फेलूदा - बंगाली साहित्याचा लाडका गुप्तहेर

मला सत्यजीत राय यांच्या प्रसिद्ध तरुण गुप्तहेर प्रदोषचंद्र मित्तिर, उर्फ 'फेलूदा'ची ओळख "शोनार केल्ला" या सिनेमाने झाली. सहा वर्षाचा मुलगा मुकूल धर अचानक एके दिवशी पूर्वजन्माबद्दल बोलू लागतो, आणि दूर राजस्थानातल्या जुन्या लढायांबाबत, उंट, रेत, चमकणारे खडे, सोनेरी किल्ला, अशा अनोळख्या गोष्टींच्या आठवणी सांगतो. एक विख्यात संशोधक मुकूलच्या पुनर्जन्माचा शोध लावण्यास त्याला राजस्थानला घेऊन जातात. पेपरात बातमी येते, आणि मौल्यवान खड्यांचा उल्लेख होतो. यामुळे काही गुंड लोक गुप्तधनाच्या आशेने त्यांच्या मागे लागतात, आणि हिप्नोसिसद्वारा मुकूलकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करतात. फेलूदा आणि त्याचा चुलत भाऊ तोपशे मुकूलच्या संरक्षणासाठी राजस्थानला धावतात, तेव्हा वाटेत त्यांना प्रसिद्ध रहस्य साहसकथालेखक लालमोहन गांगूली उर्फ 'जटायू' भेटतात. तिघांची चांगली जमते, आणि मुकूलला चोरांपासून वाचवून ते यशस्वीरित्या कलकत्त्याला परत घेऊन येतात.

का कोण जाणे, मला शोनार केल्लाने वेड लावले. राजस्थानचे चित्रण आणि लोकसंगीत, जटायूंच्या विनोदी भूमिकेत संतोष दत्त, खिन्नपणे किल्ला शोधणारा मुकूल, त्याच्या गतजन्माच्या आठवणींचे गूढ, आणि उंटावरून, रेल्वेतून, टॅक्सीतून खलनायकांचा पाठलाग करणारे दोघे भाऊ. सगळंच सुरसपणे एकत्र आलं होतं. शोले परत परत पहावा तसा मी पंचवीसएक वेळा हा चित्रपट पाहिला असेन. मग गोपा मजुमदार यांनी इंग्रजीत अनुवाद केलेल्या समग्र फेलूदा कथा वाचल्या. अलीकडे, अनेक वर्षांनंतर, अशोक जैन यांनी मराठीत अनुवाद केलेल्या बारा फेलूदा कथांचा संच पहवयास मिळाला. योगायोगाने, तेव्हाच एका नातेवाइकाने बंगाली वाचन सुधारण्याकरिता मला मूळ फेलूदा समग्रचे दोन खंडही भेट म्हणून दिले. याच निमित्ताने, या आवडत्या गुप्तहेराच्या जगाची थोडीशी ओळख.

राय यांनी १९६५-१९९५ या अवधीत एकूण ३५ फेलूदा कथा लिहील्या. त्यांचे आजोबा उपेंद्रकिशोर रायचौधरी यांनी बाल-किशोर वाचकांसाठी 'संदेश' हे मासिक एकेकाळी काढले होते. आजोबांसारखेच, राय यांचे वडील सुकुमार राय यांचा देखील बंगाली बालसाहित्यात सिंहाचा वाटा आहे - त्यांच्या 'आबोलताबोल' कविता शाळकरी मुलांना आजही पाठ असतात. सत्यजीत राय स्वतः दिग्दर्शक म्हणून जगविख्यात आहेत, पण किशोरवाचकांसाठी त्यांनी अनेक सायन्स फिक्शन लघुकथा लिहील्या. १९६१ राय यांनी 'संदेश' पुन्हा चालू केले, आणि १९६५ साली याच मासिकात पहिली फेलूदा कथा प्रसिद्ध झाली. ही इतकी लोकप्रिय झाली की पुढच्या वर्षी राय यांनी आणखी एक लिहीली. त्यानंतर कथा जशा लोकप्रिय आणि विस्तृत होत गेल्या, तशीच फेलूदाची व्यक्तीरेखाही जास्त पैलूदार होत गेली.

