कागदी पुस्तकांचा अंतकाळ जवळ आला आहे का?

बॉर्डर्स ही अमेरिकेतील पुस्तकांच्या दुकांनाची साखळी शेवटचा आचका देऊन गेल्या आठवड्यात गार झाली. गेले काही महिने तेथील माल कमी दराने विकला जातो आहे हे सांगणार्‍या इमेल्स येत असत. बंद झालेल्या या प्रचंड ओक्या बोक्या दुकानाला शेवटची भेट देताना मनापासून वाईट वाटले.

दिवाळखोरी ही काही अमेरिकेत नवी गोष्ट राहिलेली नाही. उतरणार्‍या नफ्यामुळे गेली काही वर्षे बॉर्डर्सची नौका डुचमळतच होती. कधी बार्न्स आणि नोबेल्स हा व्यवसाय विकत घेत आहे तर कधी ऍमेझॉनपासून वेगळे होऊन स्वतःची वेबसाइट सुरू करणार आहे, कधी भरमसाठ डिस्काउंट्स अशा अफवा, सत्यकथांतून मार्ग काढता काढता बॉर्डर्सचे तारू अखेर बुडले.

-----------

खालील संवाद गेल्या आठवड्यात मॉलमध्ये बॉर्डर्सचे बंद दुकान पाहून घडला.

"शेवटी एकदाचे बॉर्डर्स बंद झाले."
"हम्म! हल्ली पुस्तकं वाचतो कोण?"
"काहीतरीच काय? तू वाचत नसशील पण मी वाचते की."
"मला माझ्या बिझी शेड्युलमध्ये रोजचं वर्तमानपत्र वाचायला वेळ मिळाला तरी खूप. तसंही मी वर्तमानपत्र हातात धरलेलंच नाही गेल्या कित्येक वर्षांत. नेटावरच वाचतो. तू कुठलं पुस्तक खरेदी केलंस हल्ली?"
"भारतातून आणली होती ७-८."
"इथे कुठलं खरेदी केलंस?"
"अम्.... हेल्दी लिविंगवर घेतलं होतं एक."
"हार्ड कव्हर की पेपरबॅक?"
"इ-बुक आहे."
"पेपरकॉपीपेक्षा स्वस्त होतं का?"
"अर्थातच."
"म्हणजे कागदी पुस्तकांची गरज नाही. आयफोन, आयपॅड, इ-रिडरच्या जमान्यात कागदी पुस्तके मागे पडत जाणार. त्यातून त्यांची इतकी मोठी शो रुम्स असायची गरज नाही. इंटरनेटवरून मागवताही येतात. $२५-५० च्या वर खरेदी केली तर शिपिंग चार्जेसही भरावे लागत नाहीत."
"हम्म! कथा कादंबर्‍या वाचणं तर मी कधीच बंद केलं आहे. त्यांची ऑडियो बुक्स मिळतात. गोष्ट वाचण्यापेक्षा जर कोणी अतिशय रसाळ शब्दांत गोष्ट वाचून दाखवत असेल तर बरं वाटतं. तसंच मल्टीटास्किंगही करता येतं. त्यातून जी जुनी पुस्तकं आहेत त्यांच्या पीडीएफ इतक्या गोळा झाल्या आहेत लॅपटॉपवर की पुढली २-३ वर्षे सहज निघतील त्या पुस्तकांमध्ये."
"झालं तर! नवी टेक्नॉलॉजी अंगी बाणवली नाही तर माणूस मागे पडतो. जुनं मागे पडतं, नवं येतं."

---------

बॉर्डर्सची साखळी बंद झाली याचे शल्य अद्यापही माझ्या मनात आहे. लवकरच मॉल्समधल्या या प्रचंड दुकानाच्या जागी दुसरं काहीतरी उभं राहिल.

  • कागदी पुस्तकांचा जमाना, बुकडेपोंचा जमाना मागे पडतो आहे असं तुम्हालाही वाटतं का?
  • बुकडेपोंची गरज आहे असे तुम्हाला वाटते का?
  • अमेरिकेच्या धर्तीवर भारतातल्या बुकडेपोंची आणि क्रॉसवर्ड वगैरे मॉलसंस्कृतीची अवस्था कशी आहे?
लेखनविषय: दुवे:

Comments

माझे मत

पुस्तक डीजीटायझेशन च्या लेखानंतर तुमचा हा लेख माझ्या मनातील बऱ्याच भावनांशी रीलेट करतो.

माझ्यामते ह्या लेखाच्या निमित्ताने 'डीजीटायझेशन ची गरज', 'कागदी पुस्तक वाचण्याचे फायदे-तोटे' ह्यावर चर्चा होऊ शकेल. तुमच्या लेखाचा तो हेतू आहे कि नाही हे मी जाणत नाही, तसे असल्यास त्यावर वेगळे मत देईन.

तूर्तास तुमच्या प्रश्नांचे माझे उत्तर -
कागदी पुस्तकांचा जमाना, बुकडेपोंचा जमाना मागे पडतो आहे असं तुम्हालाही वाटतं का?
नाही, आजमितीला निदान पुण्यात तरी पुस्तके वाचणाऱ्यांची संख्या बरीच आहे असे वाटते, माझ्या माहितीत जवळपास बरीच क्लासिक पुस्तके डीजीटाइझ्ड स्वरुपात उपलब्ध आहेत तरीही पुस्तके घेणाऱ्यांची संख्या बरीच असल्याचे दिसते*

बुकडेपोंची गरज आहे असे तुम्हाला वाटते का?
हो, पुस्तके विकत घेण्यासाठी एक सोय म्हणून.

