बुद्धिप्रामाण्यवाद
बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजे स्वतःच्या विवेचक बुद्धीला जे पटतं त्यावर विश्वास ठेवणं नी त्याच्या आधारावर कृती करणं. ही व्याख्या परिपूर्ण आहे असं मी म्हणत नाही. पण ती चूक आहे असंही म्हणता येणार नाही. तसा प्रत्येक माणूस काही अंशी बुद्धिप्रामाण्यवादी असतोच. पण तुम्ही बुद्धिप्रामाण्यवादाचा पुरस्कार करू लागलात की कर्मकांडाचा पुरस्कार करणारे, स्वतःला अध्यात्मिक समजणारे, निखळ बुद्धिप्रामाण्यवादाच्या विरोधात जे मुद्दे मांडतात त्यांचा परामर्श या लेखात घेतला आहे.
मुद्दा क्रमांक १ : मानवी बुद्धीला मर्यादा आहे.
उत्तर - सनातन धर्मवाल्याला जर त्यानी सांगितलेल्या गोष्टी बुद्धीला पटणार्या नाहीत असं सांगितलं तर तो म्हणतो, 'मानवी बुद्धि मर्यादित आहे. बर्याच गोष्टी तिच्या आकलनापलीकडच्या आहेत. त्यामुळे काही गोष्टींवर विश्वास ठेवणं आपल्या हिताचं नी अपरिहार्य आहे (म्हणून मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा)'. नीट विचार केला तर "मानवी बुद्धीला मर्यादा आहे" हे विधान, आजपर्यंतचा मानवाच्या बौद्धिक विकासाचा इतिहास पाहता, खरं नाही असं आढळून येईल. मानवी बुद्धि ही विकसनशील आहे. तिचा वापर करत राह्यल्यानी, तिला वैचारिक खाद्य पुरवल्यानी, ती वाढत जाते नी सुरवातीला अगम्य वाटणार्या गोष्टींचंही आकलन होऊ लागतं. काही शतकांपूर्वी निसर्गातल्या ज्या गोष्टी बुद्धीच्या आवाक्याबाहेर समजल्या जात होत्या (नी ज्याचा ताबा आपण कुठल्यातरी अज्ञात महाशक्तीकडे आहे असं समजत होतो) त्या आता बुद्धिगम्य झाल्या आहेत हे मानवी बुद्धि ही वाढत जाणारी गोष्ट आहे याचंच निदर्शक नाही का? पण जर आपण बुद्धि गुंडाळून ठेवली, कुठल्याही घटनेचा कार्यकारणभाव समजून घेण्याऐवजी कुठल्यातरी अज्ञात शक्तीची इच्छा म्हणून तिच्याकडे पाहू लागलो, तर आपल्या बुद्धीला शैथिल्य येईल नी आज बुद्धीनी समजणार्या गोष्टीही पुढील काळात हळूहळू "बुद्धीच्या कक्षेबाहेर" म्हणून सोडून द्यायची आपल्याला संवय लागेल ज्यामुळे आपल्या बुद्धीचा संकोच व्हायला लागेल.
मुद्दा क्रमांक २ : अनेक थोर वैज्ञानिकही काही गोष्टींवर विश्वास ठेवतात नी काही गोष्टी बुद्धीच्या आवाक्याबाहेर असल्याचं मान्य करतात.
उत्तर - मुळात एखादा माणूस वैज्ञानिक आहे म्हणजे तो शंभर टक्के बुद्धिप्रामाण्यवादी असेलच असं नाही. तो त्याच्या क्षेत्रात कितीही मोठा असला तरी त्याला एखादी गोष्ट पटते म्हणून ती दुसर्यांनाही पटावी असा आग्रह धरणंच बुद्धिप्रामाण्यवादांत बसत नाही कारण बुद्धिप्रामाण्यवादात स्वतःच्या बुद्धीनी चालणं अभिप्रेत आहे. उदाहरणार्थ, एखादा शल्यविशारद रोग्यावर शस्त्रक्रिया करण्याअगोदर त्याची जन्मपत्रिका पाहून शस्त्रक्रियेची वेळ ठरवत असेल तर केवळ तो निष्णात शल्यविशारद आहे म्हणून त्याचा हा विचार इतराना पटलाच पाहिजे असं नाही.
तुम्हाला काय वाटतं?
Comments
बुद्धी म्हणजे 'डोक्यावरची शेंडी'?
