चित्रगुप्ताची चोपडी

त्र्यंबकेश्वरीं कालसर्पयोगाचे नारायण-नागबळी विधी करणारे तोता भट आसन्नमरणावस्थेत होते, ते निधन पावले. पापपुण्याची झाडाझडती देण्यासाठी चित्रगुप्तासमोर उभे राहिले. चित्रगुप्त म्हणाला,"माझ्या वहीतील नोंदींप्रमाणे दिसते की तू नागबळी नावाचा विधी करायला भाग पाडून एक हजार नऊशे एकसष्ठ जणांना लुबाडण्याचे मुख्य पाप केले आहेस.म्हणून तुला तेव्हढे दिवस नरकवास भोगावा लागेल. अन्य लहान सहान पापे आहेतच."
"मी हे सगळे धर्मशास्त्रानुसार केले.ते पाप कसे असेल?"
"माझ्यासमोर खोटे बोलायचे नाही.मी चित्रगुप्त आहे.त्र्यंबकेश्वराला आलेले तुझे भोळसट, श्रद्धाळू गिर्‍हाईक नव्हे. कुंडलीतील राहू-केतू बिंदू जोडणार्‍या सरळ रेषेच्या एका बाजूला सगळे ग्रह पडले म्हणजे कालसर्पयोग होतो. तो त्या व्यक्तीला घातक असतो. असे तुम्ही सांगता ते श्रुति-स्मृति-पुरा्णोक्त आहे काय ? कुंडली तरी कोणत्या धर्मशास्त्रात आहे काय ? सांग पाहू. श्रद्धाळूंना फसवण्यासाठी तुम्हीच निर्माण केलेली ही सगळी बनवाबनवी आहे.त्यासाठी शास्त्राधार मुळीच नाही"
"पण मी तिरुपती बालाजी,अष्टविनायक,आदि अनेक तीर्थयात्रा केल्या आहेत. काशीला जाऊन पर्वकाळी शुभमुहूर्तावर गंगास्नान केले आहे.सत्यनारायणव्रत तर प्रतिवर्षी करत होतो. त्यामुळे शास्त्रवचनांनुसार माझ्या पापांचे क्षालन झाले असेलच."
"हे सगळे तुमच्या मनाच्या समजुतीसाठी. खोटेनाटे सांगून लोकांना फसवल्याचे मनात खात असते ना! त्यातून थोडी सुटका मिळवण्यासाठी करावयाचे हे भ्रामक उपाय आहेत. इकडे कर्मफलसिद्धान्त सांगायचा आणि तिकडे पापक्षालनाचे उपाय करायचे.काय ही विसंगती! किती ही आत्मवंचना !! तू अनेक गरिबांनासुद्धा लुबाडले आहेस. या पापातून सुटका नाही. नरकवास भोगावाच लागेल."
"पण तो चुकवण्याचा काहीतरी मार्ग असेलच ना?" तोता भट म्हणाला.
"तो निरर्थक,निरुपयोगी नागबळी विधी अनेकांना करायला लावून तू खूप संपत्ती गोळा केली आहेस.त्या सगळ्याची नोंद माझ्या चोपडीत आहे. पण तो पैसा राहिला घरी. इथे त्याचा काही उपयोग नाही. नियमाप्रमाणे नरकात जाणे अटळ आहे."
"या नरकवासाचे स्वरूप काय असते?"
" आता आलास सरळ! पाप केले आहेस हे पटले ना? या पापासाठी सर्पनरकभोग आहे.एका मोठ्या हौदात खूप साप ठेवले आहेत.तिथे तुला एकहजार नऊशे एकसष्ट दिवस कंठावे लागतील.ते गार गिळगिळीत साप तुझ्या अंगावर सतत सरपटत राहातील.तुझ्यासारखे अनेकजण तिथे अशा नरकयातना भोगत आहेत."
" तिथे स्नानसंध्येची तरी काही व्यवस्था असेल ना?"
"स्नानसंध्या? हा ! हा! हा! सकाळी आंघोळ,पूजा-अर्चा आटोपून कपाळावर गंधाचे किंवा कुंकुमाचे टिळे लावून वरवर शुचीर्भूत होऊन पुण्यकृत्य केल्यासारखे दाखवायचे.मग दिवसभर सावजे गाठून पापे करायला मोकळे! नरकात तसले काही नसते.खाणे-पिणे नसते.मरणही नसते. केवळ यातना भोगायच्या.तुझ्या सर्वांगावरून साप सतत फिरणार."
"पण माझ्या देहाचे दहन झाले आहे.शरीरच नाही तर साप अंगावरून कसे सरपटणार?"
"शाबास! थोडे थोडे तुझ्या ध्यानी येत आहे.खरे तर तुझा अजून मृत्यू झालेला नाही.तू मरणासन्न अवस्थेत मृत्युशय्येवर आहेस."
"मेलेलो नाहे? मग चित्रगुप्तासमोर उभा कसा?"
"कुठला चित्रगुप्त? अंतकाळी तुझा तुझ्याशीच चाललेला हा संवाद आहे.तुझी सदसद्विवेकबुद्धी म्हणजे मी, चित्रगुप्त.आयुष्यभरात तू जे काही पापपुण्य केलेस त्याच्या सचित्र नोंदी तुझ्या मेंदूच्या स्मृतिकेंद्रात आहेत.तीच माझी चोपडी.तू काय काय केलेस ते सगळे कुणा त्रयस्थाला कसे कळणार? आता मेंदूतील ती जीवनचित्रपटदृश्ये तुझ्या डोळ्यांपुढून वेगाने सरकत आहेत.भोळसट श्रद्धाळूंना लुबाडून तू पाप केले आहेस.त्याचे फळ म्हणून तुला नरकयातना भोगाव्या लागणार असे तुला मी,म्हणजे तुझी सदसद्विवेकबुद्धीच सांगत आहे."
"मी असे करायला नको होते.शिक्षकाची नोकरी होती.त्यात कुटुंबाचे भागले असते."
"हे तुझ्या बुद्धीला त्यावेळीही समजत होते.पण लोभ,मोह अशा मनोविकारांनी बुद्धीवर मात केली.पुढे या धंद्यात विनायास खूप प्राप्‍ती होऊ लागली.पैसा वाढल्यावर विषयोपभोग,रंगढंग सुचू लागले.अंतर्मनात टोचणी लागली होती.तिच्या शमनार्थ तीर्थयात्रा,जपजाप्य,सत्यनारायण व्रत असे उपाय केले. ते सगळे निरर्थक आहे हे बुद्धीला कळत होते पण भावनेला वळत नव्हते.अंतकाळी सगळे आठवलेच."
"मी अजून जिवंत आहे तर!"
"मनात तोच विचार चालला आहे वाटते ! जगण्याची आशा तुटत नाही का? पण आता मरण अटळ आहे. अगदी जवळ आले आहे.म्हणून आपले निधन झाले,अंत्यसंस्कार झाले असे भासले.आता नरकयातना भोगाव्या लागणार याची जाणीव झाली."
"मृत्यूनंतर नरकवास नसतो का?"
"मृत्यूनंतर काहीच नसते.हे पटवून देण्याचा मी अनेकदा प्रयत्‍न केला.पण उपयोग झाला नाही.प्रत्येक वेळी भावना बुद्धीपेक्षा वरचढ ठरली. नरकातील यातना तसेच स्वर्गातील सुखे या गोष्टी मानसिक पातळीवर भोगायच्या असतात.आयुष्यातील सर्व घटनांचा पट मृत्यूपूर्वी काही काळ विद्युत् वेगाने दृष्टिपटलावरून सरकत असतो. ज्यांनी सत्कृत्ये केलेली असतात त्यांना सुख, समाधान, कृतकृत्यता वाटते.तसे आयुष्यभर त्यांना सुखसमाधान लाभतच असते.तेच स्वर्गसुख.
ज्यांनी दुष्कृत्ये केलेली असतात त्यांना ती आठवून मानसिक यातना होतात. हा नरकवास म्हणायचा. खरे तर हे अगदी अल्पकाळ असले तरी आपण वर्षांनुवर्षे नरकवास भोगतो आहोत असे वाटते.काळ सापेक्ष असतो.तसेच केल्या पापाचे शल्य नेणिवेच्या पातळीवर आयुषभर टोचतच असते."
"मग मी आता काय करू?"
"आता तुझ्याहाती काही नाही.स्वासोच्छ्वास थांबेपर्यंत शारीरिक आणि मानसिक पातळीवर जे घडत राहील ते सोसायचे. दुसरे काय?"

