श्वान दिन

इंग्रजीमधे एक फ्रेज आहे, श्वान दिन (Dog Days) या नावाची. हे श्वान दिन असतात तरी कसे? अत्यंत दगदग, चिडचिड, मनस्वी उकाडा, चिकचिकाट आणि आत्यंतिक कष्ट करायला लावणारे दिवस म्हणजे श्वान दिन असा या शब्दांचा अर्थ सध्या तरी लावला जातो. मात्र या अशा त्रासदायक दिवसांना श्वान दिन असे का म्हटले जाते याच्या मागचे कारण अगदीच निराळे आहे. या फ्रेजमधला श्वान आहे तो काही अवनीतलावर असलेला कोणी कुत्रा नाही. हा श्वान आहे, अवकाशातील एक तारका समूह. मोठा कुत्रा किंवा कॅनिस मेजर (Canis Major) या नावाने हा तारका समूह ओळखला जातो. या तारका समूहाची ही ओळख भारतीय मात्र नाही. ती आहे ग्रीक पुराणांतून आलेली! आपल्याकडे या तारका समूहाला नावच नाही. या तारका समूहातला प्रमुख तारा म्हणजे सर्व आकाशस्थ ज्योतींपैकी अत्यंत तेजस्वी व पहिल्या प्रतिचा असलेला व्याध किंवा सिरियस (Sirius) हा तारा.

शरद संपात (22 सप्टेंबर) दिनाच्या एक किंवा दोन महिने पूर्वकालात, हा तारका समूह, सूर्योदयाच्या काही क्षण आधी, पूर्व क्षितिजावर दिसू लागतो व या नंतरचे पुढचे सहा महिने तो रात्री दिसतच राहतो. उत्तर गोलार्धातील देशांच्यात हा काल आत्यंतिक उकाड्याचा व एकूण जिकिरीचा व त्रासदायक असतो आणि त्यामुळेच या त्रासदायक दिवसांना श्वान दिन असे नाव दिले गेलेले आहे.

लोकमान्य टिळकांनी आपल्या ‘ओरायन‘ या ग्रंथात या श्वान दिनांची एक मोठी रोचक उत्पत्ती दिलेली आहे. त्यांच्या मताने, मध्य एशिया मधे वास्तव्य करणार्‍या ऋग्वेदकालीन आर्यांना, हा कॅनिस मेजर तारका समूह, शरद संपात दिनाच्या आधीचे थोडे दिवस दिसू लागत असे. त्यांच्या धर्मशास्त्राप्रमाणे देवांना हविर्भाग देण्याची सर्व धर्मकृत्ये, शरद संपात दिनाच्या आधी संपवणे आवश्यक असे. या दिनानंतर दक्षिणायन किंवा अशुभ काल सुरू होत असल्याने, ही धर्मकृत्ये शरद संपात दिनाच्या आधी संपवावी लागत. या कारणामुळे एकदा कॅनिस मेजर तारका समूह पहाटे दिसू लागला की वर्षभराची धर्मकृत्ये संपवण्याची एकच लगबग व गडबड, ऋग्वेदकालीन आर्यांची सुरू होत असे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे दिवस कष्टदायक व दगदगीचे असत. तेंव्हा पासून शरद संपात दिनाच्या आधीच्या कालातील या दिवसांचे, श्वान दिन असे नामकरण झाले असावे.