अमेरिकेच्या धर्तीवर भारतातल्या बुकडेपोंची आणि क्रॉसवर्ड वगैरे मॉलसंस्कृतीची अवस्था कशी आहे?
ठीक आहे, पुस्तकांवर सवलत मिळत नाही, जनरल दुकानात ओळखीमुळे सवलत मिळू शकते, पण क्रॉसवर्ड मध्ये पुस्तक वाचून मग विकत घेता येते, ही सोय नक्कीच छान आहे.

*पुण्यातील अप्पा बळवंत चौकातील एका दुकानातील माणसाच्या निरीक्षणानुसार.

त्या दिशेने चर्चा जायला

माझ्यामते ह्या लेखाच्या निमित्ताने 'डीजीटायझेशन ची गरज', 'कागदी पुस्तक वाचण्याचे फायदे-तोटे' ह्यावर चर्चा होऊ शकेल. तुमच्या लेखाचा तो हेतू आहे कि नाही हे मी जाणत नाही, तसे असल्यास त्यावर वेगळे मत देईन.

त्या दिशेने चर्चा जायला हरकत नाहीच. तुम्ही अवश्य नवा प्रतिसाद द्या. हा मी ब्लॉक केला म्हणून. ;-) स्वारी!

पण केवळ भारतातील सद्यस्थिती एवढेच लक्षात घेऊ नका अशी विनंती. भविष्यात काय होईल, जे अमेरिकेत घडते आहे तेच भारतातही अजून १० वर्षांत घडेल असे वाटते का?

आणखी एक मुद्दा म्हणजे नवी पिढी काय पसंत करते?

अवांतर...!

चर्चेची दिशा कशी असायला हवी हे प्रियाली बाई ठरवतीलच! पण चर्चेच्या प्रस्तावातले शीर्शकावरून असे वाटते कि 'वाचन संस्कृतीबाबत भवीश्यात काय काय घडू शकते?' अन् तसे मानले तर,
जसे दृश्टीहिन जसे स्पर्शाने वाचतात, अगदी तसेच 'स्पर्शातून वाचण्याची क्रिया' सामान्य देह असणार्‍यांना शिकवली व त्यानुसारची आयपॉड सारखी गॅजेट आली तर काय गंमत होईल. केवळ स्पर्शांना जी तरंगे, लहरी जाणवतील त्यातूनच माहिती मिळत जाईल, द्न्यान मिळत जाईल. शब्द, वाक्य नाहिसेच होतील, जे मिळाले ते सांगताना देखील व्हिडीओफोनद्वारे हातवारे वा इतर गॅजेटमधून लहरी पाठवल्या जातील.

'जिव्हाळ्याचा विषय'

ह्या विषयावर (थोडे) लिहायचे आहे, कृपया उप-प्रतिसाद देउ नये :)

धन्यवाद प्रियाली हा विषय चर्चेला आणल्याबद्दल.

कागदी पुस्तकांना पर्याय नाही

गेल्या ३ वर्षात मी जी पुस्तके वैयक्तीक रीत्या (फक्त माझ्यासाठी) खरेदी केली ती ८०% सेकंड हँड, १५ % ऍमेझॉन वरून आणि ५% बॉर्डर्स, बार्नस अँड नोबल मधून घेतली. एक डिजीटल पुस्तक (ई - बुक म्हणा) वाचायचा अयशस्वी प्रयत्न केला. ई-बुक आवडले नाही.
११ वर्षाची माझी मुलगी खूप पुस्तके वाचते पण कागदी पुस्तके. अजून तरी तिला संगणकाने फारसे वेड लावले नाही. ही पुस्तके आम्ही ऍमेझॉनवरूनच घेतो कारण स्वस्त पडतात.
____________
कागदी पुस्तकांना पर्याय नाही असे मला तरी वाटते. कदाचित विशफुल थिंकींग असेल. अर्थात जर सेकंड हँड पुस्तके इतक्या विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत जसे क्रोज बुक शॉप, हेस्टींग्स, अन्य लहान दुकाने तर नवी पुस्तके वाचक घेतील असे वाटत नाही. आणि दुसरे एक म्हणजे सेकंड हँड पुस्तकांच्या दुकानात चॉइसेस्ट पुस्तके मिळतात. कारण वाचकांनी अगदी आवर्जून घेतलेली पुस्तके बहुधा तेथे विकावयास असतात.

काळाचा रेटा

काळाच्या रेट्यात काय होईल ते सांगता येत नाही.

मला कागदी पुस्तकेच वाचायला आवडतात अजून. कारण वाचायला बरे वाटते. स्क्रीनवर वाचणे कम्फर्टेबल वाटत नाही.

बाकी स्वतः पुस्तक वाचण्या ऐवजी कोणी रसाळपणे गोष्ट वाचून दाखवण्यापेक्षा स्वतः वाचलेली चांगली. स्वतःच्या वाचण्यात काही वेगळेच जाणवू शकते.

ठाण्याचे मॅजेस्टिकचे दालन बर्‍यापैकी चालते. तेथे पुस्तके चाळून वाचून विकत घेता येतात. क्रॉसवर्ड सारखी बसून वाचण्याची सोय मात्र नाही. :-(

कागदी पुस्तक वाचले जाण्याची शक्यता जास्त आहे. अन्यथा माझ्या लॅपटॉपवर कैक पुस्तकांच्या पीडीएफ (असू देत म्हणून) जमा केलेल्या आहेत.

नितिन थत्ते

अंशतः असहमत

बाकी स्वतः पुस्तक वाचण्या ऐवजी कोणी रसाळपणे गोष्ट वाचून दाखवण्यापेक्षा स्वतः वाचलेली चांगली. स्वतःच्या वाचण्यात काही वेगळेच जाणवू शकते.

वेगळेपणा दुसर्‍याने वाचल्यावरही जाणवू शकतो. किंबहुना, एक्स्पर्टस जेव्हा खाचाखोचा लक्षात घेऊन वाचतात तेव्हा त्याचा परिणाम अधिक असतो असेही विधान करता येईल.