लेखनविषय: दुवे:

Comments

आवडले

हे आवडले.

+१

आवडले.

-Nile

सल्युट

व्वा ! धिस इज समथिंग् वर्दी ! दोन वाचने झाली, अजूनही चित्रगुप्त संवाद वाचावासा वाटतो आणि आता यनावाला समोर असते तर लेखाबद्दल कडकडीत मिलिटरी सल्युटही ठोकला असता.

+१

संवाद अतिशय आवडला.

:-)

संवाद चांगला आहे. आवडला. असा चित्रगुप्त सर्वांना भेटो.

ज्यांनी दुष्कृत्ये केलेली असतात त्यांना ती आठवून मानसिक यातना होतात.

असा कोणताही ठोस नियम नाही. एखाद्याला वाटणारी दुष्कृत्ये ही दुसर्‍यासाठी दुष्कृत्ये नसून धर्मकार्ये, न्याय, संस्कृती-परंपरा वगैरेंमुळे निर्माण झालेली सत्कृत्ये असण्याची शक्यता असते.

+१

>>>> एखाद्याला वाटणारी दुष्कृत्ये ही दुसर्‍यासाठी दुष्कृत्ये नसून धर्मकार्ये, न्याय, संस्कृती-परंपरा वगैरेंमुळे निर्माण झालेली सत्कृत्ये असण्याची शक्यता असते.
सहमत.

शाश्वत नीतिमूल्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
तत्त्ववेत्ता कांट यानी म्हटले आहे,"दोन गोष्टींचे जितके स्मरण, चिंतन करावे तितके माझे मन आश्चर्याने आणि गांभीर्याने भरून येते.त्या दोन गोष्टी म्हणजे असंख्य तारकांनी भरलेली ही अमर्याद,अनादि अवकाशपोकळी आणि माणसाच्या अंतःकरणात असलेला शाश्वत नैतिक विवेक.जीवन क्षणभंगूर आहे,समाजव्यवहार चंचल आहे.मग नीतीचे हे शाश्वत मूल्य येते कुठून? नीतीचा भंग केला तर जे भय वाटते ते कुणाचे?"

हा विचार मला पटतो.कुणी म्हणेल कसलीही भीती न बाळगता नीतीची ऐशी की तैशी करणारे खूप महाभाग आहेत.आहेत असे दिसते हे खरे. मनोविकारांच्या आहारी जाऊन ते आपल्या अनीतीचे समर्थनही करतात.पण माणसाच्या ठायी नैतिक विवेक म्हणजे सदसद्विवेकबुद्धी असतेच.अनेकवेळां ती पराभूत होते. निद्रिस्त राहाते. अंतकाळी ती जागृत होत असावी अशी एक कल्पना केली. मूलभूत नीतिमूल्य स्थल,काल,व्यक्ति निरपेक्ष आहे.शाश्वत आहे.असे मला वाटते.

तात्विक बैठक

कांट, कसाब, कन्निमोळी, कलमाडी आणि राहिलेले ओसामा बिन लादेनपासून तोताभटांपर्यंत सर्वांची तात्विक बैठक एक आहे अशा अंधश्रद्धेत मी वावरत नाही. त्यामुळे विवेचन पटले नाही. :-(

मूलभूत नीतिमूल्य स्थल,काल,व्यक्ति निरपेक्ष आहे.शाश्वत आहे.असे मला वाटते.

याला मी अंधश्रद्धा किंवा अज्ञान म्हणेन.

शल्य

एकूण संवाद आणि कल्पना आवडली. तोता भट यांना शिक्षकाची नोकरी कशी काय होती हे समजले नाही, पण ते महत्त्वाचे नाही.
केल्या पापाचे शल्य नेणिवेच्या पातळीवर आयुषभर टोचतच असते.
हे पटायला अवघड वाटते. पाप-पुण्याच्या कल्पना सापेक्ष आहेत. दुसर्‍यांना लुबाडणे हे सर्वसामान्यांच्या दृष्टीने पाप असले तरी जो/जी ते करतो/ते आहे त्याला/तिला ( या उचक्या खास स्त्री-पुरुष समानतेच्या समर्थनार्थ!) ते त्या त्या क्षणी किंवा अगदी आयुष्याच्या अखेरीसही पाप वाटते का? आपण करतो आहोते ते चुकीचे आहे हे कळत असून केवळ स्वार्थ या हेतूने मुर्दाडपणे तसे करत राहाणे हा एक भाग झाला. आपण जे करतो आहो त्यात काही चुकीचे नाहीच असे वाटणे हा दुसरा. मला वाटते गैरकृत्ये करणार्‍यांमध्ये दुसर्‍या भागातले लोक अधिक असावेत. एक अगदी वेगळे उदाहरणः पुण्यात गणपतीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलालाचा वापर कमी करा असे आवाहन प्रशासनाने केले होते. त्याला 'असल्या आवाहनांना आम्ही भीक घालत नाही,आम्ही गुलालाचा आम्हाला हवा तितका वापर करणारच' असे गुरुजी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मस्तवालपणे (आणि जाहीरपणे) सांगितले होते. त्याप्रमाणे त्यांनी तसे केलेच. या लोकांना अगदी आयुष्याच्या अखेरीस अशा गोष्टींची टोचणी लागेल का? सार्वजनिक ठिकाणी कचरा करणारे, पच्चकन् थुंकणारे, रस्त्यावर चुकीच्या बाजूने वेगाने वाहन दामटणारे, सामान्य माणसांना सरकारे कचेरीत नाडणारे, अन्नधान्याची नासाडी करणारे, कागदावर वजन ठेवल्याशिवाय कोणताही कागद पुढे न सरकवणारे.... या सगळ्यांना मरताना आपण केले ते चूक हा साक्षात्कार होत असेल का? मला तसे वाटत नाही. 'हे ईश्वरा, या लोकांना माफ कर, कारण ते जे करत आहेत ते चुकीचे आहे हे त्यांना कळत नाही' या वाक्याचेच अशा सगळ्यांवर आभाळ आहे, असे वाटते.
सन्जोप राव
हरेक बातपे कहते हो तुम के तू क्या है
तुमही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगू क्या है

असेच म्हणायचे आहे.