मला असे नेहमी वाटायचे की आपणा सर्वांना कधी ना कधी तोंड द्यायला भाग पाडणार्‍या या अशा दगदगीच्या व त्रासदायक दिवसांना, श्वान दिवस म्हणू नये. आकाशातल्या ज्योतींचा आपल्या हालअपेष्टांशी काय संबंध? आणि कुत्र्यासारख्या माणसाच्या एका सच्च्या व प्रामाणिक मित्राचा संबंध, कशासाठी या नको नको वाटणार्‍या दिवसांशी जोडायचा? तसे बघायला गेले तर प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे हे श्वान दिन वर्षाकाठी निरनिराळ्या वेळीच येत असतात. समग्र विद्यार्थी वर्गासाठी परिक्षेच्या आधीचे दिवसच श्वान दिन असतात. तर हिशेब तपासनीस किंवा बॅन्क कर्मचार्‍यांसारखे आर्थिक उलाढालींशी संबंध असलेल्यांसाठी हे श्वान दिन, आर्थिक वर्ष समाप्त होण्याच्या (31 मार्च), आधीचे काही दिवस असतात. महाराष्ट्रातल्या पोलिसांसाठी हे श्वान दिन नक्कीच गणेशोत्सवाचे दिवस आणि कोणी बडा पदाधिकारी भेट देणार असण्याच्या वेळचे असतात. तर महिन्याचा खर्च आणि उत्पन्न यांची ताळमेळ कशी घालायची? या विवंचनेत असलेल्या सर्वसामान्यांसाठी, हे श्वान दिन प्रत्येक महिन्याच्या शेवटी येत असतात. फॅशन आणि लाईफस्टाईलच्या बाबतीत अतिशय आग्रही असलेल्या मंडळींसाठी, शेजारणीने आणलेली ब्रॅन्डेड पर्स किंवा ऑफिसमधल्या कलीगने घेतलेली कोरी करकरीत गाडी बघितली की पुढचे काही दिवस श्वान दिवसच होतात. थोडक्यात काय, की प्रत्येक व्यक्तीचे श्वान दिन निरनिराळ्या वेळी येतात.

परंतु या वर्षीचा भारतातला घटनाक्रम बघितला तर ऋग्वेदकालीन आर्यांनी लावलेला कॅनिस मेजर या तारका समुहाचा पूर्व दिशेकडचा उदय व दगदगीचे व त्रासाचे दिवस सुरू होणे यातील परस्पर संबंध निदान राजकारणी व राजकारणाशी संबंधित मंडळींसाठी तरी खासच बरोबर ठरतो आहे. माध्यमे आणि माहिती अधिकार कायद्यामुळे मिळालेल्या माहितीमुळे दररोज नवीन नवीन माहिती उजेडात येते आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील मंत्र्यांचे परस्पर वाद विवाद चव्हाट्यावर येत आहेत. बेलारीच्या खाणींतून खनिजे बाहेर काढून त्यावर अमाप नफा मिळवणारे एक राजकारण संबंधी, हैद्राबादच्या तुरुंगात त्यांच्यासारख्याच एका दुसर्‍या बड्या उद्योगपतींबरोबर बॅडमिंटन खेळून श्वान दिन व्यतीत करत आहेत. . तर बडे बडे नेते दिल्लीच्या तिहार तुरुंगाचे हवा पाणी चाखत श्वान दिनांची मजा अनुभवत आहेत. मात्र श्वान दिनांचा सर्वात मोठा त्रास या नेते मंडळींना खरा कधी सुरू झाला असेल तर तो महाराष्ट्राच्या कोपर्‍यातल्या एका खेडेगावातील एका म्हातार्‍याने दिल्लीत केलेल्या उपोषणानंतर! परिणामी एका राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांना, खोडसाळ आरोप केल्याने, बिनशर्त लेखी माफी मागावी लागली आहे तर अनेक मंत्री तेंव्हापासून चूपच बसले आहेत.

श्वान दिनांचे महत्व असे आहे. शेवटी ऋग्वेद लिहिणारे आर्य चूक कसे ठरतील? निदान दिल्लीकरांना तरी तसे वाटत असले तर ते स्वाभाविकच आहे.

27 सप्टेंबर 2011

लेखनविषय: दुवे:

Comments

स्वागत!

चंद्रशेखर, येत चला - लिहित चला.

माहिती रोचक वाटली पण लेखाचा उद्देश ध्यानात आला नाही. :-)

सिरिअस म्हणजे व्याध म्हणजे मृग नक्षत्रातीलच व्याध ना!

अजूनही लेख टाका. लिहिले असतीलच तुम्ही काहीतरी नवे.

लेख वाचला!

शीर्शक वाचून लेख वाचायला घेतला त्यावेळी वाटले होते की 'एव्हरी डॉग हॅज हिज डेअज्' ह्या इंग्रजी वाक्याशी संबंधित असेल असे वाटले होते. पण लेख वेगळा होता. माहिती माझ्यासाठी नवीन होती.

