्तव आपण आपले घरी वाड्यात ठेवावी. आपले घरी भांडी घासील, दळणकांडणही करील. परंतु तिचा जीव रक्षण करावा. या उपर मजला सांगणे नाही. असे ऐकून बाईसाहेबांनी उत्तर केले की, मी होता होईपर्यंत संरक्षण करीन. तुम्ही काळजी करू नये. असे सांगोन बाईसाहेब उठोन गेल्या. साहेबही उठोन आपले गोटात गेला. दुसरे दिवसी सकाळी सात वाजता गोरे लोकांच्या बायका तेथे होत्या तितक्या निघोन बाईसाहेबांचे वाड्याजवळ आल्या. ही खबर बाईसाहेबांस लागताच येक जागा रिकामी पाहून तेथे कैद करून सर्व मुले बायका पाहर्याेत ठेविल्या.

शत्रुक्षय व्हावा, राज्य चांगल्या रीतीने चालावे सबब नवीन अनुष्ठानेही चालू केली होती. श्रीमहालक्ष्मीस रोज नवचंडी सुरू होती. ग्रहाबो। जप व दाने जेव्हाचे तेव्हा देत होते. श्री गणपतीचे देवालयात रोज सहस्त्र आवर्तनेही सुरू होती.

काम्य ग्रहयज्ञ
सरकारात काम्य ग्रहयज्ञ गृह्यपरिशिष्टोक्त करण्याबो। ठराव जाहाला. तो सहस्त्रपक्ष ठरला, त्याजबो। कुंडमंडप करण्याबो। ही ठराव जाहाला. पुढे जागा शोध करून कुंडे व वेदी वगैरे सर्व तयारी जाहाली. रोज ब्राह्मण होमाकडे शंभर नेमिले होते. अशा ग्रहयज्ञाचे समारंभात ब्राह्मणही मोठे मोठे कासीकर वगैरे बाहेर गांवचे ऋत्विज्य काही नेमिले होते.

लेखनविषय: दुवे:

Comments

धन्यवाद.

पुस्तक वाचवे असे कुतुहल निर्माण झाले आहे, धन्यवाद. आमीर खानच्या मंगल पांडे वरील सिनेमात पहिल्या उतार्‍यात् दिलेला प्रसंग जवळजवळ असाच आहे हे पाहून आश्चर्य वाटले!

-Nile

+१

हेच लिहायला आलो होतो. आमिर च्या पिक्चर् मध्ये फक्त् तो चर्मकार् मनाही तर् दलित समाजातील पात्र म्हणून दाखवलाय.
लेख उत्तमच्. उपक्रमावर ह्यापूर्वी त्याकाळात् प्रवास केलेल्या एका भटजीच्या लिखाणाबद्दल् बरीच चर्चा झाल्याचे स्मरते आहे.
बहुतेक ती चर्चा गोडसेंसंदर्भातच असावी.

एक शंका:- कानपूर् तात्या टोपे- उठावकर्‍यांनी जिंकल्याबद्द्ल लिहिले आहे. गोर्‍या स्त्रियांबद्दल लिहिले आहे, पण मग कानपूरला नदीकाठी झालेल्या प्रचंड हत्याकांडाबद्दल् काहिच कसे दिसत नाहिये? ती तर महत्वाची घटना आहे ना?
--मनोबा

यापूर्वी उपक्रमावर झालेली चर्चा

गोडसेंच्या माझा प्रवासवर यापूर्वी उपक्रमावर झालेली चर्चा येथे वाचा. माझ्याकडे हे पुस्तक इमेज (.टीफ) स्वरूपात आहे. कुठून उतरवलं होतं ते आठवत नाही. :-(

धन्यवाद

पुस्तकाचा दुवे तसेच काही भाग येथे दिल्याबद्दल धन्यवाद. 'प्रो।' हे नेमके काय आहे. आजूबाजूच्या शब्दांवरून अंदाज लावता येतो. (दुव्यावरील पिडिएफ प्रतितही हे अक्षर? दिसले)
__________
"Do not argue with an idiot. He will drag you down to his level and beat you with experience" - सहकार्‍याच्या दारावरील वाक्य कोणाचे ते माहीत नाही.

प्रो|

प्रो | म्हणजे 'प्रमाणे' असावे. लघुकरण करताना पहिले अक्षर आणि शेवटचा स्वर लिहिला गेलेला दिसतो.
मोडीत लघुकरणाच्या अशा प्रथा असाव्यात. शब्द अंदाजाने लावावे लागतात पण अंदाज फारसा चुकीचा येत नसावा.