प्रदोष उर्फ फेलू मित्तिर देखणा, उंच, विशीतला असून, कथांचा निवेदक आणि त्याचा चुलत भाऊ तपेश (उर्फ तोपशे - एखा लहान मास्याचे नाव) त्याहून दहा-बारा वर्षांनी लहान आहे (म्हणूनच फेलू-दा). फेलूदाची स्मरणशक्ती उत्कृष्ट आहे, आणि बुद्धीबळ, बंदूक चालवणे, योगासन, क्रिकेट, पत्त्यांचे जादूचे खेळ, दोन्ही हाताने लिहीणे, या सर्वात तरबेज आहे. त्याला वाचनाची आवड आहे, आणि त्यातून सामन्य ज्ञान वाढवण्याची. केसबद्दलचे टिपण तो पुरातन ग्रीक लिपीत करतो. तो अत्यंत धाडसी आणि सत्यनिष्ठ आहे. शर्लॉक होम्स सारखेच तर्कशक्ती आणि निरीक्षणशक्तीद्वारे बारीक सारीक गोष्टींतून, बाबींतून रहस्य उलगडतो. थोडक्यात, तो तोपशेचा हीरो आहेच, पण किशोरवाचकांसाठी तो रोलमॉडेलही आहे. काही ठराविक कोडे त्याच्या समोर नेहमी येतात - मौल्यवान वस्तू अचानक घरातून गायब होणे हे राय यांचे लोकप्रिय रहस्य. सुरुवातीच्या कथांमध्ये तोपशेला रात्री जाग येऊन खिडकीत अनोळखी चेहरा दिसतो; सकाळी "पुढे चौकशी केलीत तर खबरदार!" अशी भीतीदायक चिठी सापडते. पुढल्या कथांमध्ये चोर्‍यांसकट खूनही होऊ लागतात, आणि फक्त धमक्याच नव्हे तर दोघा भावांना मारहाण आणि अपहरणही सहन करावे लागते. फेलूदाला तोपशे लहान-सहान प्रश्न विचारून साहाय्य करतो, तर जटायूंची प्रयत्न करूनही मदत होत नाही. माझ्या सर्वात आवडत्या कथा "देवतेचा शाप" आणि "रॉयल बेंगॉलचे रहस्य" - दोन्हीत राय यांनी रहस्य इतके गुंतागुंतीचे रचले केले आहे, की शेवटपर्यंत सस्पेन्स मस्त टिकून राहतो.

जैन यांनी निवडलेल्या कथांच्या शीर्शकावरूनच त्यांच्या लोकप्रियेतेचा सुगावा लागतो - "गंगटोकमधील गडबड"; "कैलासातील कारस्थान"; "मुंबईचे डाकू"; "काठमांडूतील कर्दनकाळ"... कधी लखनऊ आणि लक्षमणझूला, तर शिमल्याच्या बर्फात गुंडांचा पाठलाग, कधी वेरूळच्या लेणींत साहसी चकमक, तर कधी वाराणसीत गंगातटी तोतया स्वामींचा पर्दाफाश. प्रत्येक कथा वाचकाला एका वेगळ्याच, रम्य पर्यटनाच्या ठिकाणी घेऊन जाते. निघण्याआधी फेलूदा त्या ठिकाणावर पुस्तक वाचतो, आणि त्याबद्दल महत्त्वाची आणि रोचक माहिती तोपशेला कळवतो. अर्थात, वाचकांचाही त्यांच्या डोळ्यातून प्रवास घडतो. खासकरून दुर्गा पूजेच्या किंवा नाताळच्या सुटीत तोपशेला फेलूदाबरोबर जाता येते, आणि प्रवासाच्या तयारीत लाँड्रीत ठेवलेले गरम कपडे घेऊन येणे आनंदाचा, महत्त्वाचा भाग असतो. मुंबईला कलकत्त्याहून हिवाळा कमी असतो हे कळल्यावर तोपशेला निराशच वाटले असावे, कारण त्या खेपेला लाँड्रीत जावे लागले नाही हे तो आवर्जून सांगतो. किशोर वाचकाला अंगावर प्रसन्न शहारा साहसपूर्ण वर्णनानेच नाही तर थंडीच्या भासानेही येत असावा असे वाटल्यावाचून राहत नाही.

१९७० साली 'देश' या प्रौढ वाचकांच्या मासिकाने पहिली फेलूदा दीर्घकथा छापली, आणि पुढच्या तीन्ही तिथेच प्रसिद्ध झाल्या. किशोर वयाच्या मुलांच्या पालकही फेलूदाच्या कथा आवर्जून वाचत होते, हे सिद्ध झाले. राय यांना या वाचकवर्गाकडून कथा अधिक मसालेदार करण्याबाबत सतत पत्रे येत. पण मोठ्यांना कितीही आवडत असल्यातरी किशोरवाचकांना समोर ठेवून कथांना "स्वच्छ" ठेवणे भाग होते असे ते वारंवार नमूद करत. म्हणून शेवटपर्यंत हिंसा, सनसनाटी वर्णन, प्रेमप्रकरणावरून झालेले खून-गुन्हे इ. त्यांनी कथानकात टाळलेच. या 'सोज्ज्वळते'च्या इच्छेमुळे, की इंग्रजी 'ऍड्वेंचर स्टोरीज् फॉर बॉइज्' कथाप्रकाराचा या गोष्टींवर पडलेल्या छाप मुळे की काय कोण जाणे, पण सुरुवातीच्या अनेक कथांमध्ये मुली-स्त्रियाच नाहीत - लहान मुली नाहीत, पात्रांच्या आया-बायका नाहीत, तोपशेच्या वयाच्या मुली तर नाहीतच. किशोरवयाच्या मुलींना फेलूदा-तोपशेंच्या कथा कशा वाटल्या या बद्दल कुतूहल वाटते. वर, किशोर मुलांसाठी रोल मॉडेल असलेला हा तडफदार फेलूदा, सिगारेट मात्र पानोपानी ओढतो याचे आश्चर्य वाटते!