कागदी पुस्तक वाचले जाण्याची शक्यता जास्त आहे. अन्यथा माझ्या लॅपटॉपवर कैक पुस्तकांच्या पीडीएफ (असू देत म्हणून) जमा केलेल्या आहेत.

लॅपटॉपवर वाचणे कठीण असते. लोळून वाचणे किंवा आरामशीर बसून वाचणे इ. लॅपटॉपसह जमणे काहीजणांना कठीण वाटू शकते. तसेच स्क्रिनच्या ग्लेअरमुळे वाचन कठीण होते. इ-रिडर किंवा आयपॅडचे तसे नाही.

माझ्याबाबतीत म्हणायचं झालं तर कोल्हटकरांनी इथे चढवलेलं ऐतिहासिक गप्पा गोष्टींचं पुस्तक वाचून झालं आहे आणि मी अनेक पीडीएफ लॅपटॉपवर वाचते.

एक हलके घेण्याजोगा प्रश्नः

स्क्रीनवर वाचणे कम्फर्टेबल वाटत नाही.

कम्फर्टेबल नसणे हे आपण म्हातारे होत असल्याचे लक्षण मानता येईल का? अनेक वृद्धांना कम्प्युटर वापरताना, मोबाईल वापरताना, डीव्हीडी प्लेअर किंवा तत्सम उपकरणे वापरताना कम्फर्टेबल वाटत नाही असा अनुभव आहे. ;-)

स्क्रीनवर वाचणे

किंडल किंवा आयपॅडवर ही अडचण भेडसावत नाही. किंडलची तर डीजीटल इंक अगदी कागदाचा आभास निर्माण करते. पण ह्या रीडर्सचा एक वेगळाच साइड इफेक्ट आहे. ह्या गॅजेट्सवरती पुस्तकाच्या जाडीची चिंता करावी लागत नाही आणि खरेदी करणे प्रचंड सोपे त्यामुळे अनेक पुस्तके जमा करुन एक ना धड अशी अवस्था होणे असा स्वानुभव आला आहे.

अजून जीव आहे!

* कागदी पुस्तकांचा जमाना, बुकडेपोंचा जमाना मागे पडतो आहे असं तुम्हालाही वाटतं का?
नाही. बिग्-बॉक्स् बुकडेपोंचा कदाचित पडत असेल, पण कागदी पुस्तकांचा नक्कीच नाही.
* बुकडेपोंची गरज आहे असे तुम्हाला वाटते का?
नाही. प्रत्येक शहरात काही स्वतंत्र पुस्तकाची दुकाने जास्त महत्त्वाची वाटतात. मोठ्या डेपोंची जागा ऍमझॉन ने घेतलीच आहे, आणि स्थानिक दुकानात न मिळणार्‍या पुस्तके मिळवून घेण्यासाठी ते उत्तम साधन आहे. पण स्थानिक, स्वतंत्र पुस्तकाची दुकाने (नवी किंवा पुनर्विक्रीची पुस्तके) एखाद्या समूहाच्या, गावाच्या वाचनाच्या आवडीचे बॅरोमीटर असतात असे वाटते. तीच टिकली नाहीत तर बिग-बॉक्स् दुकानांचेही काही खरे नाही. सध्या तरी ही आवड आणि गरज ई-पुस्तकांनी पुरी होत आहे असे वाटत नाही - वाचनक्रियेत मोठ्या स्तरावर बदल येईपर्यंत तरी ते कागदी पुस्तकांची जागा नाही घेऊ शकणार. आणि हा बदल व्हायला ई-रीडर्सचा समाजात वापर पुष्कळ वाढला पाहिजे, मनोरंजनार्थ वाचनापेक्षा बराच जास्त. भारताची तर गोष्ट सोडून द्या, इथे मोठ्या शहरांतल्या उच्चवर्गापलिकडे ही गॅजेट्स अद्याप नाहीतच; पण अमेरिकेत आठवड्याचे वाचन सॉफ्टकॉपीने विद्यार्थ्यांना पाठवले तर अर्ध्यावरून जास्त प्रिंटाउट घेऊन वर्गात येत. तिथेही दैनंदिन वापर फारसा बदलला नाही. त्यामुळे ई-वाचन, ई-पुस्तके तूर्तास तरी कागदी पुस्तकांना बाजूला सारतील असे वाटत नाही.
काहीसे अवांतरः बर्कले मध्ये समोरासमोर दोन दुकाने होती - एक स्थानिक स्वतंत्र, आणि एक बार्न्स्-&-नोबल. १७ स्थानिक दुकाने असलेल्या या गावात अर्थात बार्न्स्-&-नोबल बंद पडले! :-)

* अमेरिकेच्या धर्तीवर भारतातल्या बुकडेपोंची आणि क्रॉसवर्ड वगैरे मॉलसंस्कृतीची अवस्था कशी आहे?
पुण्याचे जंगली महाराज रोड वरचे एक क्रॉसवर्ड बंद पडले, बाकीच्या समान दुकानांची अवस्था मला माहित नाही, पण बॉर्डर्स वगैरेच्या तुलनेत क्रॉसवर्ड मध्ये तरी सिलेक्शन फारच भिकार होते. तेच ते पौलो कोएल्हो, स्टीग लार्सन, विलियम दॅल्रिम्पल, पेन्गुइन् क्लासिक्स, इनिड ब्लाइटन, डोमिनीक लापिएर..... पुस्तकाच्या दुकानापेक्षा हॉलमार्कच्या कार्डाचे दुकान वाटायचे. इथे कलकत्त्यात स्वतंत्र दुकाने अनेक आहेत, पण क्रॉसवर्डसारखी दुकाने पुस्तकांसहित अत्तर, सीडी, कपडे, कायकाय विकतात. त्यांचे बंगाली पुस्तकांचे सिलेक्शनही बर्‍यापैकी असते.
त्यापेक्षा फ्लिपकार्ट.कॉम चांगले वाटते, आणि ऑनलाइन बुक डेपो आजकाल भारतीय भाषांतली पुस्तकेही विकायला लागले आहेत, त्यामुळे भारतात सर्वत्र मराठी पुस्तके सहज मिळू शकतील!