प्रमोद

जसे सो| म्हणजे साहेब

आण्णासो| (दुसरा काना) म्हणजे आण्णासाहेब होय.

मोडी लघुकरण

हो. मोडी लिखाणात असे अनेक लधुकरण आढळतात. सु|| प्रो||, ता|| ब|| इत्यादी. संदर्भावरून पूर्ण शब्दाचा अंदाज लावता येतो.
गोडसे भटजींचे मूळ हस्तलिखित भारत इतिहास संशोधन मंडळात आहे. त्यांनी ती सुरेख स्कॅन करून ठेवली आहे. गोडसेंचे अक्षर सुरेख आणि सुवाच्य होते. गंमत म्हणून त्याचा एक नमूना:

धन्यवाद

हा प्रतिसाद न वाचताच खालचा प्रतिसाद टंकला होता. या लघुकरणांची यादी कुठे उपलब्ध आहे काय? नसल्यास उपक्रमींनी हे काम हाती घ्यावे असा एक कृतीशील विचार चमकून गेला पण लगेच त्याला झटकून टाकले.

वरसईकर गोडसे भटजी

यांचे माझा प्रवास हे पुस्तक बर्‍याच वर्षांपूर्वी मुंबई विश्वविद्यालयात मराठी विषयासाठी नेमलेले होते. ते बाळबोध लिपीत होते. हे गोडसे भटजी पूर्वीच्या कुलाबा व आताच्या रायगड जिल्ह्यातल्या वरसई गावचे. मला वाटते विनोबाजींच्या गागोदे ह्या गावी जाताना हे वरसई गाव लागते. ते बहुधा पेण तालुक्यात असावे. पुष्कळांना ते 'वसई' वाटते,पण ते नाव 'वरसई' असे आहे .वसई ठाणे जिल्ह्यात येते. अभ्यासक्रमात असल्याने या पुस्तकाची समीक्षणे आणि रसास्वाद उपलब्ध होते. त्यावरून आणि एकूण पुस्तकवाचनावरून यात वर्णिलेला इतिहास फारसा विश्वसनीय नसावा असे मत झाले होते. त्या काळातल्या मराठीचे वळण अभ्यासण्यासाठी त्याचा समावेश अभ्यासक्रमात झाला असावा.

असे का?

त्यावरून आणि एकूण पुस्तकवाचनावरून यात वर्णिलेला इतिहास फारसा विश्वसनीय नसावा असे मत झाले होते.

विश्वसनीय नसावा असे का म्हणता ते अधिक विस्ताराने सांगता येईल काय? गोडसे भटजींनी अर्थातच हे पुस्तक एखाद्या इतिहासकाराच्या नजरेने किंवा उद्देशाने लिहिलेले नसावे. त्यात सांगोवांगीच्या कथाही येत असाव्या पण तसे ते इतर अनेक लिखाणांतूनही जाणवते. या खेरीज काही मुद्दे असावेत का?

विश्वसनीयता

हे पुस्तक इतिहासकाराच्या नजरेतून लिहिले गेलेले नाही हे उघड आहे. १८५७ च्या युद्धाचा कार्यकारणभाव आणि विस्तृत पट लक्षात येण्याएव्हढा गोडसे भटजींचा आवाका नव्हता. ते एक याज्ञिकी करणारे साधे भिक्षुक होते आणि त्या दृष्टीनेच त्यांनी ह्या आठवणी लिहिल्या आहेत. बर्‍याच वेळा गॉसिप् वाचत आहोत असे वाटत राहाते.शिवाय प्रवास आटपून ते आपल्या गावी परत आल्यावर बर्‍याच काळानंतर या आठवणी त्यांनी लिहिल्या. दैनंदिन नोंदी नसल्यामुळे स्मरणावर अवलंबून लिहावे लागले. त्यामुळे अचूकता कमी झाली.
हे पुस्तक बर्‍याच काळापूर्वी वाचले असल्याने आता नेमके उतारे अथवा प्रसंग यांचे संदर्भ देणे कठिण आहे.
त्यावेळी काय मत झाले होते ते मात्र आठवते. नजीकच्या भविष्यकाळात जर ते पुन्हा वाचनात आले तर नेमके लिहिता येईल.