ऍगथा ख्रिस्टीच्या रहस्यकथांच्या प्रचंड लोकप्रियतेच्या संदर्भात त्यांचे "टी-केक् मिस्ट्रीज्" असे वर्णन कुठेतरी वाचल्याचे आठवते. त्यांची अनेक पुस्तके प्रचंड गाजली, आणि आजही रहस्यकथा प्रकाराचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. मूळ रहस्याच्या मांडणीबरोबर त्यांच्या लोकप्रियतेचे अजून एक कारण म्हणजे त्यांच्या पात्रांचा, स्थान-काळ-प्रथांचा परिचितपणा. लंडनहून रेल्वेने जाण्यासारखे छोटेसे सुंदर इंग्लिश गाव, तिरसट जमीनदार, कमी बोलणारा वकील, नको तिथे नाक खुपसणार्‍या म्हातार्‍या, तडफदार तरुणी, जरा जास्तच माहिती पुरवणारे दुकानदार, हिंसक घटनांमध्ये विक्षिप्त आनंद घेणारी मोलकरीण, ही सगळी ओळखीची पात्रे पुन्हा पुन्हा भेटावयास मिळतात. ख्रिस्टी यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य हेच आहे, की याच परिचित विश्वातून त्यांनी इतक्या विविध रहस्यकथा निर्माण केल्या. नवीन रहस्याचा आस्वाद घेता घेता, वाचक या ओळखीच्या पात्रांच्या पुनर्भेटीचा, त्यांच्या विश्वात काही काळ रमण्याचाही आस्वाद घेतात - एखाद्या ओळखीच्यांकडे चहाबरोबर "टी-केक्" खालल्यासारखे.

फेलूदा कथा सलग वाचून काढल्या की ख्रिस्टींची आठवण होते. फेलूदाची मदत घेणारे बहुतेक लोक बडे, जुने जमीनदार किंवा श्रीमंत मंडळी असतात. त्यांचे मोठमोठे वाडे, बागबगीचे, जुन्या गाड्या, घरभर नोकर-चाकर, भिंतीवर टांगलेले पूर्वाजांची चित्रे, झुंबर - अनेक गोष्टींतून राय यांच्याच 'जलसाघर' चित्रपटाचा सेट, किंवा "बीस साल बाद" मधला बंगला डोळ्यांसमोर येतो. यातील अनेक वयस्कर पात्रे थोडीशी विक्षिप्त असतात - त्यांना जुन्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद तरी असतो, किंवा पिढ्यांपिढ्या त्यांच्याकडे मुघलकालीन मौल्यवान वस्तू असतात. हिर्‍यांनी जडलेले तपकिरीचे डबे, पुरातन संस्कृत हस्तलिखिते, दागिने, मूर्त्या... फेलूदा चोरीला गेलेली औरंगझेबची अंगठी शोधून काढतो, गणेशाची मूर्ती, नेपोलियनचे पत्र, टिंतोरेत्तो या इटॅलियन चित्रकाराचे चित्र अशा अनेक संग्रहित वस्तू चोरांपासून वाचवतो. कथांतील एकूण तयार केलेल्या वातावरणावरून जुन्या काळचा समृद्ध, उच्चभ्रू बंगाली वर्ग समोर येतो. अर्थात, तो समृद्धीचा काळ आता राहिला नाही, हेही जाणवते - भल्या मोठ्या घरात बहुतेक खोल्या बंद असतात, वृद्ध मालक एक-दोन नोकरासहित राहतात, मुलं परदेशात असतात. लहान मुलांसाठी लिहीलेल्या या कथांद्वारे राय या गतविश्वाचे, थोडेसे उतरते का होईना, रोचक दर्शन घडवतात. ६०-७०च्या दशकांत गतविश्वाची आठवण असलेला, पण झपाट्याने बदलत चाललेला बंगाली मध्यमवर्ग हा फेलूदाच्या गोष्टींचा वाचकवर्ग. कथा सुरस आहेतच, आणि एखादी कथा आवडण्याचे लाखो कारण असू शकतात. तरीसुद्धा, यातील मोठ्या वाचकांसाठी कथांमधला हा परिचितपणा आणि त्यातून उद्भवणारा कडूगोड आनंददेखील त्यांच्या आकर्षणाचे कारण होते, असे वाटून जाते. एकूण अनोळखी आणि ओळखीचे सुरेख मिश्रण या सरळसोप्या कथांतून राय साधतात.