कागदी पुस्तके

प्रत्यक्ष दुकानात जाउन खरेदी करण्याचा फारसा अनुभव नाही पण जे जातात त्यांच्याकडून बॉर्डर्स विषयी चांगले ऐकयला मिळाले नाही. बार्न्स अँड नोबल्स खूप सरस आणि ग्राहकाभिमुक आहे असे ऐकले होते. इंटरनेट आणि इबुक्सच्या स्पर्धेमधे दोन दोन चेन्स टिकणेही अशक्यच होते, एकाचा अंत निश्चित होता. हे केवळ पुस्तकांचेच नसुन सगळ्याच रिटेल क्षेत्रांमधे घडताना दिसते आहे. सर्किट् सिटी, मरायला टेकलेले ब्लॉकबस्टर आणि कधीच दिवगंत झालेले टॉवर रेकर्डस् ही त्याचीच काही उदाहरणे. माझ्या मते जो पर्यंत सार्वजनिक वाचनालये लोकांनी भरलेली आहेत तो पर्यंत कागदी पुस्तकांना मरण नाही. अजून तरी सार्वजनिक वाचनालये ओस पडलेली दिसत नाहीत. बॉर्डर्सच्या निधनाने त्यावर काही परीणाम होइल असे वाटत नाही.

अवांतरः अमेरिकेत कामानिमित्त बर्‍याच नोकर्‍यांमधे प्रवास भरपूर करावा लागत असल्याने मध्यमवर्गिय आणि उच्चमध्यमवर्गियांचा कल प्रवासात पुस्तके वाचण्याचा असतो. किंडल आणि आयपॅडमुळे विमानतळावरची दुकाने मात्र किती तग धरतील हे सांगता येत नाही.

चांगले मुद्दे

प्रत्यक्ष दुकानात जाउन खरेदी करण्याचा फारसा अनुभव नाही पण जे जातात त्यांच्याकडून बॉर्डर्स विषयी चांगले ऐकयला मिळाले नाही.

बार्नस् अँड नोबल्स सरस आहे याविषयी शंकाच नाही. बॉर्डर्सच्या डबघाईला येण्यामुळे गेली काही वर्षे हवी असणारी दुर्मीळ पुस्तके इ. मिळत नव्हती खरी पण त्याखेरीज वाईट अनुभव आलेले नाहीत.

माझ्या मते जो पर्यंत सार्वजनिक वाचनालये लोकांनी भरलेली आहेत तो पर्यंत कागदी पुस्तकांना मरण नाही. अजून तरी सार्वजनिक वाचनालये ओस पडलेली दिसत नाहीत. बॉर्डर्सच्या निधनाने त्यावर काही परीणाम होइल असे वाटत नाही.

+१.

अमेरिकेत कामानिमित्त बर्‍याच नोकर्‍यांमधे प्रवास भरपूर करावा लागत असल्याने मध्यमवर्गिय आणि उच्चमध्यमवर्गियांचा कल प्रवासात पुस्तके वाचण्याचा असतो. किंडल आणि आयपॅडमुळे विमानतळावरची दुकाने मात्र किती तग धरतील हे सांगता येत नाही.

याला अवांतर म्हणता येणार नाही. मी चर्चाप्रस्ताव घाईत टाकला त्यामुळे सर्व प्वाइंट्स टाकलेले नाहीत पण या मुद्द्यात दम वाटतो.

अंतःकाळ नव्हे अंतकाळ

अंतःकाळ असा शब्द मी आधी कुठे वाचल्याचे आठवत नाही. मोल्सवर्थच्या शब्दकोशातही ही मिळाला नाही. अंतकाळ आहे. इथे पहा

धन्यवाद

माझे लेखन सुधारण्यासाठी तुम्ही इतके कष्ट घेतलेत ते पाहून डोळे भरून आले. आपल्याकडून अशा विधायक कार्याची अपेक्षाच कधी ठेवलेली नाही. आपल्यातील हा बदल सुखावह वाटला.

संपादकांना काळजी असेल तर ते बदल करतीलच.

अति अवांतर - अंतःकाळ नव्हे अंतकाळ

माझ्याहि हे लक्षात आले होते...

'अनायासेन मरणं विना दैन्येन जीवितम्|
अन्तकाले च गोविन्द स्मरणं देहि मे तव||'

शाळेतील एक प्रसंगाची ह्यावरून आठवण झाली. संस्कृतच्या वर्गात एकाने ' अन्धःकार' असा उच्चार केल्यावर आमचे शिक्षक - जे स्वत: चांगले विद्वान् म्हणून नावाजलेले होते - ते म्हणाले - 'तुझा अन्धःकार ऐकून मला धक्का बसला!'

धूम्रपान हा असाच मराठीत अति-सवयीचा झालेला शब्द खरा धूम-पान असा आहे. धूम्र हा शब्द धूम पासून झालेले विशेषण आहे, ज्याचा अर्थ धूसर, करडा असा होतो

प्रतिसाद

जिव्हाळ्याच्या विषयावरचा लेख. लेखात मांडलेली परिस्थिती, उपस्थित केलेले मुद्दे आणि येथे झालेली चर्चा उद्बोधक वाटली.

कागदी पुस्तकांच्या मार्केटबद्दल लेखात जे मुद्दे उपस्थित केले गेलेले आहेत ते एकंदर जागतिक अर्थव्यवस्थेमधल्या सद्यस्थितीशी निगडीतच आहेत असं मला वाटतं. युरोप आणि आणि अतिपूर्वेकडच्या प्रगत देशांबद्दल मी निश्चित विधाने करू शकत नाही पण किमान उत्तर अमेरिकेबद्दल तरी असं दिसतं आहे की बॉर्डर सारखी दुकानंच नव्हेत तर शंभरेक वर्षं चालवली जाणारी वृत्तपत्रं बंद पडत आहेत किंवा चालवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.