शेवटच्या दोन परीच्छेदावरून श्री. चंद्रशेखर यांची 'ग्रहतार्‍यांचा मानवी व मानवी समुहाच्या आयुश्यावरील परीणाम' या व अशाबाबतची मते बदलत आहेत, असे वाटते.

रोचक

रोचक माहिती, लेखाचा नेमका सूर कळत नाही, तरिही रन्जक माहिती.

+1

रञ्जक माहिती.

आण्णा चिंबोरी
पोट्टे काय बोलून राहिलेत बे!

गमतीदार

गमतीदार!

(आल्फा कानिस मेजोरिस तारा = व्याध तारा. नक्षत्रपथाबाहेरच्या ताककासमूहांची प्राचीन भारतीय नावे मला फारशी ठाऊक नाहीत.)

लेखामागचे विचार

हा लेख लिहिताना श्वान दिन हे एक उदाहरण म्हणून घेतले होते. मानवी जीवनातील ताणतणाव व धकाधकी याच्याशी तारे , सूर्य यांचा ओढून ताणून संबंध लावण्याचा प्रयत्न अगदी पुरातन कालापासून कसा केला जातो आहे हे मला दर्शवून द्यायचे होते. आपण अजूनही राशी भविष्य. कोणत्या नक्षत्रावर जन्म झाला? वगैरे गोष्टींच्यावर विश्वास ठेवून ही परंपरा पुढे चालवतोच आहोत.
मात्र श्री रावलेसाहेबांचा प्रतिसाद वाचून हा लेख लिहिण्याचा माझा उद्देश असफल झाला आहे असेच म्हणावे लागेल.
चन्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

शेवटचा परिच्छेद

श्वान दिनाची माहिती तर छान होती.. परंतु शेवटचा परिच्छेद थोडासा गोंधळात टाकणारा झालाय.. रावले यांचा गैरसमज त्यामुळे झाला असेल.. (sarcasm पचला नसावा.. :D.. )

मनोरंजक आणि उद्बोधक

लेख वाचून dog-days ह्या phrase चा अर्थ लागला. ही phrase आपणा सर्वांच्या परिचयाची आहे पण मला असे वाटत होते की वाईट दिवसांचा थकावटीमुळे वाटणारा वाईटपणा दर्शविण्यासाठी त्यांना कुत्र्याची उपमा दिली आहे - जसे dog-tired ही अशीच परिचित phrase. नुसता वाईटपणा दाखविण्यासाठीदेखील हिंदी सिनेमांच्या चालीवर (कुत्ते-कमीने) वाईट दिवसांना कुत्र्याचा संदर्भ जोडला आहे असेहि वाटत होते. आता हे स्पष्ट झाले की हा वाईटपणा हे दिवस ऊष्म्याचे असतात अशा अर्थाचा आहे.

ह्या निमित्ताने टिळकांचे 'ओरायन'हि चाळले. तेथे ऊष्म्याऐवजी सूर्य आणि व्याध एकत्र उगवणे आणि त्यावरून नववर्षाचा प्रारंभ होणे एव्हढया मर्यादित अर्थाचाच उल्लेख मिळाला. मूळ लेखात सुचविल्याप्रमाणे ऋग्वेदकालीन आर्यांच्या 'धर्मशास्त्राप्रमाणे देवांना हविर्भाग देण्याची सर्व धर्मकृत्ये, शरद संपात दिनाच्या आधी संपवणे आवश्यक असे. या दिनानंतर दक्षिणायन किंवा अशुभ काल सुरू होत असल्याने, ही धर्मकृत्ये शरद संपात दिनाच्या आधी संपवावी लागत. या कारणामुळे एकदा कॅनिस मेजर तारका समूह पहाटे दिसू लागला की वर्षभराची धर्मकृत्ये संपवण्याची एकच लगबग व गडबड, ऋग्वेदकालीन आर्यांची सुरू होत असे. त्यामुळे त्यांच्यासाठी हे दिवस कष्टदायक व दगदगीचे असत. तेंव्हा पासून शरद संपात दिनाच्या आधीच्या कालातील या दिवसांचे, श्वान दिन असे नामकरण झाले असावे' असा अर्थ मात्र कोठेच दिसला नाही.