असेच म्हणायचे आहे. पण मी ते माझ्या शब्दात मांडतो.

श्री. यनावाला यांचे लेख माझ्या आकलनानुसार 'सत्य जाणण्याचा एक प्रयत्न' अशा ढंगाचे असले तरी काहिसे असंतुलित असतात. आणि हे संतुलन काहि अंशी 'भारतीय समाजात पसरलेल्या धार्मिक समजूती व त्यावर आधारलेल्या प्रथा-रिती रिवाज' यांना कमी लेखण्यातून आलेले असते. या कारणास्तव मी त्यांच्या लेखांना आत्तापर्यंत प्रतिसाद दिलेला नव्हता.

ह्या लेखात ही सत्याची काहि बाजू उलगडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पण लेखकाच्या मुळ प्रवृत्तीचा - काहि गोश्टींना कमी लेखत त्या अधोरेखित करण्यामुळे लेख (नेहमीप्रमाणे) असंतुलित झालेला आहे.

मानवाची प्रस्तुत अवस्था हि त्याच्या आयुश्यातील एका टर्निंग पॉंईट वर येते, देहाच्या मृत्युच्यावेळी येत नसावी. मी ह्या अवस्थेतून गेलो आहे म्हणून असे ठामपणे लिहीत आहे.

'आपण जे करतो आहोत त्यात काही चुकीचे नाही, तीच जगण्याची रीत आहे. असे वाटणे' जीवनाच्या ह्या स्थितीत एक बदल होवून तिथूनपुढे
'आपणाकडून जे घडले गेले ते तसे घडले गेले नसते तर काय-काय झाले असते...!' हे ध्यानात घेवून त्या मानवाच्या मनचक्शूंसमोर एक मोठा चित्रपटच दाखवला जातो. असे होण्याने त्या वेळेनंतर त्या मानवाच्या 'वैचारीक इनपूटच्या बाबतीतील' ('जाणीवेच्या' हा शब्द इथे फिट बसत नाही.) कक्शा बर्‍याच वृंदावतात.

(चित्रपट कोण दाखवतो? असे म्हटले तर माझ्या दृश्टीने 'नियती' दाखवते. या लेखानुसार हे 'सदसतविवेकबुद्धी'चूकलं..'सद्-असद-विवेक'-बुद्धी दाखवते) बहुतेकदा ह्या चित्रपटाच्या अखेरीस काळ मोठ्या दैत्यासमान दिसतो. मला स्वत:ला काळ ह्या महादैत्याच्या दाढांखाली अनेक माणसे कचाकचा भरडली जाताना दिसली होती. त्यांच्या आरोळ्या-किंचाळ्या ऐकून-पाहून (डोळे बंद असताना) मी चांगलाच टरकलो होतो. जी स्वत:ला त्या भरडण्यातून वाचवू शकत नव्हती, ती त्या दैत्याच्या खोल अंधार्‍या घशातून मृतावस्थेत सरकत होती.

असंतुलित लेख?

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.रावळे सतीश यांच्या मते प्रस्तुत लेख असंतुलित आहे.
एखाद्याच्या लेखनात त्याला योग्य (समाजहिताच्या दृष्टीने)योग्य वाटणार्‍या विचारसरणीचा पुरस्कार आणि अयोग्य वाटणार्‍या विचारसरणीचा/वर्तनाचा निषेध व्यक्त होणे स्वाभाविक आहे.हेही वाहवा! आणि तेही छान छान ! असे म्हटले म्हणजे लेख संतुलित होतो असे वाटत नाही.वस्तुतः तसे लिहिणे अस्वाभाविक,किंबहुना मानभावीपणाचे ठरेल.

शिक्षकाची नोकरी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
*तोता भट हे पूर्वी शिक्षक असतील हे श्री.सन्जोप राव यांना तितकेसे शक्य वाटत नाही.(याला महत्त्व नाही असे त्यांनी म्हटलेच आहे.) खरे तर त्र्यंबकेश्वरचे वामन दत्तात्रेय उपाध्याय (बी.ए.बी.एड) हे तोता भट या नांवे ओळखले जातात.(जसे आमच्या गावचे विश्वंभर दामोदर दीक्षित विसभट या नावाने.)
* वर लिहिलेला "शाश्वत नीतिमूल्य" हा प्रतिसाद पाहावा.त्याने अन्य शंकांचे निरसन कदाचित् होऊ शकेल

उत्तम संवाद :)

उत्तम संवाद :)

तरीदेखील तोता भट ह्यांना स्वर्ग-नरकाच्या कल्पना ठाऊक होत्या, एका 'नास्तिकाचे' शेवटचे श्वास कसे असतील ह्याबद्दल उत्सुकता आहे, का दुष्कृत्यांची शिक्षा मृत्यू नंतर मिळत नसते हि धारणा(विचार) असल्याने तो मरताना केलेल्या वाईट कर्मांचा विचार करत नसावा?

आणि...

दुष्कृत्यांची शिक्षा मृत्यू नंतर मिळत नसते हि धारणा(विचार) असल्याने तो मरताना केलेल्या वाईट कर्मांचा विचार करत नसावा?
तसेच सत्कृत्याचे फळही असे काही वेगळे मिळणार नाही ह्याची त्याला जाणीव आहे, म्हणून् त्यचाही सत्कृत्याचाही विचार नाही.
अरेच्चा म्हणजे विचारहीन, भावनातीत अशी ही ध्यानस्थ समाधी किंवा केवल-ज्ञानाची किंवा शून्य-निर्वाणाची अवस्था नास्तिकांनाच काय ती प्राप्त होउ शकते तर! ;-)

--मनोबा

करावं तसं भरावं - एक त्रिकालाबाधित नियम

"कुठला चित्रगुप्त? अंतकाळी तुझा तुझ्याशीच चाललेला हा संवाद आहे.तुझी सदसद्विवेकबुद्धी म्हणजे मी, चित्रगुप्त.

"करावं तसं भरावं" हा त्रिकालाबाधित नी निरपवाद नियम आहे. तो सर्वाना सारखाच लागू आहे.

मात्र कधी कधी असं दिसून येतं की जगात दुष्प्रवृत्त माणसं मजेत आहेत नी सत्प्रवृत्त माणसाना त्रास होतोय. अशा वेळी या नियमाच्या खरेपणाविषयी शंका निर्माण होते. पण हा आपला भ्रम असतो. माणसांची वर्तणूक नी आयुष्यात त्यांच्या वाट्याला येणार्‍या गोष्टी किंवा त्यांच्या वाट्याला येणारा आयुष्याचा शेवट यांचा दीर्घकाळ मागोवा घेतल्यास "करावं तसं भरावं" या नियमाच्या सत्यतेचा निर्विवाद पुरावा आपल्याला सापडतो.

