कविवर्य बी.रघुनाथ- एक स्मरणयात्रा

आधुनिक काव्यप्रवाहातील एक अभिनव कवि म्हणजे बी.रघुनाथ. कथा,काव्य आणि कादंबरी हे तीनही साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळलेत. बी.रघुनाथ यांनी सन १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला.त्यांची पहिली कविता हैद्राबाद येथिल "राजहंस" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिध्द झाली. नंतर मात्र त्यांनी बी.रघुनाथ या नावाने लेखन केले.
बी.रघुनाथ यांच्या लेखनकालाचा आढावा घेता एकीकडे दुसरे महायुध्दाचे परिणाम, भारतात सुरु असलेले स्वातंत्र्य संग्राम आणि दुसरीकडे महाराष्ट्रात परिवर्तनाच्या वळणावर असलेले साहित्य तर
घरातील बेताची आर्थिक परिस्थिती अशा विविध वास्तवांना सामोरे जात त्यांचे लेखन बहरतच गेले, आणि त्यांनी साहित्य क्षेत्रात अभिनव कर्तृत्व सिध्द केले.
"आज कुणाला गावे ?" या रचनेत समाजात सर्वत्र विखुरलेली अराजकता,दांभिकता,अन्याय,कपट या वास्तवात जगणारे सर्वसामान्य व त्यांचे जीवन यांचा वेध घेतांना ते म्हणतात :

वेश स्वदेशी,घोष सभांतून
देव देखणे भुललो पाहून
वरवरचा परि शेंदूर त्यांचा
कसले स्तवन म्हणावे ?.....
........मीहि एक कवि जगातलां
माझा मजला मोह न सुटला
पोटामधल्या आगीसाठी
रचुनी कवन फुंकावे ?

जीवनाच्या आशयहीन आणि अर्थशून्य चक्रव्युहात आपण्ही अडकले आहोत याची खंत कवि या रचनेत व्यक्त करतो.
बी.रघुनाथ स्वातंत्र्यसमरचे एक साक्षीदार होते.स्वातंत्र्यानंतर विखुरलेल्या नेतॄत्वाखाली भारताची सावारण्याची धडपड त्यांच्या कवीदृष्टीतुन सुटली नाहि. नवीनतेच्या प्रवाहात जगण्यातील विसंगती त्यांना अस्वस्थ करते. या अस्वस्थ भावनांचा उपहासात्मक उद्रेक त्यांच्या " ती तुमच्यावर हसली रे " या रचनेत प्रत्ययास येतो.

ढवळ्यावरती फासा काळे
नितीमंदिरा लावा टाळे
करा चांगल्याचे वाटोळे
शतके ज्यामधे खचली रे
पाहुनि तुमच्या रंग यशाचे
अनुकारित लय आवेशांचे
गिरवित विक्रम पराक्रमांचे
कळी कलीची खुलली रे

हाच आवेश, हाच उपहास, हाच अवरोध त्यांच्या " या जगताची तृषा भय़ंकर " या रचनेत तीव्रतेने जाणवतो:

या जगताची तृषा भयंकर
या जगताची नशा भयंकर
या जगताचे ध्वंसन संचित
या जगताचे प्रलय विलासित
सजल सुपर्णी लक्ष योजने
खंड खंड रसगर्भ धरेचे
या जगताला सहज कराया
प्रांत रक्त सिंचित अस्थींचे

बी.रघुनाथ यांनी मनाची तळमळ मोजक्या आणि अर्थपूर्ण शब्दात व्यक्त केली आहे. रचनेतील शब्दांमधील तीव्रता नेमका आघात करते.मात्र जेव्हा कवि स्वत: या दांभिक-मुल्यविहीन व्यवस्थेचा एक घटक असल्याची खंत व्यक्त करतो तेव्हा कवितेतील वास्तवाचा उत्कट प्रत्यय येतो आणि असाह्यतेचा सूर नकळत उमट्तो.
बी.रघुनाथ यांच्या काही आत्मपर रचनांमधे उदासीनतेची लकेर जाणवते."पुन्हा नभाच्या लाल कडा" ही त्यांची एक उत्कृष्ट रचना:

उदासीनता माझी घेउनी
झुरे चांदणे सावल्यातुनी
मीच दिल्या नव तृष्णा फुलवुनी
पापणीने ढवळुन पाडिला
तम: सिंधुचा तळ उपडा

या ओळीत व्यक्त उदासीनता त्यांची वैयक्तिक आहे. पण कवि आशावादी असल्याने तो म्हणतो मीच दिल्या तृष्णा फुलवुनी. ज्याप्रमाणे एक ठिणगी काळोखात उजेड दाखवू शकते त्याप्रमाणे अश्रुचा थेंब मनाचा आरसा होउ शकतो. ही रचना कदाचित त्यांच्या अव्यक्त भावना कोणी जाणुन घेण्यासाठी लिहिली असावी. मात्र रचना वाचुन अंतर्मुखकवीमनाचा प्रत्यय येतो.
सामाजिक आणि वैयक्तिक जाणीवांपलीकडे बी.रघुनाथ यांची एक काव्यसृष्टी विलसत होती ती म्हणजे त्यांची ग्रामीण स्पर्शी कविता.या कविता वचल्यानंतर त्यांच्या शैलीतील वेगळेपणा प्रकर्षाने जाणवतो. "पडली बग झाकड", "टिचकी", "दुपार" या रचना ग्रामीण संदर्भामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.

पडली बग झाकड,लागली जिवास घरची वड
या सम्द्या शिवारातुनी
चिट्पाखरु नाही कुनी
झालं ज्वारं ही बग मुक्यावानी
घरकुलात मैना एकटीच, कर निघायेची तातड

तिन्ही सांज होताच दिवसभर शेतात राबणार्या शेतकर्याच्या मनात दाटून येणारी घरची ओढ या ओळीत व्यक्त केली आहे.पुढच्या ओळीत कवी म्हणतो :

जर उशीर होईल खिनभर
ती निवल ना भाकर
ते तोंड होईल गोरंमोरं
कळ इकड माझ्या उरात, वाटलं जर तिकडं अवघड

क्षणभराचा उशीर आपल्या मैनेची काय अवस्था करेल. या जाणीवेनीच शेतकर्याच्या मनाची घालमेल होते. एकाच वेळेला दोघांच्या मनातील व्याकुळ भाव आणि परस्परांचे प्रेम कवीनी मराठमोळ्या भाषेत अचूक टिपले आहे.
बी.रघुनाथ यांच्या कवितेते स्त्री संदर्भ विपुल प्रमाणात आणि विविध रुपात आढळतात.स्त्री-पुरुष नातेसंबधातील अनेक भाव त्यांनी कवितेते टिपले आहे."उन्हात बसली न्हात" या रचनेत एका अल्लड ग्रामीण युवतीचे वर्णन करतांना ते म्हणतात :

उन्हात बसली न्हात
दुपारचा एकान्त मोकळा
उघड्या आडोश्यात !
झोपडीची वाकडी साउली
भुलुनी भिईवर जरा थबकली
अनिमिष नयनी जलवेषांतील
ठरली चित्र पहात.

तर "ज्वार" या रचनेत एका गृहिणीचे वर्णन केले आहे, "तुजवर लिहितो कविता साजणी"," ते न तिने कधि ओळखले" या र्चना प्रेयसीला उद्येष्युन लिहिल्या आहेत."घन गरजे" आणि "लहर" या दोअन रचना धुंद प्रणयाने नटल्या आहेत. लहर या रचनेतील ओळी :

चला शिंपडा गुलाबपाणी
दिवे अत्तराचे उजळा कुणी
नवीच मुसमुस गाली गात्री आज हिच्या मोहरली ग !
**************************

कशाला मुखी पुन्हा तांबुल ?
गुलाब शोधित झुरुनी मेले काट्यांवर बुलबुल
पदर सरळ तरी भांग वाकडा
चारजणींचा तसा न मुखडा
खडा न टाकिल कोण चोरटी बघुनि हूल चाहूल !