ओरायन

ओरायन ग्रंथातील १८० ते २०९ ही पृष्ठे वाचावीत
चन्द्रशेखर

मनोरंजक

लेख आवडला.
या निमित्ताने आकाशाशी अधिक ओळख झाली. (गुगल स्काय बघितले.) ओरायन (मृग+), मोठा कुत्रा, ज्यात व्याध आहे (कॅनिस मेजर) यांचे परस्पर संबंध कळाले. ग्रीकांच्या ८८ नक्षत्रांची थोडीफार ओळख झाली.

शरद संपात (22 सप्टेंबर) दिनाच्या एक किंवा दोन महिने पूर्वकालात, हा तारका समूह, सूर्योदयाच्या काही क्षण आधी, पूर्व क्षितिजावर दिसू लागतो व या नंतरचे पुढचे सहा महिने तो रात्री दिसतच राहतो. उत्तर गोलार्धातील देशांच्यात हा काल आत्यंतिक उकाड्याचा व एकूण जिकिरीचा व त्रासदायक असतो आणि त्यामुळेच या त्रासदायक दिवसांना श्वान दिन असे नाव दिले गेलेले आहे.

हे थंडीचे असले पाहिजे ना? (सहा महिने धरले तर).

नुकतेच वाचले की २४ जुलै ते २४ ऑगस्ट हे कुत्र्याचे दिवस म्हणून ओळखले जातात. आणि हे दिवस उकाड्याचे असतात हे खरे. येथील दुव्यानुसार हे दिवस थोड्या थोड्या वेगळ्या काळाशी जोडले गेले आहेत

दर ७१ वर्षांनी एक दिवस (२६०००/३६५) या वेगाने हा या नक्षत्राचे पूर्वे कडचे येणे बदलायला हवे. सुमारे २१०० वर्षांपूर्वी हा दिवस साधारण महिनाभर (पाच जून? ) ला हे नक्षत्र पूर्व क्षितिजावर दिसायला हवे. (अर्थात या वेळी कॅलेंडर नीटसे झाले नव्हते ही गोष्ट वेगळी.) सायन पद्धतीत (जी इंग्रजी कॅलेंडर पद्धत आहे) उकाड्याचे दिवस बदलत नाहीत (शीत-उष्मयुग फरक सोडल्यास). पण नक्षत्र उगवण्याचे (पूर्व क्षितिजावर येण्याचे) दिवस मात्र बदलतात. पूर्वी जून मधील नक्षत्र दिसायला लागल्यानंतर उकाड्याचे दिवस आले असे म्हणत असतील असे धरून चालू. हल्ली मात्र आपण महिनाभर पुढे गेलो आहोत. आणि तरीही त्यास कुत्र्याचे दिवस म्हणतो.

लेखाच्या निमित्ताने हे सगळे वाचायला मिळाले, धन्यवाद.

प्रमोद

थंडीचे दिवस

कॅनिस मेजर हे नक्षत्र थंडीच्या दिवसात दिसते हे खरे असले. तरी पुरातन काळी जेंव्हा ते पूर्वे क्षितिजावर सर्व प्रथम दिसू लागत असे तेंव्हा उकाड्याचे दिवस असत. त्यामुळे उकाड्याच्या दिवसांना श्वान दिवस हे नाव मिळाले.

न्द्रशेखर
Learning is not compulsory... neither is survival.

मृग नक्षत्र भारतीय / ग्रीक आणि व्याध

मृगा नक्षत्राबद्दल अनेकांना माहिती असेल पण वरील श्वानांपैकी ज्या व्याध तार्‍याविषयी चर्चा झाली आहे त्याच्या आनि मृग नक्षत्राविषयी थोडेसे:
आपल्याकडे मृग नक्षत्र हे आकाशात दिसणार्‍या ठळक नक्षत्रांपैकी एक. इतकेच नव्हे तर आपल्या कडे त्याविषयी कथा आहेत व ग्रीकांच्याही कथा आहेत दोघांना एकाच आकृतीत दिसणार्‍या गोष्टी त्या त्या प्रांतातील प्रधान घटकांकडे लक्ष वेधतात.
मृग नक्षत्र आकाशात असे दिसते:

ओरायन (मृग नक्षत्र + इतर तारे)

भारतीय मृग नक्षत्रात व्याध थेट येत नाहि मात्र त्याभोवतीच्या गोष्टीत त्याचे स्थान रोचक आहे

भारतीय कल्पनेत ही आकृती एका भांबावलेल्या मृगाची आहे. आपण मृगाचा बॉटम व्ह्यू घेत आहोत. भोवतीच्या चौकोनातील चार तारे (Betelgeuse, Bellatrix, Saiph, Rigel) हे मृगाचे पाय आहेत. खालील दोन पायांमधुन आलेली एक कमी प्रतीच्या तार्‍यांची अर्धगोलाकार माळ (IC430 पासून NCC1977) ही त्याने भदरून आत घेतलेल्या शेपटीचे प्रतीक आहे. तर geuse, Bellatrix मधील Meisa तारा व त्याभोवतीच्या दोन तार्‍यांनी मिळून मृगाचे डोके होते. (लक्षात ठेवा बॉटम व्ह्यु आहे :) )
आता हा मृग इतका घाबरलेला का बरे? अरेच्या त्याच्या पोटात तर बाण घुसला आहे (हेच ते तीन प्रसिद्ध एका रेषेतील व उच्च प्रतीचे तारे).. कोणी बरं मारला तो बाण? ती बाणाची रेषा मागे खेचली तर थेट पोहोचते एका तेजस्वी तार्‍याशी (रात्रीच्या आकाशातील सर्वात तेजस्वी 'तारा')..... हाच तो शिकारी ... 'व्याध'!!!

ग्रीक कल्पनेत ही वरील आकृती हीच एका शिकार्‍याची आहे. (वरील तारे + आजुबाजुचे तारे) त्यातील तीन तारे हा त्याच्या कमरेवरील पट्टा आहे. हातात शस्त्र आहे, एका हातात आसूड आहे आणि तो दोन श्वानांच्या गाडीवरून चालला आहे. त्यातील एक तेजस्वी श्वान म्हणून आपल्यासमोर येतो Sirius (भारतीय व्याध! :) )

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

तीन हरिणे

जातक कथामंध्ये कुठेतरी याच वर तीन हरिणे आणि एक शिकारी अशी कथा आहे असे मला एकाने सांगितले होते.

तीन हरणे (जो ओरायन मधील तलवार आहे, वा मृग नक्षत्रात बाण आहे) एका मैदानात/तळ्यात (चार तारे हे मैदान दाखवते) (हरिणे का पक्षी असा एक संभ्रम माझ्या मनात आहे.) आहेत. एक शिकारी त्यांची शिकार करणार असतो. तिन्ही हरिणांनी वेगवेगळ्यावेळी शिकार्‍याकडे थोडी मुभा मागितलेली असते. (तिघेही आई बाप मुल अशा काहिशा नात्यात आहेत.) आणि शिकार्‍याला सांगितले असते की अमुक वेळी आम्ही तुझी शिकार होण्यास येऊ. आपल्या वचना प्रमाणे तिघेही जण शिकार्‍याकडे येतात. (आणि त्यातून मोक्ष/बुद्धत्व मिळते.).

ही कथा शोधायचा प्रयत्न करून जालावर सापडली नाही.

प्रमोद

उत्तम माहिती

उत्तम माहितीचे संकलन. मला स्वत:ला या नक्षत्राचा आकार मृगापेक्षा शिकार्‍यासारखा जास्त भासतो.
चन्द्रशेखर

डोक्यावर

हे नक्षत्र मला उगवताना शिकार्‍यासारखे भासते कारणे ते वरील चित्राशी (आणि बर्‍याचशा खगोलविषयक पुस्तकातील आकृतीशी) साधर्म्य दाखवते..
मात्र हे नक्षत्र थेट डोक्यावर आल्यावर मात्र मृगाची कल्पना अक्षरशः भुरळ घालावी इतकी चपखल बसते.. एकदा हे नक्षत्र खास डोक्या यायच्यावेळी बघा आणि मग सांगा :)

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

 
^ वर