अलिप्तता

मी कागदी पुस्तक वाचले आहे. त्याच्या प्रस्तावनेत माझ्या आठवणीत ते एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस किंवा विसाव्या शतकाच्या सुरुवातीस (घटनेनंतर सुमारे ५० वर्षांनी) लिहिले गेले होते. ऑथेण्टिक इतिहास नाही हे तर उघड आहे.

परंतु त्या पुस्तकातली युद्धाबाबतची 'अलिप्तता' माझ्या मनाला स्ट्राइक झाली होती.

किंवा दुसर्‍या शब्दात सांगायचे तर जे युद्ध चालले आहे ते 'आपल्यासाठी' वगैरे असल्याची कसलीच जाणीव लेखनात दिसत नाही. १८५७ चे युद्ध हे स्वातंत्र्यसमर नसल्याच्या मतास पुष्टिच मिळाली होती.

*अतिअवांतर: हे पुस्तक अंतुले यांनी स्थापन केलेल्या प्रतिभा प्रतिष्ठानने प्रकाशित केले होते.

नितिन थत्ते

असेच काहीसे

अगदी असेच काहीसे लिहावयाचे मनात होते.
ह्या धामधुमीचे ऐतिहासिक महत्त्व भारतीयांच्याही लक्षात फार उशीराच आले.
(इंग्रजांना मात्र त्याचे गांभीर्य तात्काळ कळले आणि त्यांनी राणीच्या जाहीरनाम्याद्वारे ईस्ट् इंडिआ कंपनी रद्द करून हिंदुस्तानचा राज्यकारभार ब्रिटिश सरकारच्या हाती सोपवला.) त्या काळात ती एक धामधूमच मानली गेली. विष्णुपंत गोडसे तर बोलून चालून भिक्षुक. ब्रह्मावर्ती यज्ञयागादि काही कार्ये निघाली(तशी ती तेव्हा निघतच होती) तर त्यात भाग घेता येऊन काही थोडेफार कनवटीस लावता येईल एव्हढाच मर्यादित उद्देश या प्रवासामागे त्यांचा होता. आपण बरे की आपले काम बरे या वृत्तीने ते राजकीय रणधुमाळीचा अन्वयार्थ लावण्याच्या भानगडीत पडले नसावेत. शिवाय आठवणी त्यांनी लगेचच लिहिल्या नाहीत. मात्र ते या आठवणी अत्यंत मनोरंजक रीतीने सांगत फिरत असत.स्वतः श्री चिन्तामणराव वैद्य हे इतिहासाचे उत्तम जाणकार होते.त्यांच्या कानावर ही हकीकत गेली आणि त्यांनी पाठपुरावा करून त्या पूर्णपणे लिहवून घेतल्या, असे काहीसे वाचल्याचेही स्मरते.

आठवणी आणि गप्पा/वदंता

पुस्तकात भटजींच्या वैयक्तिक आठवणी आहेत तशाच गप्पा/वदंता आहेत. बहुतांश प्रत्यक्षदर्शी कथनांमध्ये याची सरमिसळ नेहमीच पाहायला मिळते. माझ्या मते इतिहासकारांच्या दृष्टिने हे लिखाण टाकावू नसावे. (पुस्तकाचा संदर्भ दिलेले इतिहासकारांचे लिखाण वाचायला मिळते.)
गप्पा आणि वदंता या देखिल इतिहासकारांच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टी असतात. उदा. काडतुसांची गोष्ट ही गप्पा स्वरुपातून सर्वत्र पोचली. अणि मग असंतोष झाला. तेव्हा अशा गप्पांना ऐतिहासिक महत्व आहे. ज्या ठिकाणे त्या आठवणी आहेत (आठवणी कुठल्या आणि गप्पा कुठल्या हे पुस्तक वाचल्यावर बर्‍याच अंशी कळते.) त्या ठिकाणी त्यांचा पुरावा म्हणून उपयोग होऊ शकतो. भटजी असल्याने त्यावेळी कुठले यज्ञ केले, काय व्रतवैकल्य केली या आठवणींना ऐतिहासिक मूल्य येऊ शकते. (या यज्ञांचा/व्रतांचा कुठला चांगला परिणाम झाला असे पुस्तकात आढळत नाही.)

पुस्तक बर्‍याच वर्षांनी लिहिले, दैनंदिनी बाळगली नव्हती (किंवा दैनंदिनी प्रकाशित केली गेली नाही.) हे कदाचित खरे असेल. पण पुस्तक बर्‍याच वर्षांनी लिहिले यास फारसा पुरावा नसावा. पुस्तक उशीरा प्रकाशित झाले एवढेच.