बुद्धी म्हणजे मेंदु नाही मग,'बुद्धी' म्हणजे काय? ह्या प्रस्तावात हि बाब स्पश्ट झालेली नाही. पुन्हा त्यात भेद ही आहेत - 'स्थल, काल, व्यक्ती' यांनुसार. 'एका व्यक्तीची बुद्धी' आणी 'समस्त मानवी जातीची बुद्धी' ह्यात फरक आहेच कि!
'बुद्धीप्रामाण्यवाद' हा शब्द अगदी 'ठणठणीत कोरडा' वाटतो. आणी म्हणूनच हा शब्द 'जीवनात भावनेला कमी लेखणारी मंडळी' आपल्या बोलण्यात, लिहीण्यात जास्त वापरत असावी असे उगीचच वाटते. बहुधा हिच मंडळी ह्या शब्दाचे उगमकर्ते असावेत.
बुद्धीची मर्यादा
मराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |
" मानवी बुद्धि ही विकसनशील आहे. तिचा वापर करत राह्यल्यानी, तिला वैचारिक खाद्य पुरवल्यानी, ती वाढत जाते नी सुरवातीला अगम्य वाटणार्या गोष्टींचंही आकलन होऊ लागतं. काही शतकांपूर्वी निसर्गातल्या ज्या गोष्टी बुद्धीच्या आवाक्याबाहेर समजल्या जात होत्या (नी ज्याचा ताबा आपण कुठल्यातरी अज्ञात महाशक्तीकडे आहे असं समजत होतो) त्या आता बुद्धिगम्य झाल्या आहेत हे मानवी बुद्धि ही वाढत जाणारी गोष्ट आहे याचंच निदर्शक नाही का? "
***********************************
श्री.शरद कोर्डे लिहितातः
..
हा विचार पटण्यासारखा आहे.विज्ञानात नवनवीन शोध लागत आहेत.तंत्रज्ञानात प्रगती होत आहे.प्रत्यही नवनवीन सुख-सुविधा निर्माण होत आहेत.यावरून मानवी बुद्धीचा विकास ठप्प झालेला नाही.भविष्यकाळात ती मोठी झेप घेऊ शकेल.
चुकीची व्याख्या
स्वतःच्या बुद्धीला अनेक भ्रामक गोष्टी पटू शकतात पण त्यांना बुद्धिप्रामाण्यवादी म्हणता येत नाही. तद्वत बुद्धिप्रामाण्यवादाची व्याख्या चूक आहे, अपरिपूर्ण नाही.
_____
द सुप्रिम ट्रायम्फ ऑफ रिजन इज टू कास्ट डाउट अपॉन इट्स ओन वॅलिडिटी.
अवांतर....!
'चूकीला' देखील व्याख्या असते? शीर्शक वाचताना मला असा प्रश्न पडला.
'ची', 'चे' हि अशी प्रत्यये कधी, शब्दांच्या कोणकोणत्या पदार्थरूपाला (अर्थाच्या वैशिश्ठ्यानुसार विभागणी केली तर..) यायला हवीत? किंवा येता कामा नयेत? ह्या बाबती लिहीताना माझा भारी गोंधळ होतो.
'गायीचे दुध' - असं वाचताना हे ठिक वाटते. पण..
'गायीचे तूप' - असं वाचलं कि गोंधळ होतो.
प्रतिसाद तुमच्या चूका दाखवण्यासाठी लिहीलेला नाही.
धन्यवाद
तुम्ही सांगता तसा गोंधळ होतो खरा.
'चूकेची व्याख्या' असे शीर्षक नाही. 'चुकीची' हे विशेषण म्हणून वापरलेले आहे. 'चुकीचे विश्लेषण' आणि 'चूकेचे विश्लेषण' यात जसा फरक आहे तसा फरक करता येणे शक्य आहे. तरीही 'व्याख्या चूक आहे' हे शीर्षक अधिक सुस्पष्ट असू शकले असते असे तुमचे मत असल्यास ते मला मान्य आहे. माझा व्याकरणाचा फारसा अभ्यास नसल्याने आणि सध्या त्यावर विचार करण्याचा मुड नसल्याने तुमच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास असमर्थ आहे.
का नाही?
>>'चूकीला' देखील व्याख्या असते?
"जे बरोबर नाही ते चूक" (अंधाराच्या रूढ व्याख्येसम)
प्रतिसाद हळू घेणे.