पुस्तके/वृत्तपत्रांसमोर असलेली स्थिती, ही एकंदर सिनेमा/संगीत यांच्या क्षेत्रांत दिसणार्‍या प्रवाहाशी काही अर्थाने मिळतीजुळती आहे असं म्हणता येऊ शकतं. इंटरनेट् वरील संगीतश्रवणामुळे एकंदर रेकॉर्ड् लेबल कंपन्यांच्या धंद्यामधे बरीच उलथापालथ झाली. सुरवातीला अनिर्बंध प्रकारे चालवली जाणारी एम्पी३ ची देवाणघेवाण, त्यात बंद पडत चाललेली म्युझिक स्टोअर्स्, सीडीज् चा ढासळता खप, रेकॉर्ड कंपन्यांचे संपलेले नफे, मग चालवलेले गेलेले खटले, नॅपस्टर या सायटीचे बंद पडणे हा गेल्या दहा बारा वर्षांचा इतिहास सर्वश्रुत आहे आणि याचा म्युझिक इंडस्ट्रीच्या अर्थकारणावर झालेला कायमस्वरूपी परिणाम हाही सर्वाना माहिती आहे.

सिनेमा स्टुडिओज् च्या संदर्भातही, इतक्या प्रचंड प्रमाणात उलथापालथ घडण्याइतपत नव्हे तरी एकंदर मोठीच स्पर्धा आधी टिवीने नि आता इंटरनेट् ने निर्माण केली आहे यात शंका नाही. सिनेमा हॉलमधे अजूनही लोक जातातच परंतु डिव्हीडीची वाट पाहण्याचा, इंटरनेटवर स्ट्रीमींगवर पहाण्याचा पर्याय लोकांसमोर आहे आणि अधिकाधिक लोक हा पर्याय वापरत असावेत असं म्हणायला जागा आहे.

काहीसा अशा स्वरूपाचाच परिणाम एकंदर वाचकसंस्कृती, पुस्तकांचा खप , पुस्तके वाचण्याची पद्धत, पुस्तक वाचनाला दिले जात असलेले महत्त्व, पुस्तकांवर व्यतीत केले जात असलेले विविध वयोगटांतील व्यक्तींचे सरासरी तास या घटकांवर होत आहे हे निश्चित.

थोडक्यात इंटरनेटमुळे "इन्फोटेनमेंट् चे" ( इन्फर्मेशन आणि एंटरटेनमेंट् चे ) फारच मोठे भांडार लोकांसमोर आले आहे आणि याची परिणती सर्व पारंपरिक ज्ञानाच्या स्त्रोतांच्या ढासळत्या हिश्शावर झाली आहे हे निश्चित.

प्रगत देशांमधे (किमान उत्तर अमेरिकेतल्या) जर का ही स्थिती असेल तर भारतासारख्या "इमर्जिंग् मार्केट"मधे अजूनही पुस्तकविक्रीकरता तेजी आहे असं सामान्यपणे म्हणता येईल. यातसुद्धा फ्लिप् कार्ट् सारख्या इंटरनेट् पोर्टलचं माहात्म्य दिवसेंदिवस वाढत असेल असं समजायला हरकत नाही, तरी पुस्तकांच्या दुकानांना धोका उत्पन्न होण्याकरता किती वर्षं जावी लागतील हे आता सांगता येणार नाही.

डिजिटल पुस्तकांबद्दल तर भारतासारख्या ठिकाणची परिस्थिती अगदीच मागासलेली वाटते. प्रकाशकांचा निरुत्साह, आवश्यक त्या डिजिटल वितरणव्यवस्थांचा अभाव या सारख्या गोष्टींमुळे सध्या तरी भारतासारख्या इमर्जिंग मार्केट्स् मधे डिजिटल पुस्तकांचा मागमूस दिसत नाही. उत्तर अमेरिकेत मात्र निदान विक्रीच्या आकड्यांच्या संदर्भात कागदी आणि डिजिटल पुस्तकांच्या बाबत विरुद्ध ट्रेंड्स् आहेत असं दिसतं. अर्थात अजूनही कदाचित अमेरिकेत कागदी पुस्तकं अधिक विक्रीला जात असतील. पण हा वेग वर्षानुवर्षे मंदावतो आहे. आणि डिजिटल पुस्तकांच्या विक्रीच्या वाढीचा वेग निश्चितच कितीतरी पट अधिक आणि वर्धिष्णु आहे हे निश्चित.

येत्या काही वर्षांमधे काय बदल होत रहातील हे पहाणे निश्चितच रोचक आहे. पुन्हा एकदा लेख आणि चर्चा मला आवडली हे नमूद करतो.

चर्चेचा आवाका

चर्चेचा आवाका मला वाटल्यापेक्षा बराच मोठा असल्याचे या प्रतिसादावरून दिसते. :-)

थोडक्यात इंटरनेटमुळे "इन्फोटेनमेंट् चे" ( इन्फर्मेशन आणि एंटरटेनमेंट् चे ) फारच मोठे भांडार लोकांसमोर आले आहे आणि याची परिणती सर्व पारंपरिक ज्ञानाच्या स्त्रोतांच्या ढासळत्या हिश्शावर झाली आहे हे निश्चित.

सहमत आहे. स्वस्त, टिकाऊ आणि कमी जागा व्यापणारा. अनेक करमणूकीच्या साधनांचा एक कॉम्पॅक्ट पॅक म्हणून जर लॅपटॉप किंवा आयपॅड काम करत असेल तर अनेकांना ते सोयीचे पडते.