प्रमोद

पुरावा

>>पुस्तक बर्‍याच वर्षांनी लिहिले यास फारसा पुरावा नसावा.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत तसे लिहिलेले आहे. गोडसे भटजी त्यांच्या नातवंडांना अनेक गोष्टी सांगत असत तेव्हा त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी विनंती केली की तुम्ही हे लिहून का काढत नाही.? ही गोष्ट सन १९०० +/- ची असल्याचे प्रस्तावनेत म्हटले आहे. पुस्तकाचे प्रकाशन तर १९८५-९० दरम्यान झालेले आहे.

दुरुस्ती: अरेच्चा !! सहस्रबुद्धे यांनी दुवा दिलेले पुस्तक मी वाचलेले नाही. [आणि पीडिएफ दुव्यात प्रस्तावना नाही :-( ]ते १९०७ मध्ये प्रकाशित झालेले दिसते. मी वाचलेले पुस्तक पुनःप्रकाशित झालेले असावे.

नितिन थत्ते

होय

होय. १९८५-९० मध्ये ते पुनःप्रकाशित झाले असणार कारण मी ते त्याआधी वाचल्याचे आठवते. त्याला तुम्ही म्हणता तशी प्रस्तावना होती.

थेट पुरावा

राजकीय घटनांचा थेट पुरावा म्हणून या पुस्तकाकडे पाहाता येणार नाही व म्हणून राजकीय इतिहास किंवा इतिहास या दालनात हे पुस्तक बसू शकत नाही. पण पूरक इतिहास म्हणून त्याकडे बघता येईल. म्हणजे त्या काळची शिष्टमान्य संस्कृती, रूढी,रीतीभाती, (शिष्टमान्य) सामाजिक प्रथा,समजुती या विषयीचे आकलन या पुस्तकाद्वारे होऊ शकेल.

वाचावेसे वाटले.

पुस्तक वाचण्याची इच्छा निर्माण झाली.

धन्यवाद

हे पुस्तक वाचायला वेळ मिळेल का नाही कल्पना नाही, पण धर्मानंद कोसंबींचे पुस्तक वाचायला आवडेल.
तेही जालावर आल्यावर जरूर कळवावे. धन्यवाद.

भटजींच्या वरील उतार्‍यांमधील काही वर्णने (उदा. मनु तांबे हिचे वर्णन) काव्यामधील नायिकेकडे झुकणारे (मधली कंबर बारीक वगैरे!) वाटले. बाकी गंगाधरपंतांचे वर्णनही अतिरंजित वाटले. अशा राजाबरोबर मनुचे लग्न का करून दिले असेल असे वाटते.

म्.टा. ची यादी

"शंभर उत्तम पुस्तकांमधे याचा समावेश म.टा. ने केला होता (अशी माझी आठवण आहे.)."

~ होय. साधारणतः १९८५ वा ८५ च्या दरम्यान म.टा. ने हा उपक्रम राबविला होता. फार गाजलीही होती त्यावेळेची ती चर्चा. सर्वश्री विजया राजाध्यक्ष, शंकर सारडा, सरोजिनी वैद्य, प्रल्हाद वडेर आदी नामवंत [अजूनही असतील पण खात्री नाही] मंडळी त्या निवडीत होती. १०० नव्हेत १५० पुस्तकांची ती यादी दोन टप्प्यात जाहीर झाल्याचे स्मरते. पहिल्या यादीत 'माझा प्रवास अथवा सन १८५७ सालच्या बंडाची हकिगत - विष्णूभट गोडसे' अशा नावाने आताच्या चर्चेतील पुस्तक नोंदविले गेले होते.

१५० नावे प्रसिद्ध झाल्यावर त्यावेळी म.टा.वर प्रतिक्रियेंचा (साहजिकच) अगदी पाऊस पडला होता, त्यातही 'अमुक एक पुस्तक यादीत का नाही?" हा प्रश्न अगदी ऐरणीवरचाच ठरला. 'गीतारहस्य', 'व्यासपर्व', '१८५७ चे स्वातंत्र्यसमर', 'बनगरवाडी', 'श्रीमान योगी' आदी दमदार नावे वगळली गेल्याबद्दल नापसंतीचा सूर तीव्र होता. मग परत एक महिन्यानंतर संपादक मंडळाने वरच्या १५० मध्ये नव्याने २७ पुस्तकांचा समावेश केला आणि मगच हे 'यादी प्रकरण' थंडावले.

आवडते पुस्तक!