यात गूढ असं काही नाही. माणसाच्या मनोव्यापारांचा थोडा खोलात जाऊन विचार केल्यास हा नियम आपलं काम अगदी बिनचूकपणे कसं करतो ते लक्षात येईल. प्रत्येक माणसात सदसद्विवेकबुद्धीच्या रुपानी एक अंतःस्थ न्यायाधीश असतो जो माणसाचाच एक अविभाज्य भाग असतो. जेव्हा कोणीही माणूस ठरवून एखादी कृती करतो तेव्हा ती न्याय्य आहे की नाही ते हा अंतःस्थ न्यायाधीश त्याला सांगू शकतो. (आठवा - तोरा मन दर्पण कहलाये ....... ). पण स्वार्थानी आंधळा झालेला माणूस एक तर या न्यायाधिशाचा सल्ला घेत नाही किंवा तो सल्ला स्वार्थाच्या आड येत असेल तर त्याचा आवाज दडपून टाकतो नी आपल्याला हवा असलेला तात्कालिक फायदा मिळवतो. त्याचं तो, "हा व्यवहार आहे", "खर्‍या आयुष्यात असंच करावं लागतं", "मी स्वार्थ नाही साधला तरी दुसरा कोणीतरी फायदा घेणारच आहे. मग मी का नको?" अशांसारख्या विधानानी समर्थन करतो. तरीदेखील अंतःस्थ न्यायाधीश आपलं काम करतोच. त्याला, तो माणसाचा अविभाज्य भाग असल्यामुळे, निर्भेळ सत्य माहीत असतं. त्यामुळे कुठलंही शाब्दिक समर्थन त्याची दिशाभूल करू शकत नाही. तो केलेल्या खोटेपणाच्या गुन्ह्याला योग्य अशी शिक्षा ठरवतो, ती माणसाच्या शरीरात नी मनात मुद्रित करतो नी ती पूर्ण होण्याच्या दृष्टिनी बुद्धि होईल याची व्यवस्थाही करतो. (बुद्धि कर्मानुसारिणी! - र्‍हस्व-दीर्घाच्या चुकीकडे दुर्लक्ष करावं).

जाणीव आणि पश्चात्ताप

आयुष्यक्रमाच्या ८०-८५ वर्षे इतक्या प्रदीर्घ कालावधीत हातून घडलेल्या/झालेल्या/केलेल्या फुटकळ चुका अथवा पापे शेवटी शेवटी लक्षातही राहात नाहीत. काही ठळक घटना आणि कौटुंबिक मानापमान मात्र कायमचा ठसा उमटवतात. जिथे कृत्याची जाणीवच नसते तिथे पश्चात्ताप कुठून होणार?
शिवाय पापपुण्याची कल्पना धार्मिक मानली तर धर्मशास्त्राप्रमाणे केलेल्या कृत्याला त्याच धर्मशास्त्रातल्या चित्रगुप्ताकडून शिक्षा कशी होऊ शकेल? शिवाय (पापपुण्य हे नीतीशास्त्राप्रमाणे मोजायचे झाल्यास) नीतीअनीतीच्या कल्पना तरी कुठे शाश्वत आहेत? भारतातल्या प्रचलित नियमांनुसार रस्त्याच्या डावीउजवीकडून गाडी हाकण्याचे नियम अमेरिकेत अगदी उलट होतात. म्हणजे दुष्कृत्ये अथवा पापे ही त्या त्या देशाच्या संविधानानुसार मोजावी लागणार.
मुस्लिम,क्रिस्टिअन् इत्यादी धर्मांमध्ये पापकल्पना वेगवेगळ्या आहेत. वरील संवाद जर हिंदू धर्म पाळणार्‍यांमध्ये घडला असेल (तो तसा घडला हे लेखात उघड झालेले आहे) तर हिंदूधर्माच्या नियमांनुसारच त्याचा निवाडा होईल. हिंदू धर्मामध्ये चित्रगुप्त आहे किंवा नाही, की तो फक्त हिंदू पुराणांतच अस्तित्वात आहे,आणि ही पोथ्यापुराणे हिंदू धर्माचा अधिकृत भाग आहेत की नाहीत हे वेगळे मुद्दे उपस्थित होऊ शकतात. अर्थात या लेखात चित्रगुप्त उपस्थित नाहीच, तोताभटाचा हा संवाद त्याच्या सदसद्विवेकबुद्धीशीच आहे हे खरे.पण धर्मशास्त्र आणि सदसद्विवेकबुद्धी या वेगवेगळ्या सेट्स् ची गृहीतके वेगवेगळी असू शकतात.

शाश्वत नीतिमूल्य ( ! )

लेख वाचला, आवडला पण प्रतिसादांतून पुढे येत असलेल्या 'शाश्वत नीतिमूल्य' या कल्पनेची मौज वाटते. कांटपुराणात वर्णिलेल्या 'माणसाच्या अंतःकरणात असलेला शाश्वत नैतिक विवेक' या वचनावर असलेली उपक्रमी विचारवंतांची अभंग श्रद्धा कौतुकास्पद असली तरी त्यांच्या एकंदर प्रतिपादनाशी विसंगत असणारी आहे. विशेषतः 'करावे तसे भरावे' हा नियम ठायीठायी भंग पावत असल्याचा मुबलक विरुद्ध पुरावाही उपलब्ध असतांना या वचनावरची श्रद्धा ही अंधश्रद्धा आहे किंवा कसे याचा जाणकारांनी खुलासा केल्यास आमच्या ज्ञानात भर पडेल.

लेख छान

आवडला

श्री.यनावलासर लेख नेहमीप्रमाणेच सयंमीत झाला आहे मला कुठेही असंतुलीतपणा जाणवलेला नाही.
उलट वाचताना उत्सुकता ताणली जात होती.

भोळसट, श्रद्धाळू गिर्‍हाईक लुबाडणारे नारायण नागबळी काय किंवा सत्य नारायण काय किंवा इतर कोणतीही तिर्थक्षेत्रे असो सगळीकडे हा अनुभव घेतलेला आहे.
कधी कुणाच्या श्रध्दे साठीतर कधी मनाविरुध्द स्वतःला लुबाडून घेतले आहे.
आज त्याची आठवण झाली.

रोचक आणि आशावादी स्फुट

रोचक आणि आशावादी/लहान मुलांना शिकवण्याकरिता बरे असे स्फुट.

(माझे असे मत आहे : "चांगुलपणा"चे मर्यादित पण जाणवण्यासारखे फायदे आहेत. पर-दु:ख-सह-अनुभूतीची मर्यादित उपजत जाणीव आहे. तेवढ्याने जी काही मर्यादित सदसद्विवेकबुद्धी मनुष्यांत दिसते, तिचे पुरेसे स्पष्टीकरण या दोहोंमधून मिळते. अमर्याद काळासाठी कर्माचे एकसंध हिशोबखाते मानण्याची गरज नाही, किंवा मरणासन्न क्षणात कर्माचा सगळा हिशोब चुकवणारी सदसद्विवेकबुद्धी मानण्याची गरज नाही.)