मला जटायूच्या व्यक्तीरेखेबद्दल कधी कधी वाइट वाटते. ते अत्यंत लोकप्रिय लेखक आहेत, पण चुकांनी आणि अतिशयोक्तीने भरलेली विकाऊ पुस्तके लिहीतात. फेलूदांकडून नेहमी बोलणी खातात, म्हणून पुढे पुस्तक छापण्याआधी ते फेलूदा कडून तपासून घेतात. मऊ माणूस, फेलूदांवर निस्सीम भक्ती असलेला. जटायूंचा अडाणी भित्रेपणा, त्यांचे टक्कल, नाजुक शरीरयष्टी, हे सगळे फेलूदाच्या बरोबर उलट तर आहेच. जटायूंचे देखील प्रत्येक पुस्तक वेगवेगळ्या देशांत, खंडात वसवलेले असते - 'हाँडूरासातील हाहाकार', 'सहार्‍यातला शहारा', इ. त्यांच्या वर्णनशक्तीद्वारे वाचकांचे पर्यटन घडवायचा त्यांचाही उद्देश्य असतो. त्यांचा कथानायक - प्रखर रुद्र - हा इतका प्रखर असतो की त्यापुढे फेलूदाही अगदीच फिका दिसतो. जटायूंच्या व्यक्तीरेखेद्वारे राय यांना स्वत:चीच हलकी-फुलकी मस्करी करायची होती, का तत्कालीन अन्य बंगाली रहस्यकथाकारांवर कडकडून टीका करावयाची होती हे निश्चित सांगता येत नाही.

जैन यांनी १२ कथांचा मराठी अनुवाद गोपा मजुमदारांच्या इंग्रजी अनुवादावरून केला आहे. मराठीतही कथानकाचा ओघ अगदी सरळ आणि सुरस आहे. मूळ कथेतले रहस्यमय, साहसपूर्ण वातावरण छान उतरले आहे. असे असून सुद्धा, भारतीय भाषांच्या देवाण-घेवाणाला इंग्रजीची वाढती मध्यस्ती चिंतनीय आहे. अनेक साहित्य अकदेमी पुरस्कृत पुस्तके इंग्रजी मार्गे अन्य भारतीय भाषांत येतात. उ. "गारंबीचा बापू" चा बंगाली अनुवादही इयन रेसाइडने केलेल्या इंग्रजी अनुवादावरून केला गेला आहे. याचा अनुवादित संहितेत मजकूरच नव्हे तर भाषाशैली, लक्षण, सूर, वाक्प्रचार, इ. कसे बदलतात, हा अभ्यासणाजोगा विषय आहे. मी जैन यांनी अनुवादित केलेल्या सगळ्या मराठी कथा वाचल्या नाहीत. पण एखाददुसर्‍या ठिकाणी मजकूर मराठीत काहीसा मजेशीर आणि कृत्रीम उमटला आहे. मूळ कथानकात बारीक, हलक्याफुलक्या विनोदाचा सूर आहे. बोलीभाषेच्या तुटक-तुटक वाक्यांतून तो उमटतो. मजुमदार यांच्या इंग्रजी रूपात वाक्यांचा हा तुटकपणा नाही, त्यामुळे तो खेळकरपणा थोडा मराठी रूपांतरातही नाहिसा झाला आहे.

पण एकदा वाचायला घेतले, की मराठी वर्शनही खाली ठेववत नाहीच! फेलूदा सारखेच अजून अनेक किशोरवयीन साहित्य आणि रहस्यकथा मराठीत आले पाहिजे अशी उत्कंठा जैन आणि रोहन प्रकाशनने निर्माण केली आहे.

Comments

चांगली ओळख

चांगली ओळख, हल्ली सकाळच्या पुरवणी मध्ये बहुदा रविवारी फेलुदाच्या मराठी अनुवादाची जाहिरात असते.

फेलुदा ची ओळख वाचून फास्टर फेणे आणि व्योमकेश बक्शीची आठवण येते, कदाचित व्योमकेश बक्षी हे शेरलॉक होम्स आणि फेलुदा ह्यांचे मिश्रण असावे, त्यातील कथा देखील रंजक आणि उत्कंठावर्धक आहेत.

पण एकदा वाचायला घेतले, की मराठी वर्शनही खाली ठेववत नाहीच! फेलूदा सारखेच अजून अनेक किशोरवयीन साहित्य आणि रहस्यकथा मराठीत आले पाहिजे अशी उत्कंठा जैन आणि रोहन प्रकाशनने निर्माण केली आहे.

फास्टर फेणे देखील ह्याच-सम आहे असे माझे मत आहे.

फँटॅस्टिक फेलूदा

मला वाटतं फस्टर फेणेलाच ध्यानात ठेवून जैन यांच्या मराठी संचाला "फँटॅस्टिक फेलूदा" असे नाव दिले असावे.

आवडली

फेलुदाची ओळख आवडली.
किशोर मुलांसाठी रोल मॉडेल असलेला हा तडफदार फेलूदा, सिगारेट मात्र पानोपानी ओढतो याचे आश्चर्य वाटते!
त्या काळात धूम्रपान करणे हे एक 'स्टाईल स्टेटमेंट' होते, आता नाही. उदाहरणार्थ आर्थर कॉनन डॉईलचा होम्स चेनस्मोकर आहे, बीबीसीने अलीकडे काढलेल्या मालिकेतील होम्स निकोटिन पॅच लावतो ('इट इज अ थ्री पॅच प्रॉब्लेम!'). हे एक कारण असावे. दुसरे कदाचित सत्यजीत राय यांचे स्वतःचे धूम्रपानप्रेम.
सन्जोप राव
हरेक बातपे कहते हो तुम के तू क्या है
तुमही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगू क्या है

होम्स

होम्सला कोकेनची लत होती. जेरेमी ब्रेटने होम्सची (अप्रतिम!) भूमिका केलेल्या जुन्या मालिकेत होम्स एका एपिसोडमध्ये त्याचा पाइप लांब समुद्रकाठी पुरून येतो, आणि पुन्हा कोकेन घेणार नाही अशी शपथ घेतो. मूळ कथेत हे नाही, पण ब्रेट ने युवक दर्शकांसाठी हे करायचे ठरवले.