सध्या आमच्या ब्लू-रे प्लेअरवरून नेटफ्लिक्सपासून ऍमेझॉनपर्यंत अनेक चॅनेल्स वापरून चित्रपट पाहण्याची सोय झाल्यावर ब्लॉकबस्टरपर्यंत जायला लागू नये म्हणून पोस्टाने येणार्‍या नेटफ्लिक्सच्या डीवीडीही बंद करून टाकल्या. इंटरनेट टीव्हीमुळे केबल्सचा धंदा बसेल. इन्फोटेनमेंटची दौड इतक्या वेगाने सुरू आहे की कागदी पुस्तकांना मरण इतक्यातच नाही हे मान्य केले तरी अंतकाळ जवळ येत चालला आहे ही शंका मनात डोकावतेच.

डिजिटल पुस्तकांबद्दल तर भारतासारख्या ठिकाणची परिस्थिती अगदीच मागासलेली वाटते. प्रकाशकांचा निरुत्साह, आवश्यक त्या डिजिटल वितरणव्यवस्थांचा अभाव या सारख्या गोष्टींमुळे सध्या तरी भारतासारख्या इमर्जिंग मार्केट्स् मधे डिजिटल पुस्तकांचा मागमूस दिसत नाही.

मध्यंतरी कुहूबद्दल ऐकले होते तेवढेच या व्यतिरिक्त कोणाचीही खरेच तयारी नाही का डिजिटल मिडियामध्ये येण्याची? भारतातील सदस्यांना याबद्दल काही माहित असावे का?

मागे पडतो आहे, पण संपायला वेळ लागेल

मागे पडतो आहे, पण संपायला वेळ लागेल.

बॉर्डर्सच्या शेवटच्या आठवड्यात एक पुस्तक विकत घेतले त्यांच्याकडून. ओकेबोके दुकान पाहून वाईट वाटले.

माझ्या "बुक क्लब"ने या वेळी प्रथमच बिनछापील - शुद्ध संगणकीय - पुस्तक निवडलेले आहे.

गेल्या वर्षात ३-४ जुनी प्रत-अधिकारमुक्त पुस्तके मी संगणकावर-भ्रमणध्वनीवर वाचलेली आहेत. परंतु ४-६ पुस्तके कागदी छपाईची वाचलेली आहेत.

संगणकावर इंटरनेटवरून वाचायच्या पुस्तकांत पुष्कळदा छपाईची मांडणी (टाइपसेटिंग) सुबक नसते. छापील पुस्तकाच्या बाबतीत आका पानावरून दुसर्‍या पानावर जाताना कुठला मजकूर असावा, पान पलटण्याच्या क्रियेमुळे रसभंग होऊ नये, अशा प्रकारचा विचार केलेला आढळतो. ते गूगलबुक्स मोबाइल वरती चांगले नसते. तंत्रज्ञानाने पुढे ही सोयसुद्धा होईल.

छापील पुस्तकांच्या बाबतीत अजून माझ्या सवयीचे "सर्च फंक्शन" चित्रमय-अवकाशमय आहे. मी वाचलेल्या पुस्तकामध्ये एखादा लक्षणीय परिच्छेद कुठे आहे, त्याबद्दल माझी स्मृती अशी काहीशी असते : "साधारण इतक्या जाडीची पानांची थप्पी उलटली, की उजवीकडच्या पृष्ठावर वरच्या तृतीयांशात..."
अजूनही माझ्याकडचे लहानपणापासूनचे संस्कृत संदर्भग्रंथ पडताळताना कागदी प्रती सोयीस्कर वाटतात. यातील बहुतेक ग्रंथ इन्टरनेटवर उपलब्ध आहेत तरी मी कागदी प्रतीच वापरतो. परंतु मी संक्रमणाच्या पिढीतला आहे. प्रौढ वयातली सवय म्हणावी, तर कामकाजासाठी जे संदर्भ वापरतो, ते हटकून संगणकावरच. छापील प्रती क्वचितच काढतो. पुढच्या पिढीचे सर्वच संदर्भ संगणकीय अवकाशातले असू शकतील.
- - -

> कागदी पुस्तकांचा जमाना, बुकडेपोंचा जमाना मागे पडतो आहे असं तुम्हालाही वाटतं का?
अजून एकदोन पिढ्या तरी कागदी पुस्तके राहातीलच.

> बुकडेपोंची गरज आहे असे तुम्हाला वाटते का?
होय.

संक्रमणातील पिढी

मला वाटतं प्रत्येक पिढी संक्रमणातून जाते. शिळेवरील कोरीव काम, भूर्जपत्रावरील आणि नंतर कागदावरील हस्तलिखिते, त्यानंतर छपाई केलेली पुस्तके आणि आता डिजिटल, मल्टीमिडिया. जुने मागे पडून नव्याची कांस पकडायला हवी हे खरेच. 'जुने ते सोने', आम्ही नाहीच बदलणार असे म्हणून जगणारी माणसे आणि त्यांचे विचार पाठी पडत जातात. असं मात्र वाटतं की आपली पिढी आधीच वेगाने होणार्‍या संक्रमणातून फार भराभर पुढे सरकते आहे आणि याचे श्रेय बहुधा संगणकीय तंत्रज्ञान, इंटरनेट आणि जालसंस्कृतीला जाईल.

जवळ, पण फार नाही

माझ्या मते अंतकाळ जवळ आलेला आहे. पण अजून एकदोन पिढ्या जातील असं वाटतं. अजूनही इ-रीडर सुधारायला वाव आहे. तसंच जगभरच्या सुशिक्षित जनतेला ते परवडण्याइतके स्वस्त होणं, याला वेळ लागेल. भारतात सेलफोन ही अनेकांना इ-रीडरपेक्षा अधिक गरजेची वाटणारी वस्तू अतिशय वेगाने पसरायला देखील दहा वर्षं लागली. त्यामुळे किमतीला किमान दुप्पट व उपयुक्ततेने निम्म्याहून कमी असलेल्या इ-रीडरला तीसेक वर्षं सहज लागावीत. दरम्यान भारतात सुरूवातीला तरी सुशिक्षितांची वेगाने वाढ, पण तरीही सर्वसाधारण गरीबी यामुळे कागदी पुस्तकांची विक्री वाढतच जाईल.

