ही चित्रे कोणी प्रचारात आणली?

?
?

वरील चित्रे पाहाताक्षणीच ती कोणाची आहेत हे आपण ओळखतो इतका जनमानसाचा पगडा ह्या चित्रांनी घेतला आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की ही चित्रे कशी तयार झाली आणि कोणी ती प्रथम प्रचारात आणली? आपल्याकडे चित्रे काढून ठेवण्याची प्रथा जवळजवळ नव्हती असे म्हटले तरी चालेल. ह्याचा अर्थ असा की कोणी कल्पक व्यक्तींनी छपाईकला सुरू झाल्यानंतरच्या काळात ती ती चित्रे प्रचारात आणली आणि त्या चित्रांचा आपल्यामधील भाविक मनांवर एव्हढा संस्कार झाला आहे की कळत-नकळत तुकाराम वा एकनाथ वा अन्य कोणी तसाच दिसत असणार असे आपण गृहीत धरूनच चालतो. त्यामुळे विष्णुपंतांचा तुकारामहि तसाच दिसायला लागतो.

माझी एक काकू चांगली कॉलेजशिक्षित आहे पण श्रद्धाळूहि आहे. तुकारामबुवा असेच दिसत होते काय असे मी तिला विचारले आणि वर लिहिलेला बुद्धिवादी - पक्षी अतिचिकित्सक - विचारहि सांगितला पण तिला तो पटल्याचे दिसले नाही!

वरच्या चित्रांचे मूळ निर्माते कोण असा शोध घेता येईल काय?

शिवाजीचीहि दाढी-जिरेटोपातली चित्रे आपण पाहातो. त्यांना थोडा आधार आहे असे म्हणता येईल. बर्‍याच वर्षांपूर्वी महाराष्ट्र सरकारच्या एका प्रकाशनात सोबतचे चित्र अधि़कृत

डच चित्रकाराने काढलेला शिवाजी
डच चित्रकाराने काढलेला शिवाजी

म्हणून छापलेले होते असे आठवते. शिवाजीच्या सुरतेवरील चालीच्या वेळी (पहिल्या की दुसर्‍या?) तेथील डच फॅक्टरीमधील एकाने प्रत्यक्ष पाहून हे चित्र काढलेले आहे असा समज आहे आणि तो खरा आहे असे मानण्यास जागा आहे कारण चित्राच्या वरच्या डाव्या कोपर्‍यात काही डच भाषेत लिहिलेला मजकूर आहे आणि त्यात थोडया वेगळया स्पेलिंगमधला 'शिवाजी' असा शब्द सहज लावता येतो. हे चित्र ऍम्स्टरडॅममध्ये संग्रहालयात आहे असेहि वाचल्याचे आठवते.

मॉस्कोमध्ये असलेले तथाकथित अस्सल चित्र
मॉस्कोमध्ये असलेले तथाकथित अस्सल चित्र

शिवाजीचे अजून एक अस्सल चित्र मॉस्कोमध्ये आहे असा दावा येथे केला गेला आहे. मला त्यात काही तथ्य दिसत नाही. एकतर माझ्या अतज्ञ नजरेलासुद्धा चित्राचे रंग फार bright आणि आजचे वाटतात. चेहेर्‍यामागचा light effect हाहि आधुनिक वाटतो. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे चित्राखाली मोडीमध्ये 'लेखनसीमा' असा शब्द स्पष्ट लिहिलेला आहे आणि ते शिवाजीचे 'हस्ताक्षर' आहे असाहि दावा खाली केला आहे, जणू काही शिवाजीनेच आपल्या चित्रांबाबत २०-२१व्या शतकात वाद होणार हे दूरदृष्टीने ओळखून चित्र authenticate करण्यासाठी आपली लफ्फेदार सही खाली ठोकली! जुना चित्रकार (जो जवळजवळ १०० टक्के अमराठी आणि मोडीमध्ये अनभिज्ञ असणार) 'शिवाजीचे चित्र' अशा अर्थाचे काही न लिहिता उत्तम वळणाच्या मोडीमध्ये 'लेखनसीमा' असे का लिहील ह्याचा काही उलगडा होत नाही. एवंच काय, बहुतेक करून कोणा आधुनिक चित्रकाराने स्वतःच हे चित्र काढून ते जुने आहे असे पाहाणार्‍यांना वाटावे म्हणून हा मोडी लिपीतला शब्द त्याला जेथे कोठे सापडला तेथून copy-paste मार्गाने तो चित्राच्या तळाशी डकवून दिला आहे. त्याला तो शब्द वाचता आला नाही आणि अन्य बहुसंख्य जनांनाहि तो वाचता येणार नाही अशी त्याची खात्री आहे.