गिल्ट थ्रेशोल्ड

प्रत्येकाचा गिल्ट थ्रेशोल्ड कमी जास्त असतो. वरती सन्जोपरावांनी म्हटल्याप्रमाणे अनेकांना मोठ्या मोठ्या (सो कॉल्ड्) गुन्ह्यांचीदेखील बोचणी लागत नसावी तर काही लोकांना क्षुल्लक गोष्टींची लागत असावी. जैन साध्वी आणि महंत तोंडास कापड बांधतात का तर जीवाणू हत्या टळावी म्हणून. आमच्यासारखे लोक मांसाहारी असतात, अगदी जिवंत , नांगी तोडलेल्या खेकड्यांना उकळत्या पाण्यात मारून त्यांचं मस्त चिंबोरी कालवण बनवतात. मला नाही वाटत मृत्यूसमयी या असल्या गोष्टींची काही बोच लागत असेल.

मस्त संवाद

उत्तम स्फुट
चित्रगुप्त म्हणजे आपल्या पापपुण्याचे हिशोब ठेवणारा देवाच्या दरबारातील हिशोबनीस असे माझ्या मनात लहानपणी अगदी पक्के होते. एवढ्या चोपड्या तो कसा काय सांभाळत असेल असा प्रश्न मला त्याही वेळी पडे. पण समजुतीसमोर तो फिका पडे. नरकात काय काय शिक्षा भोगायला लागतात याचे एक सचित्र पुस्तकही बघण्यात आले होते. या जन्मात केलेली पापे व त्याचा मृत्युनंतर द्यावा लागणारा हिशोब असे काहीसे त्याचे भीतीदायक स्वरुप होते. उकळत्या तेलाच्या कढईत माणसाला टाकले आहे असे चित्र आठवते. घराच्या मागे एक बखळ होती त्यात उकिरडा, गोखाडी (हागीनदारी) व डुकरे होती. आम्ही डुकरांना दगडी मारत फिरत असू. एकदा एक डुकरीण व तिची दहा बारा पिल्ले चालली होती मी दगड मारत सुटलो. डुकरीण व पिल्ले पळत होती. मला मजा येत होती. एक दगड एका पिल्लाच्या वर्मी लागला व ते जागीच निपचित पडले. मी घाबरलो. आता माझ्या डोळ्यासमोर चित्रगुप्त व नरकयातनाची ती चित्रे येउ लागली. मला असंख्य लोक दगड मारताहेत व मी घाबरुन पळत सुटलो आहे असे दृष्य डोळ्यासमोर तरळून गेले. बराच वेळ अस्वस्थतेत गेल्यावर परत घरामागे ते पिल्लू पहाण्यासाठी गेलो. पिल्लू जागेवर नव्हते डुकरीण पलिकडे आपल्या पिल्लांबरोबर संचार करीत होती. हुश्य केले आपण पापाच्या हिशोबातुन वाचलो असे वाटले. मनातल्या मनात रामाचे आभार मानले.
आजही उत्साह, उन्मादाच्या वा अन्य भावनेच्या भरात कळत नकळत आपल्या कडुन एखादी इतरांना त्रास देणारी कृती तर झाली नसेल ना असा विचार मनात येउन जातो.
प्रकाश घाटपांडे

दोन पैसे

नाशिक-त्र्यंबकेश्वरातील याज्ञिकी हा व्यवसाय असणार्‍या काही लोकांशी जवळून संबंध आल्यामूळे मला तोताभटांचा आत्मसंवाद वास्तवाच्या जवळ जाणारा वाटला नाही. बर्‍याचशा पूजा वगैरे सांगणार्‍या लोकांची नैतिकता आपण करतो तो व्यवसाय भ्रष्ट आहे याच्याशी संबंधित नसते. पूजेच्यावेळी योग्य तेच मंत्र म्हणणे, शॉर्टकट न मारणे, यजमानाच्या शंकांना उत्तरे देणे थोडक्यात काम 'चांगले' करणे येथपर्यंतच त्यांचे नैतिकतेचे निकष पोचतात. पुढचा विचार ते बर्‍याचदा करत नाहीत. तोता भट त्यातल्या त्यात विचारी दिसतात.

____________
वाचण्यासारखे काही

शाश्वत नीतिमूल्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीत नैतिक विवेक असतो हे आमचे मित्र श्री.ज्ञानेश यांना कां बरे पटत नसावे? अनेकजणांचे वर्तन/आचरण त्या विवेकानुरूप दिसत नाही हे खरे.त्याचे कारण माणसातील प्रबल मनोविकार.ते सदसद्विवेकबुद्धीला डोके वर काढू देत नाहीत.
.चोरी करणे
.खोटे बोलणे
.दुसर्‍याला फसविणे
.कुणावर अन्याय करणे
या गोष्टी वाईट आहेत हे प्रत्येकाला समजते.बनावट औषधे निर्माण करणार्‍याला आपण अनैतिक गोष्ट करीत आहो याची जाणीव असते.चोरी करणार्‍याला आपण ही वाईट गोष्ट करीत आहो हे समजते.चित्रपटातील खलनायक निष्पाप,निरपराध्यांवर अन्याय,अत्याचार करतो.त्यांना खोट्या खटल्यात अडकवतो.त्या खलनायकाला चांगली अद्दल घडावी असे प्रत्येक आणि यच्चयावत सर्व प्रेक्षकांना वाटते.
कांट यांना अभित्रेत असलेले शाश्वतनीतिमूल्य ते हेच असावे

शाश्वत नीतिमूल्य

नैतिक अनैतिकतेची जाण आपोआप नसते.

अनेकदा अनैतिक कृत्याचे परिणाम डोळ्यासमोर दिसत नसले तर मनुष्याला त्या कृत्याच्या अनैतिकतेची जाणीवच होत नाही. पूर्वी धनंजय यांनी दिलेले उदाहरण येथे चपखल बसते. आपण सिगरेट बनवणार्‍या कंपनीचे भागभांडवल घेतो. त्या कंपनीने बनवलेल्या सिगरेटी अनेकांच्या ममृत्यूस कारणीभूत होतात हे वास्तवसुद्धा आपल्याला माहिती असते. पण तरीही सिगरेट बनवणारा कारखाना असणे आणि आपण त्या कारखान्याचे अंशतः मालक असणे हे दोन्ही अनैतिक आहे अशी जाणीव आपल्याला होत नाही. कारण बनावट औषधांच्या कारखान्यासारखा सिगरेटचा कारखाना बेकायदेशीर नसतो आणि त्याचे परिणाम थेट आपल्या डोळ्यासमोर घडत नसतात.

वर जातकाने आपण आपल्या बायकोचा दागिना विकून नागबळी करू असे जातकाने भटांना सांगितले तर त्या प्रत्यक्ष परिणामाच्या जाणीवेने भट कदाचित त्या जातकाला नागबळी ऐवजी दुसरा कमी खर्चिक उपाय सांगेल.