वाचनानुभव हा कदाचित मल्टिमीडिया स्वरूपाचा होईल. म्हणजे, हवं असल्यास वाचा नाहीतर सिनेमाच्या सबटायटल्सप्रमाणे कोणीतरी तुम्हाला वाचून दाखवेल. जाहिरातीदेखील त्यात शिरतील असा संशय आहे.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

उत्तम

वाचनानुभव हा कदाचित मल्टिमीडिया स्वरूपाचा होईल. म्हणजे, हवं असल्यास वाचा नाहीतर सिनेमाच्या सबटायटल्सप्रमाणे कोणीतरी तुम्हाला वाचून दाखवेल.

उत्तम. ही गोष्ट अनेकांना आवडेल असे वाटते.

जाहिरातीदेखील त्यात शिरतील असा संशय आहे.

:-(

मुक्त मते

सर्वप्रथम बॉर्डर्सला मनापासून 'श्रद्धांजली!'. बर्‍याच चांगल्या आठवणी या पुस्तकालयात आहेत.
दुसरे या चांगल्या चर्चा प्रस्तावाबद्दल आभार

माझ्यापुरता/माझ्यासारख्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला उत्तर "छे छे असे येत्या-नजीकच्या काळात होणारच नाही" असे लगेच वाटावे. मात्र जरा विचार करता, नव्या पिढीकडे बघता हा विचार अजुन किती वर्षे करता येईल याची शंका मनात येते. काळाचा रेटा इतका जबरदस्त असतो की केवळ एखाद्या पिढीला किंवा काहि पिढ्यांना एखाद्या गोष्टीची सवय आहे म्हणून ती टिकून राहिल असे मानणे हा कल्पनाविलास म्हणावा लागेल. एखादी वस्तू/कल्पना किंबहुना काहीही टिकण्यासाठी त्याच्या सवयी सोबत त्याचे 'आर्थिक' मुल्यमापनही महत्त्वाची भुमिका बजावते. पुस्तकांमधेही जोपर्यंत इ-बुक्स वाचायची सोय सोपी नाहि व/ अथवा खर्चिक आहे तोपर्यंत कागदी पुस्तके ही आर्थिक दृष्ट्या ग्राहकाला आणि म्हणूनच प्रकाशकाला परवडतात / परवडतील.

जेव्हा ही पुस्तके वाचायची साधने अधिक सोपी आणि परवडण्याजोगी होतील तेव्हा जुन्या पद्धती आपोआप 'महाग' होतील व केवळ 'हौस' किंवा 'प्रेस्टीज' म्हणून जिवंत रहातील. आता मुख्य प्रश्नांकडे वळतो

कागदी पुस्तकांचा जमाना, बुकडेपोंचा जमाना मागे पडतो आहे असं तुम्हालाही वाटतं का?

होय.

•बुकडेपोंची गरज आहे असे तुम्हाला वाटते का?

मला गरज वाटते. नुसती बुकडेपोचीच नाहि तर कागदी पुस्तकांचीही. पण ही गरज सवयीमुळे + भावनात्मक आहे. काळाच्या रेट्याने होणार्‍या बदलांना दुर्दैवाने या दोन्ही गोष्टी कळत नसल्याने बुकडेपोंची गरज कमी होत जाईल असे वाटते. मात्र, बुक डेपोचं स्वरूप बदलेल आणि ते एक यशस्वी व्यवसायाचं साधन असेपर्यंत या ना त्या स्वरूपात हे डेपो दिसतील असे वाटते.

•अमेरिकेच्या धर्तीवर भारतातल्या बुकडेपोंची आणि क्रॉसवर्ड वगैरे मॉलसंस्कृतीची अवस्था कशी आहे?

सध्या तितकी वाईट नाहि. तसेच नाहि म्हटलं तरी लोकसंख्येमुळे म्हणा किंवा शिक्षणात वाढ झाल्याने म्हणा मधल्या काळात वाचकवर्ग (संख्येने) वाढला (टक्क्याने घटला). शिवाय कागदी नसलेली पुस्तके वाचायची साधने ही तितकीशी सोपी नाहित. जी सोपी आहेत ती महाग आहेत. याशिवाय नवसाक्षर वर्ग तितकासा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नाहि, तेव्हा ही साधने स्वस्त होईपर्यंत ही कागदी संस्कृती टिकेल-वाढेल असे वाटते.

पुढे काय? एक अंदाज:
माझ्यामते पुढेही कागदी पुस्तके छापली जातील. मात्र त्यांची संख्या अगदीच कमी आणि किंमत अतिशय जास्त असेल. कागदी पुस्तक असणे हे 'श्रीमंतीचे' लक्षण होऊन, मोठाल्या पार्ट्यांमधे श्रीमंत स्त्रिया पर्समधे एखादी पेपरबॅक आवृत्ती आवर्जून ठेवताना आढळतील ;)

अवांतरः मलाही पुस्तके 'ऐकायला' आवडत नाहीत कारण त्यात मी हरवू शकत नाहि (कदाचित सवतयीमुळे असलेली माझी मर्यादा.)