या ओळी कवीच्या "कशाला मुखी पुन्हा तांबुल ?" या रचनेतील आहे. शब्दरचनेवरुन ती अवघ्या गावाला भुरळ पाडणार्या नखरेल नारीची आहे हे सहज ओळ्खु येते. या रचनेत कवीचा कल्पनाविलास
प्रत्ययास येतो. तर "नेस नवी साडी, उकल घड्या होई आड,लोटुनि अर्धे कवाड, जागवि या डोळ्यांच्या आज जुन्या खोडी" या नेस नवी साडी या रचनेतील ओळीं प्रौढ युगलाच्या आठवणींना उजाळा देउन जातात."मुलीस आला राग" आणि "चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली"या रचनेत पिता-पुत्री प्रेमाचे दर्शन होते

काहि दिसे भरलेले
रित्या बोळक्यात
गवसले आजवर
जे न रांजणात

बाहुल्यांशी खेळणारी लेक गावी जाता, तिचे खेळणे पाहून वडिलांच्या मनात दाटून आलेला गहिवर या ओळीत व्यक्त केला आहे.
स्त्री ची अनेक रुप त्यांच्या कवितेतेच नाहि तर त्यांच्या कथा -कादंबरीत ही अनुभवायला मिळतात."काळी राधा", "आकाश",या त्यांच्या उल्लेखनीय कथा ."हिरवे गुलाब","जगाला कळलं पाहिजे"
या हैद्राबाद संस्थांनातील सामाजिक आणि राजकिय जीवन व्यक्त करणार्या आणि स्त्री-प्रधान कादंबर्या. आहेत.स्त्री चे उदात्त ,निरागस बहुआयामी रुपे बी.रघुनाथांना मोहित करत असावी म्हणुनच त्यांचे गद्य आणि पद्य दोन्ही स्त्री-प्रधान आहेत.
प्रत्येक कवीची एक विशेष रचना असते ज्यामधे कवीच्या सर्व काव्यगुणाचां प्रत्यय येतो. कवीची अशी संपूर्ण रचना म्हणजे "सांज" :

गाउलीच्या पावलातं
सांज घरा आली
तुंबलेल्या आंचळात
सांज भरा आली "१"
आतुरल्या हंबराचा
सांज कान झाली
शिणलेल्या डोळुल्यांचा
सांज प्राण झाली "२"
माउलीच्या वातीतून
सांज तेल झाली
माउलीच्या गीतातून
सांज भाव प्याली "३"
माउलीच्या अंकावर
सांज फुल झाली
फुलासाठी निदसुरी
सांज भूल झाली "४"
वहिनीच्या हातातून
सांज सुधा झाली
वहिनीच्या हातासाठी
सांज क्षुधा झाली "५"
वहिनीच्या सुखासाठी
सांज चंद्र झाली
वहिनीच्या सुखासाठी
सांज मंद्र झाली "६"

इतक्या सहज-सोप्या आणि साध्या भाषेतील ग्रामीण जीवन दार्शन घडवणारी एक तरल कविता याचे विश्लेषण दुसर्या शब्दात मांडणे म्हणजे कदाचित कवितेवर अन्याय होईल. निसर्ग आणि मानवी नात्यांचा हा गोफ शब्द-दृष्य चित्रांच्या वीणेत इतका घट्ट गुंफला आहे कि त्या काळ्ची ही "सांज" आझी सुखावुन जाते.

बी.रघुनाथ यांच्या कवितेतून त्यांना जाणुन घेतानां प्रकर्षाने जाणवणार्या काही गोष्टी म्हणजे तालबध्द्ता- धृपद प्रधान-अल्पाक्षरत्व आणि गेयता, काही सुनीत रचनांवरुन त्यांच्या शिस्तबध्द वृत्तीची प्रचिती येते.कवीच्या सामाजिक कथा आणि काव्यातुन त्यांची समाजनिष्ठा प्रत्ययास येते. ग्रामीण स्पर्शी रचनांवरुन कवीची मातीची ओढ प्रत्ययास येते.कधी उत्कट कधी तरल संवेदना अचूक टिपणार्या या कवीने पारंपारिक संकेत ,त्याच प्रतिमा नावीन्याच्या कोंदणात बसव्ल्यामुळे त्याम्ची शैली इतरांपासून वेगळी आणि विशेष ठरते.बी.रघुनाथ यांनी कथा ,काव्य,कादंबरी हे तीनही साहित्यप्र्कार समर्थपणे हाताळलेत. परिवर्तनाच्या वळणावर असलेल्या साहित्यात. बहरणार्या रविकिरणमंडळाच्या आवर्ताबाहेर बी.रघुनाथ यांनी साहित्य क्षेत्रात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले.त्यांचे काव्य कर्तृत्व अभिजात आणि अभिनव आहे.