नितिन थत्ते

व्यक्तिसापेक्ष नीतीमूल्य

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.नितिन थत्ते यांनी लिहिले आहे,"पण तरीही सिगरेट बनवणारा कारखाना असणे आणि आपण त्या कारखान्याचे अंशतः मालक असणे हे दोन्ही अनैतिक आहे अशी जाणीव आपल्याला होत नाही."
.
सिगरेट निर्मात्याचा हा धंदा अवैध नाही.तो ग्राहकांना फसवीत नाही.आपल्या उत्पादनाची जाहीरात करीत असेल तरी तेही नियमांना धरून आहे.आता आरोग्याला घातक असलेली सिगारेट उत्पादित करावी की न करावी हे व्यक्तिसापेक्ष नीतिमूल्य आहे.
दुधात भेसळ करणारा ग्राहकांना फसवत असतो.म्हणून ते निश्चितपणे अनैतिक आहे.त्याची त्या भेसळ कर्त्यालासुद्धा जाणीव असते.

टोच

आता आरोग्याला घातक असलेली सिगारेट उत्पादित करावी की न करावी हे व्यक्तिसापेक्ष नीतिमूल्य आहे.

बरोबर त्याच प्रकारे अश्या धंद्यात पैसा गुंतवावा की नाहि हे ही व्यक्तीसापेक्ष नितीमूल्य आहे. मात्र त्या कंपन्यांचे शेअर्स घेणे (पक्षी पैसा गुंतवणे) अनैतिक आहे असे सामान्यतः समजले जात नाही

तेव्हा या अनैतिक कृत्याला तसे न समजल्याने त्याची टोच ते शेअर घेणार्‍याला लागेलच कशी?

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

अवैध असण्याचा-नसण्याचा काय संबंध?

>>सिगरेट निर्मात्याचा हा धंदा अवैध नाही.

तसा तोताभट यांचा धंदाही अवैध नाही. तेव्हा आपण जी चर्चा करीत आहोत ती कायद्याने अवैध याबद्दल नसून सदसदविवेकबुद्धीला जे अनैतिक वाटते/वाटायला हवे असे आपण समजतो त्याविषयी आहे.

>>दुधात भेसळ करणारा ग्राहकांना फसवत असतो.

दुधात (दुधाची) पावडर मिसळणे हे देखील कधीकाळी अनैतिक(अवैध नाही) समजले जात असेल.

नितिन थत्ते

प्रतिसाद

'निसर्गतः असलेला नैतिक विवेक' ही संकल्पना फारच ढोबळ आहे असे मला वाटते. त्यात पुन्हा नीती-अनीतीच्या कल्पनाही देश-काल-वय-प्रसंग इ. सापेक्ष बदलत असतात, त्यामुळे हा गोंधळ अधिकच वाढतो.
तुमचेच उदाहरण घेऊ-

चोरी करणे- सर्वसामान्यतः वाईट. मग शत्रूदेशाची गोपनीय माहिती चोरणारे गुप्तहेर खाते वाईट आहे का? तर नाही. एथिकल हॅकिंग वाईट नाही. इथे 'देशभक्ती' हे मूल्य मोठे ठरून चोरी करण्याच्या कृत्यातला गिल्ट नाहीसा होतो. उलट तो अभिमानाचा विषय होतो.
याचप्रमाणे आपले किंवा आप्तस्वकीयांचे हितसंबंध जपण्यासाठी ढोबळमानाने अनैतिक समजली जाणारी कृत्ये सर्रास केली जाऊ शकतात आणि त्याबद्दल टोचणी वगैरे लागणे अशक्यच आहे असे वाटते. अगदी श्रीकृष्णापासून शिवाजीपर्यंत 'अनैतिक' म्हटली जाऊ शकतील अशी कृत्ये व्यापक जनहितासाठी केली गेलेली आहेत असे दिसते. (लेटेस्ट उदा.- ब्लॅकमेलिंग वाईट, पण अण्णांचे उपोषण वाईट नाही. ;))
प्रस्तुत लेखातल्या भटजींना "आपण करतो त्या विधीने जातकावरील संकट खरोखर टळते" याबद्दल खात्री असेल तर त्यांना अंतसमयी अशी टोचणी लागणार नाही. उलट अनेकांवरील येऊ घातलेली संकटे आपल्या विधीमुळे टळल्याचे पुण्य गाठीशी बांधून आकंठ समाधानाने त्यांनी शेवटचा श्वास घेण्याची शक्यता जास्त !

'करावे तसे भरावे' हासुद्धा नैसर्गिक न्यायावर दाखवलेला असाच अवास्तव आणि भाबडा विश्वास आहे. हे वचन खोटे ठरवणारी मुबलक उदाहरणे रोजच्याच जीवनात दिसतात. अनेक लोक करतात तसे भरत नाही, आणि अनेक जण काहीही न करता नुसते भरत राहतात. याचे कारण निसर्ग इतका न्यायी नाही. उलट 'बळी तो कान पिळी' हाच निसर्गाचा स्वाभाविक कायदा आहे असे दिसते. निसर्ग न्यायी असता तर मानवाला आपली स्वतःची न्यायव्यवस्था कशाला निर्माण करावी लागली असती?

वैयक्तिक नीतिमूल्ये

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.ज्ञानेश म्हणतात "चोरी करणे- सर्वसामान्यतः वाईट. मग शत्रूदेशाची गोपनीय माहिती चोरणारे गुप्तहेर खाते वाईट आहे का? तर नाही."
मूळ लेख वैयक्तिक नीतिमूल्यांविषयी आहे. या नीतिमूल्यांहून राजकारण,व्यवसाय,आदि क्षेत्रांतील नीतिमूल्ये भिन्न असतात.

बारकेसे मत

प्रत्येक व्यक्तीच्या बुद्धीत नैतिक विवेक असतो

किंबहूना विवेकबुद्धीने वागावे हीसुद्धा नैतिक निवडच आहे असे मला वाटते.

__________
"Do not argue with an idiot. He will drag you down to his level and beat you with experience" - सहकार्‍याच्या दारावरील वाक्य कोणाचे ते माहीत नाही.

शाश्वत नीतीमत्ता/दुष्कृत्यांचा पाढा-कन्फेशन

१. पायाभूत शाश्वत नीतीमत्ता अथवा सदसद्विवेकबुद्धीला स्मरून वागणे हे माणसाला उपजत येत असावे आणि केवळ स्वार्थाच्या आहारी जाऊन तो त्याविरुद्ध वागतो असे मलाही पूर्वी वाटत असे. किंबहुना लोक वाईटपणे का वागतात? असा प्रश्नही माझ्या मनाला पडत असे.
परंतु तसे नाही. आपण ज्यांना अजाण म्हणतो अशा वयाची मुलेसुद्धा मुद्दाम दुष्टपणे वागताना दिसतात. तेव्हा चांगुलपणा हा जसा मानवी मनाचा एक स्वयंभू भाग आहे तसाच वाईटपणाही आहे. त्याचे गुणोत्तर व्यक्तीव्यक्तीप्रमाणे आणि कदाचित परिस्थितीप्रमाणे बदलते. त्यामुळे सर्व पातळीवरील बुद्धीमत्तेचा, चांगुलपणाचा आणि संवेदनशीलतेचा लसावि म्हणून पापपुण्याच्या धर्माधिष्टित कल्पना रूढ करणे पूर्वसुरींना गरजेचे वाटले असावे. आज त्यांची सुशिक्षित, सुसंस्कृत, नीतिमान व्यक्तींना गरज नाही म्हणून या कल्पना मुळातून उखडून टाकाव्यात का? की त्या कल्पनांच्या कष्टदायक बंधनातून मुक्त होण्याचे (नागबळी-सत्यनारायण-गुप्तदान-यात्रा-गुरू आदि) मार्ग स्वार्थी लोकांनी शोधून काढल्याने त्या आपोआपच कालबाह्य झालेल्या आहेत?