स्वगत १:
पुढल्या पिढीत एखादा ऋषिकेश जेव्हा आजी-आजोबांच्या वस्तु लिहायला घेईल तेव्हा त्यात कागदी पुस्तके येतीलसे दिसते. :)
स्वगत २:
नव्या डिजिटला पिढीतील वाचकांना, रसिकांनाही पुढील संदीप खर्‍यांच्या ओळी मनाला नक्की भिडतील, मात्र त्यातले दुमडले पान कल्पावे लागेल असे दिसते:

कधि राती लावुनिया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायला द्यावे!
शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग त्याने आपल्याला चाळायला हवे!! ….कधीतरी वेड्यागत वागायला हवे! -- संदीप खरे

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

काळमहिमा

बॉर्डर्सची साखळी बंद झाली याचे शल्य अद्यापही माझ्या मनात आहे. लवकरच मॉल्समधल्या या प्रचंड दुकानाच्या जागी दुसरं काहीतरी उभं राहिल.

~ "काळमहिमा" अगाध असतो हीच या विज्ञानयुगाची महती, जी सर्वानीच (हताशपणे का होईना पण...) स्वीकारली पाहिजे असेच 'बॉर्डर्स' ची कथा सांगते. शंभर वर्षाची परंपरा असलेला कोल्हापुरातील व्ही.शांताराम यांचा 'शालिनी सिनेटोन' जमीनदोस्त होत असताना पाहणारे ऐंशी वयाचे करवीरकर रडतानाचे फोटो स्थानिक वर्तमानपत्रात आले होते. आता 'मराठी चित्रपट व्यवसायाचा मूक साक्षीदार' जाऊन त्याच जागेवर बिल्डर लॉबीने उभे केलेले कॉम्प्लेक्स पाहणे क्रमप्राप्त झाले आहे.

कागदी पुस्तकांचा जमाना, बुकडेपोंचा जमाना मागे पडतो आहे असं तुम्हालाही वाटतं का?
~ अजून तरी तसे वाटत् नाही. निदान भारतात याची शक्यता खूप धूसर आहे.
बुकडेपोंची गरज आहे असे तुम्हाला वाटते का?
~ नक्कीच. ते ठिकाण केवळ खरेदीचे नसून संस्कृतीकेन्द्र म्हणून जपणे फार गरजेचे आहे असे वाटते.

'मास मार्केट'

'मास मार्केट' पेपरबॅक पुस्तकं कदाचित हळूहळू नामशेष होतील, पण विशिष्ट कलात्मक जाणीवेनं प्रकाशित केलेली पुस्तकं तगून राहतील असं वाटतं. उदाहरणार्थ, कॅलिफोर्नियातल्या काही पुस्तकप्रकाशकांविषयीचं The Art of the Book in California: Five Contemporary Presses हे प्रदर्शन नुकतंच स्टॅनफर्डमध्ये होऊन गेलं. त्याबरोबर Illustrated Title Pages: 1500 – 1900 या नावाचं काही सुप्रसिद्ध चित्रकारांनी घडवलेल्या मुखपृष्ठांचंही प्रदर्शन होतं. ही पुस्तकं दिसायला सुंदर होतीच, पण हाताळायचा ऐंद्रिय अनुभव आवश्यक का आहे हे पटवून देत होती. मराठीतदेखील प्रास प्रकाशन (अशोक शहाणे), मुद्रा (सुजित पटवर्धन) यांनी मोजकीच पण फार सुरेख पुस्तकं काढण्याचा पायंडा पाडला आणि चालू ठेवला आहे. ज्याप्रमाणे कृत्रिम धाग्यांच्या झुळझुळीत आणि स्वस्त साड्या उपलब्ध होऊ लागल्या तरीही पारंपरिक हातमागाच्या साड्या अद्यापही विकल्या जातात आणि सणासुदीला लग्नकार्यांना हौशीनं नेसल्या जातात, तसं कदाचित हे असेल.

- चिंतातुर जंतू :S)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||

कागदी पुस्तके

चर्चाप्रस्ताव आणि प्रतिसाद वाचले दोन्ही आवडले. बॉर्डर्स बद्दल वाचून धक्का बसला.

कागदी पुस्तकांच्या येत असणार्‍या अंतकाळाने हे घडले का, बॉर्डर्स विरुद्ध ऍमेजॉन बिजिनेस प्लान मुळे हे घडले हे याचा उलगडा फारसा झाला नाही. प्रकाशकांकडील माहिती मिळाली असती तर (कागदी आणि विनाकागदी पुस्तकांच्या ग्रोथरेट बद्दल) या विषयी मत मांडता आले असते.

काही कागदी पुस्तके अती मोठी असतात, इकडे तिकडे वागवता येत नाही, हातात उचलून वाचता येत नाही (टेकवून वाचावी लागतात.) अशा वेळी इ-पुस्तकांकडे वळावेसे वाटते. पण असे नसल्यास कागदी पुस्तके मला अजून तरी आवडतात. म्हणजे कुठेही वाटेल तशी धरता येतात आणि तुटल्या फुटल्याची फारशी काळजी नसते. मला जरी आवडत नसले तरी पाने दुमडून ठेवणे, पानांवर ग्राफिटी करणे, राग आला की जाळणे इत्यादींसारख्या क्रियांना कागदी पुस्तकांशिवाय पर्याय नसावा. (किंडल मी अजून बघितलेले नाही!) याशिवाय कोणाला तरी देणे आणि परत न मिळणे (वा याउलट) या क्रिया इ-पुस्तकात होणे कदाचित कठीण असावे. (हल्ली काही नेम नाही. असे पण करता येत असेल.)

प्रमोद

:-)

मला जरी आवडत नसले तरी पाने दुमडून ठेवणे, पानांवर ग्राफिटी करणे, राग आला की जाळणे इत्यादींसारख्या क्रियांना कागदी पुस्तकांशिवाय पर्याय नसावा. (किंडल मी अजून बघितलेले नाही!) याशिवाय कोणाला तरी देणे आणि परत न मिळणे (वा याउलट) या क्रिया इ-पुस्तकात होणे कदाचित कठीण असावे.

प्रतिसाद आवडला.

 
^ वर