स्टाइल स्टेटमेंट होते खरे, पण वाचकवर्गाची नाजुक इम्प्रेशनेबल मने राय यांच्या सतत समोर होती, म्हणून सिगरेटीचे नवल वाटते.

दुरुस्ती

जुन्या मालिकेत होम्स एका एपिसोडमध्ये त्याचा पाइप लांब समुद्रकाठी पुरून येतो, आणि पुन्हा कोकेन घेणार नाही अशी शपथ घेतो
मला वाटते आपल्याला सिरींज म्हणायचे असावे. पाईपमधून कोकेन घेता येते का याबद्दल कल्पना नाही.
'लत' हा शब्द आपण का वापरला असावा याबद्दल कुतुहल आहे. लत?
(पुढे एका प्रतिसादकर्त्याने 'धन्स' असाही अफलातून शब्द वापरला आहे, पण त्याबद्दल काही लिहीत नाही.)

सन्जोप राव
हरेक बातपे कहते हो तुम के तू क्या है
तुमही कहो के ये अंदाज-ए-गुफ्तगू क्या है

सिरिंज

हो हो, सिरिंज म्हणायचे होते! सॉरी.
मराठीत लत शब्द नाही का? हिंदीत लत = व्यसन. मला मराठीतही शब्द आहे असे वाटले होते, आणि मी त्याच अर्थी तो शब्द (फार विचार न करता) वापरला.
ता.क: मोल्स्वर्थ मध्ये लत शब्द सापडतो: -
लत [ lata ] f ( H) A trick, vice, evil habit. v लाग, पड, जड, & मोड, सुट. 2 Blameworthiness or faultiness. v लाव, लाग. Ex. हा आपल्या वचनास लत लावणार नाहीं.

माझं मराठी तसं गोलच आहे, मराठी लेखन सुधारायचे प्रयत्न करत आहे, त्यामुळे शब्द आणि वापर चुकले असल्यास जरूर सुधारावेत!

वा!

वा! छान ओळख! फेलुदाचे एखादे तरी पुस्तक वाचायची इच्छा जागृत झाली. (आणि शोनार केल्ला ही डाउनलोडायला लावतो)
आमच्या लायब्ररीवाल्यांना सागितले पाहिजे की हे भाषांतरीत संच घ्या म्हणून ;)
आवडल्यास
स्वतः विकतही घेईनच

ऋषिकेश
------------------
कधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का?

धूम्रपान

धूम्रपानाचे नेमके तोटे न कळलेल्या काळात धूम्रपानाची इश्टाइल फेमस होती. पूर्वीचे अनेक नट पडद्यावर सिगरेटचे झुरके घेताना दिसत. प्राणच्या वलयांकित धूम्रपानाला चंदेरीवलय होते.

असो. फेलूदाची ओळख आवडली असे नेमके म्हणता येणार नाही कारण फेलूदाबद्दल मी आधीही वाचले आहे पण लेख आवडला. (फेलूदाबद्दल कोणी लिहिले होते? मनोगतावर मीराताईंनी का?)

दुवा

लेखाचा दुवा असल्यास अवश्य द्या. वाचायला आवडेल. मला एक-दोन वर्तमानपत्रातले छोटे लेख सोडले तर मराठीत जालावर या विषयावर काही सापडले नाही.

ऐकून होते

फेलूदांबद्दल बंगाली मित्रांकडून ऐकून होतेच. आज आणखी थोडी माहिती मिळाली.

मला असं दिसलं की आता पंचविशीत असणार्‍या, इंग्लिश माध्यमात शिकलेल्या बंगाली मुलांना फेलूदांबद्दल तेवढी आपुलकी नव्हती जेवढी बंगाली माध्यमात शिकून लहानपणी ती पुस्तकं वाचणार्‍यांना होती. इंग्लिश माध्यमात शिकलेल्या बंगाली मुलांचा जीव 'केल्व्हीन अँड हॉब्ज'मधे जास्त रमतो (इतरांनाही ते आवडतात हे खरंच) असं दिसलं.

माझ्या ओळखीतल्या बंगाली पुरूषांमधलं धूम्रपानाचं प्रमाण पहाता फेलूदा पानापानावर सिग्रेटी ओढतात यात मला आश्चर्य वाटलं नाही. प. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेब भट्टाचारजी यांच्या धूम्रपानाबद्दलच्या अनेक बातम्या वर्तमानपत्र आणि आंतरजालावर वाचलेल्या आहेत. दुवा १, दुवा २, इ.