जीवनपट
कवी बी. रघुनाथ अर्थात भगवान रघुनाथ कुळकर्णी. यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१३ रोजी मराठ्वाडा जिल्हा परभणीतील सातोना या गावी झाला. वयाच्या १४व्यावर्षी (१९२७) वडिलांच्या मॄत्युपश्चात शिक्षाणासाठी हैद्राबादा येथे गेले परन्तु प्रतिकुल परिस्थितीमुळे मॅट्रीकपुढचे शिक्षण घेता आले नाही.
सन१९३२ साली परभणीतील बांधकाम विभागात करकुअन म्हणुन रुजु झाले.७ सप्टेंबर १९५३ रोजी कार्यालयात काम करत असतांना ह्रदयक्रिया बंद पडुन त्यांचे अकस्मात निधन झाले.बी.रघुनाथ यांनी सन १९३० ते १९५३ या तेवीस वर्षाच्या साहित्यप्रवासात एकूण १५ पुस्तकं लिहिलीत :
काव्यसंग्रह: आलाप आणि विलाप(१९४१), पुन्हा नभाच्या लाल कडा(१९५५)
कथासंग्रह:साकी(१९४०), फकिराची कांबळी(१९४८), छागल(१९५१), आकाश(१९५५),काळीराधा(१९५६)
कादंबरी:ओ॓”””(१९३६), हिरवे गुलाब( १९४३), बाबू द्डके(१९४४),उत्पात(१९४५), म्हणे लढाई संपली(१९४६), जगाला कळलं पाहिजे( १९४९), आड्गावचे चौधरी( १९५४),
अलकेचे प्रवासी हा स्फूट लेखन संग्रह(१९४५)

Comments

छान ओळख

बी. रघुनाथ यांची छान ओळख करून दिली आहे. उद्धृत कवितांचे उतारे आवडले.

उपक्रमावर स्वागत आहे.

हेच म्हणतो.

बी. रघुनाथ यांची छान ओळख करून दिली आहे. उद्धृत कवितांचे उतारे आवडले.
उपक्रमावर स्वागत आहे.

हेच म्हणतो.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

चांगली ओळख

रघुनाथांच्या कादंबर्‍यांबद्दल अजून थोडे विस्तृत वाचायला आवडले असते. पहिल्या दोन कविता वाचून त्यांच्या राजकीय दृष्टीकोनाबद्दलही कुतूहल वाटते; अधिक माहिती असल्यास वाचायला आवडेल.
(लेखाचे फॉर्मॅटिंग संपादकांना सुधारता येईल का? परिच्छेद मोठे पाडले तर कविता वाचायला जास्त सोपे जाइल...)

छान

असेच म्हणते.

लेखाचे फॉर्मॅटिंग सुधारता आले तर वाचायला सोपे पडेल.

कवितांचा काळ

रघुनाथांची ओळख आणि कविता आवडल्या. कवितांचा काळ समजला असता (विशेषतः राजकीय) तर अधिक समजले असते.

प्रमोद

+१

रघुनाथांची ओळख आणि कविता आवडल्या. कवितांचा काळ समजला असता (विशेषतः राजकीय) तर अधिक समजले असते.

असेच म्हणतो

उपक्रमावर स्वागत! :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

कवि बी

बी. रघुनाथ हे कवि बी ('चाफा बोलेना', 'गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या') तर नाहीत ना अशी क्षणभर शंका आली पण थोडा शोध घेतल्यावर हे दोघे वेगळे होते असे लक्षात आले. कवि बी ह्यांच्याबद्दल येथे पहा.

 
^ वर