२. फक्त मृत्यूसमयी माणसाला आपण केलेल्या दुष्कृत्यांचा पाढा स्वतःच्या विवेकबुद्धीसमोर वाचायला लागतो ही कल्पना काही पटली नाही. अनेक अपराधी प्रवृत्तीच्या व्यक्ती जन्मभर अनैतिक गोष्टी करतात त्यावेळी त्यांची विवेकबुद्धी कुठे असते? त्यावेळी जर ती अस्तित्त्वात नसते तर मरणाच्या वेळीच अचानक दत्त म्हणून का उभी राहील? (वरील उदाहरणात तोताभट यांच्या व्यक्तीमत्त्वात विवेकबुद्धीचे प्रमाण अधिक असल्याने आणि त्यांची हिंदू धर्मकल्पनांवर नितांत श्रद्धा असल्याने त्यांना सीमेवर हिशोब घेणारा चित्रगुप्त दिसला असे वाटते. ते ख्रिश्चन असते तर कदाचित त्यांनी 'कन्फेशन' देऊन स्वतःची त्या बोचणीपासून सुटका करून घेतली असती. )

स्पष्टीकरण

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
शाश्वत नीतितत्त्वे या कल्पनेविषयी श्री.ज्ञानेश,प्रियाली आदि काही जणांचा गैरसमज झालेला दिसतो.अनेक नीतितत्त्वे स्थल-काल सापेक्ष असतात.काही धर्मसापेक्ष तर काही व्यक्तिसापेक्ष असतात.अशी तत्त्वे अर्थातच शाश्वत नव्हेत.पण काही मूलभूत नीतिमूल्ये स्थल-काल-धर्म-व्यक्ती-निरपेक्ष असतात.ती प्रत्येक व्यक्तीच्या विवेकबुद्धीत उपजतच असतात.उदा.:
*खोटे बोलू नये.
*चोरी करू नये.
*कुणाची फसवणूक करू नये.
*कुणावर अन्याय, अत्याचार करू नये.
जगात सर्व ठिकाणी,सर्व काळी (गेली किमान दहा हजार वर्षे),सर्व धर्मांना आणि सर्व माणसांना (किमान सर्व साधारण बुद्धी असलेल्या) ही तत्त्वे विदित आहेत आणि मान्य आहेत.काही आपद्धर्मप्रसंगी याला अपवाद असू शकतो.
मात्र अनेकांचे आचरण या तत्त्वांना अनुसरून होत नाही हे दिसतेच. कारण प्रबळ मनोविकार सदसद्विवेक बुद्धीवर मात करतात. खोटे बोलून काही लाभ होत असेल तर त्या मोहाला बळी पडून काही जण खोटे बोलतात.पण हे आपण चांगले केले नाही याची त्यांना जाणीव असते. आपल्या कृतीचे ते समर्थन करतील(काय करणार इलाज नव्हता.) पण खोटे बोलणे,चोरी करणे, इ.कृती वाईट असे सर्वजण( अगदी निरक्षर आदिवासीसुद्धा) , सर्वकाळी सर्व ठिकाणी निर्विवादपणे मानतात. तत्त्ववेत्ता कांट यांना अचंबा वाटतो तो या गोष्टीचा. सर्वच नीतितत्त्वे शाश्वत असतात असे कोणीच म्हणत नाही.

वर्तन कसे होते ते महत्त्वाचे

दुष्कृत्य करणार्‍याला त्याची कटुफळे निसर्गतः आपोआप भोगावी लागतील असे आपल्याला वाटते.पण न्याय नैसर्गिक नसतो . निसर्ग उदासीन आहे.दुष्कर्मीला दंडण्यासाठी माणसाने न्याय व्यवस्था निर्माण केली. तसेच सत्कार्यासाठी मानसन्मान, पारितोषिके ठेवली.(याचा अल्प स्वल्प का होईना,उपयोग होतो.)
वरील तीन गृहीतके सत्य असलीच पाहिजेत या अट्टहासापोटी त्यांच्या येन केन प्रकारेण समर्थनार्थ पुनर्जन्म,संचित, प्रारब्ध,क्रियामाण अशा भ्रामक कल्पनांचा डोलारा उभा करावा लागला.कर्मसिद्धान्ताचे हे एक संभाव्य कारण मानता येईल.
....याहून अधिक संभवनीय म्हणजे सत्ता अबाधित राखण्यासाठी राजे आणि धर्मगुरू यांनी संगनमताने केलेली ही धूर्त योजना असू शकेल.

-सदसद्विवेकबुद्धीला मारून टाकण्याचा राजमार्ग म्हणजे - "कर्ता करविता परमेश्वर" , "अमुक कृत्य माझ्या हातून घडले कारण ईश्वरेच्छा बलीयसि","माझ्या नशिबातच तसे करणे होते". यापुढे त्याला कोणताही आधार नको.
हे जरी खरे असले तरी, सर्वसामान्य विचारशक्तीच्या (बहुसंख्य) व्यक्तींना पापपुण्य संकल्पनेचा दरारा वाटून त्यांचे वर्तन शक्य तितके निर्दोष करण्यासाठी सर्वच धर्ममार्तंडांनी प्रयत्न केलेले आहेत. धर्मांची मूळ मांडणी करणार्‍या द्रष्ट्यांना या कल्पनेचा विपर्यास करून काही 'धूर्त' लोक तिचा गैरफायदा उठवतील हे अभिप्रेत नसावे. तसे तर कोणतीच प्रणाली पूर्णपणे निर्दोष असू शकणार नाही. कारण ती राबवणारा मनुष्यप्राणी हाच स्वभावतः स्खलनशील आहे.

स्पष्टच सांगायचे तर धर्म-ईश्वर-पापपुण्य-दैव-नियति आदि संकल्पना मानणारी (सर्व-) सामान्य विचारशक्ती असणारी किंवा त्यांना पूर्णपणे नाकारणारी असामान्य विचारशक्तीची एखादी व्यक्ती मूलभूत नीतिमूल्यांना अनुसरून नेहमीच आचरण करेल याची खात्री मुळीच देता येत नाही. त्यामुळे या संकल्पना मानल्या काय किंवा न मानल्या काय? - शेवटी वर्तन कसे होते ते महत्त्वाचे.

समजा, गेलेच तोताभट्ट नरकात

तर नक्की काय जाणार नरकात त्यांचं?
आत्मा?
अन जर हा आत्मा, नैनं छिंदन्ती शस्त्राणी वगैरे असेल तर त्या नरकातली आग यातना इ. याचं काय वाकडं करतील??