इंग्रजी माध्यम

हो, आजकाल इंग्रजी माध्यमात शिकणार्‍या मुलांचे बंगाली वाचन कमी होत चालले आहे असे सगळे म्हणतात. १०-१५ वर्षांपूर्वी देखील असे नव्हते - माझ्या समवयीन इंग्लिशमधून शिकलेल्या बंगाली मुला-मुलींचे बंगाली वाचन माझ्या आणि बाकीच्या इंग्लिश-मीडियम मराठी/ हिंदी/ तमिळ मुलामुलींपेकक्षा नक्कीच जास्त होते.

माझ्या ओळखीतल्या बंगाली पुरूषांमधलं धूम्रपानाचं प्रमाण पहाता फेलूदा पानापानावर सिग्रेटी ओढतात यात मला आश्चर्य वाटलं नाही.

+१! तो चारमिनार प्लेन ओढायचा हेही अगदी उत्साहाने सांगतात!

फेलुदाची ओळख आवडली

फेलुदाची ओळख आवडली

मराठी पुस्तक

मराठी पुस्तकाची किंमत रु. ७५ असून ऑनलाईन १०१ रुपयांना उपलब्ध आहे.
'रॉयल बेंगॉलचे रहस्य' सुद्धा तितक्याच किंमतीला दिसते आहे.
तर संपूर्ण फेलुदा संग्रह (२ खंड-प्रत्येकी रु. २९३) इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे.

(सत्यजीत रे यांच्या या पैलूची माहिती नव्हती...धन्स!!)

संपादित ता. क. :थँक यू=थँक्स, तसं धन्यवाद=धन्स...(या शब्दासाठी मराठी आंतरजालास धन्स)

||वाछितो विजयी होईबा||

महापुरुष

फेलु-दाचा परिचय आवडला. शोनार केल्ला हा चित्रपट बघण्याच्या यादीत टाकला आहे. सत्यजीत राय यांचे हे अंग माहित होते पण त्याबद्दल फारसे काही वाचले नव्हते. या परिचयाने त्यांचा कापुरुष-महापुरुष हा जोड सिनेमा आठवला. त्यातील 'महापुरुष' मधील बाबाची फसवेगिरी उघडकीस आणण्यात केलेली युक्ति या अंगाने जाते. (अवांतर: हा सिनेमा बघितल्यावर बाहेर आलेला प्रेक्षक हा दोन्ही हात विरुद्ध चक्राने फिरवण्याचा प्रयत्न करीत बाहेर पडतो. )

या निमित्ताने अजून एक जाणवले की डिटेक्टीव शब्दाला मराठीत चपखल शब्द नाही. (शोध घेऊन सापडले नाही.) गुप्तहेर स्पायला जवळचा आहे. शेरलॉक होम्स, पॉयरॉ, धनंजय यांना गुप्तहेर म्हणावे हे मला फारसे पटले नाही.

प्रमोद

फसेवेगिरी करणारे बाबा

राय यांच्या कथांमध्ये बाबा-स्वामी-ज्योतिषी-न्युमरॉलॉजिस्ट-सन्यासी अनेकदा येतात. शोनार केल्ला मध्ये हिप्नोसिस करणारा भवानंद, जय बाबा फेलूनाथ मध्ये मछली बाबा, अशी बरीच पात्रे आहेत. राय यांना पुनर्जन्म, भूत, निराळ्या "पॅरानॉर्मल" गोष्टींमध्ये रस होता - त्यांच्या अनेक लधुकथांमध्ये भुताटकी, भीतीदायक, रॅशनल दृष्टीकोणातून न समजण्यासारखे प्रसंग होते. काही कथांत सस्पेन्स तसाच बनून राहतो. फेलूदाच्या कथांत मात्र फेलूदा सगळ्यांबद्दल पूर्वग्रह मनात न बाळगायचा प्रयत्न करतो, पण शेवटी बहुतेक स्वामी-बाबा फसवेच निघतात.

महापुरूष ची आठवण करून दिल्याबद्दल आभार! बिरिंचीबाबा अफलातून पात्र आहे - "लोक म्हणतात क्रुसीफिक्शन, मी म्हणतो क्रुसीफॅक्ट!"
सिनेमा च्या मूळ लघुकथेचा इंग्रजी अनुवाद येथे वाचायला मिळेल.

डिटेक्टिव्ह साठी मराठीत "सत्यान्वेषी" शब्द काही ठिकाणी पाहिला आहे. "गुप्तहेर" असमाधानकारक आहे खरा, पण सत्यान्वेषी पेक्षा सरळसोपा वाटतो. शब्दश: अनुवाद केला तर "शोधकरी" (detective) किंवा "तपासक" (investigator) शब्द येऊ शकतात का?

अन्वेषक, शोधक, तपासनीस

अन्वेषक, शोधक, तपासनीस, हेसुद्धा चालतील.

"अन्वेषक" शब्दाचा फायदा असा की "अन्वेषण" शब्दाशी त्याचा संबंध लागतो. पोलीस दलातील हे काम करणार्‍या विभागाला "अन्वेषण खाते" म्हणतात, असे वाटते.

शोधक नजर असते. तसाच हा मनुष्य शोधक, असे म्हणता येईल.

तपासनीस हा शब्द आधीच अस्तित्वात आहे. त्याचे अर्थवलय डिटेक्टिव्ह पर्यंत ताणता येईल.