गोडसे भटजींच्या पुस्तकाबद्दल लिहावे तितके कमीच आहे! त्यांच्या हस्तलिखिताची, आणि ती छापून कशी आली, तिचा वेगवेगळ्या लेखकांनी कसा वापर केला आहे त्याचा इतिहासही अत्यंत रोचक आहे. वैद्यांनी १९०७ साली पहिल्या आवृत्तीत मूळ हस्तलिखितात अनेक फेरबदल केले होते. न र फाटक, आणि नंतर १९६६ साली द वा पोतदार यांनी मूळ हस्तलिखित छापून प्रसिद्ध केले.

मी गेले अनेक वर्षे हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचून काढले आहे - प्रवासवर्णन, इतिहास, बखर, तीर्थाटन वृत्त, अशा अनेक प्रकारांचे ते विलक्षण मिश्रण आहे. (सध्या नंदा खरे यांचे अंताजीची बखर वाचते आहे, आणि सारखी गोडसे भटजींच्या "वर्मस् आय व्यू" ची आठवण होते. खर्‍यांना हे पुस्तक आवडत असावे असे वाटून जाते!)

काही वर्षांपूर्वी या विषयावर मी थोडेसे लिहीले होते - ते येथे आहे.
१८५७च्या एकूण साधन सामग्री मधील गोडसे भटजींच्या पुस्तकाच्या महत्त्वावर इंग्रजीतही थोडेफार येथे आहे.

(आज जरा गडबडीत असल्याकारणाने इथे गोषवारा न देता फक्त दुवे देत आहे, क्षमस्व. लेख वाचले तर उपक्रमीयांचे विचार आणि चर्चा वाचायला खूप आवडेल.)

कळवते

काही वर्षांपूर्वी या विषयावर मी थोडेसे लिहीले होते - ते येथे आहे.
१८५७च्या एकूण साधन सामग्री मधील गोडसे भटजींच्या पुस्तकाच्या महत्त्वावर इंग्रजीतही थोडेफार येथे आहे.

वेळ मिळाला की (किंवा वेळ काढून) नक्की वाचून कळवते. :-)

फेरबदल

"वैद्यांनी १९०७ साली पहिल्या आवृत्तीत मूळ हस्तलिखितात अनेक फेरबदल केले होते"

~ रोचना, बहुतेक असे असणार नाही. मूळ मोडीवरून लिहिताना शब्दमांडणीदृष्टीने काही आवश्यक बदल असले तर तेवढेच बदल श्री.वैद्य यानी केले आहेत असे प्रस्तावनेवरून दिसते. ते (वैद्य) म्हणतात, "कोठे कोठे भाषा अलिकडच्या रितीने लिहीली आहे, तसेच काही ठिकाणी मजकूर अधिकचा (कदाचित् द्विरूक्ती म्हणायचे असेल) वाटला तो कमी केला आहे. एकंदरीत बहुतेक सर्व ग्रंथच मूळचा आहे असे म्हटले तरी चालेल."

तुम्ही म्हणता तसे अनेक फेरबदल केले असतील तर मूळ मोडीतील "माझा प्रवास" वाचूनच मग ते ठरविता येईल असे वाटते.

(अवांतर : उपक्रमवरील एक सदस्य श्री.विश्वास कल्याणकर मोडी शिकलेत असे येथीलच एका लिंकच्या वाचनावरून समजले. ते आज इथे ऍक्टिव्ह असतील तर ते कदाचित यावर ज्यादाचा प्रकाश टाकतील.)

वैद्य

खरेतर वैद्यांनी नमूद केल्या पेक्षा बरेच जास्त फेरबदल केले होते. आणि ते मोडी-बाळबोधीकरणापलिकडचे होते. त्यांनी काही मजकूर गाळला, काही स्वतः घातला, एक परिच्चेद मोडून दुसर्‍यात घातला, वगैरे. तसे त्यांनी का व कसे केले, याचेच मी दुवा दिलेल्या मराठी लेखात विवेचन करायचा प्रयत्न केला आहे.