बरेचसे अवांतर

इथे तोताभट्ट हे यज्ञयाग वगैरे करवणारे याज्ञिक दाखवले आहेत. खरे तर ही कार्ये यजमानाकरवी करवली जातात.संकल्प यजमानाने सोडायचा असतो. यजमानाच्या आग्रहावरून,इच्छेखातर भटजी ते करीत असतो. त्याचे बरेवाईट फळ (फळ मिळते असे मानले तर) यजमानाला मिळणार असते.मग यात दोष कुणाचा? सदसद्विवेकबुद्धी कुणाची जागृत असायला पाहिजे?
दुसरे असे की यजमान हा बहुधा अनेक ज्योतिष्यांकडे जाऊन काय करायचे, कुठे करायचे या विषयी सल्ले घेऊन आलेला असतो.त्या सल्ल्यांनुसार तो त्र्यंबकेश्वरी जातो. इथे सल्ला देणारा जास्त दोषी की प्रत्यक्ष काम करणारा?खून करणारा अधिक दोषी की खुनाची सुपारी देणारा?

शेवटी काय.......?

नीतीमात्तेविषयी बराच उहापोह झाला.बऱ्याच विद्वानांची मते वाचली.काहींची पटली काहींची नाही. असो....
माझे सर्वसाधारण मत हे आहे कि 'सत्य हे शाश्वत आहे '.जर मानव हा नैसर्गिक प्राणी आहे तर त्याने त्याच्या सगळ्या गोष्टी नैसर्गिकपणे केल्या तर काहीही होणार नाही. जसे एखादे झाड , प्राणी निसर्गात जसा राहतो ,परिसंस्थेत त्याची जी भूमिका आहे ती तो नैसर्गिक रित्या वठवतो त्यात अनैसर्गीक्तेची थोडीही झाक नसते.त्यात कोणीही कृत्रिम पणा केला तर जसे सगळाच डामडौल बिघडेल परंतु तसे होत नाही कारण ती बिचारी नियमात जगत असतात.मानवा कडूनही ही तीच अपेक्षा आहे कि त्याने त्याचा प्रत्येक आचार हा नैसर्गिक ठेवावा जसे विचार, बोलणे,कृती ई.उदा. एखाद्या गोष्टीबद्दल सांगायचे तर त्याने ते सत्यच सांगितले पाहिजे त्यात खोटेपणा नको.जर त्यात त्याने थोडाही खोटेपणा केला तर त्या गोष्टीचे सगळेच संदर्भ बदलतात.तसेच कृती कोणतीही असो ती जर नैसर्गिक असेल म्हणजे कुणासही न दुखावणारी किंवा कोणाच्या हिताच्या आड न येणारी तर सर्व ठीकच राहील परंतु थोडा जरी त्यात स्वार्थ ( अनैसार्गीकता ) आला तर फुटलेच फाटे.म्हणजेच मानवाने सत्याचरण केले तर कसला नरक अन कसला स्वर्ग.सगळेच आनंद दायी.
एखादी इमारत समजा मुळापासूनच ओळम्ब्यात नसेल तर ती कधीतरी इतर इमारतींच्या तुलनेत लवकर पडणारच आहे ( ओळंबा - नैसर्गिक ) याचा अर्थ नैसर्गिक कृती अंतिम सत्य आहे.
तुमच्या सारख्या विद्वानांसमोर 'ह्यो फिरस्त्या' लहान तोंडी मोठा घास घेतोय , माफ करा मला पण मला उमगलेला निसर्ग' ह्यो असा' आहे.

नैसर्गिकता

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.फिरस्ता यांनी मांडलेले विचार सैद्धान्तिक पातळीवर पटण्यासारखेच आहेत.आजच्या गुंतागुंतीच्या मानवी व्यवहारात ते आचरणात येणे अवघड आहे."म्हणजेच मानवाने सत्याचरण केले तर कसला नरक अन कसला स्वर्ग.सगळेच आनंद दायी."

यात दुमत संभवत नाही. श्री.फिरस्ता यांचे हे प्रतिसादलेखन अभिनंदनीय आहे.

आयुष्यात १०० माणसांना मारणार्‍या..

माणसाच्या मनात तुमच्या मते शेवटी कुठ्ला चित्रपट चालेल? तो माणूस फासावर लटकवण्याच्या नोकरीवर असेल तर त्याला कृतकृत्य झाल्यासारखं वाटेल.

येरवड्यात फासावर लटकवणार्‍या एका माणसाने १०० री पार केल्यावर एक् पुस्तक लिहिले आहे. तेव्हा असा माणूस खरोखर अस्तित्त्वात् होता. समजा जर त्या माणसाने स्वखुषीने ही नोकरी पत्करली असेल् (जसं वरच्या उदाहरणात भटाने शिक्षकाची नोकरी सोडून् धंदा केला) तर् त्याला मरताना टोचणी लागेल का?

मी जे करतो आहे ते मला पाप वाटत नसेल् तर् मरण्याच्या आधी असं कुठलं ज्ञान प्राप्त होणार आहे कि ज्याने मला कळेल् कि मी केली ती पापं होती? जर तसं काही कळालच् नाही तर् कसली टोचणी आणि कसल्या यातना?

"आयुष्यातील सर्व घटनांचा पट मृत्यूपूर्वी काही काळ विद्युत् वेगाने दृष्टिपटलावरून सरकत असतो" असल्या वाक्यांना नक्कीच काहीतरी शास्त्रीय आधार असेल (भारतीय धर्मग्रंथातले आपल्याला सोयिस्कर असतील तेव्ह्ढेच संदर्भ् नकोत हा.). ज्यांचा मेंदू बंद पडून् मृत्यु होतो ते हा चित्रपट मिस करतात का?

बुद्धीची टोचणी

मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
***********************************
श्री.भटका लिहितात,:"येरवड्यात फासावर लटकवणार्‍या एका माणसाने १०० री पार केल्यावर एक् पुस्तक लिहिले आहे. तेव्हा असा माणूस खरोखर अस्तित्त्वात् होता. समजा जर त्या माणसाने स्वखुषीने ही नोकरी पत्करली असेल् (जसं वरच्या उदाहरणात भटाने शिक्षकाची नोकरी सोडून् धंदा केला) तर् त्याला मरताना टोचणी लागेल का?"


..त्या माणसाला त्याने केलेल्या या कामाच्या संदर्भात टोचणी लागण्याचे काही कारण नाही. या संदर्भात त्याने कोणाला फसवले नाही,कोणावर अन्याय,अत्याचार केला नाही,असत्यकथन केले नाही.ज्यासाठी वेतन मिळत होते ते काम त्याने पार पाडले. त्याची बुद्धी त्याला टोचणार नाही.
..पण भटाचे तसे नाही. आपण लोकांना फसवीत आहो,खोटे नाटे सांगून लुबाडत आहो याची त्याला जाणीव आहे. अधिक पैसे मिळतात या मोहाने तो हे काम करीत होता.इथे मनोविकाराने म्हणजे भावनेने बुद्धीवर मात केली. म्हणून शेवटी मनाला बुद्धीची टोचणी लागली,अशी कल्पना केली आहे.आपण शिक्षकाची नोकरी सोडून हा धंदा पत्करला याची त्याला शेवटी खंत वाटत आहे.

 
^ वर