अन्वेषक

अन्वेषक शब्द आवडला. तपासनीस पण ठीक आहे - पण अन्वेषक मध्ये एक भारदस्तपणा वाटतो.

अतिशय छान ओळख

सत्यजीत राय यांनी उत्तम किशोर-साहसकथा लिहिल्या हे माहीत नव्हतं. त्यांच्या चित्रपटातल्या एकेक फ्रेम्स छोटीशी कथा सांगणाऱ्या टिप्पणी करणाऱ्या असतात. त्यांचं लेखन तसंच चित्रदर्शी होतं का हे पहायला आवडेल.

राजेश

द्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा
भावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी

धन्यवाद

उपक्रमवरच्या माझ्या पहिल्या लेखाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.

ओळख आवडली.

शोनार केल्ला हा चित्रपट खूप आवडला होता. फेलूदाच्या इतर कथा मात्र वाचलेल्या नाहीत. फेलूदाची ओळख आवडली.

ओळख आवडली

फेलुदाच्या कथांचे एक भलेमोठे संकलन मागील भारतवारीत आणले आहे. या लेखामुळे परत त्या पुस्तकाची आठवण झाली. आता वाचतेच.

आभारी आहे

फेलुदाची थोडक्यात एक चांगली ओळख करून दिल्याबद्दल आभारी आहे.

अवांतर:
ही डाकनामे बरेचदा निरर्थक आणि गोड असतात असे वाटते. उदा. टुटू, बुबला.
सौमित्र चॅटर्जी आणि सव्यसाची चक्रवर्ती हे दोन्ही अभिनेते मला आवडतात. आणि दोघांनाही फेलुदाचे काम केले आहे.

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

पडद्यावरचे फेलूदा-जटायू

सौमित्र तर ग्रेटच! सव्यसाचीपण चांगला फेलूदा उभा करतो, पण सौमित्रची बातच और होती.
लेख इथे टाकल्यावर ही बातमी वाचली. अलीकडे जटायूची भूमिका करणारे बिभू भट्टाचार्य निधन पावले. "रॉयल बेंगाल रहस्य" चे शूटिंग नुकतेच संपवून! संतोष दत्त च्या तुलनेत त्यांचा जटायू जरा जास्तच धांदरट आणि भित्रा वाटत असे, तरी ते ही खूप लोकप्रिय झाले होते.

डाकनामांबद्दल +१...

अनुवाद

नेटसुविधा नसलेल्या गावी गेलो होतो त्यामुळे हा सुंदर लेख वाचायला आणि पर्यायाने प्रतिक्रिया [वेळीच] देता आली नव्हती.

फेलुदा आणि त्यांच्या शोधमोहिमा याविषयी वाचले होतेच. 'फेलुदा' वरील सत्यजित रे यांचे ते दोन्ही चित्रपटही [इंग्रजी सबटायटल्ससह] 'रे महोत्सव' निमित्ताने फिल्म क्लब सोसायटीमाध्यमाद्वारे पाहण्याची संधीही लाभली होती [त्या आठवड्यातच माधवी मुखर्जीची "चारूलता" ही पाहण्याचे भाग्य लाभले होते. रोचना यांच्याकडून केव्हातरी 'माधवी' बद्दल इथे वाचायला मिळावे अशी अपेक्षा व्यक्त करतो.]

"गारंबीचा बापू" चा बंगाली अनुवादही इयन रेसाइडने केलेल्या इंग्रजी अनुवादावरून केला गेला आहे."

~ या अनुवादासंदर्भात श्री.रेसाईड यानी लेखक श्री.ना.पेंडसे यांच्याशी कादंबरीतील विशिष्ट् शब्दांच्या अर्थाविषयी केलेल्या पत्रव्यवहाराची आठवण येते. अनुवाद सरस उठण्यासाठी एखाद्या प्रांतातील/मातीतील शब्दांचा अर्थ जर कोषात सापडत नसेल तर त्यासाठी सात समुद्रापल्याड राहणार्‍या लेखकाशी केवळ पत्राद्वारे (त्यावेळी टेलिफोन परवड्त नसणार आणि ई-मेलचा तर प्रश्नच नव्हता) संपर्क साधून त्याच्या उत्तराची/खुलाशाची वाट पाहण्याइतपत सोशीकता श्री.रेसाईड यानी दाखविली होती आणि त्यामुळेच तो इंग्रजी अनुवाद सरस झाला होता.

~ हट्टाने प्रत्येक शब्दाचे 'मराठीकरण' करून इंग्रजी कादंबर्‍यांचे अनुवाद करणेही कित्येकदा अतिरेकीपणाचे ठरते. उदा. मनोहर माळगांवकरांच्या 'दि प्रिन्सेस' कादंबरीमध्ये नायक अभयराजे यानी वाड्यात पाळलेल्या मेंढराचे नाव असते 'कॅनन्'. मराठीत कादंबरीचा अनुवाद करताना हे मूळचेच नाव जसेच्या तसे ठेवणे गरजेचे होते, पण भा.द.खेर त्या नावाचाही अनुवाद करतात ~ कोकरूचे नाव ठेवले "तोफगोळा". फार रसभंग होतो अशावेळी.