वैद्य द. ब. पारसनिस यांच्या बरोबर काम करत असताना त्यांनी हे हस्तलिखित मिळवले होते, आणि पारसनिस यांनी गोडसे भटजींच्या लिखिताचा वापर त्यांच्या लक्ष्मीबाई चरित्रात वापर करून घेतला होता. त्याचा आणि गोडसे भटजींच्या संहितेचा इतिहास निगडितच आहे. भटजींच्या संहितेचा उल्लेख पारसनिस नाव घेऊन करत नाहीत, पण त्याचे ठसे चरित्रात स्पष्ट दिसतात. पण जेव्हा हस्तलिखितच वैद्यांनी छापले, तेव्हा ते "सुधारणास्तव" चरित्रातला काही मजकूर त्यांनी गोडसेंच्या कथानकात घातला. १८५७ च्या इतिहासाबद्दल, त्याला साजेचे, विश्वसनीय साधन सामग्री व स्रोत यांबद्दल त्यांचे काही विशिष्ट विचार होते. ब्रिटिश दृष्टीकोनातून बंडाबद्दल तयार झालेल्या प्रचंड दस्ताइवजासमोर एक विश्वसनीय भारतीय "आय विटनेस" स्रोत त्यांना पुढे ठेवायचे होते, आणि यास्तव त्यांनी ते संपादन करताना "सुधारले".

या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा मी चूक किंवा गोची असे न ठरवता , तत्कालीन आधुनिक भारतीय इतिहासलेखन पद्धती आणि साधन चिकित्सा, साधन हाताळणीच्या गुंतागुंतीचीच एक झलक आपल्याला दिसते, असे मला वाटते. (लेख जरा लांबलचक आहे खरा, पण तो वाचल्यास माझ्या मुद्द्याची जास्त ठळक कल्पना येईल, इथे मी घाईघाईत नीट मांडू शकत नाहीये!)

लेख

थॅन्क्स ~~ सविस्तर खुलाशाबद्दल

"लेख जरा लांबलचक आहे खरा"

~ जरूर वाचतो. या निमित्ताने अधिकचे वाचनही होऊन जाईल.
मी जे वर लिहिले आहे, ते वैद्यांच्याच प्रस्तावनेवर आधारित असल्याने तेच प्रमाण मानले होते.

लेख वाचला

वैद्यांच्या दृष्टीकोनाचा गोडसेंच्या मूळ लेखनावर कसा परिणाम झाला ते समजले.
पोतदार संपादित प्रत जालावर कुठे मिळेल? हा प्रश्न उभा आहे.

पोतदार प्रतच मराठीपुस्तके.ऑर्ग् वर आहे

मराठीपुस्तके यांनी उपलब्ध केलेल्या पुस्तकाची पूर्वप्रसिद्धी, किंवा अवृत्ती-प्रत माहिती दिलेली नाही, पण प्रमोद यांनी दिलेल्या उतार्‍यांवरून ते मूळ मजकूराचेच आहे असे दिसते.

गंगाधरबाबांबद्दलच्या शंका आणि बाजारगप्पा वैद्यांनी बर्‍याच संक्षिप्त केल्या. डिजिटल लायब्ररीवरच्या आवृत्तीत त्यांनी केलेले बदल पृ.६७-६८ वर वाचता येतील. आणि मूळ मजकूर तर वर लेखात आहेच, पण चौथ्या प्रकरणाच्या सुरुवातीला "गंगाधर बाबा" च्या शीर्षकाखाली आहे.

पुस्तक वाचावेसे वाटते आहे

लेखात दिलेले देवनागरीतील लेखन मराठी असले तरी अनेकदा समजायला जड गेले.
त्यावरून अख्खे पुस्तक वाचायला मला बराच वेळ लागेलसे दिसते.

असो. या परिचयामुळे पुस्तक वाचावेसे वाटते आहे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

वाचनीय पुस्तक

काल पुस्तकाची पन्नासेक पाने वाचली. पुस्तक निर्विवादपणे वाचनीय आहे. गोडसे भटजी तर मला मराठीतील पहिले आधुनिकोत्तर लेखक असावेत असे काहीसे विचित्र वाटून गेले.

प्रो | म्हणजे 'प्रमाणे' असावे. लघुकरण करताना पहिले अक्षर आणि शेवटचा स्वर लिहिला गेलेला दिसतो.
मोडीत लघुकरणाच्या अशा प्रथा असाव्यात.

प्रथाच असावी. बो| म्हणजे बाबत, म||र म्हणजे मजकूर असे आपसूकच ध्यानात येते. सु| म्हणजे नेमके काय हे कळले नाही पण काही वेळा सोबत हा शब्द असावा असे वाटले.
__________
"Do not argue with an idiot. He will drag you down to his level and beat you with experience"? - सहकार्‍याच्या दारावरील वाक्य कोणाचे ते माहीत नाही.

 
^ वर