शिवभक्त मावळयांच्या मनात मात्र असले चिकित्साखोर विचार येत नसल्यामूळे त्यांच्या शिवभक्तीला आलेला पूर चित्राखालच्या comments मध्ये दुथडी भरून वाहतांना दिसत आहे.

लेखनविषय: दुवे:

Comments

लेखनसीमा!

लेखनसीमा!
मजा आहे. (निरक्षर नकलकार.)

यावरही पूर्वी चर्चा झाली आहे

शिवाजीच्या या चित्रांवरही उपक्रमावर पूर्वी चर्चा झाली आहे. आता शोधावयास कंटाळा येतो.

चित्रशोध

चित्रशोध घेतल्यास चांगले प्रकल्प होऊ शकतील.
असेच काही प्रश्न.
राम- कृष्ण निळ्या रंगात दाखवतात (विष्णुचे इतर अवतार तसे दिसत नाहीत.) हा निळा रंग कधीपासून आला असेल?
ऋषी,मुनींच्या दाढ्या आणि डोक्यावर बांधलेल्या जटा,
गौतम बुद्धाची विशिष्ट बसण्याची पद्धत आणि डोक्यावरचे बांधलेले केस.
दत्ताचे तीन तोंडांचे रूप ज्यास दाढी नाही पण डोक्यावरचे केस बांधलेले,
चाणक्याचे टक्कल-शेंडी,
राणाप्रतापाचे शिरस्त्राण,
इत्यादी.

चांगल्या कलाकाराची (चित्रकार/मूर्तिकार/नट) ही देणगी असू शकेल. कित्येक चित्रांची सुरुवात राजा रविवर्मा यांच्या चित्रात दिसते.
तसेच बाबुराव पेंटर, दलाल, पंडित इत्यादिंच्या चित्रांचे साधर्म्य पुढील चित्रकारांच्या चित्रात दिसते.

भारतात चित्रकारीतेची फारशी चांगली परंपरा दिसत नाही. त्याच बरोबर कित्येक जुनी चित्रे अजून बाहेर आली नसावीत. लघुचित्रे (मिनिएचर) भारतीय लिखाणात भरपूर सापडतात. मी असे ऐकले होते की अगदी रामदासस्वामींच्या हस्तलिखितात स्केच स्वरूपाची चित्रे असत. असेही ऐकले होते की औंध संस्थानाकडे जवळपास ५००० लघुचित्रांचा संग्रह आहे. या लघुचित्रांवरून काही परंपरा आल्या असतील.

मूर्तीकारांकडून काही प्रतिमा तयार होतात. झाशी राणीचे पाठीवर बाळाला बांधून घोड्यावर टाच मारलेली मूर्ती (नागपूर) अशीच डोळ्यासमोर येते. देवी देवतांच्या मूर्ती, बुद्धाच्या मूर्ती अशा विविध ठिकाणी आढळतात.

अशा एका व्यक्तिच्या काळानुरुप बदललेल्या प्रतिमा हा एक चांगला चित्रशोध प्रकल्प होऊ शकतो. कोणी केला असेल तर बघायला आवडेल. (अशी प्रदर्शने म्युजियम्स करू शकतात, माझ्या पहाण्यात ती आलेली नाही.)

एक चांगला प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद.

प्रमोद

तुकाराम

लेखात दिसणारे तुकारामाचे चित्र प्रभातच्या "संत तुकाराम" चित्रपटात काम करणारे विष्णुपंत पागनीस यांचे असावे. चित्रपटाच्या आधीपासून हे चित्र प्रचलित असल्याचे समजल्यास आश्चर्य वाटेल.

 
^ वर