अशोक शहाणे यानी मात्र थेट बंगालीतून मराठीत प्रभावी अनुवाद केले आहेत, हेही जाताजाता सांगावेसे वाटते.

अनुवाद

रेसाइड यांनी केलेला "भाउसाहेबांच्या बखरी" चा अनुवाद वाचण्यासारखा आहे. बखरींच्या शैलीला इंग्रजीत उतरवणे अजिबात सरळ नाही, पण मूळ कथेतला रोमांच, वेग, आणि करुण-वीर रसांचे विलक्षण मिश्रण अनुवादातही बनवून ठेवणे त्यांना चांगलेच साधले आहे. पेंडसें बरोबर त्यांचा पत्रव्यवहार कुठे छापला गेला आहे का?

~ हट्टाने प्रत्येक शब्दाचे 'मराठीकरण' करून इंग्रजी कादंबर्‍यांचे अनुवाद करणेही कित्येकदा अतिरेकीपणाचे ठरते. उदा. मनोहर माळगांवकरांच्या 'दि प्रिन्सेस' कादंबरीमध्ये नायक अभयराजे यानी वाड्यात पाळलेल्या मेंढराचे नाव असते 'कॅनन्'. मराठीत कादंबरीचा अनुवाद करताना हे मूळचेच नाव जसेच्या तसे ठेवणे गरजेचे होते, पण भा.द.खेर त्या नावाचाही अनुवाद करतात ~ कोकरूचे नाव ठेवले "तोफगोळा". फार रसभंग होतो अशावेळी.

सहमत. ललित, लहानशा रहस्यकथा असल्यामुळे इथे एवढा फरक जाणवत नाही खरा, आणि मजकूरात चूक होत नाही. पण जैन यांचा अनुवाद अजून काळजीपूर्वक करता आला असता असे वाटते. आता माझ्या समोर पुस्तके नाहीत, पण आधी सांगितल्या प्रमाणे, मूळ कथानकातला हलके-फुलका हसरा निवेदनाचा सूर इंग्रजी-माध्यमामुळे सपाट झाला आहे. आणि काही शब्दवापर विचित्र झाले आहेत - एके ठिकाणी मूळ कथेत जटायू "उरे बाबा!" असे काहीतरी उद्गारतात. त्याचे इंग्रजीत "ओह् नो!" असे झाले आहे. तेच मराठीत "अरे बापरे" होण्याऐवजी "ओह्, नाही!" असे झाले आहे. बंगालीत एस्पिरिन का कुठल्यातरी डोकेदुखीच्या गोळीचे इंग्रजीत "पेन्किलर" होते. ते मराठीत "वेदनाशामक गोळी" असा कृत्रिम शब्द येतो - डोकेदुखीची गोळी, अथवा क्रोसिन दोन्ही चालले असते. अशी अनेक छोटी छोटी उदाहरणे आहेत - स्वतंत्र नव्हे तर एकत्र घेतल्या की रसभंग होतो. गारंबीचा बापू सारख्या मोठ्या कादंबरीच्या अनुवादात बंगालीत काय झाले आहे कोणास ठाउक.

चारुलता बद्दल पुन्हा केव्हातरी - मला खरंतर चारूलता पेक्षा महानगर मधली माधवी जास्त आवडते..

वेदनाशामक गोळी

इएन रेसाईड आणि पेंडसे यांच्या पत्रव्यवहारातील काही पत्रे खुद्द पेंडश्यांनी 'श्री.ना.पेंडसे : लेखक आणि माणूस' या आत्मचरित्रात प्रसिद्ध केली असून इतर अन्य पत्रांसोबत शिरुभाऊंचा सारा पत्रव्यवहार आता "मौज प्रकाशन गृहा"कडे आहे. मौजेच्या परंपरेनुसार तो केव्हा पुस्तकरुपात येईल त्याचवेळी ती सारी पत्रे वाचावयास मिळतील, तो पर्यंत वाट पाहावीच लागेल.

कोकण भागातील मराठी शिकण्यासाठी रेसाईड खास आले होते आणि पेंडश्यासमवेत सारा मुरूड परिसर त्यानी पिंजून काढला होता. पेहरावही मुद्दाम तिथला धोतर उपरणे असा वापरत. अंगावरच्या उपरण्याला ते 'अंगवस्त्र' असे समजत. मात्र नंतर माधव आचवलांनी त्याना 'वस्त्र' आणि 'अंगवस्त्र' ह्यातला फरक सांगितला तेव्हा मराठी भाषा किती निसरडी अहे ह्याची त्याना कल्पना आली.

अनुवादकर्त्यांनी भाषेची अशी लवचिकता तपासणे फार गरजेचे असते, अन्यथा वर दिलेल्या उदाहरणातील 'वेदनाशामक् गोळी' सारख्या कृत्रिमतेला सामोरे जावे लागते.

["महानगर" पाहिला आहे. माधवी मुखर्जी यातही लाजवाब आहेच, पण 'चारुलता' माईल स्टोन असेल.]

 
^ वर